जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
April 24, 2021
लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती असलेल्या आणि नसलेल्याही माहितीचा संग्रह..
जन्म - सप्टेंबर २८, इ.स. १९२९ ; इंदोर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ गाव - मंगेशी, गोवा
भाषा - मराठी
पारिवारिक माहिती
आई - माई मंगेशकर
वडील - मास्टर दीनानाथ मंगेशकर
बंधू-भगिनी - आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर
संगीत साधना गुरू - मास्टर दीनानाथ मंगेशकर
संगीत कारकीर्द
पार्श्वगायन, सुगम संगीत
कारकिर्दीचा काळ - इ.स. १९४२ पासून
गौरव
विशेष उपाधी - गानकोकिळा
पुरस्कार - भारतरत्न(२००१)
लता मंगेशकर या भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते.
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे.
त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.
लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.
लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्या गायक-गायिकांमध्ये लता दीदी या दुसर्या गायिका आहेत..
लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद झालेले आहे.
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात झाला.
त्यांचे पाळण्यातले नाव हृदया.
त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य.
आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे.
लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.
इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.
लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते).
लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले.
मास्टर विनायकांच्या दुसर्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.
इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवालें यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.
इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंचे मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई(अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.
ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणार्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.
सुरूवतीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर हिंदुस्तानी शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्तानी उच्चारांचे धडे घेतले.
लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार मुखोपाध्याय, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)
संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.
इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणार्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.
१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.
इ.स. १९६१ मध्ये लताने सचिन देव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.
इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार मुखोपाध्याय-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.
२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणार्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.
इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांव्याबरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.
इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.
१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.
लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.
अभिजात संगीतात उस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.
लेखन
लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.
लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
The Voice of a Nation (मूळ लेखक पद्मा सचदेव; अक्षय गाणे-मराठी अनुवाद : जयश्री देसाई)
ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)
लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (लतादीदी-मराठी अनुवाद : अशोक जैन.)
In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)
Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९)- संपादन:विश्वास नेरूरकर
गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
हे रत्न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)
लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)
संकलन - अमित कुलकर्णी
संदर्भ - विकिपिडिया, विविध वेबसाईटस व पुस्तके
September 28, 2016
देशपांडे, (डॉ.) श्री. आ.
विद्वानाने विद्येचा वापर व आदर कसा करावा, याचा वस्तुपाठ ठरणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्री. आ. देशपांडे आता आपल्यात नाहीत. विदर्भासह महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाची सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या डॉ. देशपांडे यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) पूर्ण केल्यावर १९५२ पासून प्रथम धनवटे मग बिंझाणी महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. अर्थशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता.
सुमारे ३५ वर्षे अध्यापन करून ३१ ऑक्टोबर १९८४ ला नागपूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. फेब्रुवारी १९७६ ते ऑक्टोबर १९७८ पर्यंत ते समाजविज्ञान शाखेचे अधिष्ठाता होते. औरंगाबादेत ऑक्टोबर १९७९ मध्ये झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय समाजविज्ञान संशोधन मंडळाच्या पश्चिम विभागाच्या सल्लागार मंडळावर सुमारे नऊ वर्षे त्यांनी काम केले. संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), विभागीय असमतोलविषयक दांडेकर समिती, जलसिंचन आयोग, तसेच राज्यपालांनी नेमलेल्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाचेही ते सदस्य होते. १९९५मध्ये अनुशेष निर्देशांक समितीतही ते होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळावर सदस्य म्हणून काम करताना त्यांनी विदर्भाच्या अनुशेषासंदर्भात अनेक निर्णय घेतले. विदर्भ विकास मंडळ स्थापन व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, मात्र त्या वेळी विरोध झाल्यावरही यासाठी सरकारकडे त्यांनी भिन्नमत पत्रिका (नोट ऑफ डिसेंट) सादर केली. १९९६ मध्ये बॅकलॉग अॅण्ड इंडिकेटर समितीचेही ते सदस्य होते. सुबोध अर्थशास्त्र, अधिकोष आणि नाणे बाजार, भारताचे आर्थिक प्रश्न, मुद्रासिद्धान्त आणि मौद्रिक व्यवहार, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक, समग्र अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था संक्रमण आणि विकास इत्यादी पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी मुद्रासिद्धान्त आणि धोरण, भारतीय नियोजन आणि आर्थिक विकास, मुद्रासिद्धान्त आणि राजस्व नीती, ही पुस्तके विशेष लोकमान्य झाली. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या मातीचा गाढा अभ्यासक हरपला आहे.
August 5, 2017
अॅड. असीम सरोदे यांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर मानवी हक्क संरक्षणाच्या क्षेत्रात आपले कौशल्य पणाला लावले. अपंग, बालमजूर, शरीरविक्रय करणार्या महिला, तृतीयपंथी, एचआयव्ही ग्रस्त अशा विविध क्षेत्रांतील उपेक्षितांसाठी त्यांनी आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेतला.
हक्काचा आवाज
July 24, 2015
पछाडलेला या चित्रपटा मध्ये “समीर” ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे.
June 20, 2022
उर्जेसाठी सक्षम पर्याय निर्माण करायचे तर तशी पूरक साधनेही हवीत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांत याविषयी महत्वपूर्ण संशोधन सुरु आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचे काम हे असे उर्जेला बळ देणारे आहे. थीन फिल्म, नॅनोटेक्नॉलॉजी व मटेरिअल सायन्स यावर त्यांचा हातखंडा असून सोपे व कमी खर्चातील नॅनो मटेरिअल बनविण्यात ते सध्या व्यग्र आहेत...
महाराष्ट्र टाईम्समध्ये श्री प्रमोद पाटील यांच्या कार्याबद्दल आलेला अक्षय उर्जेचा आधार हा लेख खाली दिला आहे.

July 24, 2015
उर्दू शायर', व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला.
मौलाना ... हसरत मोहानी!
संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!
सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. मा.हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले. ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या. कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती.
हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते. मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली.
१८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे. मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची. दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या.
मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!
अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला.
अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला. मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.
हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात -
मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक
पैगामे वफा बादे सहर लेके गयी है
(हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते -
मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से
सिधारे आज तिलक
बलवंत तिलक, महाराज तिलक,
आझादी के सरताज तिलक
मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
मनमोहन श्याम से नैन लाग
निसदिन सुलग रही तन आग
मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है
हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है
व
खूब-रुयोंसे यारियाँ न गई
या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स मा.हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई
हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर
खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g
हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
=========================================
उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
=====================================
कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
=====================================
जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
======================================
तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
देखता था मै तुने भी इशारा कर दिया
इश्कने उसको सीखा दी शायरी
अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई
January 1, 2019
त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात.
July 2, 2022
दादा कोंडके यांचे चित्रपट म्हटलं की विनोद आणि त्यातल्या त्यात द्विअर्थी विनोदच आठवतो. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगाव येथे झाला. द्विअर्थी शब्द आणि संवाद ही दादांच्या चित्रपटांची खासियत होती. 'विच्छा माझी पुरी करा' या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळं दादांना जास्त ओळख मिळाली.
'विच्छा माझी' मुळे भालजी पेंढारकर यांनी त्यांना आपल्या 'तांबडी माती' या चित्रपटात संधी दिली. त्यांचा पहिला चित्रपटात 'तांबडी माती' १९६९ मध्ये प्रदर्शित झाला. दादा कोंडके निर्मित पहिला चित्रपट सोंगाड्या १९७१ मध्ये आला. सोंगाड्या खूपच हिट ठरला. चंदू जमादार,राम राम गंगाराम, राम राम अन्थाराम , एकटा जीव सदाशिव, तुमच आमच जमल, अंधेरी रात मी दिया तेरी हात मे या काही प्रसिध्द सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते. त्यांचे ९ चित्रपट त्या काळात २५ आठवड्यापेक्षा जास्त चित्रपट गृहात चालले. याची गिनीज बुकातही नोंद आहे.
द्विअर्थी शब्द आणि संवाद ही दादांच्या चित्रपटांची खासियत. तेव्हा दादांना या विषयी बराच विरोध झाला. दादांनी मराठी भाषेत कलाकार आणि निर्माते असे दुहेरी भूमिका बजावली त्यासोबतत हिंदी आणि गुजरातील चित्रपटांची ही निर्मिती केली. दादा कोंडके यांनी सोंगाड्या (१९७१), आंधळा मारतो डोळा (१९७३), पांडू हवालदार (१९७५), राम राम गंगाराम (१९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या ( १९७८) असे अनेक सिल्व्हर ज्युबली मराठी चित्रपट दिले.
हिंदी व मराठी मिळून दादा कोंडके यांनी १९ चित्रपटांची निर्मिती केली व त्यात भूमिकाही केल्या. १९९४ मध्ये आलेला 'सासरच धोतर' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्याची निर्मितीही दादा कोंडके यांनीच केली होती. फक्त चित्रपट आणि नाटक नव्हेतर दादा कोंडके यांनी राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी याची कबुली स्वतः एका मुलाखतीत दिली होती.
शिवसेनेच्या सभेत दादा स्टेजवर भाषणे देत. त्यांचा प्रचंड असा चाहता वर्ग असल्यानं ही भाषणं ऐकण्यासाठी गर्दी होत असे. दादा कोंडके यांचे १४ मार्च १९९८ रोजी निधन झाले.
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 8, 2021
लेखक, संपादक, प्रकाशक, ज्योतिषतज्ज्ञ आणि सातासमुद्रा पार गेलेल्या अनेक भाषांतून प्रकाशित होणार्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेचे सर्वेसर्वा म्हणजे ज्योर्तिभास्कर जयंत शिवराम साळगावकर. साळगावकरांचा जन्म १ फेब्रुवारी १९२९ रोजी सिंधुदुर्ग तालुक्यातील मालवण या गावी झाला.
February 4, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti