स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती.
March 9, 2022
कविता, गाणी, शेर-शायरी, पटकथेचे ‘शब्दप्रभू’ आणि आपल्या लेखणीची रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच नाही.
जुन्या लोकप्रिय गीतांच्या निवडक गीतकारांच्या यादीतील अव्वल नाव अख्तर यांचे आहे. गीते व पटकथा लेखनापलीकडे सामाजिक कार्यकर्ता व विद्रोही विचार मांडणारे लेखक अशीही त्यांची ख्याती आहे. ‘लावा’, ‘तरकश’ त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकांच्या अन्य भारतीय भाषांमध्ये आवृत्त्याही निघाल्या आहेत. आजवरच्या या लिखाणातून त्यांनी भारतीय तरुण मनांना अनोखी ऊर्जा दिली आहे. धार्मिक गुंतागुंत मानवाला पुढे जाण्यापासून रोखत असल्यानेच त्यांनी निरिश्वरवादाचा वेळोवेळी पुरस्कार केला आहे. मा.जावेद अख्तर यांची अशी विशेष ओळख आहे. १९७० ते १९८० च्या दशकात सलीम खान-जावेद अख्तर या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपट रसिकांना दिले. ‘अंदाज’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘डॉन’ या त्यांच्या चित्रपटांना सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले, एका वादानंतर हा इतिहास घडवणारे दोन्ही पटकथाकार बाजूला पडले ते आजतागायत. १९९३ साली जावेद अख्तर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे शेवटची पटकथा लिहिली होती. ‘सिलसिला’ चित्रपटापासून अलीकडच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटामधील गीतांनी युवापिढीचे भावविश्व भारून टाकले. आज चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला पन्नास पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे.
एक प्रभावशाली गीतकार म्हणून त्यांना स्वत:ला हिंदी चित्रपटांमधील कुठली गाणी आवडतात, असे विचारल्यावर साठ आणि सत्तरचे दशक हे चित्रपट संगीताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते असे ते सांगतात. सत्तरच्या दशकांमधली चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी, त्यांचे बोल, त्यांचं संगीत, त्यांचं दिग्दर्शन आणि ज्या कलाकारांवर ती चित्रित केली गेली ते कलाकार अशा अनेक गोष्टी अनमोल होत्या. मा.जावेद अख्तर यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.अभिनेत्री मा.शबाना आझमी जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत.जावेद विवाहित असून दोन मुलांचे(फरहान आणि जोया)वडील होते.तरीदेखील शबाना यांचा जावेद यांचा जीव जडला होता.शबाना यांचे कुटुंबीय यांच्या लग्नाच्या विरोधात होते.परंतु त्यांनी ठाम निश्चय केला होता आणि जावेद यांच्याशी लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 18, 2018
कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा.
अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं.
मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट अख्खी मुंबई. पुण्यातील कसबा पेठेत वाढलेल्या दीपक नावाच्या मराठी मुलाने कफ परेड भागात बत्तीस मजल्यांचा अवाढव्य टॉवर बांधलाय. कसबा पेठ म्हणजे तेला तांबोळय़ांची वस्ती, असं खुद्द लोकमान्य टिळक म्हणत. पेपरची लाइन टाकून, टेलिफोन पुसत, अपार कष्ट करून तेला तांबोळय़ांच्या वस्तीतून लहानाचा ‘मोठ्ठा’झालेला दीपक आज सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक आहे.
पूर्ण नाव दीपक सखाराम कुलकर्णी. वय ५५ ते ६०च्या अध्येमध्ये. त्यांनी मुंबई-पुण्यापासून, हैदराबाद, चेन्नई, अमेरिकेपर्यंत सर्वत्र घरं बांधली आहेत. पुणे-मुंबई प्रवासात, दिवसभराच्या मीटिंग्ज आणि बिझी शेडय़ूलमध्येही त्यांचा तजेलदार चेहरा, नीटनेटका पोशाख, मुख्य म्हणजे गळय़ातली टाय नजरेत भरते.
‘‘टेलिफोन बिझनेसमध्ये टाय लावायला शिकलो.’’ सव्वीसाव्या मजल्याच्या छोटेखानी टेरेसवर फोटोशूटसाठी संपूर्ण सहकार्य करत दीपक कुलकर्णी क्षणार्धात गप्पांच्या मूडमध्ये शिरतात. ‘‘टेलिफोन पुसत असताना ओळखी होत गेल्या. ‘ब्ल्यू डायमंड’चे पी. एल. किलरेस्कर म्हणाले, ‘तू ताजला का नाही जात? मी चिठ्ठी देतो, तुझं काम होईल.’ मी गेलो. हातात किलरेस्करांची चिठ्ठी. अंगावरचा वेश गबाळा. हाफ बुश शर्ट, बिनइस्त्रीची बेलबॉटम, पायात स्लीपर्स. दरवाजातच अडवलं. गुरख्यासाठी पेहेरावाचं इम्प्रेशन अधिक महत्त्वाचं होतं. पुन्हा किलरेस्करांसमोर उभा राहिलो. त्यांनी तिथल्या तिथे शंभर रुपये काढून दिले. म्हणाले, ‘आजपासून स्वच्छ इस्त्रीची पॅण्ट. फुल शर्ट, पायांत बूट, चप्पल विसरायची आणि टाय वापरायची. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसारखा वेश हवा. कुणी अडवणार नाही.’१९७१-७२ ची ही गोष्ट असावी. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून आजतागायत टाय लावला आहे. मधल्या काळात काढला होता. १९८० साली बिल्डर झालो, तेव्हा पांढरा सफारी चढवला. टिपिकल बिल्डरचा ड्रेस. गळय़ात गोफ एकदम झकपक. सलमान खानच आम्ही जणू. मग माझ्या लक्षात आलं, आपण लोकांपासून दूर जातोय. नाइलाज म्हणून लोक येतायत, धंदा होतोय, पण लोकांना आपलेपणा वाटत नाहीय. पुन्हा जुन्या पेहेरावावर आलो.’’
आज कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या दीपक कुलकर्णी यांनी सुरुवात कशी व कुठून केली? त्यांचा पहिला बिझनेस कोणता? कुलकर्णी तपशीलवार सांगू लागतात.
‘‘वडील पोलिस खात्यात. आई शिक्षिका.
आई बिचारी दिवसभर कष्ट करायची. आम्ही तीन भाऊ, आमची एक बहीण. आमची आई सकाळी निघायची, आमचा पूर्ण स्वयंपाक करून. शिकवण्या, शाळा, पुन्हा शिकवण्या. घरी येताना बेतलेले कपडे घेऊन यायची. आमच्याकडे हप्त्यावर घेतलेलं शिलाई मशीन होतं. बेतलेले कपडे म्हणजे लहान मुलांच्या चड्डय़ाबिड्डय़ा. त्या शिवून दिल्या की, डझनाला सहा आणे मिळत. तिचा दिवस कष्टात निघून जायचा. आम्ही म्युनिसिपल शाळेत. पंचवीस नंबरची शाळा. आमचं घर म्हणजे जेमतेम दीड खोली. शाळा सकाळ-दुपार शिफ्टमध्ये, उरलेला वेळ मित्रांसोबत.
माझ्या मित्रांच्या वडिलांचे छोटे-मोठे व्यवसाय होते. एकाची चन्यामन्या फुटाण्याची गाडी होती. दुसरा सुगंधी सुपाऱ्यांच्या पुडय़ा भरत असे. मग मी एकासोबत चन्यामन्याची गाडी लावायचो, शनिवार पेठेतल्या अहिल्यादेवी मुलींच्या शाळेसमोर आणि दुस-याला सुपारीची परात भरायला मदत करायचो. माझ्या दोन्ही मित्रांचे वडील महिन्याला दोन-तीन रुपये देत.
अशा प्रकारे मला दरमहा पाच ते सहा रुपये मिळू लागले. दिवाळीत आमचे वडील आम्हा चार भावंडांना मिळून पाच रुपयांचे फटाके आणत. आम्ही त्याची वाटणी करत असू. मग मी म्हणायचो, ‘दादा, माझेपण सात रुपये आहेत. पाच रुपयांचे तुम्ही फटाके आणा. सात रुपयांची आपण घरासाठी एखादी छान वस्तू आणू.’ तो आनंद वेगळा होता.’’
सोळाशे कोटींचं साम्राज्य असणाऱ्या दीपक कुलकर्णीच्या डोळय़ांत सात अधिक पाच रुपयांचा ‘तो’ आनंद चमकून जातो.
‘‘मी पेपर टाकण्याची लाइन निवडली. ही माझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची
नोकरी. पाच किंवा दहा रुपये महिन्यावर (आता नक्की आठवत नाही) मी पेपरवाला पोऱ्या झालो. १९५८-५९ सालची गोष्ट सांगतोय मी. एकदा कधी तरी मी साडेपाचऐवजी सव्वासहाला पोहोचलो. मालकाने खाडक्न माझ्या मुस्काटीत मारली. ‘ही काय यायची वेळ झाली? माझं गिऱ्हाईक गेलं.’ त्या दिवशी माझी पहिली आणि शेवटची नोकरी गेली. मुस्काटीत खाल्ली. अपमान झाला. माझी स्वत:ची पेपर लाइन काढली. तो माझा पहिला व्यवसाय.
होलसेलवर पेपर घ्यायचो, कमिशन मिळायचं. पूर्वी अकरावी (मॅट्रिक) चा रिझल्ट पेपरमध्ये छापण्याची पद्धत होती. मॅट्रिकचा रिझल्ट सायकलला बांधला. कॅम्पात जाऊन एक आरोळी ठोकली की, दहा मिनिटांत चटणीसारखे पेपर संपायचे. चार आण्याचा अंक बारा आण्याला विकला जात असे. त्या दिवशी ‘प्रीमिअम’ काय असतं, ते लक्षात येत असे. आम्ही त्या दिवसाची वाट बघत असू.
एका वर्षी पायजम्याच्या दोन्ही खिशात मिळून ऐंशी रुपये होते. सगळी चिल्लर, मी दोन्ही हातांनी घट्ट धरली होती. त्यापुढे आजचे आठ की सोळा की बत्तीसशे कोटी रुपये फिक्के आहेत.’’
दीपक कुलकर्णी थांबतात. आज मागे वळून पाहताना, व्यवसायात मिळालेला टर्निग पॉइंट त्यांना नेमका कोणता वाटतो? ठराविक एखादा प्रसंग किंवा घटना, ज्यामुळे त्यांचा
भविष्यातला मार्ग सुकर झाला.
‘‘ एम. एस. कॉलेजला प्री-डिग्री (किंवा एफवाय)ला असताना आम्हा विद्यार्थ्यांना सुट्टीत दीड-दोन महिन्यांकरिता एखाद्या कारखान्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंगला पाठवत. मला ‘किलरेस्करऑइल इंजीन’मध्ये पाठवण्यात आलं. तळमजल्यावर त्यांचं टेलिफोन एक्सचेंज होतं. मोठे लाकडी बोर्ड, जाड सुतळीच्या वायर्स, कानाला भलेमोठे ‘इअरफोन्स.’ सोनपट्टी नावाचे इन्चार्ज होते. म्हटलं, ‘मला शिकवाल का?’ पहिल्याच दिवशी त्यांनी माझ्या तोंडाजवळ (इअरफोनसकट) माईक धरला आणि मी तोंड वळवत हाताने तो ढकलून दिला. त्याला डेटॉलचा उग्र वास येत होता. दर तीन मिनिटाला ऑपरेटर बदलला जात असे आणि टेलिफोन पुसून आत डेटॉलचा बोळा ठेवण्यात येई. माझ्या मनात विचार आला की, डेटॉलऐवजी यात अत्तराचा बोळा ठेवला तर?
माझ्या मैत्रिणीला मी हे सांगितलं. मैत्रीण म्हणजे जिच्यावर मी प्रेम केलं आणि विसाव्या वर्षी जिच्याशी लग्न केलं ती, माझी मैत्रीण- (पत्नी) ज्योती. तिने माझी कल्पना उचलून धरली. एफवायला आमचं प्रेम जमलं. तिची आर्थिक परिस्थिती बिकट.आम्ही गुपचूप लग्न केलं. मी माझ्या घरी परत आलो आणि ती नारायण बागेतल्या महिलाश्रमाच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली. मी सेकंड इअर बीकॉमला. मला नोकरी नाही. पेपरची लाइन टाकणं हा काही बिझनेस होऊ शकत नव्हता. मी कोणत्या तोंडाने आई-वडिलांना सांगणार होतो? त्यातून माझ्या मोठय़ा भावाचं आणि मुख्य म्हणजे मोठय़ा बहिणीचं लग्न व्हायचं होतं.
टेलिफोनची आयडिया मी माझ्या पत्नीला सांगितली आणि आज इतक्या वर्षानी मी उघडपणे सांगू शकतो की, तिने ती आयडिया डेव्हलप करून पूर्णत्वाला नेली. भांडवलाची आवश्यकता होती. ६५ ते ७० रुपये आणायचे कुठून? तिच्या वडिलांनी तिला कानातले इअरिंग्ज दिले होते, तिच्यापाशी ट्रान्सिस्टर होता.
तिने दोन्ही गोष्टी विकल्या. ७२ रुपये मिळाले. ते आमचं पहिलं भांडवल. आमचा पहिला बिझनेस सुरू झाला. ‘टेलिफोन क्लिनिंग सव्र्हिस’- ‘टेलिस्मेल.’ तो कमालीचा क्लिक झाला. पुण्यात एकमेव ‘टेल्को’ वगळता बाकी सर्व इंडस्ट्रीत आम्ही जात होतो. ‘बँक ऑफ इंडिया’ सोडली, तर सगळय़ा बँकांच्या शाखांचे टेलिफोन आम्ही पुसत होतो.
अत्तराचा वास, सात दिवस टिकत असे. आठवडय़ातून एकदा, महिन्यातून चार वेळा एक फोन पुसायचे आम्हाला तीन रुपये मिळत. फोन जास्त असतील, तर दोन ते अडीच रुपये. दिवसाला दीडशे फोन आम्ही दोघं मिळून सहज पुसत असू. आमचा टर्नओव्हर होता दिवसाला सरासरी पंच्याहत्तर ते शंभर रुपये . महिन्याला सरासरी दोन हजार रुपये. दोन हजारांत नेट प्रॉफिट होता बाराशे ते चौदाशे रुपयांचा.
मी १९७० सालातली गोष्ट सांगतोय. बँकेचा मॅनेजरदेखील तेव्हा दरमहा हजार-अकराशे रुपये कमावत होता आणि मी बीकॉमच्या दुस-या वर्षाचा विद्यार्थी. बाराशे रुपये कमावत होतो. दिवसभर कष्ट केल्यामुळे झोपही छान लागत होती.’’
बिल्डर व्यवसायात शिरण्यायोग्य परिस्थिती कधी निर्माण झाली?
‘‘गरजेपोटी मार्ग सापडत जातात. मला ऑफिस हवं होतं. स्वस्तात कुणी टेबलस्पेस देईल का, या शोधात होतो. अलका टॉकीजशेजारी एका ऑफिसमध्ये टेलिफोन पुसायला जात होतो. त्या मालकाला विचारलं- तो म्हणाला, ‘जागेला रंगबिंग लाव, इंटिरिअर कर. मग तू बस.’ इंटिरिअर डिझायनरचे पैसे परवडेनात. मग मीच रंगाचं कॉण्ट्रॅक्ट घेतलं. ६६ रुपयांत काम झालं. कॉण्ट्रॅक्टरने स्क्वेअर फूटच्या हिशेबाने घेतले असते १०० रुपये. जवळपास चाळीस टक्के फायदा. मी या धंद्यात शिरलो. ‘पेंट ऑल’ ही माझी कंपनी होती. एकदा किलरेस्करांचा बंगला रंगवताना डोक्यावरचं छप्पर गळायला लागलं. (फॉल्स सीलिंग) त्यांचे इंजिनीअर वगैरे आले. मला म्हणाले, ‘दहा दिवसांनी या, आधी सीलिंग नीट होऊ दे.’ म्हटलं, भविष्यात आपण वॉटर प्रुफिंग करून द्यायचं. अनेक ठिकाणी रंगाऱ्यासह ठरलेल्या तारखेला उपस्थित राहिलो की, फ्लॅटमालक सांगणार, ‘पुढल्या आठवडय़ात या.
अजून फर्निचर व्हायचंय.’ रंगाऱ्यांची मजुरी घरबसल्या अंगावर पडू लागली. मनाशी ठरवलं, आपणच फर्निचर करायचं. वॉटर प्रुफिंग, प्लम्बिंग, जुनी फरशी बदलून देणं (फ्लोअरिंग), मेन गेट लोखंडी करणे या सर्व गोष्टी मी करू लागलो. १९७३ ते १९८० घरातला कोपरा न् कोपरा दुरुस्त करू लागलो, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की, लोकांनी बिघडवलेलं घर दुरुस्त करण्यात आपली ताकद घालवतोय. त्याऐवजी स्वत:च घर बांधू लागलो तर? आणि ८० साली मी बिल्डर झालो. ‘अर्बन लॅण्ड सीलिंग’ होतं.
३३०, रास्ता पेठ. मी विकत घेतलेला पहिला वाडा आजही माझ्या डोळय़ांसमोर आहे.’’ बोलता बोलता दीपक कुलकर्णी थांबतात. त्यांना पुढच्या अडीच तासांत कफ परेडहून पुणे गाठण्याची घाई असते. ‘‘एका शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न आहे. तो म्हणाला, ‘साहेब, तुम्ही नाही आलात, तर मी पंक्तीला बसणार नाही.’ ही माझी कमाई आहे. फ्लॅटहोल्डर्स मला ‘आपले’ वाटतात. त्यांच्या घरी जातो, बसतो, कांदे-पोहे खातो. एरवी बिल्डर आणि फ्लॅटहोल्डर्स यांचा काडीचा संबंध उरत नाही, म्हणूनच आजच्या मंदीचा आमच्याशी काही संबंध नाही.
आमचा अलिखित नियम आहे- ‘इन्व्हेस्टर्स- ब्रोकर्स नॉट अलाऊड.’ ब्रोकर्सना आम्ही फ्लॅट विकत नाही. बिझनेसच्या चौकटीबाहेर खूप गोष्टी करायच्या आहेत. मला लेखन करायचंय, मला (ओल्ड) महाबळेश्वरला जाऊन लेखन करायला आवडतं. चालणं हा माझा छंद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर माझी भक्ती आहे. विज्ञानावर निष्ठा आहे.
अगदी माझा पहिला खरेदी केलेला रास्ता पेठेतला वाडा, अपशकुनी म्हणून इतर बिल्डर्स नाकारत होते, मी घेतला तोही विज्ञानाच्या निष्ठेपोटी. दोन इच्छा प्रबळ आहेत. अमेरिकेतलं ‘मॅन हॅटन’ म्हणजे आम्हा बिल्डर लोकांची काशी, पंढरी. तिथे दीडशे मजल्यांची बिल्डिंग बांधायची आहे. ऑलरेडी न्यू जर्सीपर्यंत पोहोचलोय आणि दुसरी इच्छा म्हणजे मला पेढी काढायचीय- ‘दीपक सखाराम आणि मंडळी, सोन्या-चांदीचे व्यापारी’ अशी बाहेर पाटी हवी. मला छान तलम धोतर नेसायचंय, जुन्या काळातला डगला शर्ट घालायचाय, डोक्यावर टोपी घालून पेढीवर येणाऱ्या लोकांचं स्वागत करायचंय.’’ क्षणभर पॉझ घेतात, डोळे मिचकावून मिश्कीलपणे म्हणतात, ‘‘आणि सध्या मी पुण्याला निघालोय. शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नाला, नाही तर त्याला वाईट वाटेल.’’ सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक, चालक, सर्वेसर्वा एका शेतकऱ्याचं मन राखण्याकरिता म्हणून पुण्याच्या वाटेने भरधाव सुटला. हीच ओळख कायम राहावी याकरिता कायम झटत असतात आणि घरापेक्षा घरपण राखलं जावं म्हणून जिवापाड मेहनत करतात पुण्याचे दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके.
March 12, 2017
जेमिनी गणेशन यांनी १९५७ साली ‘मिस मेरी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.
March 22, 2022
डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांनी वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण नागपूर येथे सुवर्णपदकासह पूर्ण केल्यानंतर आरोग्या समस्या सोडविण्यासाठी सहा वर्षे ग्रामीण भागात जाऊन काम केले. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी झाला. डॉ. अभय बंग हे सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. सार्वजनिक आरोग्यसेवा परिणामकारकरीत्या कशी करावी, हे शिकवण्यासाठी त्यांनी फोर्ड फेलोशिप अंतर्गत १९८३ साली अमेरिकेत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात एमपीएचचे शिक्षण घेतले. येथे त्यांना डॉ.डोनाल्ड हेंडरसन व डॉ. कार्ल टेलर हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील दोन दिग्गज गुरू म्हणून लाभले. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी गडचिरोलीतील स्त्रिया व आदिवासींचे आरोग्य, दारू व तंबाखूचे व्यसन, तसेच बालमृत्यू हे प्रश्न सोडविण्यासाठी केला. बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले घरोघरी नवजात बालसेवा हे मॉडेल जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात ९ लाख आशांव्दारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप ((मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅनसेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
डॉ.अभय बंग यांच्या सर्च या संस्थेची वेबसाईट.
http://searchforhealth.ngo/
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
October 3, 2017
प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या गिरिजा ओक. तिचा जन्म २७ डिसेंबर रोजी झाला. १५ वर्षाची असताना तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळे मडगुळे' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' या झी मराठी वरिल मालिका हि तीची पहीली मालिका होती. जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या तिचं ‘दोन स्पेशल हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. ही हरहुन्नरी अभिनेत्री बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
December 28, 2017
रमाबाई पंडिता यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी झाला.
रमाबाई पंडिता या स्त्रियांचा सर्वांगीण विकास, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रियांची कर्तबगारी यांबाबत बुद्धिमत्ता व स्व- कर्तृत्वाच्या साहाय्याने प्रतिकूल परिस्थितीतही पायाभूत कार्य केलेल्या विदुषी!
परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत.
रमाबाई पंडिता यांचा जन्म अनंतशास्त्री व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई १५-१६ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून-विशेषतः आईकडून-संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतिकारी असा विवाह होता. कारण पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या.
बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले. परदेशातील वास्तव्यात त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या व त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक काऱ्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या.
भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ ज्यू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले. ११ मार्च, १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर, १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.
अशा या थोर विदुषीला १९१९ साली ‘कैसर-ए-हिंद’ सुवर्णपदक मिळाले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व काऱ्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवला होता.
पंडिता रमाबाई यांचे ५ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे पंडिता रमाबाई यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
April 5, 2022
अमोल पालेकर आणि झरिना वहाब यांच्या अभिनयानं सजलेला 'घरोंदा' हा हिंदी सिनेमा अनेकांच्या आजही स्मरणात आहे. तिचा जन्म १७ जुलै १९५९ रोजी झाला. चितचोर हा चित्रपट ही खूप गाजला होता. त्यातली अल्लड, लग्नाळू वयातली झरिना वहाब यांनी काम अप्रतिम केले होते. ‘चितचोर’ चित्रपटात नायिकेची भूमिका करून एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या झरिना वहाब हिने तिच्यापेक्षा सहा वर्षाने लहान असलेल्या आदित्य पांचोलीशी लग्न केलं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 17, 2017
‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
त्यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी झाला.त्यात ३७ हिंदी, ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचे डेहराडून येथे प्रारंभीचे शिक्षण झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली व नंतर हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथे त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. १९४८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले व साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. राज कपूर अभिनित सुनहरे दिनचे ते साहाय्यक दिग्दर्शक होते. तसेच त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उदा., फणी मजुमदार दिग्दर्शित बादबान व धोबी डॉक्टर. बहुहा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला कथाचित्रपट होय. त्यानंतर त्यांनी इन्स्पेक्टर, शेरु, डिटेक्टिव्ह व हिलस्टेशन हे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वतःची चित्रपटनिर्मिती संस्था १९५७ मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या निशाणाखाली त्यांनी हावडा ब्रिज हा पहिला चित्रपट निर्माण केला. त्याने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले. त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये हावडा ब्रिज, चायना टाऊन, काश्मीर की कली, इव्हनिंग इन पॅरिस, आराधना, कटी पतंग, अमर प्रेम इ. उल्लेखनीय आहेत. एकच चित्रपट दोन भाषांत (हिंदी व बंगाली) निर्माण करण्याचा प्रयोग प्रथमतः करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी अमानुष हा चित्रपट हिंदी व बंगाली या दोन्ही भाषांत १९७४ मध्ये निर्माण केला. भारत व बांगला देश यांच्या संयुक्त विद्यमाने, सहनिर्मिती असलेला पहिला चित्रपट सामंतांनी १९८४ मध्ये बनवला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सामंतांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्ना यांना नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले. त्यांपैकी आराधना, कटी पतंग व अमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले. राजेश खन्नाला सुपरस्टार पदावर पोहोचवण्यात या चित्रपटांचा मोलाचा वाटा होता. आराधना ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. मा.शर्मिला टागोर यांनी ‘अॅ न इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घातली आणि प्रचंड खळबळ उडवून दिली. चित्रपटाची नायिका ही पॅरिससारख्या ठिकाणी स्वत:च्या जीवावर युरोपभर प्रवास करत असल्याने तिचे अत्याधुनिक असणे अटळ होते. साहजिकच ही बिकिनी अत्यंत वेलस्क्रिप्टेड होती आणि मा.शक्ती सामंत या दिग्दर्शकाने ती अत्यंत योग्य रितीने शूट केली होती. ‘अमर प्रेम’ मधील ‘चिंगारी कोई भडके...’ या गाण्याचे शुटिंग कोलकता येथील हावडा ब्रिजखाली असलेल्या पाण्यामध्ये एका जहाजात करायचे, अशी योजना ठरली परंतु दिग्दर्शक मा.शक्ती सामंत यांना राजेश खन्नाच्या लोकप्रियतेची जाणीव होती. लोकांची हावडा ब्रीजवर एवढी गर्दी जमेल की, तो ब्रीज तुटेल अशी भीती त्यांना वाटली त्यामुळे त्यांनी एका स्टुडिओमध्ये हावडा ब्रीजचा सेट उभारुन शुटिंग करण्याचे ठरवले. काश्मीर की कलीपासून सामंत रंगीत चित्रपटनिर्मितीकडे वळले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय चित्रपटांत जाने-अन्जाने, मेहबूबा, आनंद आश्रम, अनुरोध, बरसात की एक रात व अलग अलग इत्यादींचा समावेश होतो. अतिरंजित भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत, लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही त्यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची बलस्थाने होत. सामंतांच्या पत्नी व त्यांचे बंधू त्यांच्या काही चित्रपटांचे निर्माते होते. त्यांचा मुलगा अशीम सामंत याने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट त्यांनी निर्माण केले. १९८५ मध्ये त्यांच्या शक्ती फिल्म्स संस्थेने ‘आराधना साऊंड सर्व्हिस’ ही ध्वनिसेवा सुरु केली. मुंबईच्या बॉलिवुड व पाश्चात्त्य हॉलिवुडमध्ये तयार झालेल्या काही चित्रपटांना या यंत्रणेने ध्वनिसेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या हावडा ब्रिज, आराधना आणि बरसात की एक रात या अभिजात चित्रपटांचे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे फिल्ममध्ये रुपांतर करण्यात आले.
सामंत यांना आराधना, अनुराग व अमानुष ह्या चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’ चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांना ‘झी’ वाहिनीतर्फे ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ एकूण चित्रपट कारकीर्दीसाठी देण्यात आला. त्यांचे काही चित्रपट बर्लिन, ताश्कंद, मॉस्को, कैरो, बैरुत इ. ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून दाखवले गेले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट-प्रमाण मंडळाचे अध्यक्ष तसेच कोलकात्याच्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ चे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. शक्ती सामंत यांचे ९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शक्ती सामंत यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=yVz_p49D75s
https://www.youtube.com/watch?v=6M71CD_nUa0
https://www.youtube.com/watch?v=aCMdJwiG_-I
मा.शक्ती सामंत यांचेअमर प्रेम, आराधना, अनुराग, अमानुष चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=H-V8o6u9HO0
http://www.hotstar.com/movies/aradhana/1000062780
https://www.youtube.com/watch?v=w-VLyNa5w54
https://www.youtube.com/watch?v=HaXN1uJmw94
April 9, 2017
प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले
May 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti