आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती.
June 25, 2022
आमचा सुहृद मित्र कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा “श्रीकांत, तळवलकर ट्रस्टच्या “अनुकरणीय उद्योजक” पारितोषिकासाठी तू मन्मनच्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा त्यांना भेट. मन्मन उद्योग सदाशिव पेठेत मुलांच्या भावेस्कूल समोर आहे. तुला फार लांब नाही. फार वेगळे गृहस्थ आहेत. बघ एकदा त्यांच्याशी बोल आणि तुला योग्य वाटले तरच पारितोषिकासाठी विचार कर.” माझ्या डोक्यात अनेक नावे असत, त्यामुळे गोखल्यांचे नाव मागे पडत गेले. यंदा परत दिलीपने आठवण करून दिली आणि आग्रह देखील केला. तु गोखल्यांना एकदा भेटच तुमचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध नक्की संपेल. फार अफलातून गृहस्थ आहेत. मी ठरवले, जाऊयात एकदा हा एव्हडा म्हणतोय तर. खरं म्हणजे सदाशिव पेठेत असा काही उद्योग असेल असे मनाला पटत नव्हते आणि असलाच तर असून असून किती मोठा असेल? असा प्रश्न मला उगीचच पडत होता. कदाचित म्हणूनच माझे पाय तिकडे वळत नव्हते. पण शेवटी मी ठरवले गोखल्यांना भेटायचे. दिलीपला विचारले तुझी ओळख देऊ का? तर दिलीप म्हणाला छे छे मी त्यांना १०-१२ वर्षांपूर्वी भेटलोय ते मला आता ओळखणार देखील नाहीत. शेवटी मी, अरुण नित्सुरे आणि अजय मोघे मन्मनच्या ऑफिसमध्ये धडकलो. स्वागतिकेला गोखल्यांना भेटायचे आहे म्हणून सांगितले. माझे कार्ड दिले. तिने कार्ड आत नेऊन दिले आणि १० मिनिटात बोलावतील असे सांगितले. आम्ही रिसेप्शन मध्ये वाट पहात बसलो. तेव्हड्यात एक कुरियरवाला आला त्याने पार्सल स्वागतिकेकडे दिले. बिल दिले आणि निघाला तोच तिने त्याला परत बोलावले आणि Octroi रिसीट विचारली. तो म्हणाला
“Octroi भरला नाही, मटेरियल तसचं आणलाय. पण मॅडम octroi भरला नाही म्हणून पैसे पण घेतले नाहीत.” आणि तो वळून जाऊ लागला. रिसेप्शनिष्टने त्याला जरबेने बोलून घेतले आणि सुनावले.
“हे बघा, octroi भरला नसेल तर ते पार्सल परत घेऊन जा. मी पाठवणाऱ्या कंपनीला कळवते की ह्या कुरियरने परत पार्सल पाठवू नका. हे घेऊन जा आणि octroi भरून आणा.” कुरियरवाल्याला हे नवीन होते तो बाईंना पटवू लागला
“बाई, तुमचं काहीतरी वेगळच. आता मी कुठे भरू octroi? घ्याना ह्यावेळी पुढे बघू.”
“हे बघा हे चालायचं नाही. मी आत्ताच फोन करते त्यांना” आणि फोन लावला देखील.
शेवटी होय नाही म्हणता कुरियर ते पार्सल परत घेऊन गेला. बाईंनी पार्सल पाठवणाऱ्या सप्लायारला याची खबर दिली व असे परत होणार नाही याची तंबी दिली.
पार्सल परत देताना मन्मन मधल्या कोणी ते मागवले होते? वेळेत न मिळाल्याने व्यवसायावर काय परिणाम होईल? याचा विचार न करता ते परत पाठवले. मी हे सर्व बघत होतो. गोखल्यांच्या कंपनीचे एथिकल वेगळेपण इथेच बघायला मिळाले. मला गोखल्यांचे आत बोलावणे आले आणि स्वागतिकेने स्वत: मला त्यांच्या केबिनपर्यंत सोडले. आत मनोहर गोखल्यांचे दर्शन झाले. वय साधारण सत्तरच्या आसपास, कोकणस्थी गोरेपण आणि चेहऱ्यावर सात्विक शांत भाव असलेले गोखले प्रथम दर्शनीच आवडले. रिसेप्शनिस्टने octroi न भरल्याने पार्सल परत पाठवल्याचे गोखल्यांच्या कानावर घातले. उत्तम केलेस, असे बाईंचे कौतुक केले आणि माझ्याकडे बघून स्माईल केले व मला बसण्याची खुण केली. मी माझा येण्याचा उद्देश सांगितला की, “आम्ही तुमच्या विषयी खूप ऐकले आहे एक उत्सुकता म्हणून आपण काय करता हे जाणून घेण्यास आलोय.” त्यांना माझी ओळख सांगितली. असे काही कुणी उत्सुकते पोटी येईल अशी त्यांना कल्पना नसल्याने आश्चर्य मिश्रित कौतुकाने मला म्हणाले “बोला काय माहिती हवी.”
“हेच की आपण काय करता? प्रॉडक्ट काय?”
“आम्ही मेडिकल सर्जरीसाठी लागणारी सामग्री बनवतो.” असे म्हणून त्यांनी त्यांचा एक प्रॉडक्ट कॅटलॉग समोर ठेवला. मी इंजिनीअर असून मला फारसे आकलन झाले नाही. पण त्यांनीच हा प्रश्न सोडवला आणि त्यांनी सुरवात केली. “आम्ही orthopedic सर्जरी पासून मेंदूच्या सर्जरी पर्यंत लागणारी सर्व प्रकारची शल्य उपकरणे बनवतो, ज्यामुळे डॉक्टरला शल्यक्रिया करणे सुकर जाते. आम्ही १००-१२५ प्रकारची शल्य उपकरणे बनवतो. देशात तसेच परदेशात देखील वितरीत करतो.” एकंदर मला जे कळले त्यावरून जशी कारखान्यात आपण वेगवेळ्या प्रकारची टूल्स वापरतो तशीच टूल्स एखाद्या सर्जनला ऑपरेशन करता वापरावी लागतात. एखादे मशीन दुरुस्त करताना ठराविक वेळेत दुरुस्त व्हावे असे इंजिनीअरला बंधन नसते. आज काम अपुरे राहिले तर उद्या करू. आहे काय अन नाही काय. पण माणसाचे हृदय, किडनी अथवा मेंदूची दुरुस्ती करताना, वेळ अतिशय काटेकोरपणे वापरावा लागतो. आज दुरुस्ती झाली नाही रुग्णाला तसेच ठेऊन उद्या उरलेली करू असे चालत नाही. हा महत्वाचा फरक माणूस आणि मशीन दुरुस्त करण्यातला आहे. तसाच इंजिनियर आणि सर्जन या मधला आहे. त्यामुळे शल्यक्रीयेची अशी उपकरणे बनवताना अजून एक महत्वाची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे त्या आयुधामुळे रुग्णास कोणतीही इजा होता कामा नये. एकंदर लक्षात आले की, गोखलेसाहेब आपल्या आकलना आणि आवाक्याच्या पलीकडचे काम करतायत. “तुम्ही इकडे कसे वळलात?” असे मी विचारले
“ अहो त्याची मोठी गम्मतच झाली.” श्रोते मिळाल्यामुळे गोखलेसाहेब रंगात आले होते.
“२० वर्षांपूर्वी माझा भाऊ ससूनमध्ये न्युरो सर्जन होता. तो एकदा म्हणाला अरे मला मेंदूचे ऑपरेशन करताना कवटीतून मेदू मोकळा करून कवटी डाव्या हाताने धरून शस्त्रक्रिया करावी लागते त्यामुळे शस्त्रक्रियेस वेळ लागतो आणि आपले काहीतरी चुकले तर? ही मोठी भीती वाटत रहाते. तर तू अशी काही वस्तू कर की ती कवटी अलगद पकडून ठेवेल आणि माझे दोन्ही हात शल्यक्रियेस मोकळे राहतील, जेणेकरून मला नीट काम करता येईल आणि वेळ कमी लागेल. परदेशात अशी उपकरणे मिळतात पण ती फार महाग असतात आणि त्यामुळे शस्त्रक्रीयेचा खर्चही वाढतो आणि तो रुग्णास परवडत नाही. मी म्हटले मला तू ऑपरेशन करताना एकदा बघावे लागेल.”
“त्याने मला एकदा ऑपरेशन करताना बोलावले. जवळ जवळ ४ तास ऑपरेशन चालले. मी शांतपणे तो काय करतो ते बघत होतो. तेव्हा काही आत्ता सारखी मोबाईलवर व्हिडीओ घेण्याची सोय नव्हती. मोजमाप देखील घेता येणार नव्हते. मी फक्त निरीक्षण केले आणि २ महिन्यांच्या प्रयत्नाने एक साधे मेदूची कवटी पकडणारे उपकरण बनवले, ते भावास दिले. त्याने ते पुढच्या ऑपरेशनसाठी वापरले आणि त्याला खूप आवडले आणि उपयुक्त देखील वाटले. त्याचे ऑपरेशन निम्म्या वेळात झाले. मुख्य म्हणजे परदेशी उपकरणाच्या तुलनेत फक्त १०% किमतीत हे उपकरण तयार केले ह्यात आमचा प्रॉफिट देखील आला.”
“ही बातमी हा हा म्हणता अनेक शल्यकर्मीपर्यंत पोहचली. हळूहळू अनेक डॉक्टर्स मला भेटून विविध प्रकारची उपकरणे बनवून घेऊ लागली. यात orthopedic आले, पोटाचे, किडनीचे अशा सर्व प्रकारच्या स्पेशालीस्टना मी वेगवेगळी उपकरणे करून देऊ लागलो. मला तो नादच लागला कोणतेही ऑपरेशन करताना निरीक्षण करायचे आणि वर्कशॉप मध्ये उपकरण बनवायचे. अशा शेकडो शस्त्रक्रिया मी ऑपरेशन थियेटर मध्ये जाऊन बघत असे. यातून मी अशा प्रकारची शेकडो उपकरणे बनवली. देशात असे कोणतेही मोठे हॉस्पिटल आणि सर्जन नसेल ज्याला माझे नाव माहीत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो हल्ली मेंदूतल्या ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यास सर्व कवटी उघडावी लागत नाही. जिथे ट्युमर अथवा दोष असेल त्याच्या वर कवटीला एक भोक पाडतात आणि शस्त्रक्रिया करून ती जागा पुन्हा बंद करतात. ह्या मेंदूच्या कवटीस ड्रील करण्याचे मशीन आम्ही बनवतो. आता एक विचार करा कुलकर्णी, हे ड्रील मेंदूत एक मायक्रॉन देखील घुसलेही नाही पाहिजे आणि अर्धवट ड्रील करून देखील चालणार नाही. असे अवघड उपकरण मी डिझाईन केले आहे आणि अनेक शस्त्रक्रियेत ते वापरले जाते.” माझ्या अंगावर सणकून शहारा आला. गोखलेसाहेब हे अगदी सहज सांगत होते.
गोखलेसाहेब या व्यवसायात पडले, ते देखील वयाच्या पन्नाशीत. पुण्याच्या कुस्रो वाडिया इंस्टीटयूटमधून draftsman चा कोर्स करून ते भोपाळच्या BHEL मध्ये नोकरी केली. ती नोकरी सोडून पुढे पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये (तेव्हाची टेल्को) आले. तिथे ते ट्रेनिंग विभाग बघू लागले. जेआरडी जेव्हा जेव्हा पुण्याला भेट देत तेव्हा ते प्रथम या विभागास भेट देऊन मगच पुढच्या कामास जात. जेआडींच्या या सवयीमुळे हा विभाग कायम व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली. गोखल्यांच्या क्रिएटिव्ह स्वभावामुळे जेआरडी त्यांना नेहमी विचारत गोखले यावेळी नवीन काय? गोखले एखादी नवीन केलेली गोष्ट त्यांना दाखवत. नवीन काहीतरी शोधण्याचा त्यांना ध्यासच लागला. त्यातून अनेक गोष्टी निर्माण होऊ लागल्या. त्यांच्या बंधुंमुळे यातूनच पुढे विविध शल्यसामग्री डिझाईन करून बनवू लागले. आता व्याप वाढू लागला आणि टेल्कोची आरामाची नोकरी सोडून पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. सदाशिवपेठेतली जागा कमी पडू लागली तर अरण्येश्वर रोड वर उपकरणे बनवण्यासाठी एक वर्कशॉप सुरु केले. मुलगा समीर ते वर्कशॉप बघत असे. नावही मोठे गमतीचे ठेवले “समीरचे वर्कशॉप” घरचे इतर देखील सर्व त्यांना उद्योगात मदत करू लागले. पण मध्येच एका अपघातात समीरचे तरुण उमद्या वयात निधन झाले. ज्या बंधुंमुळे ते या व्यवसायात आले तो डॉक्टर भाऊ देखील अकाली गेला. पण गोखले साहेब त्या आघातातून सावरले.
“गोखले हे “मन्मन” ही काय भानगड आहे ? नुसतं मन का नाही?” मला सतावणारा प्रश्न मी शेवटी विचारलाच. त्याच काय आहे कुलकर्णी, मी असे समजतो आपल्याला दोन मने असतात. एक बाहेरचे मन जे चंचल असते. सारखं सुख, दुखः, बरे, वाईट याचा विचार करते. ते स्वार्थी असते, दुसऱ्याला पीडा देण्याचा विचार करते, हे हवंय, ते हवंय असा हव्यासी विचार करते. पण त्या मनाच्या आत एक आणखीन मन असते ते निरागस असते, क्रिएटिव्ह असते. ते मनाचे मन असते. तिथे चांगले विचार निर्माण होतात. तिथे वेगवेगळी डिझाईन घडतात. त्या बाहेरच्या चंचल मनाचे जे अंतर्मन ते “मन्मन.” हे अंतर्मन जागे असले, तर उत्तम कल्पना सुचतात. मी एखाद्या डॉक्टरचे ऑपरेशन बघतो तेव्हा माझे हे मन्मन मला ते उपकरण कसे बनवायचे ते सुचवते आणि मी ते फक्त प्रत्यक्षात आणतो. मला drawing काढावे लागत नाही. ते आतूनच येते. कसे येते ते माहित नाही पण सुचत जाते. परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मी निमित्तमात्र करता करविता तोच, विधाता.” गोखल्यांमधला निगर्वी उद्योजक बोलत होता. मीपणाचा स्पर्शही नाही. पेशाने इंजिनीअर असलेले गोखले किती कविमनाचे तत्वचिंतक कलाकार आहेत ह्याचे मी प्रत्यंतर घेत होतो.
त्यावर्षीचा अनुकरणीय उद्योजकाचा शोध संपला होता. इथे सगळेच अनुकरणीय होते. गोखलेसाहेब इंजिनिअर आहेतच, पण कलाकार, गुरु, तत्वचिंतक, सेवाभावी शिवाय एथिकल आणखीन काय काय होते. त्यांना सगळ्यात शेवटी माझा येण्यातला स्वार्थ सांगितला आणि तळवलकरसरांच्या नावाने अनुकरणीय उद्योजक हा पुरस्कार त्यांना देणार असे सांगितले. त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. काही क्षण ते बोलू शकले नाही. अहो मी फार छोटा माणूस मला कसले पारितोषिक? माझ्यापेक्षा कितीतरी महान लोक या जगात आहेत? त्यांच्या मृदू स्वभावाला साजेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली. त्यांना तळवलकरसरांविषयी सांगितले. ते म्हणाले मी त्यांना ओळखायचो कारण, मी देखील कुस्रो वाडीयाचाच ना. मला ते शिकवायला नव्हते पण त्यांची शिस्त माहीत होती. पुरस्कार स्वीकारणार असे त्यांनी कबूल केले. प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख जवळ आली तर त्यांनी मला फोन केला कुलकर्णी मी पुरस्कार स्वीकारणार आहे, पण ते भाषण वगैरे मला जमणार नाही. मी कधी असे लोकांसमोर बोललो नाही. तर ते जरा टाळता आले तर बघा. मी त्यांना समजावले गोखले आमच्याशी जे बोललात तेच सांगा लोकांना आवडेल. भाषण करावेच लागेल. होय नाही करता तयार झाले. परत एकदा माझ्या ऑफिसमध्ये आले म्हणाले भाषण लिहून आणलंय तुम्ही ऐका. मी ऐकले. छान लिहिले होते. त्यावर्षी जी चार भाषणे झाली त्यात गोखल्यांनी बाजी मारली. प्रत्यक्ष भाषण करताना लिहून आणलेले भाषण तसेच राहिले आणि फार उत्कट आणि उत्स्फूर्त बोलले. जेष्ठ विचारवंत विद्याताई बाळ अध्यक्षा होत्या त्या भान हरपून ऐकत होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणात गोखल्यांचे मनापासून कौतुक तर केलेच, पण पुढे त्यांच्या ऑफिसमध्ये देखील जाऊन आल्या.
खरे म्हणजे गोखल्यांचे भाषण एव्हडे नितांत सुंदर झाले कारण, ते त्यांच्या मन्मनातून आले होते. आतून आले होते आणि ते सर्व श्रोत्यांच्या मन्मनात खोलवर भिडले. मनोहर गोखल्यांचा जीवनपट निरागस कर्मयोगी जीवन जगण्याचा एक वस्तुपाठ आहे.
श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७
Shrikaant.blogspot.com
Shrikantkulkarni5557@gmail.com
WhatsApp वरुन
July 26, 2017
गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला. पुढे ते पुण्यास राहू लागले. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ यांच्या पाक्षिकात त्यांच्या बालकथा, कविता आणि अन्य लेख प्रसिद्ध व्हायचे. पुढे ही लेखनाची आवड वाढत गेली. त्यांनी पुण्याला गेल्यावर वृत्तपत्रव्यवसायास सुरुवात केली. पुढे भावगीतकार व चित्रपटगीतकार म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.
उत्कट भावकाव्यात गणना होणारी त्यांची अनेक गीते आहेत. महांबरे यांनी ‘कंठातच रुतल्या ताना’ निळा सावळा नाथ, बोलून प्रेमबोल, ‘संधीकाली या अशा’ ‘नयनात तुझ्या सखि सावन का?’ अशा कित्येक सुंदर उत्कट भावकविता लिहिल्या. आजही रसिकांच्या मनात त्या घोळत आहेत. उत्तम भावगीतरचनांप्रमाणेच त्यानी सुरेख चित्रदर्शी भावरम्य चित्रपट गीते लिहिली होती. त्यामुळे त्यांची चित्रपटगीतकार म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. त्यांची चित्रपट गीते असलेले मराठी चित्रपट म्हणजे ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘सौभाग्यकांक्षिणी’ ‘एकटी’, ‘प्रीत तुझी माझी’ इत्यादी आहेत. गंगाधर महांबरे यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतात ‘तूच खरा आधार’, ‘जादुगारा तुला मी’, ‘देवाघरच्या फुला’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’, ‘हळदीकुंकवाला हळदीकुंकवाला बाई सुवासिनी झाल्या दंग’ इत्यादी गीते गाजत आहेत. त्यांची कित्येक गीते आशा भोसले, लता मंगेशकर, सुधीर फडके इत्यादी नामवंत गायक- गायिकांनी गाऊन महांबरे यांच्या गीतरचनांना योग्य तो न्याय दिलेला आहे.
सुप्रसिद्ध नाटककार व बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक मालवणचे नामवंत साहित्यिक भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचा जीवनपट चितारणारे ‘एक अविस्मरणीय मामा’ हा छोटासा चरित्रग्रंथ महांबरे यांनी लिहिला आहे. याशिवाय ‘चार्ली चॅप्लीन’,‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मॉरिशस’, ‘मराठी गझल’ इत्यादी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारतीय आकाशवाणीचे एक मान्यवर गीतकार म्हणून त्यांचे आकाशवाणीसाठी योगदान आहे. चित्रपट रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनीमुद्रिका, संगीत मैफल, कॅस्टेस् आणि आता सी. डी. इत्यादी माध्यमांनी कवी मा.गंगाधर महांबरे यांच्या गीतांचा अनुरुप उपयोग करून घेतला आहे. ‘रसिका तुझ्याच साठी’ या त्यांच्या गीताची ध्वनिमुद्रिका एका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती.
नवी दिल्ली येथील नॅशनल प्रोडक्टिव्हिटी कौन्सिलने त्यांना १९८३ साली पोएट ऑफ दि इयर हा सन्मान दिलेला असून गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने सन्माननीय फेलोशिप दिली होती. केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे अन्य पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. मा.गंगाधर महांबरे यांचे २२ डिसेंबर २००८ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 6, 2017
वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांना साहित्याचं नोबेल मिळालं. इतक्या कमी वयात दुसऱ्या कोणालाच साहित्याचं नोबेल मिळालेलं नाही.
December 30, 2021
त्यांचे खरे नाव इक्बाल हुसेन होते. हसरत जयपुरी यांनी सगळ्यात जास्त गाणी संगीतकार शंकर जयकिशन यांच्या साठी केली. त्यांचा जन्म १५ एप्रिल १९१८ रोजी झाला. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है' व में 'जिंदगी एक सफर है सुहाना' या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला हसरत जयपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटात २००० पेक्षा जास्त गीते लिहिली.
जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी यांची अभेद्य जोडी होती. हसरतसाहेबांच्या लेखणीतून प्रणयी गीतांचा जणू ओघच चालू असायचा आणि जयकिशन त्या गीतांना अशा काही आकर्षक चाली लावीत, की ऐकणारा बाकीचे सगळे विसरून गीत ऐकत बसयाचा.
जयकिशन यांच्या कन्या आणि मुंबईच्या अग्रगण्य फॅशन डिझायनर भैरवी जयकिशन यांनी आपल्या वडिलांचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझे वडील ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच्याच आधारे हसरत जयपुरींनी ‘अंदाज’मधील (१९७१) ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना’ हे शीर्षकगीत लिहिले. हसरत जयपुरी यांचे १७ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 17, 2017
वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी झाला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सादर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सादर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. त्यांच्या स्वत:च्या कोल्हापूर शहरातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
केशवरावांनी वीर वामनराव जोशी यांजकडून राक्षसी महत्त्वाकांक्षा हे नाटक लिहून घेऊन १९१३ साली ते रंगभूमीवर आणले. हे नाटक त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाले. त्यातील केशवरावांनी केलेली मृणालिनीची भूमिका अप्रतिम होत असे. याच काळात त्यांनी गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून गाण्याची दीक्षा घेतली व गायनकलेतही त्यांनी प्रावीण्य मिळविले.
मानापमान नाटकात केशवरावांची धैर्यधराची भूमिका फार तडफदार पणे करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले मराठी रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध संगीतगायक नट.स्त्री भूमिका करणारे ,दिग्दर्शक ,निर्माते अशी त्यांची ओळख होती टिपेच्या सुरांना सहज व स्वच्छपणे पोहोचणारा आवाज आणि अत्यंत प्रभावी तान हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रंगभूमीवरील सजावटीबाबत नवनवीन प्रयोग करून केशवरावांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. कालांतराने त्यांनी स्त्रीभूमिका सोडून पुरुषभूमिका करण्यास सुरुवात केली. हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, शहाशिवाजी इ. नाटकांतील त्यांच्या नायकाच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. जुन्या नाटकांपैकी मानापमान नाटकात केशवरावांची धैर्यधराची भूमिका फार तडफदार होत असे. त्यातील त्यांची पदे त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाली.
१९२१ साली टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी ‘गंधर्व’ व ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळ्यांतर्फे मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग झाला. त्यात साहजिकच केशवरावांकडे धैर्यधराची भूमिका आली. त्यांच्या जोडीला बालगंधर्व-भामिनी आणि गणपतराव बोडस-लक्ष्मीधर असा मातबर संच जमल्यामुळे हा प्रयोग दृष्ट लागण्यासारखा झाला. १९२१ सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका हि त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव फक्त ३१ वर्ष जगले. केशवराव भोसले यांचे ४ ऑक्टोबर १९२१ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया
October 4, 2017
लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ , तशीच ती धाडसीही म्हणावी लागेल. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे , त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ' शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली.
दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत. वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे.
' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू..' व ' झूलो के संग..' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे. लीला चिटणीस यांनी त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
September 9, 2017
नातवंडांच्या कविता हा सामाजिक जाणीव असलेला कार्यक्रम (वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी कवितावाचन) आदित्य दवणे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असून मुंबई, पुणे, गोवा येथे या कार्यक्रमांचे प्रयोग सादर झाले आहेत.
June 22, 2022
त्याच्या कादंबऱ्यांवर युद्धपट निघाले, ते गाजलेही. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘व्हेअर ईगल्स डेअर’. ब्रायन हट्टन या दिग्दर्शकाने रीचर्ड बर्टन आणि क्लिंट इस्टवूड या जोडगोळीला घेऊन बनवलेला हा एक हिट चित्रपट.
February 2, 2022
पूर्वाश्रमीच्या त्या रमा नारायणराव मुदवेडकर. मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरीजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांनी आपले लेखन केले. त्यांची एकूण ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात ‘अनुराधा’ मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवातूनच लिहिले गेले आहे. ‘गिरिजाघर’, ‘देवकुमार’, ‘चांदण्याचं झाड’, ‘चंद्रलिंपी’, ‘चक्रवेद’, ‘स्वप्नात चंद्र ज्याच्या’, ‘आभाळमाया’, ‘आत्मभाग’, ‘झपाटलेला’ इ. त्यांच्या कादंबर्यालही लोकप्रिय आहेत. ‘गाभार्या्तील माणसं’, ‘जगावेगळी माणसं’, ‘कलावंत’, ‘साहित्य सहवास’ ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करीत असत. “जन्मठेप” हे पुस्तक त्यांनी ६ वर्षे येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे. गिरिजा कीर यांचे संकेतस्थळ. www.girijakeer.in
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 5, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti