(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो

    फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला. महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्डोहला सर्वश्रेष्ठय फुटबॉलपटू संबोधलेले आहे. रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांरनी मुलाचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’असे ठेवले होते.पुढे त्याूचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’असे पडले. वयाच्याा १४ व्याड वर्षी रोनाल्डोटने शाळेतील शिक्षकाला बुट आणि खुर्ची फेकून मारली होती. त्यासमुळे त्याळला शाळा सोडावी लागली होती. लहानपणी रोनाल्डो ची आई त्याला ‘रडके बाळ’ असे म्हणत असे. कारण रोनल्डोअ लहानपणी खुप रागीट होता आणि राग आल्या नंतर जोरजोरात रडत होता.

    रोनाल्डोने २००२-०३ मध्ये मॅनचेस्टर युनाइटेडला जोडला गेल्यां नतर त्याजने 28 नंबरची जर्सी मागितली हेाती. परंतु नाइलाजास्तेव त्याेला सात नंबरची जर्सी देण्याात आली. आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली. जॉनी बेरी, जॉर्ज बेस्ट, स्टीव कूपेल, ब्रायन रॉब्सन, एरिक कैंटोना आणि डेविड बेकहम हे सुध्दाे ७ नंबरची जर्सी परिधान करत. जवळपास पाच वर्षांपासून मॉडेल इरिना शायक सोबत क्लोज रिलेशनशिपमध्येु आहे. इरिना सपुर मॉडेल असून तिने २०१४ मध्येय हॉलीवुड फिल्म 'हरक्यूलिस'मध्येे कामसुध्दा केले आहे. रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने कारकिर्दीत चॅम्पियन्स लीगचे तिसरे जेतेपद आणि पोर्तुगालसह युरो २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर ‘बेलोन डिओर’ पुरस्काराचा मान मिळवला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ सामन्यांत १६ गोल नोंदवले. आपल्या समुहाकडून रोनाल्डोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रोनाल्डोचे संकेतस्थळ www.cristianoronaldo.com

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 5, 2019


  • माझी माणसं – बंडू दादा

    तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल . पण वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही .

      December 13, 2017


  • बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन

    बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला.विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

    एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला. समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले.

    त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले. 'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते.

    प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2018


  • गायक रवींद्र साठे

    स्पष्ट शब्दोच्चार,खर्जातील घनगंभीर स्वर,आणि भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासीयत. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.

    रविंन्द्र साठे यांचे श्री. मुकुंदराव गोखले यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले.बालकलाकार म्हणून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.पण महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या या शिक्षणात खंड पडला.त्याच वेळी सुगम संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले.आणि ते पुन्हा गाण्याकडे वळले.पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांची गानसाधना सुरु झाली.पदवीनंतर त्यांनी पुण्याच्या एफ.टी.आय मध्ये '' साऊंड रेकॉर्डडिस्ट ''चा कोर्स पूर्ण केला.त्यानंतर दूरदर्शनवर म्हणून नोकरी केली.तेव्हा दूरदर्शनवर आरोही,शब्दांच्या पलीकडले,अमृताची फळे असे दर्जेदार कार्यक्रम सादर होत असत.येथेच स्वरांचे संस्कार त्यांच्यावर घडले.सुधीर फडके आणि गजानन वाटवे यांना ते ''शब्दोच्चरतिल आदर्श'' मानतात.

    रवींद्र साठे हे नाव सुपरिचित झाले ते ''घाशीराम कोतवाल''या नाटकातील त्यांच्या गायक नटाच्या भूमिकेमुळे .त्यांच्या या भूमिकेबद्दल सी.रामचंद्र,कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे अश्या मान्यवरांकडून त्यांना दाद मिळाली. मधुकर गोळवलकर,सी.रामचंद्र,राम कदम,आनंद मोडक,हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके अशा नामवंत संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे.''ओंजळीत स्वर तुझेच''हा त्याचा आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेला अल्बम रसिकांनी खूप नावाजला आहे.

    सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.''पिक करपल'' हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ मानसी पटवर्धन

      February 9, 2017


  • उर्दू शायर’, व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी

    मौलाना ... हसरत मोहानी यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) येथे झाला.संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!

    सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले.

    ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या. कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती. हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते. मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

    पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली. १८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे.

    मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची. दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या.

    मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!

    अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला.

    अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला. मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.

    हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात -
    मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक पैगामे वफा बादे सहर लेके गयी है.
    (हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
    टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते -
    मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से सिधारे आज तिलक बलवंत तिलक, महाराज तिलक, आझादी के सरताज तिलक
    मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
    मनमोहन श्याम से नैन लाग निसदिन सुलग रही तन आग मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!

    चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है , हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है, व खूब-रुयोंसे यारियाँ न गई
    या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स मा.हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई
    हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर

    खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
    https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
    चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
    https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g

    हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
    =========================================
    उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
    किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
    =====================================
    कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
    उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
    =====================================
    जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
    अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
    ======================================
    तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
    देखता था मै तुने भी इशारा कर दिया
    इश्कने उसको सीखा दी शायरी
    अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई

      May 15, 2017


  • ज्येष्ठ अभिनेते जॉय मुखर्जी

    लव्ह इन टोकियो', "शागीर्द', "लव्ह इन सिमला', "जिद्दी', "एक मुसाफिर एक हसीना' अशा गाजलेल्या चित्रपटांनी रसिकप्रिय झालेले जॉय मुखर्जी यांचे वडील शशधर मुखर्जी हिंदी चित्रपटनिर्माते होते; अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओ त्यांच्या मालकीचा होता. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९३९ रोजी झाला."लव्ह इन सिमला' हा जॉय मुखर्जी यांचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातील "रोमॅंटिक' नायकाच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांच्या वडिलांनी "हम हिंदुस्थानी' आणि "एक मुसाफिर एक हसीना' असा "डबल बार' उडवून दिला. जॉय मुखर्जी यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले; त्यातून त्यांची "स्टाईल' निर्माण झाली. ते साठच्या दशकातील लोकप्रिय अभिनेते होते. "लव्ह इन टोकियो' या चित्रपटानंतर आलेला "सांज और आवाज' हा चित्रपट फारसा चालला नाही. अभिनय करत असतानाच, त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली, तसेच दिग्दर्शनही केले. माला सिन्हा आणि शर्मिला टागोर यांना घेऊन "हमसाया' हा चित्रपट त्यांनी बनवला. मात्र चकवा देणारे कथानक आणि नायिकांतील वादामुळे या चित्रपटाला "बॉक्स ऑफिस'वर चांगली कामगिरी करता आली नाही. "सांझ की बेला' आणि "उम्मीद' या चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली."बहुत शुक्रिया, बडी मेहरबानी', "ओ मेरे शाहे खुबा, ओ मेरी जाने जनाना', "वो है जरा खफा खफा', "बडे मिया दीवाने' अशी त्यांची गाणी अत्यंत गाजली आहेत. मा.जॉय मुखर्जी यांचे ९ मार्च २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 25, 2017


  • बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन

    सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्‌मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 6, 2017


  • चरित्र अभिनेते नाना पळशीकर

    नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ‘ कानून ‘ ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्ह्णून ‘फिल्मफेअर’ पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतमहोत्सवनिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना पारितोषीक देण्यात आले.

      June 23, 2021


  • महाराष्ट्र मोल्सवर्थचे ऋण विसरलाय का?

    मोल्सवर्थचा मराठी – इंग्रजी शब्दकोश (१८३१) ऐकूनही माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं कठीण. पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसंही तशी कमीच. मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आजही सुमारे १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे.

    महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. मोल्सवर्थ ह्या ब्रिटीश माणसाने आपल्याला ही डिक्शनरी तयार करून दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यकथा अचंबित करणारी आणि आजच्या तरूणांना प्रेरणा देणारी अशी दोन्ही आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती निदान माहीत तरी असायला हवी.

    जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक ब्रिटीश लष्करी अधिकारी. जन्म १५ जून १७९५ चा. शालेय शिक्षण व बालपण ब्रिटनमध्ये गेलेलं. त्याकाळी किशोरवयीन ब्रिटीश मुलांना लष्करात दाखल करण्याची पद्धत होती.

    जेम्स वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटीश लष्करात दाखल झाला. एप्रिल १८१२ मध्ये १७ व्या वर्षी त्याला भारतात पाठवण्यांत आले. ब्रिटीश लष्कराच्या पद्धतीप्रमाणे भारतात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला मराठी आणि हिंदी भाषा शिकावी लागे. त्याच्या परिक्षा घेतल्या जात, आणि त्यात पास होण्याची लष्करी सक्तीही असे.

    जेम्स त्या परिक्षांसाठी मराठी शिकू लागला आणि मराठी भाषेच्या चक्क प्रेमातच पडला. मराठी शब्द जमवण्याचा छंद त्याला लागला. पुढे १८१४ मध्ये त्याला लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. १८१८ मध्ये त्याची बदली सोलापूरला झाली. तेव्हा तो २३ वर्षांचा होता. मराठीत भाषांतर करण्यासाठी तो जे शब्द टिपून ठेवत होता त्याची संख्या दिवसेदिवस वाढत होती. पुढे १८२४ मध्ये त्याची बदली गुजरातमध्ये खेडा भागात झाली.

    मराठी वातावरणाची सवय झालेल्या मोल्सवर्थला गुजरातमध्ये करमेना. त्याने पुढल्या काही महिन्यांत ब्रिटीश सेनेकडे मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला आणि महाराष्ट्रात बदलीही मागितली. शब्दकोशासाठी सहकाऱ्यांचा पगार, स्टेशनरी वगैरेंचा मिळून एकूण खर्च २००० रूपये येईल त्यास मंजुरी मिळावी अशी प्रस्तावात विनंती होती. पण ब्रिटीश सेनेने त्याचा प्रस्ताव फेटाळला.

    इंग्रज सरकारला मराठी शब्दकोशाशी कसले देणेघेणे? त्यांना आपले साम्राज्य सांभाळायचे आणि त्यासाठी लढाया करायच्या एवढेच माहिती. मोल्सवर्थच्या प्रस्तावावर ब्रिटीश सेनेचे म्हणणे होते की लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी यांनी एक मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार केला आहे. तो पुरेसा आहे. सबब, प्रस्ताव नामंजूर.

    पण मोल्सवर्थ तर मराठी शब्दकोशाच्या कल्पनेने झपाटला होता. गुजरातमध्ये राहून मराठी शब्दकोश होणे शक्य नव्हते. वारंवार विनंती अर्ज, स्मरणपत्र पाठवूनही त्याची महाराष्ट्रात बदली होत नव्हती. शेवटी कंटाळून त्याने एक धमकी आणि एक ऑफर ब्रिटीशांना दिली. धमकी अशी की बदली झाली नाही तर मी लष्करी नोकरीच सोडून देईन.

    ऑफर अशी की शब्दकोशासाठी रजा दिली तर त्याला मिळणारे सर्व भत्ते तो सोडून द्यायला तयार आहे. एवढं टोक गाठल्यावर त्याची बदली मुंबईत करण्यांत झाली. शब्दकोश तयार करण्याची परवानगीही त्याला देण्यांत आली. मोल्सवर्थवर अधिकारी म्हणून लष्करी जबाबदाऱ्या होत्या, त्यात आणखी एक भर म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा (BNES) कारभार पाहण्याचं कामही त्याला दिलं गेलं.

    बीएनईएस संस्थेत त्याची भेट मराठी भाषा उत्तम जाणणाऱ्या काही शास्त्री मंडळींशी झाली. सोलापूरला असताना त्याची ओळख थॉमस कँडी यांच्याशी झाली होती. थॉमस कँडी आणि त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज दोघेही मराठी उत्तम जाणणारे होते. थॉमस तर संस्कृत पाठशाळेचे प्राचार्य म्हणून काम करीत असत.

    दोघा कँडी बंधूंना मुंबईला बीएनईएस मध्ये पाठवण्यांत यावं ही मोल्सवर्थची विनंतीही ब्रिटीशांनी मान्य केली. कँडी बंधू एप्रिल १८२६ मध्ये मुंबईला आले. आता मराठी शब्दकोशाचं काम वेगात सुरू झालं. पण जून महिन्यांत मुंबईत पावसाने थैमान घातलं. हवामान पार बदलून गेलं. कँडी आणि मोल्सवर्थ सगळेच त्या पावसाने हैराण झाले. मुंबई सोडून कोकणात जावं असं त्यांनी ठरवलं.

    त्यानुसार शब्दकोशाचं पुढलं काम बाणकोट आणि दापोली येथे झालं. १८२८ च्या डिसेंबरात शब्दकोशाची अंतिम प्रत तयार झाली. बीएनईएस संस्थेचा लिथो छापखाना होता. तिथे शब्दकोशाची छपाई करावी असं ठरलं. मोल्सवर्थला उपलब्ध असलेले मराठी टाईप आवडले नव्हते. त्यामुळे त्याने नवा आणखी सुबक टाईप शब्दकोशासाठी करून घेण्याचे ठरवले.

    त्यावेळी टाईप फक्त कलकत्त्यात तयार होत. काही आठवड्यांत कलकत्त्याहून नवे टाईपही आले. तयार झालेला शब्दकोश २५,००० शब्दांचा होता. कलकत्त्याहून टाईप यायला जो वेळ लागला तेवढ्या वेळात मोल्सवर्थने आणखी १५,००० शब्द जमा केले आणि शब्दकोशातील शब्दांची संख्या ४०,००० केली. शब्दकोशाला नाव दिले ‘महाराष्ट्र भाषेचा कोश’. छपाई पुर्ण होऊन प्रती हाती यायला १८३१ साल उजाडले.

    मोल्सवर्थने काही प्रती एका पत्रासोबत ब्रिटीश सेनाप्रमुखांकडे पाठवल्या. पत्रात लिहीले की “कामाचा आवाका, आणि झालेल्या कामाचा दर्जा (याबाबत मी बोलण्यापेक्षा) प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कल्पना येईल. लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडींनी तयार केलेला मराठी शब्दकोश ८००० शब्दांचा होता. मोल्सवर्थचा ४०,००० शब्दांचा. पण सरळ कौतुक करतील तर ते ब्रिटीश कसले?

    शब्दकोशाचा दर्जा ठरवण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. त्यात लेफ्टनंट कर्नल केनेडी, लेफ्टनंट जॉर्ज पोप, आणि रॉबर्ट कॉटन मनी हे तीन सदस्य नेमले. केनेडींच्या मते मराठी ही फक्त एक बोली भाषा होती, आणि त्यात जे मोजके शब्द आहेत त्यांचा कोश त्यांनी तयार केलेला होता.

    नव्या कोशाला मुळातच त्यांचा विरोध होता. त्यांनी मत दिले की मोल्सवर्थने संस्कृत, पर्शियन, फारशी, अरबी वगैरे शब्दांचा भरणा करून शब्दसंख्या वाढवली आहे. मराठीत एवढे शब्दच नाहीत. जॉर्ज पोप यांनीही केनेडींचीच री ओढली. पण रॉबर्ट मनी यांनी मोल्सवर्थचं कौतुक केलं. भारतात आजपर्यंत झालेल्या छपाईत ही छपाई उजवी असल्याचे सांगून त्यांनी लिहीलं की “अशा मोठ्या शब्दकोशाची विद्यार्थ्यांचा विचार करता गरजच होती. शब्दकोश समृद्ध आणि अचूक आहे. मऱ्हाठा (मराठी) भाषेचे विशाल ज्ञान त्यात आहे. हा ग्रंथ गौरवास पात्र आहे.”

    त्रिसदस्य समितीची उलट सुलट मते पाहून इंग्रज सरकार बुचकळ्यात पडले. त्यांनी आता १८ सदस्यांची एक समिती मोल्सवर्थ डिक्शनरीचे मूल्यमापन करण्यासाठी नेमली. त्या समितीने मात्र एकमुखाने मोल्सवर्थच्या कामाची वाखाणणी केली. ही डिक्शनरी नसती तर किती तरी मराठी शब्द युरोपियनाना कधीच समजले नसते असा अभिप्राय बहुतेक सदस्यांनी दिला.

    पाठोपाठ सप्टेंबर १८३१ मध्ये इंग्रज सरकारनी मोल्सवर्थची प्रशंसा करणारे पत्र त्याला पाठवले. मोल्सवर्थने आता इंग्रजी – मराठी डिक्शनरीही तयार करावी असं इंग्रज सरकारने सुचवलं आणि त्या खर्चास मंजुरीही दिली.

    मोल्सवर्थने कँडी यांच्या मदतीने इंग्रजी – मराठी डिक्शनरीचे काम सुरूही केले. पण १८३२ च्या सुमारास त्याला प्रकृतीचा त्रास होऊ लागला. जिद्दीने मराठी – इंग्रजी शब्दकोशाचे काम करताना त्याचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले होते. आयुष्यातली इतकी सारी वर्ष मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्यांत गेली होती. तो आता ३७ वर्षांचा झाला होता. लग्न करायचं राहूनच गेलं होतं. थंड हवेच्या ठिकाणी गेलं तर तब्येत सुधारेल म्हणून तो उटीजवळच्या भागात दक्षिण भारतात काही दिवस जाऊन राहिला. पण तब्येत त्याला साथच देत नव्हती.

    नाईलाजाने तो १८३६ मध्ये इंग्लंडला परत गेला.
    १८३६ ते १८५१ ही १५ वर्षे मोल्सवर्थ मराठी आणि महाराष्ट्रापासून दूर साता समुद्रापार इंग्लंडमध्ये राहिला. दरम्यान शब्दकोशाची पहिली आवृत्ती संपत आली होती. दुसरी सुधारित आवृत्ती तयार करायची होती. इंग्रज सरकारने १५ वर्षांनंतर मोल्सवर्थला विनंती केली की दुसरी आवृत्ती तयार करायला भारतात या, मराठीसाठी तुमची गरज आहे. त्या विनंतीला मान देऊन मोल्सवर्थ १८५१ साली पुन्हा भारतात आला. वय ५६ वर्षांचे होते.

    पण तब्येत सुधारली होती. त्याला सर्वांशी उत्साहाने उत्कृष्ट मराठीत बोलताना पाहून लोक तोंडात बोट घालत होते. १८५१ ते १८५७ ही सात वर्षे मोल्सवर्थने मराठी – इंग्रजी शब्दकोशासाठी पुन्हा वाहून घेतले. हे काम त्याने पुणे आणि महाबळेश्वर येथे राहून केले. तयार झालेल्या नव्या सुधारित शब्दकोशात आता ६०,००० मराठी शब्द होते. १८५७ साली हा ९५२ पानांचा सुधारित मोल्सवर्थकृत मराठी इंग्रजी शब्दकोश प्रकाशित झाला.

    आज आपण हीच आवृत्ती पहात असतो. अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीने ही डिक्शनरी इंटरनेटवर (सर्चसह) उपलब्ध केली आहे हे आज बहुतेकांना माहित आहे.

    मोल्सवर्थ १८६० मध्ये इंग्लंडमध्ये परत गेला. शब्दकोशाच्या कामात मोल्सवर्थला मदत करणारी कितीतरी शास्त्री मंडळी होती. त्यात अलिबाग नागाव कडली बरीच होती. ते सारे मोल्सवर्थला मोलेसर शास्त्री म्हणत. काही जणांनी तर मोरेश्वर शास्त्री असेच बारसे करून टाकले होते. मोल्सवर्थ १३ जुलै १८७२ रोजी कलीफ्टन येथे वारला. असं म्हणतात की तो गेल्याचे कळल्यावर आपल्याकडल्या अनेक शास्त्र्यांनी मोलेसर शास्त्र्याचा श्राध्दपक्षही केला होता.

    जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काहीही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करून घेतात काय, सगळेच अघटित आहे. अगदी मोल्सवर्थइतकं समर्पण आज मिळण्याची अपेक्षा नाही, पण निदान त्याच्याकडून प्रेरणा घेण्याइतपत तरी क्षमता आजच्या मराठीजनांमध्ये असायला हवी. असावी.

    मोल्सवर्थच्या कार्याचा गौरव करताना विश्वकोशकर्ते पं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहीले, “‘मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वत: मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र, मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही.’

    वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्र मोल्सवर्थचे ऋण विसरला आहे.

    हा लेख सोशल मिडियातून वाचायला मिळाला. फार आवडला म्हणून शेअर केला..

      July 11, 2017


  • “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार

    जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला. निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .

    सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल. बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा र्वष. मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण मा.जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.
    राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्हीठ. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्द र्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.

    'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत. 'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून मा.जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते. जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 6, 2017