(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अभिनेत्री स्मिता पाटील

    रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.

    स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली मुलगी होती. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. 'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यार स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या.

    वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मास्को, न्यूर्यॉक , फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : ग्लोबल मराठी

      November 4, 2017


  • अभिनेत्री रीना रॉय

    रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबई येथे झाला. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या केवळ १३ व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला मात्र तिने यासाठी कधीही आपल्या परिवाराला दोष दिला नाही वा आपण कुटुंबाच्या चरितार्थासाठी हे काम करतोय याची कबुली दिली नाही. ती एक जबाबदार मुलगी होती, प्रेमळ बहिण होती मात्र ती व्यवहारी तरुणी खचितच नव्हती !रॉय यांनी स्टुडीओचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि सौदर्य बी.आर.इशारांनी बरोबर हेरले. मात्र रीना रॉय यांची सुरुवात फारच वाईट झाली. बी.आर. इशारांनी त्यांना एकदम दोन चित्रपटासाठी साईन केले होते. त्यांचा ‘नई दुनिया नए लोग’ हा सिनेमा आधी फ्लोअरवर गेला, त्यात रीना रॉय यांचा नायक होता डेनि डेन्ग्झोपा! या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता, सारे युनिट बेंगलोरजवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता. रेल्वे दिवसातून एकदाच तिथून जायची.त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दुसरा दिवस उजडायचा. दोनेक दिवस असेच गेले, तिसऱ्या दिवशी बी.आर.इशारा वैतागले ते म्हणाले आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही तेंव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील. रीना रॉय यांचे वय तेंव्हा फक्त १४ वर्षांचे होते ! मात्र इथे ती परत संवाद विसरली, रेल्वे आणि निघून गेली. सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन सिनेमाही डब्यात गेला. हा सिनेमा रिलीज झालाच नाही. त्या दिवशी रीना मात्र हमसून हमसून रडली. तिने पुन्हा असं चुकायचे नाही हा निश्चय मनोमनी केला तो थेट वर दिलेल्या ‘आशा’तल्या प्रसंगापर्यंत पाळला ! याच बी.आर.इशारा यांचा १९७३ मध्ये आलेला ‘जरुरत’ या सिनेमात असेच दृश्य होते ज्यात अस्ताला जाणारया सूर्याचे दृश्य सीनच्या पार्श्वभूमीला होते. या सिनेमात तिचा नायक होता तरणाबांड देखणा (पण ठोकळा) नायक विजय अरोरा ! इथे तिने सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची गाडी रांकेला लागली. पडद्यावर आलेला ‘जरुरत’ हा रीनाचा पहिला सिनेमा ठरला होता. या सिनेमातील बोल्ड दृश्यामुळे नंतर रीना ‘जरुरत गर्ल’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. जरुरतमुळे तिच्या नावापुढे रॉय कायमचे चिकटले. राजपूत रीनाचे बंगालीकरण झाले, मात्र तिने तेच नाव रिअल लाईफमध्येही धारण केले कारण तिला तिच्या बालपणीच्या कटू आठवणी विसरायच्या असाव्यात….

    रीनाच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे, रीनाला ते पटत नसे. आशा पारेख आणि माला सिन्हा नंबर रेसमध्ये कधीही वर जाऊ शकल्या नाहीत मात्र त्यांची शिडी वापरून अनेक ठोकळे अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे रीनाला त्यांच्यासोबत आपली तुलना मान्य नसे. खरे तर लुक आणि गेटअपची जाण तिला रेखाने करून दिली. तिचा कपाळावरचा केसांचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर कसा करायचा याचे धडे तिला रेखाने दिले. मात्र रीनाला स्वतःची इमेज आणि करीअर यांची गंभीरता सुरुवातीला नव्हती, केवळ अर्थार्जन ह्या हेतूने तिने बी आणि सी ग्रेडचे ढीगभर सिनेमे तिने केले. या काळात ओ.पी. रल्हान सारखा जाणता निर्माता दिग्दर्शक तिच्या सौंदर्याला भूलला होता आणि तिच्या सोबत खेटे मारत होता.तेंव्हा त्यांचा राजेंद्रकुमार अभिनित ‘तलाश’ तिकीटबारीवर सुपरहिट झाला होता. पण रीनाला लफडेबाजीत रस नव्हता. तिला शोध होता आयुष्याच्या जोडीदाराचा….

    रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. ‘मिलाप’, ‘जंगल में मंगल’ आणि ‘उम्रकैद’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. मात्र १९७६ साली रिलीज झालेल्या राजकुमार कोहलीच्या ‘नागिन’ या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागीन नंतर कोहलीने तिला ‘जानी दुश्मन’, ‘मुकाबला’, ‘बदले की आग’ आणि ‘राजतिलक’ या मल्टीस्टारकास्ट सिनेमात रिपीट केले. राजकुमार कोहली आणि रीनाचे हे कॉम्बिनेशन हिट ठरले.

    त्यानंतर जे. ओमप्रकाशच्या १९७७ मध्ये आलेल्या ‘अपनापन’ या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देखील तिला ‘आशा’ व ‘अर्पण’ मध्ये रिपीट केले. १९८० मध्ये आलेल्या ‘आशा’साठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिन, कालिचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्म काटा, सौ दिन सास के, आदमी खिलौना है, हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत. रीनाची पडद्यावरची जोडी शत्रुघ्नखालोखाल सुनील दत्त आणि जितेंद्रसोबत जास्त जमली. राजेशखन्ना आणि अमिताभसोबत मेन रोलमध्ये तिचे सिनेमे कमी आले त्यामुळे नंबर गेममध्ये ती मागे राहिली. त्या उलट रेखा आणि हेमामालिनी यांचे चित्रपट अमिताभ, राजेश आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जास्त आले आणि तितकेच हिट झाले. पण तरीही रीना त्यांच्या पुढे टिकून होती, ती केवळ तिच्या वेगळ्या आयडेंटीटीमुळे ! आज सोनाक्षीदेखील स्पर्धेत टिकून आहे ते केवळ इंतर अभिनेत्रीपेक्षा तिच्यात असणारया वेगळेपणामुळे. हाही एक योगायोग म्हणावा लागेल.

    बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. १९७५ मध्ये रीनाचा सुनीलदत्तसोबतचा ‘जख्मी’ हिट झाला तर याच वर्षीच्या सुभाष घईच्या ‘कालीचरण’ने एकाच वेळी अनेकांना जीवदान दिले. यात स्वतः सुभाष घई, शत्रुघ्न, रीना आणि अजित यांना संजीवनी मिळाली. कालीचरण हिट झाल्याने घईंनी १९७८ मध्ये रीना -शत्रुघ्न यांची सुपरहिट ठरलेली जोडी रिपीट केली आणि गॉसिपला ऊत आला. दरम्यानच्या काळात रीनाचे जितेंद्रसोबतचे ‘प्यासा-सावन’, ‘बदलते रिश्ते’, हिट झाले होते. ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’मध्येही तिचा नायक जितेंद्र होता मात्र रीनाने शत्रू वगळता आपले नाव कोणाबरोबर जोडले जाणार नाही याची काळजी घेतली. जितु आणि सुनीलदत्त दोघेही विवाहित होते त्यामुळे तिचे काम अधिक सुकर झाले. याच काळात विवाहित असलेल्या धर्मेंद्र आणि हेमाचा रोमान्स रंगात आला होता, तरअमिताभ विवाहित असूनही रेखाने त्याच्या आयुष्यात पुन्हा एन्ट्री घेतली होती. जुलै १९८० मध्ये रीना लंडनला असताना शत्रुघ्नने रीनाला वाऱ्यावर सोडले आणि पूनमबरोबर लग्न करुन सगळ्यांना चकित केले. याच दिवसात धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमाशी लग्न केले. शत्रुघ्नच्या लग्नाची बातमी रीनाला मोठा धक्का देणारी होती. इतकेच नाही तर मुंबईला परतल्यानंतर रीनाने म्हटले होते, की माझ्या गैरहजेरीत शत्रुघ्नला लग्न करण्याची काय गरज होती ? ती बरेच वर्ष शत्रुघ्न यांच्यावर नाराज होती. मात्र शत्रुघ्नने ‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ या त्याच्या बायोपिक पुस्तकात विवाहोत्तर काळात देखील तो रीनाला भेटत असल्याचा उल्लेख करून तिच्याशी अफेअर असल्याची मनमोकळी कबुली दिली आहे.

    बॉलिवूडमध्ये ज्यावेळी रीना रॉयचे करिअर यशस्वी होते, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हासोबत चालू होते. जेव्हा रीनाला दोघांच्या लग्नाविषयी माहित झाले तेव्हा ती भडकली आणि तिने भारतात येऊन शत्रुघ्न सिन्हाला याचे उत्तर मागितले होते. लग्नानंतर अनेक वर्षे ते रीना रॉयला भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत का झाला याचे उत्तर या पुस्तकात देणे शत्रुघ्नने टाळले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिच्या इंग्लंड दौऱ्याच्यावेळेस ओळख झाली होती, मात्र तिने बारकाईने विचार न करता त्याच्याशी १९८३ मध्ये निकाह लावला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले अन तीही संपली. तिला चुकीची जाणीव होऊ लागल्यावर रुपेरी पडदा पुन्हा खुणावू लागला.मात्र मोहसीनचे लोढणे तिच्या गळ्यात पडले त्याला घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. यापाई मोहसीनखानला त्याच्या ९ वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावे लागले.

    १९९२ ते १९९७ या पाच वर्षात त्याला तेरा चित्रपट मिळाले मात्र ऐकही सिनेमा चालला नाही. शेवटी त्याने रीनासह गाशा गुंडाळला आणि तो परत पाकिस्तानला गेला. या काळात जे.ओमप्रकाशनी तिला पुन्हा हात दिला आणि त्यांचा ‘आदमी खिलौना है’ने तिची थोडीफार पत राखली, या व्यतिरिक्त तिने केलेले या ५ वर्षातले सर्व दहाही चित्रपट दणकून पडले. या दरम्यान तिचे आणि मोहसीनचे खटके उडू लागले. तिने पाकिस्तानात गेल्यावर त्याच्याशी तलाक घेतला. मात्र तिला तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची ‘सनम’ची कस्टडी मिळाली नाही. सैरभैर झालेली रीना आईकडे परत आली आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये रिएन्ट्रीसाठी ती प्रयत्न करू लागली. अजय देवगणच्या ‘गैर’ आणि अभिषेक बच्चनच्या ‘रीफ्युजी’त तिला भूमिका मिळाल्या आणि तिच्या पदरात आणखी सिनेमे पडणार असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने उचल खाल्ली. तिने मोहसीनला परत संपर्क केला, त्यानेही तिच्याशी तलाक नंतर दुसरा निकाह लावला नव्हता.

    रीनाने आपल्या मुलीवरच्या प्रेमापायी मोहसिनबरोबर कराची येथे पुन्हा एकदा निकाह केला आणि तिच्यातली आई सुखावली. मात्र आईच्या ममतेमुळे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पुन्हा अन्याय झाला….यानंतर मोहसीन आणि रीनाने आपले संबंध न ताणता एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मात्र आपले नाते न तोडता त्यांनी हा निर्णय घेतला.

    रीना आपल्या मुलीला घेऊन भारतात परत आली तर तिकडे पाकिस्तानमध्ये मोहसीन अजूनही एकटाच आहे. आपल्या टीनएजमध्ये कुटुंबासाठी जगलेली रीना तिच्या तारुण्यात शत्रुघ्नसाठी जगली, तो तिच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिने जणू काही स्वतःवर सूड उगवावा तसा निर्णय घेतला आणि आपल्या शानदार करिअरचे मातेरे केले.तिथून पुढे ती पूर्ण सावरल्यासारखी कधी वाटलीच नाही. ती दमदार पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिच्यातल्या ‘आई’ने तिच्यातल्या हीरोईनवर मात केली. सुखाचा काठोकाठ भरलेला प्याला तिच्या ओठी कधी आलाच नाही. संघर्ष मात्र अविरतपणे तिच्या नशिबी आला आणि तो ती करत राहिली.

    रीना रॉय यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=3GEFsCLf-vA

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ समीर गायकवाड

      January 7, 2019


  • मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट आणि नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते

    मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट आणि नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म २४ सप्टेंबर १८८९ रोजी झाला.

    दाते अवघे पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील मरण पावले. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यानंतर चरितार्थासाठी केशवरावांनी मुंबई गाठली व तेथे सुरुवातीला त्यांनी कंपाऊंडर म्हणून काम केले. त्या काळात महाराष्ट्र नाटक मंडळींची काही नाटके पाहिल्यानंतर नट होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. एका हौशी नाट्यसंस्थेच्या झुंजारराव नाटकातील सारजेची भूमिका हीच केशवरावांची पहिली भूमिका. पुढे एका हितचिंतकाच्या मध्यस्थीने त्यांनी २० मे १९०७ रोजी महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश केला.

    कीचकवध हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक महाराष्ट्र नाटक मंडळीच्या रंगभूमीवर २२ फेब्रुवारी १९०७ रोजी आले; तेव्हापासून त्या नाटकाचा व त्या नाटकातील गणपतराव भागवत यांच्या कीचकाच्या भूमिकेचा अतिशय बोलबाला झाला होता. कीचकाची पत्नी रत्नप्रभा, हिची भूमिका करण्याची संधी केशवरावांना लाभली (१९०८). त्यामुळे त्यांना भागवतांच्या अभिनयकौशल्याचे अगदी जवळून दर्शन घडले. कोणत्याही भूमिकेचा कसा आणि किती विचार केला पाहिजे, नटाच्या जीवनात शिस्तीची आणि चारित्र्याची किती गरज असते आणि नटाने प्रत्येक भूमिका रंगभूमीवर कशी जगली पाहिजे, याचे शिक्षण केशवरावांना भागवतांच्या सान्निध्यात मिळाले. महाराष्ट्र नाटक मंडळीचे मालक ⇨ त्र्यंबकराव कारखानीस आणि नाटककार खाडिलकर या दोघांना केशवराव गुरूस्थानी मानत.

    महाराष्ट्र नाटक मंडळीच्या नाटकांत केशवरावांनी काही स्त्रीभूमिका केल्यानंतर ते नायकाच्या भूमिका करू लागले. प्रेमसंन्यास नाटकातील जयंत (१९१२), सत्वपरीक्षा नाटकातील हरिश्चंद्र (१९१४), पुण्यप्रभाव नाटकातील वृंदावन (१९१६) आणि विचित्रलीला नाटकातील विचित्र (१९१६) या त्यांपैकी काही ठळक भूमिका होत. केशवरावांचा विवाह रमाबाई यांच्याबरोबर १९१७ साली झाला. रमाबाईंची सोबत केशवरावांना ३० जानेवारी १९६८ पर्यंत लाभली. आपल्या सुखी आणि नेटक्या संसाराचे सारे श्रेय केशवराव रमाबाईंना देत असत. महाराष्ट्र नाटक मंडळीचे १९१९ साली केशवराव एक भागीदारमालक झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बेबंदशाही नाटकातील गणोजी शिर्के (१९२४), खडाष्टक नाटकातील कवीश्वर (१९२७) व सवतीमत्सर नाटकातील राम (१९२७) या भूमिका उत्कृष्ट रीतीने केल्या. महाराष्ट्र नाटक मंडळीच्या भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर १९२० ते १९३४ या काळात केशवरावांनी समर्थ नाटक मंडळी व नाट्यमन्वंतर या संस्थांच्या नाटकांत भूमिका केल्या. समर्थ नाटक मंडळीच्या आग्र्याहून सुटका या नाटकातील औरंगजेब (१९३०) आणि नाट्यमन्वंतराच्या आंधळ्यांची शाळा या नाटकातील मनोहर (१९३३) या भूमिका त्यांनी गाजविल्या. केशवराव हे उत्कृष्ट नाट्यशिक्षकही होते. नट आणि नाट्यशिक्षक अशा दोन्ही भूमिका करून त्यांनी नाट्यमन्वंतर या प्रयोगशील नाट्यसंस्थेला कलात्मक यश आणि व्यावसायिक प्रतिष्ठा मिळवून दिली.

    बोलपटांच्या आगमनानंतर केशवरावांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. प्रभात फिल्म कंपनीच्या अमृतमंथन (१९३५), कुंकू (१९३७) आणि शेजारी (१९४१) या चित्रपटांत तसेच ⇨ बाबूराव पेंटर यांच्या शालिनी सिनेटोन निर्मित सावकारी पाश (१९३६) या चित्रपटात त्यांनी प्रभावी भूमिका केल्या. सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक व्हि. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरात शांताराम यांचे सहकारी आणि सल्लागार या नात्याने केशवराव यांनी १९४२ ते १०६७ या काळात अतिशय मोलाची कामगिरी केली. राजकमलच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटातील त्यांची भूमिका बरीच लोकप्रिय झाली होती.

    केशवराव चित्रपटसृष्टीत रंगले होते. तरी त्यांचे मन मात्र रंगभूमीवरच गुंतलेले असे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या भाऊबंदकी नाटकाला भारताच्या राजधानीत पहिले पारितोषिक मिळाले (१९५४); त्याचे दिग्दर्शन केशवरावांनीच केले होते. संघाच्या सवाई माधवराव यांचा मृत्यू या नाटकात केशवशास्त्र्यांची भूमिका करून (१९४६–६३) केशवरावांनी त्या समर्थ शोकांतिकेला जिवंत केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या मंगलदिनी (१ मे १९६०) राजकमल कलामंदिराच्या नाट्य शाखेने केलेल्या शिवसंभव नाटकाचा प्रयोग प्रत्यक्ष शिवनेरी येथे करण्यात आला; त्या प्रयोगाचे दिग्दर्शक केशवराव होते. रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना १९६४ साली संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपतिपदक मिळाले.

    ‘नोच्यार्थो विफलोऽपि दूषणपदम्‌ दूष्यस्तु कामो लघु:|’ हे महाराष्ट्र नाटक मंडळींचे ब्रीदवाक्य होते आणि केशवरावांच्या जीवनाचेही तेच सारसर्वस्व होते. मा.केशवराव दाते यांचे १३ सप्टेंबर १९७१ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.मराठी विश्वकोष, इंटरनेट / जोग वि. वा. संपा. नटश्रेष्ठ केशवराव दाते, मुंबई, १९७६.

      September 13, 2017


  • दिलखुलास – प्रवीण दवणे

    प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते…

    पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून ओळख मिळवलेले आणि कुसुमाग्रजांची एक वेगळीच जवळीक लाभलेला तसंच त्यांच्या नवनवीन कविता खुद्द ज्यांनी त्यांना वाचून दाखवल्या तो भाग्यवान साहित्यिक म्हणजे प्रवीण दवणे.

    ते साहित्य क्षेत्रात येण्यासाठीचा टर्निंग पॉइंट ठरला तो त्यांच्या शाळेत साजरा केला गेलेला शिक्षक दिन. डोंबिवलीतील स. वा. जोशी हायस्कूलला अकरावीला असताना त्यांनी शिक्षक दिनानिमित्त दहावीच्या वर्गासाठी मराठीचा तास घेतला होता. त्यांच्या शिकवणीचं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भरभरून कौतुक केलं आणि इथेच त्यांना त्यांच्यात लपलेल्या सुप्त गुणांची वेगळी अशी ओळख झाली. त्यांनी मराठीचा ध्यासच घेतला आणि पुढे साहित्याचा वसाच जपण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं.

    बघता बघता त्यांच्या लिखाणाला गती आली आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ‘मंथन’ ही पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या लिखाणानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘दिलखुलास’, ‘परीसस्पर्श’, ‘प्रकाशाची अक्षरे’, ‘रे जीवना!’, ‘सावर रे’, ‘शब्दमल्हार’, ‘सूर्यपूजक कुसुमाग्रज’ अशा पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण त्यांनी केलं. आर्ताचे लेणे, आनंदाचे निमित्त, भूमीचे मार्दव, दत्ताची पालखी, एक कोरी सांज असे अनेक कवितासंग्रह त्यांचे आजवर प्रसिद्ध झाले आहेत तर आई परत येते, प्रिय पप्पा अशा अनेक नाटकांसाठीचं लिखाणदेखील त्यांनी केलं आहे. सावर रे, दिलखुलास, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विजांचं हे त्यांचे कार्यक्रम आजही दर्दी रसिकांची गर्दी खेचतंय.
    मराठी साहित्यात आपला वेगळा असा ठसा उमटवलेल्या प्रवीणजींचं एक वेगळं पोर्ट्रेट मला टिपण्याची संधी मिळाली. त्यासंबंधित त्यांच्याशी बोलून मी ठरल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेलो.

    घरात शिरताचक्षणी लगेचच लक्ष वेधून घेत ते त्यांच्या यशाचा आलेख सांगणाऱया कित्येक ट्रॉफीजची केलेली आरासवजा मांडणी. शेकडो पारितोषिकांनी नटलेली ही मांडणी प्रवीणजींच्या यशाचा आलेख स्पष्ट सांगतात. अनेक सिनेमांची छायाचित्रं असलेली, नामांकित संस्थांची नावं असलेली, अनेक नामांकित आणि मानाच्या अशा पुरस्कारांनी सजलेल्या या ट्रॉफीज नुसत्या पुनः पुन्हा बघत राहाव्या अशाच. याच ट्रॉफीजच्या पुढय़ात प्रवीणजींना उभं राहण्याची मी विनंती केली आणि यशाच्या या खुल्या शिदोरीसोबत त्यांचे काही मुद्दाम ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी टिपले. कृष्णधवल छायाचित्रांनी त्यांचा हा इतिहास आणखीनच जिवंत वाटत होता. हे फोटो टिपत असतानाच माझ्या मनात एक प्रश्न डोकावत होता. प्रवीणजी त्यांचं लिखाण कुठे बरं करत असतील या प्रश्नाचं उत्तर थेट त्यांनीच मला दिलं. त्यांनी मला त्यांच्या लिखाणाच्या खोलीत नेलं.

    या खोलीत त्यांचं एक लिखाणाचं टेबल होतं. मागून मंद प्रकाश डोकावत होता, तर टेबल ज्या भिंतीला लागून ठेवलं होतं त्यावर एक बोर्ड होता. या बोर्डावर प्रवीणजींना ऊर्जा देणाऱया देवदेवतांची छायाचित्रं होती. टेबलाच्या एका बाजूला अनेक कागदं तर खिडकीवर एका कोपऱयात लिखाणाचं साहित्य आणि इतर बाबी विखुरलेल्या होत्या. हे सारं चित्र प्रवीणजींसोबत कॅमेऱयात कैद करण्यासाठी मी प्रवीणजींना त्यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि त्यांनीही लगेचच हातात लेखणी घेऊन नेमकं ते कसं लिखाण करतात त्याची एक झलकच मला दाखवली.

    गेली अनेक दशकं सतत आपल्या लिखाणातून आपला वेगळा असा आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिलेल्या साहित्यिकाचं असं पोर्ट्रेट टिपायला मिळणं हे माझ्यासाठी सोन्याहून पिवळंच असं होतं.

    प्रवीणजींचा हा फोटो माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. हा फोटो नैसर्गिक कसा वाटेल याकडे माझा कल होता आणि म्हणूनच ड्रमॅटिक लाइटिंग न करता नैसर्गिक प्रकाशात हा फोटो कसा टिपता येईल यासाठी मी झटत होतो. हा फोटो टिपताना त्यांच्या मागून खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि खोलीत असलेला प्रकाश यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मागून येणाऱया प्रकाशाचा छायाचित्रणाला त्रास होत होता.

    खिडकी बंद केली तर प्रकाशाचा स्रोत अडवला जाईल आणि फोटो नैसर्गिक येणार नाही. आणि खिडकी उघडी ठेवली तर त्यातून येणाऱया प्रकाशाचा ग्लेअर छायाचित्रात येईल अशी परिस्थिती होती. अगदी क्षणार्धात यावर तोडगा काढून या फोटोसाठी फ्लॅश म्हणजेच अनैसर्गिक लाइट वापरण्याचं मी ठरवलं. फ्लॅश लाइटची तीव्रता बाहेरून येणाऱया प्रकाशाशी मिळतीजुळती ठेवून प्रकाशयोजना केली आणि हा नैसर्गिक वाटेल असा फोटो टिपण्यात मला यश आलं. दिलखुलास साहित्यिकाचा दिलखुलास अंदाज या दिवशी मी कॅमेराबद्ध केला.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

      March 16, 2019


  • मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत

    तेजस्विनी पंडीत ही रणजित पंडित आणि जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या... तिचा जन्म २३ मे १९८६ रोजी झाला. तेजस्विनी पंडित ने 'अग बाई अरेच्चा ' मधील निगेटिव्ह शेडमधील भूमिकेतून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर सुरु झालेला तिचा प्रवास जाहिरात, चित्रपट,मालिका,नाटक अशा चारही माध्यमात सुरु आहे. भूमिका ग्लॅमरस असो कि सोज्वळ त्या भूमिकेत शिरून त्यावर आपली छाप पाडण्याचे कसब तिला उत्तम जमलंय. ‘रानभूल’, ‘गैर’ आणि ‘अगबाई अरेच्चा’ या चित्रपटांमध्ये आणि ‘कालाय तस्मै नम:, ‘एकाच या जन्मी’, ‘घर श्रीमंताचं’ अशा टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचणाऱ्या तेजस्विनी पंडीतला ‘मी सिंधूताई सपकाळ’ मधील भूमिकामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला. तेजस्विनी पंडितने एक अभिनेत्रीची उद्योजिका बनून ‘तेजाज्ञा’ नावाचा साड्यांचा ब्रँड उभा केला आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांच्या ‘तेजाज्ञा’ या ब्रॅण्ड अंतर्गत साड्या तयार करण्यात येतात. ‘एक महिला एक साडी’ अशी त्यांच्या ब्रॅण्डची टॅगलाइन आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 23, 2017


  • मराठी अभिनेत्री क्षिती जोग

    क्षिती जोगचा जन्म १ जानेवारी १९८३ रोजी झाला. क्षितीची ‘दामिनी’ आणि ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत. तर ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातल्या तिच्या अभिनयाचेही अनेकांनी कौतूक केले. नाटक, मालिका, चित्रपट यांमुळे क्षितीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे क्षिती जोगचे वडिल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 1, 2017


  • अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर

    महेश मांजरेकर यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली.

      August 17, 2017


  • बॉलीवुड अभिनेत्री दिया मिर्झा(हेंड्रिच)

    दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरूवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली. तिचा जन्म ९ डिसेंबर १९८१ रोजी हैदराबाद येथे झाला.

    याच कार्यक्रमात दियाला मिस ब्युटिफूल स्माइल, द सोनी च्वॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दियाने बॉलिवूडकडे येण्यास सुरुवात केली. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्या अपोझिट आर. माधवन बघावयास मिळाला. वास्तविक या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नाही, परंतु चित्रपटाच्या संगीताने आजही प्रेक्षकांवर मोहिनी घातलेली आहे. त्यानंतर दियाने ‘दिवानापन’ आणि सलमान खानसोबत ‘तुमको न भूल पाएंगे’ या चित्रपटांमध्ये काम केले.

    ‎सलमानने अनेक अभिनेता, अभिनेत्री आणि कम्पोजरला इंडस्ट्रीमध्ये संधी दिली आहे. त्यापैकीच एक नाव अभिनेत्री दिया मिर्झाचे आहे. दिया मिर्झाला इंडस्ट्रीत सलमानेच आणले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ‎९४२२३०१७३३
    ‎संदर्भ.इंटरेनट

      December 9, 2017


  • सीमा हर्डिकर – जगू या स्वच्छंदे परि विज्ञाने

    सीमा नुसती शेती विषयात पदवीधर झाली नाही तर विद्यापीठात पहिली आली. त्याबरोबच ती बाळासाहेब सावंत आणि सर रॉंबट अलन Robart Alan सुवर्णपदकाची मानकरी ठरली. कृषी विद्यापीठातली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कुलपती पदक प्रदान करून तिच्या यशावर सुवर्ण कळस चढवला.

      October 8, 2018


  • महान व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची पुण्यतिथी

    २६ जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन. आनंदाचा दिवस. मात्र याच दिवशी भारत एका महान व्यक्तिमत्त्वाला मुकला. महान व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची पुण्यतिथी आजच्या दिवशीच.

    भारतीय व्यंगचित्रांची ओळख असलेल्या प्रत्येक जण रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर.के. लक्ष्मण या नावानेच ओळखतो.

    सुप्रसिद्ध लेखक आर.के. नारायण यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २४ आक्टोबर १९२१ रोजी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी अनेक नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. 'हार्पर्स', 'पंच', 'ऑन पेपर', 'बॉइज', अॅ्टलांटिक', अमेरिकन मर्क्युरी', 'द मेरी मॅगझिन', स्ट्रॅन्ड मॅगझिन', अशी मासिके त्यांना तिथे पहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स येथे शिकण्यासाठी मा.लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्झ मध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नल मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे देखील तेथेच काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी 'फ्री प्रेस'ची नोकरी सोडली. त्यांनी १९५० पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली. त्यानंतर अर्धशतकभर ते 'टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये व्यंगचित्रे काढत राहिले. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्यांचे व्यंगचित्र या दैनिकात नाही असे एकदाही घडलेले नाही. मा.लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे - चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत.
    त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस ‘कॉमन मॅन’ देशभर आणि जगभर पोहोचला आहे. मा.लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की त्याचा एक पूर्णाकृती पुतळाही बनविण्यात आला आहे. पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेच्या मुख्य आवारात लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'चा ९ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्‌स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नाही. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४ मध्ये गौरवण्यात आले.
    आर.के. लक्ष्मण यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, आणि अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले. मा.आर.के. लक्ष्मण यांचे निधन २६ जानेवारी २०१५ रोजी झाले. आपल्या समूहाकडून मा.आर.के. लक्ष्मण यांना आदरांजली.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट
    मा.आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके
    आयडल अवर्स आर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८
    द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह) अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह) बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
    मा.आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.

      January 26, 2017