संस्कृत साहित्याच्या इतिहासात बाराव्या शतकात झालेल्या जयदेव कवीचे विख्यात संस्कृत काव्य आहे गीतगोविंद. संस्कृतमधील भगवान श्रीकृष्णांवर आधारित असंख्य काव्यांपैकी अत्यंत श्रेष्ठ असे एक काव्य म्हणून गीतगोविंद प्रसिद्ध आहे. या काव्याचा विषय राधा-कृष्णांच्या परस्पर अनुराग, विरह आणि मीलन असा आहे. चैतन्य संप्रदायात या काव्याला विशेष महत्त्व आहे. रोमेश चंद्र दत्त, चिं.वि. वैद्य, डॉ. कीथ असे अनेक विद्वान गीतगोविंदाची उत्तम काव्यात गणना करतात.
या अत्यंत रसाळ काव्याचा विचार करता लोकप्रियतेचा विचार करता त्याचे प्रधान कारण म्हणजे सदर काव्य हे गेय अशा राग आणि तालात बांधलेले आहे. त्याचे चोवीस प्रबंध आहेत. त्याची बारा सर्गात विभागणी केलेली आहे. प्रत्येक प्रबंधाच्या आधी व नंतर विविध वृतांत श्लोक रचलेले आहेत.
श्रीकृष्ण हा या काव्याचा नायक असून राधा ही नायिका आहे. त्यांची सखी त्या दोघांच्यात मध्यस्थाचे काम करते. नायक नायिकेच्या अवस्था एकमेकांना सांगणे हे तिचे काम आहे. संस्कृत साहित्यात नोंदविल्या गेलेल्या अभिसारिका,वासकसज्जा, विप्रलब्धा इत्यादी नायिकांचे प्रकार जयदेवाने या काव्यात वर्णन केलेले आहे.
गीतगोविंदात राधाकृष्णांच्या प्रणयलीला अत्यंत काव्यमय भाषेत रंगविल्या आहेत. विप्रलंभ आणि संभोग अशा दोन्ही प्रकारच्या शृंगाराचा उत्कट परिपोष त्यात आढळतो असे अनेक पंडितांनी वर्णन केले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांच्या माध्यमातून सगळ्यांना समजलेल्या मधुरा भक्तीची बीजे ह्या काव्यात आढळतात असे म्हटले जाते.
शृंगाराच्या आवरणाखाली जयदेवाने गूढ आध्यात्मिक अर्थ ध्वनित केला असून राधा व कृष्ण हे अनुक्रमे जीवात्मा आणि परमात्मा ह्यांवरील रूपक होय, असेही काही अध्यात्मनिष्ठ अभ्यासकांचे मत आहे. असा आध्यात्मिक अर्थ लावण्यास अनुकूल ठरणारे काही उल्लेख ह्या काव्यात आढळत असले, तरी एकंदरीने पाहता राधाकृष्णाचे प्रेम हे स्त्री-पुरुष प्रेमाचेच प्रतीक होय, असा सर्वसामान्य समज आहे.
गोपनाट्य, भावनाट्य, उत्कटनाट्य अशा एखाद्या नाट्यप्रकारात हे काव्य बसविण्याचा प्रयत्न सर विल्यम जोन्स आदी पाश्चात्त्य पंडितांनी केला आहे. तथापि अशा कोणत्याही प्रकारात हे काव्य काटेकोरपणे बसत नाही. निवेदन, वर्णन, भाषण, गीत इत्यादींचा उचित वापर करून जयदेवाने ह्या काव्याला एक आगळेच रूप दिले आहे. त्यामुळे हे काव्य खरोखरच एकमेव द्वितीय आहे.
जयदेवानंतरच्या साहित्यशास्त्रकारांनी ह्या काव्याच्या स्वरूपाचा विचार केल्याचे दिसत नाही. ह्या काव्यविषयाचा निश्चित मूलाधार दाखविणे कठीण आहे. त्यास ब्रह्मषैवर्तपुराणातील राधाकृष्ण कथेचा काहीसा आधार असावा. तसेच श्रीमद्भागवतपुराणातील कृष्णगोपींच्या रासलीलांवरूनही जयदेवाने स्फूर्ती घेतली असावी असे अभ्यासकांचे मत आहे.
गीतगोविंदातील अष्टपदी रचनेवर तत्कालीन अपभ्रंश काव्यशैलीचा गाढ परिणाम जाणवतो. पुढील काळात जयदेवांच्या प्रेरणेने गीतराघव, गीतगौरीपति इ.अनेक काव्ये गीतगोविंदाच्या अनुकरणाने लिहिली गेली. आलंकारिकांनी उदाहरणादाखल त्यातील अवतरणे दिलेली आहेत.
गीत गोविंद या वैशिष्ट्यपूर्ण काव्यावर सुमारे ४० टीका लिहिण्यात आल्या आहेत यातून त्याचे महत्त्व आणि लोकप्रियता लक्षात येते. अनेक युरोपीय आणि भारतीय भाषांतून ह्या काव्याचे अनुवाद झाले आहेत. गीतगोविंदाची इंग्रजी भाषांतरे सर विल्यम जोन्स आणि एडविन आर्नल्ड ह्यांनी केली आहेत. दत्तात्रेय अनंत आपटे ह्यांनी गीतगोविंदाचे मराठी भाषांतर , पंडित जयदेवकृत सार्थ गीतगोविंद काव्य किंवा राधामाधवविलास ह्या नावाने केले आहे.
विविध नृत्य शैली मध्ये गीतगोविंदातील रचना कलाकारांनी स्वीकारलेल्या आहेत हे या रचनेचे वेगळे वैशिष्ट्य. गेल्या जवळ जवळ हजार वर्षापासून भारतीय रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारे हे वैशिष्ट्यपूर्ण काव्य जयदेवांना अमर करणारी रचना आहे.
ऐश्वर्या नंदकिशोर मोहितकर
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. भाग २
दि. ०६. ०७. २०२२
