राजकपूरने तिला पाहिले, त्यावेळी तो एका मुलीच्या शोधात होता बरसात या चित्रपटासाठी . त्याने निम्मीला तिचे नाव विचारले तेव्हा निम्मीने आपले नाव सांगितले नवाब बानो . आठ-दहा दिवसानी मेहबूब स्टुडिओंमधून बोलावणे आले , तयार रहा तुझी स्क्रीन टेस्ट घ्यायची आहे.
अनंत माने हे पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला.
भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले. नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश संपादित करून वकील म्हणून नावोलौकिक मिळवला.
भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे मा.भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले.
भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. मा.भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.
भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
"आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,
हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे"
भाऊसाहेब पाटणकरांची स्वत:च्या मृत्युवरील ही शायरी.
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मेलो आता, बोलू नये
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
दैनिक ‘मराठा’ च्या माजी संपादक , मराठीतील ख्यातनाम लेखिका ‘प्रेम कहाणी’, ‘ऊन-सावली’, ‘ओशो’, ‘प्रियजन’,‘पप्पा’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका आणि ‘हायकू ’ हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा आणणा-या कवयित्री शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणाऱ्या लेखिका शिरीष पै. आचार्य अत्रे यांच्या शिरीष पै या कन्या. त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकूं हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो.
लालन बैरागीण, हे ही दिवस जातील ह्या कादंबर्या त्यांन लिहिल्या. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला, अशी पुस्तके गाजली. आपल्या अफाट कर्तृत्वाच्या वडिलांचे चित्रण पप्पा आणि वडिलांचे सेवेशी या दोन पुस्तकातून त्यांनी रंगवले आहे. शिरीष पै यांचे दोन सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
मराठीतील ‘हायकू’ला प्रतिष्ठा मिळवून देणा-या शिरीष पै यांच्या गाजलेल्या काही हायकू…
पाहिला नाही असा उन्हाळा
उगवतानाच
सूर्य भडकलेला
दुरून पाऊस पाडेन
काळा ढग येतो आहे
लांबूनी जोर दिसतोय
आठवून सारे हसू येते
याचसाठी का मी
रडले होते
केव्हापासून करत आहे
काव काव कावळा
एवढा का भरून
येतो त्याचा गळा
केळीचे पान वा-यावर डुलतय
पण त्याला माहीत नाही
टराटरा फाटतंय
बागेमध्ये आनंदात फुलपाखरू
गेलं बागडून
पाऊस थांबला म्हणून
प्राचीन किल्ल्यात पाय ठेवताच
आपल्याला कळले
भूतकाळात काय घडले
पठ्ठे बापूरावांचे खरे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. पठ्ठे बापूराव यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली येथे झाला.
ग्रामीण भागात गायल्या जाणार्या जात्यावरच्या ओव्यां ऐकूनऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले. पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले.
नंतर हे शाहीर, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातत पसरली. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्याप स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही.
पठ्ठे बापूराव यांचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संगीत आणि सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलेल्या विजया जोगळेकर यांना १९७२ साली अनपेक्षितपणे दूरदर्शनवर नोकरी लागली आणि त्यांच्या आवडीचं विश्व नकळतपणे हाताशी आलं. ‘किलबिल’ या कार्यक्रमासाठी याकूब सईदना मदत करत असतानाच त्या या नोकरीत कायम झाल्या आणि त्यांच्या मनातल्या कल्पनांना जणू पंख फुटले.
इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा प्रतिनिधित्व करत असत.
शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार वादक उस्ताद वहीद खान. अजीज खान यांनी शाहिद परवेझ यांना पहिले अनेक वर्ष आधी तबला प्रशिक्षण दिले व नंतर सतारीचे प्रशिक्षण.
शाहिद परवेझ यांनी देशात आणि अमेरिका, युरोप, युएसएसआर, कॅनडा, आफ्रिका, मध्य-पूर्व आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक मैफिली केल्या आहेत. भारत सरकारने शाहिद परवेझ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीरंग गोडबोले. खऱ्या अर्थाने चतुरस्र वल्ली. उत्तम लेखक… कवी… निर्माते… दिग्दर्शक आणि बरेच काही ! श्रीरंग गोडबोले हे खरोखर काव्यात्मक आविष्कार घडवू शकणारे रंगकर्मी आहेत. त्यांचा जन्म १५ जून १९६० रोजी पुणे येथे झाला. नाटक, सिनेमा अणि टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांनी पेक्षकांना गुंगवलेलं आहे. श्रीरंग गोडबोले यांनी एस.एस.सी. पर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. कॉलेज रुईया, झेविअर्समध्ये केलं आणि नंतर इंजिनीअरिंग केलं. श्रीरंग गोडबोले यांनी १९७९ मध्ये थिऐटर अॅकाडमीतून आपले अभिनयाचे करियरला सुरवात केली. त्यांनी जब्बार पटेल यांच्या घाशीराम कोतवाल, पडघम, सतीश आळेकर यांच्या प्रलय, महानिर्वाण, भिंत अश्या नाटकात कामे करून या व्यवसायात जम बसवला.
१९८६ साला पासून त्यांनी स्वत:च नाटके लिहिण्यास सुरवात केली. पहिले नाटक होते ‘रंगमंचावर वावरतानाचे कलाकार आणि ग्रीनरूममध्ये वावरतानाचे कलाकर आणि त्यांचे संबंध’ या विषयावर होतं. हे नाटक लिहिताना त्यांची ही कल्पना कुणाला पटली नाही. मग ठरवलं, आपणच नाटक लिहायचं आणि त्यांनी ते नाटक लिहिलं. या नाटकाला राज्य नाटय़ स्पर्धेत सगळी बक्षिसं मिळाली. हे नाटक गाजल्यावर श्रीरंग गोडबोले यांच्यात एक विश्वास आला. त्या काळी ग्रिप्स ची चळवळ जोरात चालू होती. पुण्याच्या ग्रिप्स थिएटरला ते जॉइन झाले.
मोहन आगाशेंच्या सांगण्यावरून त्यांनी बालनाटय़ं लिहिली, तीदेखील गाजली. ग्रिप्स थिएटरला त्यांचा मोठा ग्रुप झाला. आम्ही नवनवीन नाटकं करायचो, शिबिरं करायचो. श्रीरंग गोडबोले यांनी विद्यार्थी संघटनेमध्ये काम केलं असल्याने माणसं जोडण्याचा गुण उपयोगी ठरला. एक उत्तम दिग्दर्शक होण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते. त्या सुमारास टेलिव्हिजनवर सीरिअल्स जोरात सुरू झाल्या होत्या. तेव्हा तीनच वाहिन्या होत्या. अल्फा मराठी, ई मराठी आणि प्रभात याच खासगी वाहिन्या होत्या. निर्माते अजय सरपोतदार यांनी श्रीरंग गोडबोले यांचे काम पाहिलेलं असल्याने त्यांनी सीरियल बनवण्याचं काम दिलं. यानंतर इव्हेंट्स डिरेक्ट करायची संधी मिळाली. याचा श्रीरंग गोडबोले यांना काही अनुभव नव्हता, पण चॅलेंजेस घेत गेले, आणि पुढचं पाऊल टाकलं सिनेमा मध्ये चिंटू १, चिंटू २, मंगल पांडे, पितृऋण… नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा त्यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर म्हणून केला. श्रीरंग गोडबोले यांची गाणी म्हणाल तर सोपी व भावपूर्ण. सा रे ग म प.. एकापेक्षा एक.. घडलंय बिघडलंय.. तुझ्यात जीव रंगला, लख लख चंदेरी, अग्निहोत्र या साठी श्रीरंग गोडबोले यांनी टायटल साँग लिहिली आहेत.
इंडियन मॅजिक आय ही श्रीरंग गोडबोले यांच्या निर्मिती संस्था आहे. या निर्मिती संस्थेने 'झी मराठी'च्या सहयोगाने एक भन्नाट, वेगळं, आजचं वाटणारं आणि सुंदर 'इडियट्स' नावाचं नाटक नुकतंच रंगमंचावर आणलंय. श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा सुहृद हा पण निर्माता आहे. त्यांची मुलगी मृण्मयी आणि सून गिरिजा ओक या अभिनेत्री आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अभिनेता सुश्रुत मंकणी यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी रोजी झाला.
प्रसिद्ध अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा असलेल्या सुश्रुत मंकणीने देवयानी या मालिकेत काम केले आहे. सुश्रुत मंकणीने तुझ्यात जीव रंगला आणि गर्ल्स हॉस्टेल मधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मुग्धा परांजपेशी नुकतेच लग्न केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लीम परिवारात झाला. आधीच खुर्शीद नावाची मुलगी असल्याने मुलगा व्हावा, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण मुलगी जन्माला आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी तर त्यांच्याकडे डॉक्टरांचे बिल देण्यासाठीही पुरसे पैसे नव्हते. म्हणून जन्मल्यानंतर लहानग्या महजबीनला मुस्लीम समाजाच्या अनाथालयात सोडण्याचे तिच्या जन्मदात्यांनी ठरवले. मात्र अनाथालयाच्या पायरीवर तिला सोडून जात असताना ऐनवेळी तिच्या वडिलांचे हृदयपरिवर्तन झाले आणि माघारी परतून महजबीनला छातीशी घट्ट कवटाळले. तसेच जमेल तसे तिचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला.
मीना कुमारी यांना कलेचा वारसा तिच्या आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी त्यांचे जवळचे नातेसंबंध होते. मीना कुमारीला यांच्या परिवारात त्यांना ‘मुन्ना’ या नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा ‘लेदर फेस’ हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून त्यांना लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार ‘बेबी मीना’ म्हणून चमकली. नायिका म्हणून अभिनय केलेला ‘बच्चों का खेल’ हा पहिला चित्रपट. त्यावेळी मा.मीना कुमारी अवघी चौदा वर्षाची होती. सुरुवातीला त्यांनी पौराणिक चित्रपटांतून अभिनय केला. नर्गिस, निम्मी, सुचित्रा सेन, नूतनसारख्या नव्या दमाच्या अभिनेत्रींचा तो काळ होता. ‘महल’ या चित्रपटाच्या यशानंतर एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक कमाल अमरोही यांना तिने अभिवादन केले असता त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मा.मीना कुमारी नायिका म्हणून यशस्वी ठरल्यानंतर कमाल अमरोही यांच्याकडूनच तिला त्यांच्या ‘अनारकली’ चित्रपटात काम करण्याबाबतचा प्रस्ताव आला. मागील अनुभव चांगलाच लक्षात असल्याने मा.मीना कुमारीने प्रस्ताव नाकारला. त्यामागचे कारण समजल्यानंतर कमाल अमरोही यांनी समक्ष भेटून तिचा गैरसमज दूर केला. त्यानंतर मीना कुमारीने सदर चित्रपट करण्यासाठी होकार दिला. दरम्यानच्या काळात मीना कुमारी यांना अपघात झाला. तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्या कालावधीत कमाल अमरोही तिला ससून हॉस्पिटलला नियमित भेटावयास येत असत. ‘अनारकली’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेबाबत तिने अमरोही यांना विचारले असता तिच्या हातावर ‘मेरी अनारकली’ असे लिहीत. त्या भूमिकेसाठी अन्य कुणाच्या नावाचा विचारही करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात हाताला इजा झाल्यामुळे मीना कुमारीला कायमस्वरूपी बँडेड लावावे लागले. साडी अथवा ओढणीत तो हात तिला लपवावा लागत असे. पुढे ‘अनारकली’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होऊनही आर्थिक बाबींमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अमरोही यांना मा.मीना कुमारी ‘चंदन’ तर अमरोही तिला ‘मंजू’ या नावाने संबोधत असत. वडिलांच्या संमतीशिवाय निकाह करण्यास मीना कुमारी तयार नव्हती. आधी लग्न करू आणि मग घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांची संमती मिळवू, असे अमरोही यांनी पटवून दिल्याने मा.मीना कुमारी राजी झाली. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी मीना कुमारीला वडिलांनी तिची लहान बहीण महलिकासह फिजिओथेरपी उपचारासाठी एका दवाखान्यात सोडलेले असताना रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान प्रथम शिया आणि सुन्नी पद्धतीने मोजक्या साक्षीदारांसह दोघांचा निकाह झाला. पुढे वडिलांना समजल्यावर ते संतापले. तलाक व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी दोघांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणले. मीना कुमारी यांना पती, कमाल अमरोहीच्या ‘डेरा’ चित्रपटात अभिनय करायची इच्छा होती. मात्र अली बक्ष यांनी मेहबूब खान यांच्या ‘अमर’ या चित्रपटात अभिनय करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. त्या चित्रपटाचे चार-पाच दिवसांचे चित्रीकरण झालेले असताना मेहबूब खान यांच्याशी मतभेद झाल्याने मीना कुमारी ‘अमर’ चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट सोडून पती कमाल अमरोही यांच्या ‘डेरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेली. या कारणामुळे वडिलांनी रात्री घरात न घेतल्याने पयार्याने मा.मीना कुमारी यांना कमाल अमरोही यांच्या घरी जावे लागले. मा.अमरोही यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये होती. त्यामुळेच खूप इच्छा असूनही मीना कुमारीला मूल होऊ न देण्याचा निर्णय त्यांचेकडून तिच्यावर लादला गेला.
परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मा.मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा,मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. पुढे ‘साहिब बिवी और गुलाम’ आणि ‘काजल’ चित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार तिला मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी ‘मैं चुप रहूंगी’, ‘आरती’ आणि ‘साहब बिवी और गुलाम’ चित्रपटांसाठी सवरेत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने तिलाच मिळालेली होती. मा.मीनाकुमारी ही अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. ‘नाझ’ या नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. मा.मधुबाला ह्या मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते. मा.मीना कुमारी यशाचे शिखर काबीज करत होती. मात्र कमाल अमरोही यांना तिच्या यशाचा हेवा वाटू लागला होता. सोहराब मोदी यांनी एका चित्रपटाच्या प्रीमियरवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल यांना कमाल अमरोही यांचा परिचय लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारी यांचे पती असा करून दिला होता. तेव्हा ‘मी कमाल अमरोही व ही माझी पत्नी मीना कुमारी’ असे नमूद करत अमरोही त्या कार्यक्रमातून निघून गेले. मीना कुमारीने अभिनय करणे सोडून द्यावे, असे त्यांना वाटत असे. मात्र मीना कुमारीने नकार दिल्याने त्यांनी काही अटींवर तिला अभिनय कारकीर्द सुरूठेवण्यास अनुमती दिली. चित्रीकरण आटोपून साडेसहा वाजण्याच्या आत घरी परतणे. मेकअपरूममध्ये मेकअपमनशिवाय अन्य कुणाशी संवाद न साधणे. स्वत:च्याच वाहनाने प्रवास करणे, अशा त्या अटी होत्या. मात्र मीना कुमारीने त्या निमूटपणे स्वीकारल्या. तरी त्यांच्या वैवाहिक संबंधात दुरावा येत होता. पुढे ते विभक्त राहू लागले. मीना कुमारी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनेता धमेंद्र हा चित्रपटांत जम बसवण्यासाठी धडपडत होता. मीना कुमारीच्या यशाचा धमेंद्रला मोठया प्रमाणावर फायदा झाला. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मीना कुमारीची विमानतळावर भेट झाली असता त्यांनी तिच्याकडे धमेंद्रबाबत विचारणादेखील केली होती. पुढे मात्र ‘फूल और पत्थर’ चित्रपटानंतर धमेंद्रने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली. तिची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी झोप येण्यासाठी तिला एक पेग ब्रँडी घेण्याची सूचना केली. पण एक पेगचे दोन, दोनचे चार असे पेग वाढतच गेले आणि मीना कुमारी पुरती नशेच्या आहारी गेल्या. चित्रीकरणावेळी, प्रवासात सगळीकडे तिच्यासोबत पर्समधे मदिरेची छोटी कुपी असायची. ‘साहिब बिवी और गुलाम’मधील ‘छोटी बहू’ हे पात्र आपल्या वास्तव जीवनाशी साधम्र्य असल्याचे मीना कुमारी सांगत असत. त्यानंतरच्या काळात कमाल अमरोही त्यांच्या महात्त्वाकांक्षी ‘पाकिजा’ चित्रपटाची निर्मिती करत असताना आर्थिक संकटांना तोंड देत होते. त्या चित्रपटात मा.मीना कुमारी केवळ अभिनयच करत होती, असे नाही तर तिने तिची सर्व मालमत्ता अमरोही यांच्या चित्रपटासाठी पणाला लावली होती. तरीही ‘पाकिजा’चे चित्रीकरण अनेक वर्षे रखडले गेले. सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पुढाकार घेऊन पुन्हा चित्रीकरण केले. ३ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद फारसा मिळाला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतरच मा.मीना कुमारीचे निधन झाले. मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे
मीनाकुमारी यांची काही गाणी, पाकिजा चित्रपट, बायोग्राफी
https://youtu.be/0R04XbzDNjU
https://youtu.be/qkD39k9xaVQ
https://youtu.be/XtdGZd7vR-U
https://youtu.be/jNdVm0W7Vtc
https://youtu.be/TnM5g4eTYUI
https://youtu.be/Q2X6u0Zg8P8
Copyright © 2025 | Marathisrushti