जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शिवाजी मंदिरच्या सांस्कृतिक कार्य परंपरेत त्यांचे मोलाचं योगदान होते. नाटक, मालिका, चित्रपट, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परिवार होता.श्री शिवाजी मंदिरचे अध्यक्ष आणि कलर वाहिनीवरील कॉमेडी एक्स्प्रेस चे निर्माते, दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर आणि गीतसुगंध या संगीताच्या कार्यक्रमाची सर्वेसर्वा अक्षदा विचारे यांचे ते वडिल होत.
May 31, 2022
वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी "फॅशन आयकॉन‘ म्हणून ओळखल्या जाणारी गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून साधना यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते.
साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली. १५ वर्षांच्या साधनाला महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली. १९५८ मध्ये "अबाना‘ या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता.
प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा 'स्क्रीन' मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना आपल्या अभिनय प्रशिक्षण शाळेत प्रवेश दिला, आणि 'लव्ह इन सिमला' या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. त्या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. त्यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.
मनोज कुमारसोबत त्यांनी केलेल्या "वो कौन थी‘ चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. मा.साधना यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली म्हणजे १२५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मागील दहा वर्षांपासून पांडुरंगजींवर आहे.
June 21, 2022
शब्दप्रभुत्व, कल्पनावैभव, कोटिबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन करणारे महाराष्ट्रातले श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक पद्मभूषण विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पहिले मराठी साहित्यिक.
February 2, 2010
वयाच्या ८ व्या वर्षापासून “बॅडमिंटन” खेळणार्या अक्षय देवलकर ह्याने क्रीडाक्षेत्रात ठाण्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे.
May 3, 2014
आत्माराम सदाशिव जयकर यांनी प्राणीशास्त्राच्या विशाल व समृध्द जगतात जे काही नवे व वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचे शोध लावले, त्यांद्वारे त्यांनी सातासमुद्रापार मराठीचा झेंडा रोवण्यात, व सर्वसामान्य मुंबईकरांची व पर्यायाने सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावण्यात लक्षवेधक कामगिरी बजावली आहे. लहानपणापासून प्राणीप्रेम हा त्यांच्या स्वभावातील विलोभनीय पैलु होता. जयकरांच्या प्राणीप्रेमाला त्यांच्यामधील कुशाग्र बुध्दीच्या व कमालीच्या चिकीत्सक अशा संशोधकाची उत्तम जोड मिळाल्यामुळेच ते प्राणीशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या व आकलनक्षमतेचा कस लावणार्या क्षेत्रात त्यांच्या नावाची अजरामर मोहोर उमटवू शकले. मस्कत मध्ये त्यांनी 30 वर्षे वास्तव्य केले व तिथल्या रमणीय व नेत्रसुखद प्राणीखजिन्याचा मनमुराद आनंद लुटत त्यांनी अनेक नव्या जातींच्या रंगीबेरंगी मास्यांवर, व समुद्राच्या आतमधील असंख्य प्राण्यांवर संशोधन केले व ते प्राणी व्यवस्थितपणे त्यांच्या संग्रही जतन करून ठेविले. अरबी समुद्राच्या किनारी येणार्या तर्हेतर्हेच्या माशांचा पुरेसा साठा जमल्यावर ते सारे मासे त्यांनी ब्रिटनमधील नॅचरल हिस्टरी म्युझियमकडे सुपुर्द केले. प्राणी संशोधन क्षेत्रात अनोखी क्रांती घडवल्याबद्दल जयकरांनी शोधुन काढलेल्यांपैकी बावीस नव्या समुद्री मास्यांना त्यांचे नाव देवून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला गेला.
July 29, 2011
राजेन्द्र नाथ यांचे पूर्ण नाव राजेन्द्र नाथ मल्होत्रा. जुन्या काळी प्रसिद्ध नायकांबरोबर विनोद वीरांची जोडी असे, जसे गुरुदत्त यांच्या बरोबर जॉनी वॉकर तसे शम्मी कपूर यांच्या बरोबर राजेन्द्र नाथ.
February 13, 2024
अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही. दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे मा.अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.
मा.अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
आज १ नोव्हेंबर.. आज मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची जयंती.
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले होते. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे. पुस्तकात छत्तीस लेख आहेत. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता. भारत सरकारने दाभोळकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३ सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे निधन २० ऑगस्ट २०१३ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 1, 2016
जन्म- ३ ऑगस्ट, १९००
मृत्यू- १९७६
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला.
लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी १९४२ च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्हाड तालुक्यात प्रकट झाले.
यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी गांधी -विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्या क्रांतिसिंहांचे १९७६ मध्ये निधन झाले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti