जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
माझा पती करोडपती’, ‘कुंकू’, ‘अशी ही बनवाबनवी’ अश्या ब-याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या ‘तू तू मै मै’ टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. ‘नवरा माझा नवसाचा’ ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली.
August 17, 2017
बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे.
March 19, 2019
त्यांची १८९४ सालची ‘द ग्रेट गॉड पॅन’ ही दीर्घकथा ही आदर्श भयकथा म्हणून नावाजली गेली आणि स्टीफन किंगसारख्या मातब्बर लेखकाच्या मते तर, ती इंग्लिश भाषेतली सर्वोत्तम भयकथा ठरावी!
December 15, 2021
बल्लाळ, नरेंद्र
नरेंद्र बल्लाळ यांनी ऐन आणीबाणीच्या काळामध्ये, “ठाणे वैभव“ नावाचे दैनिक काढण्याचा जो निर्णय घेतला होता, तो त्या काळातील एकंदर राजकीय “घडामोडी पाहता अत्यंत धाडसाचा होता. ठाण्याच्या सार्वजनिक जीवनावर वेगळा ठसा उमटवित, ह्या दैनिकाने घेतलेली प्रगतीची गरूडभरारी नक्कीच वाखाण्यासारखी आहे. ठाण्यातील विविध क्षेत्रांमधील अचूक नोंद करणारे विश्वासार्ह दैनिक अशी या दैनिकाची किर्ती आहे. जिल्हा दैनिक सुरू करण्यासाठी नरेंद्र बल्लाळांनी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील नोकरी सोडून , हे वृत्तपत्र सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.
सध्या त्यांचे चिरंजीव मिलिंद बल्लाळ व नातू निखील बल्लाळ हे नव्या संकल्पना आणिव्यावसायिक गणितांची आखणी करुन नरेंद्र बल्लाळ यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.
January 12, 2015
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’ अशा कार्यक्रमांतून छोटा पडदा गाजविणारा, तसेच अनेक चित्रपट, मालिका व नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे दूरदर्शन वरील “चालता बोलता” आणि जी मराठी वरील “फु बाई फु” या कार्यक्रमातून तो घरा घरात पोहचला. “फु बाई फु” च्या एका पर्वाचे तो विजेते ठरला होता.
June 18, 2022
गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९३७ रोजी झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशन बावरा यांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरमधल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला.
नंतर गुलशन बावरा यांनी दिल्लीस येऊन मॅट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती.
पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वे भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तऱ्हेने ते माया नगरीत दाखल झाले.
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले मैं क्या जानूँ कहाँ लागे ये सावन मतवाला रे हे गीत लता मंगेशकरांनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नोकरी सोडून दिली.चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतिभाई पटेल यांनी त्यांचे नामकरण बावरा असे केले. तेव्हापासून ते गुलशन बावरा या नावाने ओळखले जाऊ लागले.
चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ २४० गाणी लिहिली आहेत. पैकी कल्याणजी-आनंदजी ह्या संगीतकारांसाठी गुलशन बावरा यांनी एकूण ६९ गाणी लिहिली तर आर. डी. बर्मन यांच्यासाठी १५० गाणी लिहिली.त्यांना मेरे देश की धरती आणि यारी है इमान मेरा या गाण्यांसाठी दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मेरे देश की धरती (उपकार), यारी है इमान मेरा (जंजीर), अगर तुम ना होते (अगर तुम ना होते), वाद कर ले साजना ( हाथ की सफाई), कस्मे वादे निभायेंगे हम (कस्मे वादे) ही काही त्यांची गाजलेली गीते. गुलशन बावरा यांचे ७ ऑगस्ट २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 7, 2017
मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली. त्यांचा जन्म २१ मे १९२८ रोजी झाला. कला व नाटय़ क्षेत्रातील आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर सन १९५१ मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. दोन वर्षांतच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये १९५६ पर्यंत त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतरची चार वर्षे त्यांनी जाहिरातींचे कॉपीरायटिंग केले. प्रामुख्याने त्यांनी शिल्पी अॅयडव्हर्टायझिंगसाठी कॉपीरायटर काम पाहिले. याच काळात त्यांनी फ्री प्रेस जर्नल साठी सहसंपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. १९५९ ते १९६१ त्यांनी फ्री प्रेससाठी काम पाहिले तर १९६१ ते ६८ या काळात त्यांनी फिनान्शिअल एक्स्प्रेससाठी काम पाहिले. कलासमीक्षक या नात्याने त्यांनी इंग्रजी व मराठीत भरपूर लिखाण केले. साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट आदी विविध कलाप्रकारांचा मागोवा घेताना याच काळात येऊ पाहणाऱ्या नवनव्या बदलांचा ते मनपूर्वक पाठपुरावा करीत असत. या विषयीचे लेखन त्यांनी भारतातील बहुतेक अग्रगण्य दैनिक व नियतकालिकांत सातत्याने केले. १९९६ साली त्यांच्या कलासमीक्षणाचा गौरव करणारे एक जंगी प्रदर्शन जहांगीर कलादालनात पार पडले. त्यावेळेस अनेक ज्येष्ठ- श्रेष्ठ कलावंतांनी त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी त्यांच्या गौरवार्थ देऊ केल्या होत्या. त्यात एम. एफ. हुसेन, अकबर पदमसी यांचाही समावेश होता. याच प्रदर्शनप्रसंगी नाडकर्णीनी युवा कलाकांरांसाठी ज्येष्ठ कलावंतांच्या नावाने सुमारे १३ पारितोषिके जाहीर केली होती.
त्यांच्या कलासमीक्षण लेखांना जगभर चांगला प्रतिसाद मिळाला. फ्रान्स सरकारने कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन १९८६ साली तर ब्रिटिश सरकारने १९९४ साली त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. महत्त्वाचे म्हणजे शिल्पकलेच्या प्रांतात नवकलेचे वारे आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगप्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर याच्या जन्मशताब्दी निमित्ताने ब्रिटिश सरकारने संपूर्ण वर्षभरासाठी एका महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीमध्ये नाडकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना त्यासाठी सरकारने खास ब्रिटनमध्ये पाचारण केले होते. आर्टिस्ट्स सेंटर व बॉम्बे आर्ट सोसायटी या कलाक्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांना फ्रेंच सरकारतर्फे ‘अक्षरांचे शिलेदार’ हा किताब बहाल करण्यात आला होता.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी समीक्षक या नात्याने नियतकालिकांत जसे विपुल लिखाण केले; तसेच साहित्याच्या विविध प्रकारांतही त्यांच्या पुस्तकांनी आगळे स्थान मिळवले. पाऊस, भरती, चिद्घोष, प्रस्थान हे कथासंग्रह, दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित या कादंबऱ्या आदींबरोबरच विख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यावरील ‘अनवाणी’ तसेच पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल व हिचकॉक यांच्यावरील चरित्रग्रंथांचे लेखनही त्यांनी केले. अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप आदी समीक्षा ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. ‘विलायती वारी’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. बालगंधर्वावरील इंग्रजी चरित्राचे लेखन करून त्यांनी मराठीतील या बुजुर्ग कलावंताची जागतिक पटावर ओळख करून दिली.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे २३ डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 23, 2018
२९ मे १९५३ साली श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे व श्री. एडमंड हिलरी यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले. या मोहिमेनंतर श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा फायदा सर्वांना मिळावा व गिर्यारोहण क्षेत्राचा भारतवर्षामध्ये प्रसार व विकास व्हावा या विचारातून श्री. पंडित नेहरू यांनी रक्षा मंत्रालयाच्या अख्यारीत हि संस्था दार्जिलिंग येथे स्थापन केली. शेर्पा तेनझिंग हे तिबेटी कि नेपाळी ह्यावर वाद होते. पण हा भला माणूस होता. शेर्पा तेनझिंग आणि हिलरी ह्यात ‘आधी’ शिखरावर कोण गेले असे फालतू वाद कित्येक पत्रकारांनी उपस्थित केले. आम्ही दोघे एकदमच पोचलो असे दोघेही सांगत.
May 31, 2022
दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू' ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण नसलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी दासूंचे बालपण गेले. तिथे कुस्तीचे फड रंगत होते, तरीही निसर्गाशी जोडले राहिल्याने कविता बहरली. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या.
"आई-वडील व भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे. दासू वैद्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मराठी या विषयात एम.ए. तसेच डिप्लोमा इन ड्रामा शिक्षण घेतले. यु.जी.सी. तर्फे त्यांना रिसर्च फेलोशिप देखील मिळाली होती. तर एम.फिलसाठी 'भारत सासणे यांच्या दीर्घकथा' तर पीएच.डी.साठी 'भारत सासणे यांचे साहित्य' हे विषय निवडून सदर विषयांवर त्यांनी प्रबंध लेखन केलेले होते. काहीकाळ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. वृत्तपत्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पुरस्कृत 'शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२००९' त्यांना प्रदान करण्यात आलेला होता.
१९८७ पासून मराठीतील वाड्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने ते कविता लेखन करत आहेत. मौज, अनुष्टुभ, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची, साक्षात, ललित, अक्षर चळवळ, कवितारती, शब्दवेध, अभिधानंतर, महाराष्ट्र टाईम्स, मिळून साऱ्याजणी, शब्दालय, साधना इत्यादी अनेक वाड्मयीन अंकांमधून आजवर त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला 'तूर्तास' हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह. मान्यवर समीक्षक व रसिक वाचकांनी गौरविलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांमध्ये रा.ना.पवार प्रतिष्ठान, सोलापूरचा काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'मराठी कविता राजधानी पुरस्कार', बुलडाणा साहित्य संघाचा ना.घ.देशपांडे साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचा विशाखा पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे ललित मासिकाच्या लक्ष्यवेधी पुस्तकात व अंतर्नाद मासिकाने निवडलेल्या शंभर वर्षांतील पन्नास पुस्तकांत 'तूर्तास' या कविता संग्रहाची निवड झालेलीं आहे. दासू वैद्य यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हस्तलिखित कवितांसाठीच्या 'कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार', ललित लेखनासाठीच्या लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार, समग्र लेखनासाठीच्या कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलेले आहे. पॉप्युलर प्रकाशन प्रस्तुत 'चौघांच्या कविता' या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केलेले आहे. दासू वैद्य हे केवळ कविता लेखनच करतात असे नाही तर कवितांचा इंग्रजी, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमधून प्रभावीपणे अनुवाद देखील करतात.
दासू वैद्य यांनी बालसाहित्यामध्ये देखील आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. 'भुर्रर्र' या त्यांच्या बालकथा संग्रहाला महाराष्ट्र बालसभा, कोल्हापूरचा २००७ सालचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार मिळालेला असून 'क-कवितेचा' या बालकविता संग्रहाला सौ.शशिकला आगाशे स्मृती बालवाड्मय पुरस्कार, बुलडाणा व मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार, आजरा, जि.कोल्हापूर असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. महावीर जोंधळे यांच्या 'आसवं गाळती कासवं' या बालकादंबरीचे त्यांनी नाट्यरुपांतर करून त्याचे महाराष्ट्रात यशस्वीरीत्या व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या 'सुगम भारती' क्रमिक पाठ्यपुस्तकात 'पक्ष्यांना घर हवे' या बालनाट्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी, अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर, कविता विभागासाठी तसेच विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सवात नाटक, कविता या कला प्रकारांसाठी परीक्षक व तज्ञ म्हणून त्यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुद्रेमनी, ता.जि. बेळगांव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद देखील त्यांनी यशस्वीपणे भूषविलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, साहित्य अकादमीच्या महोत्सवांमध्ये त्याचप्रमाणे आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेकवेळा कविता वाचन करण्याची संधी त्याला लाभलेली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये व कवितांच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदविलेला आहे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत त्यांच्या 'वाळवी' या नभोनाट्याला लेखनासाठीचा पुरस्कार मिळालेला असून या नभोनाट्याचा इतर भारतीय भाषांमधून अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे.
मदुराई येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्यविभागाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावलेले आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्टीत एकांकिका स्पर्धांमधून 'एक लेखक लिहिणार आहे..' 'आम्हाला बांधायचय मंदिर..' या सारख्या एकांकिकांसाठी व 'च्यानल झीरो' या पथनाट्यासाठी लेखन, दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील दिग्दर्शनासाठी पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. एवढेच नव्हे तर साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य लेखन व सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या मरून पडलेला पांडुरंग, एकदा मी, भीती मेंदूत आरपार या सारख्या अनेक कवितांचा, 'तूर्तास' या कविता संग्रहाचा तसेच 'देता आधार का करू अंधार' या एकांकिकेचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या वाड्मयीन मुलाखती विविध अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. 'बिनधास्त' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगुळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार मिळालेला आहे. 'भेट' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी-गौरव पुरस्कार मिळालेला असून या व 'सावरखेड एक गांव' या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी म. टा. सन्मानासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. 'सोनियाचा उंबरा' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी म. टा. सन्मान पुरस्कार तर 'पदरी आलं आभाळ'च्या शीर्षक गीतासाठी लक्स सह्याद्री माणिक सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे.
'गाभ्रीचा पाऊस', 'खाली डोकं वरती पाय' तसेच 'तुकाराम', सावरखेड एक गाव अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेले आहे. ई टीव्ही, झी टीव्हीवरील 'पिंपळपान', 'टिकल ते पॉलिटिकल', 'एक होता राजा', 'आपली माणसं', 'रंग माझा वेगळा', 'घर श्रीमंताचं' इत्यादी मालिकांसाठी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तर 'लेक वाचवा' अभियानासाठी अभियानगीत लिहून सामाजिक उपक्रमांत देखील त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.
#DasuVaidya
November 26, 2021
पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बसेश्वरनाथ कपूर हे पोलिस उपनिरीक्षक होते. बसेश्वर यांची बदली पेशावर येथे झाल्याने कपूर खानदान या शहरात राहायला आले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार (मूळ शब्द किस्सा कहानी, मग त्याचा अपभ्रंश झाला.) परिसरातील डाकी नालबंदी भागात कपूर खानदानाचे पिढीजात घर आहे. पृथ्वीराज कपूर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०६ रोजी पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला. पृथ्वीराज कपूर यांचे सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण ल्यालपूर येथील खालसा कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पेशावरमधील एडवर्ड्स महाविद्यालयात झाले. एडवर्ड्स महाविद्यालयातील प्राध्यापक जय दयाळ हे कलाप्रेमी होते. पृथ्वीराज कपूर यांच्यातील अभिनेत्याला पहिली संधी मिळाली ती याच महाविद्यालयात. एडवर्ड्स महाविद्यालयातून पृथ्वीराज कपूर बी.ए. झाले. पृथ्वीराज कपूर यांचे खरे प्रेम नाटकांवरच होते. त्यामुळे पुढे साहजिकच त्यांची पावले नाट्य व चित्रपटसृष्टीकडेच वळली. १९२८ मध्ये पृथ्वीराज कपूर मायानगरी मुंबईमध्ये आले आणि मग कायमचे इथलेच झाले. पृथ्वीराज कपूर यांचा विवाह पेशावरमध्ये रामसरनी मेहरा यांच्याशी झाला. त्या वेळी पृथ्वीराज यांचे वय होते १७ वर्षांचे, तर त्यांच्या पत्नीचे वय होते १४ वर्षांचे. पृथ्वीराज कपूर यांनी मुगल-ए-आझम या सिनेमात साकारलेली अकबरची भूमिका अविस्मरणीय आहे. पृथ्वीराज कपूर यांना तीन मुले एक मुलगी. शम्मी कपूर, राज कपूर आणि शशि कपूर व उर्मिला सियाल. आपले आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतचा ऋषी कपूर यांचा लहानपणाचा एक किस्सा एका पुस्तकातील.
‘लहानपणीच चित्रपटसृष्टीशी माझी ओळख झाल्याबद्दल मी खरोखरच खूप ऋणी आहे. हिंदी सिनेमातल्या काही ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदारही आहे. त्यावेळी मी साधारण सहा वर्षांचा होतो. आजोबांनी (पृथ्वीराज कपूर) डब्बू (रणधीर कपूर), रितू (रितू नंदा) आणि मी.. असं आम्हा तिघांना गोळा केलं, अक्षरश: आम्हा तिघांचं गाठोडं करून त्यांच्या छोट्याशा ओपेल कारमध्ये घातलं आणि असीफसाब (के. असीफ) दिग्दर्शित करीत असलेल्या मुगल-ए-आझम या ऐतिहासिक चित्रपटाच्या भव्यदिव्य अशा सेटवर ते आम्हाला घेऊन गेले. मला मात्र खुद्द ‘अकबर बादशहा’नंच आपलं बोट धरून या चित्रपटाच्या सेटवर नेल्याच्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होता आलं. माझ्या आयुष्यातली ती रणरणती दुपार म्हणजे एक अमूल्य असा ठेवा आहे. त्या दिवसाचा क्षण अन् क्षण आजही माझ्या मनात अगदी आज, आत्ता घडल्यासारखा ताजा, रसरशीत आणि जिवंत आहे.
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर यांनी कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे नेला आणि हिंदी सिनेसृष्टीला मोलाचे योगदान दिले. पृथ्वीराज कपूर यांचे निधन २९ मे १९७२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / समीर परांजपे
May 29, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti