(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेखक – दिग्दर्शक रजत कपूर

    रजत कपूर हे प्रामुख्याने ग्लॅमरस बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा चेहरा म्हणून ओळखला जातो. रजत कपूर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे.

  • भारतीय लेखक, पत्रकार खुशवंत सिग

    पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, संशोधक, विनोदकार, वादग्रस्त लेखक अन् अतिशय सर्जनशील, संवेदनशील माणूस... खुशवंतसिंग यांची ही विविध रूपे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पाकिस्तानात असलेल्या हदली येथे झाला.तब्बल सात दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक तसे विरळेच. खुशवंतसिंग त्यांपैकी एक. वृत्तपत्रांतील स्तंभ असो वा कादंबरी; किस्से असोत की चुटके... प्रत्येक माध्यमांतून ते मैफल रंगवत होते आणि रसिक त्यांचा आस्वाद घेत होते.

    खुशवंत सिग यांचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी आपल्या जन्मगावी घेतले. त्यानंतर लाहोर, दिल्ली आणि लंडनमधून शिक्षण पूर्ण केले. 'बार अॅट लॉ' झाल्यावर १९३९ ते ४७ या दरम्यान लाहोर हायकोर्टात त्यांनी वकिली केली. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी परराष्ट्र खात्यात नोकरी स्वीकारली. सरकारने त्यांची वार्तांकन सहाय्यक या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर लंडनच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून आणि युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांनी काम पाहिले. नभोवाणी मंत्रालयाच्या योजना नियतकालिकाचे संपादकत्व त्यांनी काही वर्षे सांभाळले. सरकारी नोकरीनंतर त्यांनी अध्यापनाकडे मोर्चा वळविली आणि अमेरिकेतल्या प्रिस्टन विद्यापीठात प्राध्यापकी केली. त्यांच्या कर्तृत्वाला खरा बहर आला, तो त्यांनी 'बेनेट कोलमन अँड कंपनी'च्या 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया' या साप्ताहिकाचे प्रमुख संपादकपद स्वीकारल्यावर. त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा हे मासिक म्हणजे फक्त उच्चभ्रू वर्तुळासाठीच असणारे असा समज होता; पण हा समज त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने बदलून टाकला. सामान्यांपर्यंत पोहोचले तरच ते यशस्वी होईल, असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी मासिकात अनेक बदल केले. हे बदल यशस्वी ठरले आणि मासिकाचा खप ६५ हजारांवरून चार लाखांवर पोहोचला. 'विथ मॅलिस टू वर्ड्‌स वन अँड ऑल' हा त्यांचा साप्ताहिक स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्घ होत असे व तो वाचकप्रियही झाला होता. वाचणाऱ्याला मजा येईल, असे त्यांचे लेखन असे. त्या काळात असणारी संपादकाची प्रतिमा त्यांनी संपूर्ण बदलली. सहजतेने कोणालाही भेटणारे, पदाची आढ्यता न बाळगता काम करणारे आणि सहज संवाद साधणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्यासोबत काम करणारेही सहज संवाद साधू शकायचे, हेही त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते. संपादकीय पान म्हणजे फक्त बुद्धिजीवी लोकांचे ही प्रतिमाही त्यांनी मोडून काढली. सामान्य माणसाला काय वाटते, त्याच्या काय अपेक्षा आहेत यापासून पत्रकारिता दूर जाऊ नये यासाठी ते झटत असत. अर्थात त्यांच्या कारकिर्दीतील अनेक विधाने वादग्रस्तही ठरली. इंदिरा गांधींशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी घरोबा असतानाही त्यांनी कधी कुठलीही एकच राजकीय बाजू घेतली नाही. आपल्या विधानांवरून उठलेली वादळेही ते खुशीने स्वीकारत असत. खुशवंतसिंग यांनी त्यांच्या लेखणीचा पट्टा चौफेर फिरवला. राजकारण, समाजकारण, प्रेम, इतिहास, भाषांतर, लघुकथा, शीखांचा इतिहास अशा सर्व प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली आहे. स्त्रियांविषयीचे अत्यंत उघड श्रृंगारिक वर्णन, तिरकसपणा आणि नर्मविनोदीपणा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. त्यांना देशाविषयी प्रचंड अभिमानही होता. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी 'ट्रेन टू पाकिस्तान' ही कादंबरी खूप गाजली. फाळणीच्या दरम्यान घडलेल्या घटनांची आणि फाळणीच्या परिणामांची कहाणी त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये मांडली आहे. हातोहात खपलेल्या या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. या पुस्तकाला गोव्ह प्रेस अॅवॉर्डही मिळाले. तिचे कथानक वापरून पुढे 'ट्रेन टू पाकिस्तान' हा चित्रपटही निघाला, 'द हिस्ट्री ऑफ शीख्स' या पुस्तकाचे तीन खंड त्यांनी लिहिले. ही पुस्तके विश्वसनीय कागदपत्रे आणि पुराव्यांवर आधारलेली आहेत. या पुस्तकांत शिखांचा सचित्र इतिहास देण्यात आला आहे. मात्र, त्यांनी लिहिलेले रणजितसिंग यांचे चरित्र व्यक्तिपूजक आणि अवास्तव महती गाणारे असल्याची टीका झाली होती. त्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. हातातले पेन वृद्धत्वामुळे गळून पडत होते; पण मनातील उत्साह कायम होता. 'द सनसेट क्लब' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या वयाच्या ८०व्या वर्षी प्रसिद्ध झाले; पण ८० व्या वर्षीही त्यांनी जगण्याविषयी, राजकारणाविषयी आणि समाजाविषयी इतके भरभरून लिहिले आहे की थक्क व्हायला होते. त्यामुळेच ९८व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी निवृत्तीनंतर कसे जगावे हे सहजतेने लिहिले आहे. या ९८व्या वाढदिवशी ते म्हणाले होते, 'पुढे नेण्यासाठी माझ्यापाशी खूप थोडे उरले आहे; पण आठवून पाहावे आणि त्यात रमावे असे खूप काही मी जमवले आहे. आयुष्याच्या जमा खात्यावर ८० पुस्तके, कादंबऱ्या, लघुकथा, आत्मचरित्र, इतिहास, पंजाबी आणि उर्दूत केलेली भाषांतरे आणि अनेक निबंध आहेत. वयाच्या ९८व्या वर्षीही ते लिहित होते. प्रतिभेचे लेणे घेऊन आलेले मा.खुशवंतसिंग सर्व माध्यमांतून त्याचा आविष्कार घडवत गेले. म्हणूनच लोकप्रियतेची उंची त्यांना गाठता आली. मा.खुशवंतसिंग यांचे २० मार्च २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    खुशवंतसिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही एक वादग्रस्त कादंबरी.
    एका उद्योगपतीचं बिनधास्त आत्मवृत्त..खुशवंतसिंगांच्या बेधडक शैलीतून...
    चैतन्य प्रेम विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृक्ष आहे. खुशवंत सिंग यांनी हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं यात जिवंत केले आहेत.

  • महानतम गायिका ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ

    ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते.

    १९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली. या नंतर त्यांचा यमला जट, ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली. १९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केला. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात. नूरजहाँ फाळणी नंतर मुंबई लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला.

    शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ (1950) ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले. नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडवा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले. पाकिस्तानात पार्श्व गायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली. त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता. नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • एम. एस. सुब्बुलक्ष्मी

    प्रसिद्ध राजकीय इतिहासकार प्रा. सुनील खिलनानी यांचे ‘इनकार्नेशन्स’ हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक आपल्याला भारताच्या आजवरच्या जडणघडणीवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि विचारांचे भव्य दालन खुले करून देते. त्यातील विसाव्या शतकात समाज आणि संस्कृतीच्या अंगाने होत गेलेल्या वैचारिक स्थित्यंतराचा वेध घेणाऱ्या ‘ओपनिंग रोझबड्स’ या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यावरील लेखावर आधारित हे टिपण...

    संस्कृती ही एकरेषीय संकल्पना नाही. ती कप्प्या-कप्प्यातही मांडता येत नाही. कारण ती व्यामिश्र, गुंतागुंतीची, खूपशी व्यापक-पसरट अशी असते. ज्या देशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम व जैन धर्म एकाच वेळी नांदले, त्या देशाची सांस्कृतिक व्याख्या संकुचित धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. प्रसिद्ध विचारवंत प्रा. सुनील खिलनानी यांचे ‘इनकार्नेशन्स’ हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केलेले पुस्तक आपल्याला भारताच्या सांस्कृतिक विश्वाच्या खोल गुहेत अलगद घेऊन जाताना याच वास्तवाची खोलवर जाणीव करून देते.

    गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवाजींपर्यंत व पुढे विल्यम जोन्सपासून धीरुभाई अंबानी यांच्यापर्यंत ५० लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांचा वैचारिक वेध घेत हे पुस्तक आपल्याला भारताच्या जवळपास दोन हजार वर्षांच्या बौद्धिक संपृक्ततेचा अनुभव देते. हा वेध केवळ व्यक्तिमत्त्वांची ओळख व त्यांच्या कार्यापुरती मर्यादित नाही तर तो आपला आपल्याशी संवाद आहे. कधी हा संवाद वादविवादाचा, तर कधी आपल्या वैश्विक जाणिवा अधिक समृद्ध, विस्तारित करणारा आहे. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या ‘भारतरत्न’ एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे काळाच्या एका टप्प्यावर प्रभाव टाकणारे रोमहर्षक जीवन या पुस्तकात समाविष्ट करून लेखकाने एक मोठे सांस्कृतिक- सामाजिक संचित नव्याने उलगडून दाखवले आहे.

    भारत ब्रिटिशांची वसाहत होण्याअगोदर राजेरजवाड्यांकडून देवदासी प्रथा चालवली जात असे. परंतु ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर संस्थानिक, राजेरजवाड्यांची संस्थात्मक रचना मोडकळीस येऊन देवदासी पद्धतीचे स्वरूपही बदलू लागले. विल्यम जोन्स व अन्य ओरियँटिलिस्ट इतिहास संशोधकांनी भारतीय प्राचीन इतिहास तसेच संस्कृत भाषेच्या गौरवशाली इतिहासाची पाश्चात्त्य नजरेतून मांडणी केल्यामुळे, त्याचबरोबर अॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफी सोसायटीच्या प्रभावी चळवळीमुळे भारतीय कलांच्या सादरीकरणाला नवा आयाम मिळाला. नव्या ब्रिटिश कायद्यांमुळे या प्रथेवर बंधने आली, पण त्यात भारतीय संगीत गुदमरले नाही. अशा वातावरणात मदुराईमधल्या एका सायकल दुकानासमोर वयाच्या दहाव्या वर्षी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनास प्रारंभ झाला.

    ‘एम. एस.’ या आद्याक्षरांनी ओळखल्या गेलेल्या सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म मदुराईचा (१९१६). एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला. एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. याच काळात ग्रामोफोनचा शोध लागला. सामाजिक-सांस्कृतिक बंधने गळून पडत संगीताशी नाते अधिक घट्ट होत गेले.

    १९३६ मध्ये सुब्बुलक्ष्मी यांची एका प्रसिद्ध मासिकात मुलाखत प्रसिद्ध झाली. या मासिकाचे संस्थापक-संपादक होते, सदाशिवम. हा काळ स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा होता. सदाशिवम हे जन्माने ब्राह्मण होते, कॉम्रेड चिदंबरम पिल्लई यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. सदाशिवम यांची सुब्बुलक्ष्मी यांच्याशी भेट झाली, तेव्हा सदाशिवम ३३ वर्षांचे होते, तर सुब्बुलक्ष्मी केवळ १९ वर्षांच्या. सदाशिवम यांना सुब्बुलक्ष्मींशी लग्न करायचे होते, पण या लग्नाला सुब्बुलक्ष्मीच्या आईचा कडवा विरोध होता. आपल्या मुलीला मिळणाऱ्या पैशासाठी सदाशिवम लग्न करत असल्याचा आरोप त्या सातत्याने करत. याच काळात खुद्द सुब्बुलक्ष्मी या प्रसिद्ध कर्नाटक संगीताचे गायक व अभिनेते जी. एन. बालसुब्रह्मण्यम यांच्या प्रेमात होत्या.

    सुब्बुलक्ष्मी यांनी या काळात काही प्रेमपत्रे बालसुब्रह्मण्यम यांना लिहिली होती. या पत्रात दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केलेला दिसत होता. या पत्रात तृप्ती, समाधान, स्थिरचित्त, अात्यंतिक आनंदी अशा शब्दांचा वारंवार उल्लेख केल्याचे दिसत होते. पण त्याचबरोबर सुब्बुलक्ष्मी यांना आपली आई व सदाशिवम यांच्यापासूनही दूर राहायचे होते, असेही स्पष्ट जाणवत होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. १९४०च्या आसपास सदाशिवम यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले, त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्याशी गुप्तपणे विवाह केला. सुब्बुलक्ष्मींचे संगीतावरील प्रेम व तादात्म्य वृत्तीमुळे सदाशिवम यांनी या विवाहाचा आदर राखत, त्यांच्या गायनाला अधिक अवकाश देण्याचे ठरवले. या काळात देवदासी प्रथा मोडकळीस आल्याने या प्रथेतील भरतनाट्यम हे नृत्य व कर्नाटक संगीताला उच्चवर्णीयांनी आश्रय दिल्याने त्याला अभिजनाचा दर्जा मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याचा फायदा घेत सदाशिवम यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाचे देशभर कार्यक्रम ठेवण्यास सुरुवात केली. सुब्बुलक्ष्मी यांच्या स्वर्गीय सुरात रसिक न्हाऊन जात होतेच, पण त्यांच्या अत्यंत साध्या निगर्वी व्यक्तिमत्त्वामुळे सुब्बुलक्ष्मी यांची लोकप्रियता जनमानसात उत्तरोत्तर वाढत होती.

    त्या वेळच्या तामीळ चित्रपटात संगीताला विशेष स्थान मिळाले होते. त्याला अधिक उंची सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाने मिळाली होती. सुब्बुलक्ष्मी यांचा स्वर्गीय स्वर व भारतीय स्वातंत्र्यलढा तसा समांतर होता. पण त्यांच्या स्वराने या लढ्याला राष्ट्रीय अभिमानाचे रूप दिले. सदाशिवम यांना सुब्बुलक्ष्मीचे जीवन पडद्यावर आणायचे होते, पण ते मांडण्यासाठी त्यांनी भक्ती संगीत परंपरेतील मीराबाई हिच्या जीवनप्रवासाचा आधार घेतला. १९४५मध्ये ‘मीरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट तामीळ भाषेबरोबर हिंदीतही डब करण्यात आला. हा चित्रपट पाहून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, “संत मीरा यांचा जीवनप्रवास हा भारतातील श्रद्धास्थानांचा, भक्तीमार्गाचा व अलौकिक स्वर्गप्राप्ती देणाऱ्या परंपरांचा आहेच, पण सुब्बुलक्ष्मी यांची या चित्रपटातील अदाकारी पाहता त्यांनी साकारलेली मीरेची व्यक्तिरेखा मीरेची नाही, तर खुद्द त्यांचीच भासते आहे.” सदाशिवम यांना जे अपेक्षित होते, ते त्यांना मि‌ळाले.

    सुब्बुलक्ष्मी यांचे गायन राष्ट्रीय पातळीवर नेण्याची पराकाष्ठा सदाशिवम करत होते, त्यात त्यांना यश मिळत गेले. त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांचे गायन राष्ट्रीय नेत्यांमध्ये पोहोचवले. म. गांधी, नेहरू यांच्यापुरते ते मर्यादित न राहता परदेशात, युनोमध्ये त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले. पं. नेहरूंनी त्यांना ‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले. रुग्णालये, शाळा, अनाथाश्रम, क्षयरोग केंद्रे ते हिंदू देवळे अशा सार्वजनिक ठिकाणी सुब्बुलक्ष्मी यांनी हजारो कार्यक्रम केले. आपल्याकडे व्यक्तीची लोकप्रियता व तिचे कार्य विभूतीपूजेकडे जाते. परिणामी, सुब्बुलक्ष्मी यांचे दैवतीकरण होऊ लागले. देवदासीची मुलगी ते अभिजनांचे दैवत हा प्रवास एका टप्प्यावर येऊन स्थिरावला. सुब्बुलक्ष्मी यांच्या रूपाने विनम्रता, एकनिष्ठा, ईर्षा, महत्त्वाकांक्षा, निराशा, अलिप्तता आदी भाव-भावनांचे दर्शन होत गेले.

    १९९७ मध्ये त्यांना केंद्र सरकारने सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. असा पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्याच गायिका ठरल्या. हा पुरस्कार सोहळा पाहण्यास सदाशिवम जिवंत नव्हते, ते एक वर्षाआधी गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर सार्वजनिक जीवनातून सुब्बुलक्ष्मी यांनी निवृत्ती घेतली होती. २००४मध्ये त्यांचे निधन झाले. संस्कृती-परंपरा-समाज राजकारण यातील परस्परप्रभावाचे, समाजाच्या वैचारिक बदल आणि उत्क्रांतीचे प्रतीक सुब्बुलक्ष्मी यांच्या रूपाने सर्वार्थाने इतिहासाच्या पटलावर कोरले गेले. आपल्याकडे व्यक्तीची लोकप्रियता व तिचे कार्य विभूतीपूजेकडे जाते. परिणामी, सुब्बुलक्ष्मी यांचे दैवतीकरण होऊ लागले. देवदासीची मुलगी ते अभिजनांचे दैवत हा प्रवास एका टप्प्यावर येऊन स्थिरावला...

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ सुजय शास्त्री

  • लोकप्रिय पार्श्वगायिका अलका याज्ञिक

    कोलकात्यामध्ये जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या ६व्या वर्षापासून शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरूवात केली. १९७२ पासून अलका याज्ञिक आकाशवाणीच्या कोलकाता केंद्रासाठी भजने म्हणत असत. त्यांचा जन्म २० मार्च १९६६ रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षी अलका याज्ञिक यांनी १९८० साली आलेल्या लावारिस ह्या हिंदी चित्रपटामधील तिने म्हटलेले गाणे गाजले होते. परंतु तिला १९८८ सालच्या तेजाब चित्रपटामधील माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या एक दो तीन ह्या गाण्यामुळे खरी प्रसिद्धी मिळाली. ह्या गाण्यासाठी तिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर तिने १९९० व २००० च्या दशकांमध्ये अनेक गाणी गायली जी लोकप्रिय झाली. अलका यज्ञिकने एकूण १,११४ हिंदी चित्रपटांमध्ये २,४८२ गाणी गायली आहेत. सर्वाधिक गाणी म्हटणाऱ्या बॉलिवूड गायकांमध्ये आशा भोसले, लता मंगेशकर, महम्मद रफी व किशोर कुमार खालोखाल तिचा त्यांचा पाचवा क्रमांक लागतो. अलका याज्ञिक यांनी हिंदी व्यतिरिक्त गुजराती, अवधी, उडिया, आसामी, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बंगाली, भोजपुरी, पंजाबी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळी व इंग्लिश ह्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अलका याज्ञिक यांनी कल्याणजी-आनंदजी, आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राजेश रोशन, नदीम-श्रवण, जतिन-ललित, अनू मलिक, ए.आर. रहमान, आनंद-मिलिंद, हिमेश रेशमिया, शंकर-एहसान-लॉय, इस्माईल दरबार इत्यादी सर्व आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. तिची बव्हंशी युगुलगीते कुमार सानू, उदित नारायण व सोनू निगम ह्य सहपार्श्वगायकांसोबत आहे. सुमारे ३ दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत राहिलेली अलका याज्ञिक या भारतामधील सर्वात यशस्वी पार्श्वगायिकांपैकी एक आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारासाठी विक्रमी ३५ नामांकने व एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बहाल करण्यात आले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    अलका याज्ञिक यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=hzTz7wUzm8E

    https://www.youtube.com/watch?v=f1FqIdVRtWU

  • रहस्यकथा सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती

    अगाथा ख्रिस्तीच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्याची उकल जशी शेवटपर्यंत होत नसे, तसेच त्यांच्यातील खुनाचे तपशील विलक्षण जिवंत, वास्तवाधिष्ठित असत. हाणामारी वा पिस्तुलबाजी टाळून, तिच्या कादंबऱ्यांतील अनेक मृत्यू विषप्रयोगाने होत. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘पेल हॉर्स’मध्ये खून ‘थेलियम’ या विषाद्वारे झाल्याचे दाखविण्यात आले होते.

  • रोशन – कलात्मक संगीतकार

    हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, चालीतील वैविध्य, वाद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि गायन शैली यात प्रयोग केले जातात, दुर्दैवाने, असले प्रयोग बहुतांशी दुर्लक्षित होत असतात. वास्तविक चाल म्हणजे काय? हाताशी असलेल्या शब्दकळेला सुरांच्या सहाय्याने सजवून, गायक/गायिके पर्यंत पोहोचवायची!! चाल अशी असावी की ती गुणगुणताना, कविता वाचनापेक्षा अधिक सुरेल आणि खोल तरीही आशयाशी सुसंवादित्व राखणारी असावी. अशा थोड्या संगीतकारांच्या पंक्तीत रोशन यांचे नाव फार वरच्या स्तरावर घ्यावे लागेल. सुरवातीपासून, उर्दू भाषेची आवड आणि संगीताचा ध्यास, यामुळे सुरवातीचे शिक्षण पंडित रातरंजनकर, पुढे, उस्ताद अल्लाउद्दिन खान साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन, यामुळे रागदारी संगीताचा पाया तयार झालेला. दिलरुबा वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते.

    सारंगी, Accordion, Spanish Guitar, बासरी या वाद्यांवर त्यांचा अधिक भर आहे. काही उदाहरणे बघूया. १] सलामे हसरत कबूल कर लो, २] मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है, ३] पांव छू लेने दो, ४] रहते थे कभी उनके दिल मे, या आणि अशा बऱ्याच गाण्यातील सारंगी मुद्दामून ऐकावी म्हणजे माझे म्हणणे पटावे. प्रेत्येक भाषिक वाक्यानंतर सारंगी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, सारंगीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे सारंगी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनाजे विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.

    रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे - मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही. "तेरी दुनिया मे दिल लगता नही", "कहा हो तुम" ही गाणी ऐकावीत. कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. असाच उदासी परिणाम, तलतच्या "मै दिल हुं एक अरमान भरा" या गाण्यात अप्रतिम येतो. तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध कंप आणि त्याला साजेसा सुरावटीचा ढाला पाया, मनार गाढा परिणाम करते.

    मात्र, साठीच्या दशकात रोशन यांची शैली बदलली. जिथे मंद्र सप्तक आणि ढाला स्वर होता, तिथे उच्चस्वरी वाद्यवृंद घेतो, असे आढळते. अर्थात, त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करूया. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. एकाच गीतात, एकाधिक ताल वा लयबंध वापरणे, हा त्यांचा खास प्रयोग म्हणता येईल. "बार बार तोहे क्या समझाये" किंवा "झीलामील तारे करे इशारा" ही गाणी बघूया. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका, या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून, त्यांची सादरीकरणे खास स्वरूपाची असतात. तसे बघितले तर, हे दोन्ही कालिक आकृतिबंध असतात, पण ताल हा मानसिक वा कल्पित कालिक नकाशा असून, त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होत असते. म्हणून एकाच तालाचे अनेक ठेके अस्तित्वात असतात आणि ते कानाला वेगवेगळे प्रतीत होतात. "सलामे आली हसरत कबूल कर लो" आणि "मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है" ही गाणी बघुया. या दोन्ही गाण्यांत निराळे ठेके योजले आहेत. "बहारो ने मेरा चमन लूटकर" या गीतात देखील १० मात्रांचा झपताल वापरला आहे पण तालाचा चेहरा-मोहरा ओळखीचा वाटत नाही.

    "मैने शायद तुम्हे" या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर, जिला आपण "सम" म्हणतो, तिच्यावर जोर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या गाण्याची सम "निराघात" आहे. "शायद" या शब्दातील, "य" अक्षरावर सम येउन गेली, हे पहिल्यांदा ऐकताना ध्यानात देखील येत नाही!! मुळात, गाण्यात, ताल देखील अति हलक्या आवाजात आघाती ठेवलेला आहे, त्यामुळे गाणे फार बारकाईने ऐकायला लागते.

    एकंदरीने, रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली आहे. अर्थात, याविरुद्ध देखील त्यानी रचना केल्या आहेत."कही तो मिलेगी", "सखी रे मोरा मन", "वो चले आये रे" ही सगळी गाणी चैतन्यपूर्ण, चमकदार चालींची झाली आहेत. द्रुत गती, चाल फार खाली नाही वा फार उंच स्वरांवर नेउन न ठेवणे, शब्दांच्या शेवटी खटके-मुरक्या इत्यादी नाजूक स्वरालंकार योजणे वगैरे सांगीतिक युक्त्या कुशलतेने योजलेल्या आहेत.

    रोशन यांच्या गाण्यांकडे आणखी वेगळ्या नजरेने बघितल्यास, त्यांना युगुलगीतांचे आकर्षण अधिक होते, हे सहज समजून घेता येते. "हम इंतजार करेंगे","छा गये बादल","पाव छु लेने दो" ,"छुपा लो युं दिल मे प्यार" इत्यादी गाणी ऐकावीत. आपल्याकडील बहुतांशी युगुलगीते, नाट्यात्म होतात, ती संवादात्मक तत्वाच्या पाठपुराव्यामुळे, हे सर्वसाधारण सत्य लक्षात घेत, या गाण्यातील आगळेपण सहज सिद्ध होते. ही गाणी कुठेही अति नाट्यात्मक होत नाहीत तर संवाद्तत्वावर पुढे विस्तारत जातात.

    आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. "मन रे तू काहे ना धीर धरे (यमनकल्याण), या गाण्यातील शांत स्वरवैभव केवळ अपूर्व आहे. निगाहे मिलाने को जी चाहता है (यमन), "बता दो कौन गली (तिलंग), "मदभरी अंखीयां" (जौनपुरी) किंवा "गरजत बरसत" (मल्हार) ही देखील उल्लेखनीय गाणी म्हणता येतील. प्रत्यक्षात तो राग जरी योजला नसला तरी त्या रागाच्या छायेत या गाण्यांच्या चाली अवतरत असतात. आता, यमन राग घेतला तरी, "सलामे हसरत","गमे हस्तीसे बस बेगाना","वळला क्या बात","युं अगर मुझको ना चाहो तो" ही सगळी यमन रागाच्या सावलीत वावरतात परंतु रागाची प्रकृती वेगळी गाण्याची रचना वेगळी, असा फरक या गाण्यांमधून अप्रतिमरीत्या दिसून येतो.

    "कव्वाली" हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. "अगर ये दिल" (घर घर मे दिवाली),"ना तो कारवां की तलाश" (बरसात की रात), "निगाहें मिलाने को" (दिल ही तो है) या कव्वाल्या ऐकाव्यात. "निगाहें मिलाने को" या कव्वालीत, यमन नीटसपणे येतो, पण आशा भोसलेच्या कौशल्यपूर्ण आवाजाच्या लागावास (उदाहरणार्थ खालच्या "रे" वरून एकदम अचूक वरचा "रे" घेणे!!) शब्दांच्या अंती येणारी द्रुतगती फिरत यांना भरपूर जागा आहे.

    आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात,
    "तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे"

    अनिल गोविलकर
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • जेष्ठ किराणा घराण्याच्या गायिका, गंगूबाई हनगळ

    “कन्नड कोकिळा" अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती, त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीचे गाण छान गात असे. त्यांचा जन्म ५ मार्च १९१३ रोजी धारवाड येथे झाला. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगुबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. सोळाव्या वर्षी त्यांचे गुरुराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. १९३७ पासून सवाई गंधर्वानी कुंदगोळ या हुबळीपासूनच्या जवळच्या गावात त्यांना संगीत शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या घरी जाऊन गंगुबाई शिकत होत्या, त्या वेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी तेथे दुसरे सहाध्यायी होते. नंतर ते गंगुबाईंचे गुरुबंधू झाले. १९३८ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीतपरिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाई हनगळ यांचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ साली पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. त्यांना गमकाच्या अंगाने गायला खूप आवडे; जे स्त्री गायिका सहसा गात नसत. नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे.

    गंगुबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), पार्श्वयगायक के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षणा नंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली.

    मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगिताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तीगीत व गझल गायानाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिली युगलगीत विख्यात गायक जी. एन जोशी व गंगूबाई हनगळ यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत असत. गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल यांना अनेक पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे.त्यात त्यांची छायाचित्र, ध्वनिमुद्रिका, तानपुरे पहायला मिळतात.

    गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरीक म्हणूनही थोर होत्या. आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी 'दि साँग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत. भारत सरकारने गंगूबाई हनगळ त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. फक्त पाचवी शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. १९९२ ते १९९४ त्या कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या होत्या. गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठीतील निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार सुधीर गाडगीळ

    सुधीर गाडगीळ यांनी विविध क्षेत्रातील २८०० हून अधीक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९५० रोजी झाला. या मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्योगपती शंतनु किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दिक्षित, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, गायक आशा भोसले, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण. यांचा समावेश आहे. त्यांच्या मुलाखती म्हणजे मान्यवरांशी मारलेल्या अनौपचारिक दिलखुलास गप्पा असतात. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची नावं तपासत लाडे लाडे निवेदन करण्याच्या काळात मा.सुधीर गाडगीळ यांनी स्वत:चं मुलाखतकार आणि निवेदक म्हणून हुकमी स्थान निर्माण केलं. त्यासाठी पत्रकारितेतील अनुभवाचा त्यांना खूपच उपयोग झाला. मा.सुधीर गाडगीळ यांची कारकिर्द १९७० च्या सुमारास सुरु झाली.

    १९७१ मध्ये मुंबईत ‘तेजस्वी’ साप्ताहिक सुरू झाले होते. तिथे ते मुंबईचा ब्युरो इन्चार्ज म्हणून काम करू लागले. कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रची ऑर्डर हातात असतानाही सुधीर गाडगीळ ‘मनोहर’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम करू लागले. १९७३ ते १९८० पर्यंत त्यांनी ‘मनोहर’मध्ये काम केलं. ‘मनोहर’ ही त्यांची शेवटची नोकरी. त्यानंतर मुक्तपत्र कारिता केली. ‘मुलखावेगळी माणसं’ ‘प्रतिमा आणि प्रतिभा’, ‘गजरा’, ‘युवदर्शन’, ‘मुखवटे आणि चेहरे’ असे अनेक दूरदर्शन साठी कार्यक्रम त्यांनी केले. विशेष म्हणजे, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर या मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रकट मुलाखती घेण्याचा मान सुधीर गाडगीळ यांच्या कडे आहे.

    आशा भोसले यांच्या जाहीर मुलाखती तर ते सलग २७ वर्ष घेत आहेत. जुलै १९८५ मध्ये त्यांनी आशा भोसले यांची पहिल्यांदा मुलाखत घेतली. प्रकट मुलाखती घेण्याच्या बाबतीत तर सुधीर गाडगीळ यांच्या नावावर राष्ट्रीय उच्चांक आहे. त्यांनी आतापर्यंत ३ हजार ६८२ प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. त्यांनी टीव्हीवर घेतलेल्या मुलाखतींवर आधारित ‘मुलखावेगळी माणसं’ असा एकपात्री स्वतंत्र कार्यक्रम केला. पण, तो फक्त परदेशांकरिता. टीव्हीवर त्याच नावाचा कार्यक्रम होता. पण, तो वेगळा होता. तिथे मी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या आणि इथे त्यांनी घेतलेल्या सगळया माणसांचं मुलखावेगळंपण एकत्र किस्से-कथनाच्या माध्यमातून मांडत होतो. अमेरिकेतल्या तर ५१ शहरांमध्ये आठ वेळा जाऊन त्यांनी हा कार्यक्रम केला. दक्षिण पूर्व अमेरिका, मॉरिशस, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, आफ्रिका अशा सर्व ठिकाणी महाराष्ट्र मंडळातून हे कार्यक्रम केले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    सुधीर गाडगीळ यांची माहिती, मुलाखत वाचण्यासाठी
    http://mulakhat.com/sudhir-gadgil/
    http://thinkmaharashtra.com/node/1885

  • ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं.सत्यशील देशपांडे

    शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!

    लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, कुमारजींप्रमाणेच पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे.

    पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता.

    संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे.

    कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.

    तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा!

    थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

    मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे.

    सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट