(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आनंदराव विठोबा अडसुळ

    आनंदराव विठोबा अडसुळ

    शिवसेनेचे खासदार. माजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री, सहकारी बॅंकांच्या युनियनचे नेते.

  • ज्येष्ठ चित्रकार आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक

    बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.

  • क्रिकेटपटू अजित वाडेकर

    अजित लक्ष्मण वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी मुबंईत झाला. मध्यमवर्गीय कुटूंबात असते तसे वातावरण त्यांच्या घरचे वातावरण होते. दादरला शिवाजी पार्कजवळ ते रहात असत. अजित वाडेकर यांचा स्वभाव लहानपणी थोडा अबोल आणि गंभीर होता. ते सदोदित वाचनात गर्क असायचे . जेम्स हॅडली चेस त्यांचा आवडता लेखक होता . त्यांना क्रिकेटमध्ये फारशी गोडी नव्हती . त्यांचे गणित चांगले होते , त्यांना इंजिनीअरिंगला जायचे होते. एस. एस. सी . ची परिक्षा ते उत्तमपणे ७९ टक्क्यांनी पास झाले होते. उत्तम गुण कां म्हणतो मी , कारण त्यावेळी गुणांची खिरापत वाटत नव्हते. त्यांचे शिक्षण दादरच्या बॉईज हायस्कूलमध्ये झाले. एस. एस. सी . नंतर त्यांनी एल्फीस्टन महाविद्यालयात शास्त्र विभागात प्रवेश घेतला , आणि इथेच अजित वाडेकर यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा प्रारंभ अचानक झाला. एक आंतर महाविद्यालयीन सामना होता त्यावेळी एक खेळाडू कमी पडला अजित वाडेकर त्यावेळी पहिल्या वर्गात शिकत होते. त्यांना खेळायचा आग्रह केला आणि ते तो सामना खेळले परंतु खेळण्यापेक्षा जो काही अडीच-तीन रुपयाचा अलाउन्सवर त्यांचा डोळा होता. त्यावेळी अडीच ते तीन रुपये उपहारासाठी देण्यात येत .

    दुसऱ्या वर्षी अजित वाडेकर यांनी कॉलेज बदलले आणि घराजवळ असलेल्या रुईया कॉलेजमध्ये जाऊ लागले , पुढे त्यांची कॉलेजच्या संघात आणि विद्यापीठाच्या संघात निवड झाली. विशेष महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी पहिल्याच आंतर विद्यापीठ सामन्यात दिल्ली विद्यापीठाविरुद्ध ३२३ धावा केल्या. हा त्यांचा विक्रमच होता पुढें हा विक्रम १९७० साली सुनिल गावस्कर यांनी मोडला. हा विक्रम केला त्याच वर्षी अजित वाडेकर यांनी शिवाजी पार्क जिमखान्यात आपले नाव नोंदवले आणि ते रणजी ट्रॉफी सामन्यात ते मुबई संघाकडून मद्रास संघाविरुद्ध खेळले .त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला १९५८-५९ साली सुरवात केली. त्यांची कसोटी सामन्यासाठी निवड होत नव्हती. माधव मंत्री आणि निवड समितीने त्यांना संधी द्यायचे ठरवले तेव्हा अजित वाडेकर यांनी त्या संधीचा भरपूर फायदा घेतला. पतौडीच्या जागी ते कप्तान झाले कारण अनेक वर्षे ते मुबईकडून कप्तानी करत होते. त्यावेळी भारतीय संघात सुनील गावस्कर , गुंडाप्पा विश्वनाथ , फारूख इंजिनीअर , सलीम दुराणी आणि जोडीला गोलनंदाजीतले ' त्रिदेव ' म्हणजे बिशनसिंग बेदी , प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर हे होते आणि जोडीला वेंकट राघवन हें होते. १९७१-७२ चे वेस्ट इंडीज आणि इंग्लंड विरुद्ध आपण सिरीज पहिल्यांदा जिंकली. त्याचे शिल्पकार अजित वाडेकर आणि संपूर्ण संघ होता.

    अजित वाडेकर खऱ्या अर्थाने पहिले ' कॅप्टन कूल ' म्हणावे लागतील आपण आता धोनीला कॅप्टन कूल म्हणतो ते खरे नाही . पाहिले कॅप्टन कूल अजित वाडेकरच . अत्यंत अभ्यासू वृत्ती आणि अचूक निर्णयक्षमता त्यांनी दाखवली ती वेस्ट इंडिजच्या पहिल्या सामन्यात. पावसामुळे पहिला दिवस फुकट गेला होता . त्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. सामना चार दिवसाचा झाला होता. भारतीय संघाने १५८.४ षटकात ३८७ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजने ९३.५ षटकात २१७ धावा केल्या . म्हणजे १७० धावांचा लीड होता. तेव्हा अजित वाडेकर यांच्या लक्षात आले की सामना जर पाच दिवसाचा असेल तर फॉलोऑन साठी २०० धावा कमी लागतात . इथे तर १७० धावा होत्या परंतु चार दिवसाच्या सामन्यात नियमाप्रमाणे १५० धावा कमी असल्या तर फॉलोऑन देता येतो . हे त्यांच्या लक्षात आले . सर गॅरी सोबर्सला ' फॉलोऑन ' सांगण्यासाठी अजित वाडेकरांनी सुनील गावसकरांना सांगितले . सुनील गावसकर सांगतात मी त्यांच्या ड्रेसिंग रूममधला दरवाजा नॉक केला , आतमध्ये हसण्याचे आवाज येत होते जरा वेळाने दार उघडले आणि सुनील गावस्करानी सोबर्सला सांगितले तुम्हाला फॉलोऑन दिलेला आहे , कुणालाही हा नियम माहीत नव्हता . सगळीकडे शांतता पसरली. सुनील गावस्कर म्हणाले मी तांबडतोब निरोप देऊन तिथून सटकलो. त्यावेळी ' हे गॅरी , यू हॅव टू फॉलोऑन ' हे वाक्य फेमस झाले होते. तो सामना अनिर्णयीत सुटला . पुढला दुसरा सामना ओव्हलवर होता इथे मात्र वेस्ट इंडिजचा संघ सावधपणे खेळू लागला आणि इथेच घोळ झाला . वेस्ट इंडिजचा संघ २१४ धावात कोसळला. पुढील तीनही सामने अनिर्णयीत झाले आणि भारताने १-० ने ती मालिका जिंकली. इंग्लंडच्या विजयाबद्दल तर सर्वाना माहीत आहे तो ऐतिहासिक विजय ठरला . भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने . परंतु १९७४ साली सपाटून मार खावा लागला. शेवटी क्रिकेट हा ' वर्तमानकाळातील ' खेळ आहे . पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. तिथे सगळ्या फॅक्टस , निर्णय स्वीकारावे लागतात. अजित वाडेकर यांनी ३७ कसोटी सामन्यात २,११३ धावा केल्या त्यात त्यांचे एक शतक आणि १४ अर्धशतके होती , तर त्यांचे सर्वोच धावसंख्या हॊती १४३ . तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २३७ सामन्यात १५, ३८० धावा केल्या त्यात ३६ शतके आणि ८४ अर्धशतके होती, त्यात त्यांचे सर्वीच धावसंख्या होती ३२३ . त्यांनी कसोटी सामन्यात ४६ झेल पडले तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २७१ झेल पकडले . अजित वाडेकर अत्यंत चपळतेने क्षेत्ररक्षण करत . त्यांनी असे काही अप्रतिम झेल पकडले आहेत की त्यावेळी सामना भारताच्या बाजूला झुकला आहे. त्यांनी फक्त २ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत . त्यात त्यांची सर्वीच धावसंख्या होती नाबाद ६७. अजित वाडेकर १९९० साली भारतीय संघाचे मॅनेजर होते. त्याचप्रमाणे ते मुंबईमधील बँकेत मोठ्या हुद्यावर काम करत होते. '

    अजित वाडेकर यांना भारत सरकारने ' अर्जुन अवॉर्ड ' आणि ' पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्याचप्रमणे सी. के. नायडू लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला .

    15 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले.

    सतीश चाफेकर

  • अभिनेत्री माला सिन्हा

    ६० आणि ७०च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा हिचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी साली कोलकाता येथे झाला.
    मा.माला सिन्हा यांचे मूळ नाव एल्डा आहे. त्यांचे वडिल अल्बर्ट सिन्हा हे बंगाली ख्रिश्चन तर आई नेपाळी होती. शाळेतील मित्रमैत्रिणी तिला तिच्या अल्डा या नावावरुन डालडा असे चिडवत असल्याने तिचे नांव बदलण्याचा निर्णय घेतला गेला.

    बेबी नझमा या नावाने जय वैष्णेदेवी या बंगाली चित्रपटातुन तिचा बालकलाकार म्हणुन प्रवेश झाला. त्यानंतर श्रीकृष्ण लिला, जोग बियोग, धुली या सारख्या चित्रपटांतुन ती बालकलाकार म्हणुन चमकली. लहानपणापासुनच तिने नृत्य व गायन या कलाप्रकारांचे प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केलेला होता. बंगाली दिग्दर्शक अर्धेंदु बोस यांनी शाळेतील नाटकातुन त्यांचा अभिनय पाहिला आणि लागलीच तिच्या वडिलांना भेटुन तिने चित्रपटांत नायिकेचे काम करावे यासाठी त्यांची संमती मिळवली.

    रोशनआरा या बंगाली चित्रपटाव्दारे माला सिन्हा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्या नंतर अनेक बंगाली चित्रपटांतुन तिने अभिनय केला. अशाच एका बंगाली चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मुंबईला आलेली असतांना अभिनेत्री गीता बालीशी तिची भेट घडुन आली. त्या भेटीने प्रभावित झालेल्या गीता बालीने केदार शर्मा यांचेशी तिची गाठ घालुन दिली. अशारितीने रंगीन रातें हा केदार शर्मांचा हिंदी चित्रपट तिला मिळाला. मात्र हिंदीत माला सिन्हा यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला बादशाह. यात अभिनेता प्रदिप कुमार नायक होता. त्यानंतर एकादिशी नावाच्या पौराणिक चित्रपटातुन त्यांनी अभिनय केला. मात्र सुरवातीचे हे दोन्ही चित्रपट आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरले. त्यानंतरचा माला सिन्हा यांची प्रमुख भुमिका असलेला प्रदिप कुमार बरोबरचा हॅम्लेट हा चित्रपट देखील अयशस्वीच ठरला मात्र यावेळी तिच्या अभिनयाबाबत बोलले जाऊन तिची दखल मात्र घेतली गेली.

    प्रदिप कुमार यांचेबरोबर फॅशन, डिटेक्टीव्ह, दुनिया ना माने या सारख्या नायकप्रधान चित्रपटांतुन अभिनय केल्यानंतर अभिनेते बलराज सहानी यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव चित्रपट लालबत्ती, नौशेरखान ए आदिल, फिर सुबह होगी या सारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाने माला सिन्हा यांची अष्टपैलु अभिनेत्री म्हणुन ओळख प्रस्थापित झाली. आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे त्यांचा’ नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव ग्रुहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला.

    'फिर सुबह होगी' तसेच यश चोप्रा दिग्दर्शित पहिला चित्रपट 'धुल का फुल' या चित्रपटांतुन तिने घवघवीत यश मिळवले. प्यासा, अनपढ, दिल तेरा दिवाना, गुमराह, हिमालय की गोद में, आँखे, मर्यादा हे त्यांच्या सिनेकारकिर्दीतील यशस्वी व विशेष उल्लेखनीय चित्रपट आहेत. बहुरानी, गुमराह, गहरा दाग, अपने हुए पराये, जहाँआरा या चित्रपटांतील तिचा अभिनय चित्रपट जाणकार सर्वोत्तम मानतात. माला सिन्हाने राजकुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार यांचे बरोबर अनेक नायिकाप्रधान चित्रपटांतुन अभिनय केलेला असला तरी अभिनेता विश्वजीत बरोबरची तिची रुपेरी पडद्यावरील जोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरली. आसरा, नाईट इन लंडन, दो कलियाँ, तमन्ना, नई रोशनी, प्यार का सपना, पैसा या प्यार, जाल, फिर कब मिलोगी अशा दहा चित्रपटांतुन ही जोडी पडद्यावर झळकली. २००७मधे त्यांना स्टार स्क्रिनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी दोघांना एकाचवेळी मंचावर बोलावण्यात येऊन गौरवण्यात आले.

    त्या काळात मालासिन्हा यांच्या चित्रपटांतील भुमिका या नायकांपेक्षा अधिक सशक्त व महत्वाच्या असत. त्या काळात चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नायकाच्या आधी माला सिन्हाचे नांव नमुद करण्यात येत असे. गुरुदत्त, राज कपुर, देव आनंद, प्रदिप कुमार, किशोर कुमार हे नायक मात्र वरिष्ठ असल्याने याला अपवाद होते. या वरिष्ठ नायकां प्रमाणे शम्मी कपुर, राजेंद्र कुमार, राज कुमार या समकालीन तर मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेश खन्ना, सुनिल दत्त, संजय खान, जितेंद्र, अमिताभ बच्चन या सारख्या त्या काळातील नवोदित अभिनेत्यांसमवेत नायिका म्हणुन माला सिन्हा यांनी अभिनय केला. नवोदितांबरोबर अभिनय करण्यास तिचा नेहमीच होकार असे फक्त तिची भुमिका सशक्त आहे की नाही हाच एक निकष ती चित्रपटांची निवड करतांना लावत असे.

    मर्यादा हा त्यांच्या सिनेकारकिर्दीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपट मानला जातो. एक अभिनेत्री बरोबरच माला सिन्हा उत्तम गायिका देखील होत्या. ऑल इंडिया रेडीओची त्या मान्यताप्राप्त गायिका होत्या. अनेक भाषांमधुन त्यांनी त्या काळी गायनाचे कार्यक्रमही केले. मात्र चित्रपटांत पार्श्वगायन करण्याची संधी तिला मिळाली नाही. याला अपवाद फक्त 'ललकार' या चित्रपटातील मेरे मेहबुब हे गीत.
    धुल का फुल, बहुरानी, जहाँआरा, हिमालय की गोद में या चित्रपटांतील अभिनयासाठी तिला फिल्मफेअर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

    उत्तम कुमार, किशोर कुमार यांचे समवेत नायिका म्हणुन तिने बंगाली चित्रपटांतुन अभिनय केला. बंगाली आणि हिंदी चित्रपटांनंतर तिने नेपाळी चित्रपटातही प्रवेश केला. माइतीघर हा तिने अभिनय केलेला एकमेव नेपाळी चित्रपट. चिदंबर प्रसाद लोहानी हे यात तिचे नायक होते. इस्टेट एजंट च्या व्यवसायात असलेल्या लोहानींच्या ती प्रेमात पडली व त्यांचेच बरोबर पुढे जाऊन घरच्यांच्या संमतीने ती विवाहबध्द झाली. लग्नानंतर तिने चित्रपटांत अभिनय करु नये अशी लोहानी यांची अट होती. सुरवातीला माला सिन्हाने ती मान्य देखील केली. परंतु तिला अभिनयाच्या चांगल्या संधी मिळत असल्यामुळे तिचं अभिनयाप्रतीचं वेड तिला स्वस्थ बसु देत नव्हते. अखेर सी पी लोहानी यांनी आपली अट मागे घेतली. काठमांडु येथे ते व्यवसाय सांभाळत असतांना माला सिन्हाला चित्रपटात अभिनय करण्यासाठी त्यांचेपासुन दुर राहावे लागत असे.

    कालांतराने सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा यांनी तशी वेळ येताच चित्रपटांतुन चरित्र भुमिका करण्यास सुरवात केली. ३६ घंटे, जिंदगी, कर्मयोगी, बेरहम, हरजाई, ये रिश्ता ना तुटे, बाबु, खेल या चित्रपटांतुन माला सिन्हा चरित्र भुमिकांतुन चमकल्या. माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांना प्रचंड भावली. ये हरियाली और रास्ता..., धीरे धीरे चल चाँद गगन में... आपकी नजरोने समझा, प्यार के काबिल मुझे... झुमता मौसम मस्त महिना... यांसारख्या एकाहून एका सरस गाण्यांना अभिनेत्री मा.माला सिन्हा यांनी आपल्या अदाकारीने चार चाँद लावले. १९५४ ते १९७४ अशा वीस वर्षांत जवळपास ६५ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. प्रतिभा सिन्हा या आपल्या कन्येला तिने चित्रपटांत येण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले. पण प्रतिभाला चित्रपटांत अजिबातच यश मिळवता आले नाही. राजा हिंदुस्तानी चित्रपटातील परदेसी परदेसी जाना नहीं.. केवळ या गाण्यासाठीच ती ओळखली जाते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे

  • अनघा मोहन पेंडसे

    शिक्षण बी.कॉम., गेली २० वर्षे संगीतात कार्यरत, पु.ल. देशपांडे ह्यांच्या हस्ते मानपत्र, ई.टी.व्ही./झी.टी.व्ही./सह्याद्री/साम/दूरदर्शन/आकाशवाणी वर गायनाचे कार्यक्रम.

  • ज्योती चांदेकर

    मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे ज्योती चांदेकर.

    पुण्याच्या सरस्वती नाट्यमंदिरात शिकताना केवळ आवड म्हणून ज्योती चांदेकर यांनी तिथल्या नाट्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. याच वाचनावेळी बाबा ओक यांनी ज्योती यांची गुणवत्ता हेरुन त्यांना' सुंदर मी होणार' या नाटकासाठी विचारलं. त्यांच्या नाटकातल्या कलाकाराची झालेली अडचण लक्षात घेऊन ज्योती यांनी अवघ्या १४ व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच ती हौस न उरता त्यांचं प्रोफेशन बनलं. या नाटकातलं त्यांचं काम पाहून 'नाट्यसंपदा' च्या प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या 'बेइमान' या नाटकासाठी विचारणा केली. ज्योती तिथेही उभ्या राहिल्या त्या बदली खेळाडू म्हणूनच. यावेळी त्यांचा सहकलाकार होते सतीश दुभाषी. नवोदित ज्योती यांच्यांवर शाबासकीची पहिली थाप पडली ती दुभाषी यांच्याकडूनच.

    मुंबईतल्या नाटकांमध्ये चुणूक दाखवतानाच, त्यांनी आपलं मूळ गाव पुणे मात्र सोडलं नाही.'थ्री स्टार्स' या बाबूराव गोखले यांच्या संस्थेतून 'वर्‍हाडी माणसं', 'स्वयंसिद्धा', 'प्रेमा तुझा रंग कसा ?' आदी अनेक नाटकं केली. घरातल्या दोन धाकट्या बंधूंची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन ज्योती यांनी त्याकाळी ऑर्केस्ट्रामधून आपलं नृत्यकौशल्यही दाखवलं. अनेक लोकनाट्यातून काम केलं. परंतु, अभिनेत्री म्हणून मोठी लोकमान्यता त्यांना मिळाली ती १९७५ साली आलेल्या 'रखेली' या नाटकामुळे. अरुण सरनाईकही या नाटकात मुख्य भूमिका करत. हे नाटक होतं आशयघन. पण त्या काळी 'प्रौढांसाठी' च्या नाटकांचं पेव फुटलं होतं. त्यात हे नाटक विनाकारण भरडलं गेलं असलं, तरी ज्योती यांच्या कामाचं कौतुक होत होतं. त्यानंतर 'श्रीचिंतामणी', 'सुयोग' आदी बड्या संस्थांमधून त्यांनी अनेक नाटकं केली. 'नाट्यदर्पण', 'रंगदर्पण' आदी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

    अनेक नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा धडाका सुरू असतानाच, आठ वर्षांपूर्वी आलेल्या 'मित्र' नाटकानंतर मात्र तब्येतीच्या कारणास्तव ज्योती यांनी नाट्यसृष्टीतून काढता पाय घेतला. पुढे पाचेक वर्षं ज्योती पुण्यातच होत्या. त्यांचं मोठं कमबॅक झालं ते 'सुखान्त' या सिनेमातून. यातील भूमिकेसाठी 'मटा सन्मान', 'झी' यांसह अनेक पुरस्कार पटकावले. त्यानंतर मात्र ज्योती यांनी मागे वळून पाहिलं नाही. समोर आलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ही त्यांची दुसरी इनिंग होती. त्यानंतर आलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाऊलवाट' या सिनेमांमधल्या भूमिकांसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले. आगामी काळात त्यांचे आणखी काही सिनेमे येणार आहेत. पुण्यात राहून ज्योती यांनी हे योगदान कोणताही गाजावाजा न करता दिलं आहे. गेल्या ४५ वर्षांचं त्यांचं नाट्य, सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन अ. भा. चित्रपट महामंडळाने त्यांचा 'चित्रकर्मी' पुरस्काराने उचित गौरवच केला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले

    माधव गोडबोले हे एक सचोटीचे, कर्तव्यदक्ष, नियमानुसार काम करणारे सनदी अधिकारी होते.. पक्के सेक्युलर पण सनदशीर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. गृहसचिव म्हणून निवृत्त व्हावे लागल्यावर ‘द अनफिनिश्ड इनिंग्ज ‘ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चांगलेच गाजले.

  • जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड

    ४० वर्षाच्या कारकिर्दीत त्याच्या नावावर ११ गिनीज रेकॉर्ड आहेत आणि २१ एमी अवॉर्ड्स. २०१५ च्या फोर्ब्सच्या यादीत सर्वात श्रीमंत सेलेब्रेटी म्ह्णून नाव होते. त्याचे १२ महिन्याचे उत्पन्न होते ६३ मिलियन डॉलर .

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक रामचंद्र

    ऐ मेरे वतन के लोगो, आधा है चंद्रमा रात आधी अशी अजरामर गाणी देणारे संगीतकार सी. रामचंद्र तथा रामचंद्र चितळीकर यांचा अनमोल ठेवा बेळगावमध्ये जपला जात आहे. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. अनेक अवीट गाणी संगीतबद्ध करण्यासाठी सी. रामचंद्र यांनी वापरलेली संवादिनी बेळगावातील लोकमान्य रंगमंदिर या नाट्यगृहामध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. पुण्यातील पी. एस. नानिवडेकर यांचा सी. रामचंद्र यांच्याशी व्यक्तिगत स्नेह होता. त्यामुळे सी. रामचंद्र यांच्या पश्चात त्यांची संवादिनी नानिवडेकर यांच्याकडे होती. ती संवादिनी जतन केली जावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी ही संवादिनी जतन करण्याबाबत रसिक रंजन या संस्थेला विचारले. संस्थेनेही तशी तयारी दर्शवल्याने दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही संवादिनी संस्थेकडे सुपूर्द केली. आता ही संवादिनी दुरुस्त करून लोकमान्य रंगमंदिर नाट्यगृहात ठेवण्यात आली आहे. बेळगावचे रसिकाग्रणी रावसाहेब तथा कृष्णराव हरिहर, पु. ल. देशपांडे व सी. रामचंद्र यांची जवळची मैत्री होती. त्यांच्या गप्पा तेव्हाच्या रिझ थिएटरमधील खोलीत व्हायच्या. आता रिझ थिएटर किरण ठाकूर यांच्या लोकमान्य संस्थेने घेतले आहे. या संस्थेच्या माध्यमातून रसिक रंजन हा उपक्रम चालवला जातो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • ग. त्र्यं. माडखोलकर

    स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकरांचे वडील मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते.

    मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते. नवयुग, विविध ज्ञान विस्तार इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. केशवसुतांचा संप्रदाय या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर केसरीत त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला. १९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे आधुनिक कवी पंचक हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले.

    १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. शुक्राचे चांदणे, रातराणीची फुले हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर तरुण भारत चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले.

    बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंब-या, साहित्य समस्यांवरील लेख व्यक्ति तितक्या प्रकृती, मी आणि माझे वाचक इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे. ग. त्र्यं. माडखोलकर यांचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ ग्लोबल मराठी वेब