जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके यांचा जन्म ३ जानेवारी १९३१ रोजी सोलापूर येथे झाला. कै यशवंत दिनकर फडके यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडके यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. व एम्.ए. चे शिक्षण केले. १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्.डी. पदवी मिळवली. य. दि. फडके हे साहित्यिक, साक्षेपी संशोधक आणि राजकीय इतिहासकार म्हणून प्रसिद्ध होते. २००० साली झालेल्या बेळगाव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी मांडलेले संशोधन तसंच राजकीय विचारांवर त्यांनी केलेले भाष्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांची सत्तरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसंच र. धों. कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट अशा दिग्गजांची खरी ओळख त्यांनी चरित्र लिहून करून दिली. डॉ. आंबेडकरांवर अरुण शौरी यांनी लिहिलेल्या टीकेला तसेच खणखणीत उत्तर त्यांनी दिले होते. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास लिहून त्यांनी मराठी माणसाला समृद्ध केले आहे. यशवंत दिनकर फडके यांचे ११ जानेवारी २००८ रोजी निधन झाले.
त्यांची साहित्यसंपदा
द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया- य दि फडके आणि आर. श्रीनिवासन, सेनापती बापट यांचे चरित्र
सोशल रिफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील समाजसुधारक, पॉलिटिक्स अॅन्ड लॅगवेज, वी के चिपळुणकर
वूमन इन महाराष्ट्र, आगरकर शोध बाळगोपाळांचा, रा. धो. कर्वे, केशवराव जेधे, नथुरामायण, आंबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी, शाहू छत्रपती आणि लोकमान्य, केतकर लेख संग्रह (संपादन - य. दि. फडके)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 3, 2019
पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, संशोधक, विनोदकार, वादग्रस्त लेखक अन् अतिशय सर्जनशील, संवेदनशील माणूस... खुशवंतसिंग यांची ही विविध रूपे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पाकिस्तानात असलेल्या हदली येथे झाला.तब्बल सात दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक तसे विरळेच. खुशवंतसिंग त्यांपैकी एक. वृत्तपत्रांतील स्तंभ असो वा कादंबरी; किस्से असोत की चुटके... प्रत्येक माध्यमांतून ते मैफल रंगवत होते आणि रसिक त्यांचा आस्वाद घेत होते.
खुशवंत सिग यांचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी आपल्या जन्मगावी घेतले. त्यानंतर लाहोर, दिल्ली आणि लंडनमधून शिक्षण पूर्ण केले. 'बार अॅट लॉ' झाल्यावर १९३९ ते ४७ या दरम्यान लाहोर हायकोर्टात त्यांनी वकिली केली. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी परराष्ट्र खात्यात नोकरी स्वीकारली. सरकारने त्यांची वार्तांकन सहाय्यक या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर लंडनच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून आणि युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांनी काम पाहिले. नभोवाणी मंत्रालयाच्या योजना नियतकालिकाचे संपादकत्व त्यांनी काही वर्षे सांभाळले. सरकारी नोकरीनंतर त्यांनी अध्यापनाकडे मोर्चा वळविली आणि अमेरिकेतल्या प्रिस्टन विद्यापीठात प्राध्यापकी केली. त्यांच्या कर्तृत्वाला खरा बहर आला, तो त्यांनी 'बेनेट कोलमन अँड कंपनी'च्या 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया' या साप्ताहिकाचे प्रमुख संपादकपद स्वीकारल्यावर. त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा हे मासिक म्हणजे फक्त उच्चभ्रू वर्तुळासाठीच असणारे असा समज होता; पण हा समज त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने बदलून टाकला. सामान्यांपर्यंत पोहोचले तरच ते यशस्वी होईल, असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी मासिकात अनेक बदल केले. हे बदल यशस्वी ठरले आणि मासिकाचा खप ६५ हजारांवरून चार लाखांवर पोहोचला. 'विथ मॅलिस टू वर्ड्स वन अँड ऑल' हा त्यांचा साप्ताहिक स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्घ होत असे व तो वाचकप्रियही झाला होता. वाचणाऱ्याला मजा येईल, असे त्यांचे लेखन असे. त्या काळात असणारी संपादकाची प्रतिमा त्यांनी संपूर्ण बदलली. सहजतेने कोणालाही भेटणारे, पदाची आढ्यता न बाळगता काम करणारे आणि सहज संवाद साधणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्यासोबत काम करणारेही सहज संवाद साधू शकायचे, हेही त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते. संपादकीय पान म्हणजे फक्त बुद्धिजीवी लोकांचे ही प्रतिमाही त्यांनी मोडून काढली. सामान्य माणसाला काय वाटते, त्याच्या काय अपेक्षा आहेत यापासून पत्रकारिता दूर जाऊ नये यासाठी ते झटत असत. अर्थात त्यांच्या कारकिर्दीतील अनेक विधाने वादग्रस्तही ठरली. इंदिरा गांधींशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी घरोबा असतानाही त्यांनी कधी कुठलीही एकच राजकीय बाजू घेतली नाही. आपल्या विधानांवरून उठलेली वादळेही ते खुशीने स्वीकारत असत. खुशवंतसिंग यांनी त्यांच्या लेखणीचा पट्टा चौफेर फिरवला. राजकारण, समाजकारण, प्रेम, इतिहास, भाषांतर, लघुकथा, शीखांचा इतिहास अशा सर्व प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली आहे. स्त्रियांविषयीचे अत्यंत उघड श्रृंगारिक वर्णन, तिरकसपणा आणि नर्मविनोदीपणा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. त्यांना देशाविषयी प्रचंड अभिमानही होता. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी 'ट्रेन टू पाकिस्तान' ही कादंबरी खूप गाजली. फाळणीच्या दरम्यान घडलेल्या घटनांची आणि फाळणीच्या परिणामांची कहाणी त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये मांडली आहे. हातोहात खपलेल्या या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. या पुस्तकाला गोव्ह प्रेस अॅवॉर्डही मिळाले. तिचे कथानक वापरून पुढे 'ट्रेन टू पाकिस्तान' हा चित्रपटही निघाला, 'द हिस्ट्री ऑफ शीख्स' या पुस्तकाचे तीन खंड त्यांनी लिहिले. ही पुस्तके विश्वसनीय कागदपत्रे आणि पुराव्यांवर आधारलेली आहेत. या पुस्तकांत शिखांचा सचित्र इतिहास देण्यात आला आहे. मात्र, त्यांनी लिहिलेले रणजितसिंग यांचे चरित्र व्यक्तिपूजक आणि अवास्तव महती गाणारे असल्याची टीका झाली होती. त्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. हातातले पेन वृद्धत्वामुळे गळून पडत होते; पण मनातील उत्साह कायम होता. 'द सनसेट क्लब' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या वयाच्या ८०व्या वर्षी प्रसिद्ध झाले; पण ८० व्या वर्षीही त्यांनी जगण्याविषयी, राजकारणाविषयी आणि समाजाविषयी इतके भरभरून लिहिले आहे की थक्क व्हायला होते. त्यामुळेच ९८व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी निवृत्तीनंतर कसे जगावे हे सहजतेने लिहिले आहे. या ९८व्या वाढदिवशी ते म्हणाले होते, 'पुढे नेण्यासाठी माझ्यापाशी खूप थोडे उरले आहे; पण आठवून पाहावे आणि त्यात रमावे असे खूप काही मी जमवले आहे. आयुष्याच्या जमा खात्यावर ८० पुस्तके, कादंबऱ्या, लघुकथा, आत्मचरित्र, इतिहास, पंजाबी आणि उर्दूत केलेली भाषांतरे आणि अनेक निबंध आहेत. वयाच्या ९८व्या वर्षीही ते लिहित होते. प्रतिभेचे लेणे घेऊन आलेले मा.खुशवंतसिंग सर्व माध्यमांतून त्याचा आविष्कार घडवत गेले. म्हणूनच लोकप्रियतेची उंची त्यांना गाठता आली. मा.खुशवंतसिंग यांचे २० मार्च २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खुशवंतसिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही एक वादग्रस्त कादंबरी.
एका उद्योगपतीचं बिनधास्त आत्मवृत्त..खुशवंतसिंगांच्या बेधडक शैलीतून...
चैतन्य प्रेम विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृक्ष आहे. खुशवंत सिंग यांनी हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं यात जिवंत केले आहेत.
March 21, 2017
गोपीचंद हिंदुजा हे भारतात जन्मलेले ब्रिटीश अब्जाधीश उद्योगपती असून भारत आणि जगभरात कार्यरत हिंदुजा उद्योगसमूहाचे ते प्रमुख आहेत.त्यांचे शिक्षण जय हिंद कॉलेज, बॉम्बे येथे झाले.हिंदुजा समूहाची स्थापना १९१४ मध्ये परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली होती.
March 1, 2024
कुंदनलाल सैगल यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. ती सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपारिक शैलीत गायिल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जलंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले. गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही.
गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे काम त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. १९३१ साली कोलकात्यात असताना त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायिली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना 'न्यू थिएटर्स' साठी करारबद्ध केले. १९३२ मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत. मात्र १९३३ मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर्. सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायिलेली भजने लोकप्रिय ठरली.
चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी. सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील 'बालम आवो बसो मोरे मन मे' व 'दुख के अब दिन बीतत नही' यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व 'न्यू थिएटर्स' निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. 'न्यू थिएटर्स'ची निर्मिती असलेले सैगल यांचे यशस्वी चित्रपट असे: दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती धरती माता); साथी (१९३८; हिंदी स्ट्रीट सिंगर); जीवनमृत्यू (१९३८; हिंदी दुष्मन) इ. त्याचबरोबर 'एक बंगला बने न्यारा' (प्रेसिडेंट), 'करू क्या आस निरास भई' (दुष्मन), 'सो जा राजकुमारी सो जा' (जिंदगी, १९४०), 'बाबूल मोरा' (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृध्द करणारी यांसारखी अनेक गीते सैगल यांनी गायिली. १९४० पर्यंत सैगल 'न्यू थिएटर्स'मध्ये होते. या काळात बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायिली. सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व 'रणजित मुव्हिटोन ' या चित्रपट-निर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले.
त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले तानसेनमधील 'दिया जलाओ' हे शुध्द कल्याण रागात त्यांनी गायिलेले गीत अविस्मरणीय ठरले. 'न्यू थिएटर्स'च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील 'दो नैना मतवारे' व 'ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे' ही त्यांची गाणीही लोकप्रिय होती. सैगल यांचा शाहजहाँ हा चित्रपट १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील 'गम दिए मुत्त किल', 'जब दिल ही टूट गया' यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला. सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भीडत. सैगल यांच्या गायकीवर शास्त्रशुध्द गायकीचेही संस्कार झाले होते. उस्ताद फैयाज खाँ यांची तालीमही काही दिवस त्यांना मिळाली होती. सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले.
गझला, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायिली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार, 'चाह बरबाद करेगी '(शाहजहाँ), 'ऐ कातिब-ऐ तकदीर' (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच 'राधेरानी देय डालो ना' (पूरन भगत), 'जीवन का सुख आज प्रभु मोहे' (धूप छाँव) व 'मैंया मोरी मैं नही माखन खायो'(भक्त सूरदास) ही त्यांनी गायिलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायिलेले 'सो जा राजकुमारी' हे अंगाईगीत तसेच 'बाबूल मोरा' ही भैरवीतल्या करूण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगलयांच्या गायनशैलीचा प्रभाव होता. सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, ७ बंगाली व १ तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायिली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इ.) गीते होती. बी. एन्. सरकार यांनी सैगल यांच्या जीवनावर आधारित अमर सैगल हा अनुबोधपट १९५५ मध्ये प्रदर्शित झाला. सहगल किर्तीच्या शिखरावर पोहोचले. तरीही डोक्यात हवा न जाता नम्र आणि साधेच राहिले.एकदा त्यांचा चाहता मुलीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आला.परिस्थिती गरीब होता.त्याची इच्छा होती सहगल साहेबानी मुलीला लग्नात आशिर्वाद द्यावेत.सहगल साहेबांनी होकार दिला.त्याच दिवशी एका धनीकाने खाजगी महफिलीला बोलावले.दहा हजार रुपये बिदागी देण्याचे प्रलोभन दाखवले.पण ते आमंत्रण सहगल नीं नाकारले.त्या गरीब चाहत्याच्या मुलीच्या लग्नाला गेले.तिथे बसायला खाट सुद्धा नव्हती.सहगल आनंदाने जमीनीवर बसले.आशिर्वाद दिलेच शिवाय आपल्या गायनाने जमलेल्याना आनंद दिला.
प्रसिद्ध खलनायक के एन सिंग आणि सहगल यांची मैत्री होती. दोघेही माटुंगा येथे जवळ जवळ रहात असत.के एन सिंग आणि गजानन जागीरदार मित्र होते.ते एके दिवशी गजानन जागीरदार यांना सहगल यांच्या घरी घेऊन गेले. सहगल यांना स्वत: स्वैपाक करण्याची.वेगवेगळे पदार्थ करण्याची फार हौस होती.सहगल यांनी के एन सिंग आणि जागीरदार यांना आग्रहाने जेवायला बसवले. मद्यपान झाल्यावर सहगलना गाणी ऐकायची लहर आली. जागीरदार यांच्या गाडीतून आणखी चार लोक फोरास रोड ला गेले. गाडी पहाताच दलालांची गर्दी जमली. गाणारीण कोण आहे याची सहगल साहेबांनी चौकशी सुरु केली .तेव्हढयात सहगल ना कोणीतरी ओळखले आणि काही मिनीटात सगळ्या फोरास रोडवर बातमी पसरली.सगळे व्यहवार थांबले.सहगल ना पहायला अमाप गर्दी झाली. सगळ्यांनी सहगल ना गाण्याचा आग्रह केला. अखेर सहगल जागीरदारांच्या मोटारीवर चढले. तिथे बसून एक गाणे म्हणले. गाणे ऐकायला गेलेले सहगल गाणे ऐकवून आले.
कुंदनलाल सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.
लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मराठी विश्वकोश
January 18, 2018
जन्म. २४ फेब्रुवारी १९५५ ग्रीन बे अमेरिका येथे.
सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन - जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्यानंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. सहा महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते.
हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाकसोबत ओळख झाली. जॉब्स आणि रीड कॉलेजमधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. १९७१ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स १६, तर व्होज्नियाक २१ वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. ७०च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्स यांनी १९७६ मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने ॲपलची सुरुवात झाली. त्यांना ५० कॉम्प्युटर्सची पहिली ऑर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला. तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकार्याने निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला ॲपल-१ हा पीसी लाँच केला. ॲपलच्या सहकाऱ्या सोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. १९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला नाव देण्यात आले पिक्सार. येथे ॲनिमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नीसोबत करारही करण्यात आला होता. १९९७ मध्ये तोट्यात चालत असलेल्या ॲपलच्या सल्लागारपदावर ते परतले. २००७ मध्ये ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन आणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला.
२००१ साली ॲपलने ५ गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. ॲपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.
ॲपल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणाऱ्या जिम कार्लटन यांनी ॲपल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स ॲपल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार ॲपल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव ॲपल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले ॲपल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.
२००७ वर्षात आयफोनच्या लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईल वेड्यांना आणखीच वेड लावले. २०१० साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-२ मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या.
जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. ॲपलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे.
स्टीव्ह जॉब्स यांचे निधन ५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 24, 2022
गीतिका वर्दे य अखिल भारतीय रेडिओच्या A श्रेणीतील कलाकारांपैकी एक आहेत. सूर श्रृंगार संसद कडून त्यांना ‘सूरमणी’ या पदवी मिळाली आहे.
November 20, 2021
राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत.
March 9, 2022
प्रियांका बर्वेने ‘रमा माधव’, ‘मुंबई पुणे-मुंबई’, ‘डबल सीट’, ‘ऑनलाइन-बिनलाइन’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’,पानीपत या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. काही मालिकांची शीर्षकगीतं तिने गायली आहेत. ‘सागरिका म्युझिक कंपनी’ची तीन-चार गाणीही रेकॉर्ड केली आहेत.
April 11, 2022
अरविंद गणपत सावंत हे शिवसेनेतील राजकीय नेते आहेत. १९६८ मध्ये अरविंद सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गटप्रमुख ह्या पदापासून केली. स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी मागणी करणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समितीत ते सामील झाले.
October 31, 2020
काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी झाला. कवी सुधांशु यांनी आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. १९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न.जोशी यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. कवी सुधांशु यांच्या गीत दत्तात्रयाचे कार्यक्रम श्रीक्षेत्र औदुंबर येथे पहिल्यांदा, नंतर मिरजेच्या अण्णाबुवा मठात आणि नंतर इतर अनेक ठिकाणी झाले.
भारत गायन समाजात आणि नंतर अन्यत्र पुण्यात झालेल्या कार्यक्रमांना मास्टर कृष्णराव, श्री (ना.र.)मारुलकरबुवा, संजीवनी खेर आदी संगीतज्ज्ञांबरोबरच पंडित महादेवशास्त्री जोशी, भा.द. खेर, सरदार आबासाहेब मुजुमदार यांसारख्या रसिक साहित्यिकांची उपस्थिती होती. या दत्तगीतांचे गायक सांगलीचेच बाळ कारंजकर होते. तबल्याची साथ रामभाऊ चिपळूणकरांनी केली होती. कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी तंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. १९६० मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५ पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला. कवि सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत.
औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९ पासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात, व आजही अध्यक्ष आणि फाजिल मानपानांविना हे संमेलन पार पडते. १९७४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताब मिळाला होता. कवी सुधांशु यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. आर. एन. पराडकर आणि माणिक वर्मा यांनी गायलेली त्यांची गाणी अजून लोकांच्या मनात आहेत. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘देव माझा विठू सावळा’ या गीतांचे कवी कवी सुधांशुच. कवी सुधांशु यांचे १८ नोव्हेंबर २००६ ला निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
November 18, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti