इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
June 27, 2022
संगीतकार शंकरराव व्यास यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या मा.शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात मा. पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. मा.शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून मा.पलुसकर यांनी त्यांना आपल्या बरोबर घेतले. मा.पलुसकर यांनी स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात ९ वर्ष शिक्षण घेतले. नंतर ते अहमदाबाद येथील राष्ट्रीय विद्यालय येथे शिक्षक झाले. पलुसकर यांनी लाहोर येथे स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात प्राचार्य म्हणून गेले. १९३८ मध्ये शंकरराव व्यास हिन्दी फिल्म संगीतच्या क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली. १९३८ मध्ये आलेल्या ‘पूर्णिमा’ या चित्रपटात काही गाणी गायली.
गायना बरोबर चित्रपटातील रचना त्याच्या गाजू लागल्या होत्या. व्यास यांच्या संगीतबद्ध, भक्ति प्रधान गाणी लोकांना आवडू लागली होती १९४० मध्ये ‘सरदार’, ‘नरसी भगत’ व १९४२ मध्ये ‘भरतमिलाप’ या चित्रपटातील गाणी खूप गाजली. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. रामराज्य’चे दिग्दर्शक विजय भट्ट महात्मा गांधींना ‘रामराज्य’ दाखवायला घेऊन आले होते, पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही म्हणत एक-दोन रिळे पाहून गांधीजी निघून गेले.
महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट म्हणून ‘रामराज्य’ची खूप पब्लिसिटी झाली. सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या धोबिणीची भूमिका पाश्र्वगायिका अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकीने केली होती. लव यशवंत निकम तर कुश मधुसूदन होते. प्रभातच्या ‘संत ज्ञानेश्वर’मध्ये याच यशवंताने बाल ज्ञानेश्वराची भूमिका केली होती. मन्ना डे यांनी हिंदी व मराठी या दोन्ही चित्रपटांत पाश्र्वगायन केले होते. हा चित्रपट गाजला तो शंकरराव व्यास यांच्या सुमधुर संगीतामुळे! विशेषत: रंजनावर चित्रित झालेल्या व सरस्वती राणे यांनी गायिलेल्या भीमपलासी रागातील ‘बीना मधुर मधुर कछु बोल’ या गाण्यामुळे! असा भीमपलासी गेल्या सत्तर वर्षांत परत कधी ऐकायला मिळाला नाही. त्यांना विजय भट यांच्या ‘रामराज्य’ या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. खरे तर हे गाणे के. सी. डे यांनी म्हणावे अशी संगीत दिग्दर्शक शंकरराव व्यास यांची इच्छा होती. पण के. सी. यांनी मन्नादांचे नाव सुचविले.
मन्नादांचा आवाज व्यास यांना आवडला. या चित्रपटाचे संगीतकार होते शंकरराव व्यास. या चित्रपटातील राग वर आधारित गाणी खूप लोकप्रिय झाली होती, ‘भारत की एक सन्नारी की हम कथा सुनाते हैं...’ ‘वीणा मधुर मधुर कछु बोल...’। शंकरराव व्यास यांनी ही दोन्ही गाणी राग काफी व भीमपलासी मध्ये रचली होती. व्यास यांची कुशलता केवळ फिल्म संगीत मध्ये नव्हती तर त्यांनी शास्त्रीय गायन, संगीत शिक्षण व ग्रन्थकार म्हणून काम केले. शंकरराव व्यास यांनी पार्श्वगायक मन्ना डे यांच्या कडून ‘रामराज्य’ चित्रपटातील गाणी गावून घेतली होती. शंकरराव व्यास यांचे १७ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 3, 2019
२००५ मध्ये १० बुद्धिमान महिला खेळाडूंविरुद्धच्या नॉर्थ उरलस कप स्पर्धेतही तिने बाजी मारली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक तर जिंकलेच, शिवाय आणखी एक सुवर्णपदक तिने मिश्र सांघिक गटातही जिंकले. त्यानंतर २०१५ ला चीनमधली चेंगडू इथे भरलेल्या महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले. २०१९ मध्ये ती जागतिक रॅपिड चॅम्पियन ठरली.
March 31, 2022
वेदांग ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीचं प्रतीक. मोठय़ा उत्साहानं आणि जोशानं साजरा केला जाणारा सण. सणाचं हेच औचित्य साधून मला फोटोशूट करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. शूटसाठीच्या मॉडेलचा माझा शोध सुरू झाला. त्यात मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशा कलावतीच्या मी शोधात होतो. ही शोधमोहीम संपली आणि मी थेट फिल्मसिटीत पोहचलो ते पाडव्याच्या फोटोशूटसाठी. मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया संस्कृती बालगुडे हिचं फोटोशूट यानिमित्तानं मी केलं. हिरव्या बॅकग्राऊंडवर बेतलेलं, संस्कृती बालगुडेचा मराठमोळा सात्त्विक चेहरा आणि उभारलेल्या गुढीचं पूजन हे सारं एकीकडे कॅमेराबद्ध करत असतानाच दुसरीकडे शूटच्या वेळच्या अनेक आठवणी तेव्हा माझ्या शिदोरीत जमा होत होत्या.
संस्कृती बालगुडेची नि माझी ही पहिलीच भेट होती. चंद्रकांत गायकवाड या नामांकित तरुण दिग्दर्शकानं ही भेट खरंतर घडवून आणली होती. अवघ्या एक दिवस आधी हे शूट आम्ही ठरवलं होत. वेळेअभावी फारसं शूटचं नियोजन आम्हाला करता आलं नव्हतं. एरव्ही एखाद्या सणासाठीच शूट करायचं झालं तर त्याची फार जय्यत तयारी करावी लागते. कलावतीचा शृंगार, पेहराव, दागिने, शूटसाठीचा लूक आणि मग हे शूट तडीस नेण्यासाठी रंगभूषा, वेशभूषा साकारण्यासाठी लागणारे आर्टिस्ट, प्रॉपर्टी अशा नानाविध बाबींच पूर्वनियोजन करून मगच शूट आयोजित केलं जातं. मात्र वेळेअभावी भेटून, ठरवून हे शूट काही आम्हाला करता आलं नाही. सारं काही ठरलं ते फोनवर. नेमकं शूट कसं असेल, त्यासाठी काय अपेक्षित आहे, लूक कसा असेल, काय प्रॉपर्टी असेल हे सारं मी आणि संस्कृतीनं फोनवरच ठरवलं होतं. तेव्हा ‘पिंजरा’ या मालिकेत संस्कृतीची मध्यवर्ती भूमिका होती. याच मालिकेच्या सेटवर मी आणि संस्कृती भेटलो. संस्कृतीसोबत तिची आईदेखील होती.
सेटवर शूट असल्याने मेकअप, हेअर आणि कॉश्च्युम यासाठीची तयारीत आम्हाला फारसं लक्ष घालावं लागलं नाही. या मालिकेत संस्कृतीचा जो पेहराव होता त्याच पेहरावात आम्ही फोटोशूट केलं. सेटच्या आवारात असलेल्या झाडांच्या हिरव्या बॅकग्राऊंडवर आम्ही हे शूट केलं. एकीकडे मालिकेचं शूट सुरू असल्याने आम्हाला या वेळी फार कमी वेळ मिळाला होता. आतून संस्कृतीला सारखा आवाज दिला जात होता. मात्र संस्कृतीचं सगळं लक्ष फोटोशूटकडे होतं. तिचा चेहरा फार बोलका होता. संस्कृती गुढीची पूजा करत असतानाचे हावभाव, तिचा हसरा-मोहक चेहरा मी कॅमेराबद्ध करत होतो. मोजक्या वीस-पंचवीस मिनिटांत हे शूट आम्ही केलं. या वेळी संस्कृतीच्या भावमुद्रा फार महत्त्वाच्या होत्या. अन्यथा हे शूट पूर्ण करणं शक्य झालं नसतं. इतक्या कमी वेळात, एका मालिकेतल्या आपल्या मध्यवर्ती भूमिकेतून बाहेर पडून मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया मराठमोळ्या स्त्रीच्या भूमिकेत जाऊन त्या भूमिकेला न्याय देणं हे संस्कृतीला या वेळी उत्तम जमलं होतं. इथेच एका कसदार कलाकाराचं लक्षण या वेळी संस्कृतीत मला पाहायला मिळालं.
या शूटनंतर आमची दुसरी भेट झाली ती स्टुडिओ शूटच्या निमित्ताने. मराठमोळा चेहरा अशीच या शूटचीदेखील थीम होती. मात्र या वेळी शूटचं नियोजन उत्तम करता आलं होतं. मला हवा तेवढा वेळ या शूटसाठी मिळणार होता. कोणतेही निर्बंध नव्हते. कसलीही घाई नव्हती. संस्कृतीनेही शूटसाठीचा वेळ राखून ठेवल्याने त्याचा शूटसाठी फायदाच झाला होता. स्टुडिओतलं शूट असल्याने लायटिंगवर ताबा मिळावणं शक्य होत. शूटसाठीची थीम संस्कृतीशी बोलून मग त्यानंतर कॉश्यूम, मेकअप, हेअर आणि दागिने हे सर काही संस्कृतीला शूटच्या आधी माझ्या टीमनं सांगितलं होतं. संस्कृतीलाही ही थीम आवडली होती. त्यामुळे शूट चांगलं होईल अशी आकांक्षा मला होती.
शूटसंबंधित संस्कृतीशी बोलून आम्ही ठरल्याप्रमाणे शूटला सुरुवात केली. संस्कृतीचा लोभस चेहरा, तिने केलेली पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने हे सारं काही कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं. या वेळी ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाइट पोर्ट्रेट्समध्ये संस्कृती अधिक खुललेली दिसत होती.
तीन-साडे तीन तासांअंती हे शूट धम्माल मस्तीत संपलं खरं. मात्र या वेळच्या अनेक आठवणी आजही कायम आहेत. वेळेच्या गणितात बांधली गेलेली आणि वेळेच्या साच्यात न अडकलेली अशा दोन्ही भिन्न वेळेची संस्कृती मी कॅमेराबद्ध केली आहे. दोन्ही वेळी मला शूटला न्याय देणारी कलावती हवी होती. आणि ती कलावती साकारण्यात संस्कृती यशस्वी ठरली.
धनेश पाटील
February 18, 2019
कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कविवर्य राजा बढे
राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. मा.राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे मा. राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. मा.राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र'मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले. १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं. बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. मा.राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. मा.राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत मा.बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. मा.राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली. शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. मा.राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
तेव्हा आणि आता...
एक राजा -
टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..
दुसरा राजा -
टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
"आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!''
राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
राजा बढे यांचे कवितासंग्रह
‘हसले मनी चांदणे', ‘माझिया माहेरा जा', ‘क्रांतिमाला', ‘मखमल', ‘मंदिका'.
February 1, 2017
आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे. ८४ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा...’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे.
आशाताई अघोषित भारतरत्न’च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार नाही. लतादीदींसोबत कुण्याही गायिकेची तुलना होऊच शकत नाही, हे एकवेळ मान्य केले तरी,लतादीदींच्या तुलनेत आशा भोसलेंचे गानकर्तृत्व कुठेही मागे नाही. उलट आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ आहे, जे माधुर्य आहे, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही. गाण्यांची जेवढी व्हेरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली आहे, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देतात! स्वतंत्र छाप आशाताईंनी संगीतविश्वाीच्या सुरील्या दुनियेत उमटवली, तेही लतादीदींसह शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहॉं, सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! तब्बल सहा दशके रसिकमनावर गारूड घालणार्याज व आज वय वर्षे ८४ असतानाही तोच मधुर स्वर आशाताईंकडे आजही कायम आहे. मात्र, ‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिलेला आहे. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वारसाने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वाूसाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही! ‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्याकरवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते.लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं़! आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.
१९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.
५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्या’ ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’...
'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला.
आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ - इंटरनेट
September 8, 2016
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उमेश कामत यांचा जन्म १२ डिसेंबर १९७८ रोजी झाला. मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. "कायद्याच बोला" या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.
कायद्याच बोला,समर - एक संघर्ष, पटल तर घ्या, अजब लग्नाची गजब गोष्ट ,मणि मंगळसूत्र ,थोडी खट्टी थोडी हट्टी, धागे दोरे,,परीस, टाइम प्लीज, माय डिअर यश ,लग्न पाहावे करून, पुणे वीअ बिहार ,बाळकडू, अ पेइंग घोस्ट, मुंबई टाइम, अश्या अनेक मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.umeshkamat.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 3, 2019
हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
‘द मॅन हु वुड बी द किंग’, ‘पॅसेज टु इंडिया’ सारख्या चित्रपटांमधून त्यांचे काम जगाने पाहिले. ‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘गांधी’, ‘दिल’, ‘जब प्यार किसीसे होता है’ सारख्या अनेक बॉलिवूडपटांतून कधी वडिलांच्या, कधी काकांच्या भूमिकेतून समोर आलेले चरित्र अभिनेता सईद जाफरी अशी त्यांची लोभसवाणी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. अभिनेत्री आणि लेखिका मेहरुनिसा (मधुरी जाफरी) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र १९६५ मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मधुरी यांच्यापासून मीरा, झिया आणि सकिना जाफरी अशा तीन मुली असून त्याही अभिनयाच्या क्षेत्रात आहेत.
सईद जाफरी यांनी अनेक सिनेमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. यात शतरंज के खिलाडी, गांधी, राम तेरी गंगा मैली, दिल, अजुबा, हिना या सिनेमांचा समावेश असून त्यातील त्यांच्या विशेष भूमिका गाजल्या. राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये सईद जाफरी यांची भूमिकाही नजरेत भरणारी होती. सईद जाफरी यांचे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 21, 2017
पं.अनंत केशव उर्फ राजाभाऊ कोगजे हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांचे आईवडील दोघेही संगीतप्रेमी होते. वडील संगीत नाटकात काम करायचे. राजाभाऊंनी आपल्या वडिलांकडून संगीताचे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यासाठी जबलपूरचे पं. गोविंदराव मुलतापीकर (विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य). यांच्याकडे पाठवण्यात आले.
March 1, 2024
दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते.
त्यांचा जन्म ३० मार्च १९२८ रोजी बेळगाव येथे झाला. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत लाड अशा मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला.
रविकिरण मंडळाच्या सदस्यांनी त्या काळात कविता गाण्यास सुरूवात केली होती. जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजानन वाटवे यांनी काव्यगायनास आरंभ केला. मास्टर दत्ता यांनी याच काळात भावगीत गायन सुरू केले. गजानन वाटवे यांना गुरू मानून त्यांनी विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर केले. आकाशवाणीच्या पुणे, मुंबई केंद्रावर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.
दत्ता वाळवेकर यांनी गायलेल्या गीतांची पहिली ध्वनिमुद्रिका ‘रिगल’ कंपनीने १९४९ मध्ये काढलेली होती. अत्यंत शुध्द शब्दोच्चार आणि गोड आवाज ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. गीताचा अर्थ श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी ते भावपूर्ण उच्चार करीत. त्यांच्या अर्थवाही गाण्यामुळे श्रोते प्रभावित होत. करमणुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे जाहीर कार्यक्रम हेच लोकांना आवडत असत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा वेळी मा.वाटवे, मा.नावडीकर आणि मा.दत्ता वाळवेकर या त्रिकुटाने राज्यातील अनेक गावात आपल्या गाण्याने लोकांना मोहित केले.
नव्या पिढीमधील गायकांना दत्ता वाळवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होत असे. त्यांनी ’’पुष्पविण कल्पतरू’’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले. खत्री भाषेच्या अभ्यासावर त्यांनी लिहिलेले ’’क्षात्र बोली’’ हे पुस्तकही गाजले. १९७६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना खत्री भाषेवरील संशोधनासाठी पी. एच. डी. प्रदान केली.
पुणे साहित्य संमेलनात तसेच कराड नाट्य संमेलनात त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात २००८ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात जीवनभर संगीत क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल विषेश गौरव करण्यात आला.
दत्ता वाळवेकर यांचे १६ मार्च २०१० रोजी निधन झाले.
दत्ता वाळवेकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली दुर्मिळ गीते, त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांची दृक्-श्राव्य मुद्रणे, वेगवेगळ्या वाहिन्यांवर झालेल्या त्यांच्या मैफली, विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती हे http://www.dattawalvekar.com या संकेतस्थळावर आपण बघू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दत्ता वाळवेकर यांची गाजलेली काही गाणी.
सांग पोरी सांग, हे काय गडे, गोपाल गोपाल नाचलो नानापरी गोपाल, माइया स्वप्नात आला सखा, काय झालं विचारू नका, जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे, का ठेविल्या इथे खुणा, आठविती मज पुन्हा पुन्हा, स्वप्नातल्या मिठीचे रोमांच अजुनी गात्री
https://youtu.be/4wePRfs_uqU
https://youtu.be/u4Jp5nUbQQc
https://youtu.be/QPAT236XS5k
March 18, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti