गुगल आपला गुरू

पुस्तकांच्यामधील व पुस्तकांच्या बाहेरची सर्व माहिती गुगलमध्ये मिळते, म्हणजे गुगल एक प्रकारे गुरुचीच भूमिका पार पाडतो. गुगल २४ तास आपल्यासमोर ज्ञानाचे भांडार उघड करतो. पूर्वी कुटुंबात काही अडचणी आल्या की घरातील मोठ्या माणसांना विचारलं जायचं आता कसलीही शंका मनात आली की लहान मुलंसुद्धा सरळ गुगलचा आधार घेतात आणि आपलं शंका निरसन करून आपल्या ज्ञानात भर पाडतात.



पुस्तकांच्यामधील व पुस्तकांच्या बाहेरची सर्व माहिती गुगलमध्ये मिळते, म्हणजे गुगल एक प्रकारे गुरुचीच भूमिका पार पाडतो. गुगल २४ तास आपल्यासमोर ज्ञानाचे भांडार उघड करतो. पूर्वी कुटुंबात काही अडचणी आल्या की घरातील मोठ्या माणसांना विचारलं जायचं आता कसलीही शंका मनात आली की लहान मुलंसुद्धा सरळ गुगलचा आधार घेतात आणि आपलं शंका निरसन करून आपल्या ज्ञानात भर पाडतात.

गुगलवर पूर्णपणे विसंबून न राहाता एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्याकडे पाहायला हवं. अलीबाबाच्या गुहेसारखं? ‘खुल जा सिम सिम’ सारखं हवी ती वस्तू मिळत नाही; पण हवी ती माहिती नक्कीच मिळते.

पुस्तक आपला गुरू असतोच; पण पुस्तकांच्या पलीकडे गुगलही आपला गुरू असतो. ज्ञानाचा प्रचंड स्फोट झाला आहे आणि रोजच नवीन नवीन कल्पना, संकल्पना यांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे पूर्वी वयस्कर व्यक्तींना शंका विचारल्यावर त्यांना माहितीसुद्धा असे. पण आता तंत्रज्ञानाच्या युगात सर्व माहिती कुटुंबातल्या वयस्कर माणसांनाही असत नाही, त्यामुळे गुगलवर अवलंबून राहावे लागते. पारिजातकाचा सडा जसा अंगणात पडतो व संपूर्ण अंगण भरून जातं, त्याच प्रकारे गुगलला एखादा प्रश्न विचारला की, असंख्य माहितीचे स्त्रोत सड्याप्रमाणे आपल्या मनाच्या अंगणात जागा व्यापतात.

गुगलशिवाय आज पानही हलत नाही. गुगलमुळे आयुष्य सुखद, सुकर झाले आहे. पूर्वी गुरुशिवाय पान हलत नव्हते. कोणत्याच अडचणीसाठी आज गुरू नसले तरीही गुगल आहे. जे अनाकलनीय वाटत होतं ते गुगलने सहज साध्य केलं आहे. लोकेशन टाकलं की कुठलाही आणि कोणताही प्रवास आज सुकर आणि सुखद होतो आहे. मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्वी रस्ते माहीत असणं आवश्यक असायचं; पण आता गुगल मॅपच्या साहाय्याने हे इतकं सोपं झालं आहे. गुगल गुरू तुमच्या सेवेत असतो, कुठे उजवीकडे वळायचं कुठे डावीकडे वळायचं हे सगळं आपल्याला गुगलमुळे शक्य झालं आहे. एखाद्या ठिकाणी आपण किती वाजता पोहोचणार हे सुद्धा गुगल आज तुम्हाला कल्पना देतं.

पूर्वी वडीलधारी माणसं व गुरू यांचं महत्त्व असायचं, अजूनही ते आहेच; पण शिवाय काही जास्तीची माहिती गुगलवरूनच आपल्याला मिळते. गुगलवरून माणसं शोधता येतात; पण माणसाच्या मनाचा तळ शोधता येत नाही. गुगलमुळे माणसाचे लोकेशनसुद्धा शोधता येते, त्याच्यामुळे कुठे आहात? असा प्रश्न विचारल्यावर मीटिंगमध्ये आहे, असं खोटं उत्तर देऊन चालणार नाही.

मी पुण्याला आहे म्हणणारे वास्तवात कलकत्त्याला असतात. शोधायचं झालं तर गुगल लोकेशनवरून त्यांचं पितळ उघडं पाडता येतं. माणसाच्या मनातलं व मनाचा छेद घेणारा गुरू अजून मिळाला नाही. पुस्तकाच्या पलीकडे जे मन आहे त्याचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही. स्वतःच्या मनाचाच थांगपत्ता स्वतःला लागत नसतो.

गुगल माझा गुरू का असू नये? कारण कुटुंबात माणसेच कमी झाली आहेत, गोतावळा कमी झाला आहे. घरात सर्व निर्जीव यंत्र मदतीला हजर; पण संवाद साधण्यासाठी कोणीच नाही. आई-बाबांना काय विचारलं तर ते मोबाईलमध्ये दंग. घरात तोंड उघडण्याची संधी मिळत नाही. कारण पूर्वीच्यासारखे भरलेली कुटुंब आता राहिलीच नाहीत. आजोबांना आता त्यांच्या गोष्टी सांगण्याची संधी मिळत नाही. काका, मामा, मावशी, वडील, भाऊ, मित्र हीच मंडळी गुरुजीची भूमिका बजवायची. ते सर्व लुप्त झालंय. ‘माय मरो पण मावशी जगो’ यामधील मावशीही आता हद्दपार झाली आहे. मुलांना आपले काका, मामा, आते भाऊ, मावसभाऊ, मावशी ही संकल्पनाच कळत नाही. कारण माणसं पूर्वीप्रमाणे घरात येत नाहीत. माणसं एकमेकांना भेटत नाहीत. भेटली तर संवाद करत नाहीत. संवाद केला तरीही सहवास त्यांचा फारच क्षणिक असतो. माणसांचा सहवास दुर्मिळ झाल्यामुळे घरात कोणतंच संवादाचं वातावरण न राहिल्यामुळे सर्वजण आपापल्या मोबाईल व टी. व्ही. मध्ये रममाण झालेले असतात. कुणाला काही विचारावं हीच अडचण आहे. एखादी संकल्पना समजून घ्यायची असेल, एखाद्या रोगाबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर गुगलशिवाय पर्याय नाही. गुगलमुळे विज्ञान सर्वांपर्यंत पोहचते. माणसाचे गुरू अनेक असतात आणि पहिला गुरू पुस्तक व नंतर शिक्षक आणि प्रसंगानुरूप आयुष्याच्या वाटचालीवर अनेक गुरू असतात. अनेक जण गुरूवर श्रद्धा ठेवून जीवनाचा प्रवास करीत असतात. गुरूच्या शब्दाबाहेर जात नाहीत. गुरू म्हणेल ती पूर्व दिशा असते. गुरूंमुळे व्यक्तीविकास होतो. गुगलला जसं फीड करू तसं आपल्याला गुगल उत्तर देतो. आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून गुगलला प्रश्न विचारायला हवा. संगीत शिकायचे असेल तर गुगलवरून शिकून करू शकतो. गुगल आपल्याकडून काही अपेक्षा नाही करत. गुरूमुळे आपण कौशल्य शिकतो. गुगलमुळे आज ज्ञानगंगा आपल्या घरी पोहोचत आहे. गुगलमुळे माणसं व्यक्त व्हायला लागली. हेच गुगलचं सामर्थ्य होय.

Author