दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू' ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण नसलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी दासूंचे बालपण गेले. तिथे कुस्तीचे फड रंगत होते, तरीही निसर्गाशी जोडले राहिल्याने कविता बहरली. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या.
"आई-वडील व भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे. दासू वैद्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मराठी या विषयात एम.ए. तसेच डिप्लोमा इन ड्रामा शिक्षण घेतले. यु.जी.सी. तर्फे त्यांना रिसर्च फेलोशिप देखील मिळाली होती. तर एम.फिलसाठी 'भारत सासणे यांच्या दीर्घकथा' तर पीएच.डी.साठी 'भारत सासणे यांचे साहित्य' हे विषय निवडून सदर विषयांवर त्यांनी प्रबंध लेखन केलेले होते. काहीकाळ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. वृत्तपत्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पुरस्कृत 'शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२००९' त्यांना प्रदान करण्यात आलेला होता.
१९८७ पासून मराठीतील वाड्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने ते कविता लेखन करत आहेत. मौज, अनुष्टुभ, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची, साक्षात, ललित, अक्षर चळवळ, कवितारती, शब्दवेध, अभिधानंतर, महाराष्ट्र टाईम्स, मिळून साऱ्याजणी, शब्दालय, साधना इत्यादी अनेक वाड्मयीन अंकांमधून आजवर त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला 'तूर्तास' हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह. मान्यवर समीक्षक व रसिक वाचकांनी गौरविलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांमध्ये रा.ना.पवार प्रतिष्ठान, सोलापूरचा काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'मराठी कविता राजधानी पुरस्कार', बुलडाणा साहित्य संघाचा ना.घ.देशपांडे साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचा विशाखा पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे ललित मासिकाच्या लक्ष्यवेधी पुस्तकात व अंतर्नाद मासिकाने निवडलेल्या शंभर वर्षांतील पन्नास पुस्तकांत 'तूर्तास' या कविता संग्रहाची निवड झालेलीं आहे. दासू वैद्य यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हस्तलिखित कवितांसाठीच्या 'कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार', ललित लेखनासाठीच्या लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार, समग्र लेखनासाठीच्या कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलेले आहे. पॉप्युलर प्रकाशन प्रस्तुत 'चौघांच्या कविता' या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केलेले आहे. दासू वैद्य हे केवळ कविता लेखनच करतात असे नाही तर कवितांचा इंग्रजी, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमधून प्रभावीपणे अनुवाद देखील करतात.
दासू वैद्य यांनी बालसाहित्यामध्ये देखील आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. 'भुर्रर्र' या त्यांच्या बालकथा संग्रहाला महाराष्ट्र बालसभा, कोल्हापूरचा २००७ सालचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार मिळालेला असून 'क-कवितेचा' या बालकविता संग्रहाला सौ.शशिकला आगाशे स्मृती बालवाड्मय पुरस्कार, बुलडाणा व मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार, आजरा, जि.कोल्हापूर असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. महावीर जोंधळे यांच्या 'आसवं गाळती कासवं' या बालकादंबरीचे त्यांनी नाट्यरुपांतर करून त्याचे महाराष्ट्रात यशस्वीरीत्या व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या 'सुगम भारती' क्रमिक पाठ्यपुस्तकात 'पक्ष्यांना घर हवे' या बालनाट्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी, अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर, कविता विभागासाठी तसेच विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सवात नाटक, कविता या कला प्रकारांसाठी परीक्षक व तज्ञ म्हणून त्यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुद्रेमनी, ता.जि. बेळगांव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद देखील त्यांनी यशस्वीपणे भूषविलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, साहित्य अकादमीच्या महोत्सवांमध्ये त्याचप्रमाणे आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेकवेळा कविता वाचन करण्याची संधी त्याला लाभलेली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये व कवितांच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदविलेला आहे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत त्यांच्या 'वाळवी' या नभोनाट्याला लेखनासाठीचा पुरस्कार मिळालेला असून या नभोनाट्याचा इतर भारतीय भाषांमधून अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे.
मदुराई येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्यविभागाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावलेले आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्टीत एकांकिका स्पर्धांमधून 'एक लेखक लिहिणार आहे..' 'आम्हाला बांधायचय मंदिर..' या सारख्या एकांकिकांसाठी व 'च्यानल झीरो' या पथनाट्यासाठी लेखन, दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील दिग्दर्शनासाठी पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. एवढेच नव्हे तर साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य लेखन व सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या मरून पडलेला पांडुरंग, एकदा मी, भीती मेंदूत आरपार या सारख्या अनेक कवितांचा, 'तूर्तास' या कविता संग्रहाचा तसेच 'देता आधार का करू अंधार' या एकांकिकेचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या वाड्मयीन मुलाखती विविध अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. 'बिनधास्त' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगुळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार मिळालेला आहे. 'भेट' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी-गौरव पुरस्कार मिळालेला असून या व 'सावरखेड एक गांव' या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी म. टा. सन्मानासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. 'सोनियाचा उंबरा' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी म. टा. सन्मान पुरस्कार तर 'पदरी आलं आभाळ'च्या शीर्षक गीतासाठी लक्स सह्याद्री माणिक सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे.
'गाभ्रीचा पाऊस', 'खाली डोकं वरती पाय' तसेच 'तुकाराम', सावरखेड एक गाव अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेले आहे. ई टीव्ही, झी टीव्हीवरील 'पिंपळपान', 'टिकल ते पॉलिटिकल', 'एक होता राजा', 'आपली माणसं', 'रंग माझा वेगळा', 'घर श्रीमंताचं' इत्यादी मालिकांसाठी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तर 'लेक वाचवा' अभियानासाठी अभियानगीत लिहून सामाजिक उपक्रमांत देखील त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.
#DasuVaidya
November 26, 2021
शांताबाई शेळके या सुप्रसिद्ध मराठी कवियत्री , गीतकार आणि लघुनिबंधकार होत्या. त्यांच्या कवितांनी आणि त्यावर बनलेल्या गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.
July 28, 2017
वैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती जगासमोर आणली.
May 23, 2014
ज्येष्ठ विधिज्ज्ञ, शिवसेनेचे माजी खासदार आणि छायाचित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून अधिक शिरोडकर प्रसिद्ध आहेत. अॅड. शिरोडकर यांनी फौजदारी वकील म्हणून अनेक महत्त्वाचे खटले लढवले. पण सामान्य जनतेला ते ठाऊक झाले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वकील म्हणून. १९९२-९३ साली मुंबईत उसळलेल्या दंगलीनंतर न्या. श्रीकृष्ण चौकशी आयोग स्थापन करण्यात आला. त्यासमोर शिवसेनेची बाजू मांडण्याची जबाबदारी अॅड. शिरोडकर यांच्याकडे आली.
हायकोर्ट किंवा मग इतर कोणत्याही न्यायालयातला खटला असो अॅड. शिरोडकर युक्तिवादासाठी असणार, असे कळल्यानंतर अनेक वकील त्या न्यायालयात गर्दी करतात. कारण युक्तिवादाचा उत्तम वस्तुपाठ त्यावेळी अनुभवता येतो. शिरोडकर यांच्या युक्तिवादात अगदी सॉक्रेटिस, शेक्सपिअरपासून ते मराठी साहित्यातील केशवसुत, आचार्य अत्रे, कधी शांताबाई शेळके यांच्यापर्यंत अनेकांचे उल्लेख येतात. ही काही ठरवून केलेली पखरण नसते तर बोलण्याच्या ओघातच सारे येत असते. त्यात नाटकीपणा किंवा आविर्भाव कधीही नसतो, हे त्यांचे विशेष आहे. त्यात नर्म विनोदही असतो. केवळ मराठी साहित्याचाच नव्हे तर इंग्रजी साहित्याचाही त्यांची उत्तम अभ्यास आहे आणि काय, कुठे व केव्हा वापरावे, याची नेमकी जाणही त्यांना आहे. त्याचमुळे त्यांची कोणतीही टिप्पणी ही विषयाला धरूनच असते. त्यांच्या या हजरजबाबीपणाला ते उत्तम अभिनेते असल्याची पाश्र्वभूमीही आहे. विल्सन महाविद्यालयातून मराठी वाङ्मय (ऑनर्स) या विषयात पदवी घेतल्यानंतर वकील सुशील कवळेकर यांच्यामुळे ते वकिली व्यवसायाकडे वळले. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच त्यांचे लग्न झाले होते. नोकरी करावी की, कायद्याचा अभ्यास हा त्यांच्यासमोरील यक्षप्रश्न पत्नीने आग्रहाने सोडवलाआणि कायद्याच्या अभ्यासाकडे वळलो, असे शिरोडकर नेहमी सांगतात. फक्त वकिलीच नव्हे तर दुसरीकडे नाटय़क्षेत्रातही ते कार्यरत होते. गणेशोत्सवातील नाटकांमधून मग ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत पोहोचले. गोमंतक मराठा समाज, धी गोवा हिंदूू असोसिएशन आणि आयएनटीच्या गाजलेल्या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. ‘साक्षीदार’मध्ये त्यांनी केलेली सरकारी वकिलाची भूमिका गाजली होती. ‘झोपी गेलेला जागा झाला’चे ९८ प्रयोग झाल्यानंतर मात्र त्यांनी नाटय़क्षेत्राला रामराम केला आणि पूर्णपणे वकिलीला सुरुवात केली. अभ्यासू पिंड, हजरजबाबीपणा, उत्तम निरिक्षणशक्ती आणि दांडगे वाचन इथे कामी आले. त्यानंतर अॅड. शिरोडकर आणि यश असे समीकरण रूढ झाले. त्यांच्यातील बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे आणि नर्म विनोदाने प्रतिवादी असलेल्या वकिलांनाही त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या अभ्यासू युक्तिवादामुळे त्यांच्याबद्दल भीतीयुक्त आदरही निर्माण झाला. हे करत असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे खासदारकीही त्यांच्याकडे चालत आली. त्यावेळेस दिल्लीमध्ये शिवसेनेची भूमिका चांगल्या पद्धतीत मांडू शकणाऱ्या चांगल्या वक्त्याची गरज होती. अॅड. शिरोडकर यांच्या निमित्ताने इंग्रजीत अधिकारवाणीने बोलू शकणारा चेहरा शिवसेनेला मिळाला. हे सारे सुरू असताना त्यांच्यातील छायाचित्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. वन्यजीवचित्रण हा त्यांच्या आवडीचा विषय. भारतीयांनी निसर्गाचे रक्षण केले नाही तर पुढच्या पिढीसाठी काही उरणार नाही, हे लक्षात घेऊन वन्यजीवचित्रणाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यास सुरूवात केली. त्याच काळात संसदेच्या पर्यावरण आणि संरक्षण समित्यांवर त्यांची नेमणूक झाली. मग त्यांनी नौदलाला भरतपूर स्वच्छ करण्याच्या कामी जोडले आणि पर्यावरणविषयक कायदे अधिक कडक करण्यास सुचवले. वयाच्या ८० व्या वर्षांत पदार्पण केलेले शिरोडकर मनाने तरूणच आहेत. याही वयात त्यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर आफ्रिकेतील जंगलेही पालथी घातली आणि छायाचित्रण केले. आता पुढच्या पिढीसाठी हे सारे जपावे, एवढा एकच ध्यास त्यांना लागून राहिला आहे!
August 5, 2017
माज्या जल्माची चित्तरकथा हे मराठी लेखिका शांताबाई कांबळे यांचे आत्मकथन आहे.
December 15, 2010
मुंबई हायकोर्टासह अन्य कोर्टांमध्ये तब्बल ५६ वर्षे वकिली करणारे ख्यातनाम अॅड. चित्तरंजन रामचंद ऊर्फ सी. आर. दळवी यांच्या वकिलीचा प्रारंभ ज्येष्ठ अॅड. व्ही. एम. तारकुंडे यांच्याकडे झाला.
June 4, 2011
मराठीतील थोर वाचस्पती, अध्यापक तसंच संगीत विषयाचे जाणकार अशी ख्याती असलेले अरविंद मंगरूळकर हे “कालिदासाचे मेघदूत”, “नीतिशतक” , “मराठी घटना रचना आणि परंपरा” अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादक देखील होते. “सातवाहन राज्याच्या शेफालिका” चा गद्यानुवादाचे श्रेय अरविंद मंगरूळकराना जाते.
सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवातील संगीतकारांची पर्वणी हा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा होता. नेमक्या व चपखल भाषातील वृत्तपत्रांतलं त्यांचं विवेचन आणि समालोचन खुपच गाजलं .
मराठी विश्वकोशात संस्कृत व संगीत या विषयांना मध्यवर्ती ठेवून अरविंद मंगरूळकरांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
(१९१८-१९९०)
काही काळ संघाचे पुर्ण वेळ प्रचारक म्हणून काम केलेल्या देवलांनी म्हैसाळ ‘जिल्हा सांगली‘ येथे अस्पृश्यांच्या पुनर्वसनासाठी मोलाचे काम केले. श्री विठ्ठल संयुक्त सहकारी शेती संस्था स्थापन करून दलितांच्या शेतीला उत्तेजन दिले. त्यांची कर्जापासून सुटका केली व त्यांना स्वयंपुर्ण बनविले शासनाने त्यांना दलित मित्र पुरस्काराने गौरवले.
March 11, 2015
रंग व रंगलेपन हा त्यांच्या चित्रातील प्रमुख घटक राहिला. ‘रोलर‘ किंवा ‘पेंटिग नाइफ‘चा वापर करणार्या गायतोंडेनी मात्र तंत्राला अती महत्व दिलं नाही. रंगांचाही ते मर्यादित वापर करीत. रंग विलेपनातून पृष्ठभागावर विविध प्रस्तर निर्माण करुन अवकाशाच्या विविध खोलींचा भास निर्माण करणं, हे त्यांच्या चित्रकृतीचं ठळक वैशिष्टय ठरलं.
March 11, 2015
स्वातंत्र्यसैनिक सौ. कुमुद नाचणे ही ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर कै. बाळासाहेब गुप्ते ह्यांची कन्या. त्यांनी समाजवादी महिला सभेचे काम पुष्कळ वर्षे केले
June 1, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti