जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. थोरातांची कमळा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे, भालू असे ८० हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती. लग्नानंतर प्रकाश भेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती व चित्रपटांमधून त्यांनी काम केले.
May 31, 2022
वैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती जगासमोर आणली.
May 23, 2014
यतिन टिपणीस गेली २३ वर्षांपासून ठाणे जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यभाग सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे १२ वर्षांपासून महाराष्ट्र टेबलटेनिस असोसिएशनचे सह-सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. भारतीय टेबलटेनिस फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत.
May 16, 2014
मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्यांाचे अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म १२ एप्रिल १८७१ रोजी झाला.
ते १८९६ साली कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर नागपूरच्या 'हिस्लॉप' कॉलेजात एक वर्ष फेलो आणि नंतर पुण्यात काही काळ शिक्षक होते. पुणे येथे असताना त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली. अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र हे आपट्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म ह्या विषयावरील बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ साली तो प्रसिद्ध झाला. काही काळ अलाहाबाद येथील 'मॉडर्न रिव्ह्यू"त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'ज्ञानप्रकाशा'च्या संपादनाचे काम त्यांनी केले. १९०६ साली त्यांनी 'आनंद' हे मुलांचे मासिक सुरू केले, ते अद्यापही सुरू असावे.
'आनंद'चे संपादन व ग्रंथलेखन ह्यांच्या बरोबरीने तरुण पिढीला राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक गोष्टींचे सम्यक ज्ञान मिळावे या उद्देशाने त्यांनी विचारसाधना नावाचे वर्तमानपत्रही सुरू करून पाहिले, परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले (१९२०). त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी करून दाखविला. सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरीवाङ्मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून वा. गो. आपट्यांनी चार खंडांत मराठीत आणले आहे. वाल्मीकीचा जय ही त्यांची कादंबरीही बंगालीचे भाषांतर आहे.
मूर्तिमंत देशाभिमान, माणिकबाग, आणि दुःखाअन्ती सुख ही पाश्चात्य कादंबऱ्यांची रूपांतरेही उत्कृष्ट आहेत. याशिवाय श्रीहरनाथ ठाकुर यांची पत्रावली, महाभारतातील सोप्या गोष्टी, नाट्यभारत, नाट्यरामायण, बालभारत, मनी व मोत्या, महाराष्ट्राचा बालबोध इतिहास, मुलांसाठी गोड गाणी, एक दिवसाच्या सुटीत यासारखी बालवाचकांच्या दृष्टीने रंजक असूनही उद्बोधक अशी पुस्तके त्यांनी लिहिली. पुराणे, इतिहास, विविधज्ञानसंग्रह, संतांची व थोरांची चरित्रे यांच्या आधारे श्री. वा. गो. आपटे यांनी बाल व कुमारांसाठी निर्माण केलेले साहित्य उल्लेखनीय आहे. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे ते पहिले घटनाकार, एका परीने जनक व संवर्धकही होते. 'मराठी शब्दरत्नासकर' हा मराठी-मराठी शब्दकोश हे आपटे यांचे अजरामर स्मारक आहे. वासुदेव गोविंद आपटे यांचे निधन २ फेब्रुवारी १९३० रोजी झाले.
वासुदेव गोविंद आपटे यांचे साहित्य:- मिसेस हेन्री१वुड, सॅम्युएल लव्हर, बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद; मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (१९१०), लेखनकला आणि लेखनव्यवसाय (१९२५), मराठी शब्दरत्नापकर (१९२२), मराठी शब्दार्थचंद्रिका (१९२२), आणि मराठी-बंगाली शिक्षक (१९२५) ही भाषाभ्यास विषयक; जैनधर्म (१९०४), टापटीपचा संसार (१९१४), बालोद्यान पद्धतीचे गृहशिक्षण (१९१८), सौंदर्य आणि ललितकला (१९१९) इत्यादी विविध विषयांवरील चोवीस-पंचवीस पुस्तके व बालवाङ्मय विभागात छोटीछोटी तीस-बत्तीस पुस्तके त्यांनी लिहिली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 12, 2019
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत...
त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं. विशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या. तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा 'बालगंधर्व पुरस्कार' बहाल केला.
१९७५ मध्ये लग्नानंतर मुंबईस स्थलांतर केल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले. पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या. आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून त्यातून आपले गाणे अधिक कसदार बनविले आहे. किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे यांच्या गायन शैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात.
'घेता किती घेशील दो करांनी' या न्यायाने माणिक वर्मा, पं. यशवंतबुवा जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. शंकरराव अभ्यंकर अशा विविध संगीत घराण्यातील गुरुंकडून गाण्याची तालीम घेतली. केवळ तालीम घेतली नाही, त्यात्या घराण्याची खासीयत आपल्या गळ्यात उतरवली आणि आपली अशी एक स्वतंत्र, काहीशी आक्रमक गायनशैली विकसित केली. आशाताईंचं गाणं ऐकताना किराणा, ग्वाल्हेर व आग्रा घराण्याची गान वैशिष्ट्यं आढळून येतात, ती त्यामुळेच. त्यांनी गायलेल्या भावगीतांत याची उत्तम झलक पाहायला मिळते. विशेषतः 'घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला' हे गाणं ऐकताना याचं प्रत्यंतर येतं.
आशाताई पारंपरिक मराठी भावगीते, भजने व नाट्यगीतेही तितक्याच प्रभावीपणे सादर करतात. देशोदेशी त्यांचे कार्यक्रम होत असतात. आशाताईंनी संगीत दिग्दर्शन व संगीत रचनाही केल्या आहेत, तसेच अनेक बंदिशी रचल्या आहेत. 'संगीत आराधना' व 'संगीत कविराज जयदेव' यांसारख्या नव्या काळातील मराठी संगीतिकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. जाहीर कार्यक्रमांच्या जोडीला आशाताईंनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम, जसे, 'होली रंग रंगीले', 'सावन - रंग', 'ऋतु-रंग', 'रचनाकार को प्रणाम', सादर केले आहेत.
१९९४ पासून आपले पती श्री. माधव खाडिलकर यांच्या सहयोगाने आशाताईंनी ठाणे, मुंबई येथे 'उत्तुंग सांस्कृतिक परिवार' नामक सांस्कृतिक संस्था सुरू केली असून तिचा उद्देश संगीत, नृत्य, नाट्य व साहित्य विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ह्या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांसाठी ही संस्था 'उत्तुंग पुरस्कार' जाहीर करते. आजवर आशाताईंना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत माणिक वर्मा पुरस्कार, पं. कुमार गंधर्व पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया / म.टा
काही गाणी मा. आशा खाडिलकर यांची
घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला
वद जाऊ कुणाला शरण
जोहर मायबाप जोहर मायबाप
मजवरी तयाचे प्रेम खरे
अनंता तुला कोण पाहू शके
बलसागर तुम्ही
किती किती सांगू तुला
मर्म बंधातली ठेव ही
January 11, 2017
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर. २० जानेवारी १८९८ ला यांचा जन्म झाला.
January 22, 2010
बिहारमध्ये आलेल्या भयानक पुराने असंख्य नागरिकांचे जीवन उध्वस्त झाल्यामुळे व्यथित झालेल्या एका मुलीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा ध्यास घेतला. स्वतःच पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून एका संगीत मैफलीचे आयोजन केले. या संगीत मैफलीत येण्याचे अनेक मान्यवर गायक तसेच वादकांनी मान्य केले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्यापैकी कोणीच फिरकले नाही. मात्र ही मुलगी मुळीच विचलित झाली नाही. या संगीत मैफलीत तिने स्वतःच गाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी अवघे सात वर्षे असलेल्या त्या मुलीने तब्बल सहा तास एकटीने गाऊन ती संगीत मैफल साजरी केली व पूरग्रस्तांसाठी निधी जमविला. या जिद्दी मुलीचे नाव होते बेगम अख्यर. मोठेपणी गझलसप्राज्ञी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. बेगम अखर मुळच्या कोलकात्याच्या. लहानपणापासून त्यांना सुगम संगीताची खूप आवड होती. त्यांना शास्त्रीय संगीताची फारशी आवड नव्हती. तरीही पतियाळाचे उस्ताद आत्ता अहमदखान यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे रितसर धडे घेतले. मात्र पुढे त्यांनी गझल, भजन, सुमरी, दादरा आदी प्रकारांमध्येच जास्त रुची दाखवून त्यात प्रभुत्व मिळविले. मिर्झा गालिब व जिगर भोरादाबादी हे त्यांचे आवडते कवी. त्यांच्या अनेक गझलांना बेगम अस्त्ररनी स्वत: संगीत दिले तसेच स्वतः गाऊन अनेक गझला लोकप्रिय केल्या. गझलगायकीमुळेत्या केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, अफगाणिस्तानातही त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. आदरातिथ्य करण्याच्या त्यांच्या लखनवी पद्धतीमुळे त्या आजही असंख्य रसिकांच्या स्मृतीमध्ये आहेत.
February 10, 2017
व्हि. बी. कर्णिक हे एक समर्थ कामगार नेते, व समाजवादी तत्वांचे विचारवंत, या नात्याने महाराष्ट्रातील कामगारांचे संघटन व विचारमंथन घडवून आणण्यात सक्रीय होते.
April 22, 2010
लक्ष्मणराव किर्लोस्कर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द उद्योगपती व कारखानदार, किर्लोस्कर उद्योगसमुहाचे मुख्य प्रवर्तक. त्यांचा जन्म २६ जून १८६९ रोजी झाला. महाराष्ट्राचे हेन्रीफोर्ड या नावाने गौरवण्यात आले आहे.
आज जगाचा वेग वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनक राईट बंधू आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर या दोघांचाही जन्म एकाच काळातील आणि दोघांनीही प्रारंभी सायकलचेच दुकान चालवले. गेल्या शंभर वर्षांत हवेत उडण्याच्या माणसाच्या स्वप्नाचा एक प्रचंड मोठा उद्योग झाला आणि किर्लोस्करांनी लावलेल्या छोटय़ाशा रोपटय़ाचे वटवृक्षात रूपांतर झाले.
१० मार्च १९१० रोजी सांगली जिल्ह्यातील कुंडल रोड या खेडेगावात किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या उद्योगाला सुरुवात झाली. याच गावाचे नामकरण नंतर किर्लोस्करवाडी असे झाले. पण त्या जागेत सुरू झालेल्या एका उद्योगाला तेथील सगळय़ांच्या घामाने आणि लक्ष्मणरावांच्या कल्पकतेने झळाळी आली.
स्वातंत्र्यचळवळीचा एक भाग म्हणून स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्यांनी आपापल्या परीने चळवळीत योगदान दिले होते. लक्ष्मणरावांनी इंग्लंडमध्ये स्थापन होत असलेल्या औद्यौगिक वसाहतींबद्दल वाचले होते. तसा प्रयत्न देशात करण्याचा त्यांचा मानस, औंध संस्थानचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी रेल्वेस्थानकाजवळ असलेली जागा देणगी म्हणून दिल्याने आकाराला आला. सुनियोजित पद्धतीने किर्लोस्करांनी कारखान्याची उभारणी केली. त्या काळात सगळय़ांना वेगळे वाटेल, असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यांनी या भागात निवासाची उत्तम व्यवस्था निर्माण केली. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी माध्यमिक शाळाही सुरू केली. खेळांची उत्तम व्यवस्था हेही या गावाचे एक वैशिष्टय़ ठरले. क्रिकेट क्लब, गोल्फ क्लब, टेनिस कोर्ट, पोहण्याचा तलाव अशा अनेक सुविधा या भागात होत्या. किर्लोस्करांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना तेथे राहणे सुखकर व्हावे, याकडे लक्ष्मणरावांचा कटाक्ष असे. स्वतंत्र पोस्ट कार्यालय हेही या गावाचे वेगळेपण ठरले होते.
त्या काळातील क्रमांक दोनचा औद्योगिक परिसर (पहिला क्रमांक जमशेदपूरचा.) म्हणून किर्लोस्करवाडीला मिळालेला मान हा या सगळ्या कल्पनांचाच गौरव आहे. कारखाना सुरू करण्याची मराठी माणसाची तयारी नसते, मराठी माणूस नोकरी करण्यात जास्त रस घेतो, हे समज खोटे ठरावेत, असे काम लक्ष्मणराव किर्लोस्करांनी करून दाखवले. कोणत्याही स्थितीत कारखान्यातील उत्पादनाचा दर्जा घसरता कामा नये, यासाठी लक्ष्मणरावांची धडपड असे.
लक्ष्मणरावांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले, तरी त्यांची स्वप्ने फार मोठी होती. लहानपणापासून परिसरात दिसत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या. शेतकऱ्यांसाठी नवी उपकरणे तयार करणे हे त्यांचे ध्येय होते. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी जी उपकरणे बनवली, त्याला शेतकऱ्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिला. किर्लोस्करांनी तयार केलेला लोखंडी नांगर प्रत्येक शेतकऱ्यासाठी मोलाचा ठरला आणि भारतातील शेतकऱ्यांच्या तोंडी किर्लोस्कर हे नाव तात्काळ रुळले. किर्लोस्कर पंप हे तर देशातील शेतांवर हमखास दिसणारे यंत्र असे. शेतकऱ्यांचे जगणे सुखकर व्हावे, हा लक्ष्मणरावांचा ध्यास होता.
एखादा उद्योग सुरू झाला तरी तो पुढे सुरू राहणे आणि त्याचा विकास होणे यासाठी पुढची पिढी कर्तबगार असावी लागते. लक्ष्मणराव त्याबाबत नशीबवान ठरले. शंतनुरावांनी आपल्या कर्तृत्वाने हा उद्योग मोठा केला आणि देशातील कानाकोपऱ्यात त्याची उत्पादने पोहोचवली. केवळ उद्योगापुरते किर्लोस्कर हे नाव अग्रेसर राहिले नाही, तर ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ आणि ‘स्त्री’ यांसारखी नियतकालिके हीही त्यांची एक वेगळी ओळख ठरली. मराठी पत्रकारितेमध्ये या नियतकालिकांचे योगदान फार मोलाचे आहे. साऱ्या देशात उद्योगांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या बिनीच्या उद्योगपतींमध्ये लक्ष्मणरावांचे आणि त्यांच्या किर्लोस्कर उद्योगसमूहाचे नाव अग्रेसर राहिले आहे.
त्यांचा मृत्यु २६ सप्टेंबर १९५६ ला झाला.
(संदर्भ : महाजालातील संदर्भस्थळे, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि पुढारी या वृत्तपत्रांतील विविध माहिती)
March 11, 2015
श्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्मयीन वाद वाचावयास मिळतात.
August 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti