स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर ह्यांनी गौरविलेला, मी लिहिलेला हा लेख मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झाला होता.
बलवंत संगीत मंडळीच्या मानापमान नाटकामध्ये मास्टर दीनानाथांनी धैर्यधराची भूमिका करण्यास १९२७ मध्ये सुरुवात केली ! मास्टर दीनानाथांच्या आधी अनेकांनी रंगभूमीवर धैर्यधर साकारला होता. "मानापमान"मध्ये मास्टर दीनानाथांनी पदांच्या चाली बदलण्यापासून सर्व ठिकाणी नाविन्य निर्माण केले !
गरिबी-श्रीमंतीचा झगडा, शौर्याच्या पार्श्वभूमीवरील शृंगाररसाने ओथंबलेले मानापमान नाटक ! त्याला कालमानाचे, वेशांतराचे बंधन कशाला ? म्हणून मास्टर दीनानाथांनी आपल्या पहिल्या रुपामध्ये आमुलाग्र बदल केला. पहिल्या अंकातील साधा लष्करी नोकरीमधला एक सेनापती, आपल्या वधूची निवड करावयास येतो, म्हणजे तो गणवेशात नसणारच ! दुस-या अंकाचेवेळी, छावणीभोवती चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असतो, त्यावेळी त्याला गणवेश हवाच ! तिस-या अंकात त्याला पृथ्वीवर महाराजांकडून तीन चांदीची सरदारी आणि पंचवीस लाखांची जहागिरी मिळालेली असते, म्हणजे धैर्यधर त्याच दिमाखात दिसावयास हवा ! चौथ्या अंकात त्याचा ऐश्वर्यभोगांकित शृंगाररस सादर करावयाचा आहे म्हणून मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या भूमिकेतील वेशाविश्करण वेळोवेळी बदलून, रंगभूमीवर आणले, याचे नाट्याचार्य खाडिलकर ह्यांनी खूप कौतुक केले. ते म्हणाले, "माझे हे नाटक कालमानानुरूप आणि विधानककुशल आहे, असा जो मला सुरुवातीपासून एक आत्मविश्वास होता, तो या स्थित्यंतरित मास्टर दीनानाथांच्या भूमिकेनेही बळावला !"
रणदुंदुभी नाटकामधील मास्टर दीनानाथांची तेजस्विनीची भूमिका बघून, श्रीमान पसारे अप्पा ह्यांनी मास्टर दीनानाथांना बक्षीस म्हणून चांदीची ढाल आणि तलवार दिली होती. ह्या चांदीच्या ढालीचा आणि तलवारीचा उपयोग मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या भूमिकेसाठी केला !
मानापमान नाटकामध्ये धैर्यधराची भूमिका करतांना, दुस-या अंकात, मास्टर दीनानाथांचा वेष इंग्रजी चित्रपटातील एखाद्या जुन्या काळच्या सेनापातीप्रमाणे दिसे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते रुदाल्फ व्हलेंटिनो हे अशा पद्धतीचा पोषाख करीत. या सेनापतीच्या पोषाखात मास्टर दीनानाथ रुबाबदार दिसायचे !
मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या पदांना रसानुकुल नव्या चाली लावल्या. "माता दिसली" या पदात, "नेत सकल रणवीर रणासी" ही ओळ गातांना मास्टर दीनानाथ तानांची उसळी घेत. रणवीरांचे ठिकाण रणांगण हे ते पटवून देत असत, "चंद्रिका ही जणू" हे पद मास्टर दीनानाथ दुर्गा रागात गायचे. त्रिताल बदलून, रूपक तालात, म्हणायचे. "दे हाता या शरणांगता" या पदाच्यावेळी तर हा वीरपुरुष केवळ वनमालेच्या दृष्टीक्षेपात घायाळ झाल्यामुळे हतबल, दीन होऊन, तिची प्रेमभराने मनधरणी करीत असल्याचा गोड भास रसिकांना होत असे. "रवी मी चंद्र कसा" ही चाल मास्टर दीनानाथांनी कवीच्या भावनांची सुयोग्य गुंफण करून केली, असे वाटते. धैर्यधराच्या त्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी ठेक्याची योजना केली.
"प्रेमसेवा शरण" हे ऐकतांना तर रसिक प्रेक्षाकांची खात्री व्ह्यायची, की रणांगणावरील हा सेनापती, रमणीच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालून घायाळ झालाय ! मूळ भिमपलास मधले हे पद मास्टर दीनानाथांनी मुलतानी अंगाने म्हणण्यास सुरुवात केली. मास्टर दीनानाथांच्या ह्या भूमिकेला, या पदांना संगीतप्रेमींनी प्रत्येक खेळास उदार आश्रय दिला. प्रत्येकवेळी वन्समोअर मिळणारे पद होते, "शूरा मी वंदिले"!
मानापमानच्या प्रयोगास सुरुवात होताच, मास्टर दीनानाथांच्या उत्साहाला जणू उधाण फुटायचे ! आपल्या नवीन चाली रसिकांना आपण कधी ऐकवितो, असे त्यांना व्ह्यायचे. नाटकातील संभाषणे आवरून, ते गाण्यावर स्थिर होत असत. गाण्याची सुरुवात करतांना, मास्टर दीनानाथ पेटीवाल्यांच्या साथीची वाट पाहायचे नाहीत. त्यांच्या गाण्यावरून, जणू पेटीवाल्यांनी सूर लक्षात घ्यायचा ! रंगभूमीवरच्या गायनात पेटीची साथ न घेता, गाण्याची अचूक फेक करणारे मास्टर दीनानाथ पहिलेच !
मानापमानमध्ये "माता दिसली समरी" या प्रथम पदापासून ते "प्रेम सेवा शरण" या अखेरच्या पदापर्यंत, प्रत्येक पदाला, प्रत्येक वेळी टाळ्यांच्या कडकडाटात वन्समोअर मिळविणारे दीनानाथ साक्षात "स्वरनाथ" होते !
एकदा शनिवारी कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरमध्ये मानापमानचा प्रयोग जाहीर झाला होता. त्याच दिवशी, त्याच वेळी, कोल्हापूरमध्येच देवल क्लबमध्ये मंजीखाँसाहेबांचे गाणे ठरले होते. बाबा देवल चिंतातूर झाले. ते वसंत देसाई ह्यांना म्हणाले, "अरे वसंता, आज आपल्याकडे मंजीखाँसाहेबांचे गाणे आणि तिकडे दीनाचे मानापमान, सगळेजण तिकडेच जाणार". हे ऐकताच वसंत देसाई ह्यांनी आनंदाने जोरात टाळी वाजवली !
पॅलेस थिएटर हाउसफुल्ल होते. धैर्यधराची भूमिका केलेल्या विद्यमान नटांनी कळत-नकळत "बलवंत"च्या या धैर्यधराला चार-आठ वेळा पैसे खर्चून मानाचा मुजरा केला होता.
बळवंत संगीत मंडळीने हैद्राबादहून आपला मुक्काम मुंबईस आणला, तेव्हां एकट्या मानापमान ह्या नाटकावरच मुंबईचा मुक्काम नवीन नाटकाप्रमाणे अत्यंत यशस्वी केला.
नटसम्राट बालगंधर्व, विनायकराव पटवर्धन, कृष्णराव फुलंब्रीकर, बापूराव पेंढारकर, आदी कलावंतांनी, मास्टर दीनानाथांची धैर्यधराची असामान्य भूमिका औत्सुक्याने पाहून गौरविली !
गोवा येथील मानापमानचा प्रयोग पाहून, लयभास्कर कपिलेश्वरी ह्यांनी मास्टर दीनानाथांना विचारले, "भाळी चंद्र"ची ठेवण आपण अशी कां योजली ?" त्यावर मास्टर दीनानाथ उत्तरले, "धैर्यधर जर मस्तकावर चंद्र धारण केलेला सुचवलाय, तर अशा उंच स्वरांची ठेवण नको कां ? प्रथम भावना आणि मग स्वर निर्माण झाला." मास्टर दीनानाथांचे हे उत्तर, कपिलेश्वरी ह्यांना मनोमन पटले !
श्रीमदजगत्गुरू श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी ह्यांनी मास्टर दीनानाथ ह्यांना, वैशाख वद्य ४ शके १८४४ म्हणजेच १४ मे १९२२ रोजी अमरावती येथे, "संगीतरत्न" हे बिरूद बहाल केले. त्याचे पूर्वपुण्य मास्टर दीनानाथांना धैर्यधराच्या निमित्ताने मिळाले !
बलवंत संगीत मंडळीने, १९३८ मध्ये कंपनीच्या पुनरुज्जीवनानंतर पहिला "रणदुंदुभी"चा तर दुसरा प्रयोग "मानापमान"चा केला होता. तेव्हांची एक आठवण ! त्या दिवशी पुणे येथे नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचा पहिला अंक झाल्यावर, मास्टर दीनानाथांचे स्नेही दादासाहेब जेस्ते त्यांना भेटण्यासाठी रंगपटात गेले. पाहतात तो काय ? मास्टर दीनानाथ तापाने कण्हत होते. जवळच औषधाची बाटली होती. "एवढा ताप आहे, तर आज काम कां करता ?" असे जेस्ते ह्यांनी विचारले. त्यावर मास्टर दीनानाथ म्हणाले, "संपूर्ण महिन्यात बलवंत संगीत मंडळीने लावलेली सर्व नाटके, माझ्या अनुपस्थितीमुळे बंद करावी लागली." प्रेक्षक तर मास्टर दीनानाथांशिवाय नाटक पाहण्यास तयार नव्हते. कंपनी चालविणे भाग होते. त्यामुळे तापातसुद्धा काम करणे, हे मास्टर दीनानाथांनी
आद्यकर्तव्य मानले होते. विशेष म्हणजे दुस-या अंकापासून त्यांनी नेहेमीप्रमाणे आपले आकर्षक गायन सादर केले !
या दिलदार आणि दानशूर धैर्यधराने गिरगावच्या एका शाळेच्या इमारत निधीसाठी मदत म्हणून "मानापमान"चा प्रयोग केला होता.
धुळ्याला १९४१ मध्ये बलवंत संगीत मंडळीची इतिश्री झाल्यानंतर, केवळ लोकाग्रहास्तव मास्टर दीनानाथांनी सांगली मुक्कामात मानापमानमध्ये धैर्यधराची भूमिका केली. ती रंगभूमीवरील त्यांची शेवटची भूमिका ठरली ! हा प्रयोग राजाराम संगीत मंडळीने केला होता. कंपनीचे मालक गंगाधरपंत लोंढे ह्यांनी मास्टर दीनानाथांना आग्रहपूर्वक विनंती केली होती.
सांगली मुक्कामात १९४१ च्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारावून टाकणारा हा एक प्रसंग ! मास्टर दीनानाथांनी, "दे हाता शरणांगता" ह्या पदातील "आपदा भोगी नाना" या ओळी म्हणताच, त्यांना गहिवरून आले. भावनेने ओथंबलेल्या स्वरात, पद चालू असतांनाच ते म्हणाले, "मला याच ठिकाणी आपदा भोगाव्या लागल्या." मास्टर दीनानाथांचे, हे वाक्य उपस्थित रसिक श्रोतृवृंदाने ऐकले मात्र आणि काही क्षण, सा-या थिएटरमध्ये गंभीर अशी शांतता पसरली. प्रत्येकाच्या चर्येवर मास्टर दीनानाथांविषयी वाटणारी सहानुभूती दिसू लागली. या व्यावहारिक जगात मास्टर दीनानाथांचे म्हणणे काय चूक होते ?
नाटकातील हा "धैर्यधर" कलावंत, वास्तव जीवनातही कृतीने आणि वृत्तीने तसाच "धैर्यधर" होता !
{मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झालेला लेख}
लेखक : उपेंद्र चिंचोरे
April 24, 2016
इंग्रजी आणि मराठीमधील वैज्ञानिक नियतकालिकांत त्या सातत्याने लेखन करीत असत. ‘समाजविकासासाठी व्यक्तिविकास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन पारीख यांच्या त्या पत्नी होत.
June 17, 2022
यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले.
July 6, 2021
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ, चिंतनशील गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे येथे झाला.
आई-वडील शिक्षक असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. तरीही मुलीनं डॉक्टर व्हावं, अशी आई-वडिलांची तीव्र इच्छा होती, पण हॉस्टेलवर एकटीनं राहण्याची तयारी नसल्यामुळे त्यांना डॉक्टर होण्याचा नाद सोडावा लागला. शेवटी शास्त्र शाखेतली पदवी संपादन करून नंतर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. खरं तर घरात संगीताची कुणालाच खास आवड नव्हती. संगीत घरात शिरले ते केवळ अपघातानेच. आईच्या आजारपणानं घर बेजार झाल्यामुळे कुणीतरी त्यांना पेटी शिकवण्याचा उपाय सुचवला. आईचं मन त्यात रमलं नाही, पण लेकीनं मात्र सूर पकडला आणि आयुष्यभर सुरांनीही प्रभाताईंना उत्तम साथ दिली.
सुरुवातीच्या काळात विजय करंदीकरांच्या शिकवणुकीतून प्रभाताईंना सुरांची ओळख झाली. रागांशी परिचय झाला. ताल समजू लागला आणि ख्याल, ठुमरी, नाटय़गीत, भावगीत यांसारखे सगळे गानप्रकार त्या मैफलींमधून गाऊ लागल्या. त्यांनी ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर व त्यांचे प्रतिभावंत बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडे सातत्याने अनेक वर्षे शिक्षण घेतले. सुरेशबाबू व त्यांच्या मोठय़ा भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्यावरील प्रभाताईंच्या गाढ श्रद्धेचाही प्रत्यय वाचकांना त्यांच्या लेखनातून वारंवार येतो. एके ठिकाणी त्या म्हणतात-
‘‘व्यवसायातल्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकदा मन:शांती ढळण्याचे प्रसंग येतात. मैफल उखडल्यासारखी होते. रियाजानंही समाधान मिळत नाही. जीवनावरची श्रद्धा डळमळायला लागते आणि हलकेच बाबूराव आणि हिराबाई आपले सूर घेऊन मनात वस्तीला येतात. तेवढा एक क्षण पुरेसा होतो. मन पुन्हा उभारी घेतं. शांत परिसरात असलेल्या शिवालयातील शुचिर्भूतता रियाज करताना मला माझ्या सुरांतून जाणवायला लागते. जीवनावरची श्रद्धा पुन्हा दृढ व्हायला लागते.’’
आकाशवाणी नागपूर केंद्र व मुंबई आकाशवाणीवर काही काळ संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी नोकरी केली. त्यानंतर मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या संगीत विभाग प्रमुख म्हणूनही जवळजवळ दहा वर्षे त्या कार्यरत राहिल्या. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून मा.प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकी सोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही मा.प्रभा अत्रे यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात.
प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला. रंगमंचावर गाण्याचा प्रभावी आविष्कार कसा करावा त्याचे तंत्र त्यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून आत्मसात केले. मा.प्रभा अत्रे यांनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीतिकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या होत्या. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभर व्हावा, या उद्देशाने डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन या संस्थेची त्यांनी केलेली स्थापना हे एक महत्वाचे पाऊल ठरले. डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन स्थापना आणि पुणे येथे ‘स्वरमयय गुरुकुलची’ स्थापना करुन, शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांना त्या विशेष प्रोत्साहन देत आहेत. क्रियात्मक संगीत आणि संगीत संशोधन या दोन्ही गोष्टींचे मार्गदर्शन त्या करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट केली आहे. संगीतविषयक अनेक प्रकल्पांमध्ये, कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांचा खूप मोठा शिष्य परिवार आहे, त्यात परदेशातून आलेले शिष्यही आहेत. प्रत्यक्ष क्रियेबरोबर लेखन, वाचन, चिंतन आणि चर्चाही महत्वपूर्ण असल्याचे त्या आपल्या शिष्यवर्गाला सांगतात. त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र शैलीत संगीतातील नवे राग निर्माण केले आहेत. आपल्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणारी मा. प्रभा अत्रे यांचे ‘स्वरमयी’ हे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकीच आनंद देतात. आपल्या सांगीतिक वाटचालीचा आढावा घेणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन म्हणजे ‘स्वरमयी.’ त्यांच्या ‘स्वरमयी’ या पुस्तकाला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक लाभले आहे. जवळजवळ दोनशेच्यावर बंदिशी त्यांनी लिहिल्या असून ‘स्वराली, अंतस्वर’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘आचार्य अत्रे अॅवॉर्ड, संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, स्वरसागर संगीत पुरस्कार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा ‘स्वररत्न’ पुरस्कार, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ऍ़वॉर्ड, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, इत्यादी पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. भारत सरकारने पद्मश्री व पद्मविभूषण देऊन गौरव केला आहे.
त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या विशेष पसंतीच्या रचना आहेत.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मा. प्रभा अत्रे यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=1zNuemR7KeA&t=24s
https://www.youtube.com/watch?v=fKmSE252OUo
https://www.youtube.com/watch?v=XaMW3iBoHfw
https://www.youtube.com/watch?v=aPj8nRdJ3B8
September 13, 2017
शिवाजी फुलसुंदर हे शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकरी बांधवांना नेमके काय हवे याची त्यांना जाणीव होती. गावाशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने शेतक-यांच्या प्रश्नांची दाहकता त्यांनी अनुभवली होती. सर्व प्रथम त्यांनी ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाचे शीर्षक गीत ज्येष्ठ कवी गीतकार शांतारामजी नांदगांवकर यांच्या सहकार्याने साकारलेले हे शीर्षक गीत “ही काळी आई,धन धान्य देई, जोडते मनाची नाती,आमची माती आमची माणसं,” घराघरात पोहचलेल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी विविध कृषीविषयक कार्यक्रमांची निर्मिती अनेक वर्षं केली आहे. शिवाजी फुलसुंदर यांनी १९८५ साली ‘गप्पागोष्टी’ हे नवीन सदर सुरू केले.
June 2, 2022
दाजीकाकांनी पुण्यासारख्या चोखंदळ बाजारपेठेत १९५८च्या प्रारंभी ‘मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी’ या नावाने दुकान थाटले. सांगलीहून आणलेले कुशल कारागीर आणि दाजीकाका व त्यांच्या पत्नी कमलाताई यांच्या आपुलकीमुळे पुणेकरांनी दाजीकाकांना आपलेसे केले.
September 11, 2021
जलरंगांची सखोल जाण हे त्यांचे वैशिष्टय़. आपल्या निष्ठांशी आणि कलेशी प्रामाणिक राहिलेल्या या कलावंताने हिंदुस्थानात प्रथमच १८९५ मध्ये, बॉम्बे आर्ट सोसायटीचे सर्वोच्च असे सुवर्णपदक मिळविले. मेयो मेडल, बेंबल पारितोषिक यांसह अन्य पाच सुवर्णपदके मिळविणाऱ्या धुरंधरांनी भारतीय धार्मिक सण, उत्सव, दरबार, प्राचीन काव्ये व ऐतिहासिक प्रसंगांची शेकडो चित्रे रेखाटली. विजयी शिवछत्रपतींचे तैलरंगातील त्यांनी काढलेले चित्र हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय होता.
June 1, 2022
रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉश यांचा जन्म २९ डिसेंबर १७६६ रोजी स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये झाला. स्कॉटलंडमधील ग्लासगोव्हमध्ये राहणारे चार्ल्स मॅकिन्टॉश हे केमिस्ट होते. चार्ल्स यांना रसायनशास्त्रात फारच रुची होती. कामावरून घरी आल्यानंतर ते रसायनशास्त्राचा अभ्यास करायचे. एका कार्यक्रमात चार्ल्स यांना कोळसा आणि नाफ्तापासून रबरचा वापर करता येईल, अशा तंत्रासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रेनकोटचा शोध लावण्यास सुरुवात केली. वेगवेगळे प्रयोग करण्यात ते नेहमीच व्यस्त असायचे.
नाफ्ता हा रबरमध्ये सहजासहजी विरघळतो. यापासून एक पदार्थ तयार होतो जो जलरोधक असतो हे चार्ल्स यांना एका प्रयोगादरम्यान कळले. त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही हे चार्ल्स यांना कळले. लोकरीच्या दोन अस्तरांना वितळवलेल्या रबरने जोडले आणि अस्तर शिवून कोट बनवला. जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट त्यांना १८२३ मध्ये मिळाले. पण त्याकाळात त्यांच्यावर आरोपही झाले हा शोध खरं तर त्यांचा नसून सर्जन जेम्स सिम यांच्याकडून त्याने ही कल्पना घेतली असेही आरोप झाले.
चार्ल्स यांचा हा शोध खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण पावसात स्कॉट नागरिकांचे बाहेर फिरताना हाल व्हायचे. छत्री होती पण ती असून नसल्यासारखीच. तसे जलरोधक कपडे होते पण त्यांचे वजनच खूप असायचे आणि त्याला कुबट वासही यायचा त्यामुळे अर्थात चार्ल्सने शोधलेल्या या नवीन रेनकोटला प्रसिद्धी लाभली नाही तर नवलच म्हणावे लागेल. चार्ल्स मॅकिन्टॉशचा हा पहिलावहिला रेनकोट जगभरात प्रचंड प्रसिद्ध झाला. त्यानंतर मूळ रेनकोटमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. चार्ल्स मॅकिन्टॉश यांचं २५ जुलै १८४३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2018
समाधी मंदिरावर मंदिर, मशीद, क्रूस व अग्निपात्राची प्रतिकृती आहे. जणू सर्व धर्माचं संचित इथे आहे! आतील भिंती व घुमटाच्या आत मेहेरबाबा व भक्तांची चित्रं रेखाटण्यात आली आहेत. समाधी मंदिराचा लाकडी उंबरठा ओलांडला की, समोर दिसतं मेहेरबाबांचं स्मितहास्य करणारं तैलचित्र.
January 31, 2022
कोकणचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेेल अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला.
अप्पासाहेब हे देशभरात मुख्यत: रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते.
ते स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. त्यांनी त्यांना तुरुंगात भंगीकाम करण्यास मिळावे म्हणून केलेला सत्याग्रह गाजला. कारण त्यांच्या समर्थनार्थ गांधीजींनीही उपोषण केले. एवढा परस्पर विश्वास त्या दोघांत होता.
महारबंधूंनी मेलेल्या पशूची कातडी सोडवणे बंद केले तेव्हा त्यांनी मृतपशूची कातडी, खतासाठी मांस आणि हाडे मिळवण्याच्या दृष्टीने अनेक चर्मालये काढली. तेथे भाई सुखी, बाबा फारक, बाळूदादा पानवलकर, शामराव जोशी, बांदेकर हे त्यांचे पहिल्यापासूनचे सोबती व अनेक ब्राह्मण सहकारीसुद्धा काम करत. ते सगळे स्वातंत्र्यसैनिक होते. दलितमित्र रमाकांत आर्ते यांनीही खूप काम केले. अप्पांनी भंगी कष्टमुक्तीसाठी चराचे संडास, गोपुरी संडास, सोपा संडास असे अनेक संडास लोकप्रिय केले.
मानवी विष्ठेसचा खतासाठी उपयोग करताना त्यांपनी शौचघरे शास्त्रीय पद्धतीने बांधली. त्यांनी 3 फूट x 3 फूट x 3 फूट आकाराच्या दोन टाक्या बांधल्या. या टाक्याध एकमेकांना लागून होत्या. टाक्यांच्या वरच्या बाजूस मधोमध शौचविधी करण्यास दीड फूट लांब व नऊ इंच रुंद अशी पोकळ जागा ठेवण्यात आली. शौचविधी झाल्यानंतर त्यावर माती टाकण्यात येई. असे केल्यानंतर सहा महिन्यांत त्यातून सेंद्रिय खत तयार होई. एक टाकी भरली, की दुसऱ्या टाकीचा उपयोग केला जाई.
अप्पासाहेबांनी त्याला 'गोपुरी शौचघर' असे नाव दिले. अप्पांनी त्याकाळात कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लँट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोगही केले. त्यावर पुस्तके लिहिली.
अप्पासाहेब पटवर्धन हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे यांनी या आश्रमाला भेट दिली आहे.
अप्पासाहेबांचे ५० वर्षा पूर्वीचे विचार आजही जनतेसाठी प्रेरणादायी आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
November 4, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti