(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)

    बाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले.

  • प्रविण कारखानीस

    भुंगा जसा चंचलपणे एका फुलावरून दुसरीकडे उडून प्रत्येक फुलामधील मधाचा आस्वाद घेत असतो तश्याच प्रकारे काही व्यक्तींना सतत दुसर्‍या देशांना व अगदी दुसर्‍या टोकांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची हुरहुर लागलेली असते व अशा प्रवासवेड्या कलंदरांमध्ये प्रवीण कारखानीस यांचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी निरनिराळ्या देशांना व तिथल्या ऐतिहासिक स्थळांना आभ्यासपुर्ण भेटी देवून तिथल्या संस्कृतींशी समरस होण्यात, व तिथल्या पारंपारिक कलांचा व पदार्थांचा आस्वाद घेण्यातच आपल्या जीवनातील बराचसा काळ व्यतित केला आहे.

  • डॉ. राणी बंग

    गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या सामाजिक संस्थेच्या संस्थापक व सहसंचालिका डॉ.राणी बंग यांची भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे २००८ मध्ये दिल्या जाणार्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली.

  • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

  • शुभांगी पांगे

    मुंबई मराठी साहित्य संघाने आठ नोव्हेंबरला चार वाड्:मयीन पुरस्कार प्रदान केले. त्यातला वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार येशू पाटील यांच्या ‘शब्द पब्लिकेशन्स’ ला; ‘मंगेशराव नारायण कुलकर्णी पुरस्कार’, गंथप्रसारक व अभ्यासक शशिकांत सावंत यांना; ‘केशव भिकाजी ढवळे पुरस्कार’ शुद्धलेखन चळवळ्ये अरुण फडके यांना तर ‘बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार’ ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या आधारस्तंभ शुभांगी पांगे यांना देण्यात आला. पाच हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र असा हा पुरस्कार मिळवणार्‍या या चौघांपैकी पहिल्या तिघांची नावे कधी ना कधी कानांवर पडतात. पण शुभांगी पांगे या कायमच पडद्याआड राहिलेल्या वाड्:मयसेवक आहेत. त्यांची मराठी साहित्य आणि व्यवहार यांवरची निष्ठा इतकी प्रखर की, बी ए आणि एम ए केल्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या या वाड्:मयसेवेला लवकरच तीन दशके पुरी होतील.

  • रामकृष्ण विठ्ठल लाड

    भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते होते.

  • अनिल मोहिले

    अनिल मोहिलेंवर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता.संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसेच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.

  • (प्रा.) ल. ना गोखले

    गोखले, (प्रा.) ल. ना.

    लक्ष्मण नारायण गोखले हे नाव पत्रकार ही त्यांची ओळख दिली जाईल. ते पत्रकार होते, पण पत्रकारांचे ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक मित्र होते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते दीपस्तंभ होते. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते पहिले उत्तम संयोजक होते. ‘ल.ना.’ अशी आद्याक्षरे उच्चारली तर त्यापुढे केवळ गोखले हेच नाव येते ते यामुळेच. ही आद्याक्षरे त्यांच्या त्या आडनावाशी एकरूप झाली होती आणि ती त्यांचा व्यासंग सांगायला पुरेशी होती. ल.ना. सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे झाली, पण तरीही त्यांना सर्व घडामोडी इत्यंभूत माहित असायच्या. पत्रकारितेतही रोजच काही ना काही घडत असते.

    कुणी त्याकडे लक्ष देते, कुणी देत नाही. ‘लनां’ना आपल्याकडून ती सांगितली जाईपर्यंत ती त्यांना मिळालेली असे. ल.ना. हे त्याही अर्थाने ज्ञानकोशच होते. कोणत्या वृत्तपत्रात काय आले आहे आणि काय हवे होते ते ल.ना. अचूकपणे सांगू शकायचे! वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी मराठी भाषा बिघडत चालली आहे, अशी तक्रार अनेकजण करतात, पण कोणी त्यावर उपाय सांगत नाही. ल.ना. म्हणायचे, ‘तुम्हाला वाटले तर मला सांगा, मी एखादा तास घेऊन काय चुकते ते सांगू शकेन.’ अर्थात, यामागे चुका दाखवून देण्यापेक्षा त्या पुन्हा केल्या जाऊ नयेत, हा दृष्टिकोन होता. ‘पत्रकारांसाठी मराठी’ या पुस्तकाचा जन्मही त्यांच्या अशाच आग्रहातून झाला. या पुस्तकातही लिहिताना त्यांनी संपूर्ण वर्षभराचे अंक समोर ठेवून कोणत्या वृत्तपत्राने कोणता शब्दप्रयोग केला आहे, तेही तपासून पाहिले होते. काही वेळा तर अनर्थ होईल, असेही शब्दप्रयोग केले गेल्याचे त्यांना आढळले. या चुका दाखवताना एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी सोपी मांडणी केली आहे. पत्रकारांना भाषा शिकवायचा उद्देश त्यामागे नक्कीच नव्हता, तर पत्रकारांनी सुबोध मराठीचा वापर करून वाचकांना चुकीच्या मराठीपासून वाचवावे, ही त्यामागे असणारी दृष्टी होती. त्यांचा त्यासाठी आग्रह होता, पण तो अनाठायी नक्कीच नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये कोठे काय आले आहे आणि त्यामागे काय भूमिका असू शकते, याचे नेमके ज्ञान त्यांना होते. इंग्रजी किंवा हिंदी वृत्तपत्रे मराठीचा वापर करतात का, तर नाही. मग आपण त्यांच्या त्या शब्दांची उसनेगिरी का करायची, असा त्यांचा साधा सवाल असे. फलटणच्या मुधोजी प्रशालेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली तरी पत्रकारितेची उपजत वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. ते पुण्यात आले आणि ‘काळ’, ‘त्रिकाळ’ या वृत्तपत्रांनंतर ‘केसरी’मध्ये दाखल झाले. ‘केसरी’त त्यांनी काही काळ ‘वाट्टेल ते’ या नावाचे सदर लेखनही केले, ज्याचे पुढे पुस्तकही झाले. त्या काळात पत्रकारांचे आर्थिक जीवनमान फार चांगले नसले तरी जे होते त्यात समाधान मानणारे ते होते. पुणे विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरू करायचे ठरवल्यानंतर ते त्या विभागाचे प्रमुख बनले. अतिशय विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणूनही ते ओळखले गेले. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठात ‘संदेश’कार कोल्हटकर शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती, पण पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई पाहून त्यांनी साऱ्या विद्यापीठाला हलवून सोडले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या बैठकींमध्ये कधी वादावादी झालीच तर तिथे एकच व्यक्ती अशी असे, की जी त्या सर्व वादावर पडदा टाकून पुढे जाणे श्रेयस्कर मानत असे. ते अर्थातच ल.ना. होते. जयंतराव टिळक, भा. गो. बापट, प्र. ल. गावडे, द. मा. मिरासदार, दा. सी. देसाई, मा. वि. साने आदींबरोबर त्यांनी काम केले. बाहेरच्या अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. पत्रकारितेबाहेर शिक्षण क्षेत्रात काम करतानाही त्यांनी पत्रकारांबरोबरचा संवाद तोडला नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थिवर्गाचे पत्ते आणि त्यांचे काम करण्याचे ठिकाण यांचीही हमखास माहिती त्यांच्याकडेच मिळत असे. संगणकयुग अवतरायचे होते, त्या काळात त्यांच्याकडे जमा होणारी ही माहितीही थक्क करून सोडणारी असे. त्याचा अनाठायी अभिमान बाळगणे हेही त्यांच्या गावी नव्हते. अलीकडे ते एका पुस्तकाच्या लेखनात गुंतले होते, त्याचे काम चालू होते, तोपर्यंत त्यांच्या तब्येतीने उमेद बाळगली होती. पुस्तकाचे काम संपत आले तेव्हा त्यांनी पडद्याआड जायचे ठरवले होते की काय, हे न कळे, पण झाले तरी तसेच! त्यांच्या निधनाने मात्र एका अतिशय चिकित्सक वृत्तीच्या सुसंस्कृत पत्रकारास आपण मुकलो आहोत.

  • प्रियंवदा म्हडाळकर

    मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्ससाठी राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच झालेल्या 'सीमॅट' या परीक्षेत व्हीजेटीआयच्या प्रियंवदा म्हडाळकरने मुलींमध्ये पहिला नंबर मिळवत बाजी मारली.

    दहावीमध्ये शाळेतून पहिली...बारावीला कॉलेजमधून तिसरी...इंजिनीअरिंगला व्हीजेटीआय कॉलेजमधून चारही वर्षं पहिल्या पाचात आणि आता सीमॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) या राष्ट्रीय परीक्षेत देशभरातून मुलींमध्ये पहिली येण्याचा घसघशीत मान तिने मिळवला. व्हीजेटीआय कॉलेजमध्ये शिकणार्‍या प्रियंवदा म्हडाळकर या विद्यार्थीनीने मिळवलेलं हे सुयश आहे.

    सीमॅटच्या ४०० मार्कांच्या या परीक्षेत २८८ मार्क मिळवत प्रियंवदाने बाजी मारली. मुलींमध्ये पहिली आलेली प्रियंवदा देशातून ४३ व्या क्रमांकावर आहे. 'फेब्रुवारीमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी मी गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच तयारीला लागले होते. आयआयएमसाठी कॅटची परीक्षासुद्धा दिली होती. यानंतर आयआयएम-कोझीकोडेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सीमॅटची परीक्षा मी एक ऑप्शन म्हणून दिली होती,' असं प्रियंवदा सांगते. इंजिनीअरिंगनंतर आयआयएममधून एमबीए आणि त्यानंतर आयएएस अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. 'दोन वर्षं जॉब करून त्यानंतर पुन्हा एकदा कॅटची परीक्षा देऊन आयआयएममध्ये अॅडमिशन मिळवायची प्रयत्न मी करणार आहे. आयएएस अधिकारी बनून देशासाठी काम करत विकासामध्ये हातभार लावण्याचा माझा निर्धार आहे,' असं ती आपण कमावलेल्या यशाबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल बोलताना सांगते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • नानाजी देशमुख

    चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.