जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. भा. भावे. त्यांच्या नावावर सतरा कथासंग्रह आहेत. त्यातील सतरावे वर्ष, पहिले पाप, संस्कार, सुगंध, प्रतारणा, मोहं, फुलवा, नौका, प्रायश्चित्त अशा अनेक कथा आजही आठवतात. . जिथे जिथे दंभ, ढोंग, खोटेपणा आहे तिथे तिथे भाव्यांची लेखणी वज्रप्रहार करते. भाव्यांच्या काही कथांवर चित्रपटही तयार झालेले आहेत.
April 12, 2021
‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले.
June 2, 2021
जूकर, पंढरीदादा
चित्रपटसृष्टीची फार ढोबळ ओळख सर्वसामान्य प्रेक्षकाला असते. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंपैकी छायाचित्रण, संकलन या विभागाची कामे काय असतात याचे थोडेफार तरी ज्ञान अनेकांना असते; परंतु ‘मेकअप’विषयी साधारणत: फारच कमी आणि त्रोटक माहिती चित्रपटसृष्टीच्या बाहेरील लोकांना असते. ‘मेकअप’ म्हणजे ‘तोंड रंगविणे’ असा एक सर्वसाधारण ठोकताळा असतो. मात्र असे ‘तोंड रंगविणाऱ्याला’ व्यक्तिरेखांचा अभ्यास असेल, अभिनेत्याच्या चेहऱ्यात नेमके काय कमी आहे आणि काय अधिक आहे याचा अंदाज असेल आणि या ज्ञानाचा उपयोग तो ‘मेकअप’ करताना जाणतेपणी करीत असेल तर ‘मेकअप’ हा ‘मेकअप’ राहत नाही, त्याची कला बनते.
पंढरीदादा जूकर यांनी ‘मेकअप’ला असे महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देता देता स्वत:ही एक कलावंत म्हणून स्थान मिळविले. गेली जवळपास ५० वर्षे पंढरीदादा आपली या क्षेत्रातली ‘दादगिरी’ टिकवून आहेत. आज या क्षेत्रात काम करणारे जवळपास सर्वच तंत्रज्ञ कधीतरी पंढरीदादांच्या ‘हाताखालून’ गेलेले आहेत. मेकअपचे तंत्र जेव्हा पुरेसे विकसितही झाले नव्हते तेव्हापासून दादांचा परिसस्पर्श हजारो चेहऱ्यांना झालेला आहे. चित्रपटसृष्टी ‘कृष्णधवल’कडून रंगांच्या युगात आली तेव्हा छायाचित्रण, वेशभूषा, रंगभूषा या सर्वच गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे ‘कृष्णधवल’च्या युगात ज्यांची चलती होती, असे अनेकजण ‘रंगांशी’ जुळवून घेण्यात अपयशी ठरले किंवा कमीतरी पडले. पंढरीदादा जूकर यांनी मात्र हे आव्हान सहजगत्या स्वीकारले .‘मधुबाला’पासून ‘मीनाकुमारी’पर्यंत आणि तेथून माधुरी दीक्षित, जुही चावलापर्यंतचा एक मोठा टप्पा गाठला. माधुरीचं नाव या ठिकाणी प्रामुख्यानं घ्यावं लागलं कारण पंढरीदादांच्या मते माधुरी दीक्षितचा चेहरा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अलीकडल्या काळातला सर्वाधिक वेधक चेहरा होता. माधुरीनंतर त्यांना थोडेफार आकर्षक, आव्हानात्मक वाटले ते मनिषा कोइराला आणि सुश्मिता सेन हे दोनच चेहरे. आजही प्रत्येक मोठी नायिका आणि हिंदी-मराठी मालिकांमधील छोटय़ा-मोठय़ा अभिनेत्रीही आपल्या चेहऱ्याला पंढरीदादांच्या मेकअपचा स्पर्श व्हावा म्हणून उत्सुक असतात. कारण त्या त्या चेहऱ्याची सौंदर्यस्थळे काय आहेत, पडद्यावर चेहर दिसतो तेव्हा नेमका तो कोणत्या बाजूने अधिक आकर्षक दिसतो याबाबतचे नेमके मार्गदर्शन पंढरीदादा करतात. १९६१ साली सुरू झालेला त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास, मीनाकुमारी, माला सिन्हा, मधुबाला, वहिदा रेहमान, हेमामालिनी, श्रीदेवी, स्मिता पाटील असा आजच्या काळापर्यंत येऊन ठेपला आहे. त्या काळात मेकअपसाठी केवळ ‘व्हाइट जेली’ उपलब्ध असे, भूवया कोरण्यासाठी काजळाचा वापर होत असे आणि व्यक्तिरेखा ‘म्हातारी’ करताना केस पांढरे करण्यासाठी अंडय़ाचा बलक हा एकमेव पर्याय असे. एवढय़ा मर्यादित साधनांचा वापर करूनही नायिकांचे सौंदर्य पडद्यावर उठून दिसत असे कारण दादांच्या मते त्या चेहऱ्यांमध्येच नैसर्गिक गोडवा होता. पंढरीदादा जर ‘मेकअप’साठी उपलब्ध नसतील तर मीनाकुमारी चित्रिकरणासाठी येतच नसे. ‘त्यांच्या चेहऱ्यांवर फार कमी मेहनत घ्यावी लागत असे,’ असे दादा आवर्जुन सांगतात; परंतु सुंदर चेहरेही अधिक सुंदर करण्यात दादांचा हात कोणी धरू शकत नाही. ‘चांदणी’ किंवा ‘लम्हे’मधली श्रीदेवी आणि ‘हम आपके है कौन’मधील माधुरी नेहमीपेक्षा वेगळी भासते कारण पंढरीदादांनी त्यांना ‘मेकअप’मधून काही वेगळी वैशिष्टय़े बहाल केली होती. ‘डर’च्या वेळी जुही चावला आणि पंढरीदादांची प्रथमच गाठ पडली. हा चित्रपट पाहून जुही चावला म्हणाली ‘मी यापूर्वी कधीही एवढी सुंदर दिसले नव्हते.’ गेली पााच दशके ‘ग्लॅमर’ला ग्लॅमरस करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या पंढरीदादा जूकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कर देण्यात येत आहे. चित्रपटसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शनाव्यतिरिक्त इतर अंगांना क्वचितच असे पुरस्कार दिले जातात. पंढरीदादांच्या निमित्ताने पुरस्कार देणाऱ्यांचे लक्ष अशा उपेक्षित विभागांकडे गेले तर खुद्द पंढरीदादांनाही त्याचा अधिक आनंद होईल. आज आथुनिक साधने हाताशी असताना अनेक गोष्टी सहजसाध्य झालेल्या आहेत, परंतु हे सर्व नसतानाही आजच्यापेक्षा अधिक उत्तम परिणाम साधला जात होता याचे रहस्य आहे कलांच्या जाणिवांमध्ये आणि निष्ठेमध्ये!
August 5, 2017
पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.
December 21, 2021
भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.
February 3, 2022
अभीनेते प्रदीपकुमार हे बंगाली नट. देवकी बोस यांच्या ‘अलकनंदा’ या बंगाली चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२५ रोजी झाला. त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश फिल्मिस्तानच्या ‘आनंदमठ’ या चित्रपटाने झाला. या चित्रपट संस्थेचे त्याची भूमिका असलेले ‘अनारकली’ व ‘नागिन’ हे चित्रपट तुफान गाजले. या बाबतीत ते फिल्मीस्तानचे सर्वेसर्वा शेठ तोलाराम जालन यांचे ऋण मानीत असे. कारण चित्रपट तयार झाल्यानंतर तो प्रदर्शित होण्यासाठी अनेक शहरांतून वितरण व्यवस्थादेखील जालन यांनी केली होती. त्याच्या ‘दीप प्रदीप’ या चित्रपट संस्थेने ‘पुलीस’, ‘एक झलक’,‘एक शोला’ हे चित्रपट प्रदर्शित केले. नंतरच्या काळातदेखील प्रदीप कुमार यांचा नर्गिसबरोबरचा ‘अदालत’, मीनाकुमारीबरोबरचा ‘आरती’ व बीना रॉय नायिका असलेला ‘ताजमहल’ हे चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. प्रदीपकुमार यांचे २७ ऑक्टोबर २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
प्रदीपकुमार यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=QnwWhCg_QZE
January 4, 2018
अविनाश नारकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रतिष्ठित नाव आहे. चित्रपट , मालिका , नाटकं ह्या क्षेत्रात कित्येक वर्षांपासून अविनाश नारकर कार्यरत आहेत. अगदी black and white च्या जमान्यापासून ते आताच्या रंगीत काळापर्यंत त्यांचा अभिनय प्रवास सुरूच आहे.
August 12, 2020
आज १४ ऑक्टोबर. भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची जयंती. त्यांचा जन्म१४ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला.
निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान. अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील बॅनर्जी यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील बॅनर्जी यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी अनेक पहिला परदेश दौरे केले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. भारत सरकाने निखिल बॅनर्जी यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्कार व १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. १९७४ साली निखिल बॅनर्जी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. मा.निखिल बॅनर्जी हे सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात. मा.निखिल बॅनर्जी यांचे २७ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. मराठी विकिपीडिया
October 14, 2016
हा माणूस दिग्दर्शक म्हणून सिनेमात आला, पण त्यांनी अनेक चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या, वीस चित्रपट दिग्दर्शित केले व सात चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१५ रोजी झाला. किशोर साहू हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. 'दिल अपना और प्रीत परायी' सोडल्यास त्यांनी दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट लोकप्रिय बनला नाही. १९४९ मध्ये किशोर साहू यांनी आपल्या चित्रपटाचे नाव सावन आया रे असे ठेवले होते. १९५४ सालचा मयुरपंख हा त्यांनी दिग्दर्शित केलेला एक संगीतमय चित्रपट होता.
शंकरजयकिशन यांचे संगीत व शैलेन्द्र-हसरत यांची गीते असलेल्या या चित्रपटात त्याने नायकाची व सुमित्रादेवीने नायिकेची भूमिका केली होती. किशोर साहू यांचे २२ ऑगस्ट १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 22, 2018
देशपांडे, स. पां.
शिक्षक चांगला असेल तर गणितही रंजक करता येते. प्राध्यापक स. पां. देशपांडे हे अशी किमया साधलेले हाडाचे गणित शिक्षक होते. त्यांच्या निधनाने आंतरराष्ट्रीय गणित वर्षांत गणितावर प्रेम करणारे एक उमदे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचा जन्म शिरवळ (जि. सातारा) इथला, शालेय शिक्षणानंतर ते पुण्यात आले. गणित विषयात एमएस्सी केल्यावर त्यांनी दोन वर्षे स. प. महाविद्यालयात फिजिक्स डेमोनस्ट्रेटर म्हणून काम केले.
नंतर ते गरवारे महाविद्यालयात दोन वर्षे गणित शिकवत. मुंबईत व्हीजेटीआय संस्थेत १९५७ ते १९६२ या काळात गणिताचे अध्यापन केल्यावर १९६२ मध्ये ते मफतलाल पॉलिटेक्निक या संस्थेत गणित विभागप्रमुख झाले. १९९० पर्यंत म्हणजे २८ वर्षे त्यांनी तेथे गणिताचे अध्यापन केले. ‘मॅथेमेटिक्स फॉर पॉलिटेक्निक स्टुडंट्स’ हे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले, ते पन्नास वर्षे वापरात आहे, त्याच्या ३५ आवृत्त्या निघाल्या आहेत. १९६४ मध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्गासाठी पुस्तक लिहिले ते ४७ वर्षे वापरात आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वर्कशॉप कॅलक्युलेशन’ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून लिहिले. गणित विषय खरेतर अनेकांना आवडत नाही; पण तो सोपा करून शिकवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. गणित लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी ‘रँग्लरचे ग्लॅमर’, ‘संख्यादर्शन’, ‘संख्याशास्त्राचे किमयागार’, ‘गणितानंदी कापरेकर’ अशी वेगळ्या धाटणीची पुस्तकेही सामान्यांसाठी लिहिली. अलीकडेच त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टसाठी ‘कन्सेप्ट ऑफ झीरो’ हे पुस्तक लिहिले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गेली साठ वर्षे त्यांनी एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे गणितविद्या विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी गणितावर २५० लेख लिहिले. पन्नासच्या वर भाषणे दिली. रेडिओवरही त्यांनी गणितातील गमतीजमती उलगडून दाखवल्या. त्यामुळेच २००९ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यांना मानद सदस्यत्व दिले होते. एक प्रकारे त्यांनी गणित पत्रकारिता हा एक नवीन विषय त्यांच्या खास शैलीत हाताळला. महाराष्ट्र भाषा संचालनालयाच्या गणित परिभाषाकोशात त्यांनी लेखन केले होते. इतरही कोश वाङ्मयासाठी त्यांनी योगदान दिले.
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti