धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला. १९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली.
अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या ‘धर्मयुद्ध’ मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९८७ पर्यंत ‘धर्मयुग’चे ते संपादक होते. डॉ. धर्मवीर भारतींना आधुनिक हिंदी साहित्याचे अध्वर्यू मानले जाते. त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या कथांचे हिंदी अनुवादही केले. त्यांचा ‘कनुप्रिया’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील एक नवा टप्पा मानला जातो.
‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ या त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट झाले. सुमारे ५० वर्षे हिंदी साहित्य आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजविणा-या धर्मवीर भारतींची ‘अंधा युग’ ही कलाकृती अजरामर ठरली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक साहित्य पुरस्कार दिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. धर्मवीर भारती यांचे ४ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३.
संदर्भ.इंटरनेट
‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ चित्रपट
https://youtu.be/adP9erjnDQo
https://youtu.be/JS00ybwPZtw
पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पत्रकारितेतील ऑस्किर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार हा पहिल्यांदा १९१७ मध्ये देण्यात आला. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही मानला जातो. पुलित्झर पुरस्कार २१ श्रेणींमध्ये दिला जातो. प्रत्येक श्रेणीतील विजेत्याला $ 15,000 रोख दिले जातात.
ग्रॅज्युएट झालेल्या जमशेदजींना युरोप, इंग्लंड, अमेरिका येथे जाऊन आल्यावर समजलं की इंग्लंडचं वर्चस्व असलेल्या कापड उद्योगात खरंतर भारतानं मुसंडी मारली तर प्रचंड संधी उपलब्ध होतील.त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. सुरुवातीला एकवीस हजार रुपये भांडवल गुंतवून जमशेदजींनी त्यांची पहिली कंपनी स्थापन केली. पुढे काही बंद पडलेल्या तेल गिरण्या, कापड गिरण्या विकत घेऊन, विकून त्यांनी उद्योग वाढवण्यास प्रारंभ केला.
मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे, यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले. कोलकाता येथील विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काकांसारखे म्हणजेच के. सी. डे यांच्यासारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के. सी. डे हे न्यू थिएटर्समध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली.
मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के. सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. पार्श्वगायनाची सुरवात मा. मन्ना डे यांनी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस" मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली. राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात.
मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका "(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे" (चित्रपट दाम करी काम). त्याचबरोबर "घन घन माला नभी "(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बॅम्बू "हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, म्युझिक अॅtरेंजर केरसी लॉर्ड यांच्यासमवेत अनेक चित्रपटांत संतूरची साथ करणाऱ्या पं. उल्हास बापट यांनी सांगितलेल्या केरसी लॉर्ड यांच्या आठवणी.
भारतीय सिनेसंगीत क्षेत्रासाठी रविवार.. १६ ऑक्टोबरची सकाळ झाली; पण उजाडले नाही. कारण या दिवशी ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, अॅलरेंजर आणि जगन्मित्र केरसी लॉर्ड यांचे निधन झाले.
त्यांना सांगीतिक विद्वत्तेचा ‘सूर्य’ म्हणू या, की प्रत्येक कामात परफेक्शनिस्ट असलेले आणि नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहणारे, स्वत:च्या विधानावर ठाम असणारे म्हणून ‘पृथ्वी’ म्हणू या? की चंद्राच्या शीतलतेने सर्व सहकलाकारांवर, चाहत्यांवर प्रेम करणारे म्हणून त्यांना ‘चंद्र’ म्हणू या? नको.. इतके सर्व म्हणण्याऐवजी त्यांना ‘केरसीबाबा’च म्हणू या.
माझ्यासाठी ते गुरू होते. मोठे भाऊ होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सच्चे मित्र होते. आमच्या कुटुंबासाठी ते केरसीकाका होते. मी नेहमी गमतीने म्हणायचो, ‘केरसीजींची मोठी चूक म्हणजे त्यांनी मला सिने म्युझिशियन असोसिएशन (CMA) च्या ऑडिशनमध्ये पास केले ही होती.’
१९७४ ची गोष्ट. केरसीजी तेव्हा CMA चे पदाधिकारी होते. ऑडिशन कमिटीत होते. ज्येष्ठ वादक कलाकार परशुरामजी हेही केरसीजींसोबत होते. माझे नाव पुकारल्यानंतर मी संतूर घेऊन आत गेलो. सर्वाना वंदन करून मला जे येत होते ते वाजवायला सुरुवात केली. केरसीजी माझे निरीक्षण करत होते. परशुरामजी माझी उलटसुलट परीक्षा घेत होते. त्यांनी सांगितलेले सर्व म्युझिक पीसेस, अलंकार मी सहज वाजवत होतो. पहिल्या दिवसापासूनच मी बारा सूर मिळवूनच वाजवत असल्याने टय़ुनिंगमध्ये वेळ न घालवता परशुरामजींनी सांगितलेले सर्व स्वरयुक्त स्वरसमूह संतूरच्या काठय़ांतून निघत होते. त्यांना नापास करण्यासारखे काही सापडत नव्हते. तेव्हा बी ग्रुपचे ८५ रुपये व ए ग्रुपचे १०० रुपये मानधन होते. सर्वसंमतीने मला पास करण्यात आले. नवीन असल्याने बी ग्रुप द्यायचे ठरले. तेव्हा केरसीजी ठामपणे माझ्यामागे उभे राहिले. संतूरसारखे वाद्य टॅक्सीशिवाय नेणे शक्य नसल्याने आणि या वाद्याच्या वेगळेपणामुळे मला ए ग्रुपच मिळावा म्हणून त्यांनी आग्रह धरला. आणि तेव्हाच मला जाणवले- ते माझे आहेत.. तेव्हापासून मी त्यांचा झालो.
ते उत्कृष्ट ड्रम्स वाजवत. त्यांनी कॅस्ट्रोनट्स् टेंपल बेल्स, ग्लॉक्स (‘अभी ना जाओ छोड के’ गाण्यात) अशा विदेशी वाद्यांचा वापर पहिल्यांदा केला, हे सर्वपरिचित आहेच. सगळी वाद्ये वाजवणे हा त्यांच्या उजव्या हाताचा मळ असला तरी अॅिकॉर्डियन या वाद्यावर डाव्या हातानेसुद्धा त्यांचे प्रभुत्व होते. डाव्या हाताने बेलोचा वापर ते श्वासानुरूप करायचे. डाव्या बाजूला न दिसणाऱ्या छोटय़ा बटणांवर गाण्याच्या हार्मनीप्रमाणे त्यांची बोटे केवळ स्पर्शाने शिताफीने फिरत. ‘आराधना’तील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात केरसींनी वाजवलेला अॅनकॉर्डियनचा पीस पुन्हा कधी ऐकायला मिळेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.
केरसीजींच्या म्युझिक अॅ रेंजमेंटमध्ये चटकन् ओठावर येणारे गाणे म्हणजे मदनमोहन यांच्या ‘संगीत दिग्दर्शनातील ‘तुम जो मिल गये हो..’मध्ये (‘हॅंसते जख्म’) समुद्राच्या उफाळून येणाऱ्या उत्तुंग लाटांप्रमाणे केलेली व्हायोलिनची रचना ऐकून कधी कधी वाटते की, केरसीजींचे संगीत ऐकून समुद्रही आनंदाने उफाळून लाटारूपी स्वरतुषार आपल्या अंगावर शिडकावतो आहे! त्यांच्या व्हायोलिनचे पीसेस लाटांसारखे असले तरी त्यांनी कोणाचेच संगीत कधी लाटले नाही.
ते संगीताचे ‘लॉर्ड’ होते हे सिद्ध करणारा सिनेमा म्हणजे ‘साथी’! नौशादजींचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे अॅररेंजर केरसीजी होते. यातली गाणी नौशादसाहेबांच्या नेहमीच्या स्टाईलपेक्षा वेगळी आहेत. विशेषत: ‘मेरे जीवनसाथी’च्या वेळी केलेला वेगळ्या पीसेसचा वापर, त्याहीपेक्षा ‘हुस्न जाना इधर आ..’ या गाण्यातले गिटारचे दोन स्ट्रोक एका वेगळ्याच हार्मनीचा वापर हिंदी संगीतसृष्टीला बहाल करून गेला. ‘ऑगमेंटेड’ हार्मनीचा वापर गाण्यात यापूर्वी अन् यानंतरही कधी झालेला नाही. असे ऐकले की, पं. हृदयनाथ मंगेशकरांनीही हे गाणे ऐकल्यावर केरसीजींना फोन करून कौतुक केले होते.
‘शालीमार’ चित्रपटाचे केरसीजींनी केलेले टायटल म्युझिक संगीत क्षेत्राला कोंदण देऊन गेले. अकरा मात्रांत रचलेला पीस भल्याभल्यांची झोप उडवून गेला. त्यातला इलेक्ट्रिक गिटारचा पीस, बाकी वाद्यवृंद अॅेरेंजमेंट आणि त्यात अकरा मात्रा.. मोजता मोजता काय होते, ते सभ्य भाषेत सांगणे कठीण आहे!
पंचमदांचे (आर. डी. बर्मन) ते उजवा हात होते. तसे पंचमदांना बासुदा, मनोहरीदा, मारुतीराव कीर आणि केरसीजी असे चार उजवे हात होते. जसे केरसीजींनी सिंथेसाइझर पहिल्यांदा या क्षेत्रात आणला तसे एकोलाईट मशीनही त्यांनी प्रथम वापरले. म्हणूनच पंचमच्या गाण्यात ‘पंचम पंचम पंचम’ अशा प्रकारचे प्रतिध्वनी येऊ शकले. केरसीजींशिवाय पंचमदांचे रेकॉर्डिग म्हणजे तारांशिवाय पियानो. बदलत्या काळाबरोबर ते स्वत:ला नेहमी ‘अपडेटेड’ ठेवायचे. सिंथेसाइझर असो किंवा कॅमेरा असो, कम्प्युटर असो वा कोणतेही आधुनिक उपकण असो, जगात कोठेही निर्माण झालेली वस्तू दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे असायची. आजच्या तरुणांनाही लाजवील अशी तल्लख बुद्धी त्यांची होती.
वेस्टर्न म्युझिकचे उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या केरसीजी यशस्वी कंडक्टर म्हणून ओळखले जात. उजव्या हातातल्या काठीने कंडक्ट करताना वादकांना त्यांनी योग्य जागी बसवलं, त्यांच्याकडून हवं ते वाजवून घेतलं आणि संगीत खुलवलं. पाश्चात्य संगीताचा गाढा अभ्यास असल्यामुळे भलामोठा वाद्यवृंद असो, टिंफनी असो, ड्रमसेट असो, फ्ल्यूट असो, पियानो असो; सर्वाना काठीच्या एका इशाऱ्यावर त्यांनी एकत्रित वाजवून घेतलं. त्यांचं स्टाफ नोटेशन लेखन अतिशय सुरेख असल्याने अन् ‘व्हाईसिंग’ (प्रत्येक वाद्यसमूहाचे योग्य संतुलन) योग्य असल्याने सर्व विभागांवर त्यांचे वर्चस्व होते. अंगात मूळचाच ताल असल्याने, त्यातही त्यांचे तबल्याचे शिक्षणही खाँसाहेब इनामअली यांच्याकडे शास्त्रोक्त झाल्यामुळे केरसीजींच्या प्रत्येक रचनेला तालाची, त्याच्या विशिष्ट ‘खंडा’ची झालर असायची.
माझ्यातल्या कलेला वेगळ्या उंचीवर नेणारा एक प्रसंग आठवतो. ‘टच डाऊन’ नावाची एअर इंडियाची एक डॉक्युमेंटरी होती. त्याचा रिलीज जगभर होता. त्याचे पाश्र्वसंगीत केरसीजींनी केले होते. ८०-९० वादक होते. व्हायोलिन, व्हिओला, चेलो, डबल बेस.. सर्व वाद्यं होती. त्याव्यतिरिक्त ब्रास सेक्शन, ट्रंपेट, सेक्सोफोन वगैरे, सिल्वर फ्लूट, ड्रम, तबला, ढोलक.. साधारण पूर्ण सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. भारतीय वाद्यांत सितार, संतूर होते. निर्माता हैद्राबादचा रईस होता. सर्व वादकांची यादी पाहिल्यावर तो चकित झाला. संतूरला माझे नाव पाहून तो थबकला. (तेव्हा माझे नावही नव्हते अन् आडनावही झाले नव्हते.) त्यांनी केरसीजींना विचारणा केली. ‘‘यह कौन नया लडका है? आप पैसे की चिंता मत करो. जो भी चाहे वो बडे कलाकार को बुलाओ.’’
केरसीजी म्हणाले, ‘नहीं. मेरा काम उल्हास ही करेगा.’ त्या निर्मात्याला हे चांगलेच झोंबले. केरसीजींनी त्याच्या बोलण्याकडे दूर्लक्ष केलं. फक्त ते निर्मात्याला एवढंच म्हणाले, ‘रेकॉर्डिग के दिन आना और सुनना. बाद मे कहना.’ त्याकाळी ट्रॅक सिस्टीम किंवा डबिंग सिस्टीम नव्हती.
शेवटी तो रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. पहिलाच पीस मला वाजवायचा होता. सर्व वाद्यवृंदाला आपापले पार्ट दिलेले होते. मला दिलेला पीस साधारण आपल्या जोग रागावर आधारीत होता. सुरुवातीला तो पांढरी दोनमध्ये होता. नंतर इतर वाद्यांच्या वेगवेगळ्या हार्मनीनंतर टायटलच्या शेवटी तोच पीस आता पांढरी एकमध्ये वाजवायचा होता.
टेक सुरू झाला. सुरवातीला ४-४ च्या तालात मला ५ चा तुकडा वाजवायचा होता. येथे केरसीजी पुन्हा दिसले! पांढरी दोनमध्ये सुरू झालेला पीस संपूर्ण वाद्यमेळानंतर पांढरी एकमध्ये वाजवायचा होता. गुरुजनांच्या कृपेने पहिलाच टेक ओके झाला. केरसीजींनी निर्मात्याला जवळ बोलावले अन् म्हटले,
‘‘एक ही टाइम में पहले सफेद दो और आखिर में सफेद एक मे पीस बजाना था. ये काम सिर्फ उल्हास क्रोमेटिक पद्धतीसे बजाता है. उस में ही यह मुमकीन है. और कोई नहीं बजा सकता है, इसलिये उल्हास को ही संतूर के लिये बुलाया.’’ माझ्याकरता ही घटना पुरस्कारासारखीच होती.
त्यांना चविष्ट खाण्याची आवड होती. ते कधी कधी सर्वासाठी पेडर रोडला कुठून तरी चिकन कटलेट आणि बुरून पाव मागवायचे. त्यांना खाण्यात.. तेही वाटून खाण्यात जास्त समाधान मिळायचे. लॅमिंग्टन रोडला ‘लीलाधर’मध्ये भेजाफ्राय खाणे त्यांना खूप आवडायचे. ‘लीलाधर’मध्ये गेल्या गेल्या वेटरला सूचना असे- ‘मेरे लिये भेजा फ्राय जास्ती रख देना. खतम नहीं होना चाहिये!’
‘महान’ सिनेमाच्या पाश्र्वसंगीतासाठी आम्ही चेन्नईला प्रसाद स्टुडिओत पंधरा दिवस गेलो होतो. ते पंधरा दिवस अत्यंत बहारदार होते. मला कॅरेमल कस्टर्ड खूप आवडतं. कोणत्याही हॉटेलात गेलं की मी प्रथम विचारायचो, ‘कॅरेमल कस्टर्ड है ना?’ एकदा केरसीजी इतके वैतागले! ‘अरे, पहले खाना क्या है वो सोच. पहले कस्टर्ड क्यों?’ त्या दौऱ्यात माझे नाव त्यांनी ‘केके’च ठेवलं होतं.
..अचानक फोनची बेल वाजली आणि मी गतकाळातून खाडकन् भानावर आलो. कानावर शब्द पडले, ‘‘हॅलो उल्हासजी, संध्याकाळी चार वाजता केरसीजींचे अंत्यदर्शन आणि अंत्यविधी आहे.’
मनात आठवणींचे काहूर माजले असतानाच आम्ही उभयता वरळीला निघालो. अत्यंत आवडत्या केरसीजींच्या अंत्यदर्शनाला! गर्दीत वाट काढत मी त्यांच्यापाशी पोहोचलो. चरणस्पर्श केला. त्या हार्मनीच्या राजाच्या चेहऱ्यावर हार नव्हती, तर सुरांना जिंकल्याचे समाधान होते. जणू तालाचा विचार करता करता आयुष्याची शेवटची सम आली होती.
त्यांच्या तिन्ही मुली झरीन, परी आणि जास्मीन तिथं उभ्या होत्या. तिघींना भेटून निघताना अश्रू आवरेनासे झाले. जास्मीन म्हणाली, ‘’uncle Don’t Cry. He has gone to a better place.’’
पं. उल्हास बापट
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पी. सी. सरकार यांचे पूर्ण नाव प्रतुलचंद्र सरकार. त्यांचा जन्म तत्कालीन बंगाल प्रांतातील (विद्यमान बांगला देश) तंगईल जिल्ह्यातील आशीकपूर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. गावातीलच शिवनाथ हायस्कूलमध्ये शिकत असतानाच जादूबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि त्यांनी गणपती चक्रवर्ती यांच्याकडून जादूविदयेचे धडे घेण्यास प्रारंभ केला; तथापि शालेय अभ्यासाकडेही दुर्लक्ष केले नाही.
जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला. निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .
सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल. बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा र्वष. मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण मा.जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.
राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्हीठ. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्द र्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.
'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत. 'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून मा.जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते. जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली. कवी गिरीश यांचे ०४ डिसेंबर १९७३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्याने १९७५ला पर्थ येथे वेस्ट इंडिज विरुद्ध १६०.६ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू होता.
कल्पवृक्ष कन्येसाठी, गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां?, लिंबलोण उतरता, जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाउस पडे सारखा, घट डोईवर, अशा एकसे एक सुंदर गाण्यांचे जनक म्हणजे नामवंत गीतकार म्हणजे कवी पी. सावळाराम. त्यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.
पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले, तेथे त्यांना तिथे शिक्षक लाभले, ते थोर कवी माधव ज्युलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन तेथेच ह्या सर्जनशील मनाच्या पी.सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती.
पी.सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. महाविद्यालयीन शिक्षण झालेले निवृत्ती पाटील, ठाणे येथे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. एच. एम.व्ही. कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी.सावळाराम यांची गट्टी जमली ती संगीतकार वसंत प्रभू ह्यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, निवृत्ती पाटील ह्या नावाने, पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते, ह्या नामसाधर्म्यातुन त्यांना बाहेर यायचे होते, त्यावेळी पी. सावळाराम ह्यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते, विधानसभेचे माजी अध्यक्ष वि. स. पागे होय. तर ह्या पागे यांना, ह. ना. आपटे ह्यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या, "उषःकाल" ह्या कादंबरीमधील "सावळ्या" ह्या व्यक्तिरेखेने भारावून टाकले होते. पागे ह्यांना, आपला मित्र निवृत्ती पाटील ह्याच्या व्यक्तिरेखेत ह्या "सावळ्या"चे साधर्म्य जाणवायचे. ते निवृत्ती पाटील ह्यांना "सावळ्या" नावाने हाकारायचे. झाले. अशा रीतीने निवृत्ती पाटील ह्यांनी आपले "पी.सावळाराम" हे नाव धारण केले.
पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने ‘पी. सावळाराम गौरवग्रंथ’ प्रकाशित केला.
पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.
‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत.
‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले.
‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti