जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” , “पालखीचे भोई” अशा एकाहून एक सरस तसंच दर्जेदार काव्यरचनांची निर्मिती करणारे प्रसिध्द कवि व साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये १५ जून १९२८ रोजी झाला.
July 10, 2012
दामू-गोविंदा जोड रे...
राम राम मंडळी,
१९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.
मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.
मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.
"अरे तू इथे कुठे?"
"बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"
"अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे.
"त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.
पं गोविंदराव पटवर्धन!
संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर.
गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला. त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.
पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.
एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!
मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.
त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.
पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.
कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.
नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!
बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!
मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!
गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!
"पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!
साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!
साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला, "तात्या, गोविंदराव गेले."
मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
तात्या अभ्यंकर.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
January 31, 2017
कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.
September 3, 2010
मारुतीराव कीर यांनी आपले करियर तबला वादक म्हणून सुरू केले. त्यांचे गुरु होते भानुदास मानकामे, भैरव प्रसाद, सुंदर प्रसाद आणि उस्ताद गेमखान साहब होते. मारुती राव कीर यांनी शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ सर्व संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले. जवळजवळ सर्व जुन्या मराठी चित्रपटांमधून आणि नॉन-फिल्मच्या गाण्यांमध्ये मारुती राव कीर यांनी तबला वाजवला आहे. मारुती राव कीर यांनी आधी एस.डी बर्मन यांच्या साठी आणि नंतर आर.डी बर्मन यांच्या साठी शेवटपर्यत रिदम असिस्टट म्हणून काम केले.
तबलावरील त्यांची निपुणता "पिया तोसे नैना लेगे रे" या गाण्यात दिसते. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या काळात मारुतीराव आणि पंचम यांची मैत्री झाली व ती शेवट पर्यत टिकली. पंचमच्या यांच्या पहिल्या चित्रपट "छोटे नवाब" पासून मारुतीराव कीर रिदम ऍरेंजर व जवळचा मित्र म्हणूनच राहिले. पंचम यांचे इतर सर्व संगीत दिग्दर्शकांमध्ये सर्वात जास्त फॅन आहेत. यासाठी मारुतीराव कीर यांना हे क्रेडीट द्यावे लागेल. पंचम आणि मारुतीराव कीर हे नेहमी रीद्मच्या काहीतरी नवीन शोधात असत, नवीन इन्स्ट्रुमेंटची ओळख करून घेत असत, मारुतीराव कीर यांनी पंचम यांना एकदा टुम्बा या वादयाची कथा सांगितली, जेव्हा पंचम आणि मारुतीराव कीर त्यांच्या ग्रुपसह आफ्रिकेत शो साठी गेले होते. तेथे त्यांनी टुम्बा नावाचे हे आफ्रिकन वाद्य पाहिले.
पंचम यांनी मारुतीराव कीर यांना ते वाद्य कसे वाजते हे दाखवण्यास सांगितले मारुतीराव कीर उभे राहिले व सराईत वादकासारखे टुम्बा वाजवून दाखविले, ही खरोखरीच कमाल होती. पंचम यांनीच टुम्बा याला भारतात आणले, व भारतात वाजवण्याचा पहिला मान मारुतीराव कीर यांना जातो. मारुतीराव कीर यांनी टुम्बाचा पहिल्यादा मनोरंजन चित्रपटात "आया हु मै तुझे ले जानुगा" या गाण्याच्या साठी वापर केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक शम्मी कपूर होते. अनेक दशके त्यांनी रिदम ऍरेंजर म्हणून हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली. लतादिदी, आशा भोसले यांच्या अनेक गीतांचा रिदम मारूती कीरांनी ऍरेंज केला.
मारुतीराव कीर हे एवढे मोठी व्यक्ती असून शेवट पर्यत साधे राहिले. दादरमधील आपल्या १० × १२ च्या रूम मध्ये ते राहत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचा पहिला विद्यार्थी अमृतराव काटकर होते. मारुतीराव कीर यांच्या मुळे पंचम यांचे बहुसंख्य तालवादक अण्णा जोशी, अमृतराव, मान्या बर्वे, नाईक,असे मराठी माणसेच होती.
मारुतीराव कीर व पंचम यांची एवढी मैत्री होती की पंचम यांच्या निधना नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बंद केले होते. मारुतीराव कीर यांचे निधन ११ जानेवारी २००५ रोजी झाले.
मारुतीराव कीर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी हिंदी गीते, ढोलकी जुगलबंदी, सोलो वादनाची संगीत मैफील 'स्मृतिगंध' म्हणून रत्नागिरीत आयोजित केली जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://youtu.be/DtwRUINTDaY
January 11, 2018
मधुकर तोरडमल यांना नाट्यसृष्टीत मामा म्हणत असत. प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात मुंबईत शाळेपासून झाली. शेठ आनंदीलाल पोद्दार ही त्यांची शाळा. शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्याला नाटकात काम करण्याची आवड असल्याचे त्यांनी वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. चिं. वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक मामांनी बसवले. दिग्दर्शन आणि अभिनयाची सुरुवात तिथूनच झाली. नंतर झालेल्या अनेक स्नेहसंमेलनात, अन्य कार्यक्रमांत नाटक बसवण्याची जबाबदारी मामांवरच आली जी त्यांनी यशस्वी पार पाडली.
July 2, 2021
भारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे महत्त्वाचे काम राजीवजींनी केले. त्यांनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. संगणक, दूरसंचार क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपविण्याचा प्रयत्नदेखील राजीवजींनी केला.
August 17, 2025
आज १९ आक्टोबर.... आज गीतकार मा.शांताराम नांदगावकर यांची जयंती
जन्म: १९ आक्टोबर १९३६
"हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर.
मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. 'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते. चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.
शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्यात होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्या बहराचा काळ हा मराठी चित्रपट गीत-संगीताच्या दृष्टीनं अधोगतीचा होता. त्यामुळे अनेकदा ‘बिनडोक’ सिच्युएशन्ससाठी गाणी लिहिण्याचं ‘व्यावसायिक काम’ त्यांना करावं लागलं; तरीही जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी गीतकार म्हणून आपल्या क्षमतेचा प्रत्यय आणून दिला. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास भावगीताच्या प्रांतात सुरू झाला, तेव्हा चित्रपटसृष्टीत ग.दि.मा., सुधीर फडके, राम कदम, जगदीश खेबुडकर ही समीकरणे ऐन भरात होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांत सर्व काही बदलले. या दरम्यान नांदगावकर यांनी भावगीतांच्या प्रांतात मुशाफिरी केली. ‘रामप्रहरी राम गाथा’सारखे त्यांचे गाणे पूर्वसूरींशी आणि मराठी भक्तीगीतांच्या सुरेल परंपरेशी नाते सांगणारे होते. याच दशकात सांस्कृतिक अभिरुची सांधा बदलत होती. अर्थवाही शब्द, भाषेचा डौल, कल्पनांची भरारी हे सर्व एका विशिष्ट वर्गाच्या सांस्कृतिक अभिरुचीसाठी लिहिले जात होते. हा पांढरपेशा मध्यमवर्ग विस्तारला तसा मराठीतील गीत, संगीत, चित्रपट, नाटक या सगळ्यांचाच बाज बदलला. १९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले. परंतु, त्यांनी चित्रपटाबाहेर जशी गाणी लिहिली, उदाहरणार्थ, ‘सजल नयन नितधार बरसती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ तशी त्यांना चित्रपटात लिहिण्याची संधी क्वचितच मिळाली.
एक आठवण मा.नांदगावकरांची.
१९९५-९६ च्या सुमारास ‘तू सुखकर्ता’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार शांताराम नांदगावकर पार्टीला आपल्या सूनबाईला घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडे ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. त्या चित्रपटात बहुधा तिने एक गाणे गायले होते. त्यांच्या प्रसन्न मूडमध्येच त्यांना कोणीतरी विचारले, ‘तुमचा चष्मा डोळ्यांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो. असं का?’ नांदगावकर मिश्किल हसले आणि म्हणाले, ‘कवी नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो, त्यामुळे मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यांवर सरकवतो. एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो.’ गमती गमतीत ते एक मोठे सत्य सांगून गेले होते.
‘अष्टविनायक’नंतर सचिनच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुण सोबत त्यांची ‘वेव्हलेंग्ध’ चांगलीच जुळली, परंतु ‘धुमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ नंतर सचिन- महेश- अशोक- लक्ष्या यांची लाट आली. त्यात गीत संगीताला फार वाव नव्हता. त्यातल्या त्यात सचिनच्या काही चित्रपटांत त्यांना बरी गाणी देता आली. ‘गंमत जंमत’साठी किशोरकुमार यांना मराठी गाणे द्यायचे ठरले, तेव्हा मराठीतल्या ‘ळ’चा उच्चार करता येत नाही आणि ‘च’चा उच्चार आपण ‘च्य’ असा हिंदी पद्धतीने करतो, असे कारण सांगून ते गाण्यासाठी राजी होईनात. पण ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी, ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी सोपी शब्दरचना केली आणि किशोर कुमार यांनी धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. मात्र बऱ्याचदा ‘दोन रुपये दे मला, खर्चाला पानसुपारीला.’ असे शब्द जोडण्याची व्यावसायिक मजबुरी शांताराम नांदगावकर यांना स्वीकारावी लागली. १९९६ नंतर ते हळूहळू यापासून दूर गेले. अनेकदा प्रथितयश गीतकार बहुजनांच्या गीत- संगीतापासून फटकून राहतात, परंतु मुळातच निर्भय स्वभावाच्या नांदगावकरांनी स्वत:ला कधी अशा चौकटींमध्ये बंदिस्त केले नाही. त्यामुळे एका बाजूला ‘दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली’ अशी गाणी लिहिताना दुसरीकडे सुनील गावस्करच्या खासगी अल्बमसाठी शब्द पुरवत तितक्याच उत्साहाने ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला’ असे खेळाचे तत्त्वज्ञान सांगून गेले. क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. मा.शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते. मा.शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै २००९ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा.शांताराम नांदगावकर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
मा.शांताराम नांदगावकर यांची काही गाणी
पहिले ना मी तुला
रजनीगंधा
रुपेळी वाळूत
हरी नाम मुखी रंगते
श्रीरंग सावळा तु
October 19, 2016
जेनिफर यांचे वडील गोफरे केंडल जेष्ठ रंगकर्मी होते. ते आपली पत्नी व दोन्ही मुलीच्या सोबत कोलकाता येथे शेक्सपियरन ग्रुप चालवत असत. जेनिफर यांची बहीण फ्री केंडल यांनी ‘शेक्सपीयर वाला’ या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की, शशी आणि जेनिफर यांची पहिली ओळख एका कनफ्यूजनमुळे झाली होती.
March 1, 2024
लेखन आणि बुद्धीबळ ह्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे श्री. शिरीष वामन हिंगणे. “काय पाहिलस माझ्यात?”, “गंगुबाई नॉनमॅट्रीक” ह्या व अशा अनेक मालीकांत एपिसोड लेखन त्यांनी केले.
May 23, 2014
तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य.
July 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti