क्रीडा क्षेत्रातील दिग्गज पत्रकार व मराठीतील ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला.
वि. वि.करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक मानले जाते. खेळासाठी झोकून काम करणाऱ्या पत्रकार करमरकरांनी क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात कोणतीही लवचीकता न ठेवता ते सतत सत्याचा ध्यास धरत राहिले.
‘वि.वि.क.’ या नावाने प्रचलित असलेले विष्णू विश्वनाथ करमरकर मुळचे नाशिकचे. वि. वि.करमरकर यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. पदवी परीक्षेपर्यंत ते नाशिकच्याच हंसराड प्रागजी ठाकरशी महाविद्यालयात शिकले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. झाले. वि. वि. करमरकरांचे वडील डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते.
मुलानेही आपल्याच क्षेत्रात कार्यरत व्हावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र त्यांच्या वडिलांनी ‘विष्णू’चा बाळहट्ट पुरविला. वि. वि. करमरकरांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना आडकाठी येऊ दिली नाही. शालेय जीवनात प्रा. ग. वि. अकोलकर, रि.पु. वैशंपायन व भट तर महाविद्यालयात प्रा. वसंत कानिटकर, प्रा. आचार्य, प्रा. सोहोनी, प्रा. राम बापट, मुंबई विद्यापीठात प्रा. दांतवाला, प्रा. कांता रणदिवे व प्रा. अप्पू नायर यांनी करमरकरांच्या आचार-विचारांना दिशा दिली. लोकशाही समाजवादी विचाराने क्रियाशील असलेल्या करमरकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, मधू लिमये यांना आपले आदर्श मानले.
पत्रकारिता करताना द्वा. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, साखळकर, पुरुषोत्तम महाले, चंद्रकांत ताम्हाणे, दिनू रणदिवे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी यांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या दैनिक ‘लोकमित्र’मधून केली.
जून १९६२पासून ‘टाइम्स’ समूहाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या क्रीडा विभागाचे प्रमुख व सहसंपादक या नात्याने खेळाच्या पानाचे यशस्वी संपादन केले. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभलेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त, तहान-भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.
क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांची दैनंदिन क्रीडा समीक्षा करणारे वि. वि. करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांनी उचलून धरले. आजही वाचकांना त्यांच्या लेखणीची ओढ कायम आहे. खेळाचे हौशी स्वरूप झपाटय़ाने बदलत गेले.
पाश्चात्त्य दुनियेइतके अफाट प्रमाणात नसले तरीही भारतीय क्रीडा क्षेत्रात साधारणत: मध्यम स्वरूपाच्या उद्योग समूहाचे (इंडस्ट्री) रूप येत आहे. त्याचा वेध करमरकरांनी सर्वप्रथम घेतला. औद्योगिक समूहात अटळ असलेली स्टेडियम्स, क्रीडा संकुले यांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांनी १९९३पासून झगझगीत प्रकाश टाकला.
१९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या बांधकामात सुमारे १००पर्यंत अनामिक मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’मधून मांडली. दक्षिण कोरिआ, क्युबा, केनिया आदी छोटय़ा देशांच्या तुलनेतील भारतीय खेळाडूंचे मागासलेपण या गोष्टी ते नेहमी मांडत राहिले. खेळ हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, ही व्यथा ते व्यक्त करतात.
खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वत: केले.
देशी व ऑलिंपिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन 'महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थे'ची त्यांनी निर्मिती केली. त्या संस्थेमार्फत ते सतत दहा वर्षे रत्ना गिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत राहिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी हा वसा अविरत चालू ठेवला.
बडय़ा क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी. व्ही. चॅनल्सवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 11, 2021
बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.
June 27, 2021
वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांना साहित्याचं नोबेल मिळालं. इतक्या कमी वयात दुसऱ्या कोणालाच साहित्याचं नोबेल मिळालेलं नाही.
December 30, 2021
लौकिक अर्थाने म्हणाल, तर शालेय शिक्षण नाही, व्यवसाय भिक्षुकीचा. वास्तव अगदी आडखेड्यात. त्यांचा जन्म ८ जुलै १९२८ रोजी वाडा, सिंधुदुर्ग येथे झाला.पण पंचेचाळीस र्वष निष्ठेने साहित्यसेवा, चोपन्न कादंब-या, तेराशे कथा अशी थक्क करणारी कामगिरी करणारे लेखक म्हणजे श्रीपाद काळे. वडिलांचा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय त्यांनी निष्ठेने सांभाळला. वडिलांनी घरीच भिक्षुकीचं प्राथमिक शिक्षण दिलं. मात्र, पुढील शिक्षण साता-याच्या वेदपाठशाळेत झालं.
दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ख्याती मिळविली. तशी घरीच गरिबीच, थोडीशी शेती अन् आंब्याची चार झाडं. पण मुळातच काटकसर आणि काटेकोर असणा-या माणसाला काहीही कमी पडत नाही हेच खरं. भिक्षुकी या व्यवसायाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली ती आपल्या वागण्यातून अन् व्यवसायातल्या निष्ठेतून. पारंपरिक कथांमधून असणारी ‘गरीब, बिचारा ब्राह्मण’ ही विशेषणं त्यांच्या मनाला रुचत नसत. स्वच्छ धोतर, पांढरा अंगरखा, काळी टोपी असा साधा पोशाख.
पण रस्त्याने जात तेव्हा लोक आदराने नम्र होत. अत्यंत मृदुभाषी, मितभाषी. पण त्यांच्या सहवासात यायला, त्यांचा सहवास मिळावा यासाठी माणसं आतुर होत. व्रतस्थपणे साहित्यसेवा करणा-या अण्णांशी ओळख व्हावी, जवळीक असावी असं प्रत्येकाला वाटत असे. भिक्षुकीला जाताना ते नेहमी चालत जात. वाड्यातून देवगड-दाभोळपर्यंत तर गिर्ये विजयदुर्गपर्यंत यजमान्याने सांगितलेल्या वेळेत हजर.
पूजाविधी, मंत्रविधी करताना कोणतीही काटछाट, शॉर्टकट्स त्यांना बिलकुल मान्य नसे. करायचं ते काम नीटनेटकं, मनापासून. भिक्षुकीचा व्यवसाय तरुणांनी करावा, यासाठी ते त्यांना प्रोत्साहन देत. पुढील पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचावं, ही परंपरा टिकून राहावी, तरुणांनी या व्यवसायात यावं यासाठी त्यांनी त्यांच्या घरी वाड्याला वेदपाठशाळा सुरू केली.
कुणाकडून एक आणासुद्धा न घेता आपल्याकडचं हे धन मुक्तपणे पुढच्या पिढीच्या हवाली केलं. आज कितीतरी तरुण त्यांची ही परंपरा पुढे चालवत आहेत. ब्राह्मण तरुणांना उदरनिर्वाहाचं एक उत्तम साधन त्यांनी मिळवून दिलं. बरेच लोक त्यांना अण्णा म्हणत. अण्णांना रिकामं बसलेलं कुणी कधीच पाहिलं नसेल. कधी माडाच्या झावळय़ांपासून हीर काढणं, जानवी करण्यासाठी सूत कातणं, जानवी, वाती तयार करणं, द्रोण-पत्रावळी बनवणं, होमासाठीची तयारी समिधा, दर्भ वगैरे जमा करणं, काहीना काही उद्योगात ते असतच असतं. श्रीपाद काळे मानसन्मान, गर्दी, माणसं यांपासून जरा दूरच असत. लेखन साधं,
व्यक्तिमत्त्व साधं म्हणूनच तर अनेक मान्यवर व्यक्ती मुद्दाम त्यांना भेटायला येत असत. दोन दोन दिवस राहत असत. पत्नी इंदिराबाईंची उत्तम साथ, त्याही नीटनेटक्या, चौथीपर्यंत शिकलेल्या. आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य करण्याची हौस. यामुळेच अण्णांच्या घरी आलेली माणसं तिथे रमत. श्रीपाद काळेंची ‘रानपाणी’ ही कादंबरी वाचून गो. नि. दांडेकर त्यांच्या घरी आले. चांगले दोन दिवस राहिले. येताना त्यांनी पेरूच्या दोन करंड्या आणल्या होत्या.
अण्णांच्या घराजवळ असलेलं पेरूचं झाड त्या बियांपासून तयार झालंय, असं वामन काळे सांगतात. त्यांचे हे धाकटे बंधू आकाशवाणी सांगली केंद्रावर निवेदक म्हणून कार्यरत होते. आता सेवेतून निवृत्त झाले आहेत.
थोर साहित्यिक रवींद्र पिंगेंशी तर अण्णांची गाढ मैत्री. या दोघांना एक त्र बघून खूप गंमत वाटे; यासाठी की रवींद्र पिंगे बोलघेवडे अन् श्रीपाद काळे मितभाषी. रवींद्र पिंगेंच्या पुस्तकात श्रीपाद काळेंविषयी लिहिलंय, अगदी तसेच होते ते जगदीश खेबूडकर, शं. ना. नवरे, शंकर वैद्य यांसारख्या थोर व्यक्तींनी या गावात पायधूळ झाडली ती केवळ अण्णांना भेटण्यासाठी.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तर कितीतरी वेळा येत. वाडा या छोटेखानी गावात वाचनालयातर्फे एक साहित्य संमेलन जवळजवळ २५-३० वर्ष भरत आहे. अण्णांनी याची सुरुवात केली. नामवंत व्यक्ती या साहित्य संमेलनाला आवर्जून हजर असतात. रेणू दांडेकर, वृंदा कांबळी, वैशाली पंडित, उषा परब, प्रा. तरुजा भोसले या माहेरच्या ओढीने वाड्याला येत. रेणू दांडेकरांशी तर त्यांचे कौटुंबिक संबंध जुळून आले.
श्रीपाद काळेंच्या कथा काय किंवा कादंब-या काय, विषय अगदी साधे, वाचकाच्या अवतीभवती घडणारे, नित्य अनुभवातले. त्यामुळे समजायला सोपे. गूढ, गर्भीत अर्थाची रचना नाही. शब्दांचा खेळ नाही. साधीसुधी भाषा, अगदी आपल्याशी कुणी बोलतंय. आपल्याला काही सांगतंय अशी. म्हणूनच ती वाचकांना भावली. ब-याचशा कथा कोकणच्या पार्श्वभूमीवरच्या, वर्तमान स्थितीतल्या.
स्वातंत्र्यानंतरच्या या मध्य कोकणातल्या कौटुंबिक, सामाजिक स्थितीचा अंदाज आपल्याला देणा-या आहेत. सभोवतालच्या जीवनात जे भलंबुरं दिसत होतं त्यांना त्यांनी कथारूप दिलं. कोकणातल्या दुर्गम भागात जगणारी माणसं, पोटापाण्याची जुळवाजुळव करताना वाट्याला आलेला अपमान, कष्ट सामाजिक संकेतांचं पालन करताना करावी लागणारी धडपड, सामाजिक संकेतांचं दडपण, सुख आणि दु:ख याचा पाठशिवणीचा खेळ, दैवाधिनता हे सर्व डोळसपणानं पाहिलं आणि कथाबीज फुलत गेलं.
‘प्रथा’ या कथेतील गोदाक्कावर गोठय़ाच्या कोप-यावर काही मारायचं या प्रथेचा पगडा असतो. आयुष्यभर ही प्रथा गोदाक्काला छळत राहते आणि प्रथेचं पालन पुढच्या पिढीकडून व्हावं म्हणून घरातल्यांना ती छळत राहते. गोदाक्का ही कोकणच्या संस्कृतीत जगणारी एक प्रातिनिधिक स्त्री.
श्रीपाद काळेंच्या कथेतल्या स्त्रिया कमालीच्या सोशीक आहेत. नव-याने दिलेली अपमानकारक वागणूक, सासरच्या माणसांकडून झालेला छळ त्या सोसतात, मुलांसाठी खस्ता खातात आणि त्यांच्याकडून होणारी प्रतारणा सहन करतात. त्यासाठी प्रारब्धाला दोष देतात, दैवावर हवाला ठेवतात. तुळशीला पाणी घालणं, सांजवात लावणं, अतिथींचं स्वागत करणं, व्रत नेमधर्म पाळणं हे त्यांचे कार्यक्षेत्र. त्या मनापासून सांभाळतात. आजच्या स्त्रीमुक्तीच्या काळात हे सर्व कालबाहय़ वाटतं. पण उंब-याची मर्यादा सांभाळणा-या या नायिकांनी घरातल्या प्रसन्नतेला तडा जाऊ दिला नाही.
बंड करण्याची, पेटून उठण्याची ऊर्मी मनात दाबून ठेवली. तेच त्यांचं ‘स्वत्त्व’ होतं. ते त्या स्त्रिया जपत राहिल्या. घरासाठी त्याग करणारी, पतीबरोबर फक्त सात पावलंच नव्हे तर अंतापर्यंत चालत राहणारी, संसार होमात आपल्या इच्छा-आकांक्षांना आहुती देणारी स्त्री. खरं तर हा प्रकृतीकडून पुरुषत्वाकडे वाटचाल करण्याचा हा मार्ग. भारतीय अध्यात्मशास्त्राचा भक्कम आधार या विचारात सापडतो.
श्रीपाद काळे यांनी आपल्या कथा-कादंब-यांतून निसर्गाची लोभस वर्णने रेखाटली आहेत. पाऊस लाल लाल पाणी, वहाळ, परे, पाणंद, गारगार वारा, समुद्र, खाड्या, पाखरं, जनावरं, खुरटलेल्या वेली, सूर्याची किरणं, चांदणी रात्र, निळंकाळं आकाश,
बहरलेली शेतं. आंब्या-फणसाची झाडं असे अनेकानेक संदर्भ सहजपणे येतात. ते वगळून कथानक पुढे सरकत नाही. त्या कथाबीजाला पूरक वातावरण हे संदर्भ देत राहतात.
पौषातली अमावास्या होऊन गेली तरी हाती काही लाभलंच नाही – खार मोठय़ा फणसावर जाऊन जिवाच्या आकांतानं चिवचिवत राहिली.
कथा प्रथा, ‘पाणी एकसारखे वाढत होते आणि केसुनानांच्या जिवाचा थरकाप वाढत होता..’ त्या उधाणाला पाण्याबरोबर माडाच्या सावल्या वाहत होत्या. लाकडाचे ओंडके बेगुमानपणे पाणी नेत होते. कथा चुटपूट कोकणच्या जीवनाला हा निसर्गही कधी साथ देतो कधी उग्र रूप धारण करून होत्याचे नव्हते करून टाकतो. कोकणातला सामान्य माणूस निसर्गाच्या या लहरीपणाचा मारा सहन करत ताठ उभं राहतो हे त्यांच्या कथांतून जाणवत राहतं.
भिक्षुकी हा व्यवसाय करत असताना माणसांशी त्यांचा अगदी जवळून संबंध आला. विविध दैविक कृत्य करताना त्यांच्यातला साहित्यिक जागा असायचा. माणसांचे विविध नमुने त्यांना भेटत. ते सांगत ब-याचशा कथा त्यांना तिथेच सुचत. चालत येताना, जाताना मनात त्या विषयाची जुळणी होई. दिवसभराच्या व्यापातून मुक्त झाल्यावर रात्री शांतवेळी त्या कथा कागदावर उतरत असत. वीज आली नव्हतीच, कडू तेलाच्या दिव्याच्या उजेडात, कंदिलाच्या उजेडात त्यांचं लेखनकार्य चालू असायचं हे एक वेगळंच यज्ञकर्म घडत होतं. साध्यासुध्या, प्रासादिक भाषेत श्रीपाद काळेंनी मानवी जीवनातल्या व्यथा, सुखदु:ख, चढउतार टिपले आहेत. लेखनातल्या मार्मिकतेने वाचनीयता वाढवली आहे. सोप्या मारलेल्या अनेक गाठी बघून आपल्याला कोडं पडावं, पण एक सूत ओढताच आपल्याला सगळय़ा गाठींचं रहस्य उमजून यावं, तसं माझं झालं आहे.
वांझोट्या झाडाला अचानक केव्हा तरी फूल दिसावं ना, तसं कैक दिवसांनी त्यांच्या मुद्रेवर हास्य उमललं- सहानुभूती. अशी वाक्यांची सुरेख पखरण त्यांच्या कथांतून आहे. श्रीपाद काळेंच्या कितीतरी कथांचे नुसते प्रारंभ, शेवट पाहिले तरी त्यांच्या प्रतिभाशक्तीचा प्रत्यय येतो. अण्णांना आपल्या मर्यादा ठाऊक होत्या. आपलं शालेय शिक्षण झालं नाही, याची त्यांना खंत वाटत असे, ते ती बोलून दाखवत. पण लेखनसेवेत खंड पडला नव्हता. मानसन्मान यांपासून दूर असणा-या श्रीपाद काळेंकडे मानसन्मान स्वत:हून चालत आले. ‘पिसाट वारा’ या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला. गुजराती, कानडी, हिंदी भाषांतून त्यांच्या कादंबरीची भाषांतरे झाली.
कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरीतर्फे त्यांच्या या साहित्यसेवेबद्दल पावस येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. १९९६ मध्ये लोकमान्य टिळक स्मृती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. श्रीपाद काळे यांचे निधन १८ जून १९९९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / संजीवनी फडके
श्रीपाद काळे यांच्या काही ठळक कादंब-या पिसाटवारा, रानपाणी, एक काळ, एक वेळ,माया, अभुक्त, उमा, काळोखाची वाट, तुटलेले पंख
कथासंग्रह : संकेत, संधीकाळ
June 23, 2018
म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे झाला. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगलेत झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले. १९४४ मध्ये ते मॅट्रिक झाले आणि १९४६ साली त्यांनी विलिंग्डन कॉलेजात असताना इंटर आर्ट्सच्या परीक्षेत तर्कशास्त्र या विषयासाठी ठेवलेले प्रसिद्ध असे सेल्बी पारितोषिक मिळविले. नंतर, १९४८ मध्ये बी.ए परीक्षेत इंग्रजी विषयासाठी त्यांना मुंबई विद्यापीठात एलिस पारितोषिक मिळाले. १९५० मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि मराठी विषयात एम.ए. पूर्ण केले. त्यानंतर हातकणंगलेकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगलीमधील विलिंग्डन महाविद्यालयात अर्धव्याख्याता म्हणून अध्यापन कारकिर्दीला सुरवात केली. पुढे धारवाड येथे महाविद्यालयात ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. १९५६ साली ते विलिंग्डन मध्ये परतले आणि तिथेच ते प्राध्यापकापासून ते प्राचार्य असे सलग १९८७ सालापर्यंत काम करीत राहिले. हातकणंगलेकर हे वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांचा मराठी साहित्याचा व्यासंग खूप दांडगा होता. त्यातूनच त्यांनी ललित लेखनाला प्रारंभ केला आणि पुढे जाऊन ते समीक्षात्मक लेखन करू लागले. तत्कालीन सत्यकथा, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, वसंत, वीणा, महाव्दार अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन चांगलेच गाजू लागले. याच काळात मराठीचे नामवंत कथालेखक जी.ए. कुलकर्णी ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. ’जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपान्रे प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबर्यांीचे इंग्रजीत अनुवाद केले.
आपल्याला आलेल्या अनेक अनुभवावरून ’उघडझाप हे आत्मवृत्त वाचकांच्यासमोर आणले.. त्याचे प्रकाशन त्यांचे साहित्यिक मित्र आणि प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले होते.
त्यांनी समीक्षा केलेल्या अनेक कांदबर्यास आणि साहित्याबाबत त्यांनी आपली मते ठामपणे मांडलेली असायची त्यामुळे त्याविरोधात कोणीसुद्धा ब्र काढू नये इतके ते मत ठाम आणि परिपूर्ण असायचे. त्यामुळेच त्यांच्या स्मीक्षेला मराठी साहित्यात चांगलेच वलय प्राप्त झालेले असे.
म,द, हातकणंगलेकरांनी साहित्य संस्कृती मंडळ तसेच विश्वकोश मंडळावरही अनेक वर्ष काम केले होते. त्यांनी अनेक नवसाहित्यिकांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचा जो प्रयत्ना केला त्यातून अनेक नवे साहित्यिक तयार झाले. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले.मराठीतील अक्षरवाङ्मय इंग्रजीत अनुवादित करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. महाराष्ट्राबाहेरच्या भारताला आणि जागतिक साहित्य विश्वााला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली. सांगली येथील ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ते अध्यपदाच्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडले गेले होते. म.द. हातकणंगलेकर २५ जानेवारी, २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 1, 2019
हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिके बरोबरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्या वर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते.
March 28, 2022
भाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त केली होती. भाईंच्या वजनाचे तबले यावेळी भाईंना भेट म्हणून मिळाले होते. हे तबले भाईंच्या घरी एका काचेच्या कपाटात दिमाखात सजले होते. याच तबल्याच्या पार्श्वभूमीवर मी भाईंचा आणखी एक फोटो टिपला. भाईंची सांगीतिक श्रीमंती या फोटोकडे नजर टाकल्याच क्षणी दिसते. मी टिपलेला हा फोटो भाईंनादेखील खूप भावला आणि म्हणून माझ्यासाठी तो विशेष ठरला. पुढे हाच फोटो स्वरदायिनी ट्रस्टच्या दिनदर्शिकेसाठी वापरला गेला होता.
March 30, 2019
शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन निंजा अशा कार्टून मागे असलेला आवाज मेघना एरंडे. तिचा जन्म २४ एप्रिल १९८१ रोजी झाला.
मेघना एरंडेला आत्तापर्यंत प्रेक्षकांनी अनेक मालिका आणि सिनेमांतून बघितलंय. तिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर गंमत म्हणून डबिंग करायला लागली. पण नंतर ती तिची पॅशनच बनली. शिनचॅन, नॉडी, डोरेमॉन अनेक कार्टून्सना मेघना एरंडे ने आवाज दिला आहे, निंजा तिच्यासाठी टर्निंग पाँइंट ठरला. निंजा हतोरी हे कार्टून खूप हुशार, मजेशीर, प्रामाणिक आहे.
निंजा सगळी लहान मुलं बघतात याचं भान ठेवावं लागतं. शिनचॅनचं 'इतनी भी तारीफ मत करो' हे लोकप्रिय वाक्य किंवा निंजाचा 'डिंग डिंग डिंग'हा आवाज कानावर पडला, की सगळ्या बच्चे कंपनीच्या टीव्हीवर उड्या पडतात. ही कार्टून्स दिसतात अफलातूनच. पण, या पोरा-टोरांना टीव्हीकडे खेचून आणतो तो त्यांचा अल्लड आवाज मेघना एरंडेचा. कार्टून्सची समयसूचकता, त्याचा खरेपणा, त्याची समतोल साधण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींचा मेघनाला अभ्यास करावा लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 25, 2017
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्घ आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले.
September 16, 2019
वि. म. कुलकर्णी यांनी निरनिराळ्या ठिकाणी भरलेल्या कविसंमेलनात सहभाग घेतला. त्यांच्या कवितांना श्रोत्यांच्या पसंतीची दादही उत्तम मिळत असे. त्यांनी लिहिलेली ‘न्याहरी’ हा संग्रह आणि ‘विसर्जन’ ही कादंबरी विशेष लोकप्रिय ठरली. त्यांची ‘झुक झुक गाडी’ सारखी बालगीतं, तशीच ‘चालला चालला लमाणांचा तांडा’ सारखी दहावीच्या पुस्तकातील कविता लोकप्रिय होती.
October 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti