खानदानी कविराज मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला.
शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी! त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील मा.पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे.मा. पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले, जगण्याचं बळ देणारे... 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती', अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगीतले.
ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून मा.पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.
पाडगांवकर यांनी ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे. या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.
मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं.
मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दम मारो दम', 'चुरा लिया है तुमने जो दिल को' अशा सदाबहार गीतांमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक केरसी लॉर्ड यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३५ रोजी झाला.
केरसी लॉर्ड. हिंदी चित्रपटसंगीताला सदाबहार सुरांचे चैतन्य बहाल करून अजरामर करणारे एक मनस्वी व्यक्तिमत्त्व. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक मा. कॉवस लॉर्ड हे मा.केरसी लॉर्ड यांचे वडील. "कावस लॉर्ड" हे ‘कावस काका’ म्हणून ओळखले जात. अगदी पहिला बोलपट ‘आलम आरा’पासून त्यांनी चित्रपटसृष्टीत कामं केली. ते तालवाद्यातले" पायोनिअर "मानले जात. घरात आई बानूबाईही पियानिस्ट, आईचं माहेर म्हणजेही संगीतघर. अशा संस्कारात बालपण गेलेल्या केरसीजींनी १४ व्या वर्षी संगीत हेच आपलं सर्वकाही असं ठरवलेलं होतं. ''उत्कृष्ट जॅझ ड्रमर'' म्हणून नाव मिळवल्यावर इंडियन -हिदमला अनुसरून केरसींनी आपली अशी प्लेइंग स्टाईल निर्माण केली, जी त्यांची एक वेगळा ‘ड्रमर’ म्हणून खास ओळख ठरली.शास्त्रीय तबल्याचं शिक्षण केरसींनी इनामअली खांसाहेबांकडे घेतलं होतं. मॅलेट इन्स्ट्रमेंट्समध्ये (वूलन किंवा रबरी गट्टनी वाजवलं जाणारं) व्हायब्रोफोन, झायलोफोन सोबत १९६०/६१च्या काळात ग्लॉकेन्स्पायल (ग्लॉक्स) हे वाद्य केरसींनी इंट्रोडय़ुस केलं."मिस रोडा खोडियाजींकडे" पियानो शिकायला सुरुवात केली होती. "पी. मधुकर "यांच्याकडे हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण घेतलं होतं. त्या पाठोपाठ ज्याच्याविषयी आंतरिक ओढ होती, ते पियानो अॅशकॉर्डियन वाद्य केरसींनी ‘गळय़ाशी’ घेतलं नि सातत्य व अनेक प्रयासांनंतर "निष्णात अॅ कॉर्डिनिस्ट" म्हणून स्वत:चं नाव केलं. सचिनदांच्या संगीतात ‘काला पानी’ सिनेमातल्या ‘अच्छाजी मैं हारी’ तसंच सलीलदांच्या ‘माया’मधल्या ‘तस्वीर तेरी दिल में’,आज सनम मधुर चांदनी में हम इ. गाण्यांतून केरसींचं अॅ कॉर्डियन वाजलंय. मेलडी व -हिदम दोन्हींवर प्रभुत्व असल्यामुळे दोन्ही सेन्सच्या समन्वयातून अॅरकॉर्डियनवर बीट्सच्या अंगाने बेलोच्या (भात्याच्या) टेक्निकने एक्स्प्रेशन्स देण्याचा अनोखा प्रयोग केला. पंचमही एक प्रयोगशील संगीतकार असल्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं व ते अॅपकॉर्डियनचं जॅझ स्टाईलचं जीवंत उदाहरण आहे. ‘आराधना’तलं ‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना.’ आणखी एक बर्मनदांच्याच ‘शर्मिली’मधल्या ‘मेघा छाए आधी रात बैरन बन गयी निंदिया’ गाण्यातलं अॅरकॉर्डियन. नौशाद साहेबांबरोबर केरसी लॉर्डनी शेवटपर्यंत काम केलं. त्यात ‘द स्वार्ड ऑफ टिपू सुलतान’ ही मालिकाही केली होती. सुमारे १९६७ मध्ये त्यांच्याकडे राजेंद्रकुमार व वैजयंतीमाला हिरो-हिरोईन असलेला मद्रासचा एक सिनेमा आला होता ‘साथी’! निर्मात्याला नौशादचं संगीत वेगळय़ा रंगाचं हवं होतं. केरसींकडे ‘साथी’ची गाणी अॅारेंजमेंटला आली. त्यांनी पठडीतले काही रूल्स ब्रेक करून ती अॅअरेंज केली. नौशादच्या संगीतात ‘अंदाज’च्या काळानंतर पुन्हा मुकेश आला. हा चेंज तमाम फिल्म संगीत शौकिनांनी स्वीकारला होता. एवढेच नव्हे; तर मद्रासचा ‘इलिया राजा’सारखा मातब्बर संगीतकार ‘साथी’ची अॅीरेंजमेंट एकून केरसींचा फॅन झाला होता.
१९६ ७नंतर कम्पोजर, वादक, अॅूरेंजर म्हणून सगळय़ा बडय़ा संगीतकारांबरोबर काम करता करता आणखी एक लक्षणीय काम केरसी लॉर्ड यांनी केलं आहे ते मदन मोहनसाठी. चेतन आनंदाच्या ‘हंसते जख्म.’ मधलं लताबाईंचं ‘आज सोचा तो आंसू भर आए’ हे गाणं म्हणजे दीदी आणि त्यांच्या मदनभैयाच्या स्वर्गीय स्वरांचा अमृतयोग. केरसींनी त्या गीताला अनुरूप असा आपल्या अॅारेंजमेंटचा हळुवार मोर पीस स्पर्श दिला. त्याच सिनेमाचं दुसरं सुपर हिट गाणं ‘तुम जो मिल गए हो, तो यह लगता है, के जहां मिल गया.’ हे कारमध्ये पिक्चराईझ केलंय. कारची गती आणि अँगल्स, वळणावरचे जर्कस् हे सगळं ग्रुप व्हायोलिन्स पार्ट्समधून, विंड इंस्ट्रूमेंट्स आणि -हिदमचे चेंज ओव्र्हर्स वापरून केरसींनी सजवलंय नि गाण्याइतकीच अॅधरेंजमेंटचीही उंची राखली होती. ‘देखो कसम से, कसम से’ (तुमसा नहीं देखा), वाद्य- कॅस्टेनट्स. ‘तेरी दुनिया में जिने से’ (हाऊस नं. ४४) वाद्य- अॅहकॉर्डियन, झनक झनक तोरी बाजे पायलिया (मेरे हुजूर), वाद्य- घुंगरू ‘अंधे जहां के अंधे रास्ते’ (पतिता) वाद्य- बोंगो ‘जाने क्या तूने कही’(‘प्यासा)’, वाद्य- वूडब्लॉक्स. ‘दिल लेना खेल है दिलदार का’ (‘जमाने को दिखाना है’) वाद्य- इलेक्ट्रिक ऑर्गन. यात मा. केरसी लॉर्ड यांनी केलेली वाद्यांची मनोहर कलाकुसर दिसते.तसेच जयदेव यांच्या ''हम दोनो ''चित्रपटातील त्यांचे ''लायटर म्युझिक'' केवळ अविस्मरणीय होते.
संगीत क्षेत्रात डी.डी. म्हणून संगीतरसिकांना माहीत असलेले डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचेही जनक आहे , हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल. केरसी यांनी पहिला सिंथेसायझर भारतात आणला होता. त्याची गोष्ट सांगताना मा केरसी लॉर्ड दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आलाला. या विचार येताक्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले ते दत्ता डावजेकरांचे. कारण संगीत आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान व त्यावर हुकमत असणारे डीडी एकटेच होते. त्यावेळी डीडी गिरगावात तर केरसी लॉर्ड गँट रोडला राहत. मग केरसींनी डीडींना गाठले. काय काय इलेक्ट्रॉनिक सामग्री लागेल, याची दोघांनी यादीच केली. डीडींनी ऑपेरा हाऊसच्या माकेर्टमधून सारी सामग्री आणली. डीडी कामाला लागले आणि सहाव्याच दिवशी भारतातल्या पहिल्या देशी सिंथेसायझरचा जन्म झाला. ही आगळी जन्मकथा सांगून केरसी म्हणाले की डीडींनी बनविलेला सिंथेसायझर घेऊन आम्ही ' पंचमदां ' कडे गेलो. तो सिंथेसायझर पाहून आरडी खूषच झाले. तो डीडींनी बनवला आहे , म्हटल्यावर तर त्यांनी आदराने मस्तक झुकवले. तेव्हा हे अफलातून वाद्य बनवण्यासाठी डीडींनी केवळ पाचशे रुपये खर्च केला. डीडींचा स्पर्श झालेल्या या वाद्याचा वापर नंतर त्यांनी निदान तीनशे गीतांच्या संगीतात तरी केला. डीडींनी तयार केलेला हा ३६ वर्षांपूवीर्चा सिंथेसायझर आजही केरसी लॉर्ड यांच्या संग्रहात मोलाच्या जागी आहे. आता तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची प्रचंड मांदियाळी तयार झाली आहे. त्यांचे आकार , त्यांची कार्यक्षमता आणि सर्वच प्रकारच्या संगीतात अशा वाद्यांचा होणारा वापर हे सारे आमूलाग्र बदलून गेले आहे. तरी एका महान संगीतकाराने तयार केलेले हे पहिलेवहिले वाद्य म्हणजे चित्रपटसंगीताच्या इतिहासातले पिंपळपान आहे. ते पिंपळपान केरसी लॉर्ड आजही जीवापाड जपून आहेत. डावजेकरांनी तयार केलेला हा अस्सल भारतीय सिंथेसायझर मा.केरसी लॉर्ड यांनी मोठ्या प्रेमाने जतन केला आहे. आर.डी बर्मन हे वेस्टर्न संगीताकडे आकर्षित केले हे खरे असले तरी वेस्टर्न संगीताशी आर.डी ची खरी ओळख करून दिली ती केरसी लॉर्ड यांनी. सुट्यात पंचम केरसी लॉर्डकडे जॅझ्झ, लॅटिन अमेरिकन, युरोपिअन आणि मिडल इस्टच्या रेकॉर्ड्स ऐकत असत. केरसी लॉर्ड व त्यांचे बंधू बुर्जोर लॉर्ड यांना ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ मिळाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ ६० टक्के गाण्यात कावस, केरसी व बजी या लॉर्ड फॅमिलीचं योगदान आहे. एकट्या केरसी लॉर्ड यांचीच पंधरा हजार गाणी आहेत. आपल्या परम मित्राचं पंचमचं निधन झाल्यावर केरसीनी २००० साली सिनेव्यवसायातून निवृत्ती पत्करली. केरसी लॉर्ड यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित केले गेले होते. मा.केरसी लॉर्ड यांचे १६ ऑक्टोबर २०१६ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज ७ नोव्हेंबर..आज तमिळ, हिंदी अभिनेता, पटकथालेखक व दिग्दर्शक कमल हासन यांचा वाढदिवस.
जन्म:- ७ नोव्हेंबर १९५४
कमल हासन यांनी हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. १९६० मध्ये त्यांना कलथुर कन्नामा या चित्रपटातील भूमिकेसाठी पहिला राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान करण्यात आला होता. कमल हसन यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवली. आत्ता पर्यंत कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. एक दुजे के लिये, सदमा, एक नई पहेली, चाची ४२० ही त्यांच्या चित्रपटांची काही नावे. कमल हसन यांनी आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत. ते दिग्दर्शन, निर्माते, पार्श्वगायक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. तामिळ, हिंदी, तेलुगु, मल्याळम आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानात कमल हसन यांची निवड करण्यात आली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भारतीय नाटय़सृष्टीवर सर्जनशील लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९३९ रोजी विदर्भातल्या पारवा या गावात झाला.
त्रिधारा या नाट्य प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. महेश एलकुंचवार यांचा जन्म तेलगु भाषक कुटुंबात झाला. त्यांची मातृभाषा तेलगूच. पारवा गावातच प्राथमिक शिक्षण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते नागपूरला आले. मॉरिस कॉलेजमधून बी.ए आणि नागपूर विद्यापीठातून इंग्लिश विषय घेऊन एम.एची पदवी मिळवली. कॉलेजजीवनात असताना, १९५७ ते १९६३ या काळात,त्यांनी जवळजवळ पाचशे ते सहाशे इंग्रजी चित्रपट पाहिले होते. पण विद्यार्थिदशेतच विजय तेंडुलकर यांचे "मी जिंकलो, मी हरलो', हे नाटक पाहून त्यांना नाट्य लेखनाची प्रेरणा मिळाली. व सहजपणे पाहिलेल्या नाटक या घटनेचा परिणाम होऊन एलकुंचवार नाटक या माध्यमाकडे वळले. चौफेर वाचन असलेल्या एलकुंचवार यांनी १९६७ साली "सुलताना'हे पहिले नाटक लिहिले आणि ते सत्यकथा मासिकात प्रसिद्ध होताच,नाट्य दिग्दर्शक आणि ख्यातनाम अभिनेत्री विजया मेहता यांनी रंगायन या संस्थेतर्फे ते रंगभूमीवर आणले. मानवी जीवनातली विलक्षण गुंतागुंत, पारंपरिक चालीरीतींचा प्रभाव, त्यामुळे निर्माण होणारे विविध सामाजिक प्रश्न, लोककथा,लोककलांचा सामाजिक प्रभाव, स्त्री जीवनाची मानसिक कोंडी, याचे प्रचंड चिंतन असलेल्या एलकुंचवार यांची नाटके चाकोरीबाह्य आणि नव्या विषयांवर प्रकाशझोत पाडणारी होती. पूर्ण अभ्यास आणि चिंतन केल्याशिवाय त्यांनी नाटके लिहिलेली नाहीत. त्यांच्या नाट्य लेखनात विलक्षण ताकद असल्यामुळेच त्यांच्या नाटकातली पात्रे प्रेक्षकांनाही नवा विचार देतात. १९८४ साली "होळी' या नाटकावर केतन मेहता यांनी तर गोविंद निहलानी यांनी "पार्टी' या नाटकावर हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. या दोन्ही चित्रपटांसाठी पटकथा लेखनही एलकुंचवार यांनीच केले होते.
रुद्राक्ष, झुंबर, एका म्हाताऱ्याचा मृत्यू,कैफियत, यातनाघर, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, प्रतिबिंब, धर्मपुत्र, एका नाट्याचा मृत्यू, रक्तपुष्प, यासह त्यांनी लिहिलेली तीस नाटके मराठी रंगभूमीला नवी दिशा देणारी ठरली आहेत. त्यांच्या काही नाटकांचे हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषातही अनुवाद झाले आहेत.
मराठी भाषेवर विलक्षण प्रेम आणि या भाषेचा अभिमान असलेल्या महेश एलकुंचवार यांनी मराठीतच नाट्य लेखन केले. मराठी नाटक हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव असल्याचे ते सांगतात. ‘मौनराग’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहाने मराठी ललित लेखनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, युगांत,गाबरे यासारख्या प्रसिद्ध नाटकाचे लेखन करून क्रांती घडवून आणणाऱ्या महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला राज्य सरकारने १९८७ मध्ये उत्कृष्ट नाटक म्हणून सन्मानित केले होते.‘आत्मकथा’ या त्यांच्या नाटकाला १९८९ मध्ये अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘युगांत’ या नाटकाला देण्यात आला. १९९४ मध्ये संगीत नाटक अकादमीचा २००३ मध्ये अत्यंत मानाचा असा ‘सरस्वती सन्मान’,२००४ मध्ये साहित्य अकादमीचा व २००८ मध्ये पु.ल देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा ‘पुलोत्सव सन्मान’ त्यांना मिळाला. मराठी नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सुवर्ण पदकाने त्यांचा सन्मान झाला होता.त्यांना ‘प्रिय जी. ए. सन्मान पुरस्कार,’ के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे ‘सरस्वती पुरस्कारा’साठी सन्मानित करण्यात आलेआहे. तसेच संगीत मराठी अकादमीने विशेष अभ्यासवृत्ती जाहीर करून त्यांचा गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रायाची रापी या एकांकिकेला दूरदर्शनचा पुरस्कार मिळाला. वामन तावडे यांनी आक्रन्दन , इमला, यमुना , अआई , चौकोन , माऊली , कॅम्पस (तुम्ही आम्ही) , जिप्सी , नादखुळ्या , वंदे मातरम या एकांकिका लिहिल्या.
कल्पना चावला या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होत्या. पूर्ण नाव कल्पना बनारसीलाल चावला. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी कर्नाल, हरयाणा येथे झाला. त्यांचे कुटुंब हे एक मध्यमवर्गीय भारतीय कुटुंब होते. मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक महत्त्व अशलेल्या समाजात लहानाची मोठी झाली तरही कल्पना यांनी आईच्या मदतीने नेहमी तिच्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण केले .कल्पना यांनी शालेय शिक्षण कर्नाल येथे, तर चंदिगड येथून एअरॉनॉटिकल इंजिनिअरींग पूर्ण केले. कल्पना कधीही वर्गात पहिली आली नाही, तरीही कायम पहिल्या पाचमध्ये ती असायची. नासामध्ये काम करण्याचे ध्येय ठेवूनच कल्पना १९२ मध्ये त्या अमेरिकेत गेल्या. त्याठिकाणी त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरींगमध्ये एमएससीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून त्यांनी ही पदवी मिळवली. अॅस्ट्रॉनॉट बनण्यासाठी कल्पना यांना आणखी उच्चशिक्षण घेणे गरजेचे होते. त्यामुळे १९८६ मध्ये त्यांनी आणखी एक मास्टर डीग्री मिळवली. तर १९८८ मध्ये एअरोस्पेस इंजिनिअरींग विषयात पीएचडी पूर्ण केली. नासामध्ये काम करताना कल्पना यांनी येथील रिसर्च सेंटरमध्ये ओव्हरसेट मेथड्स या क्षेत्रात उपाध्यक्षपद मिळवले होते.
नासामध्ये उपाध्यक्षपद मिळवल्यानंतर कल्पना यांना Computational fluid dynamics (CFD) श्रेत्रात संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली. शॉर्ट टेकऑफ आणि लँडींग कन्सेप्टबाबतचे हे संशोधन होते. कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी त्या सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होत्या. १९९१ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पना चावला यांनी नासामध्ये अॅस्ट्रोनॉट कॉर्प्सचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी कल्पना यांनाअनेक पुरस्कार मिळाले होते. स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टींग्वीश्ड सर्व्हीस मेडल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. प्रथम अंतराळात पाऊल ठेवल्यानंतर कल्पना चावला म्हणाल्या होत्या की, जेव्हा तुम्ही ताऱ्यांकडे किंवा आकाशगंगेकडे पाहता तेव्हा तुम्ही जमिनीच्या एखाद्या तुकड्यावरून नव्हे तर सौरगंगेतून पाहत असता.
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्यास कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अनंत काणेकर यांचा ‘ चांदरात ‘ हा काव्यसंग्रह खूप गाजला. अनंत काणेकर यांनी १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ माणूस ‘ या चित्रपटाचे संवाद लेखन केले परंतु त्याच वर्षी तो चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला ‘ आदमी ‘ ह्या नावाने याही चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले.
रघुनंदन पणशीकर यांनी आपली पहिली व्यावसायिक मैफल १९८४ मध्ये केली होती. त्या वेळी त्यांनी राग भूप सादर केला होता. सिंग बंधूंच्या ‘सूरशृंगार’ या संस्थेच्या कार्यक्रमात त्यांना पाऊण तास गाण्याची संधी मिळाली होती.
शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा.
१९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, "सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये, दोन मते कमी पडत आहेत, काहीही कर पण त्यांना निवडून आण". बहुदा मा.गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंवा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल.
शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (शरद पवार म्हणतात .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!"), त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळाराम' यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले. मा.शरद पवारांनी 'पी.सावळाराम' यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले, तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर मा.गदिमाही उपस्थित होते, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले, नगराध्यक्ष झाले. गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...
"बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."
त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पीटल साठी प्रसिद्ध होते, कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असत, त्याचा रेफरंन्स व 'येडेमच्छींद्र' हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटील' केले. "बहाद्दरा काय काम केलस!, येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....." , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वनस्पतींनाही संवेदना असतात', याची जगाला जाणीव करून देणारे महान भारतीय वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी झाला.
बोस यांचा जन्म बांगला देशातील मैमनसिंग येथे झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे फरीदापूर जिल्ह्याचे उपदंडाधिकारी होते. भारतीय संस्कृती व परंपरा पाळणाऱ्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. रामायण व महाभारत या श्रेष्ठ महाकाव्यांचे त्यांच्यावर बालपणापासून संस्कार झाले होते. ही महाकाव्ये त्यांच्या जीवनप्रणालीचे प्रेरणास्रोत होती. सातत्याने कठोर परिश्रम केल्यास अपयशाचे परिवर्तन यशामध्ये होऊ शकते, यावर त्यांची वाढ श्रद्धा होती.
कोलकाता (कलकत्ता) येथील सेंट झेविअर्स शाळेत त्यांचे प्रारंभिक शिक्षण झाले. या शाळेत बहुसंख्य विद्यार्थी ब्रिटिश व इंग्रज प्रशासकीय सेवेतील भारतीय अधिकाऱ्यांची मुले होती. जगदीशचंद्र हे ग्रामीण भागातील असल्यामुळे इतर मुले या मुलाची थट्टा व छळ करीत असत. सुरुवातीस बोस यांनी त्यांची ही मस्ती व त्रास सहन केला. परंतु या वागण्यामुळे बोस यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला, तेव्हा त्यांनी त्या शहरी मुलांपैकी एका आडदांड मुलाला चांगलेच चोपले व खाली पाडले. त्यांच्या या प्रतिकारामुळे बरेच विद्यार्थी त्यांचे मित्र बनले व त्यांना मान देऊ लागले. या प्रकारानंतर मात्र त्यांना त्रास देण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.
बोस यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथील महाविद्यालयातच झाले. नंतर वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तेथील वास्तव्यात पदार्थ विज्ञानाचे नामांकित तज्ज्ञ लॉर्ड रॅले यांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की वैद्यकशास्त्र सोडून पदार्थविज्ञानाचेच अध्ययन त्यांनी सुरू केले. त्यासाठी केंब्रिजच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. १८८५ साली त्यांनीलंडन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली. याबरोबरच सृष्टिविज्ञान विषयातील ट्रायपॉस ही पदवी मिळवून ते भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले. हे उच्च पद धारण करणारे ते पहिले भारतीय होते. या उच्च पदावर काम सुरू केल्यानंतर त्यांना समजले की, ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा आपल्याला कमी वेतन देण्यात येत आहे. या अन्यायाचा प्रतिकार म्हणून, जरी काम केले तरी पगार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
अशा प्रकारे, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवणे हा सत्याग्रहाचाच एक प्रकार होता. त्यांच्या या सत्याग्रहाचा परिणाम होऊन शासनाने शेवटी त्यांची मागणी पूर्ण केली. त्यांना थकबाकीसह पूर्ण पगार देण्यात आला. महात्मा गांधींनी भारतात येऊन सत्याग्रहाच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करता येतो याची जाणीव करून दिली होती. परंतु बोस यांनी त्यांच्याही अगोदर शांततापूर्ण मार्गाने अन्यायाच्या विरोधाचा हा प्रयोग यशस्वी केला होता.
प्रकाशाचा किरण स्फटिकातून जाताना मार्ग बदलतो, म्हणजेच त्याचे अपवर्तन (Refraction) होते. काही स्फटिकांतून दोन अपवर्तित किरणे आढळतात. या चमत्कृतीस 'दुहेरी अपवर्तन' म्हणतात. कोलकाता येथे परत आल्यानंतर बोस यांनी या दुहेरी अपवर्तनावर संशोधन सुरू केले. जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संशोधन नियतकालिकात या संदर्भातील त्यांचा पहिला शोधनिबंध प्रकाशित झाला. यानंतर त्यांनी 'विद्युत-चुंबकीय तरंग' या विषयावरील संशोधनाला सुरुवार केली. १ मिमी ते १ सेमी तरंगलांबी (Wavelength) असलेल्या विद्युत-चुंबकीय तरंगाची निर्मिती, संप्रेषण व ग्रहणक्षमता हे त्यांचे संशोधन क्षेत्र होते. त्या काळात अशा प्रकारच्या तरंगलांबीच्या क्षेत्राचे संशोधन कार्य हे अतिशय जटिल व गुंतागुंतीचे मानले जाई.
या कामासाठी त्यांना महाविद्यालयाकडून कोणतेही साधन, साहाय्य वा अन्य मदत मिळाली नाही. असे असूनही, स्थानिक मनुष्यबळाची मदत घेऊन, त्यांना मार्गदर्शन करून तीन महिन्यांत आवश्यक ती उपकरणे त्यांनी बनवून घेतली, त्यासाठी लागणारा खर्च त्यांनी स्वतः सोसला व ते संशोधनात गढून गेले. पदार्थांची अंतर्गत संरचना समजावी यासाठी प्रथमच त्यांनी सूक्ष्म तरंगांचा (Micro Waves) वापर केला व यात त्यांना यशही आले. त्यांनी बनवलेले हे उपकरण आज 'तरंग मार्गदर्शक' (wave Guide) या नावाने ओळखले जाते. लघुतरंगांच्या अर्धप्रकाशीय गुणधर्मासंबंधात. अनेक प्रयोग त्यांनी केले व इ.स. १८९५ साली या प्रयोगांच्या आधारे रेडिओ संसूचकांच्या प्रारंभिक रूप असलेल्या सुसंगतीत सुधारणा घडवून आणली. त्यामुळे स्थायू अवस्था पदार्थविज्ञानाच्या (Solid-state Physics) विकासाला चालना मिळाली.
बिनतारी संदेशवहनाच्या (Wireless Telegraphy) संशोधनाशी नाव निगडित असलेले इटलीतील प्रसिद्ध संशोधक व विद्युत अभियंते मार्कोनी यांनी या क्षेत्रात काम करण्यापूर्वीच बोस यांनी काम केले होते आणि यशही प्राप्त केले होते. इ.स. १८९५ मध्येच प्रा. बोस यांनी रेडिओ तरंग पक्क्या भिंतीतून परावर्तित करता येऊ शकतात हे जाहीरपणे प्रयोग करून दाखवून दिले. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. लंडन येथील रॉयल इन्स्टिट्युटमध्ये लॉर्ड केल्विन व अन्य वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत त्यांनी या प्रयोगाचे प्रात्यक्षिक पुन्हा दाखवले. नंतर या क्षेत्रातील प्रयोग थांबवून आपले खूप वर्षांनी मार्कोनी यांनी बिनतारी संदेशासंबंधित एकस्व अधिकार (पेटण्ट - Patent) प्राप्त केले. अनेक विदेशी ग्रंथांतून आज बिनतारी संदेश यंत्रणेचा संशोधक म्हणून मार्कोनीची प्रशंसा केली जाते; पण खरे श्रेय मात्र बोस यांनाच आहे.
इंग्रजांच्या काळात संशोधन हे भारतीय वैज्ञानिकांसाठी फारसे उमेदीचे काम नव्हते. उपकरणांची कमतरता होती, सोयी-सुविधा असलेल्या प्रयोगशाळांचा देखील अभाव होता. संदर्भसाहित्य व ग्रंथालायेही उपलब्ध नव्हती. शासनही प्रोत्साहन देत नसे. मान्यतेसाठी लंडनकडे डोळे लावून बसावे लागे. बोस यांच्या बौद्धिक क्षमतांमुळे अनेक इंग्रजी शास्त्रज्ञ प्रभावित झाले होते. लॉर्ड केल्विन व सर ऑलिव्हर लॉज यांना तर बोस यांच्याबद्दल विलक्षण आदर होता. त्यांनी असेही सुचवले होते की, बोस यांनी लंडन येथेच स्थायिक व्हावे व संशोधन करावे. परंतु स्वतःच्या देशावर प्रेम असणाऱ्या बोस यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
शतकाच्या अखेरच्या सुमारास बोस यांनी वनस्पती शारीरक्रियाशास्त्र (Plant Physiology) या विषयाच्या संशोधनावर आपले लक्ष केंद्रित केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिद्ध केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात, या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बोस यांनी कल्पक पद्धत शोधून काढली. त्यांनी हे सिध्द केले की, वनस्पतींना संवेदना असतात. माणसाप्रमाणेच सुख-दु:खाच्या प्रतिक्रिया त्या व्यक्त करू शकतात. मात्र माणून किंवा पशू यांच्याप्रमाणे आवाजाच्या माध्यमातून वनस्पती वेदना व आनंद व्यक्त करू शकत नाहीत; पण फुलून येऊन, कोमेजून वा वाळून त्या आपल्या भावना व्यक्त करतात. तसेच, अन्य सजीवांप्रमाणेच वनस्पतीही श्वासोच्छवास करतात.
१० मे, १९०१ रोजी लंडन येथील रॉयल सोसायटीचे सभागृह वैज्ञानिकांच्या उपस्थितीने गच्च भरले होते. जगदीशचंद्र बोस तेथे आपल्या एका महत्त्वपूर्ण प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर करणार होते. त्यांनी वनस्पतींची संवेदनशीलता तपासणारे 'क्रेस्कोग्राफ' या नावाचे अतिशय नाजूक उपकरण बनवले होते. ते उपकरण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असा शोध होता. एका रोपट्याला ते उपकरण जोडले होते. नंतर ते रोपटे ब्रोमाइड या विषारी द्रव्याच्या पसरट भांड्यात बुडवण्यात आले. त्यामुळे वनस्पतीच्या सूक्ष्म स्पंदनांचे प्रक्षेपण वर्धित स्वरूपात पडद्यावर दिसत होते. थोड्या वेळाने त्या रोपट्याचे स्पंदन अनियमित होत होत अचानक थांबले. रोपटे जणू काही विषाला बळी पडले होते. वातावरण आश्चर्याने स्तब्ध झाले होते.
क्रेस्कोग्राफ : वनस्पतींची वाढ नोंदवणारे व सूक्ष्मातीसूक्ष्म हालचाल कोट्यांशपटींनी वर्धित करून दाखवणारे नाजूक उपकरण. या प्रयोगामुळे वनस्पती शरीरक्रिया जाणणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना मुळीच आनंद झाला नाही. बोस हे पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ असून, विज्ञानाच्या अन्य क्षेत्रांवर त्यांनी अतिक्रमण करण्याचे धाडस केले, हे त्या शास्त्रज्ञांच्या रागामागील व आनंदित न होण्यामागील कारण होते. वनस्पती शरीरक्रिया शास्त्रातील वैज्ञानिकांनी प्रतिपादित केलेल्या गोष्टी चूक असल्याचे बोस यांनी सिद्ध केले होते. सभागृहातील वैज्ञानिक यामुळे इतके विचलित व प्रक्षुब्ध झाले की, रॉयल सोसायटीतर्फे बोस यांचे भाषण प्रकाशित करण्यास त्यांनी विरोध केला. परंतु खोटा पडेल इतका आपला प्रयोग तकलादू नाही, याबद्दल बोस यांना आत्मविश्वास होता. दोन वर्षे अथक परिश्रम करून त्यांनी एक प्रबंध (मॉनोग्राफ - Monograph) प्रकाशित केला. प्रबंधाचे शीर्षक होते 'सजीव व निर्जीव यांच्यातील प्रतिसाद प्रक्रिया' (Response in the Living and Non-living). आपला प्रयोग अचूक असून प्रयोगाचे फलित योग्यच आहे, हे सत्य स्वीकारण्यास पर्याय नाही; हे रॉयल सोसायटीला त्यांनी पटवून दिले. जे भाषण सुरुवातीस प्रकाशित झाले नाही, ते आता प्रकाशित देले गेले व जगभर वितरित करण्यात आले. बोस यांची शास्त्रज्ञ म्हणून जगभर ख्याती पसरली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. इ.स. १९२० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. या पदासाठी निवड झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे मोल लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने इ.स. १९१७ मध्ये त्यांना 'सर' या किताबाने सन्मानित केले. तेव्हापासून ते 'सर जगदीशचंद्र बोस' या नावाने ओळखले जाऊ लागले.
बोस यांना जीवशास्त्रज्ञ म्हणून आता ओळखले जाऊ लागले. त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल प्रत्येक भारतीय सदैव ऋणी राहील. पाश्चिमात्यांनी मान्यता दिल्यानंतरच त्यांच्या देशातील लोकांनी बोस यांच्या संशोधनास मान्यता दिली व त्यांचे श्रेष्ठत्व ताणले. ३० नोव्हेंबर, १९१७ रोजी बोस यांनी 'बोस संशोधन संस्था' देशाला समर्पित केली.
कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर हे बोस यांचे मित्र होते. त्या काळात पाश्चिमात्यांना टागोरांविषयी माहिती नव्हती. बोस यांनी टागोरांच्या साहित्याचे भाषांतर करून ते प्रसिध्द केले. त्यामुळे टागोरांची प्रतिभा ज्ञात झाली. त्यांचे समकालीन भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रामन यांच्यापेक्षा बोस ३० वर्षांनी मोठे होते. योगायोग असा की, रामन ज्या वित्तीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेस बसले होते, त्या परीक्षेतील पदार्थविज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी तयार केली होती. आपल्या मृत्यूच्या एक दिवस आधी बोस यांनी बोस संशोधन संस्थेच्या निदेशकास सांगितले होते की, मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकावी व त्यातून मिळणारे धन संशोधन व सामाजिक कार्यासाठी वापरले जावे. जगदीशचंद्र बोस यांचे २३ नोव्हेंबर १९३७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti