जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भाजपचे जेष्ठ नेते जसवंतसिंह यांचा जन्म ३ जानेवारी १९३८ रोजी झाला. राजस्थानच्या राजघराण्यात जन्मलेल्या जसवंतसिंह, उच्च शिक्षणानंतर तेव्हाच्या दरबारी अलिखित प्रथेप्रमाणे सैन्यात अल्पकाल सेवा बजावून परत आले. राजकारणातला त्यांचा ओढा लक्षात घेऊन आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधले धुरंधर नेते भैरोसिंह शेखावत यांना जसवंतसिंह राजकारणात आणले. मुळात राजघराण्यातील असल्याने जसवंतसिंह यांचे वागणे आणि शालीन तसेच सुखासीनही त्यातच नंतर सैन्यात राहिल्याने जगण्याला शिस्त आलेली. त्यामुळे जसवंतसिंह यांच्या जीवन शैली तसेच सवयीविषयी पक्षात कायम एकाचवेळी असुयापूर्ण आणि नवलाईचीही चर्चा असायची, आजही असते. उच्च शिक्षण आणि वावर परदेशात राहिल्याने जसवंतसिंह झापडबंद नव्हतेच. त्यांचा कल व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही कायम सुधारणावादी राहिला.
शेखावत यांच्यामुळेच जसवंतसिंह १९८० साली राज्यसभेवर निवडून गेले. पक्ष आणि सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा वावर सुरु झाला. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांना पक्षाचा प्रवक्ता म्हणून जसा ‘एलिट’ चेहेरा पाहिजे होता तो, जसवंतसिंह यांच्यामुळे मिळाला. पक्षाच्या ‘श्रेष्ठी’ गोटात सहज आणि फारच लवकर त्यांचा समावेश झाला. (आता, लोकसभा निवडणुकीत हवा तो मतदार संघ न मिळाल्याने पक्ष सोडल्यावर भारतीय जनता पक्ष संकुचित दृष्टीचा पक्ष आहे ! अशी टीका करणा-या ) जसवंतसिंह यांच्या वाट्याला केंद्रात अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर परराष्ट्र, अर्थ, सरंक्षण यासारखी महत्वाची खाती आली. केंद्रीय मंत्री म्हणून काम करतानाही त्यांचा सुधारणावादी आणि खुला दृष्टीकोन पाह्यला मिळाला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात घडलेल्या कंदहार विमान अपहरण घटनेत निरपराध प्रवाश्यांचे प्राण वाचावे यासाठी राजकीय विरोध मोडून काढत अतिरेक्यांना सोडण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ते स्वत: अतिरेक्याना घेऊन कंदहारला गेले आणि अपहरण झालेल्या प्रवाश्यांना घेऊन आले. अमेरिकेशी बिघडलेले संबध पुन्हा सुरळीत करण्यात जसवंतसिंह यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून बजावलेली भूमिका त्या काळात वाखाणली गेली. म्हणूनच केंद्रातून सत्ता गेली तरी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेतेपद पक्षाने त्यांच्याकडे सन्मानाने दिले. जसवंत सिंह नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. त्यांनी मोहम्मद अली जीनांवर २००९ मध्ये लिहिलेल्या पुस्तकाने मोठा वाद निर्माण झाला होता. "जीना- इंडिया, पार्टिशन, इंडिपेंडन्स‘ या पुस्तकात त्यांनी जीना यांचे कौतुक, तर नेहरू-पटेल यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे १९ ऑगस्ट २००९ ला त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा पक्षात परतले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 3, 2019
‘थिएटर अॅककॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोटया भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकामुळे ख-या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात ‘केसरी’, ‘ब्लिट्झ’ वगैरेमध्ये ते काम करायचे. मोकाशी यांनी सातवीत असताना पहिलं नाटक केलं आणि तेही हिंदी, ‘नही नही कभी नही’. पुढील शिक्षण मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्यात. कॉलेजमध्ये असतानाचा ‘थिएटर अॅहकॅडमी’ मध्ये जाण्यास मोकाशी यांनी सुरवात केली. त्याचा मोकाशी यांना खूप उपयोग झालाय. परेश मोकाशी एका मुलाखतीत म्हणतात, थिएटर अॅतकॅडमीने खरोखरंच माझा मेंदू उघडला. तोपर्यंत हिंदी-इंग्रजी चित्रपट किंवा जी काही व्यावसायिक नाटकं उपलब्ध असतात, तेवढयापुरतंच तुमचं विश्व मर्यादित असतं. थिएटर अॅहकॅडमीमुळे पहिल्यांदा माझी जागतिक रंगभूमी, जागतिक नाटक, जागतिक सिनेमा यांच्याशी ओळख झाली. तो एक नवा नाद लागला. मग वेगळ्या प्रकारचं साहित्य, संगीत अशा सगळ्या गोष्टींनी संपुक्त असलेली ती संस्था होती. जब्बार पटेल नाटक बसवताहेत, मोहन आगाशे काम करताहेत, सतीश आळेकर अफलातून नाटक लिहिताहेत, समर नखाते, माधवी पुरंदरे यांच्यासारखे तज्ज्ञ आहेत, संस्थेमध्ये ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक होतंय, ‘महानिर्वाण’सारखं होतंय, ‘बेगम बर्वे’सारखं होतंय.. हे म्हणजे अलिबाबाची गुहाच. सगळं फॅण्टॅस्टिक असायचं. तिथे आल्यावर पहिल्यांदा मी गंभीरपणे मी या क्षेत्राचा विचार केला असावा, असं मला वाटतं. याचं सगळं श्रेय थिएटर अॅदकॅडमीचं. २००१ मध्ये ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ हे नाटक केले. त्यानंतर ‘लग्नकल्लोळ’, ‘मेकअप’, ‘मंगळावरचे मुंडके’, ‘समुद्र’ अशी व्यावसायिक-प्रायोगिक नाटकं करता करता त्याने थेट ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचललं. या पहिल्याच चित्रपटाने त्याला ऑस्करच्या दारापर्यंत नेलं.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी सांगतात. ‘समुद्र’ झाल्यावर एके दिवशी बापू वाटवेंनी लिहिलेलं दादासाहेब फाळके यांचं चरित्र माझ्या वाचनात आलं. त्यानंतर माझ्या डोक्यावर वीज कोसळावी असं झालं. मग ठरवलं की, ही अफलातून कथा आहे. ही आपल्याला कशी काय ठाऊक नव्हती? यावर अजून काहीच कसं झालेलं नाही? त्यानंतर पंधरा दिवसांत माझी स्क्रिप्ट लिहून झाली. माझी सगळ्यात वेगवान लिहून झालेली कलाकृती म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. मी लिहायला लागलो आणि एक-दोन प्रसंग लिहिल्यावरच माझ्या लक्षात आलं की, ही माझ्या नेहमीच्या नाटकाच्या फॉर्ममधलं नाही. याचा चित्रपट करावा लागेल. मी जाणीवपूर्वक थोडंसं चित्रपटाच्या दृष्टीने काय करावं लागेल, ते डोक्यात ठेवून लिहायला लागलो. त्या दृष्टीने प्रसंग रचायला लागलो. २००५ मध्ये संहिता तयार झाली आणि पुढची तीन वर्ष मला चित्रपटासाठी पैसे मिळाले नाहीत. आम्ही सगळे कॉन्टॅक्टस वापरले, पण अशा प्रकारचा सिनेमा कसा करायचा, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यात कुणी स्टार असणार नाही, त्यात गाणं असणार नाही अशा माझ्या काही अटी होत्याच. तसंच ती साधी सिंपल गोष्ट असणार. साधारणपणे पडद्यावर ज्या प्रमाणे चरित्र दाखवण्याची लार्जर दॅन लाइफ, देवत्व दिल्यासारखं चित्रित करण्याची पद्धत आहे, तसा हा चित्रपट नसणार होता. फाळके हे एक साधे माणूस कसे होते आणि तरीही त्यांच्या हातून हे मोठं काम कसं झालं, याची ही कहाणी असणार होती. मुळातच मला चरित्र सांगायचं नव्हतं तर फाळके यांनी पहिला चित्रपट कसा केला त्याची ही गोष्ट होती. हे माझे निर्णय महत्त्वाचे ठरले. मला कुणीतरी सुचवलं होतं की, हा चित्रपट हिंदीत करू या. कारण हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. पण मी मराठीत कम्फर्टेबल आहे. मुळात फाळके मराठी होते. त्यामुळे ते मराठीत जास्त चांगल्या प्रकारे येईल, असं माझं म्हणणं होतं. या सगळ्या अटी असल्याने हा चित्रपट काढायला कुणी धजावेना. मग अखेर मी निर्णय घेतला की, आता आपणच धाडस करूया. वडील आणि काकाही मागे उभे राहिले. मग आम्ही पैसे उभे केले आणि २००८ मध्ये शूटिंग सुरू केलं. सहा महिन्यांत आमच्या हातात सेन्सॉरचं सर्टिफिकेट होतं, इतक्या झपाटयाने आम्ही काम केलं. साधी-सोपी तरीही वैचित्र्यपूर्ण हाताळणी ही शैली बनलेल्या परेश यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 8, 2017
सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच. सिमी गरेवाल यांचे वडील जे. एस. ग्रेवाल आर्मीत ब्रिगेडियर होते. त्यांचे बालपण इंग्लंडमध्ये गेले आणि शिक्षण न्यूलँड हाऊस स्कूलमध्ये झाले होते. इंग्लंडमध्ये बालपण घालवल्यानंतर किशोरावस्थेत सिमी भारतात परतल्या. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली येथे झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला 'टार्जन गोज टू इंडिया' या सिनेमाची ऑफर मिळाली होती. हा सिनेमा सिमीने स्वीकारला होता. आपल्या पहिल्या सिनेमात तिला फिरोज खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले.
सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. सिमी गरेवाल या 'दो बंधन', 'साथी', 'मेरा नाम जोकर' आणि 'सिद्धार्थ' या वादग्रस्त सिनेमासाठी ओळखले जातात. १९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'सिद्धार्थ' या सिनेमात सिमी गरेवालने बॉलिवूडमधला पहिला न्यूड सीन देऊन खळबळ उडवली होती. हा सिनेमा सर्वाधिक वादग्रस्त सिनेमा ठरला होता. कोनरॉट रुक्सच्या 'सिद्धार्थ' या सिनेमात अनेक हॉट आणि वादग्रस्त सीन्स होते. एका सीनमध्ये तर शशी कपूर न्यूड सिमी ग्रेवालच्या समोर उभे दिसतात. हे छायाचित्र दोन इंग्रजी मासिकांनी आपल्या कव्हरपेजवर प्रकाशित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले होते. शशी कपूर आणि सिमीच्या न्यूड सीनमुळे 'सिद्धार्थ' हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला नव्हता.
सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. सिमी गरेवालने "रुखसत " या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मिथुन चक्रवर्ती व अनुराधा पटेल यांच्या भूमिका होत्या. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman's World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. सिमी गरेवाल यांची खासियत म्हणजे त्या नेहमी पांढ-या रंगाचे कपडेच परिधान करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 3, 2017
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार चळवळ ज्या प्रामाणिक आणि निस्वार्थी पुढाऱ्यांच्या जीवावर फोफावली त्या पुढाऱ्यांमध्ये किसन तुळपुळे यांचा समावेश अपरिहार्यपणे करावा लागेल. किंबहुना त्यांच्या समावेशाशिवाय या पुढाऱ्यांच्या यादीला कुठेतरी अपूर्णपणा येईल. महात्मा गांधींनी १९४५ मध्ये अहमदाबादला जाऊन ‘मजदूर महाजन’ या कामगार संघटनेचे काम करण्याचा दिलेला सल्ला धुडकावणाऱ्या तुळपुळेंनी नंतर अहमदाबादमधील सूत गिरणी कामगारांसाठी ‘मिल मजदूर सभा’ स्थापन केली.
अर्थात कामगार हा त्यांचा प्राण होता आणि ‘मिल मजदूर सभा’ हा श्वास होता. पुण्यामध्ये १९२१ मध्ये जन्म झालेल्या किसन तुळपुळ्यांची मुंबई ही कर्मभूमी होती. १९४१ मध्ये मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांनी तयारी केली. त्याचबरोबर खडकीच्या दारूगोळा कारखान्यात त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.
जयप्रकाश नारायण, एसेम जोशी, साने गुरूजी, राम मनोहर लोहिया आदी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत नेते त्याकाळातील तरूणांचे आदर्श होते. तुळपुळेही त्याला अपवाद नव्हतेच. या नेत्यांच्या ते संपर्कात आले. चळवळीसाठी काम करीत असतानाच त्यांना १९४३ मध्ये अटक होऊन दोन वर्षांची शिक्षा झाली. या दोन वर्षांचा अनुभव त्यांनी आपल्या ‘माझी जेलयात्रा’ या पुस्तिकेत नोंदवला आहे. तुरूंगातून सुटल्यावर ते मुंबईला कामगारांच्या चळवळीकडे आकर्षित झाले. साम्यवाद्यांच्या ‘गिरणी कामगार युनियन’मध्ये अनुभव घेतल्यावर ते ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’त गेले.
राजकीय मुद्दय़ांवर संघ फुटल्यावर ते साथी अशोक मेहतांबरोबर बाहेर पडले आणि ‘मिल मजदूर सभे’त गेले. या संघटनेचे ते पहिले खजिनदार होते. पण नंतर त्यांनी तब्बल २७ वर्षे या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. ही संघटना म्हणजे त्यांचा खरोखरच श्वास होता. दर बुधवारी या संघटनेच्या दादर येथील कार्यालयात जाऊन सहकाऱ्यांशी गप्पा मारल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे. हा त्यांचा नेम शेवटपर्यंत होता. १९५८ मध्ये त्यांची निवड वेतन मंडळावर झाली. त्याचवर्षी अमेरिकेत झालेल्या ‘लीडर एक्स्चेंज’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.
राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांच्याशी त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. १९६८ मध्ये तुळपुळ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिल मजदूर को-ऑप. क्रेडीट सोसायटी’ स्थापन करण्यात आली. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यामध्ये या सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्य निर्वाह निधीच्या मध्यवर्ती मंडळावर नियुक्ती होताच त्यांनी कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची व्यवस्था केली. आणीबाणीच्या काळात त्यांना या मंडळावरून दूर करण्यात आले पण १९७७ नंतर पुन्हा त्याची नियुक्ती करण्यात आली. केवळ कामगारांच्या संघटनांमध्ये त्यांनी काम केले नाही तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.
कामगार आणि मालक यांच्यात नेहमी सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे, न्याय्य मागण्यांसाठी मिल बंद करायची नाही तर ती सुरू ठेवून आपल्या मागण्यांसाठी लढा द्यायचा, यावर त्यांचा नेहमी भर असे. रेशम उद्योगातील कामगारांचा लढा लढताना ‘अशोक सिल्क मिल’ आणि एल्डी व्हेल्वेट अॅण्ड सिल्क मिल’ या दोन बंद गिरण्यांचा प्रश्न त्यांनी याच पद्धतीने लढवला. पाच वर्षे लढा दिल्यावर त्यांनी त्या पुन्हा सुरू केल्याच पण कामगारांची थकीत देणीही मिळवून दिली.
५५ वर्षे कामगार संघटनेत काम केल्यावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारली. किसन तुळपुळे यांनी कामगार चळवळीवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम करीत राहणाऱ्या तुळपुळ्यांची श्रीमंती ही त्यांच्या सहकाऱ्यांच्या संख्येत होती. त्यांचा साधेपणा सर्वानाच भावणारा होता.
सच्छिल, निस्वार्थी आणि प्रामाणिक असे दुर्मिळ गुण त्यांच्यात होते. कामगारांप्रती असलेली त्यांची तळमळ त्यांच्या सहकाऱ्यांना कायम लक्षात ठेवणारी आहे. मरगळलेल्या कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड अखेर ५ सप्टेंबर रोजी विसावली.
August 5, 2017
आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.
June 12, 2017
मनोज कुमार यांच्या "उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन् प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं "मेरे देश की धरती‘... हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला. महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार शालेय स्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. प्रसिद्ध गायक मा.मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.
गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले. मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, सारखे अनेक पुरस्कार मिळाले. मा.महेंद्र कपूर यांचे निधन २७ सप्टेंबर २००८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- वेब दुनिया
काही गाणी महेंद्र कपूर यांची
तुम अगर साथ देने का वादा करो
लाखो हे यहाँ दिल वाले पर प्यार नहीं मिलता
चलो एक बार फिर से अजनबी बन जाएँ
तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
मेरे देश की धरती सोना उगले
मेरा रंग दे बसंती चोला
है प्रीत जहाँ की रीत सदा
नीले गगन के तले
किसी पत्थर की मूरत से
भारत का रहने वाला हूँ
January 11, 2017
आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले.
पुढे त्यांनी 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता.
'लगान' ने त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले. आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला.
आशुतोष गोवारीकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/ashutosh-govarikar/
# Govarikar, Aashutosh
June 4, 2017
उस्ताद झिया फरिदुद्दीन हे धृपदगायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या डागर घराण्याच्या १९ व्या पिढीचे गायक. त्यांचा जन्म १५ जून १९३२ रोजी उदयपूर येथे झाला. वडील उस्ताद झियाउद्दीन खान डागर आणि बंधू वीणावादक उस्ताद झिया मोहीनुद्दीन डागर यांच्याकडून त्यांना धृपद गायनाची तालीम मिळाली. त्यांच्या गायकीमध्ये स्वरभेद आणि गमक यांचे प्रभुत्व होते. देशात आणि परदेशामध्ये त्यांच्या गायनाच्या मैफली झाल्या आहेत.
सांगीतिक मैफली आणि कार्यशाळांद्वारे त्यांनी ओळख निर्माण केली. ऐंशीच्या दशकात ऑस्ट्रिया आणि फ्रान्स येथेही त्यांनी ध्रुपद गायकीचे शिक्षण दिले. भोपाळ येथील ध्रुपद केंद्रामध्ये त्यांनी तब्बल २५ वर्षे संगीताचे मार्गदर्शन केले. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यासह पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले आहे.
नॉर्थ अमेरिकन धृपद असोसिएशनतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. भोपाळ येथील धृपद केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डागर यांनी १९८१ पासून तेथे संगीत अध्यापनाचे कार्य केले. आयआयटी मुंबई येथील धृपद संसार येथेही त्यांनी संगीत शिक्षणाचे काम केले. पनवेल येथील गुरुकुलमध्ये गेली काही वर्षे त्यांचे वास्तव्य होते. प्रसिद्ध धृपदगायक उमाकांत-रमाकांत गुंदेचा बंधू आणि उदय भवाळकर हे त्यांचे शिष्य होत. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर यांचे ८ मे २०१३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 8, 2018
स्त्री शिक्षण ज्याकाळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य मानली जात होती अश्या परिस्थितीत शिक्षणासाठी पुढाकार घेणारी महिला म्हणजे रमाबाई महादेव रानडे.
May 7, 2014
अत्यंत बिकट परिस्थितीतही धीरोदात्तपणा न सोडणारे, निगर्वी, सरळ, प्रेमळ अंत:करणाचे मा.भार्गवराम आचरेकर यांना नाट्य व्यवसायातील चारुदत्त असे संबोधिले जात असे.त्यांचा जन्म १० जुलै १९१० रोजी झाला. स्थानिक शाळेच्या मदतीसाठी केलेल्या शारदा नाटकाच्या प्रयोगात त्यांनी वल्लरीचे काम इतके अप्रतिम केले की त्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यावेळी ललितकलादर्शचा मुक्काम मालवणला होता. बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. त्यांनी भार्गवरामांचे गाणे ऐकले आणि आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. ललितकलादर्शन मधील १९२५ ते १९३७ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य जीवनाची चढती कमान होती. ललितकलादर्शच्या बापूसाहेब पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली मा.भार्गवराम आचरेकर यांना विविध भूमिका करण्याचे भाग्य लाभले. ‘कुंजविहारी’ नाटकातील ‘कृष्ण’ ही भार्गवरामांची पहिली व्यावसायिक भूमिका. यानंतर ‘वधूपरीक्षा’, ‘शारदा’, ‘पुण्यप्रभाव’ इत्यादी अनेक नाटकांत ते भूमिका करू लागले. बापूसाहेब पेंढारकर आजारी पडल्यानंतर त्यांनी ‘मानापमाना’तील धैर्यधर, आणि ‘शिक्काकट्यार’ मधील ‘शाहू’ या अवघड संगीत भूमिका भार्गवरामांवरच सोपविल्या. ‘ललितकलादर्श’ मंडळीत पणशीकर बुवा, विष्णुपंत पागनीस, कागलकरबुवा, वझेबुवा आणि शिवरामबुवा वझे यांची तालीम मिळाल्याने त्यांची गायकी कसदार आणि दर्जेदार झाली होती. बापूसाहेबांनी भार्गवरामांच्या अभिनयाकडेही बारीक लक्ष पुरविले आणि म्हणूनच ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील फटकळ पण सरळ स्वभावाच्या बिजलीची तडफदार तेजस्वी भूमिका भार्गवरामांनी अप्रतिम साकार केली. जणू त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच वरेरकरांनी ती भूमिका लिहिली होती. अभिनय, गायन आणि रूप यांचा त्रिवेणी संगम या तडफदार भूमिकेत झाला होता. बिजली म्हणजे भार्गवराम आणि भार्गवराम म्हणजे बिजली असे समीकरण त्याकाळी झाले होते. पुढे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील भानुशंकरांच्या भूमिकेमुळे नव्या पिढीला भार्गवरामांचा नाट्याभिनय व गायनाची करामत ऐकण्याची संधी मिळाली. भार्गवराम नुसते नटच नव्हते तर चांगले ख्याल गायकही होते. साध्या आणि अनवट रागातील चीजांचे बरेच मोठे भांडार त्यांच्यापाशी होते. अशा या प्रसन्न वृत्तीच्या, निकोप प्रकृतीच्या, धार्मिक श्रद्धेच्या, नम्र स्वभावाच्या आणि निर्व्यसनी, निष्कलंक चारित्र्याच्या गुणशाली कलाकाराला नाट्य परिषदेने ‘बालगंधर्व पदक’ देऊन गौरविले होते. भार्गवराम आचरेकर यांचे २७ मार्च १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti