जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मोगूबाईंवर १९११ साली हरिदासबुवांकडून गाण्याचे संस्कार झाले . मोगूबाई मुळातच बुद्धीमान. मोगुबाई चटकन आत्मसात करायच्या.
August 2, 2021
दिनकर देशपांडे यांच्या निधनामुळे विदर्भाच्या साहित्य आणि पत्रकारितेतील एक कलंदर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आपल्या दिनकर या नावापुढे ‘राव’ हे विशेषण स्वत:च लावणारे अस्सल आणि स्वत:च ते उच्चारत मिरवणारे वैदर्भीय मोकळेढाकळे, वेगळेपण स्वभावात असणारे दिनकरराव आयुष्यभर कलंदरीवृत्तीने जगले. शासकीय सेवेत चांगली ग्रामसेवकाची नोकरी सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांना चालून आली आणि त्यांनी ती स्वीकारलीही. मात्र, त्या नोकरीत मन रमले नाही आणि बालनाटय़ाच्या क्षेत्रात लक्षवेधी धडपड करण्याच्या उर्मीने दिनकरराव नागपुरात परतले.
महाराष्ट्र, लोकमत, नागपूर पत्रिका अशा विविध दैनिकात पत्रकारिता करत विशेषत: बालनाटय़ लेखनाच्या क्षेत्रात दिनकररावांनी अजोड कामगिरी बजावली. सुधा करमरकर यांच्या लिटल थिएटर्सनी दिग्दर्शित केलेले दिनकररावांचे ‘हं हं आणि हं हं हं’, हे बालनाटय़ सत्तरीच्या दशकात खूपच गाजले. ‘बहरले झाड सोन्याचे’, ‘देव भावाचा भुकेला’, ‘जंगलातील वेताळ’ आणि ‘बं बाबू हो बं बाबू’ या त्यांच्या बालनाटय़ांनी त्या काळात बालरंगभूमी अक्षरश: उजळून टाकली होती. बालनाटय़ हा दिनकररावांचा खऱ्या अर्थाने श्वास होता.
बालनाटय़ाच्या रंगमंचावर लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय आणि लहान मुलांची मानसिकता अशा विविध पैलूंचा दिनकरराव साकल्याने विचार करत असत. आणि त्याप्रमाणे सादरीकरण करवून घेत. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात बालनाटय़कार म्हणून त्यांची कामगिरी अतुलनीय समजली जाते. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणूनच ठाण्यात भरलेल्या अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती. बालनाटय़ लेखनासाठीचा राज्य शासनाचा राम गणेश गडकरी हा वाङ्मय पुरस्कार दोन वेळा मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक होते.
सुमारे १०० बालनाटय़ांसह मोठय़ांसाठीही त्यांनी कथा, कादंबऱ्या अशी विपुल साहित्य निर्मिती केली. नागपूर पत्रिका या दैनिकात वऱ्हाडी शैलीत त्यांनी रंगवलेली ‘इब्लिस माणसं’ आजही वाचकांच्या स्मरणात आहेत. पत्रकार म्हणून दिनकर देशपांडे यांनी लौकिक प्राप्त केला तो त्यांच्या निष्कपट स्वभावामुळे. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक माणसाची खास वऱ्हाडी इब्लिश शैलीत दिनकररावांनी सातत्याने भोचक फिरकी घेतली मात्र, पत्रकारिता करताना त्यांनी कधीही कुणाला दुखावले नाही. तो त्यांचा स्वभावच नव्हता आणि त्यामुळेच समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा अफाट असा लोकसंग्रह होता.
समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातील नेत्याने मन मोकळे करताना एका अर्थाने दिलेल्या कबुलीजबाबाचा साधा उच्चारही कधी दिनकरराव देशपांडे यांनी केला नाही. पत्रकारितेत अतिशय परोपकारी सहकारी म्हणून ते ओळखले जात. सहकारी पत्रकारांच्या अडीअडचणीच्या, दु:खाच्या क्षणी धावून जाणे हे दिनकररावांचे जणू व्रतच होते. त्यामुळे अनेक पत्रकारांच्या कौटुंबिक आयुष्यातही दिनकररावांना मानाचे स्थान होते.
अत्यंत लोकप्रिय बालनाटककार, यशस्वी साहित्यिक आणि हेवा करावा असा अफाट लोकसंग्रह असणारा पत्रकार अशी श्रीमंती असणारे दिनकरराव अतिशय साधेपणाचे जीवन जगले. लौकिकाधारित श्रीमंतीच्या भरवशावर त्यांनी ना कधी कोणाकडून कशाची अपेक्षा ठेवली किंवा कोणाकडून काही तरी मागणी कोणा नेत्या वा श्रीमंत परिचिताकडे केली. नाटय़लेखनावर आटोकाट निष्ठा ठेवत आणि कलंदरी वृत्तीने पत्रकारिता करत जगण्याचा हा साधेपणा दिनकररावांनी व्रतस्थपणे शेवटपर्यंत जपला.
August 5, 2017
चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. त्यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधना विना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या नळीने दूध पाजतो. जुनी खुर्ची मध्यभागी फाडून बाळाची ‘पॉटी’ म्हणून वापरात आणतो. मोठय़ा पडद्यावर या सगळ्या गोष्टी घडत असताना धमाल उडत असते. पण तो हे सगळं पोटतिडकीनं करत असतो. त्याच्यातली आई आणि ते बाळ यांची नाळ अदृश्य स्वरूपात जुळलेली असते. खरं तर, तो त्या बाळाचा कुणीही नसतो, पण त्यांच्यातली माया आपणा प्रेक्षकांनाही अस्वस्थ करून जाते. त्याचा ‘द किड्’ हा चित्रपट आपल्याला भारावून सोडतो. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला.
पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’ आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
संगीत नाटकांचं युग सुरू करणारे रंगकर्मी म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर. ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत शाकुंतल’ या त्याकाळी गाजलेल्या आणि त्यातील नाट्यगीतांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या नाटकांचे नाटककार म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर. एका पारशी नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला आणि असाच एखादा नाट्यप्रयोग मराठीत करून तो रंगभूमीवर आणायचा, असं त्यांनी ठरवलं. कथानक शोधता शोधता कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’ या कलाकृतीने त्यांच्या मनात घर केलं. त्यातूनच ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा जन्म झाला.
July 7, 2015
चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि अभिनयावरील निष्ठेने स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कलावंत म्हणून वामन उर्फ सूर्यकांत तुकाराम मांडरे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले.
June 2, 2021
वेस्ट इंडिजचा विख्यात गोलंदाज मायकेल होल्डिंग यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९५४ रोजी झाला.
मायकेल होल्डिंग हे वेस्ट इंडिजच्या तेज चौकडीतील एक भक्कम खांब. जलतगती गोलंदाज, बोलिंग करताना बाजूने धावत गेले तरी बुटांचा आवाज येत नसे. म्हणून काही इंग्लिश पंचांनीच त्यांचे व्हिस्परिंग डेथ असे नामकरण केले होते.
होल्डिंग यांच्या गोलंदाजीतली कविता रनअपपुरतीच असायची. प्रत्यक्ष चेंडू अत्यंत विध्वंसक ठरायचा. सीम, स्विंग, वेग अशा तिन्हींवर हुकूमत.
त्यांचा फिटनेसही आदर्शवत होता. निव्वळ नेटप्रॅक्टिस करून काही साधत नाही. तेज गोलंदाजांनी भरपूर धावलं पाहिजे, असं ते आजही सांगतात.
६० सामन्यांमध्ये २४९ विकेट्स, त्यांतल्या बहुतेक वेस्ट इंडिजबाहेर घेतलेल्या आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 16, 2022
रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबई येथे झाला. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या केवळ १३ व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला मात्र तिने यासाठी कधीही आपल्या परिवाराला दोष दिला नाही वा आपण कुटुंबाच्या चरितार्थासाठी हे काम करतोय याची कबुली दिली नाही. ती एक जबाबदार मुलगी होती, प्रेमळ बहिण होती मात्र ती व्यवहारी तरुणी खचितच नव्हती !रॉय यांनी स्टुडीओचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि सौदर्य बी.आर.इशारांनी बरोबर हेरले. मात्र रीना रॉय यांची सुरुवात फारच वाईट झाली. बी.आर. इशारांनी त्यांना एकदम दोन चित्रपटासाठी साईन केले होते. त्यांचा ‘नई दुनिया नए लोग’ हा सिनेमा आधी फ्लोअरवर गेला, त्यात रीना रॉय यांचा नायक होता डेनि डेन्ग्झोपा! या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता, सारे युनिट बेंगलोरजवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता. रेल्वे दिवसातून एकदाच तिथून जायची.त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दुसरा दिवस उजडायचा. दोनेक दिवस असेच गेले, तिसऱ्या दिवशी बी.आर.इशारा वैतागले ते म्हणाले आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही तेंव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील. रीना रॉय यांचे वय तेंव्हा फक्त १४ वर्षांचे होते ! मात्र इथे ती परत संवाद विसरली, रेल्वे आणि निघून गेली. सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन सिनेमाही डब्यात गेला. हा सिनेमा रिलीज झालाच नाही. त्या दिवशी रीना मात्र हमसून हमसून रडली. तिने पुन्हा असं चुकायचे नाही हा निश्चय मनोमनी केला तो थेट वर दिलेल्या ‘आशा’तल्या प्रसंगापर्यंत पाळला ! याच बी.आर.इशारा यांचा १९७३ मध्ये आलेला ‘जरुरत’ या सिनेमात असेच दृश्य होते ज्यात अस्ताला जाणारया सूर्याचे दृश्य सीनच्या पार्श्वभूमीला होते. या सिनेमात तिचा नायक होता तरणाबांड देखणा (पण ठोकळा) नायक विजय अरोरा ! इथे तिने सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची गाडी रांकेला लागली. पडद्यावर आलेला ‘जरुरत’ हा रीनाचा पहिला सिनेमा ठरला होता. या सिनेमातील बोल्ड दृश्यामुळे नंतर रीना ‘जरुरत गर्ल’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. जरुरतमुळे तिच्या नावापुढे रॉय कायमचे चिकटले. राजपूत रीनाचे बंगालीकरण झाले, मात्र तिने तेच नाव रिअल लाईफमध्येही धारण केले कारण तिला तिच्या बालपणीच्या कटू आठवणी विसरायच्या असाव्यात….
रीनाच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे, रीनाला ते पटत नसे. आशा पारेख आणि माला सिन्हा नंबर रेसमध्ये कधीही वर जाऊ शकल्या नाहीत मात्र त्यांची शिडी वापरून अनेक ठोकळे अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे रीनाला त्यांच्यासोबत आपली तुलना मान्य नसे. खरे तर लुक आणि गेटअपची जाण तिला रेखाने करून दिली. तिचा कपाळावरचा केसांचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर कसा करायचा याचे धडे तिला रेखाने दिले. मात्र रीनाला स्वतःची इमेज आणि करीअर यांची गंभीरता सुरुवातीला नव्हती, केवळ अर्थार्जन ह्या हेतूने तिने बी आणि सी ग्रेडचे ढीगभर सिनेमे तिने केले. या काळात ओ.पी. रल्हान सारखा जाणता निर्माता दिग्दर्शक तिच्या सौंदर्याला भूलला होता आणि तिच्या सोबत खेटे मारत होता.तेंव्हा त्यांचा राजेंद्रकुमार अभिनित ‘तलाश’ तिकीटबारीवर सुपरहिट झाला होता. पण रीनाला लफडेबाजीत रस नव्हता. तिला शोध होता आयुष्याच्या जोडीदाराचा….
रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. ‘मिलाप’, ‘जंगल में मंगल’ आणि ‘उम्रकैद’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. मात्र १९७६ साली रिलीज झालेल्या राजकुमार कोहलीच्या ‘नागिन’ या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागीन नंतर कोहलीने तिला ‘जानी दुश्मन’, ‘मुकाबला’, ‘बदले की आग’ आणि ‘राजतिलक’ या मल्टीस्टारकास्ट सिनेमात रिपीट केले. राजकुमार कोहली आणि रीनाचे हे कॉम्बिनेशन हिट ठरले.
त्यानंतर जे. ओमप्रकाशच्या १९७७ मध्ये आलेल्या ‘अपनापन’ या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देखील तिला ‘आशा’ व ‘अर्पण’ मध्ये रिपीट केले. १९८० मध्ये आलेल्या ‘आशा’साठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिन, कालिचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्म काटा, सौ दिन सास के, आदमी खिलौना है, हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत. रीनाची पडद्यावरची जोडी शत्रुघ्नखालोखाल सुनील दत्त आणि जितेंद्रसोबत जास्त जमली. राजेशखन्ना आणि अमिताभसोबत मेन रोलमध्ये तिचे सिनेमे कमी आले त्यामुळे नंबर गेममध्ये ती मागे राहिली. त्या उलट रेखा आणि हेमामालिनी यांचे चित्रपट अमिताभ, राजेश आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जास्त आले आणि तितकेच हिट झाले. पण तरीही रीना त्यांच्या पुढे टिकून होती, ती केवळ तिच्या वेगळ्या आयडेंटीटीमुळे ! आज सोनाक्षीदेखील स्पर्धेत टिकून आहे ते केवळ इंतर अभिनेत्रीपेक्षा तिच्यात असणारया वेगळेपणामुळे. हाही एक योगायोग म्हणावा लागेल.
बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. १९७५ मध्ये रीनाचा सुनीलदत्तसोबतचा ‘जख्मी’ हिट झाला तर याच वर्षीच्या सुभाष घईच्या ‘कालीचरण’ने एकाच वेळी अनेकांना जीवदान दिले. यात स्वतः सुभाष घई, शत्रुघ्न, रीना आणि अजित यांना संजीवनी मिळाली. कालीचरण हिट झाल्याने घईंनी १९७८ मध्ये रीना -शत्रुघ्न यांची सुपरहिट ठरलेली जोडी रिपीट केली आणि गॉसिपला ऊत आला. दरम्यानच्या काळात रीनाचे जितेंद्रसोबतचे ‘प्यासा-सावन’, ‘बदलते रिश्ते’, हिट झाले होते. ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’मध्येही तिचा नायक जितेंद्र होता मात्र रीनाने शत्रू वगळता आपले नाव कोणाबरोबर जोडले जाणार नाही याची काळजी घेतली. जितु आणि सुनीलदत्त दोघेही विवाहित होते त्यामुळे तिचे काम अधिक सुकर झाले. याच काळात विवाहित असलेल्या धर्मेंद्र आणि हेमाचा रोमान्स रंगात आला होता, तरअमिताभ विवाहित असूनही रेखाने त्याच्या आयुष्यात पुन्हा एन्ट्री घेतली होती. जुलै १९८० मध्ये रीना लंडनला असताना शत्रुघ्नने रीनाला वाऱ्यावर सोडले आणि पूनमबरोबर लग्न करुन सगळ्यांना चकित केले. याच दिवसात धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमाशी लग्न केले. शत्रुघ्नच्या लग्नाची बातमी रीनाला मोठा धक्का देणारी होती. इतकेच नाही तर मुंबईला परतल्यानंतर रीनाने म्हटले होते, की माझ्या गैरहजेरीत शत्रुघ्नला लग्न करण्याची काय गरज होती ? ती बरेच वर्ष शत्रुघ्न यांच्यावर नाराज होती. मात्र शत्रुघ्नने ‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ या त्याच्या बायोपिक पुस्तकात विवाहोत्तर काळात देखील तो रीनाला भेटत असल्याचा उल्लेख करून तिच्याशी अफेअर असल्याची मनमोकळी कबुली दिली आहे.
बॉलिवूडमध्ये ज्यावेळी रीना रॉयचे करिअर यशस्वी होते, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हासोबत चालू होते. जेव्हा रीनाला दोघांच्या लग्नाविषयी माहित झाले तेव्हा ती भडकली आणि तिने भारतात येऊन शत्रुघ्न सिन्हाला याचे उत्तर मागितले होते. लग्नानंतर अनेक वर्षे ते रीना रॉयला भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत का झाला याचे उत्तर या पुस्तकात देणे शत्रुघ्नने टाळले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिच्या इंग्लंड दौऱ्याच्यावेळेस ओळख झाली होती, मात्र तिने बारकाईने विचार न करता त्याच्याशी १९८३ मध्ये निकाह लावला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले अन तीही संपली. तिला चुकीची जाणीव होऊ लागल्यावर रुपेरी पडदा पुन्हा खुणावू लागला.मात्र मोहसीनचे लोढणे तिच्या गळ्यात पडले त्याला घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. यापाई मोहसीनखानला त्याच्या ९ वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावे लागले.
१९९२ ते १९९७ या पाच वर्षात त्याला तेरा चित्रपट मिळाले मात्र ऐकही सिनेमा चालला नाही. शेवटी त्याने रीनासह गाशा गुंडाळला आणि तो परत पाकिस्तानला गेला. या काळात जे.ओमप्रकाशनी तिला पुन्हा हात दिला आणि त्यांचा ‘आदमी खिलौना है’ने तिची थोडीफार पत राखली, या व्यतिरिक्त तिने केलेले या ५ वर्षातले सर्व दहाही चित्रपट दणकून पडले. या दरम्यान तिचे आणि मोहसीनचे खटके उडू लागले. तिने पाकिस्तानात गेल्यावर त्याच्याशी तलाक घेतला. मात्र तिला तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची ‘सनम’ची कस्टडी मिळाली नाही. सैरभैर झालेली रीना आईकडे परत आली आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये रिएन्ट्रीसाठी ती प्रयत्न करू लागली. अजय देवगणच्या ‘गैर’ आणि अभिषेक बच्चनच्या ‘रीफ्युजी’त तिला भूमिका मिळाल्या आणि तिच्या पदरात आणखी सिनेमे पडणार असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने उचल खाल्ली. तिने मोहसीनला परत संपर्क केला, त्यानेही तिच्याशी तलाक नंतर दुसरा निकाह लावला नव्हता.
रीनाने आपल्या मुलीवरच्या प्रेमापायी मोहसिनबरोबर कराची येथे पुन्हा एकदा निकाह केला आणि तिच्यातली आई सुखावली. मात्र आईच्या ममतेमुळे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पुन्हा अन्याय झाला….यानंतर मोहसीन आणि रीनाने आपले संबंध न ताणता एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मात्र आपले नाते न तोडता त्यांनी हा निर्णय घेतला.
रीना आपल्या मुलीला घेऊन भारतात परत आली तर तिकडे पाकिस्तानमध्ये मोहसीन अजूनही एकटाच आहे. आपल्या टीनएजमध्ये कुटुंबासाठी जगलेली रीना तिच्या तारुण्यात शत्रुघ्नसाठी जगली, तो तिच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिने जणू काही स्वतःवर सूड उगवावा तसा निर्णय घेतला आणि आपल्या शानदार करिअरचे मातेरे केले.तिथून पुढे ती पूर्ण सावरल्यासारखी कधी वाटलीच नाही. ती दमदार पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिच्यातल्या ‘आई’ने तिच्यातल्या हीरोईनवर मात केली. सुखाचा काठोकाठ भरलेला प्याला तिच्या ओठी कधी आलाच नाही. संघर्ष मात्र अविरतपणे तिच्या नशिबी आला आणि तो ती करत राहिली.
रीना रॉय यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=3GEFsCLf-vA
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ समीर गायकवाड
January 7, 2019
वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी फगवाल जम्मू येथे झाला. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली. तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा अल्ला रक्खा खान यांनी बदलली. १९४५ ते १९४८ हिंदी चित्रपटाला संगीत दिले पण ते बॉलीवूड मध्ये यशस्वी झाले नाहीत. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी बड़े ग़ुलाम अली ख़ाँ, उस्ताद अलाउद्दीन ख़ाँ, पंडित वसंत राय व पंडित रविशंकर यांना खूप वेळा तबल्याची साथ केली. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी भारत व विदेशात तबल्याला एक स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. भारत सरकारने १९७७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.१९८२ साली संगीत नाटक अकादमी अवार्ड त्यांना मिळाले होते. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत. उजवा तसेच डावा असे दोन्ही हातांचा उत्तम समन्वय साधत तबलावादन करणे ही अल्ला रक्खा खान यांची विशेषता होती. अल्ला रक्खा खान यांना तीन मुले, झाकीर हुसेन, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी.
झाकीर हुसेन आणि र्फ्क्युनिस्ट तौफिक कुरेशी लोकांना माहिती आहेत. पण तबलावादक फझल कुरेशी नेहमीच लो-प्रोफाइल राहिले आहेत. मुंबईत क्लासिकल संगीताची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहे. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्लारखा खान यांच्या नावाची चर्चा होते. उस्ताद अल्ला रक्खा खान यांचे ३ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 3, 2019
अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’
June 20, 2022
रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.
स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली मुलगी होती. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. 'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यार स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या.
वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मास्को, न्यूर्यॉक , फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : ग्लोबल मराठी
November 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti