मी बँकेत टाइपिस्ट म्हणून नोकरीला लागलो. दोन तीन महिने झाले असावेत. एकदा साहेबांनी टाइपिंगला दिलेल्या पत्रात मला व्याकरणाची एक चूक आढळली. मी ती दुरुस्त केली. पत्रावर सही करण्यापूर्वी साहेबांनी मला बोलावून तीच दुरुस्ती चुकीची असल्याचे सांगितले. त्यांनी does च्या पुढे क्रियापदाला s प्रत्यय लावला होता. मी चटकन म्हणालो, ’साहेब does च्या पुढे मेलं तरी s लागत नाही’. साहेबांनी किंचित रागानेच माझ्याकडे पाहिले. ’ सॉरी सर, हे आमच्या कोण्णूर सरांच वाक्य डोक्यात इतक फिट झालं आहे की चुकून तुमच्यासमोर मी ते तसच बोललो’. आपली चूक साहेबांच्या लक्षात आली. पण हे ’मेलं तरी’ त्याना फारस रुचल नव्हत.
कोण्णूर सरांच्या हाताखाली शिकलेल्या एकूण एक हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडात किंवा डोक्यात हे वाक्य असच फिट झाल आहे. कोण्णूर सरांची भाषाच अशी जगावेगळी होती. जरा व्याकरणाकड लक्ष दिल तर SSC ला इंग्रजीत आंद्या परिटाचं गाढव सुद्धा पास होईल, अडचण एवढीच आहे की ते तीन तास एके ठिकाणी बसत नाही. इंग्रजीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ते गर्दभाच्या असे जवळ उभे करायचे. जशी भाषा वेगळी तसेच विद्यार्थ्यांना मारण्याची पद्धतही वेगळी. डोक्यावर किंवा हाताच्या ढोपराच्या मागे हाडावर डस्टरने खाटकन मारायचे. जीव कळवळायलाच पाहीजे. आणखी अस्त्र म्हणजे एक वेताची छडी होती. हात झणझणण म्हणजे काय ते कोण्णूर सरांची छडी खाल्ल्यावरच कळायचे. मुलींना सुद्धा सर मारायचे हे आम्हाला तेव्हां खूप छान वाटायच.
कोण्णूर सर कोल्हापूरात न्यू हायस्कूलच्या कागलकर वाड्यात इंग्रजीचे शिक्षक होते. अतिशय कडक शिक्षक म्हणून त्याना ओळखले जायचे. पांढरे शुभ्र दुटांगी धोतर, खादीचा कुडता त्यावर खादीचेच जाकीट आणि डोक्यावर टोकदार कडक इस्त्रीची गांधी टोपी असा त्यांचा पोशाख असायचा.
चार चौघात पटकन उठून दिसतील असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. शाळेव्यतिरिक्त ते स्वत:चे खाजगी क्लासेस घ्यायचे. कोण्णूर सरांमुळे इंग्रजी सुधारले पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटतो सरांसारख्या भन्नाट माणसाचा सहवास लाभल्याचा आनंद.
कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेतील त्यांच्या घरातल्या पहिल्या मजल्यावर काही महिन्यांपूर्वी मी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेलो होतो तेव्हां ती खोली पाहून या खोलीत आम्ही ६५/७० मुले तेव्हां कशी काय बसत असू याचे खूपच आश्चर्य वाटले. मुली खिडकीत बसायच्या. दाटी वाटीने जागा करून देण्यासाठी सर मुलांना बजावयाचे ’जे नुसत हलवल्या सारख करतोयस ते बूड प्रत्यक्ष हलव’. साधी, सोपी, सरळ, नेहमीची भाषा सरांना त्यांच्या आईने शिकवलीच नसावी. वर्गात बसून मागच्या बाजूला कोणी बडबड करायला लागला की सर म्हणायचे ’ए बोडकी, रामाच्या पारावर बसून वाती वळायला आलायस काय ?’ अंबाबाईच्या देवळात राम मंदिराच्या मागे प्रवचन ऐकायला जाणाऱ्या विधवा बायकांसाठी वापरला जाणारा शब्द बोडकी. कोण्णूर सरांनी कुठून कुठून हे शब्द संग्रहात साठवले होते ते कळत नाही.
चहाचे त्यांना अत्यंतिक व्यसन होते. टेबलावर चहाचा एक थर्मास अखंड भरलेला असायचा. आम्हालाच कोणालातरी कपात अर्धाच कप चहा भरायला सांगत. भुरका मारून चहा प्यायचे. थर्मास रिकामा झाला की घरात हाक द्यायचे. सर पूर्वी धूम्रपानही करायचे. पुढे डॉक्टरांनी त्यावर बंदी घातली.
फक्त ५०/६० मिनिटांच्या शिकवणीने इंग्रजी सुधारणार नाही म्हणून घरी सराव करण्यावर त्यांचा भर होता. रोज भरपूर गृहपाठ द्यायचे. म्हणजे जितका वेळ शिकवणे त्यापेक्षा जास्त वेळ वह्या तपासण्यात जायचा. त्या वह्या एका कोनाड्यात रचून ठेवलेल्या असायच्या. एकदा एका बहाद्दराने कोणाची तरी वहीच चोरली. वही गायब झाल्याने चोरी झाल्याचे कळले तरी चोर सापडण्यासारखा नव्हता. त्या दिवशी सरांनी न भूतो न भविष्यति अशा शिव्या हासडल्या. रोज रात्री दोन अडीच पर्यंत जागून सर वह्या तपासायचे याचा शोध आम्हाला त्या दिवशी लागला. सरांचा सात्विक संताप खरा होता. त्यापूर्वी किंवा त्यानंतरही सरांना इतके चिडलेले मी कधीच पाहीले नाही.
कोण्णूर सरांचा सारा भर व्याकरण शिकवण्यावर होता. पहिले चार पाच महिने फक्त काळ शिकवायचे. नंतर पाठ्यपुस्तक शिकवतानाही मुख्य भर व्याकरणावर. परीक्षेच्या दृष्टीने पुस्तकाची तयारी ज्याची त्याने करावी. पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना पोहणाऱ्याला हात द्यावा त्या पद्धतीने शिकवायचे. म्हणजे प्रत्यक्ष पोहण्यासाठी हातपाय तुम्हीच मारले पाहीजेत. इंग्रजी वाक्य घटक पद्धतीने शिकवायचे. घटक दोन प्रकारचे. पहिले जे वाक्यात असलेच पाहीजेत, आणि दुसऱ्या प्रकारात असतीलही. पहिल्या प्रकारातील घटक दोन, कर्ता आणि क्रियापद. ह्या दोनही घटकांशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात कर्ता, क्रियापद, कर्म शिवाय ह्या साऱ्या विषयीची अधिक माहिती सांगणारी विशेषणे इत्यादी.कोणी काही चूक केली की ’शेण खाल्लं’ हे त्यांच आवडीच ठरलेल वाक्य होत. साठ मिनिटात किमान पाच सहा वेळां ते शेणावर घसरायचे. वर्गात दोशी नावाचा मुलगा होता. रोज त्याच्या वाट्याला बुट्टीभर शेण यायच. एकदा तर दोशीच्या वाट्याला जे शेण आलं ते आम्ही कोणीच विसरू शकणार नाही.पाहिजेतच असे घटक कर्ता-क्रियापद. कर्ता-दोशी, क्रियापद – खातो. त्यावर विशेषणे जोडता जोडता अखॆर ते वाक्य इतकं मोठ झाल…. दोशी शेण खातो. दोशी रोज सकाळी म्हशीचे बुट्टीभर, ताजे-ताजे शेण, फोडणी देऊन, मिटक्या मारत चवीने खातो . सरांच्या क्लासमधे शेण या शब्दाशिवाय दिवस उजाडायचा नाही, मावळायचाही नाही.वर्गात उशीराने येणाऱ्या मुलांचे स्वागतही खास शैलीत व्हायचे. ’इतक्या सकाळी उकिरडे फुंकत तरंगत कुठे गेला होतास अशा प्रश्नाबरोबरच वर एक छडी खायला मिळायची. कोण्णूर सरांवर तरीही सर्वांच प्रेम होत. त्यांनी मारलेल्या छड्या, दिलेल्या शिव्या गोडच लागायच्या. कारण त्यांनी आमचे इंग्रजी सुधारण्याची जी जादू आमच्या जीवनात केली होती त्याच्यापुढे या साऱ्या गोष्टी किरकोळ वाटायच्या.
एकदा मात्र सरांनी मारलेली छडी माझ्या हाताबरोबरच मनावरही कायमचा ठसा उमटवून गेली. सर वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांना फारसे प्रश्न विचारायचे नाहीत. कोणीच उत्तर देऊ शकले नाही तर मग त्यांच्या मते हुशार मुले जी होती त्यांना शेवटी विचारायचे. सुदैवाने माझा नंबर बहुदा शेवटचा असायचा. खरतर माझ्यापेक्षा जास्त हुशार काही जण होते. पण माझ्या भावाने बोर्डाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे सरांचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम होते. मला मारायचेही नाहीत. इतर मुलांची त्याबद्दल तक्रारही असायची. इतकच काय ते मला सरळ कात्रे या नावाने हाक मारायचे बाकी कोणालाही त्यांनी सरळ नावाने हाक मारल्याचे माझ्या स्मरणात नाही. सबनीसला सबन्या, मानेला मान्या, पाटीलला पाटल्या अशीच नावे घ्यायचे. सान्या (साने) तुला सांगतो कळंब्याच पाणी पिऊन इंग्रजी येत नाही, हे त्यांच्या आवडीचे विधान होते. कळंबा तलावातून कोल्हापूर शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाई. म्हणजे इंग्रजी शिकण्याच काम कोल्हापूरवाल्यांच नव्हे हे ते खास त्यांच्या स्टाईलने ऐकवायचे ते ऐकायला जाम मजा यायची. तर एकदा त्यांनी काहीबाही प्रश्न विचारला. मी सरांच्या जवळ त्यांच्या स्टूललगत अगदी पायाशीच बसलो होतो. खुर्ची असती तरी स्टूल हे त्यांचे आवडते आसन होते. प्रश्न विचारतच त्यांनी माझ्याकडे पाहीले. याचे उत्तर वर्गात कोणालाही येणार नाही अशी त्यांची अटकळ होती. त्यामुळे आता बऱ्याच जणांना मार देता येईल असा काहीसा मिष्किल भाव त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. आजपर्यंतचा माझा अनुभव असा होता की माझ्यापर्यंत प्रश्न यायचाच नाही. एखाद्याने तरी उत्तर देलेले असायचे. म्हणून मी उत्तर ठाऊक असल्याचा भाव चेहेऱ्यावर ठेवला. वास्तविक मलाही त्याचे उत्तर ठाऊक नव्हते. जवळ जवळ बारा चौदा जणांना हा प्रश्न विचारूनही माझ्या दुर्दैवाने कोणालाच त्याचे उत्तर देता आले नाही. माझ्या चेहेऱ्यावरील भाव प्रदर्शनामुळे शेवटी सर म्हणाले Yes, now you. पण मला उत्तर येतच नव्हते. हे पाहिल्यावर सर जाम भडकले. ’भोसडीच्या, मला फसवतोस ? म्हणत त्यांनी वेताच्या छडीने जी सपकन माझ्या हातावर लगावली की पुढे पूर्ण एक तास माझ्या हातातून झिणझिण्या येत होत्या. आज कात्रेने मार खाल्ला यामुळे सारे सुखावले. चुकीचे भाव नजरेत ठेवून मी त्यापुढे आयुष्यात कधीही आणि कुणाच्याही सामोरा गेलो नाही. असा प्रसंग आला तर मला प्रथम कोण्णूर सरांची आठवण येते. ती छडी आठवते. आणि ती शिवी सुद्धा, भोसडीच्या मला फसवतोस ?
एकदा मी क्लासला थोडा उशीरा पोचलो. पाहतो तर आज क्लास नव्हता. सुट्टी दिली होती. नेहमी वर्गात बनियन किंवा कधीकधी फक्त धोतर नेसून वर उघडेबंब बसणारे सर आज त्यांच्या पूर्ण पोशाखात एकदम टापटीप दिसत होते. मला थांबवून त्यांनी एक पेढा खायला दिला. सर कसला पेढा अस विचारल्यावर माझ्या एकसष्ठीचा अस सरळ उत्तर ते देऊ शकले असते. पण एकसष्ठी असली म्हणून काय झाल ? ते कोण्णूर सरच होते. कसला पेढा या माझ्या प्रश्नावर त्यांनीच मला प्रतिप्रश्न केला ’पेपर वाचतोस की नाही’ ? मी गप्पच. मग त्यांनी पुढारीमधे आलेली बातमीच मला दाखवली. त्यांच्या फोटोखाली त्यांच्या एकसष्ठीची बातमी होती.
भाषांतर हा कोण्णूर सरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेतील विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीप्रमाणे व्यक्त करणे ही त्यांची भाषांतराची सोपी सुटसुटीत व्याख्या होती. कुठल्याही वाक्याचा केवळ शव्दार्थ सांगणे म्हणजे भाषांतर नव्हे यावर त्यांचा सतत जोर असायचा. Oh, God ! म्हणजे फक्त हे देवा नव्हे. माणूस परमेश्वराला साद घालताना काय काय म्हणेल ते सगळ लिहायला सांगायचे. उदा: परमेश्वरा, भगवंता, विठ्ठला पांडुरंगा, अरे रामा इ. इ. एकदा त्यांनी भाषांतर करायला सांगितलेले मराठीतील वाक्य खूप लांबलचक होते. एक मुलगा म्हणाला सर खूप मोठ आहे वाक्य. त्यावर म्हणाले घे छोट वाक्य – विद्या विनयेन शोभते किंवा शेणखाऊ गप्प बस. काय भाषांतर करणार ? कोणी चांगल्या मराठीत भाषांतर केले की खूष होऊन शाबासकी द्यायचे. रागावताना भरपूर शब्दांचा वापर करणारे सर शाबासकी मात्र शक्यतो नजरेतूनच द्यायचे. आम्ही त्यावर खूष असायचो.
त्यांनी सांगितलेली एका वाक्याची विविध भाषांतरे माझ्या चांगलीच लक्षात राहीली आहेत. मूळ इंग्रजी वाक्य होते The old man called his son and said my boy I am going to die now यातील I am going to die now चे भाषांतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे असे केले होते. बाळा, मला आता त्याचे बोलावणे आले आहे. मुला, मला आता पैलतीर दिसू लागला आहे. बाबारे, मी म्हणजे पिकले पान, कधीही गळून पडेन. माझे काही आता खरे नाही. आता मी चीरनिद्रा घेणार आहे. मला बाहेर रेडा उभा दिसतो आहे. मृत्यु कुणाला चुकलाय, मी आता चाललो. मृत्यु आता अगदी समीप येऊन ठेपला आहे तो कधीही झडप घालेल. बाबा, मला यमाने निरोप धाडला आहे, आता गेलेच पाहीजे. माझा इहलोकीचा प्रवास संपला, आता मी तिकडे चाललो. माझे आता शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, अगदी ताससुद्धा. गंगेचा टाक आहेना रे घरात ?
कोण्णूर सरांनी नुसते इंग्रजी शिकवले नाही. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली. भाषांतराची ही गंमत चाखण्याची चव दिली. मराठी भाषेचा बाज आणि साज दाखविला. अमृताते पैजा जिंकणारी आमची मातृभाषा कशी समृद्ध आहे त्याचे ज्ञान करून दिले.
SSC परीक्षेत माझ्याकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवाने त्या मी पुऱ्या करू शकलो नाही. माझी अकरावीची परीक्षा झाल्यावर सर स्वत: माझ्या घरी आले होते. माझ्या पेपरची सगळी चौकशी करून मला इंग्रजीत ८१ गुण मिळतील असा त्यांचा अंदाद होता. प्रत्यक्षात ६१ च गुण मिळाले. त्यावेळी माझ्यापेक्षाही कांकणभर जास्तच दु:ख कोण्णूर सरांना झाले हे मी त्यांच्या चेहेऱ्यावर पाहिले.
कोणतीही गोष्ट करण्यामधे एकप्रकारची मनस्विता त्यांनी नेहमी जोपासली. माझ्या काही कविता लिहिलेली डायरी एकदा मी त्यांना पहायला दिली होती.माझी डायरी ’छान आहे’ एवढा ढोबळ शेरा मारून ती ते परत करू शकले असते. पण कोण्णूर सरांच्या ते स्वभावात बसणारे नव्हते. ठलेच
काम त्यांनी Lightly घेतले नाही. माझ्या सगळ्या कविता त्यांनी व्यवस्थित वाचल्या. पुढच्या रविवारी निवांत वेळी मला घरी बोलावले. सरांचा अभिप्राय ऐकायला मी उत्सुक होतो. सर्वसाधारणपणे दहावी अकरावीतला कोणी मुलगा काही तरी लिहितो आहे याच नेहमी कौतुकच व्हायचे. मात्र सर म्हणाले, ’काहीतरी लिहिण्य़ापूर्वी प्रथम खूप वाचल पाहीजे. मग लिहायला लाग’. मी थोडासा नाराजच झालो. पण आज त्या संपूर्ण गोष्टीकडे मी वेगळ्या नजरेने पाहू शकतो. किती मोलाचा सल्ला सरांनी दिला होता. मुख्य म्हणजे माझ्यासाठी भरपूर वेळ काढून अत्यंत आत्मीयतेने मला एक मंत्रच दिला होता.
पुढे कोण्णूर सरांना भेटण्याचा एक दोनदाच योग आला. माझ्या एका मित्राला इंग्रजीमुळे परीक्षेत यश मिळत नव्हते. त्याला तीन चार महिने व्याकरण समजून घ्यायला मदत केली. तो पास झाला. त्या आनंदात पेढे घेऊन मी सरांना भेटायला गेलो होतो. नंतर काही भेटण्याचा योग आला नाही. अचानक कोण्णूर सरांच्या निधनाची बातमी पेपरमधे वाचली. आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वेगळी बाग फुलविणारे, इंग्रजी कशाशी खातात त्याचे ज्ञान करून देणारे, तिरकस आणि शिव्यांनी युक्त भाषा वापरूनही प्रेमाचे झरे पाझरविणारे कोण्णूर सर इहलोकीचा प्रवास संपवून परलोकी गेले. कळंब्याच पाणी वहात वहात हडसन पर्यंत जाऊन मिळाल तरी कात्र्या कळंब्याच पाणी पिऊन इंग्रजी येत नाही हे त्यांच वाक्य अजूनही कानात घुमत आहे.
-- श्री.संजय कात्रे
संगीतकार म्हणून श्रीकांतजी वॉयलीन वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली.
मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी झाला. अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले. ’आशा’ आणि ’चित्रा’ या साप्ताहिकांचे ते काही काळ संपादक होते.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. अनंत काणेकर यांच्या स्मरणार्थ मुंबई विद्यापीठ एक व्याख्यानमाला चालवते.
गीतकार म्हणून अनंत काणेकर यांनी लिहिलेली गाणी
आता कशाला उद्याची बात
आला खुशीत् समिंदर
एकलेपणाची आग लागली
तू माझी अन् तुझा मीच
दर्यावर डोले माझं
अनंत काणेकर यांचे २२ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ‘ कानून ‘ ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्ह्णून ‘फिल्मफेअर’ पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतमहोत्सवनिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना पारितोषीक देण्यात आले.
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्य त्यांच्याबद्द्लच्या जागवलेल्या आठवणी.
आयुष्यभर अभिनयकलेची व्रतस्थपणे सेवा करून त्या कलेचे अनेकांना दान करून कलाकारांची ललाटरेखा कालातीत बनविणारे मराठी रंगभूमी व रुपेरी पडद्यावरील नायक,खलनायक,चरित्र नायक आणि दिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे असंच एक अनोखं व्यक्तिमत्व........
कोल्हापूर-कलानगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर,पंचगंगेचा अवखळपणा आणि सह्याद्रीचा कणखरपणा असा विलोभनीय संगम असलेल्या या नगरीने महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या राष्ट्राला अनेक रत्ने बहाल केली.कलेचा समृद्ध वारसा असल्याने जुन्यांचे पडद्याआड जाणे आणि नव्यांचे चमचमणे हे नियतीचे रहाटगाडगे....असे अविरत चाललेले...ज्यांचा उमेदीचा काळ कोल्हापुरात गेला त्या सर्वांचे कार्यकर्तुत्व खरं तर बंदिस्त करणे कठीण;पण मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीच्या कळसावर विराजमान झालेले आणि अभिजात शिष्य कलावंतांच्या मांदियाळीत पताका घेऊन पुढे उभे असणारे व आपल्या कसदार अभिनयाने मराठमोळ्या जनतेच्या हृदयसिंहासनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांच्या परंपरेतील एक कलाकार म्हणजे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे.
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे उत्कृष्ट खलनायक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म पुणे येथे १ मार्च १९१० रोजी महाशिवरात्रीला झाला.३ सप्टेंबर १९८६ रोजी कोल्हापूर येथे त्यांचे देहावसान झाले.या ७५ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण १०० चित्रपट आणि १३४ नाटके व त्यांचे असंख्य प्रयोग त्यांच्या नांवावर आहेत.त्यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओत चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी बराच काळ व्यतीत केला.
राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे होते जयशंकर दानवे. सुलोचना या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्रीला “ करीन ती पूर्व ” या रंगमंचावरील नाटकाद्वारे प्रथम अभिनय क्षेत्रात आणणारे आणि “ जयभवानी ” या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रथमच त्यांना मुख्य नायिकेची संधी देणारे होते जयशंकर दानवे. “ ऐका हो ऐका ” या नाटकातून गणपत पाटील यांना नाच्याची पहिली टाळी शिकविणारे व राजशेखर यांना रंगभूमीवर याच नाटकाद्वारे प्रथम दिग्दर्शन करणारे होते जयशंकर दानवे.
चंद्रकांत,सुर्यकांत मांडरे,सोहराब मोदी,विक्रम गोखले,जयश्री गडकर,पद्मा चव्हाण, रत्नमाला,रमेश देव अशा कलाकारांना अभिनयाच्या पाउलवाटेवर प्रथम संधी देऊन सिने-नाट्य सृष्टीची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणारे होते जयशंकर दानवे.त्यांनी एक काळ हैद्राबादला ‘हैम्लेट’ नाटकाचे असंख्य प्रयोग करून गाजवला होता. उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असूनही मुंबईच्या अभिनय महासागरात न जाता कोल्हापुरात राहून त्यांनी अनेक कलाकार शिष्य घडविले.
करवीर वाचन मंदिर,करवीर नाट्य मंदिर,देवल क्लब,मेडिकल असोसीएशन, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल,न्यू हायस्कूल अशा कोल्हापुरातील अनेक संस्थाना नाटकांच्याद्वारे उर्जितावस्था आणली अशा कलाकाराचे चिरंतन स्मरण करणे आवश्यक आहे.म्हणूनच २०११ सालापासून “नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार ” हा मानाचा पुरस्कार दानवे परिवारातर्फे प्रदान करण्यात येतो.
आजपर्यंत रंगकर्मी “श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,श्री.सदाशिव अमरापूरकर,श्री.शरद पोंक्षे, श्री.अरुण नलावडे,श्री.सुबोध भावे” यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अशा नाट्य-सिनेदिग्दर्शकाचे व कलाकाराला ही भावांजली.......
“ स्मृतीत तुमच्या मिळते स्फूर्ती, गातो आम्ही तुमची कीर्ती
भावफुले ही तुम्हास अर्पण, स्मृतीस तुमच्या शतश: वंदन ”
जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर
(९८६०४४७५९७)
३ सप्टेंबर २०१६
आदिनाथ कोठारे हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र असून स्वतः अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९८४ रोजी झाला. बालपणापासूनच त्याला अभिनयाची गोडी होती.. महेश कोठारे यांनी आदिनाथ कोठारे याला 'माझा छकुला' या चित्रपटातून लाँच केले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आदिनाथने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून दिली होती. अभिनय करता करता आदिनाथ यांनी एम.बी.ए. पूर्ण केले होते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला झपाटलेला २, खबरदार, इश्कवाला लव्ह, पछाडलेला, निळकंठ मास्तर असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत.
अभिनेत्यासोबतच आदिनाथ निर्माता म्हणूनही समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर 'सरगम' या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होते. शिवाय 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेचासुद्धा निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली.
चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. अनेक वर्षं एकमेकाला डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११ मध्ये लग्न केले. आदिनाथ आणि उर्मिला हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी कार्मिक व्यवस्थापनात काम केलं होतं. त्यांचे वडील, कामगार नेते पी. जी. सावंत हे सीटू या कामगार संघटनेत सक्रिय होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतील हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्ने केले. मुंबईतील जुन्या चाळी आणि त्यांची पुनर्बांधणी व त्यावरील मालमत्ता करासाठी आंदोलनात पुढकार घेतला.
बुवांच्या कीर्तनाला हजारोंनी गर्दी होई, रस्ते बंद होत. भावगीतांच्या काही रेकॉर्डसही त्यांच्या आवाजात निघाल्या. “सागरा प्राण तळमळला” हे सावरकर रचित गीत सर्वप्रथम HMV ने १९४८-४९ साली त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले आहे. विविध मासिकात, दैनिकात त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर लेख प्रसिद्ध होत. १५ नाटके, २ कवितासंग्रह, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित “सावरकर गाथा” हे महाकाव्य त्यांनी रचले. त्याचे काव्यगायनाचे १०० प्रयोगही त्यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरची असंख्य गावं इतकच नव्हे तर अमेरिकेतही ते ३ महिने राहून कीर्तने गाजवून आले.
अमेरिकेत संपूर्ण जगातिल् विविध वंशाचे लोक वास्तव्यास आहेत त्यात भारतीय लोक फक्त ६% आहेत. ईतर देशाच्या नागरीकांच्या तुलनेने भारतीय नागरिक ज्याना अमेरिकेत ” भारतीय-अमेरिकन ” असे सम्बोधिले जाते व अनेक राष्ट्रातुन आलेल्या नागरिका पेक्षा भारतीय-अमेरिकन लोक जास्त प्रगतिच्या वाटेवर आहेत असे दिसुन येते.
Copyright © 2025 | Marathisrushti