(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल

    मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला.

    १९३४ मध्ये सागर फिल्म कंपनीच्या शहर का जादू या चित्रपटात नायक म्हणून पहिले काम केले. मोतीलाल यांचे गाजलेले चित्रपट 'शादी', आई-'परदेसी', ,'अरमान', 'ससुराल', 'मूर्ति', 'देवदास', जागते रहो व अछूत कन्या. मोतीलाल यांचे जागते रहो मधील गाणे 'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे त्या काळी खूपच गाजले होते. मोतीलाल यांचे १७ जून १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे
    https://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk
    https://www.youtube.com/watch?v=y5JcBpFMkKw

      June 17, 2019


  • मधुकर नारायण गोगटे

      December 15, 2010


  • सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके

    राष्ट्र सेवादलाच्या कार्यालयात मोठमोठ्या व्यक्ती येत असत त्यांना जवळून पाहता यावे म्ह्णून दादा सेवादलामध्ये भरती झाले. दादा त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम भागही घेऊ लागले आणि तेथेच त्यांची निळू फुले आणि राम नगरकर यांच्याशी मैत्री झाली.

      August 17, 2021


  • ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत

    ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी धुळे येथे झाला. वडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर चंद्रकांत कामत यांनी बालनट म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नाटक कंपनीच्या दौऱ्यांमध्येच त्यांनी तबलावादकांकडून तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. १९५५ मध्ये आकाशवाणीमध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि १९५६ पासून ते १९९१ अशी तब्बल पस्तीस वर्षे त्यांनी आकाशवाणीत तबलावादक म्हणून काम केले. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केलेच; पण त्याचप्रमाणे कला जगतात मानाच्या असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये त्यांनी १९५४ पासून साथसंगत करण्यास सुरूवात केली आणि प्रदीर्घ काळ ती सुरू होती.

    शास्त्रीय गायनापासून ते नृत्यापर्यंतच्या आणि संगीत नाटकांपासून ते अभंगवाणीतील ‘इंद्रायणी काठी’ सारख्या रचनेपर्यंतच्या अनेकविध कलाप्रकारांना समर्थपणे साथ देणारे ज्येष्ठ तबलावादक मा.चंद्रकांत कामत यांचा तबल्यावरील त्यांच्या विलक्षण हुकमतीमुळे कामत यांचा उल्लेख ‘अनुभवसिद्ध लययात्री’ असा करण्यात येत असे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’, गजानन वाटवे, बबनराव नावडीकर यांची भावगीते, सुलोचना चव्हाण यांची लावणी, बेगम अख्तर-गिरीजादेवी यांची ठुमरी अशा विविध कार्यक्रमांमध्ये मा.चंद्रकांत कामत यांची संगत विशेष रंगत आणीत असे. प्रत्येक कार्यक्रमाचा बाज आणि शैली लीलया पेलून ते तो कार्यक्रम जिवंत करीत. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले.

    भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी मा.कामत यांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळाले, व पुणे महापालिकेकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला. चंद्रकांत कामत यांचे दोन्ही चिरंजीव भरत कामत आणि सुभाष कामत हे तबलावादनाचा वारसा सांभाळतात. चंद्रकांत कामत यांचे निधन २८ जून २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 26, 2018


  • कर्मवीर भाऊराव पाटील

    (१८८७-१९५९)

    कोल्हापुर जिल्हयातील कुंभोज गावी (ता. हातकणंगले) एका जैन शेतकरी कुटुंबात भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेव्हिन्यू खात्यात लेखनिक म्हणून नोकरीस होते. भाऊरावांना त्यांच्या वडिलांनी कोल्हापुरला शिक्षणासाठी ठेवले. तेथे त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचे संस्कार झाले. महात्मा फुले, विठठ्ल रामजी शिंदे व मुख्यत्वेकरून शाहू महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. परंतु मतभेद झाल्याने त्यांनी कोल्हापुर सोडून सातार्‍यास विक्रेता म्हणून नोकरी धरली. ही नोकरी करीत असताना त्यांना ग्रामिण भागातील लोकांना शिक्षण मिळाले तर त्यांचे प्रश्न सुटतील हे त्यांच्या लक्षात आले व त्यासाठी १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेसाठी त्यांनी पैसे जमा केले. शिक्षणाच्या कार्याला वाहून घेतील अशा सहकार्यांचा संच उभा केला व खेडयापाडयातील लोकांनी त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास पाठवण्यास प्रवृत्त केले. जातीप्रमाणे वसतिगृहे असू नयेत असे भाऊरावांचे मत होते. त्यांचा स्वतःचा जैन वसतिगृहाचा अनुभव वाईट होता. म्हणून सर्व जातीधर्माच्या मुलांना खुली असणारी वसतिगृहे सुरू केली. ब्राह्यणेतर चळवळीतील इतर नेत्याप्रमाणे राष्ट्रवादी चळवळीपासून दूर न रहाता भाऊरावांनी आपल्या परीने त्या चळवळीस हातभार लावला. आयुष्यभर खादी वापरली. पण राजकीय काम करण्याऐवजी रचनात्मक कार्यास वाहून घेतले. १९४२ च्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांना मदत केली.

    त्यांच्या रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात शाळा व महाविद्यालयांचे जाळे विणले. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे विद्यापीठाने त्यांना १९५९ मध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्याच वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले.

      June 8, 2015


  • मनोरमा वागळे

    मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर तसेच एकूणच भारतीय कलेच्या प्रांगणात विनोदी नटांची आणि लेखकांची तशी कमतरता नाही. आजपर्यंत अनेक पुरुष विनोदी नटांनी आपल्याला पोट धरुन हसायला लावलंय. पण विनोदी स्त्री कलाकारांची उणीव ही आजही कुठेतरी जाणवतेय, अगदी सर्वच माध्यमांमध्ये.

      March 28, 2013


  • मराठी नाट्यसंगीत गायक, अभिनेते छोटा गंधर्व

    हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी झाला.

    बालगंधर्व यांच्यानंतर पुण्यस्मरण करावे असे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.छोटा गंधर्व. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती.

    छोटा गंधर्व यांनी १० वर्षे वयाचे असताना ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत.

    आपल्या गायकीने अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी गाजविणारे स्वरराज छोटा गंधर्व हे त्यांच्या दातृत्वासाठी सर्वपरिचित होते, १९४३ मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.

    संगीत सौभद्रातील तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ' मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.

    आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या छोटा गंधर्व यांना आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला.

    १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.

    छोटा गंधर्व यांचे ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकी पिडीया

      December 31, 2016


  • मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

    शांतारामबापूंनंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल.

    दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्याच वेळी "पाध्येबुवा‘कडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले; पण त्यांचे वडील जगन्नाथराव वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात आले आणि नोकरी करायची म्हणून प्रभात स्टुडिओत त्यांनी "टाइमकीपर‘ची नोकरी स्वीकारली; पण त्यांचं मन त्यात रमत नव्हतं. त्यांना व्ही. शांताराम यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक व्हायचं होतं. ते क्षेत्र त्यांना खुणावत होतं. चराचरसृष्टीचा "टाइमकीपर‘ ब्रह्मदेव; त्यानं दत्ताजींच्या कुंडलीत शुभवेळेची नोंद केली; ते शांतारामबापूंचे व दामले-फत्तेलाल यांचे सहायक दिग्दर्शक झाले! आणि १९५० मध्ये त्यांनी "मायाबाजार‘ (हिंदी व मराठी) हा चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. सुलोचना, बेबी शकुंतला, उषा किरण (यांना दत्ताजींनी नायिकेची प्रथम संधी दिली), राजा गोसावी, शरद तळवलकर (यांनाही रजतपटावर प्रथम संधी दिली), सूर्यकांत, चंद्रकांत, राजा परांजपे, राजा नेने, जयश्री गडकर, रेखा, चित्रा आदी कलावंतांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या. मराठीबरोबरच हिंदीतले प्रथितयश मोतीलाल, सोहराब मोदी, नलिनी जयवंत, गीता बाली, निरुपा रॉय, मीनाकुमारी आदी कलाकारांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं. "बाळा जो जो रे‘, "स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी‘, "भाग्यवान‘, "चिमणीपाखरं‘, "एक धागा सुखाचा‘, "अबोली‘, "सावधान‘, "सुहागन‘ (हिंदी) चित्रपटांबरोबरच "अखेर जमलं,‘ "आलिया भोगासी‘, "लग्नाला जातो मी‘, असे विनोदी चित्रपट काढून त्यांनी लोकांना खळखळून हसवलंही. याशिवाय "थांब लक्ष्मी कुंकू लावते‘, "विठू माझा लेकूरवाळा‘, "सतीचं वाण‘, "सतीची पुण्याई‘, "सुदर्शनचक्र‘, "भक्त पुंडलिक‘ इत्यादी धार्मिक व पौराणिक चित्रपट तितक्याचच समर्थपणे त्यांनी दिग्दर्शित केले. "भाग्यवान‘, "दीप जलता रहे‘, "मुझे सीने से लगा लो‘, "दौलत का नशा‘ इत्यादी हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन त्यांनी केलं. "दैवे लाभला चिंतामणी‘, "कुंकू जपून ठेव‘ इत्यादी यशस्वी नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. "कुंकू जपून ठेव‘ या नाटकात नायिकेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती, तीही वयाच्या साठाव्या वर्षी. त्यांचा "महात्मा‘ हा चित्रपट पु. ल. देशपांडे यांच्या "भाग्यवान‘ नाटकावर आधारित होता आणि तो मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये निर्माण केला होता. एकच चित्रपट एकाच वेळी तीन भाषांमध्ये निर्माण करणारे दत्ताजी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातले पहिले निर्माता-दिग्दर्शक होते. सर्व समीक्षकांनी या चित्रपटाचं यथोचित कौतुक केलं होतं. दत्ताजींचं हास्य ही त्यांना ईश्वतरानं दिलेली देणगी होती आणि कोणत्याही संकटात ते हास्य त्यांना सोडून गेलं नाही. साधेपणा हा त्यां चा गुण होता. एवढंच नव्हे तर, संगीतकार वसंत पवार यांना हिंदी चित्रपटात त्यांनी संधी दिली व त्यांचा रुबाब वाढावा म्हणून त्यांना वूलनचा सूटही शिवून दिला होता. आपल्या "स्टाफ‘वर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. त्यामुळंच एक चित्रपट पूर्ण झाल्यावर दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळातला पगारही ते देत असत! काही काम न करताही आपल्या या कुटुंबाला ते सहा-सहा महिने पोसत असत. स्वतः उत्तम दिग्दर्शक असूनही आपले सहकारी अनंत माने यांना आपल्या मराठी व हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी त्यांनी दिली होती. एखाद्या संतानं प्रेमळ मानवाचं रूप घेऊन तो या मायावी चित्रपटसृष्टीत वावरतोय, असं दत्ताजींना पाहून वाटायचं

    दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 3, 2016


  • प्रख्यात अभिनेते व विनोदवीर वसंत शिंदे

    साल : १९२४, स्थळ : नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यात करण्यात आली.

    स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे. लहानपणापासून अंगपिंडाने गुटगुटीत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते. उंचीने काहीसे बुटके असलेला, उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. १९२५ मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती उत्तम वठली. त्यानंतर ‘सीतावनवास’, ‘राम-रावण युद्ध’ या मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाई’मध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हाद’मध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेली’मध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले.

    हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात शिंदे जवळजवळ सगळ्या खात्यांमधील कामे शिकून आले. या काळात त्यांनी फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली १९ मूकपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. फाळकेंकडे नोकरी करताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला होता दरमहा ५ रुपये! पाच वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्या वेळी शिंदे यांचा पगार होता दरमहा १८ रुपये. पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले, तर त्याला निश्चितच भोवळ येईल. पण त्या काळच्या स्वस्ताईच्या जमान्यात एवढे पैसेही पुरेसे होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९२३ पासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते. मुंबईतील कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते. त्यांचे व फाळक्यांचे अनेकदा मतभेद होत. त्याचमुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत आले होते. मात्र तिसर्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा तिथे कधीही फिरकले नाहीत. ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले, त्यात वसंत शिंदेही होते. ते वर्ष अदमासे १९२८-२९ असे असावे. सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. पोट भरण्यासाठी हातपाय तर हलवायला हवे होते. नियतीने त्यांना या वळणावर नेऊन सोडले पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीत. लहान मुलांसाठी नाटके करणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्योग. बालमोहनचे मालक होते दामूअण्णा जोशी.

    वसंत शिंदे ज्या वेळी या कंपनीत गेले, तेव्हा तिचीदेखील ती सुरुवातच होती. संस्थेने तोवर एकही नाटक बसवलेले नव्हते. सगळी जमवाजमव सुरू होती. त्या दोन महिन्यांच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटय़ाला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही. त्यामुळे ते अखेर वैतागून पुन्हा नाशिकला परतले. ११ ऑगस्ट १९२९ रोजी स्थापन झालेल्या अरुणोदय नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडाव होता. या नाटय़मंडळीत त्यांनी चार वर्षे काढली. त्या कालावधीत गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले. त्यामुळे एक नाटय़कलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळू लागली. त्या वेळी नाटकमंडळ्यांचे संसारही अल्पजीवीच असायचे. अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यानंतर वसंत शिंदे यांची पावले वळली ती नवजीवन संगीत मंडळीमध्ये. मोराचा नाच, व्याही-विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली.नाटक-चित्रपटाचा व्यवसाय एकूण अस्थिरच.

    नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या ‘आनंद व्यंगपट’ या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचीही नोकरी केली. आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते. विवाहानंतर सांसारिक जबाबदाऱयांतही वाढ झाली होती. १९४१च्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करते झाले. राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे. ‘भावबंधन’मधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यांना पुढे ‘कामण्णा’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. दिनकर ढेरेंनंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची भूमिका मुळाबरहुकूम करून गाजवली. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रेमसंन्यास’मधील गोकुळ, ‘राजसंन्यास’मधील जिवाजी कलमदाने अशा काही भूमिका केल्या. राजाराम संगीत मंडळीनंतर ‘ललित कला कुंज’च्या नाटकांत काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला मोहरा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला. बोलपटांची एव्हाना चलती सुरू झालेली होती. वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित ‘मायाबाजार’.

    १९३९ मध्ये झळकलेल्या या चित्रपटात त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती. १९४६मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘सासुरवास’मध्ये सुभान्याच्या भूमिकेत वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले. त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. १९२४ ते १९२९ या काळात त्यांनी १९ मूकपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९३९ पासून ते १९९६पर्यंत १९०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्याशिवाय सात हिंदी चित्रपटांतही कामे केली. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले, तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांत प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते. अशाच अप्रदर्शित राहिलेल्या नऊ चित्रपटांतही वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या. पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही. वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाटय़ कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा सुमारे ५७ लोकनाटय़ांतून वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या होत्या. विनोद, कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते.

    माधवराव जोशी, आचार्य अत्रे, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्यंकटेश माडगूळकर आदी सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या. त्यांनी १०५ नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगडय़ाची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवलेली आहे, असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे. पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येईल. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तेवढेच रंगून जात. सुमारे ७५ वर्षे मूकपट, नाटके, बोलपट यांच्यात वसंत शिंदे यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली.

    वसंत शिंदे यांच्या वर ‘विनोदवृक्ष’ हे मधू पोतदार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ‘विनोदवृक्ष’ या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना शरद तळवलकर यांनी म्हटले होते, ‘वसंत म्हणजे ऋतूंतला श्रेष्ठ ऋतू! सृष्टीचे वातावरण त्या वेळी प्रसन्न असतं. तेच नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले. त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावांवर येऊन पडली असं म्हणायला हरकत नाही.’ वसंत शिंदे यांचे ४ जुलै १९९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / समीर परांजपे
    ‘विनोदवृक्ष’ या पुस्तकाची लिंक
    http://erasik.com/productdetails/PROD150300028501

      May 14, 2019


  • थोर देशभक्त, नामवंत नाटककार वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी

    १९१२ साली ’वीर वामनराव’ जोशी यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्यांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी झाला. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे नाटक लिहिले. मास्टर दीनानाथांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने ते रंगभूमीवर आणले. हे नाटक खूपच गाजले. या नाटकातील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे गाणे तर १९३० च्या चळवळीने खेड्यापाड्यांपर्यंत पोचविले होते. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना. रणदुंदुभीनंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली. वामनराव जोशी यांचे ३ जून १९५६ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 3, 2017