जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ज्यांच्या शास्त्रीय संगीताने रंगमंच गाभारा आणि सभागृह मंदिर बनत असे अशा उच्च दर्जाची सांगीतिक क्षमता असलेल्या किशोरी आमोणकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या श्रेष्ठ गायिका. त्यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी झाला.
किशोरी आमोणकर या ख्यातनाम गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या; मात्र त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला प्रारंभ केला तो भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्या तालमीत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मातोश्री मोगुबाईंकडे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. मोगुबाईंचे शिक्षण अल्लादियॉं खॉं साहेबांकडे झाले होते. घराण्याचे गाणे शिकत असताना त्यात किशोरी आमोणकर यांनी प्रयोगशीलता आणली. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे असे त्या म्हणायच्या. गाण्यामध्ये रस महत्त्वाचा असतो, असे त्या सांगायच्या. साहित्यशास्त्रात रससिद्धांत वापरला जातो. भारताच्या प्राचीन संगीत परंपरेचा वेध घेण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. हे तत्त्व आजच्या काळात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड होती. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते. घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला; आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. सिनेसंगीतालाही त्यांनी त्याज्य मानले नाही. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या "गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्व गायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. मुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्टर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले. "जाईन विचारीत रानफुला' हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला. त्यांनी 'स्वरार्थरमणी – राग रससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. १९८७ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने; तर २००२ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले. तसेच १९८७ साली संगीत सम्राज्ञी पुरस्कार, २००२ साली संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप इ पुरस्कार मा.किशोरी आमोणकर यांना मिळाले होते. शास्त्रीय संगीतात मोलाची कामगिरी बजावताना त्यांनी शिष्यांची फौज तयार केली. माणिक भिडे, नंदिनी बेडेकर, आरती अंकलीकर-टिकेकर, देवकी पंडित आणि रघुनंदन पणशीकर हे त्यातील काही महत्त्वाची शिष्यगण.किशोरी आमोणकर यांचे ३ एप्रिल २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
किशोरी आमोणकर यांचे गायन
अवघा रंग एक झाला.
https://www.youtube.com/watch?v=5p5hy-2AjTA
https://www.youtube.com/watch?v=FglVACXnQIk
https://www.youtube.com/watch?v=VylhIJF50sI
https://www.youtube.com/watch?v=zLgXP-WvXLM
https://www.youtube.com/watch?v=ddimw49-waw
https://www.youtube.com/watch?v=RSba7WebiXo
किशोरी आमोणकर यांची गाजलेली गाणी :
अवघा रंग एक झाला,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,माझे माहेर पंढरी,हे श्यामसुंदर राजसा,अवचिता परिमळु,कानडा विठ्ठल,अवघा तो शकुन,जनी जाय पाणियासी,जाईन विचारित रानफुला,पडिलें दूरदेशीं,पाहतोसी काय आता पुढे,मी माझें मोहित राहिलें,या पंढरीचे सुख,सोयरा सुखाचा विसांवा
April 10, 2017
कोशकार, लोकसाहित्याचे अभ्यासक, संग्राहक व संपादक चितामण गणेश कर्वे.
January 22, 2010
आलम, आज इसवीसन, गर्द निळा गगनझुला, मंदीला हे काव्यसंग्रह, असायलम, आमचे येथे श्रीकृपेकरुन, राधी यांसारखी राज्यनाट्यस्पर्धा पारितोषिक विजेती नाटकं; मृतिकाघट, अश्वत्थामा, माचिस यांसारख्या एकांकिका असं विपुल लेखन त्यांनी आजवर केलं आहे. तसंच सुमारे ५० चित्रपटांसाठी बागवे यांनी गीतलेखन केलं आहे.
March 10, 2022
काळू-बाळू
किस्सा तसा फारच जुना! शिवा-संभा कौलापूरकर यांचा तमाशा त्यावेळी फारच लोकप्रिय होता. कोल्हापूरमध्ये त्यांच्या तमाशाचा खेळ रंगला असताना राजर्षी शाहू महाराज तमाशा पाहायला आले. महाराज आल्याबरोबर कनातीमधले सगळे प्रेक्षक, तमाशातील कलाकार त्यांना वाकून नमस्कार करायला लागले. संभा त्यावेळी राजा विक्रमादित्याची भूमिका साकारत होता. त्याने मात्र शाहू महाराजांना नमस्कार केला नाही. लोकांना खूपच आश्चर्य वाटले आणि रागही आला. वग संपल्यानंतर शाहू महाराज कलाकारांना भेटायला गेले आणि संभाने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला आणि दिलगिरी व्यक्त केली. संभा म्हणाला, महाराज माफ करा.
तुम्ही आल्याबरोबर नमस्कार केला नाही, कारण मी त्यावेळी राजाची भूमिका करत होतो आणि तुम्हाला नमस्कार केला असता तर राजाचा अपमान झाला असता. संभाचे हे उत्तर ऐकताच शाहू महाराज प्रचंड खुश झाले आणि त्यांनी संभाला शाबासकी दिली. आपल्या भूमिकेशी, तत्त्वांशी इतके प्रामाणिक असलेले कलाकार म्हणजे शिवा-संभा कौलापूरकर आणि त्यांचा तमाशाचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे नेणारे काळू-बाळू ही त्यांची पुढची पिढी. याच काळू-बाळू कौलापूरकर यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने बुधवारी पुरस्कार जाहीर होणे, हा एक चांगला योगायोग आहे. आयुष्यात बऱ्याच खस्ता खाऊनही उभ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारी सोंगाडय़ाची जोडी म्हणजे काळू-बाळू. खरे नाव लहू आणि अंकुश खाडे. हे दोघे जुळे भाऊ. शिवा-संभा कौलापूरकरपैकी संभाची ही दोन मुले. आज २०० वर्षांची तमाशाची परंपरा या कौलापूरकरच्या घराण्याने जोपासली आहे. सातू हिरू हा या घराण्याचा मूळ पुरुष. त्यांचा तमाशा पुढे शिवा-संभा यांनी चालवला आणि पुढे काळू-बाळूने सबंध महाराष्ट्रात नाव कमावले. बालगंधर्व एकदा शिवा-संभायांचा तमाशा पाहायला गेले होते आणि त्यावेळी त्यांनी शिवा-संभा यांना तमाशात हार्मोनियम वापरण्याची सूचना केली. तेव्हापासून तमाशात हार्मोनियमची पद्धत सुरू झाली. सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावात महार जातीत १६ मे १९३३ रोजी काळू-बाळूंचा जन्म झाला. दोघेही दिसायला इतके सारखे की त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांचा रंग, केसांची रचना, दंतपंक्ती, चष्म्याची फ्रेम, उंची सगळेच सारखे. त्यामुळे अनेकांची तर पंचाईत व्हायचीच परंतु त्यांच्या बायकांची पंचाईत तर जास्तच व्हायची. तमाशात याच गोष्टीचा फायदा उचलत काळू-बाळू यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांची अनेक वगनाटय़े गाजली. त्यात प्रामुख्याने जहरी प्याला, राजा हरिश्चंद्र, रक्ता रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम ३०२, शेराला भेटला सव्वाशेर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले. तमाशा डबघाईला आलेला. अशा भीषण परिस्थितीत गरिबीचा सामना करत काळू-बाळू वाढत गेले. मात्र काही झाले तरी घराण्याने नावारूपाला आणलेला तमाशा बंद होऊ द्यायचा नाही, असा निर्धार त्यांनी लहानपणापासूनच केला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी चुलतीच्या मदतीने त्यांनी पुन्हा एकदा तमाशाचा फड उभा केला आणि अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्राला वेड लावले. काळू-बाळूंना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मात्र त्यात १९९८ सालचा महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार आणि २००१ सालचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अधिक महत्त्वाचा आहे. दादा कोंडके हे काळू-बाळू यांचे मोठे ‘फॅन’ होते. मुंबईला काळूृ-बाळूंचा प्रयोग असला की दादा कोंडके दररोज तिकीट काढून त्यांच्या प्रयोगाला जाऊन बसायचे. इतका मोठा कलाकार दररोज येतो हे पाहून काळू-बाळू खूपच ओशाळायचे. मात्र तुमच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळत आहे, असे दादा कोंडके सांगायचे, तेव्हा काळू-बाळूंना स्फुरण चढायचे. दिसण्यात कमालीचे साधम्र्य हेच काळू-बाळू यांच्या अभिनयाचे खास वैशिष्टय़ होते. जहरी प्याला या वगात दोघेही शिपाईची भूमिका करायचे आणि त्यात त्यांची नावे काळू-बाळू अशी होती. तेव्हापासूनच लऊ-अंकुश खाडे या नावाऐवजी ते काळू-बाळू कौलापूरकर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या विनोदाची एक स्वतंत्र अशी बैठक आहे. वगनाटय़ात जोडगोळीचा एकसूत्रीपणा दिसत असल्यामुळे लोकांना आनंद मिळायचा. आजघडीला जवळपास सगळे तमाशा फड मालक कर्जबाजारी असताना काळू-बाळू यांच्या तमाशाचा फड कधीही कर्जाच्या विळख्यात सापडला नाही हे विशेष. याचे कारण म्हणजे इतर तमाशा फडांप्रमाणे त्यांनी कधीही बडेजाव केला नाही. मोजकेच परंतु महत्त्वाचे साहित्य घेऊन त्यांनी तमाशाचा फड सुरू केला आणि त्याचे नियोजन इतके व्यवस्थित केले की त्यांची आर्थिक घडी कधीच विस्कटली नाही. अशा या काळू-बाळूंना राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार जाहीर होणे हे त्यांच्या करवीर नगरीसाठी खरोखरच भूषणावह आहे.
August 5, 2017
“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.
November 7, 2017
अंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
August 14, 2014
शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली.
October 24, 2016
मधुकर वामन धोंडे यांनी मराठी काव्य व साहित्याचे विविधांगी चिंतन मांडून समीक्षेला झळाळी दिली.
January 4, 2021
मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सुमती गुप्ते. त्यांचा जन्म १९१९ रोजी वाई येथे झाला. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण मात्र बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘प्रभात’मध्ये दाखल झाल्या. तिथे ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांना पहिले काम मिळाले. त्यानंतर त्यांना बाबासाहेब तोरणेंच्या ‘नवरदेव’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘थोरातांची कमळा’ या ऐतिहासिक चित्रपटात संभाजीच्या प्रेयसीची कमळेची मध्यवर्ती भूमिका दिली. त्यापाठोपाठ त्यांच्या ‘सूनबाई’नेही रौप्यमहोत्सवी यश मिळविले आणि सुमतीबाईंचे नाव एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वतोमुखी झाले. पुढे त्यांनी विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ यासारखे काही चित्रपट केले.
‘चिमुकला संसार’चे दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांच्या रूपाने त्यांना जीवनाचा जोडीदारही इथेच लाभला. वसंतराव जोगळेकर यांच्या साथीने त्यांनी मीरा पिक्चर्स या संस्थेची स्थापना करून त्या बॅनरखाली ‘शेवटचा मालुसरा’, ‘जानकी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपटांची निर्मितीही केली. अभिनयाबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा', 'जानकी' आणि 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. ‘ऊनपाऊस’, ‘थोरातांची कमळा’, ‘चिमुकला संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट, तसेच ‘मौसी’, ‘उर्वशी’, ‘हमारा संसार’, ‘वक्त’, ‘एक मंझिल, दो राहें’ इत्यादी हिंदी चित्रपटांतून आणि ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘लग्नाची बेडी’, ‘विकारविलसित’ आदी नाटकांतून सुमती गुप्ते यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांना रसरंगचा दादासाहेब फाळके पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-माता पुरस्कार, शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. नाटककार अच्युत वझे हे त्यांचे जावई आहेत. मा.सुमती गुप्ते यांचे ३१ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 13, 2017
सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला.आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, बॉलिवूड, जाहिराती, हिंग्लिश नाटकं आणि मालिकांमधून रसिकांना निखळ आनंद देणारे, त्यांच्या मनात प्रेमाचं-आदराचं स्थान मिळवणारे आत्माराम भेंडे यांनी, 'एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते' म्हणून स्वतःचा ठसा उमटवला होता. रसिकांना हसवण्यासाठी अंगविक्षेप किंवा कुठलाही थिल्लरपणा करायची गरज नसते, तर चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दफेक आणि टायमिंगमधून उत्तम विनोदनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिलं होतं. रंगभूमी, सिनेमा, जाहिराती, मालिकांमध्ये ते अगदी लिलया वावरले होते. फक्त अभिनेते म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती.
अलीकडच्या काळात त्यांच्या चरित्र भूमिका रसिकांना भावल्या. तरुणाईला तर ते आपल्या घरातले आजोबाच वाटले. 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये त्यांनी साकरलेला 'आत्माराम' सगळ्यांच्याच काळजाला भिडला होता. १९६०-७० च्या दशकात लेखक बबन प्रभू आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे जोडीनं मराठी रंगभूमीला फार्सिकल नाटकांची ओळख करून दिली आणि रसिकांना अगदी खळखळून हसवलं. दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, पिलूचं लग्न ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती. मन पाखरू पाखरू, प्रिती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, पळा पळा कोण पुढे पळे अशा नाटकांमधून भेडेंनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी आणि हिंग्लिश नाटकांमधूनही आत्माराम भेडेंनी दर्जेदार काम केलं होतं.
दूरदर्शनसाठी अनेक मालिकांचं दिग्दर्शन केलं होतं. जाहिरातींमध्ये अभिनय करण्याचं आव्हानही त्यांनी उतारवयात स्वीकारलं आणि तेही यशस्वी करून दाखवलं. काही वर्षांपूर्वीच्या 'यंदा कर्तव्य आहे' या सिनेमात त्यांनी आजोबांची छोटेखानी भूमिका एकदम चोख बजावली होती. कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भेंडेंना नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. १९८१ मध्ये नाशिकला झालेल्या ६१व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही भेंडेंनी भूषवलं होतं. भेंडे यांना २००७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आत्माराम भेंडे यांचे ७ फेब्रुवारी २०१५ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti