घर म्हटलं की काही वस्तू या ठरलेल्याच असतात. मूलभूत किंवा गरजेच्या वस्तूंमध्ये यांची गणना होते. जसे की, बैठकीची मांडणी, बेड, वॉल युनिट, वॉर्डरोब, किचन ट्रॉलीज् वगैरे. तर काही वस्तू या बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहात घरात विराजमान कराव्या लागतात. आता ड्रेसिंग टेबलचंच बघा ना. आज घरातल्या फर्निचरच्या यादीत ड्रेसिंग टेबललासुद्धा अग्रक्रम द्यावा लागतोय. पूर्वीसुद्धा हे ड्रेसिंग टेबल आपल्याकडे होतं, पण त्याचं रूप खूपच वेगळं होतं. आज मात्र चित्र वेगळं आहे. मुळात बदलत्या जीवनशैलीमुळे सौंदर्यप्रसाधनासाठी स्वतंत्र असं एखादं युनिट असावं हे आज अत्यंत आवश्यक झालंय. राहणीमानात, पेहरावात झालेले बदल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्या वस्तूंची नेटकी मांडणी गरजेची झाली आहे. ही नेटकी मांडणी करण्यासाठी तसंच खास अत्याधुनिक कपाट असलं पाहिजे. ज्यात सौंदर्यप्रसाधनं, परर्युम्स, पोषाखांवरच्या अन्य ॲक्सेसरीज जसं की बांगड्या, टिकल्या, वेगवेगळी आभूषणे अशा विविध वस्तू एकत्र, पण व्यवस्थित ठेवता येतील. म्हणजेच एक परिपूर्ण असं ड्रेसिंग टेबल किंवा ड्रेसिंग वॉर्डरोब !
ड्रेसिंग टेबल हे शक्यतो बेडरुममधला बेड, तिथला वॉर्डरोब बनवतानाच बनवून घ्यावं. म्हणजे मग रचना आणि सजावट यात एकसंधपणा राहतो. बेडरुममधल्या इतर फर्निचरबरोबरच ड्रेसिंग बनवून घेतलं तर ते फायदेशीर ठरतं. आपल्या पसंतीचं, आवडत्या डिझाइनचं ड्रेसिंग आपल्याला बनवून घेता येतं. शिवाय हे खिशालासुद्धा परवडणारं असतं. इतर फर्निचरसाठी वापरण्यात येणाऱ्या मटेरिअलमधूनच ड्रेसिंग बनवल्यामुळे वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा, टिकाऊपणा, पॉलिश यांविषयी आपण निःशंक राहू शकतो. तसंच आपल्या गरजांनुसार ड्रेसिंग टेबल बनवून घेतलं तर वस्तू नीट जागच्या जागी ठेवल्या जाऊन पसारा होत नाही. आरसा आणि अॅक्सेसरीजचे स्टोअरेज यांची सुरेख सांगड म्हणजे ड्रेसिंग टेबल होय, जे कुठल्याही जागेत सहज बसवता येतं. बेडच्या शेजारी, बेडरुमच्या दाराच्या मागे, वॉर्डरोबच्या बाजूला अगदी कुठेही. मात्र ड्रेसिंग टेबलची जागा निश्चित करण्याआधी त्या जागेच्या ठिकाणी भरपूर प्रकाश आहे की नाही हे पाहावे. नैसर्गिक प्रकाशाबरोबरच कृत्रिम प्रकाशयोजनाही करावी लागते. या ठिकाणी हेअरड्रायर वगैरेसाठी इलेक्ट्रिकल पॉईंट्स आवश्यक आहेत. तसेच बेडरुमला अॅटॅच्ड टॉयलेट असेल तर त्याच्या आजूबाजूला ड्रेसिंग टेबल असलेले चांगले.
ड्रेसिंग टेबल तयार करण्याआधी आपल्या कोणत्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत त्याची नीट यादी करावी. आज पुरुष, लहान मुलेदेखील फॅशनच्या बाबतीत विशेष जागरूक असतात. त्यामुळे घरातील किती व्यक्तींचे कोणकोणते सामान तिथे ठेवायचे आहे हे सुरुवातीस ठरवून घ्यावे. त्यानुसार वेगळे कप्पे, ड्रॉवर्स करता येतात. त्यामुळे वस्तूंची सरमिसळ होत नाही. स्त्रियांचे सेमी प्रेशियस दागिने ठेवण्यासाठी इथे एखादा बंद ज्याला लॉक आहे असा ड्रॉवरही करता येतो.
बेडरुममधल्या जागेच्या उपलब्धतेनुसार आपण ड्रेसिंग टेबलचा आकार, त्याची रचना ठरवू शकतो. म्हणजे जर का जागा व्यवस्थित मिळत असेल तर छान, सुटसुटीत ड्रेसिंग टेबल बनवता येतं. पण जर जागा आवश्यक तेवढी मिळत नसेल तर वॉर्डरोबमध्येही ड्रेसिंगची सोय करू शकतो. वॉर्डरोबच्या शटरला आपल्या गरजेनुसार बाहेरून किंवा आतल्या बाजूने आरसा लावून ड्रेसिंग करता येते किंवा वॉर्डरोबचा थोडासा भाग बाहेरच्या बाजूने ड्रेसिंगचा करावा. म्हणजे संपूर्ण वॉर्डरोब उघडावा लागणार नाही किंवा मग संपूर्ण वॉर्डरोबच्या मधोमध ड्रेसिंगची रचना करावी. तिथे आपल्याला हव्या त्या आकाराचा आरसा बसवून त्या जागेत इतर कप्पे, वस्तूंची मांडणी करू शकतो. ड्रेसिंग टेबलची मांडणी ही तिथल्या छोट्याशा पुफीने (आरशासमोर बसण्यासाठी छोटंसं स्टूल) पूर्ण होत नाही, हे सुद्धा लक्षात असूद्यात.
झपाट्याने बदलत जाणाऱ्या आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव मानवाच्या प्रत्येक गोष्टीला स्पर्शन जातोय. त्याचा परिणाम घरातल्या सजावटीतसुद्धा होतोय. हे नवे आयाम स्वीकारून गृहसजावट केली तर ते जास्त सयुक्तिक ठरतं.
संकलन : शेखर आगासकर