स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला.स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते.
१९८३ साली त्यांनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या सुरेख अभिनयाने मराठी रसिकांवर मोहिनी घातली होती. अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. १९८६ मध्ये त्यांनी "गडबड घोटाळा' व "तू सौभाग्यवती हो' या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाय रोवले. त्यांनी "अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट व मालिकांची निर्मिती-दिग्दर्शन केले.
"कळत नकळत' व "तू तिथे मी' या चित्रपटांमधील अभिनयाने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. "अस्मिता चित्र'चा "चौकट राजा' या चित्रपटामुळे १९९१ चे वर्ष स्मिता तळवलकर यांच्यासाठी खास ठरले. हा चित्रपट गतिमंद मुलाच्या आयुष्यावर बेतलेला होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामध्ये स्मिता तळवलकर यांनी "मीनल' म्हणजे या मुलाच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. संजय सूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरकर-तळवलकर जोडीने "तू तिथे मी', "सातच्या आत घरात', 'आनंदाचे झाड' असे यशस्वी चित्रपट दिले. "सवत माझी लाडकी' हा स्मिता तळवलकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. "अस्मिता चित्र' या बॅनरखाली त्यांनी सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका, अशा त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.
स्मिता तळवलकर यांनी चित्रपट शिक्षणासाठी "अस्मिता चित्र अकादमी' स्थापन केली होती. या अकादमीच्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे शाखा असून या अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. 'स्मिताची गोष्ट 'हे पुस्तक त्यांचे अनेक वर्षांचे मित्र योगेश्वर गंधे यांनी लिहिले आहे. पहिल्या २६ पानात चरित्र /आठवणी आहेत तर पुढील ४५ पानांत त्यांच्या कथा आणि लेख आहेत.
स्मिता तळवलकर यांचे निधन ६ ऑगस्ट २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 5, 2017
जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .
प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. इ.स. १९५४ साली बसर्गे (गडहिंग्लज तालुका) येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रभात फिल्म कंपनीच्या ‘दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़ त्यानंतर १९४४ मध्ये ‘रामशास्त्री’ या चित्रपटात काम केले़ त्यानंतर मायाबाजार, सीता स्वयंवर, मी दारू सोडली, अबोली, सपना, परदेस, आदींसह सुमारे साठ चित्रपटांत त्यांनी काम केले़.
बेबी शकुंतला यांनी यानंतर ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांतही अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी पाटील, बिमल रॉय आणि बी. आर. चोप्रा यांच्यासारख्या दिग्दशर्कांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातील अभिनयक्षमतेचा सन्मान करणारी होती. बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, किशोर शाहू, बिमल रॉय, व्ही. शांताराम, केदार शर्मा, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्या सारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले होते. बेबी शकुंतला यांच्या ’अबोली’ आणि ’चिमणीपाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत.
पी.एल अरोरा यांनी काढलेल्या ’परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ’फरेब’ आणि ’लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या. पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी चित्रपट संन्यास घेतला. बेबी शकुंतला यांचे निधन १८ जानेवारी २०१५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
November 17, 2018
एका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
August 17, 2021
अभिनय बेर्डे ने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला. मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनयला ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होते.
November 3, 2021
राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी काम करत आहेत. मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे यांचा जन्म ४ ऑगस्ट रोजी झाला. त्यांच्यासाठी विविध पुस्तके, हसत-खेळत शिक्षणाच्या पद्धतींचा विकास केला आहे.
युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे. त्या माध्यमातून विविध स्तरातील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेत त्यांनी शिकवण्याची पद्धत विकसित केली आहे. यामध्ये कविता, कथा, एकपात्री प्रयोग, नाटक, विज्ञानकथा अशा विविध वाङ्मय प्रकारांची निर्मिती केली आहे. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये लेखन केले आहे. गुजराती आणि कानडीमध्ये त्यांनी लिहिलेली पुस्तके भाषांतरीत झाली आहेत. बालरंगभूमीसाठी त्यांनी लिहिलेल्या अनेक एकांकिकांना बक्षिसं मिळाली आहेत. त्यांच्या लेखनाला आजपर्यंत सुमारे १७ विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
अक्कम बक्कम, छत्रीची जादू आणि इतर कथा, दांडोबा राक्षस आणि गुळगुळीत मावशी, अजब कथा, अशोक आणि अमीन, आई आणि बाळ, आमची शाळा, मगरू आणि इतर कथा, गंमत गँग, गंमत जंमत, गंमतशाळा भाग १, २, गुळाची ढेप आणि सरबत, चटकन पटकन वाचन लेखन, झॅकपॅक शोध आणि इतर कथा, बंटू बसला ढगात आणि इतर कथा, ससुल्या आणि इतर कथा, विज्ञान गमती-सहज सोपे प्रयोग, माझे मराठी निबंध, भाग १,२, सु सुटका आणि रंगीत डोंगर, प्रेमळ भूत संच अशी त्यांची ५० हून जास्त पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
August 4, 2021
अत्यंत बिकट परिस्थितीतही धीरोदात्तपणा न सोडणारे, निगर्वी, सरळ, प्रेमळ अंत:करणाचे मा.भार्गवराम आचरेकर यांना नाट्य व्यवसायातील चारुदत्त असे संबोधिले जात असे.त्यांचा जन्म १० जुलै १९१० रोजी झाला. स्थानिक शाळेच्या मदतीसाठी केलेल्या शारदा नाटकाच्या प्रयोगात त्यांनी वल्लरीचे काम इतके अप्रतिम केले की त्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यावेळी ललितकलादर्शचा मुक्काम मालवणला होता. बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. त्यांनी भार्गवरामांचे गाणे ऐकले आणि आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. ललितकलादर्शन मधील १९२५ ते १९३७ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य जीवनाची चढती कमान होती. ललितकलादर्शच्या बापूसाहेब पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली मा.भार्गवराम आचरेकर यांना विविध भूमिका करण्याचे भाग्य लाभले. ‘कुंजविहारी’ नाटकातील ‘कृष्ण’ ही भार्गवरामांची पहिली व्यावसायिक भूमिका. यानंतर ‘वधूपरीक्षा’, ‘शारदा’, ‘पुण्यप्रभाव’ इत्यादी अनेक नाटकांत ते भूमिका करू लागले. बापूसाहेब पेंढारकर आजारी पडल्यानंतर त्यांनी ‘मानापमाना’तील धैर्यधर, आणि ‘शिक्काकट्यार’ मधील ‘शाहू’ या अवघड संगीत भूमिका भार्गवरामांवरच सोपविल्या. ‘ललितकलादर्श’ मंडळीत पणशीकर बुवा, विष्णुपंत पागनीस, कागलकरबुवा, वझेबुवा आणि शिवरामबुवा वझे यांची तालीम मिळाल्याने त्यांची गायकी कसदार आणि दर्जेदार झाली होती. बापूसाहेबांनी भार्गवरामांच्या अभिनयाकडेही बारीक लक्ष पुरविले आणि म्हणूनच ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील फटकळ पण सरळ स्वभावाच्या बिजलीची तडफदार तेजस्वी भूमिका भार्गवरामांनी अप्रतिम साकार केली. जणू त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच वरेरकरांनी ती भूमिका लिहिली होती. अभिनय, गायन आणि रूप यांचा त्रिवेणी संगम या तडफदार भूमिकेत झाला होता. बिजली म्हणजे भार्गवराम आणि भार्गवराम म्हणजे बिजली असे समीकरण त्याकाळी झाले होते. पुढे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील भानुशंकरांच्या भूमिकेमुळे नव्या पिढीला भार्गवरामांचा नाट्याभिनय व गायनाची करामत ऐकण्याची संधी मिळाली. भार्गवराम नुसते नटच नव्हते तर चांगले ख्याल गायकही होते. साध्या आणि अनवट रागातील चीजांचे बरेच मोठे भांडार त्यांच्यापाशी होते. अशा या प्रसन्न वृत्तीच्या, निकोप प्रकृतीच्या, धार्मिक श्रद्धेच्या, नम्र स्वभावाच्या आणि निर्व्यसनी, निष्कलंक चारित्र्याच्या गुणशाली कलाकाराला नाट्य परिषदेने ‘बालगंधर्व पदक’ देऊन गौरविले होते. भार्गवराम आचरेकर यांचे २७ मार्च १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 28, 2017
प्रसाद सावकार यांचा जन्म १४ डिसेंबर १९२८ बडोदे येथे झाला.
प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात त्यांचे वडील रघुवीर सावकार हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्घ असलेले गायक-नट होते व ते ‘रंगदेवता’ या पदवीने ओळखले जात.
वडिलांच्या ‘रंगबोधेच्छु नाट्यसमाज’ या नाट्यसंस्थेत प्रसाद सावकारांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच नाटक प्रसाद सावकार व संगीत यांचे संस्कार होत गेले. गायन-अभिनयाचे प्राथमिक धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. संशयकल्लोळ नाटकात त्यांनी वडिलांबरोबर कृत्तिकेची भूमिका केली. एवढेच नव्हे, तर ह्याच नाटकात कृत्तिका, साधू, जलशातील गायक व वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी करून त्यांनी एक विक्रमच केला. गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर’ संस्थेच्या सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान अशा नाटकांतून त्यांनी सुरुवातीला काही भूमिका केल्या, तसेच हौशी रंगभूमीवर करीन ती पूर्व इ. नाटकांतूनही कामे केली. मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेच्या रंभा कुलवधू, कोणे एके काळी, एक होता म्हातारा या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. लग्नाची बेडी या नाटकातील त्यांची ‘गोकर्णा’ची भूमिका उल्लेखनीय होती. पेडगावचे शहाणे, गोरा कुंभार अशा मोजक्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. १९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके–पंडितराज जगन्नाथ व सुवर्णतुला लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले आणि प्रसाद सावकारांनी गायिलेली त्या नाटकांतील पदे संस्मरणीय ठरली. विशेषतः पंडितराज जगन्नाथ या नाटकातील वसंत देसाईंच्या संगीत-दिग्दर्शनाखाली प्रसाद सावकारांनी (भूमिका पं. जमनलाल) गायिलेली ‘जय गंगे भागिरथी’ व ‘सावन घन गरजे’ ही नाट्यपदे खूपच लोकप्रिय झाली. ‘जय गंगे’ने तर लोकप्रियतेचा कळस गाठला व प्रसाद सावकारांना श्रेष्ठ गायक-नट असा लौकिक मिळवून दिला. त्यांनी सुवर्णतुला नाटकात कृष्णाची भूमिका केली आणि ‘रतिहून सुंदर’ व ‘रागिणी मुख’ ही पदे गायिली. यानंतर विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला नाटकात त्यांनी ‘मदनगोपाळ’ ही व्यक्तिरेखा साकारली व राम मराठे यांच्याबरोबर ‘बसंत की बहार’ ही जुगलबंदी गायिली. तसेच विद्याधर गोखले यांच्या जय जय गौरीशंकर या नाटकात ‘ श्रृंगी’ची भूमिका केली. त्यातील त्यांनी गायिलेली ‘ भरे मनात सुंदरा’ व ‘नारायणा रमारमणा’ ही नाट्यपदेही लोकप्रिय झाली. यानंतर त्यांनी पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या कट्यार काळजात घुसली या नाटकात ‘सदाशिव’ची भूमिका साकारून पं. जितेंद्र अभिषेकींसमवेत ‘घेई छंद’ हे पद गायिले. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या घनश्याम नयनी आला या नाटकात त्यांनी गायिलेल्या दोन गीतांची ध्वनिमुद्रिका निघाली. मधुसूदन कालेलकरांच्या तो राजहंस एक या नाटकात त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली. अमृत मोहिनी, अवघा रंग एकची रंग ही त्यांच्या भूमिका असलेली अखेरची नाटके होत. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्ध आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले.
त्यांना अनेक मानसन्मान लाभले: पद्मश्री, अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृतिपुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, गोमंतक मराठी अकादेमीच्या दीनानाथ स्मृतिप्रतिष्ठानतर्फे लता मंगेशकर पुरस्कार इत्यादीचा त्यात समावेश होतो.
आपल्या समुहा तर्फे. प्रसाद सावकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
December 14, 2021
आजपर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे . पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो’चटका’दिला त्याची दाहकता अजूनही मनात जिवंत आहे .
December 20, 2017
स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे इथे झाला. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.
स्मिता पाटील ह्यांचा झाला. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला.
'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यात स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या.
स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या, बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्याय अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. पण मृत्यूनंतरही मास्को, न्यूर्यॉक, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय व मराठी अभिनेत्री ठरली. फ्रान्स मध्ये ला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये त्यांच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव (रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला होता. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिता यांना मिळाला होता. मराठी रंगभूमीवर काम करणारे मा.नाना पाटेकर बॉलीवूडमध्ये आपल्या येण्याचे श्रेय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिला देतात. मा.नाना पाटेकर म्हणतात हिंदी चित्रपटातील प्रवेश स्मिता पाटील हिच्यामुळेच झाला.
मी मराठी रंगभूमीवर काम करत होतो. तेथे मी खूश होतो. पण स्मिताने मी हिंदीत प्रवेश करावा म्हणून प्रयत्न केले. मला हिंदीत काम करण्यासाठी प्रवृत्त केले. तिनेच माझे नाव रवी चोप्रा यांना सुचविले आणि मला ‘आज की आवाज’ हा चित्रपट मिळाल्याचे नाना पाटेकर यांनी नुकतेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. स्मिताने केलेल्या ‘फोर्स’मुळे मी इंडस्ट्रीत आलो. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्याबरोबर मी ‘अवाम’ आणि ‘गीद्ध’ या चित्रपटात काम केले होते. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
स्मिता पाटील यांचे काही चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=7_IAjinodPo
https://www.youtube.com/watch?v=TxRk-jbUrrk
https://www.youtube.com/watch?v=GC6XmwlNwhE
https://www.youtube.com/watch?v=tuo6F5qUu00
https://www.youtube.com/watch?v=8L4oq6VKA2U
https://www.youtube.com/watch?v=gskP5p2Oknc
October 31, 2019
दादोजींनी देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक लहानसाच ब्राह्मण पण त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शाहूने त्याच्याविषयी उद्गार काढले आहेत.
March 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti