जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कंप्यूटरच्या भाषांपैकी एक "कोबोल" या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर यांचा जन्म ९ डिसेंबर १९०६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. सुमारे ८० वर्षांपूर्वी "इंटरनेट'चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून "प्रोग्रॅमिंग'मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या "नेव्हल ऑफिसर' ठरल्या.
संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि अमेरिकन नौदलातील असामान्य कामगिरीमुळे त्यांचा उल्लेख "अमेझिंग ग्रेस' असाही केला जातो. इतकेच नव्हे तर यू. एस. नेव्ही डिस्ट्रॉयरला "यू. एस.एस. हॉपर" हे नाव त्यांच्याच नावावरून दिले गेले आहे, हा केवढा मोठा गौरव आहे.
ग्रेस मरे हॉपर यांचे शालेय शिक्षणही न्यूयॉर्क येथे झाले. त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्रातील पहिली पदवीही तेथेच मिळवली. १९४१ मध्ये जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला, तेव्हा ग्रेसला नाविक दलात प्रवेश हवा होता. तो तिला मिळाला नाही. तिचे चौतीस हे वय त्यांना जास्त वाटले होते. शिवाय तिच्या पाच फूट सहा इंच उंचीच्या मानाने तिचे वजन नौदलाच्या प्रमाणाप्रमाणे सोळा पौंड कमी भरले. शासनाने तिचे गणितातील पदव्युत्तर शिक्षण पाहून गणितात अध्यापन करण्याचा निर्णय घेतलं आणि तिला सैनिकाऐवजी नागरिक राहण्याचा आदेश दिला. तरीही निराश न होता, तिने खटपट करून अमेरिकन नौदलाच्या राखीव सेनेत नेमणूक मिळवली. लेफ्टनंट हा हुद्दा तिला देण्यात आला आणि दुस-या युद्धाच्या धामधुमीत नौदलाच्या "Ordnance Computation Project" या विशेष प्रकल्पावर तिला धाडण्यात आले. वयाच्या साठाव्या वर्षी ती नौदलातून निवृत्त झाली. पण एका वर्षातच तिला पुनः बोलावण्यात आले. नौदलाच्या सर्व संगणकीय कामाचे प्रमाणीकरण करण्याच्या कामात समन्वय आणण्यासाठी तिची नेमणूक झाली. यापूर्वी तिला आदेशा बरहुकूम काम करण्याचा अनुभव होता. आता सबंध नौदलातील नोकरशाहीशी तिचा सामना होता आणि तो तिने यशस्वीपणे हाताळला.
युद्धकालीन कामगिरीवर असतांना तिला मार्क-१ हा जगातील पहिला डीजीटल संगणकीय सोफ्टवेअर प्रोग्राम शिकायला मिळाला.या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन या हुशार बाईनं एका आयुष्यात काय काय करावं? डब्यात जाणारा ‘मार्क-१’ संगणक तिनं तिच्या हुशारीनं वाचवला. तसंच ‘कंपायलर’ नावाच्या संकल्पनेला तिनं जन्म दिला. जसा एखादा दुभाष्या एका भाषेतलं बोलणं समजून घेऊन दुसऱ्या भाषेत त्याचा अर्थ लावून सांगतो, तसं ‘कंपायलर’ नावाचा एक प्रोग्रॅम आपण संगणकाला चालवायला सांगू शकतो. हा ‘कंपायलर’ प्रोग्रॅम मग आपल्याला सोप्या वाटतील अशा संगणकाच्या भाषेत (उदाहरणार्थ सी, जावा, कोबॉल) लिहिलेले प्रोग्रॅम्स संगणकाला समजतील अशा ०-१ च्या भाषेत (मशीन लँग्वेज) आपल्याला बदलून देतो. आणि हा ० आणि १ च्या भाषेतला ‘मशीन लँग्वेज’ मधला प्रोग्रॅमच संगणकाला कळू शकतो. त्यामुळे मग आपल्याला संगणकाची ०-१ ची क्लिष्ट भाषा शिकत बसावी लागत नाही. तसंच एकदा ग्रेस हॉपर तिचा एक प्रोग्रॅम चालवून बघत असताना अचानक ‘मार्क २’ संगणक नीट कामच करेना! त्या इमारतीत वातानुकूल यंत्रणा नव्हती. त्यामुळे सगळ्या खिडक्या वारं येण्यासाठी उघडलेल्या होत्या.
काय झालं म्हणून तिनं एका सहकाऱ्याच्या मदतीनं जरा खुडबूड करुन बघितली तेव्हा तिच्या लक्षात आलं की संगणकाचा कुठला तरी भाग उघडा राहिला होता, आणि त्यात एक किडा (बग) जाऊन बसला होता! त्याला बाहेर काढून तिनं तिचा प्रोग्रॅम परत चालवून बघितला तर तो व्यवस्थित चालला की! आजही त्या ऐतिहासिक किडय़ाचा अवशेष अमेरिकेत जपून ठेवलेला बघायला मिळतो! तेव्हापासून कोणताही प्रोग्रॅम नीट चालत नसेल तर त्या प्रोग्रॅममध्ये ‘बग’ आहे असं सॉफ्टवेअरमधली मंडळी आजही म्हणतात आणि ती ‘बग’ शोधून प्रोग्रॅम दुरुस्त करायला ‘डिबगिंग’ असं म्हणतात! असो. १९५३-५४ च्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे प्रोग्रॅमर मंडळींना इंग्रजीसारख्या भाषेत संगणकाकडून काम करुन घेण्यासाठी सूचना लिहायची सोय करणं. प्रोग्रॅमिंगचं काम शक्य तितकं सोपं व्हावं यासाठी ग्रेस हॉपर प्रयत्नशील असे. त्यातूनच जेव्हा इंग्रजीशी बऱ्यापैकी साधर्म्य असणारी ‘कोबॉल’ नावाची भाषा तयार झाली तेव्हा त्या प्रयत्नात तिचा वाटा मोठा होता. यासाठी १९५९ साली हॉपरसकट ६ माणसांनी एका परिषदेत यासंबंधी चर्चा करुन या भाषेचा तपशील ठरवला.
अनेक दशकं ‘कोबॉल’ ही भाषा संगणकाचे प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी वापरात असलेली सगळ्यात लोकप्रिय भाषा होती. १९६६ साली तिचं वय खूप जास्त असल्याच्या सबबीवर तिला नौदलानं सक्तीनं निवृत्ती घ्यायला लावली. तिच्या आयुष्यातला हा सर्वात वाईट दिवस होता. पण १९६७ साली नौदलात काम करणाऱ्यांची पगारपत्रकं बनवायच्या कामात असंख्य चुका होत असल्यानं त्या दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी तिला ‘थोडय़ा काळासाठी’ परत कामावर रुजू व्हायची विनंती केली गेली. हा ‘थोडा काळ’ चार वर्षांचा असणार होता! १९७१ साली ती परत एकदा निवृत्त झाली. पण तिला कोणी निवृत्त थोडीच होऊ देणार होतं! १९७२ साली तिला पुन्हा एकदा कामावर येण्याची विनंती केली गेली. १९७३ साली तिला ‘कॅप्टन’ म्हणून पदोन्नती मिळाली. शेवटी १९८६ साली वयाच्या ८०व्या वर्षीही ही बाई नाखुशीनं तिच्या इच्छेविरुद्धच निवृत्त झाली. ही तिची शेवटची (!) निवृत्ती होती! संगणकक्षेत्रातली बहुतेक झाडून सारे पुरस्कार तिला मिळाले होते. तिची संगणक आणि नौदल यांच्याविषयीची भाषणं अतिशय लोकप्रिय असायची.
"मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन'मध्ये काम करणाऱ्या महिलांनी "हॉपर्स' नावाचे मंडळच स्थापन केले आहे आणि त्यांच्या नावाने शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. सप्टेंबर १९९१ मध्ये तिला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय पदक मिळाले. तिने केलेल्या संगणकाच्या विकास कार्याची देशाने घेतलेली ती दखल होती. यापेक्षा आणखी एक सर्वोच्च पातळीवरील सन्मान तिला लाभला. तो म्हणजे अमेरिकन नौदलातील एका विनाशिकेला तिचे नाव देण्यात आले. यु.एस.एस. हॉपर या ४६६ फूट लांब व ८३०० टन वजनाच्या विनाशिकेवर अत्याधुनिक संगणकीय यंत्रणा बसवलेली आहे. नौदलाच्या परंपरेनुसार या विनाशिकेवरील मानचिन्हातही शब्द आहेत, ते माजी रिअर अॅयडमिरल हॉपर मार्गदर्शन करताना नेहमी वापरत असे – DARE & DO
अशा या हरहुन्नरी बाईची काही विधानंही अजरामर आहेत:
‘कुठलीही गोष्ट करायची परवानगी मागण्यापेक्षा ती सरळ करुन मोकळं होणं जास्त बरं असतं.’ किंवा
‘बंदरात असलेलं जहाज हे समुद्रातल्या जहाजापेक्षा जास्त सुरक्षित असतं. पण बंदरात ठेवण्यासाठी जहाज तयार केलेलं नसतं.’ ग्रेस हॉपर यांचे १ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विनोद गोरे
December 10, 2021
भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
July 21, 2021
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.
बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!
नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी त्यांनी रसिकांना हसविले. त्यात ‘करायला गेलो एक’ हा एक मास्टरपीसच. ‘अन् झालं भलतच’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘पतंगावरी जीवन माझे’, ‘पाप कुणाचे शाप कुणाला’, ‘ते तसे तर मी अशी’, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पाहावा मोडून’, ‘थांबा-थांबा घोळ आहे’, ‘पुत्रवती भव’, ‘पेल्यातील वादळ…’ त्यातली ही काही नाटके. जी नावापासूनच ‘नाट्य’मय ठरलेली. आता ‘करायला गेलो एक’ हे नाटक १९५५ च्या सुमारास रंगभूमीवर पुण्याच्या ‘श्रीस्टार’तर्फे आणलेलं. याच्या लेखनासोबतच दिग्दर्शन आणि भूमिकाही बाबूरावांनी केलेली.
पहिल्या प्रयोगात शरद तळवलकर, शीला गुप्ते, राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, इंदिरा चिटणीस, इंदू मुजुमदार यांच्या भूमिका होत्या. यातल्या हीरोची म्हणजे हरिभाऊ हर्षेची मध्यवर्ती भूमिका भाऊ बिवलकर यांनी केलेली. ‘नटसम्राट’ नाटकातील विठोबा, ‘भावबंधन’ मध्ये महेश्वपरी, ‘लग्नाची बेडी’तला अवधूत या भूमिका भाऊंनी केलेल्या. पुढे काही प्रयोगांत शरद तळवलकर यांनी पत्रकार शंखनाद व हरिभाऊच्या भूमिका केल्या.
फिल्मस्टार राजा गोसावी यांनीही हरिभाऊची भूमिका केली होती. रवींद्र स्टार्स, श्री स्टार्स या संस्थांतर्फे त्यांनी स्वत:ची व इतर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. त्यांचा 'वारा फोफावला' हा कवितासंग्रह, 'करायला गेलो एक', ' संसार पाहावा मोडून', 'अन् झालं भलतंच', 'नवरा म्हणून नये आपला', 'रात्र थोडी सोंगे फार' इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
बाबुराव गोखले यांचे २८ जुलै १९८१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 15, 2017
हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.
December 20, 2021
पंडित, (डॉ.) अनला
कोणत्याही खासगी अथवा सार्वजनिक कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या यंत्रणेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती साठय़ाचा योग्य उपयोग करून घेतल्यास त्याचा कंपनीच्या विकासासाठी मोठा फायदा होऊ शकतो; पण त्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या या माहितीचा कसा शोध घ्यायचा याचे प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक असते. किंबहुना ही माहिती कशी जमा करावी, त्याचा उपयोग कसा करावा याबाबतचा खास अभ्यासक्रम असेल तर त्याचा मोठाच फायदा होऊ शकतो.
‘वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिटय़ूट’च्या (व्हीजेटीआय) सहाय्यक प्राध्यापिका अनला पंडित यांनी ‘आयबीएम’ या जगविख्यात संगणक कंपनीला अशा माहितीचा उपयोग करून घेणारा ‘कॉम्पिटिटिव्ह इंटलिजन्स यूजिंग बिझनेस अॅनॅलिसिस’ हा प्रोजेक्ट सादर केला. पंडित यांचा हाच प्रोजेक्ट ‘आयबीएम’च्या दहा हजार डॉलर्सच्या (सुमारे साडेचार लाख रुपये) ‘सर्जनशील शिक्षक पुरस्काराचा’ मानकरी ठरला आहे. जगभरातून २०४ तर भारतातून अवघ्या सहा जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती, त्यात पंडित एक होत्या. ‘आयबीएम’ने दिलेल्या या रकमेतून आता पंडित ‘व्हीजेटीआय’मध्ये हा प्रोजेक्ट प्रत्यक्ष राबविणार आहेत. कोणत्याही प्रोजेक्टसाठी, संशोधन कार्यासाठी एखाद्या कंपनीकडून अशा प्रकारचा पुरस्कार मिळणे ही त्या शिक्षकासाठी व संबंधित महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असते. सायन येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयातून त्यांनी १९८१ मध्ये बीएस्सी तर १९८३ साली मुंबई विद्यापीठातून एमएस्सी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी अमेरिकेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’मध्ये दोन वर्षांचा एमएस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग हा (एमटेक समकक्ष) अभ्यासक्रम पूर्ण केला. पंडित यांच्या आई शिक्षिका तर वडील महापालिकेमध्ये नोकरी करणारे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे उच्चशिक्षण शक्य झाले. ८५ साली शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईस परतल्या आणि वाटुमल अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्या. विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे शिक्षण द्यायचे, त्यांना संशोधनासाठी प्रवृत्त करायचे, पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजासोबत जोडून घ्यायला प्रवृत्त करायचे या हेतूने त्यांनी विविध उपक्रम महाविद्यालयात सुरू केले. पती अनिरूद्ध हे ‘आयसीटी’मध्ये (यूआयसीटी) प्राध्यापक, तर सासरे भालचंद्र पंडित हेसुद्धा शिक्षकच. त्या दोघांचे अनेक बाबतींत मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. सुमारे साडेतीन वर्षांच्या सेवेनंतर काही कारणास्तव त्यांनी वाटूमल महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रॉम्प्टन या खासगी कंपनीत त्या ‘कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह’ पदावर रूजू झाल्या. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन वरिष्ठांनी प्रोबेशन काळातच त्यांना बढती दिली. मात्र तीन-चार वर्षे हे काम केल्यानंतर पुन्हा शिक्षकी पेशात यायचा निर्णय त्यांनी घेतला. १९९४ ते ९९ या काळात त्यांनी रिझवी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, व्हीजेटीआय, एमईटी या महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केले. २००० मध्ये त्यांना व्हीजेटीआयमध्येच पूर्णवेळ व्याख्याता होण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाचा व्याप आता रेडिफ, आयबीएम, सिटी बँक अशा विविध कंपन्याच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन पोचला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या काही पुरस्कारांच्या मानकरीही त्या ठरल्या आहेत. त्यांना पीएच.डी.साठी अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’ येथे पाठविण्याचा निर्णय व्हीजेटीआयने घेतला आहे. ऑगस्टमध्ये त्या अमेरिकेला जाणार आहेत, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.
August 5, 2017
December 15, 2010
मोहंमद जहूर खय्याम हाश्मी... त्यांना सारे जग प्रख्यात संगीतकार खय्याम या नावाने ओळखते.त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी जालंधरनजीकच्या राहों शहरात झाला.खय्यामम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. ते दहा वर्षांचे असतानाच आपले गावातील घर सोडून दिल्लीयत राहणार्या काकांच्याेकडे आले. तेथेच राहून त्यांपनी आपल्या करिअर घडवण्याघची स्वयप्नेा बघितली. मुंबईत आल्याेनंतर त्यां च्याा करिअरला खर्याक अर्थाने सुरु झाली. मुंबईला आल्यावर ‘यह है जिंदगी’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. १९४७ मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी ‘शर्माजी’ या टोपणनावाने चार चित्रपटांना संगीतही दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या मा. खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नाहसच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले आहे. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवतो. एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. मा.खय्याम हे गेली ७० वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मा.खय्यायम यांनी ७० आणि ८०च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. त्यांनी 'त्रिशूल', 'थोडी सी बेवफाई', 'बाझार', 'कभी कभी', 'उमराव जान', आणि 'नूरी'सारख्या सिनेमांना संगीत दिले. वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम. व्यावसायिक यशासाठी झगडत असलेल्या मा.ख्ययाम यांच्या 'फिर सुबह होगी' या चित्रपटाची गाणी ऐकल्यावर राज कपूर यांनी 'खय्यामसाहब अब आपकी सुबह हो गयी' असे प्रेमाने म्हटले होते.प्यारका दर्द ही मीठा मिठा, कभी कभी मेरे दिल मे’ और दिल चीज क्या है या गाण्यांनी तरुण आणि वृद्ध लोकानाही वेड लावले होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशकाहून आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून मा. खय्याम टाकले होते. ’कभी कभी’, ‘बाजार’, ‘त्रिशूल’, ‘ नुरी’ ,‘आखरी खत’ अशा अनेक चित्रपटाना त्यांचा परीस स्पर्श लाभला होता. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००७ साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार व भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.खय्यायम यांचा गौरव केला आहे. मा.खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाली होती. मा. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या पण गायिका होत्या. मा.जगजीत कौर यांनी नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी मा.खय्याम यांनी गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाला १२ कोटी रुपये देणगी दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणार्यांाना आर्थिक मदत केली जाणार आहे. या ट्रस्टमध्ये काही मान्यवरांना ट्रस्टीच्या रूपात जोडले जाईल. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं कौतुक करू तेवढे कमी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
February 20, 2017
आज १४ ऑक्टोबर. भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची जयंती. त्यांचा जन्म१४ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला.
निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान. अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील बॅनर्जी यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील बॅनर्जी यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी अनेक पहिला परदेश दौरे केले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. भारत सरकाने निखिल बॅनर्जी यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्कार व १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. १९७४ साली निखिल बॅनर्जी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. मा.निखिल बॅनर्जी हे सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात. मा.निखिल बॅनर्जी यांचे २७ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मराठी विकिपीडिया
October 14, 2016
वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली.१९५४ मध्ये जपान येथे झालेल्या दुसर्या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले.
July 5, 2022
पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, संशोधक, विनोदकार, वादग्रस्त लेखक अन् अतिशय सर्जनशील, संवेदनशील माणूस... खुशवंतसिंग यांची ही विविध रूपे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पाकिस्तानात असलेल्या हदली येथे झाला.तब्बल सात दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक तसे विरळेच. खुशवंतसिंग त्यांपैकी एक. वृत्तपत्रांतील स्तंभ असो वा कादंबरी; किस्से असोत की चुटके... प्रत्येक माध्यमांतून ते मैफल रंगवत होते आणि रसिक त्यांचा आस्वाद घेत होते.
खुशवंत सिग यांचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी आपल्या जन्मगावी घेतले. त्यानंतर लाहोर, दिल्ली आणि लंडनमधून शिक्षण पूर्ण केले. 'बार अॅट लॉ' झाल्यावर १९३९ ते ४७ या दरम्यान लाहोर हायकोर्टात त्यांनी वकिली केली. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी परराष्ट्र खात्यात नोकरी स्वीकारली. सरकारने त्यांची वार्तांकन सहाय्यक या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर लंडनच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून आणि युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांनी काम पाहिले. नभोवाणी मंत्रालयाच्या योजना नियतकालिकाचे संपादकत्व त्यांनी काही वर्षे सांभाळले. सरकारी नोकरीनंतर त्यांनी अध्यापनाकडे मोर्चा वळविली आणि अमेरिकेतल्या प्रिस्टन विद्यापीठात प्राध्यापकी केली. त्यांच्या कर्तृत्वाला खरा बहर आला, तो त्यांनी 'बेनेट कोलमन अँड कंपनी'च्या 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया' या साप्ताहिकाचे प्रमुख संपादकपद स्वीकारल्यावर. त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा हे मासिक म्हणजे फक्त उच्चभ्रू वर्तुळासाठीच असणारे असा समज होता; पण हा समज त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने बदलून टाकला. सामान्यांपर्यंत पोहोचले तरच ते यशस्वी होईल, असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी मासिकात अनेक बदल केले. हे बदल यशस्वी ठरले आणि मासिकाचा खप ६५ हजारांवरून चार लाखांवर पोहोचला. 'विथ मॅलिस टू वर्ड्स वन अँड ऑल' हा त्यांचा साप्ताहिक स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्घ होत असे व तो वाचकप्रियही झाला होता. वाचणाऱ्याला मजा येईल, असे त्यांचे लेखन असे. त्या काळात असणारी संपादकाची प्रतिमा त्यांनी संपूर्ण बदलली. सहजतेने कोणालाही भेटणारे, पदाची आढ्यता न बाळगता काम करणारे आणि सहज संवाद साधणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्यासोबत काम करणारेही सहज संवाद साधू शकायचे, हेही त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते. संपादकीय पान म्हणजे फक्त बुद्धिजीवी लोकांचे ही प्रतिमाही त्यांनी मोडून काढली. सामान्य माणसाला काय वाटते, त्याच्या काय अपेक्षा आहेत यापासून पत्रकारिता दूर जाऊ नये यासाठी ते झटत असत. अर्थात त्यांच्या कारकिर्दीतील अनेक विधाने वादग्रस्तही ठरली. इंदिरा गांधींशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी घरोबा असतानाही त्यांनी कधी कुठलीही एकच राजकीय बाजू घेतली नाही. आपल्या विधानांवरून उठलेली वादळेही ते खुशीने स्वीकारत असत. खुशवंतसिंग यांनी त्यांच्या लेखणीचा पट्टा चौफेर फिरवला. राजकारण, समाजकारण, प्रेम, इतिहास, भाषांतर, लघुकथा, शीखांचा इतिहास अशा सर्व प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली आहे. स्त्रियांविषयीचे अत्यंत उघड श्रृंगारिक वर्णन, तिरकसपणा आणि नर्मविनोदीपणा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. त्यांना देशाविषयी प्रचंड अभिमानही होता. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी 'ट्रेन टू पाकिस्तान' ही कादंबरी खूप गाजली. फाळणीच्या दरम्यान घडलेल्या घटनांची आणि फाळणीच्या परिणामांची कहाणी त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये मांडली आहे. हातोहात खपलेल्या या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. या पुस्तकाला गोव्ह प्रेस अॅवॉर्डही मिळाले. तिचे कथानक वापरून पुढे 'ट्रेन टू पाकिस्तान' हा चित्रपटही निघाला, 'द हिस्ट्री ऑफ शीख्स' या पुस्तकाचे तीन खंड त्यांनी लिहिले. ही पुस्तके विश्वसनीय कागदपत्रे आणि पुराव्यांवर आधारलेली आहेत. या पुस्तकांत शिखांचा सचित्र इतिहास देण्यात आला आहे. मात्र, त्यांनी लिहिलेले रणजितसिंग यांचे चरित्र व्यक्तिपूजक आणि अवास्तव महती गाणारे असल्याची टीका झाली होती. त्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. हातातले पेन वृद्धत्वामुळे गळून पडत होते; पण मनातील उत्साह कायम होता. 'द सनसेट क्लब' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या वयाच्या ८०व्या वर्षी प्रसिद्ध झाले; पण ८० व्या वर्षीही त्यांनी जगण्याविषयी, राजकारणाविषयी आणि समाजाविषयी इतके भरभरून लिहिले आहे की थक्क व्हायला होते. त्यामुळेच ९८व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी निवृत्तीनंतर कसे जगावे हे सहजतेने लिहिले आहे. या ९८व्या वाढदिवशी ते म्हणाले होते, 'पुढे नेण्यासाठी माझ्यापाशी खूप थोडे उरले आहे; पण आठवून पाहावे आणि त्यात रमावे असे खूप काही मी जमवले आहे. आयुष्याच्या जमा खात्यावर ८० पुस्तके, कादंबऱ्या, लघुकथा, आत्मचरित्र, इतिहास, पंजाबी आणि उर्दूत केलेली भाषांतरे आणि अनेक निबंध आहेत. वयाच्या ९८व्या वर्षीही ते लिहित होते. प्रतिभेचे लेणे घेऊन आलेले मा.खुशवंतसिंग सर्व माध्यमांतून त्याचा आविष्कार घडवत गेले. म्हणूनच लोकप्रियतेची उंची त्यांना गाठता आली. मा.खुशवंतसिंग यांचे २० मार्च २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खुशवंतसिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही एक वादग्रस्त कादंबरी.
एका उद्योगपतीचं बिनधास्त आत्मवृत्त..खुशवंतसिंगांच्या बेधडक शैलीतून...
चैतन्य प्रेम विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृक्ष आहे. खुशवंत सिंग यांनी हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं यात जिवंत केले आहेत.
March 21, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti