जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
खरतर, जयदेवला "अपयशी" संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.
मला वाटत, त्यांच्या आयुष्याची सुरवातच मुळी "सहाय्यक" म्हणून झाली आणि त्यातच बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी, सुरवातीला, उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत, देव आनंदच्या "आन्धीया" या चित्रपटाला संगीत देताना, सहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर, एस.डी.बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!! जयदेव यांचे खरे नाव झाले ते, "हम दोनो" या चित्रपटाने!! पण, दुर्दैवाने, या संगीताच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजुबत झाला नाही. एकदा, देव आनंद म्हणाला होता कि," जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!!" अजब तर्कशास्त्र!! एक खरे कि, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या पण तो त्यांचा शैलीचा भाग होता, त्याला कोण काय करणार. पण, मग, मदन मोहन तरी काय फारसे वेगळे करायचा!! अर्थात, मदन मोहन देखील अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर वावरला!! एखाद्या संगीतकाराची शैली जर का रूढ मार्गाने न जाता, वेगळ्या वाटेने जात असली तर, तो काय दोष मानायचा का? त्या अर्थाने मराठीतील, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हे देखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!!
जयदेवला, "हम दोनो" व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटाने लौकिकार्थाने यश दाखवले नाही. अगदी, "अंजली" पासून ते शेवटचा, "हीर रांझा" पर्यंतचा इतिहास, हेच उत्तर दर्शवतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा कि आपल्या तत्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत मोजली, असे म्हणायचे!! संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी, जयदेवने आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किमत मोजली. जयदेवने, इतर संगीतकारांच्या मानाने फारच तुरळक चित्रपट केले पण, त्यातील बहुतांशी चित्रपट केवळ अविस्मरणीय असेच होते, अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या सहाय्याने सांगोपांग चिकित्सा केली तरीदेखील!! जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्यक असतील तितकीच, त्यांनी आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्ट होई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४,५ व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची काहीच गरज नाही आणि त्यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरज नाही. असला, अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.
आधी शब्द कि आधी चाल, हा भावगीत/चित्रपट गीतातील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्या सारख्या रसिकांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, आपल्यापुढे जे गाणे सादर होते, ते महत्त्वाचे मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारावी!! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेंव्हा आपल्यासमोर एखादे गाणे येते तेंव्हा, ते गाणे, १] कविता, २] संगीत रचना आणि ३] गायन, या तीनच घटकातून ऐकायचे, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात, हे तिन्हीही घटक, वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथे, मी केवळ "अर्थपूर्ण" गाण्यांचाच विचार करीत आहे. कारण आजही, आपल्या समजत असाच विचार प्रचलित आहे कि, तीन मिनिटांचे गाणे, हे "संगीत" नव्हेच!! अर्थात, हा देखील एक खुळचट विचार आहे म्हणा. प्रत्येक, गाण्यान, वरील तिन्हीही घटक आवर्जूनपणे आवश्यकच असतात. यातील एक जरी घटक "दुबळा" राहिला तर, सगळी रचनाच "फोफशी" होते. जयदेवच्या गाण्यांत हीं जाणीव प्रखरपणे जाणवते. जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरित्या जाणवतो. अर्थात, जयदेवने बहुतेकवेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवी असतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच्यासारखे, किंवा मराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्ष्यात येईल कि, हे "गीतकार" मुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कविता मुलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एका वेगळ्या निबंधाचा विषय आहे.
"हम दोनो" मधील गाणी आपण, वानगीदाखल बघूया. "अल्ला तेरो नाम" पासून ते " कभी खुद पे" सारख्या गझल सदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. इथे, मला आणखी एक गमतीचा मुद्दा सुचला. "अल्ला तेरो नाम" हे गाणे तर अप्रतिम आहेच, यात वादच नाही, पण, मोठ्या झाडाच्या संपर्कात आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुटते तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. "अल्ला तेरो नाम" ची लोकप्रियता प्रचंडच आहे आणि आता तर ते लताचे एक classic गाणे म्हणूनच ओळखले जाते पण, याच चित्रपटातील, "प्रभू तेरो नाम" हे भजनदेखील तितकेच सुश्राव्य आहे, हे फारसे कुणी ध्यानातच घेत नाही आणि एक प्रकारे, या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!! असाच प्रकार, सी. रामचंद्रांच्या "अनारकली" बाबत झाला आहे,. "ये जिंदगी उसीकी हैं" हे गाणे अजरामर झाले पण, त्याच चित्रपटातील, "मुहोब्बत ऐसी धडकन हैं" हे गाणे पार मागे पडले. खर तर, रचनेच्या दृष्टीकोनातून पहिले तर, "मुहोब्बत ऐसी धडकन" हे गाणे नितांत रमणीय आणि गोड गाणे आहे. थोडा वेगळा विचार केला तर, असे दिसेल कि, "ये जिंदगी उसीकी हैं" या गाण्यावर, "शारदा" नाटकातील, "मूर्तिमंत भीती उभी" या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनी देखील कबूल केलेले आहे तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखे आहे. असो,
जयदेवने फक्त लताकडूनच अफलातून रचना गावून घेतल्या आहेत असे नव्हे तर, हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सासदार केलेल्या आहेत. रुना लैलाचे "बोलो बोलो कान्हा" हे गाणे कधी ऐकले आहे का? आवर्जूनपणे ऐकण्यासारखे आहे. सुरेश वाडकर तर, "सीनेमे जलन" या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासियत अशी आहे कि, त्याची गाणी ऐकताना गोड वाटतात पण, प्रत्यक्ष्य ऐकताना त्यातील "अवघड" लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल, लताचेच प्रसिद्ध, "ये दिल और उनकी" हे पहाडी रागातले गाणे ऐकावे आणि माझ्या वाक्याची प्रतीती घ्यावी. इतके लयबद्ध गाणे पण तितकेच गायला अवघड!! तसाच प्रकार, " तू चंदा मीन चांदनी" आणि "मै आज पवन बन जाऊ" या गाण्यांच्या बाबतीत येतो. "मै आज पवन" हे गाणे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी मांड राग तर, खास जयदेवची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. "रात भी हैं कूच भिगी" सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस, सगळेच इतके विलोभनीय आहे कि, अशी गाणी ऐकताना, आपणच आपल्या मनाशी आपल्या लेखणीचा पराभव स्वीकारावा!!
गाणी, आणखी अनेक सांगता येतील कि त्या योगे जयदेवची प्रतिभा निखरून मांडता येईल. पण, खर तर, गाण्यातील वाद्यमेळ, त्याचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ ऐकण्याचाच भाग आहे आणि तो फक्त, आपण एकटेच बसून शांतपणे अनुभवण्याचा भाग आहे. खर तर, कुठलेही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथे, दुसरे कुणीही उपरेच असतात. प्रत्येक गाणे हे, फक्त तुमच्याशीच संवाद साधत असते आणि त्यातूनच तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देत असता. निदान, माझी तरी, गाणे ऐकण्याची अशीच प्रक्रिया आहे.
रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला, कसलाच आवाज नसतो. आपणही, विक्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशाच वेळी, दूरवरून, लताचे, "किस किसको दीपक प्यार करे" हे अत्यंत अवघडल्या रचेनेचे सूर ऐकायला येतात आणि आपण, स्वत:च कधी अंतर्मुख व्हायला लागतो हेच कळत नाही.
- अनिल गोविलकर
September 4, 2018
मराठी गद्य रंगभूमीचे जनक, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला.
सांगली हायस्कूलमध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे शिक्षण झाल्यानंतर तेथेच कांही काळ ते शिक्षकही होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना नाट्यवाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास केला. तत्वज्ञान हा त्यांचा खास विषय होता. `सवाई माधवरांचा मृत्यू `हे नाटक लिहून त्यांनी आपल्या नाट्यलेखनास प्रारंभ केला. काकासाहेब वकील व्हावे या उद्देशाने मुंबईस अभ्यासासाठी गेले होते. पण राजकीय जागृतीच्या शिक्षणाचा जनतेत प्रसार करण्याची कामगिरी सुशिक्षित तरुणांनी अवश्य केली पाहिजे असे काकांना वाटत होते. त्यामुळेच ते टिळकभक्त झाले. गौतमबुद्ध हा तत्वज्ञानावरील चरित्रपट प्रबंध विविध ज्ञानविस्तार मासिकांत प्रसिद्ध झाला. पुढे काका लो.टिळकांना भेटले. पहिल्या भेटीत काकांना केसरीसाठी लेख लिहण्यास त्यांनी सांगितले. १ सप्टेंबर १८९६ रोजी काकासाहेबांचा हा पहिला लेख अग्रलेख म्हणून टिळकांनी प्रसिद्ध केला. पहिल्याच लेखाला अग्रलेखाचा मान मिळाला. लेखाचा विषय होता.
राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता.
त्यानंतर केसरीच्या संपादकीय खुर्चीवर काका विराजमान झाले. त्यातूनच काकांचे जळजळीत देशप्रेम व सडेतोड विचार प्रगट होऊ लागले. सोलापुरात दुष्काळ निवरणाचे काही काळ गेले. तेथे त्यांनी लोकजागृतीचे काम केले. यामुळेच पुढे `कांचनगडची मोहना ` नाट्यकृती जन्माला आली. `कीचकवध ` हे अप्रतिम नाटक त्यांनी लॉर्ड कर्झनने केलेल्या फाळणीवर लिहिले. ते २३-२-१९०७ रोजी पुण्यात विजयानंद थिएटरमध्ये रंगमंचावर सादर झाले. ते ऑक्टोबर १९०८ मध्ये `मराठा ` चे संपादक झाले. १९१० साली कीचकवध नाटकावर बंदी आली. प्रेमध्वज, मानापमान, विद्याहरण, सत्वपरीक्षा इ. नाटके त्यांनी लिहिली. त्यांची नाटके समाज प्रबोधनाबरोबर जनजागृतीसाठीही होती. ते दोन वेळेला नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. मे १९०७ व जून १९१७. १९३३ साली एका साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्षही झाले. १९२० साली त्यांनी केसरीचे संबंध तोडले. मुंबईस दैनिक `लोकमान्य ` च्या संपादकपदाची धुरा सांभाळू लागले. एप्रिल १९२३ साली स्वत:च्या संपादकत्वाखाली स्वत:चा `नवाकाळ ` दैनिकाची सुरुवात केली. १९३५ मध्ये मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सुलोचना संगीत मंडळाकडून `बायकांचे बंड ` नाटकाचा प्रयोग झाला. १९३८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची भेट घेतली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे २६ ऑगस्ट १९४८ रोजी निधन झाले.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विजय बक्षी
November 23, 2018
मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट ऋत्विक घटक यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२५ रोजी ढाका येथे झाला. ऋत्विक घटक यांचे वडील सुरेशचन्द्र घटक जिल्हा दंडाधिकारी आणि एक कवी आणि नाटककार होते. वडिलांच्या लिहिण्याचा प्रभाव त्यांच्या वर झालेला असावा. त्यांची आई इंदू बाला देवी, त्यांची बहिण प्रतिती आणि मोठा भाऊ मनीष घटक त्याच्या वेळ मूलगामी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता. असा हा परिवार १९४७ साली बंगालच्या विभाजना नंतर भारतात कलकत्ता यथे आला. १९४८ साली घटक यांनी पहिल नाटक गडद तलाव लिहिले. १९५१ साली ते भारतीय पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) मध्ये झाले. त्यांचे शेवटचे नाटक १९७० सालचे ज्वाला. घटक चित्रपटात निर्मल घोष यांच्या सोबत सामील झाले,सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते साल होते १९५०. घटक यांचे पहिले व्यावसायिक प्रकाशन अजांत्रिक. यावरच काल्पनिक चित्रपट तयार केला. कथा लेखक म्हणून घटक यांना व्यावसायिक यश मधुमती (१९५८) या चित्रपटाने दिले. हा हिंदी चित्रपट होता याचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते. या चित्रपटाच्या कथेला अरजित फिल्म फ़ेअर सर्वोत्तम कथा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ह्रित्विक घटक यांनी पूर्ण लांबीचे आठ चित्रपट तयार केलेले आहेत यातील सर्वोत्तम चित्रपट म्हणजे मेघ ढाका तारा (१९६०),कोमल गांधार (१९६१),आणि शुब्रनरेका (१९६२).
ऋत्विक घटक हे सत्यजीत रे आणि मृणाल सेन यांचे समकालीन. ऋत्विक घटक प्रामुख्याने चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. तरी त्यांनी अनेक कथा आणि नाटक लिहिली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आठ पूर्ण लांबीचे वैशिष्ट पूर्ण चित्रपट आणि काही लघुपट,माहितीपट निर्माण केले. तसेच अनेक लघुकथा, नाटक आणि कविता लिहिल्या. ५० पेक्षा जास्त चित्रपटांवर लेख आणि निबंध लिहिले. ते फक्त चित्रपट दिग्दर्शक नव्हते तर त्यांच्या चित्रपटातली दृष आणि समालोचन विव्दातापूर्ण अभ्यास आणि शोधातून आलेल होत. त्यांना दोन देशातील विभाजनातून आलेला बंगाल मान्य नव्हता हीच धीम त्यांच्या जवळ जवळ सर्वच चित्रपटात अप्रत्यक्षपणे दिसत असे. चित्रपट बनवणे हि त्यांच्या साठी कला नव्हती,तर लोकांची दुखे आणि दुखांवर त्यांचा राग व्यक्त करण्याचे साधन होते. त्यांना १९७० साली भारत सरकारने पद्मश्री या किताबाने सन्मानित केले. ऋत्विक घटक काही काळ एफ टी आय आय चे संचालक होते.
एफ टी आय आय मध्ये शिकवत असताना त्यांच्या कडून मणी कौल,जॉन अब्राहम ,कुमार सानी आणि असे अनेक विद्यार्थी घडले. सत्यजित रे यांना जगभरातील प्रेक्षक लाभले,पण या बाबतीत घटक हे भाग्यवान नव्हते. ते जिवंत असताना त्यांच्या चित्रपटांना न प्रेक्षक लाभले ना त्यांची समीक्षा झाली. परंतु त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे चित्रपट भारतात आणि परदेशात फिल्म मेकींकच्या विद्यार्थीना आभ्यासासाठी ठेवले जातात. सत्यजित रे वास्तववादी सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत,परंतु रे यांच्या पथेर पांचाली या सिनेमाच्या तीन वर्षे आधी घटक यांनी नागरिक नावाचा वास्तविक सिनेमा तयार करून ठेवला होता. तो त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशित झाला. या नंतरच घटक यांचा प्रभाव भरत बाहेर पडू लागला. घटक यांचे अपूर्ण राहिलेले आणि प्रदर्शित होऊ न शकलेले अनेक चित्रपट आजही आहेत. हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संकलित करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) गेल्या काही दिवसांपासून होत आहे.
या प्रयत्नांना आता यश येत असून, पश्चि म बंगाल सरकारने घटक यांचे "काटो अजनारे' (1959), "बनगार बगो दर्शन' (1964) आणि "रंजर गुलाम' (1968) हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केले आहेत.
घटक यांच्या अपुरे राहिलेल्या किंवा प्रदर्शित होऊ न शकलेल्या बहुतांश चित्रपटांच्या चित्रफितींचे संकलन आता चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध असणार आहेत. यात घटक यांचे 1959 ते 1971 या कालावधीतील चित्रपटांचा समावेश आहे, घटक यांच्या "तिताश एकती नदिर नाम' (1973) या चित्रपटाची माहिती पुस्तिका, तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या "शहजादी मुमताज' (1977) आणि बाबजीराव राणे दिग्दर्शित "संत तुकाराम' (1932) या चित्रपटांची छायाचित्रे, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रदर्शित होऊ न शकलेला "जमानत' हा चित्रपट आणि ज्योतिप्रसाद आगरवाल यांनी दिग्दर्शित केलेला पहिला आसामी चित्रपट "जोयमती' (1935)ची छायाचित्रे आणि प्रेसक्लि पिंग उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शने यात घटक यांचे सिनेमे दाखवले जाऊ लागले आहेत. यानंतर त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाच्या मध्ये गणले जाऊ लगले. ऋत्विक घटक यांचे ६ फेब्रुवारी १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/शंशाक बोरसे
February 6, 2019
ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं.
October 23, 2021
साहित्य सागरातील कोहिनूर हिरा साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांची कन्या मीना देशपांडे.
September 8, 2023
१९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘पैज लग्नाची’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी १४ राज्य पुरस्कार मिळाले होते. ‘घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर, ‘राजा पंढरीचा’ या भक्तीपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या ‘राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासीक कशानकावर आधारित चित्रपटाला लंडनमध्येही प्रदर्शित करण्यात आलं होतं.
April 18, 2022
आज ‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या राजकुमार यांचा जन्म ८ आक्टोबर १९२६ रोजी झाला. राजकुमार उर्फ भूषण पंडित यांची ओळख विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी म्हणून अधोरेखित झाली. बी. आर. फिल्म निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान यांना उद्देशून केलेला संवाद त्या काळात प्रचंड गाजला व असे संवाद म्हणजेच आपली अभिनयशैली असे ते मानू लागले. तो संवाद होता, ‘चिनॉय शेठ शिशे के घर में रहनेवाले लोग दुसरों के उपर पत्थर नही फेंका करते.. यह चाकू कोई बच्चे के खेलने की चीज नही, हाथ कट जाएगा तो खून निकल आयेगा..’ या संवादाला रसिकांच्या प्रचंड टाळय़ा पडल्या व या यशानंतर राजकुमार यांनी अभिनयापेक्षा संवादफेकीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केले. कधी ते प्रभावीदेखील ठरले.
‘पाकिजा’मध्ये मा.राजकुमार मीनाकुमारी यांना एकदा म्हणतात, ‘यह पाँव जमीं पे मत रख देना, मैले हो जायेंगे..’ पण ‘एका विशिष्ट लयीतील संवाद’ अशी त्याची ओळख व ताकददेखील झाल्याने दिग्दर्शक त्याला स्वातंत्र्य देत असत असे जाणवू लागले. आणि याच गुणावर ‘फिदा’ असणारा असा त्याचा स्वत:चा एक मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. तो राजकुमारचे संवाद ऐकायला सिनेमाचे तिकीट काढू लागला. त्याच्या संवादावर मनसोक्त टाळय़ा मारू लागला. गिरगावातील इम्पिरियल या चित्रपटगृहाच्या भिंतीवर त्याचे ‘बुलंदी’चे संवाद लिहिले होते, ते वाचून तिकीट काढणारे फिल्म दीवाने होते. हेदेखील यशच! मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया,’ श्रीधरचा ‘दिल एक मंदिर,’ चेतन आनंदचा ‘हीर रांझा’ या चित्रपटांत राजकुमार यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळतो. दिल अपना और प्रीत परायी’ हा राजकुमार यांचा एक महत्त्वपूर्ण चित्रपट. एका डॉक्टरच्या भूमिकेत, नर्स असलेल्या मीनाकुमारी यांच्याबरोबर, त्यांची अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक विसरू शकत नाहीत.
‘जेमिनी पिक्चर्सच्या एस.एस. वासन दिग्दर्शित ‘पैगाम’ नंतर मुक्ता आर्ट्सच्या सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ मध्ये ते तब्बल एकतीस वर्षांनी दिलीपकुमारसमोर उभा ठाकले. कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीच्या वाटचालीतही या जानीने उभे राहण्यात यश मिळवले व नंतर मनोजकुमार सुनील दत्त-धर्मेद्र-जीतेंद्र-राजेश खन्ना यांच्यासमोरही ते वाटचाल करू शकला. अर्थात, त्याचे वळण, त्याचा रस्ता पूर्णपणे वेगळा होता. राजकुमार हे वेगळे रसायन होते हे त्यात त्यांनी सतत सिद्ध केले, अगदी त्याच्या मृत्यूची बातमीदेखील त्याच्या त्या वाटचालीला साजेशी ठरली. त्याला कर्करोगाने ग्रासले असल्याची बराच काळ चर्चा असूनही त्या दरम्यान त्याने ‘सौदागर’मधील भूमिका साकारली होती, पुढेही काही काळ वाटचाल केली, राजकुमार हा राजकुमारसारखा जगला व स्वत: निर्माण केलेल्या अनाकलनीय अशा प्रतिमेनुसारच जगाच्या पडद्यावरून गेला. राजकुमार यांचे काही महत्त्वाचे व उल्लेखनीय चित्रपट – ‘अर्धागिनी’ (१९५९) (मीनाकुमारी), ‘नीलकमल’ (१९६८) (वहिदा रहेमान), ‘जिंदगी’ (१९६४) (वैजयंतीमाला), ‘हमराज’ (१९६८) (सुनील दत्त), ‘मेरे हुजूर’ (१९६८) (माला सिन्हाबरोबर) मा. राजकुमार यांचे ३ जुलै १९९६ यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
October 27, 2017
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्घ आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले.
September 16, 2019
नाझिया हसन यांनी वयाच्या १५व्या वर्षीचं ‘आप जैसा कोई’ हे गाणं, १६ व्या वर्षीचा ‘डिस्को दिवाने’, १८ व्या वर्षीचं ‘बुम बुम’, २० व्या वर्षीचं ‘यंग तरंग’, २२ व्या वर्षीचं ‘हॉटलाइन’ आणि शेवटी ‘कॅमेरा कॅमेरा’ आणि ‘टूनाइट’. पाच अल्बम मधून त्यांनी क्रांती निर्माण केली. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६५ रोजी झाला. संपूर्ण दक्षिण आशिया तिच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या डिस्को दिवान्यांत ब्राझीलसारखे लॅटिन देशही सामील झाले. त्यांनी निर्माण केलेल्या पॉप वातावरणानंतर भारत आणि पाकिस्तान कायमचे बदलून गेले. नाझिया हसन यांनी स्वरांचं नवं दालन उघडून दिलं. १९८० सुमारास, ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आए, तो बात बन जाए..’ हे गाणं सतत वाजू लागलं होतं. ते गाणं होतं फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील होते आणि गाणारी नाझिया हसन ही पाकिस्तानी मुलगी. संगीत बिड्डू याचं आहे. हेही समजलं की ते गाणं वेगळं वाटण्याचं कारण होते त्याला बिड्डूचं संगीत आणि लंडनमध्ये झालेलं गाण्याचं रेकॉर्डिंग. ते २४ ट्रॅकवर रेकॉर्ड केलेलं पहिलं भारतीय गाणं होतं. नाझिया यांचा आवाज दोनदा रेकॉर्ड करून त्यात एको म्हणजे प्रतिध्वनीचा परिणाम साधला होता. याच वर्षी ‘डिस्को दिवाने’ नावाचा एक म्युझिक अल्बम आला. त्यातील सगळी गाणी नाझिया हसन यांची होती. आणि एक दिवस व्हिडीओ अल्बमवर नाझिया हसन कोण हेही दिसलं. उजव्या हातात मायक्रोफोन आणि डाव्या हातात त्याची वायर धरलेली.. खांद्यावर ओघळेलेले तिचे लांब केस, तिचं गाणं जसं जगावर पसरलं तसे.
नाझिया हसन यांच्या ‘डिस्को दिवाने’ या पहिल्या अल्बमच्या जगभर सहा कोटी प्रती खपल्या. या अल्बमच्या माध्यमातून ती चिरंतन झाली पण तिचा शेवट खूप क्लेशकारक झाला. हे एवढंच नव्हतं. तिच्या असण्याचे काही ऐतिहासिक आणि अर्थातच सांस्कृतिक पैलू होते. तिने केवळ संगीत क्षेत्रात वादळ निर्माण केलं नव्हतं, तर एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणली होती. नाझिया हसन आणि त्यांचा भाऊ झोहेब हसन यांनी एकत्रितपणे अनेक गाणी गायली. नाझिया हसन जगभरात इतकी लोकप्रिय होत होत्या की, असे म्हणतात तिला तिच्या देशात गाणं म्हणताना टीव्हीवर बघता येऊ नये, अशी व्यवस्था करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिचा व्हिडीओ, कमरेपासून वरचाच भाग शूट करून तयार करण्यात आला. कारण इतकंच की, तिचे नाचणारे पाय दिसू नयेत.
‘वायटल साइन्स’, ‘स्ट्रिंग्स’, ‘जुनून’ हे नंतर भारतात लोकिप्रय बनलेले बँड सुरू झाले होते. त्यांच्यासाठी नाझियाच्या संगीताने त्यांच्या संगीताला रुजण्यासाठीची जमीन तयार केलेली होती.
नाझिया यांना कर्करोग झाला होता त्यावर त्वरित उपचार सुरू झाले. त्या त्यातून बरी झाल्या आणि नाझिया यांचे लग्न झालं. दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मात्र लाखो हृदयांत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या या पॉप क्वीनचा फुप्फुसाचा कर्करोग पुन्हा उफाळून आल्याचं उघडकीस आलं.
नाझिया हसन यांनी अनेकदा आपल्या मुलाखतींतून सांगितलं होतं की, गाणं हे तिच्यासाठी कायम छंद होता आणि आहे. त्यांनी स्वत:साठी वेगळं करिअर उभं केलं होतं. नाझिया हसन यांनी लंडनच्या विद्यापीठातून बिझनेस अॅंडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली होती. संयुक्त राष्ट्रांच्या महिला विभागातील आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमात सहभागी होती. त्या वेळी तरुणांची पिढी नष्ट करणाऱ्या अमली पदार्थाच्या विरोधात काम करण्यासाठी तिने संस्था काढली होती. कराचीतील ल्यारी या सर्वाधिक गरीब वस्तीत तिने त्यासाठी मोबाइल क्लिनिक सेवा सुरू केली होती. नाझिया हसन यांचे निधन १३ ऑगस्ट २००० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट / इब्राहिम अफगाण
नाझिया हसन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=mWzTZE-B1fM
https://www.youtube.com/watch?v=mZqawa_lmSo
April 15, 2017
अलेक्झांडर मेलविले आणि एलिझा सायमंड्स बेल हे त्यांचे आई वडील. त्यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी स्कॉटलंडच्या एडीनबर्गमध्ये येथे झाला. अगदी लहान असल्यापासूनच ग्रॅहम बेलनी विविध प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प हा गव्हापासून त्याचा भुसा वेगळा करण्यासंदर्भातील होता. पण त्यांना आवाजाबाबत विशेष प्रेम होते. तोंडातून बाहेर पडणारा आणि कानाला ऐकू येणारा आवाज याबाबत बेल यांना प्रचंड आकर्षण होते. वडीलांनी दिलेल्या प्रेरणेतून त्यांनी भाऊ मेलविले याच्यासह टॉकिंग मशीन तयार करण्याचा प्रयत्नही केला होता. यात त्यांना यश आले आणि नाही आले असेही म्हणता येईल. कारण हा प्रोजेक्ट मागे पडला. पण त्यानंतर बेल यांनी जो शोध लावला त्या जोरावर आज संपूर्ण जगाने कुठल्या कुठे मजल मारली आहे. हा शोध म्हणजे टेलिफोनचा. हेही एक टॉकिंग मशीनच म्हणायला हवे ना.
वयाच्या ११ व्या वर्षी अलेक्झांडर बेल यांनी ग्रॅहम हे नाव धारण केले. तेव्हा ते बनले अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांचीही पहिली नावे अलेक्झांडर अशीच होती. त्यामुळे या नावाचा कंटाळा आल्याने त्यांनी हे नाव निवडले होते. त्यांच्या वडिलांच्या एका विद्यार्थ्याचे नाव अलेक्झांडर ग्रॅहम असे होते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावात ग्रॅहम अॅड केले. बेल हे रिंगशी संबंधित असल्याने त्यांनी ते तसेच ठेवले असेल. पण काहीही असले तरी त्यांच्या कुटुंबासाठी मात्र कायम अॅलेस किंवा अॅलेक हेच त्यांचे नाव होते.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ग्रॅहम बेल यांनी एका मुलांच्या निवासी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या वडिलांनी व्हिजिबल स्पीच ही पद्धत तयार केली होती.
एखादा शब्द तयार होण्यासाठी आवाज कसे तयार होतात त्यासाठी ओठांच्या हालचाली कशा होतात, याचा त्यात समावेश होता. हीच पद्धत बेल यांनी कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी आणि त्यांचे उच्चार अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरली. त्यांनी स्वतःच्या काही पद्धतीही तयार केल्या. त्यांच्या आईला कमी ऐकू येत होते. त्यामुळे ते लहानपणीपासूनच आईशी वेगळ्या प्रकारे बोलायचे. कर्णबधीर मुलांना शिकवण्यात त्यांनी अगदी प्रावीण्य मिळवले होते.
ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनच्या शोधासाठी अनेक वर्षे संशोधन केले. त्या जोरावर त्यांनी १४ फेब्रुवारी १८७६ रोजी पेटंटसाठी अर्ज दिला. त्याच दिवशी एलिशा ग्रे यांच्यासाठी काम करणाऱ्या एका वकिलानेही अशाच संशोधनासाठी अर्ज सादर केला. बेल यांनी वडिलांना लिहिलेल्या पत्रानुसार कोणीतरी आपल्या सारखाच शोध लावत असल्याचा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अर्ज केला होता. त्यामुळे काही तासांच्या फरकामुळे बेल यांना या शोधाचे क्रेडीट मिळू शकले. मार्च १८७६ मध्ये बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले. त्यांनी सासरे गार्डीनर ग्रीन हबर्ड यांच्या मदतीने बेल टेलिफोन कंपनीची सुरुवात केली. त्यात गुंतवणूकदारांमध्ये बेल यांचे स्पर्धक एलिशा ग्रे यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादही झाला होता.
बेल यांनी फोटोफोनचा शोधही लावला. त्यात प्रकाशाला आवाजामध्ये परावर्तीत करण्यात येत होते.
बेल यांच्यामते त्यांच्या महत्त्वाच्या शोधापैकी हा एक होता. त्यांना मिळालेल्या गिफ्टचा वापरही ते शोध लावण्यासाठी करायचे. आपल्या समस्या सोडवताना ते नवीन शोधाची निर्मिती करायचे. स्वतःच्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर त्यांनी मेटल व्हॅक्क्यूम जॅकेट तयार केले. त्यामुळे श्वासोछ्च्वासाला मदत होत होती. याच कल्पनेतून पुढे पोलिओच्या रुग्णांच्या उपचारात कामी येणारे उपकरण तयार केले गेले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्यावर १८८१ मध्ये हल्ला झाला त्यावेळी ग्रॅहम बेल यांची मदत घेण्यात आली होती. शरिरात गोळी कुठे आहे हे शोधण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेट मशिन वापरले होते. गारफिल्ड यांना वाचवण्यात यश आले नाही. मात्र याच मशीनमध्ये सुधारणा करून सध्याच्या मेटल डिटेक्टरचा शोध लावण्यात आला होता.
ग्रॅहम बेल यांनी १८९० मध्ये पंतंगांच्या मदतीने काही प्रयोग सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी काही खास इमारती खरेदी केल्या होत्या. अनेक प्रयोग केल्यानतंर बऱ्याच संशोधनानंतर बेल यांनी टेट्राहेड्रोन तंत्रावर आधारित एक खास पतंगाचे डिझाइन तयार केले होते.
१९०७ मध्ये त्यांनी एरियल एक्सप्रिमेंट असोसीएशनची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी काही फ्लाइंग मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यातील सर्वात यशस्वी ठरले ते सिल्व्हर डार्ट. हेच सिल्व्हर डार्ट पुढे कॅनडामध्ये पॉवर्ड फ्लाइटमध्ये वापरले गेले.
अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचे २ ऑगस्ट १९२२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 2, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti