संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.
January 29, 2022
हेजल किच ही मूळ ब्रिटीश बॉलिवूड अभिनेत्री आहे. हेजलचे वडील ब्रिटिश आहेत तर आई मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या कुटुंबातील आहे. हेजलने ‘हॅरी पॉटर’ या ब्रिटीश- अमेरिकन फिल्म सीरिजमध्ये काम केलंय. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बालकलाकार म्हणून हेजल ‘हॅरी पॉटर’ सीरिजच्या तीन चित्रपटांमध्ये झळकली होती.
March 1, 2024
बाळ कोल्हटकर यांना नऊ अक्षरांचा नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२६ रोजी सातारा येथे झाला. बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. मा.बाळ कोल्हटकर यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले.
१९४७ पर्यंत ते रेल्वेत नोकरी करत होते. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत. त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. "दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते.
बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणाऱ्याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'दुरितांचे तिमीर जावो', 'वेगळं व्हायचंय मला', अशा नाटकांनी तर गर्दीचे विक्रम रचले. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. शहरी मध्यमवर्गीय नाटकांबरोबरच कोल्हटकरांनी काही पौराणिक व ऐतिहासिक विषयही हाताळले. 'देव दीनाघरी धावला', 'सीमेवरून परत जा', 'शिवराय कवि भूषण' ही नाटकेही गाजली.
कोल्हटकर उत्तम कवी होते. त्यामुळे त्यांच्या नाटकांत पदेही असत. 'आई तुझी आठवण येते,' व 'निघाले आज तिकडच्या घरी' ही गाणी नाट्यगृहांत प्रेक्षकांना हमखास रडवीत असत. पंडित कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या आवाजातील 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी' हे प्रेमद्वंद्वगीत अजरामर झाले. कुमार गंधर्वजींच्याच आवाजातील भूपाळी 'ऊठी ऊठी गोपाळा' आजही सकाळी ऐकू येते. मा.कोल्हटकरांच्या नाटकांच्या शीर्षकांचे एक वैशिष्टय होते की 'एखाद्याचं नशीब', 'आकाशगंगा' असा अपवाद सोडला तर त्यांच्या ३१ पैकी बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली.
प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. मा.बाळ कोल्हटकर यांचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 3, 2017
१९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले.
October 31, 2017
स्वामी विवेकानंद आणि संत परंपरेतून पुढे आलेले विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्यासाठी त्यांनी एमआयटी ही संस्था सुरू केली. ही त्यांची संस्था पुण्यात खासगी शिक्षण उपलब्ध करुन देत असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम त्यांनी केले आहे.
February 3, 2022
पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, संशोधक, विनोदकार, वादग्रस्त लेखक अन् अतिशय सर्जनशील, संवेदनशील माणूस... खुशवंतसिंग यांची ही विविध रूपे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पाकिस्तानात असलेल्या हदली येथे झाला.तब्बल सात दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक तसे विरळेच. खुशवंतसिंग त्यांपैकी एक. वृत्तपत्रांतील स्तंभ असो वा कादंबरी; किस्से असोत की चुटके... प्रत्येक माध्यमांतून ते मैफल रंगवत होते आणि रसिक त्यांचा आस्वाद घेत होते.
खुशवंत सिग यांचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी आपल्या जन्मगावी घेतले. त्यानंतर लाहोर, दिल्ली आणि लंडनमधून शिक्षण पूर्ण केले. 'बार अॅट लॉ' झाल्यावर १९३९ ते ४७ या दरम्यान लाहोर हायकोर्टात त्यांनी वकिली केली. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी परराष्ट्र खात्यात नोकरी स्वीकारली. सरकारने त्यांची वार्तांकन सहाय्यक या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर लंडनच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून आणि युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांनी काम पाहिले. नभोवाणी मंत्रालयाच्या योजना नियतकालिकाचे संपादकत्व त्यांनी काही वर्षे सांभाळले. सरकारी नोकरीनंतर त्यांनी अध्यापनाकडे मोर्चा वळविली आणि अमेरिकेतल्या प्रिस्टन विद्यापीठात प्राध्यापकी केली. त्यांच्या कर्तृत्वाला खरा बहर आला, तो त्यांनी 'बेनेट कोलमन अँड कंपनी'च्या 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया' या साप्ताहिकाचे प्रमुख संपादकपद स्वीकारल्यावर. त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा हे मासिक म्हणजे फक्त उच्चभ्रू वर्तुळासाठीच असणारे असा समज होता; पण हा समज त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने बदलून टाकला. सामान्यांपर्यंत पोहोचले तरच ते यशस्वी होईल, असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी मासिकात अनेक बदल केले. हे बदल यशस्वी ठरले आणि मासिकाचा खप ६५ हजारांवरून चार लाखांवर पोहोचला. 'विथ मॅलिस टू वर्ड्स वन अँड ऑल' हा त्यांचा साप्ताहिक स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्घ होत असे व तो वाचकप्रियही झाला होता. वाचणाऱ्याला मजा येईल, असे त्यांचे लेखन असे. त्या काळात असणारी संपादकाची प्रतिमा त्यांनी संपूर्ण बदलली. सहजतेने कोणालाही भेटणारे, पदाची आढ्यता न बाळगता काम करणारे आणि सहज संवाद साधणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्यासोबत काम करणारेही सहज संवाद साधू शकायचे, हेही त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते. संपादकीय पान म्हणजे फक्त बुद्धिजीवी लोकांचे ही प्रतिमाही त्यांनी मोडून काढली. सामान्य माणसाला काय वाटते, त्याच्या काय अपेक्षा आहेत यापासून पत्रकारिता दूर जाऊ नये यासाठी ते झटत असत. अर्थात त्यांच्या कारकिर्दीतील अनेक विधाने वादग्रस्तही ठरली. इंदिरा गांधींशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी घरोबा असतानाही त्यांनी कधी कुठलीही एकच राजकीय बाजू घेतली नाही. आपल्या विधानांवरून उठलेली वादळेही ते खुशीने स्वीकारत असत. खुशवंतसिंग यांनी त्यांच्या लेखणीचा पट्टा चौफेर फिरवला. राजकारण, समाजकारण, प्रेम, इतिहास, भाषांतर, लघुकथा, शीखांचा इतिहास अशा सर्व प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली आहे. स्त्रियांविषयीचे अत्यंत उघड श्रृंगारिक वर्णन, तिरकसपणा आणि नर्मविनोदीपणा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. त्यांना देशाविषयी प्रचंड अभिमानही होता. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी 'ट्रेन टू पाकिस्तान' ही कादंबरी खूप गाजली. फाळणीच्या दरम्यान घडलेल्या घटनांची आणि फाळणीच्या परिणामांची कहाणी त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये मांडली आहे. हातोहात खपलेल्या या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. या पुस्तकाला गोव्ह प्रेस अॅवॉर्डही मिळाले. तिचे कथानक वापरून पुढे 'ट्रेन टू पाकिस्तान' हा चित्रपटही निघाला, 'द हिस्ट्री ऑफ शीख्स' या पुस्तकाचे तीन खंड त्यांनी लिहिले. ही पुस्तके विश्वसनीय कागदपत्रे आणि पुराव्यांवर आधारलेली आहेत. या पुस्तकांत शिखांचा सचित्र इतिहास देण्यात आला आहे. मात्र, त्यांनी लिहिलेले रणजितसिंग यांचे चरित्र व्यक्तिपूजक आणि अवास्तव महती गाणारे असल्याची टीका झाली होती. त्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. हातातले पेन वृद्धत्वामुळे गळून पडत होते; पण मनातील उत्साह कायम होता. 'द सनसेट क्लब' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या वयाच्या ८०व्या वर्षी प्रसिद्ध झाले; पण ८० व्या वर्षीही त्यांनी जगण्याविषयी, राजकारणाविषयी आणि समाजाविषयी इतके भरभरून लिहिले आहे की थक्क व्हायला होते. त्यामुळेच ९८व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी निवृत्तीनंतर कसे जगावे हे सहजतेने लिहिले आहे. या ९८व्या वाढदिवशी ते म्हणाले होते, 'पुढे नेण्यासाठी माझ्यापाशी खूप थोडे उरले आहे; पण आठवून पाहावे आणि त्यात रमावे असे खूप काही मी जमवले आहे. आयुष्याच्या जमा खात्यावर ८० पुस्तके, कादंबऱ्या, लघुकथा, आत्मचरित्र, इतिहास, पंजाबी आणि उर्दूत केलेली भाषांतरे आणि अनेक निबंध आहेत. वयाच्या ९८व्या वर्षीही ते लिहित होते. प्रतिभेचे लेणे घेऊन आलेले मा.खुशवंतसिंग सर्व माध्यमांतून त्याचा आविष्कार घडवत गेले. म्हणूनच लोकप्रियतेची उंची त्यांना गाठता आली. मा.खुशवंतसिंग यांचे २० मार्च २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खुशवंतसिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही एक वादग्रस्त कादंबरी.
एका उद्योगपतीचं बिनधास्त आत्मवृत्त..खुशवंतसिंगांच्या बेधडक शैलीतून...
चैतन्य प्रेम विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृक्ष आहे. खुशवंत सिंग यांनी हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं यात जिवंत केले आहेत.
March 21, 2017
अमीर खॉं यांचा महाराष्ट्रातील अकोला गावी जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. उण्यापुर्याव साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१२ रोजी झाला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“. अमीर अलीचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे वडील लहानग्या अमीरला घेऊन अकोल्याहून इंदोरला गेले. इंदोरला त्याकाळी कलाकारांना राजाश्रय होता आणि शहा अमीर हे चांगले बीन व सारंगी वाजवायचे. अमीर अली नऊ वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली आणि शामीरखाँना त्यांच्या दोन्ही मुलांची आई ही व्हायला लागले. अर्थात तीही जबाबदारी त्यांनी चांगली पेलली. त्या काळच्या कलाकारांच्या घरी जसे वातावरण असायचे तसे यांच्याही घरी होते. शामीरखाँ यांनी अमीर अली आणि त्यांचा भाऊ बशीर या दोघांनाही संगीताचे धडे द्यायला सुरवात केली होती. तसेच त्यांच्या बिरादरीतील इतर श्रेष्ठ कलाकारांकडेही ते त्यांना नियमितपणे गाणे ऐकायला घेऊन जात होते. असेच एकदा ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे गेले असता एक प्रसंग घडला. लहानग्या अमीरला आणि बशीरला घेऊन ते त्या घरापाशी आले तेव्हा घरातून संगीताचे स्वर ऐकू येते होते. “आत्ता तालीम चालू असणार” ते मनाशी म्हणाले आणि त्यांनी त्या घरात प्रवेश केला. त्याच क्षणी तेथे एकदम शांतता पसरली आणि सगळ्या शिष्यांनी ताबडतोब आपापल्या वह्या मिटल्या. शामीरसाहेबांनी बळेबळेच एका वहीचे पान उघडले त्यात मेरूखंड गायकीची बरीच नोटेशन्स लिहिलेली त्यांना दिसली. तेवढ्यात एका नातेवाईकाने त्यांच्या हातातील ती वही हिसकावून घेतली.
“हे सारंगियांसाठी नाही. मग वाचून काय उपयोग ?”
हे ऐकून अपमानित होऊन शामीरखाँ त्या घराबाहेर पडले ते ठरवूनच की मी माझ्या एका मुलाला मेरूखंड गायकीत तयार करेन. हे बोलण्याइतके सोपे नव्हते कारण ही गायकी फार म्हणजे फार अवघड आहे. काय आहे ही गायकी आणि ती एवढी अवघड का आहे ?. उस्ताद अब्दुल वहिद खॉं यांच्या विलंबित लयीतील गायनाचा प्रभाव त्यांच्या गायनात होता, तसेच, इंदौर घराण्याचे रजाब अलि खॉं यांची तान गायकी आणि अमान अलि खॉं यांचे मेरुखंड पद्धतीचे रागविस्तार यांच्या प्रभावामुळे अमीर खॉं यांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र गायकी विकसित केली होती. अमान अलि खॉं यांचे शिष्यत्व पत्करून ते चांगले तयारीचे गायक झाले. अभिजात शास्त्रीय संगीतातील ख्यालगायकीतच त्यांनी विशेष मेहनतीने सौंदर्यप्रधान अशी शैली अमीर खॉं यांनी विकसित केली. अधिकतर गंभीर प्रकृतीच्या रागगायनात ते स्वत: अंतर्मुख होऊन रसिकांनाही अंतर्मुख करीत असत. अमीर खॉं यांची गायकी म्हणजे स्वरप्रधान व आलापप्रधान. 'झूमरा' किंवा 'एकताला'च्या अतिविलंबित लयीतील ख्यालासाठी ठेका अगदी साधा असे. ख्यालाची बढ़त, मेरुखंड पद्धतीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, बोलआलाप, आलंकारिक सरगमयुक्त ताना आणि क्लिष्ट व अवघड ताना सहजतेने गाण्याची क्षमता यांनी त्यांच्या गायनाला सौंदर्यपूर्णता आणि सूक्ष्मता लाभली होती. क्वचित मुर्की व कणस्वराचा वापर करून ते गाण्यात सौंदर्य आणत असत. मंद्र व मध्य सप्तकांतील रागविस्तारात न्यास स्वरांनी गायनाला उठाव आणून ते रसिकांना मंत्रमुग्ध करीत. कधी कधी ते अंतरा घेतही नसत. त्यांच्या मते, ख्यालरचनेत शब्द महत्त्वाचे; तर स्वरांच्या रंगांना विशेष अर्थ त्यांनी दिला. त्यांनी स्वत:च्या अनेक रचना लोकप्रिय केल्या. अनेक रुबाईदार तराणे, ख्यालनुमा आणि बंदिशी अमीर खॉं यांनी रचल्या. "हृदयातून निर्माण झालेले, आणि आत्म्याला स्पर्श करणारे ते खरे संगीत" असे ते नेहमी म्हणत. मा. अमीर खॉ यांनी चित्रपटांसाठीसुध्दा काही गाणी म्हटली. पहिला सिनेमा होता क्षुधित पाषाण. हा एक बंगाली सिनेमा होता. बैजू बावरामधील शेवटच्या जुगलबंदीसाठी तानसेनसाठी अमीर खॉं यांचा आवाज तर ठरला पण बैजूसाठी कोणाचा हे काही ठरेना. कोणी म्हणाले पं. ओंकारनाथ ठाकूरांचा आवाज घ्या. पण अमीरखॉसाहेबांनी डि. व्हि. पलूसकरांचा आवाज त्या आवाजाच्या निर्मळतेमुळे सुचवला आणि ते अजरामर गाणे ’आज गावत मन मेरो झुमके” निर्माण झाले. या चित्रपटाचे टायटल सॉंग पण अमीर खॉ यांनीच म्हटले होते. अजून दोन चित्रपटातील गाणी मा.अमीर खॉं यांनी गायली. एक म्हणजे झनक झनक पायल बाजे आणि दुसरा गुंज उठी शहनाई. ग़ालिबच्या माहितीपटासाठी त्यांनी ग़ज़लही गायली. मा.अमीरखॉसाहेब हे एक कलकत्यातील बडे प्रस्थ होते. एक काळ असा होता की त्या शहरातील एकही मेहफिल त्यांच्याशिवाय व्हायची नाही. एवढेच काय त्यांना भारत सरकार कडून पद्मभूषण, राष्ट्रपती पारितोषिक, स्वरविलास असे अनेक मानसन्मान मिळाले. पण या अत्यंत साध्या माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. खर्या अर्थाने ते सुशिक्षित व सुफी संत होते. त्यांनी अमेरीकेत न्युयॉर्क विद्यापिठात ही काही काळ संगीत शिकवले.
सरोदवादक अमज़द अली खॉ यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे ती त्याच्याच शब्दात ते साल होते १९७१. कलकत्यात तानसेन समारोह नावाचा एक संगीत समारोह भरायचा. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या समारोहात मला आमंत्रण होते. एक बुजुर्ग गायक श्री. शैलेनबाबू याचे आयोजन करायचे. हा समारोह संध्याकाळी चालू होऊन रात्रभर चालायचा आणि दुसर्यारदिवशी सकाळी संपायचा, (आपल्या गंधर्व महोत्सवाप्रमाणेच.) परंपरेने बुजुर्ग कलाकराच्या गायनाने याचा समारोप व्हायचा. त्या दिवशी माझी फ्लाईट उशिरा पोहोचली आणि मी त्या हॉलमधे पोहोचेपर्यंत उस्ताद अमीरखॉसाहेबांचे गाणे सुरू झाले होते. शैलेनबाबू या प्रकाराने अतिशय अस्वस्थ झाले होते. मी जेव्हा त्यांना सांगितले की मी खॉसाहेबांनंतर गाऊ शकणार नाही तेव्हा ते थोडेसे चिडलेच. बरोबर आहे. प्रेक्षकांनी तिकिटे अगोदरच काढलेली होती. त्यांनी माझी बरीच समजूत काढायचा प्रयत्न केला, पण मी ठामपणे नकारच दिल्यामुळे त्यांचे काही चालेना. हे सगळे चालले असतानाच खॉसाहेबांचे गायन संपले आणि ते निघाले होते. शैलेनबाबूंनी त्यांना गाठले आणि त्यांना माझ्या नकाराबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी माझ्याकडे बघून मला जवळ जवळ आज्ञाच केली. म्हणाले “ माझ्यानंतर तू नाही वाजवणार तर कोण वाजवणार? जा. वाजव !”
पहाटेचे पाच वाजले होते. मी तसाच स्टेजवर गेलो आणि सुरवात करणार तर काय पुढच्याच रांगेत खॉसाहेब बसले होते. मी नम्रपणे त्यांना म्हटले “ खॉसाहेब आपण गायल्यानंतर आता मला काय वाजवायचे हेच सुचत नाही आहे. कृपया आपण शांतपणे घरी जा आणि आराम करा.”
त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सुरवात करायला सांगितले. मला अजून आठवतंय मी कोमल रिषभ असावरीने ती पहाटेची मेहफिल चालू केली. परमेश्वराच्या कृपेने ती माझ्या अनेक मेहफिलीत सगळ्यात अविस्मरणीय ठरली. त्या पहाटे मला खॉसाहेबांनी जगातील सगळ्यात मोठे बक्षीस दिले होते.” पं. हृदयनाथ मंगेशकर, कंकणा बॅनर्जी, कमल बोस, अमरजीत कौर, ए. कानन, भीमसेन शर्मा हे सर्व उस्ताद अमीर खॉं यांचे शिष्य आहेत. अमीर खॉं यांना 'संगीत नाटक अॅकॅडमी अॅवॉर्ड', 'पद्मभूषण', 'राष्ट्रपति अॅवॉर्ड', सूरसिंगार, 'स्वरविलास' पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. अमीरखाँसाहेबांचे आपल्या वडिलांवर इतके आदरयुक्त प्रेम होते की त्यांनी पुढील आयुष्यात मुंबईला एक इमारत बांधली आणि त्याला नाव दिले होते “शामीर मंझील”. उस्ताद अमीर खॉं यांचे १३ फेब्रु. १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 13, 2017
आपल्या सरल, सुस्पष्ट, सुमधुर निवेदन शैलीतून, सलग 41 वर्षे चालणाऱ्या गीतमालेतून भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमी श्रोत्यांना एका सुरेल सूत्रात बांधून ठेवणारे सदाबहार आवाजाचे रेडिओसाथी अमीन सयानी 21 डिसेंबर या दिवशी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत. आजही कार्यमग्न असणाऱ्या अमीन सयानींच्या कार्याची, जीवनाची झलक, श्रोत्यांच्या शुभेच्छांसह...
"भाईयों और बहनों‘ अशी अकृत्रिम स्वरात साद घालत, "अगले बुध की शाम फिर मिलेंगे‘ असा वादा करत "अगले पायदान‘पर असणारं गाणं कोणतं असा सवाल करत अमीन सयानी आपल्याला भेटत राहिले. आणि आपण चित्रपट संगीताच्या सोनेरी कालखंडात मुक्तपणे विहार करीत राहिलो. दूरदर्शन तर दूरच, पण त्याचा अभाव जाणवू न देणारं श्रवण आणि संवाद इतका उत्कट होता की ध्वनिलहरींनी मनाचं अवकाशही भरून राहिलं. संवादक, निवेदक, सूत्रधार अमीन सयानी आपल्या बालपणीचे जणू सवंगडी, दर बुधवारी भेटणारे मित्र आता ऐंशी वर्षांचे होत आहेत यावर विश्वा्स ठेवणं कठीण गेलं. आवडती "बिनाका गीतमाला‘ 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू होऊन आज साठीची झाली हेही खरं वाटेना.
गीतमालेची जन्मकथा सांगताना ते म्हणतात, ""साल 1952. एका तरुण ब्रॉडकास्टरला सांगण्यात आलं होतं की, एक प्रायोगिक तत्त्वावर गीतमालेचा कार्यक्रम लिहावा, सादर करावा, श्रोत्यांना उत्तरंही द्यावी, त्याचं मानधन रुपये पंचवीस प्रत्येक आठवड्याचे मिळतील.‘‘ तो तरुण ब्रॉडकास्टर मीच होतो... कार्यक्रम तयार केला. बुधवार 3 डिसेंबर 1952 रोजी रेडिओ सिलोनवरून रात्री 8 ते 8.30 या वेळात प्रसारित झाला आणि थेट श्रोत्यांच्या हृदयात पोचला. पहिल्याच आठवड्यात श्रोत्यांची 9000 पत्रं आली, नंतर 15000 आणि आकडा वाढतच गेला...‘ रेडिओ सिलोनचा ट्रान्समीटर अत्यंत प्रभावशाली असल्याने त्याचं प्रसारण दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आफ्रिका येथे सर्वदूर स्पष्ट ऐकू येई. कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी वाढली की, 3 डिसेंबर 1952 रोजी सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता एप्रिल 1994 रोजी झाली. 41 वर्ष गीतमाला चालली. हा एक विश्वाविक्रमच होता.
रेडिओ सिलोनच्या प्रभावी ट्रान्समीटर इतकाच प्रभावी, आकर्षक निवेदन शैलीचा, विशीचा युवा निवेदक एक इतिहास घडवीत होता. चित्रपट संगीताचं सुवर्णयुग तर उगवलं होतंच. नवे चित्रपट, तारे, तारकाही अवतरत होते. अमीन सयानी एका प्रभावी, परिणामकारक संवादशैलीतून अवघ्या भारतातल्या तरुणाईला बोलावीत होते, त्यांच्याशी साध्या, सरल हिंदीतून बात करीत होते. कोणताही भारतीय एकात्मता साधण्याचा तो राष्ट्रीय सरकारी कार्यक्रम नव्हता की हिंदी भाषेची प्रसारसभा नव्हती. आपलं उत्पादन विकणाऱ्या कंपनीसाठी तो एक व्यावसायिक कार्यक्रम होता, पण त्यात अमीन सयानींनी असे प्राण ओतले की एक पिढी हिंदी बोलू लागली, नव्हे हिंदी फार सोपी भाषा आहे. हे त्यातून भारतात कुठेही संचार शक्यल आहे, हे समजलं. या सोप्या भाषेचं श्रेय ते आपले वडील बंधू-गुरू व निवेदक हमीद सयानींना आणि म. गांधींच्या अनुयायी असलेल्या आपल्या मातोश्री कुलसुम सयानी यांना देतात.
आई-वडिलांची दोन्ही घराण्यांची पार्श्विभूमी डॉक्टधर, समाज सेवकांची. 21 डिसेंबर 1932 रोजी कच्छी खोजा मुस्लिम घरात जन्मलेल्या अमीन सयानींचे वडील डॉक्टभर, आईचे वडील डॉ. रजबअली पटेल, महात्मा गांधींचे निकटवर्ती, मौलाना अबुल कलाम आझादांचे मित्र. दोन्ही कुटुंबं पुरोगामी विचारांची, शिक्षणाला महत्त्व देणारी. महात्माजींच्या आदेशानुसार कुलसुम सयानींनी प्रौढ शिक्षणाचं कार्य हाती घेतलेलं. 40 वर्षांपासून त्या "रहबर‘ (पथदर्शक) हे पाक्षिक चालवीत. हिंदी, ऊर्दू आणि गुजराती भाषा व लिपीतून. वयाच्या तेराव्या वर्षांपासून आईला मदत करणाऱ्या अमीन सयानींना उर्दू, गुजराती, हिंदीचा चांगला परिचय घडला.
भारतातल्या साध्या माणसासाठी संभाषणाची भाषा, कशी असावी ते नकळत उमगलं. न्यू एरा हायस्कूलमध्ये गुजराती माध्यमातून, तर ग्वाल्हेरच्या सिंदिया हायस्कूलमध्ये इंग्रजीतून शिक्षण झालं. सेन्ट झेव्हियर्समध्ये छोटी नाटकं, एकांकिका लिहून करण्याचा छंद जडला. घरातलं वातावरण स्वातंत्रसैनिक, विचारवंत यांचा राबता असल्याने अतिशय मोकळं, सेक्युदलर. संस्कृत, अरेबिकची खास शिकवणी होती. आजूबाजूला मराठी गोतावळा. विजया मेहता, दामू केंकरे यांची प्रायोगिक नाटकं पाहायला जायचा उत्साह असे.
संभाषणाच्या ओघात अमीन सयानी बिनचूकपणे गणपतीची आरती, संस्कृत सुभाषितंही आठवतात. वयाच्या सातव्या वर्षीच रेडिओच्या इंग्रजी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या छोट्या भावाला-अमीनला मोठ्या हमीदनं कानमंत्र दिला. "समोर असणाऱ्या व्यक्तीशी बोलशील तसा मायक्रोफोनमधून बोलत जा.‘
सही म्हणजे बिनचूक, सत्य म्हणजे खरं, फसवाफसवी नको, स्पष्ट- संदिग्ध नको, सरल- समजेल असं, सभ्य- अश्लीजलता, उद्धटपणा, उथळपणा नको, सुंदर म्हणजे आकर्षक अशी सहासूत्रं अमीन सयानींनी पाळली आणि त्याला सहृदयतेची, प्रेमाची जोड दिली. निवेदन एका उंचीवर नेऊन ठेवलं.
बालगोविंद श्रीवास्तव यांनी रेडिओ सिलोनच्या "फुलवारी‘ या नवोदितांच्या कार्यक्रमासाठी निवेदन करायला बोलावलं. तेव्हा कॉलेज झाल्यानंतर एलएलबी करून वकील होण्याचं घरच्यांचं स्वप्न तसंच राहिलं खरं, पण एक उमदा, हरहुन्नरी निवेदक रेडिओत दाखल झाला आणि त्यानं इतिहास घडवला.
52 व्या वर्षीच्या 3 डिसेंबरपासून सुरू झालेल्या गीतमालेनं संगीतप्रेमी सिनेप्रेमी रसिकांच्या भावजीवनात एक रोमहर्षक पर्व सुरू केलं. त्यात खूप बदल झाले. 54 व्या वर्षापासून अर्ध्या तासाचा कार्यक्रम एक तासाचा करण्यात आला. खास लोकाग्रहास्तव! गीता दत्तनी "आसमान‘ या चित्रपटात गायलेल्या गाण्याची धून बिनाकाची सिग्नेचर ट्यून होती. ओ.पी. नय्यरच्या या संगीताची धून लोकांच्या हृदयात जाऊन बसलेली होती. ती 70 व्या वर्षांपर्यंत वाजत असे.
प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन गाण्याचा पसंतीक्रम अमीन सयानींनी लोकांवर, रसिकांवर सोपवला. देशभरात नियमित गाणी ऐकणारे श्रोतासंघ तयार झाले ते अमीन सयानींमुळे. श्रोते आणि चित्रपट निर्माते आणि रेकॉर्ड विक्रेते याच्या संयुक्त पसंतीनं निर्णय झाल्यामुळे संपूर्ण लोकशाही तत्त्वाचा आधार असलेला गीतमाला हा कार्यक्रम चांगलाच बहरला.
गीतमालाचे अभ्यासक जयपूरचे अनिल भार्गव म्हणतात. ""41 वर्षांच्या प्रसारणात एकूण 2081 कार्यक्रमांत केवळ 80-85 कार्यक्रम काही कारणास्तव घडू शकले नाहीत. खुद्द अमीन सयानी काही अपरिहार्य कारणास्तव केवळ फक्त 30 वेळा हजर राहू शकले नाहीत.‘‘
थोडं मागे वळून पाहिलं तर ज्या वेळी अमीन सयानींचा चिरपरिचित स्वर ऐकू आला नाही त्या वेळी श्रोत्यांच्या मनातही काही चुकल्यासारखे झाले होते, हे आठवते.
अमीन सयानींचे अनेक रेडिओ प्रोग्रॅम्स गाजले.
"सॅरिडॉन के साथी‘, "एस. कुमार्स का फिल्मी मुकद्दमा‘, "मराठा दरबार की महकती बातें "जोहर के जबाब‘ इत्यादी; पण खुद्द अमीन सयानी म्हणतात, ""मी कॉलेजात मुलींशी बोलत असे, मिसळत असे; पण तेवढंच. माझी खरी "स्वीटहार्ट म्हणजे गीतमाला. मी हा कार्यक्रम समरसून करीत असे. यावर माझं नितांत प्रेम आहे.‘‘
अमीन सयानी त्यांना कामात मदत करणाऱ्या "इव्हज वीकली‘ची टॉप मॉडेल असलेल्या देखण्या काश्मियरी रमा मट्टूच्या खरोखरीच प्रेमात पडले. 58 व्या वर्षी विवाहबद्ध झालेल्या अमीन सयानींचं रमाबरोबरचं सहजीवन सुरेल, समाधानी ठरलं.
2002 साली रमाच्या निधनानंतर एकाकी झालेल्या अमीन सयानींचे काम अखंडपणे सुरू आहेच. त्याचा मुलगा राजील त्यांना कामात मदत करतो.
"फिल्म फेस्टिव्हल‘, "सौंदर्य स्पर्धा‘, "फॅशन शो‘ किंवा महत्त्वाचे प्रतिष्ठित कार्यक्रम अमीन सयानींनी शैलीदारपणे सादर केलेत. पसंतीच्या टॉप गाण्यात आपल्या गाण्यांचा समावेश नाही म्हणून नाराज झालेल्या काहींनी त्यांच्यावर आरोप केले; पण पारदर्शकता आणि निर्दोष कार्यप्रणालीमुळे अमीन सयानी आजही टिकून आहेत. "बिनाका‘ "सिबाका‘ अशी नावं बदलली, बुधवार बदलला, निवेदकही बदलले; पण गीतमाला आणि अमीन सयानी मात्र अजूनही लोकप्रियता टिकून आहेत.
चित्रपटाचं आणि चित्रपट संगीताचं सुवर्णयुग ही त्यांची "मर्मबंधातली ठेव‘. अभिनेते, अभिनेत्री, गीतकार, संगीतकार यांच्या दिलखुलास मुलाखतींचं ध्वनिमुद्रण हा त्यांचा लाडका विषय. नर्मविनोदाची पखरण, स्पष्टता, खेळकरपणा यांचा सुंदर मिलाफ असलेल्या त्यांच्या मुलाखती केवळ श्रवणीय, बालकलाकार, रेडिओ, टीव्हीची सम्राज्ञी असलेल्या तबस्सूमची ओळख "मेरी छोटी और मोटी बहन‘ अशी कौतुकानं करून देतील. अशोककुमारना त्यांच्या पहिल्यावहिल्या "शॉट‘बदल विचारतील. लतीदीदींना त्यांच्या आशाताईंशी असलेल्या व्यावसायिक स्पर्धेबद्दल प्रश्नि विचारतील तर किशोरकुमारची फिरकी घेतील; पण संयमाचं सूत्र कधीच सुटत नाही.
रेडिओ सिलोनचं "श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‘ झालं. एकेकाळचा "पॉवरफुल‘ ट्रान्समीटर क्षीण, दुर्बल झाला. पण त्यांच्या सुस्पष्ट आवाजात ऐकू येणारा पत्ता "सेसिल कोर्ट, लॅन्सडाऊन रोड, मुंबई‘ मात्र तोच आहे. पहिल्यापासून असणारा रेकॉर्डिस्ट जॉन नियमित येतो. अमीन सयानी नेहमीप्रमाणे येतात. गीतमालेचा विषय निघाला की खुलतात.
भाषा बिघडली, परस्परांतला भाईचारा, गोडवा हरवला म्हणून व्यथित होतात. रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेची आठवण त्यांना होते-where the mind is without fear... त्यावर "मन जहॉं न डरे, सर जहॉं न झुके ऐसा हो देश हमारा‘ अशा ओळी सुचतात.
त्यांचं आवडतं गीत ही आठवतं "मन रे, तू काहे ना धीर धरे‘ पलीकडेच गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेलचा परिसर गजबजलेला असतो, समुद्राची गाज येते.
अमीन सयानी मात्र कामात बुडून जातात. गीतमालाची सावली गडदही असते अन् फार सुमधुरही.
-- सुलभा तेरणीकर
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 21, 2017
आर्या आंबेकरची आजी वर्षां आंबेकर सुद्धा एक शास्त्रीय गायिका आहेत. तिचा जन्म १६ जून १९९४ रोजी झाला. पार्ले टिळक विद्यालयात संगीत शिक्षिका, आकाशवाणी गायिका, काही ऑडिओ कॅसेटच्या संगीतकार अशी त्यांची ओळख. आर्याचे वडील समीर आंबेकर हे डॉक्टर आहेत ते उत्तम तबला वादक सुद्धा आहेत. आर्याची आई श्रुती आंबेकर यांनी जयपूर घराण्याचे खास शिक्षण प्रख्यात गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे अनेक वर्ष घेतले आहे. त्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयात संगीत विभागात लेक्चरर होत्या. त्या एम.ए. म्युझिक सुवर्णपदक, संगीत अलंकार देशात पहिली, बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, नेट उत्तीर्ण आहे. संगीत नाटकातही त्यांनी काम केले आहे. त्यांनी आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले.
आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली. तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी अल्बम्स मध्ये तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली. आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती. सारेगमप या कार्यकमात तारसप्तकातला ‘नी’ फक्त एकमेव तिला मिळाला होता.
आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. ‘पंचरत्न’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’, ‘जय हरी विठ्ठल’, ‘मराठी अभिमानगीत’, ‘आठवा स्वर’, ‘मला म्हनत्यात आर्या आंबेकर’, ‘गीत तुझे गाता गाता’, ‘खाऊचा गाव’, ‘माझ्या मातीचे गायन’, ‘दिवा लागू दे रे देवा’ हे आर्याच्या आवाजातील अल्बम संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. ‘आनंदवन आले घरी’ हा थोर समाजसेवक बाबा आमटेंचं कार्य वर्णन करणारा अल्बमही खूप चर्चेत राहिला.‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शीर्षक गीतही आर्यानेच गायलं आहे. आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
आनंद मोडक, नरेंद्र भिडे या संगीतकारांकडे कॅसेट्स, चित्रपट, माहितीपट, नाटक इत्यादीसाठी ती गायली आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते. आर्याला माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी आर्या आंबेकर अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. ती सध्या काय करते या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीचा रोल तिने केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 16, 2019
प्रवीण दवणे यांनी आपल्या बाल वयातच लेखनासाठी प्रारंभ केला. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९५९ रोजी झाला. प्रवीण दवणे हे ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे गेली तीस वर्षे अध्यापन करत आहेत. प्रवीण दवणे यांनी विविध माध्यमांतून वाड्मयच्या विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांच्या प्रकाशित ग्रंथसंपदा सुमारे साठ पुस्तके मा.प्रवीण दवणे यांच्या नावावर आहेत. “सावर रे !”, “स्पर्शगंध”, “रंगमेध”, “गंधखुणा”, “हे शहरा” यांसारखी अनेक रसिकप्रिय काव्यसंग्रह, लेखसंग्रह मा.प्रवीण दवणे यांच्या नावे प्रसिद्ध झाले आहेत. तर "आई परत येते", "स्माईल प्लीज", "श्रीयुत सामान्य माणूस","प्रिय पप्पा" ही नाटके रंगमंचावर आली आहेत. मा.प्रवीण दवणे यांनी सुमारे ठकास-महाठक, झपाटलेला, आम्ही असू लाडके, आम्ही सातपुते,शुभमंगल सावधान, अदला बदली अशा १२५ मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली आहेत. त्यांनी अनेक भावगीते व भक्तिगीते गाणी लिहिली आहेत. मा.प्रवीण दवणे हे त्यांच्या कविता, लेख, लेखमाला या साठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याही पेक्षा ते एक सामजिक जाणीव असलेला माणूस म्हणून ते जास्त प्रसिद्ध आहेत. मा.प्रवीण दवणे यांना सर्वोत्कृष्ट वाडम़याचा राज्यपुरस्काराचा पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, मा.दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या ठाण्याविषयी बोलताना मा.प्रवीण दवणे म्हणतात की, कालचे ठाणे हिरवळीचे, नाते संबंधांचे, घरोब्याचे नाते जपणारे होते. आजचे ठाणे ट्रॅफिक जॅमचे, प्रदूषणाचे आणि माणूसपण तुटलेले वाटते, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यात काही चिकीचं नाही. हा बदल अपरिहार्य आहे. ठाण्यातल्या समस्यांवर आपलं प्रशासन योग्य त्या उपाययोजना करताना दिसत आहे. सध्या ठाणे हे परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. पण असं असलं तरी ठाण्यातली सांस्कृतिक जाणीव ही कधीच कमी होणारी नाहीये आणि त्यामुळेच उद्याचं ठाणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरेल यात कोणतेही दुमत नसावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रवीण दवणे यांची काही गाणी.
कसा प्रकाश पाझरे, घन करुणेचा सूर, चल् झेलूया गाणे, चिंब भिजलेले, ज्यास देव सापडला, तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी, तेजोमय नादब्रह्म हे, दे साद दे हृदया,
दोन रात्रीतील आता संपला, निघालो घेऊन दत्ताची, पाऊस पहिला जणु कान्हुला, माघाची थंडी माघाची, मुक्या हुंदक्याचे गाणे, ही वाट कुणी मंतरली
प्रवीण दवणे यांचे कविता वाचन.
https://youtu.be/NZRFsS729a4
https://youtu.be/oXiXGHtuqwI
April 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti