महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबई येथे झाला. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे, आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उध्दव यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.
उद्धव ठाकरे जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले.
२००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी पाटणकर यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत.
आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून २०१९ च्या निवडणुकीत ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.
शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणार्याा शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण केले. विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी केली. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश संपादन केले आहे. आता तर शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे, तसेच शिवसेनेने राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळविले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि आता राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले. संवेदनशील लेखक आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले.
उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या सहकार्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे'' उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा पिंड कवी मनाचाच असल्याने घरच्या विरोधाला जुमानता तो प्रकट होत राहिला. बँक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या मा.समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि सिनेक्षेत्रात गीतकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली. ‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, अशा अनेक चित्रपटांसाठी मा.समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. मा.समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. मा.समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. या आधीचे रेकॉर्ड गीतकार मा.आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती. मा.समीर यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
समीर यांची काही गाणी
आए हो मेरी जिंदगी में
आखों ने तुम्हारी
आपके प्यार मे हम
घुंगट की आड से
चाहा है तुझको
जो हाल दिल का
तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
तेरी उम्मीद तेरा इंतजार
धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
धूम मचा ले धूम
दिल ने दिल से क्या कहा
दिल है के मानता नही
देखो जरा देखो
श्रीराम भिकाजी वेलणकर हे भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक होते. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसंच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तरीही त्यांना पोस्ट आणि टेलीग्राफ खात्याच्या तोंडी परीक्षेत ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते.
चंद्रकांत यांनी ‘ ज्वाला ‘ या चित्रपटात अभिनेते चंद्रमोहन यांच्याबरोबर १९३८ मध्ये अभिनय केला. त्याच वर्षी भालजी पेंढारकर यांच्या ‘ राजा गोपीचंद ‘ या चित्रपटासाठी साठी त्यांनी चंद्रकांत यांना बोलवले आणि त्यांचे सिनेसृष्टीसाठी पहिल्यांदा ‘ चंद्रकांत ‘ हे नाव ठेवले.
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’चे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी झाला. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे गीतरामायण १९५५ साली रेडियोवर सुरू झाले.
बाबूजींचा सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार व नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते. दरम्यान, त्यांनी सुमारे ५६ गाणी असलेल्या गीतरामायणाचे १,८०० प्रयोग देश व विदेशात केले. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते.
गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लावणार? एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसांनी ओतप्रेत भरलेली, मधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. शिवाय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे ही रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करतात.
कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता.
बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोने यांनी लिहिले आहे.
पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.
सुमारे ५० वर्षे संगीतसृष्टी गाजवणारे बाबूजी माणूस म्हणून श्रेष्ठच होते ते त्यांच्या अभिजात संगीतप्रेमामुळेच! सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वि.स.खांडेकर यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८९ रोजी झाला. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. कुमार वयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला.
ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा- कादंबऱ्यातून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत.
‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्यांंवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले. ‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला. मा.वि.स.खांडेकर यांचे २ सप्टेंबर १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वि.स. खांडेकर यांची ग्रंथसंपदा : हृदयाची हाक, कांचनमृग, हिरवा चाफ़ा, दोन मने, रिकामा देव्हारा, उल्का, सुखाचा शोध, पहिले प्रेम, पांढरे ढग, ययाती, अमृतवेल इत्यादी कांदबर्या . कालची स्वप्ने, नवा प्रात:काल, ऊनपाऊस, दत्तक आणि इतर गोष्टी, प्रसाद, जीवनकला, स्त्री-पुरुष, पाषाणपूजा इत्यादी कथासंग्रह. चांदण्यात, वायुलहरी, सायंकाळ, मझधार, झिमझिम, कल्पकता इत्यादी लघुनिंबधसंग्रह. याशिवाय काही रुपकथासंग्रह, टोपणनावाने लिहिलेल्या काही कविता, रंकाचे राज्य हे नाटक, काही टीकात्मक लेखनाचे ग्रंथ यांचाही त्यांच्या साहित्यात समावेश होतो.
श्रीनाथ त्रिपाठी उर्फ एस.एन.त्रिपाठी यांची धार्मिक आणि पौराणिक चित्रपट अधिक संख्येने वाट्याला येऊन देखील सातत्याने श्रवणीय गाणी देणारे संगीतकार म्हणून ओळख होती.
त्यांचा जन्म १४ मार्च १९१३ रोजी झाला. पौराणिक चित्रपट संगीताचा बादशाह म्हणून ते प्रसिद्ध होते.
एस.एन.त्रिपाठी यांचे आजोबा पंडित गणेशदत्त त्रिपाठी काशी येथील संस्कृत विद्यापीठाचे प्राचार्य, तर वडील पंडित दामोदरदत्त त्रिपाठी हे काशीच्याच सरकारी विद्यापीठाचे प्राचार्य. त्यामुळे श्री नाथजींचं शालेय शिक्षण वाराणसी येथे, बी.एस्सी. झाल्यावर अलाहाबाद विद्यापीठातून संगीतविशारद एन.व्ही. भातखंडें यांच्या विद्यालयातून, संगीत प्रवीण प्रयाग संगीत समितीतून तर लाइट क्लासिकल शिक्षण लखनौ येथील मैना देवींकडे झालं. या शिदोरीवर त्यांनी थेट मुंबई गाठली अन बॉम्बे टॉकीजला येऊन मिळाले. व्हायोलनिस्ट म्हणून पगार होता १००/-.
त्यांना गायक म्हणून संधी मिळाली ती ‘जीवननैया’ मध्ये. ‘ऐरी दैया लचक लचक चलो..’ हे पहिलं गाणं. चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँझ ऑस्टिन. बाँबे टॉकीज सोडल्यावर पहिला ब्रेक मिळाला संगीत दिग्दर्शनासाठी तो १९४१च्या ‘चंदन’साठी. पहिलं गाणं- ‘नन्हासा दिल देती हूँ..’ हे राजकुमारीबरोबर त्यांनी स्वत: गायलेलं युगलगीत होतं. पण पहिले यश मिळालं १९४३च्या ‘पनघट’मध्ये. प्रथम अभिनय केला ‘रामभक्त हनुमान’मध्ये हनुमानाच्या भूमिकेमध्ये! दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा १९५७चा ‘राम हनुमान युद्ध’.
मुळात शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या त्रिपाठींनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील ‘रानी रूपमती’ (१९५९) आणि ‘संगीतसम्राट तानसेन’ (१९६२) हे महत्त्वाचे चित्रपट. त्यांतील शास्त्रीय संगीताला नौशाद सारख्यांनी देखील दाद दिली. जसा नौशाद यांचा ‘बैजू बावरा’ तसा त्रिपाठींचा ‘तानसेन’. त्यात शास्त्रीय संगीत गायकांनादेखील त्यांनी आग्रहाने गायला बोलावलं. ‘रानी रूपमती’तदेखील त्यांनी तसा प्रयोग केला.
एस.एन.त्रिपाठी यांनी आपल्या प्रदीर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले.
एस.एन.त्रिपाठी यांची पौराणिक चित्रपटांमधे मात्र मक्तेदारी कुणीच मोडू शकलं नाही. पौराणिक चित्रपट हे तसे पाहिले तर लो बजेटचे. त्यामुळे त्यांचा दर्जाही दुय्यम समजला जायचा. पण तरीही एकेकाळी अशा चित्रपटांची लाटच होती. बी ग्रेडच्या चित्रपटांचं संगीत देऊन एखादा खचून जाईल, पण एस.एन.त्रिपाठी यांनी या चित्रपटांवर आपली अनोखी मोहोर उमटवली. आणि ती ही संगीताच्या सुवर्णयुगात, म्हणजेच एकोणीसशे पन्नासच्या दशकात!
‘सप्तसूर तीनग्राम..’ (मन्ना डे), ‘सुधबिसर गयी आज..’ (मन्नाडे-रफी), ‘अब आयी बरखा बहार.’ (मन्नाडे-रफी), ‘टूट गयी रे मनकी बीना..’ (पंढरीनाथ कोल्हापुरे- पूर्णा सेठ), ‘सखी कैसे धरू मैं धीर..’ (लता मंगेशकर), ‘दीपक जलाओ, ज्योती जगाओ..’ (रफी), ‘प्रथमशांतरस जाके..’ (मन्नाडे, मूळ तानसेनची रचना), ‘हे नटराज..’ (महेंद्र कपूर- कमल बारोट, मूळ रचना तानसेन) ही गाणी असलेला ‘संगीतसम्राट तानसेन’ हा कृष्णधवल चित्रपट. त्यातील एक गाणं ‘घिर घिर के आयो रे मेघा.’ हे रंगीत चित्रित केलं होतं. (जसं ‘मुगल-ए-आझम’ १९६० मधील ‘प्यार किया तो डरना क्या..’ हे नौशादचं गाणं. पन्नास वर्षांनी संपूर्ण ‘मुघल-ए-आझम’ डिजिटली कलर्ड झाला. तर ‘संगीतसम्राट तानसेन’ विस्मृतीत गेला.)
‘रानी रूपमती’ या रूपमती आणि सुलतान बाजबहादूर यांची प्रेमकहाणी मांडणाऱ्या चित्रपटातदेखील अव्वल शास्त्रीय बाज असलेली गाणी होती- ‘बात चलत नई चुनरी रंग डारी..’ (कृष्णराव चोणकर- रफी), ‘उडम् जा माया कमलसे..’ (मन्नाडे), ‘सुन बगीयां में बुलबुल बोले..’ (लता मंगेशकर). या चित्रपटातीलच ‘आ लौट के आजा मेरे मीत..’, ‘संगीतसम्राट तानसेन’मधील ‘झूमती चली हवा..’ अथवा ‘पिया मिलन की आस रे..’ (लता- पिया मिलन की आस- १९६१) या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाण्यांचं संगीत देताना शास्त्रीय बाज सांभाळला होता. कदाचित ही त्यांची शास्त्रीय संगीताची बैठकच तत्कालीन सामाजिक आधुनिक चित्रपटांसाठी मर्यादा ठरली असावी.
१९४१ ते १९८५ अशी पंचेचाळीस वर्षांची कारकीर्द (‘चंदन’ ते ‘महासती तुलसी’) असूनही तसे चित्रपट अभावानेच मिळाले. उत्तम गुणवत्तेला योग्य कोंदण लाभणं, हा नशिबाचा भाग. जे लक्ष्मी-प्यारेंना लाभलं. ‘सती-सावित्री’, ‘हरिश्चंद्र तारामती’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘पारसमणी’, ‘आया तूफान’ वगैरे चित्रपटांबरोबर ताराचंद बडजात्यांचा ‘दोस्ती’ मिळणं हे नशीब. त्या संधीची उत्तम गुणवत्तेशी सांगड घालून त्यांनी कुठल्या कुठे झेप घेतली.
अशी कित्येक लोकप्रिय गाणी देणारे त्रिपाठी चित्रपटाच्या ग्रेडची पर्वा न करता या क्षेत्रात भरपूर रमले. सव्वाशे ते दीडशे चित्रपटात विविध भूमिका त्यांनी केल्या. ९० वर चित्रपटांचं संगीत, २३ चित्रपटांचं दिग्दर्शन, त्यातील काही स्वनिर्मित, कथा-पटकथा-संवादलेखक, गायक, अभिनेता अशा विविध भूमिकांतून वावरले.
एस.एन.त्रिपाठी यांचे २८ मार्च १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रभाकर बोकील
संगीतकार एस.एन.त्रिपाठी यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=aXX-84r5Eg4
https://www.youtube.com/watch?v=jRcgvNN5L80&list=PLoYmSmY92nUwKTlCcsqskIxMoktpV987A&index=3
https://www.youtube.com/watch?v=ThuSY1LVJnw
डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे ज्येष्ठ समीक्षक आणि ललित लेखक म्हणून ओळखले जात असत. ‘पुरुषराज अळुरपांडे’ असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकांत येत असत. गंमत म्हणजे ते नाव घेऊन लिहिणारी एक व्यक्ती नसून तीन जण होते. ते म्हणजे – पु. ल. देशपांडे, रा.वा.अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष!
त्यांचे वडील राजदरबारी सनईवादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी ते वाराणसीमध्ये आले. त्यानंतर तेथे वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यानी आपले काका ‘ अली बक्श ‘ यांच्याकडे सुरु केले. अत्यंत कठोर परिश्रम ते करत असत याचा आपण सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही.
"बोला अमृत बोला...‘, "आला खुशीत समिंदर...‘ "क्षण आला भाग्याचा...‘ यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. त्यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी झाला. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती.
ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी प्रथम ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकात भूमिका केली. या नाटकाचा प्रथम प्रयोग दि. १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकात त्यांनी नायिकेची म्हणजेच बिंबाची भूमिका केली.या नाटकाचे मुंबई व पुणे येथे शंभराहूनअधिक प्रयोग झाले. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. विवाहानंतर १९३३ साली त्यांचे पती केशवराव भोळे यांनी ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली. या संस्थेने अनेक नाटकांचे प्रयोग केले.
‘अलंकार’ नाटकात वत्सलेची, ‘आराधना’त देवकीची, ‘आशिर्वाद’मधील सुमित्रा, ‘एक होता म्हातारा’तील उमा, ‘कुलवधू’ मधील भानुती, ‘कोणे एके काळी’ मधील कल्याणी, ‘धाकटी आई’ मधील वीणा,‘भूमिकन्या सीता’मधील सीता, ‘रंभा’तील सुगंधा, ‘राधामाई’ मधील राधा तर‘ विद्याहरण’ मधील देवयानी अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. या नाटकातील पदे त्यांनी गाऊन अजरामर केली. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजीपार्क येथे झालेल्या कार्यक़्रमात त्यांनी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियअमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत गाऊन एक इतिहासच रचला.
यागीताला शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केले. या गीताने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण भारावले.ज्योत्स्नाबाईंना अभिनय, गायन याबरोबर साहित्याचीही आवड होती.त्यांनी ‘आराधना’ या नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कल्चरलसेंटर’च्या अध्यक्षा होत्या. १९९९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लतामंगेशकर पुरस्कार’ तर पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’असे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र ‘तुची ज्योत्स्ना भोळे’ हे प्रकाशित केले आहे.
ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ज्योत्स्ना भोळे यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=ytNtDJ9Yq38
Copyright © 2025 | Marathisrushti