जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संगीतकार राहूल रानडेंचा जन्म २३ मे १९६६ रोजी झाला. १९८६ सालच्या सई परांजपे लिखित-दिग्दर्शित ‘माझा खेळ मांडू दे’पासून राहुल रानडे यांचा नाटय़प्रवास सुरु झाला. आज पर्यत २०० हून अधिक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं तसेच मराठी, हिंदी चित्रपट यांना राहुल रानडे यांनी संगीत तसेच पार्श्वसंगीत दिले आहे.
काकस्पर्श, वास्तव,अस्तित्व, कोकणस्थ, सुंबरन,साने गुरुजी,डॉ.प्रकाश आमटे अशा मराठी, हिंदी चित्रपटाना त्यांनी संगीत दिले आहे. राहुल रानडे यांनी भास्कर चंदावरकर, आनंद मोडक, अशोक पत्की यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारां बरोबर काम केले आहे. मूकपटांना मानवंदना द्यावी म्हणून पुण्यातल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाने तीन मूकपटांना पाश्र्वसंगीताची जोड देऊन त्यांची एक डीव्हीडी प्रकाशित करायचे ठरवले.
यात फाळकेंचे ‘राजा हरिश्चंद्र’ (१९१३) आणि ‘कालिया मर्दन’ (१९१९) हे दोन चित्रपट आणि कलिपदा दास या बंगाली दिग्दर्शकाचा ‘जमाई बाबू’ (१९३१) अशा तीन चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांसाठी नव्याने संगीत देण्याचे काम राहुल रानडे यांनी दिले आहे.
राहुल रानडे यांची वेब साईट
http://rahulranade.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ इंटररनेट
May 25, 2017
अमीर खॉं यांचा महाराष्ट्रातील अकोला गावी जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. उण्यापुर्याव साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१२ रोजी झाला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“. अमीर अलीचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे वडील लहानग्या अमीरला घेऊन अकोल्याहून इंदोरला गेले. इंदोरला त्याकाळी कलाकारांना राजाश्रय होता आणि शहा अमीर हे चांगले बीन व सारंगी वाजवायचे. अमीर अली नऊ वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली आणि शामीरखाँना त्यांच्या दोन्ही मुलांची आई ही व्हायला लागले. अर्थात तीही जबाबदारी त्यांनी चांगली पेलली. त्या काळच्या कलाकारांच्या घरी जसे वातावरण असायचे तसे यांच्याही घरी होते. शामीरखाँ यांनी अमीर अली आणि त्यांचा भाऊ बशीर या दोघांनाही संगीताचे धडे द्यायला सुरवात केली होती. तसेच त्यांच्या बिरादरीतील इतर श्रेष्ठ कलाकारांकडेही ते त्यांना नियमितपणे गाणे ऐकायला घेऊन जात होते. असेच एकदा ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे गेले असता एक प्रसंग घडला. लहानग्या अमीरला आणि बशीरला घेऊन ते त्या घरापाशी आले तेव्हा घरातून संगीताचे स्वर ऐकू येते होते. “आत्ता तालीम चालू असणार” ते मनाशी म्हणाले आणि त्यांनी त्या घरात प्रवेश केला. त्याच क्षणी तेथे एकदम शांतता पसरली आणि सगळ्या शिष्यांनी ताबडतोब आपापल्या वह्या मिटल्या. शामीरसाहेबांनी बळेबळेच एका वहीचे पान उघडले त्यात मेरूखंड गायकीची बरीच नोटेशन्स लिहिलेली त्यांना दिसली. तेवढ्यात एका नातेवाईकाने त्यांच्या हातातील ती वही हिसकावून घेतली.
“हे सारंगियांसाठी नाही. मग वाचून काय उपयोग ?”
हे ऐकून अपमानित होऊन शामीरखाँ त्या घराबाहेर पडले ते ठरवूनच की मी माझ्या एका मुलाला मेरूखंड गायकीत तयार करेन. हे बोलण्याइतके सोपे नव्हते कारण ही गायकी फार म्हणजे फार अवघड आहे. काय आहे ही गायकी आणि ती एवढी अवघड का आहे ?. उस्ताद अब्दुल वहिद खॉं यांच्या विलंबित लयीतील गायनाचा प्रभाव त्यांच्या गायनात होता, तसेच, इंदौर घराण्याचे रजाब अलि खॉं यांची तान गायकी आणि अमान अलि खॉं यांचे मेरुखंड पद्धतीचे रागविस्तार यांच्या प्रभावामुळे अमीर खॉं यांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र गायकी विकसित केली होती. अमान अलि खॉं यांचे शिष्यत्व पत्करून ते चांगले तयारीचे गायक झाले. अभिजात शास्त्रीय संगीतातील ख्यालगायकीतच त्यांनी विशेष मेहनतीने सौंदर्यप्रधान अशी शैली अमीर खॉं यांनी विकसित केली. अधिकतर गंभीर प्रकृतीच्या रागगायनात ते स्वत: अंतर्मुख होऊन रसिकांनाही अंतर्मुख करीत असत. अमीर खॉं यांची गायकी म्हणजे स्वरप्रधान व आलापप्रधान. 'झूमरा' किंवा 'एकताला'च्या अतिविलंबित लयीतील ख्यालासाठी ठेका अगदी साधा असे. ख्यालाची बढ़त, मेरुखंड पद्धतीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, बोलआलाप, आलंकारिक सरगमयुक्त ताना आणि क्लिष्ट व अवघड ताना सहजतेने गाण्याची क्षमता यांनी त्यांच्या गायनाला सौंदर्यपूर्णता आणि सूक्ष्मता लाभली होती. क्वचित मुर्की व कणस्वराचा वापर करून ते गाण्यात सौंदर्य आणत असत. मंद्र व मध्य सप्तकांतील रागविस्तारात न्यास स्वरांनी गायनाला उठाव आणून ते रसिकांना मंत्रमुग्ध करीत. कधी कधी ते अंतरा घेतही नसत. त्यांच्या मते, ख्यालरचनेत शब्द महत्त्वाचे; तर स्वरांच्या रंगांना विशेष अर्थ त्यांनी दिला. त्यांनी स्वत:च्या अनेक रचना लोकप्रिय केल्या. अनेक रुबाईदार तराणे, ख्यालनुमा आणि बंदिशी अमीर खॉं यांनी रचल्या. "हृदयातून निर्माण झालेले, आणि आत्म्याला स्पर्श करणारे ते खरे संगीत" असे ते नेहमी म्हणत. मा. अमीर खॉ यांनी चित्रपटांसाठीसुध्दा काही गाणी म्हटली. पहिला सिनेमा होता क्षुधित पाषाण. हा एक बंगाली सिनेमा होता. बैजू बावरामधील शेवटच्या जुगलबंदीसाठी तानसेनसाठी अमीर खॉं यांचा आवाज तर ठरला पण बैजूसाठी कोणाचा हे काही ठरेना. कोणी म्हणाले पं. ओंकारनाथ ठाकूरांचा आवाज घ्या. पण अमीरखॉसाहेबांनी डि. व्हि. पलूसकरांचा आवाज त्या आवाजाच्या निर्मळतेमुळे सुचवला आणि ते अजरामर गाणे ’आज गावत मन मेरो झुमके” निर्माण झाले. या चित्रपटाचे टायटल सॉंग पण अमीर खॉ यांनीच म्हटले होते. अजून दोन चित्रपटातील गाणी मा.अमीर खॉं यांनी गायली. एक म्हणजे झनक झनक पायल बाजे आणि दुसरा गुंज उठी शहनाई. ग़ालिबच्या माहितीपटासाठी त्यांनी ग़ज़लही गायली. मा.अमीरखॉसाहेब हे एक कलकत्यातील बडे प्रस्थ होते. एक काळ असा होता की त्या शहरातील एकही मेहफिल त्यांच्याशिवाय व्हायची नाही. एवढेच काय त्यांना भारत सरकार कडून पद्मभूषण, राष्ट्रपती पारितोषिक, स्वरविलास असे अनेक मानसन्मान मिळाले. पण या अत्यंत साध्या माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. खर्या अर्थाने ते सुशिक्षित व सुफी संत होते. त्यांनी अमेरीकेत न्युयॉर्क विद्यापिठात ही काही काळ संगीत शिकवले.
सरोदवादक अमज़द अली खॉ यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे ती त्याच्याच शब्दात ते साल होते १९७१. कलकत्यात तानसेन समारोह नावाचा एक संगीत समारोह भरायचा. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या समारोहात मला आमंत्रण होते. एक बुजुर्ग गायक श्री. शैलेनबाबू याचे आयोजन करायचे. हा समारोह संध्याकाळी चालू होऊन रात्रभर चालायचा आणि दुसर्यारदिवशी सकाळी संपायचा, (आपल्या गंधर्व महोत्सवाप्रमाणेच.) परंपरेने बुजुर्ग कलाकराच्या गायनाने याचा समारोप व्हायचा. त्या दिवशी माझी फ्लाईट उशिरा पोहोचली आणि मी त्या हॉलमधे पोहोचेपर्यंत उस्ताद अमीरखॉसाहेबांचे गाणे सुरू झाले होते. शैलेनबाबू या प्रकाराने अतिशय अस्वस्थ झाले होते. मी जेव्हा त्यांना सांगितले की मी खॉसाहेबांनंतर गाऊ शकणार नाही तेव्हा ते थोडेसे चिडलेच. बरोबर आहे. प्रेक्षकांनी तिकिटे अगोदरच काढलेली होती. त्यांनी माझी बरीच समजूत काढायचा प्रयत्न केला, पण मी ठामपणे नकारच दिल्यामुळे त्यांचे काही चालेना. हे सगळे चालले असतानाच खॉसाहेबांचे गायन संपले आणि ते निघाले होते. शैलेनबाबूंनी त्यांना गाठले आणि त्यांना माझ्या नकाराबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी माझ्याकडे बघून मला जवळ जवळ आज्ञाच केली. म्हणाले “ माझ्यानंतर तू नाही वाजवणार तर कोण वाजवणार? जा. वाजव !”
पहाटेचे पाच वाजले होते. मी तसाच स्टेजवर गेलो आणि सुरवात करणार तर काय पुढच्याच रांगेत खॉसाहेब बसले होते. मी नम्रपणे त्यांना म्हटले “ खॉसाहेब आपण गायल्यानंतर आता मला काय वाजवायचे हेच सुचत नाही आहे. कृपया आपण शांतपणे घरी जा आणि आराम करा.”
त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सुरवात करायला सांगितले. मला अजून आठवतंय मी कोमल रिषभ असावरीने ती पहाटेची मेहफिल चालू केली. परमेश्वराच्या कृपेने ती माझ्या अनेक मेहफिलीत सगळ्यात अविस्मरणीय ठरली. त्या पहाटे मला खॉसाहेबांनी जगातील सगळ्यात मोठे बक्षीस दिले होते.” पं. हृदयनाथ मंगेशकर, कंकणा बॅनर्जी, कमल बोस, अमरजीत कौर, ए. कानन, भीमसेन शर्मा हे सर्व उस्ताद अमीर खॉं यांचे शिष्य आहेत. अमीर खॉं यांना 'संगीत नाटक अॅकॅडमी अॅवॉर्ड', 'पद्मभूषण', 'राष्ट्रपति अॅवॉर्ड', सूरसिंगार, 'स्वरविलास' पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. अमीरखाँसाहेबांचे आपल्या वडिलांवर इतके आदरयुक्त प्रेम होते की त्यांनी पुढील आयुष्यात मुंबईला एक इमारत बांधली आणि त्याला नाव दिले होते “शामीर मंझील”. उस्ताद अमीर खॉं यांचे १३ फेब्रु. १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 13, 2017
भारत सरकारतर्फे “अ” क्षेत्राच्या कथ्थक नृत्यांगना म्हणून मान्यता मिळालेल्या आणि गेली तीस वर्षे नृत्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुक्ता जोशी या ठाण्यातील कलारत्नांपैकी एक ! ठाण्याच नाव कोरिया, चीन, कंबोडिया, ग्रीस या देशांमध्ये पोहोचवण्याचा आणि उज्वल करण्याचा मान मुक्ता जोशी यांच्याकडे जातो
May 29, 2014
बोट ही एक कंपनी आहे जी हेडफोन्स, वायरलेस स्पीकर आणि इयरफोन्समध्ये डील करते जे समकालीन डिझाइनमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्ये देतात. त्याचप्रमाणे अमन आता सोनी टीव्ही वरील शार्क टँक या कार्यक्रमामुळे तरुणाईत लोकप्रिय झाला आहे.
March 5, 2025
कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवावत. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाखीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर संवाद,संगीत आणि अभिनयाचे धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. याचा पुरेपुर उपयोग पुढे कमलाबाईंना मुकपट तसेच संगीत नाटकांसाठी झाला. भारतीय सिनेसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती २० व्या शतकाच्या आरंभी. त्याकाळी आपल्या समाजात समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणार्यां कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती. पण, त्याकाळी एक उणीव मात्र या नाटकांमध्ये कायमची जाणवायची ती म्हणजे स्त्री पात्रांची. अर्थात स्त्री भुमिकाही त्याकाळी पुरुष साकारत असत. याच काळात म्हणजे १९१३ साली चित्रपट युग सुरु झाले ते राजा हरिश्चंद्र पासून. त्या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंचा मोहिनी भस्मासुर या मुकपटाचा प्रयोग सुरु झाला होता. आपल्या आगामी बोलपटांमध्ये स्त्री पात्र ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मतांचे दादासाहेब फाळके होते. त्याचवेळी कोणीतरी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं.
फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मुकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रुपानं, रुपेरी पडद्याला एक स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. विशेष म्हणजे मोहिनी भस्मासुर या चित्रपटात कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांची सुद्धा पार्वतीच्या छोट्या भूमिकेसाठी निवड झाली. सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत झालं आणि पुढे कमलाबाईंच्या अभिनयाची कमान ही चढतीच राहिली. पुढे अनेक मुकपटांमधून त्यांनी परिपूर्ण भूमिका साकारुन स्त्री कलाकारांना एकाअर्थी या क्षेत्रात येण्यासाठी हे उदाहरण आपल्या रुपानं ठेवलं असं ही म्हणता येईल. चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. पण अशावेळी संगीत नाटकांतील महत्वपूर्ण अशी किर्लोस्कर कंपनी बंद पडल्यानं, रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली आणि गद्य नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली. या नाटकांमधून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या पण अशातच रघुनाथरावांचे निधन झाले आणि रामभाऊ गोखले यांच्याकडे चित्ताकर्षकची सूत्रे आली. त्यांनी पुन्हा संगीत आणि पौराणिक नाटकांची निर्मिती सुरु केली. पुंडलिक तसेच मृच्छकटिक ही नाटकं चित्ताकर्षक तर्फे सादर होऊ लागली होती. या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रमुख भुमिका केल्या. त्यामुळे नाट्यसंगीतालाही सुरेल बाज लाभला. त्यावेळेला कमलाबाई यांच्या खाजगी जीवनात मोठे परिवर्तन झाले. चित्ताकर्षकचे मालक राजाभाऊ गोखले यांच्याबरोबर त्या विवाहबद्ध होऊन कमलाबाई गोखले झाल्या.
पती-पत्नी दोघेही एकाच क्षेत्रातले असल्यानं त्यांचं बिर्हा्डही सतत फिरत राहिलं. पण दुर्दैवाने चित्ताकर्षक मंडळी नुकसानित आल्यानं कंपनीला टाळं लागलं. अनेक प्रश्न भेडसावत होते. पण कमलाबाईंनी हार मानली नाही. त्यांनी मनोहर स्त्री संगीत मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या काळात फक्त स्त्रियांची नाट्यकंपनी असणं हे कला आणि मनोरंजन सृष्टीसाठी सूचक असं पाऊल होतं आणि या नाट्यकंपनीचं वैशिष्ट्य हेच की स्त्री आणि पुरुषांची पात्र स्त्रियाच सादर करत. या सुमारास नाट्यकलाप्रसाद या नाट्यकंपनीनं अस्पृश्यता निवारण हा सामाजिक प्रश्न रंगभूमीवर आणला, ज्या विषयाचा उच्चार करणंही धाडसाचं होतं, ते उ:शापच्या माध्यमातनं जनतेसमोर आले. कमलाबाईंनी काळाची गरज ओळखुन या नाटकात समर्थपणे भुमिका साकारली. पेशव्यांचा पेशवा या ऐतिहासिक नाटकातली त्यांची आनंदीबाईची भूमिका, सौभद्र मधील सुभद्रा व अर्जुन, मानापमान मधील धैर्यधर (पुरुषपात्र) या व्यक्तिरेखा तर गाजल्याच पण विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करुन दिला.
तब्बल २०० पेक्षा ही अधिक नाटकं, मुकपट त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि चाळीस वर्ष या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा वयाच्या ७० व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला. रिना मोहन या बंगाली दिग्दर्शिकेने हिंदीमध्ये त्यांच्यावर टेलिफिल्मही बनवली. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते व चंद्रकांत गोखले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कलेचा वारसा अभिनयातून आपल्यासमोर आणला आणि विक्रम गोखले यांच्या रुपात आज कमलाबाईंची तिसरी पिढी या क्षेत्रात समर्थपणे कारकिर्द घडवतेय मा.मा.कमलाबाई गोखले यांचे १८ मे १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सागर मालाडकर
September 6, 2017
साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली.
December 9, 2015
तब्बल सहा दशके वृत्तपत्रीय क्षेत्रात ‘चौफेर’ मुशाफिरी करणारा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार असलेला एक लढवय्या, व्यासंगी, व्रतस्थ पत्रकार, एक तत्वचिंतक, मार्गदर्शक, पत्रकारितेच्या अथांग सागरातील दीपस्तंभ माधव गडकरी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी मुंबईत झाला.
एकविसाव्या वर्षांपासून आपल्या अमोघ वक्तृत्वाने राज्यात, देश-विदेशात अनेक उत्तमोत्तम भाषणांसह व्यासपीठ गाजवणारे फर्डे वक्ते, लिहावे कसे... बोलावे कसे.. याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच माधव गडकरी. अफाट ग्रंथसंपदा, अनेक संपादने, हजारो विषयांवरील अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेख, यामधून काय वेचायचे आणि कसे वेचायचे, असा प्रश्न पडावा, इतके विपुल लेखन माधव गडकरी यांनी केले आहे.
माधव गडकरी हे मूळचे निफाडचे. तेथे वडिलोपार्जित अशी ३०० एकर सुपीक जमीन होती. मात्र नियतीचे असे काही विचित्र फासे पडले, निफाड कायमचे दुरावले आणि त्यांच्या वडिलांनी मुंबईत येऊन शून्यातून विश्व निर्माण करून माधव गडकरी यांना वाढवले, शिकविले, मोठे केले.
माधव गडकरी यांचे लहानपण लॅमिंग्टनरोड वरील टोपीवाला चाळीत गेले. १९३२ मध्ये माधवराव ठाण्यास राहावयास आले. गोखले रोडवरील मारुती मंदिरासमोरील ‘सिद्धाश्रम’ या इमारतीत दोन वर्ष वास्तव्य. पुढे १९३४ मध्ये वडिलांनी राममारुती रोडवर एकमजली टुमदार घर बांधले. आजोबांचे ‘सीताराम’ हे नाव या घराला दिले. १९३४ ते १९५८ असे तब्बल चोवीस वर्षे माधव गडकरी यांचे वास्तव्य ठाणे येथे होते. याच कालखंडात माधवरांवाचे शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच माधव गडकरी संपादकीय भूमिकेत शिरलेले होते. निर्झर क्षितिज (१९४७) कडून निर्धार (१९५४) या साप्ताहिकापर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला.
माधव गडकरींच्या पत्रकारितेची बीजे ‘निर्धार’ या राजकीय साप्ताहिकाने पेरली. म्हणूनच ‘निर्धार ते लोकसत्ता’ माधव गडकरी यांचा वृत्तपत्रीय कारकिर्दीमधला प्रवास वाचनीय, अनुकरणीय आणि संस्मरणीय असा आहे. दा. भ. कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, पु. ल. देशपांडे, पाडगावकर, मधू मंगेश कर्णिक, प्रभाकर अत्रे, नी. गो. पंडितराव अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास माधव गडकरी यांना लाभला. त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.
ठाण्याचे नी. गो. पंडितराव यांनी माधवरावांना वक्तृत्वातील खुब्या शिकवल्या. सभेत बोलावे कसे, भाषण कसे असावे याचे जणू धडे दिले. माधवरावांचे पहिले जाहीर भाषण गावदेवी मैदानात झाले. ‘ज्यांचे पाठांतर खूप, वाचन भरपूर, अनुभव समृद्ध असतात, ते चांगले वक्ते सहजपणे होतात.’ असे माधव गडकरी नेहमी सांगत असत. मा.माधव गडकरी हे संपादकीय भूमिकेत शिरल्यानंतर वृत्तपत्रलेखनाद्वारे, स्तंभलेखनाद्वारे अनेक लोकाभिमुख, सामाजिक संस्थांचा, थोर व्यक्तींचा, स्थळांचा, प्रांतांचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि परदेशातील अनेक घटनांचा तपशील वाचकांना करून देताना त्यांची प्रामाणिक तळमळ, धावपळ अधोरेखित होते. मा.माधव गडकरी यांच्या बद्दल पु. ल. देशपांडे म्हणत असत, ‘आजवर महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक कारागिरांचे हात लागले, त्याच्या हातून घडलेल्या सांस्कृतिक जडावांची आणि ते जडाव घडविणाऱ्या त्या लोकोत्तर कारागिरांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्राची शब्दचित्रे माधवरावांनी काढली. गडकऱ्यांची लेखमाला प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांचा वाचकांशी सलोखा वाढला. कारण गडकऱ्यांचा मन:पिंड ज्या ज्या संस्कारांनी घडला त्यांच्याशी कृतज्ञ राहून, इमान ठेवून गडकऱ्यांनी अफाट लिहिले, मोकळ्या मनाने लिहिले.’
पत्रकारितेच्या निमित्ताने माधव गडकरी यांनी जवळजवळ सर्वच देशात उदंड भ्रमंती केली. जे काही अनुभवले ते सारे लेखांद्वारे, पुस्तकांद्वारे मांडले. जनमानसामध्ये उदंड आणि सार्थ विश्वास संपादन करून माधवरावांनी एक आदर्श निर्माण केला. समाजातील अनेक वंचितांना आपल्या लेखांच्या माध्यमातून भरघोस अशी मदत केली. तसेच समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर आणि भ्रष्टाचारावर प्रहारात्मक, परखडपणे लिखाण केले. एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माधवरावांची भाषणे गाजत असायची, तर दुसरीकडे त्यांची विविधांगी विषयांवरची पुस्तके, लेखसंग्रह सातत्याने प्रकाशित होत असायचे.
माधव गडकरी यांच्या एकूण संपादकीय कारिकर्दीचा, लेखनाचा वेळोवेळी गौरव झाला आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यात पद्मश्री, अनन्त हरी गद्रे पुरस्कार, भ्रमन्ती पुरस्कार, लोकश्री पुरस्कार, भारतकार हेगडे देसाई पुरस्कार, प्राचार्य अत्रे पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले होते. २००६ मध्ये ठाणे येथे संपन्न झालेल्या नवव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वरकरणी खूप कठोर आणि कडक स्वभावाचे वाटायचे. मात्र अंतरंगी ते अतिशय मृदू स्वभावाचे होते, कुटुंबवत्सल होते.
१ जून २००६ रोजी माधव गडकरी यांचे निधन झाले.
माधव गडकरी यांची साहित्यसंपदा
त्यांचे एकूण पस्तीसच्यावर ग्रंथ प्रकाशित आहेत. ‘चौफेर’ या त्यांच्या स्तंभलेखनाचे पाच खंड, ‘दृष्टीक्षेप’ या सदरांचे तीन खंड अभ्यासपूर्ण आहेत. व्यक्तिचित्रे प्रवासवर्णने गाजली आहेत. काही निवडक पुस्तके - ‘असा हा महाराष्ट्र’, ‘असा हा गोमंतक’, ‘मुंबई ते मास्को व्हाया लंडन’, ‘सोनार बंगला’, ‘सत्ता आणि लेखणी’, ‘हॅलो चार्लस’, ‘माओ नंतरचा चीन’, ‘कुसुमाग्रज गौरव’, ‘गुलमोहराची पाने’ इ.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.रामदास खरे/लोकमत
October 3, 2017
प्राच्यविद्यासंशोधक आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांनी मराठी भाषा व मराठी वाङ्मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळी स्थापन केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर व उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता.
June 4, 2022
अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर अभिज्ञा भावे हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. किंगफिशर एअर लाईन्स मध्ये ‘एअर होस्टेस’ म्हणून कार्यरत होती. २०१० साली महाराष्ट्र टाईम्स कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होऊन ‘श्रावण क्वीन’ची ती फायनलिस्ट बनली.
June 20, 2022
दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले.
April 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti