मौसमी चॅटर्जी यांचे खरे नाव इंदिरा. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९४८ रोजी झाला. १९६७ मध्ये बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या बालिका वधू या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर १९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'अनुराग' या सिनेमाद्वारे मौसमी यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. 'कच्चे धागे', 'जहरीला इंसान', 'स्वर्ग नरक', 'फूल खिले हैं गुलशन गुलशन', 'मांग भरो सजना', 'दासी', 'अंगूर', 'घर एक मंदिर', 'जल्लाद' हे त्यांचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत. मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले. मा.मौसमी चॅटर्जी या प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांच्या सुनबाई. मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी म्हटले जाते की, रडण्याचे दृश्य त्या अगदी सहज करायच्या. यासाठी त्यांना ग्लिसरीनची आवश्यकता भासत नव्हती. याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणतात, ''होय हे खरं आहे. हे देवाने दिलेले एक वरदान आहे. जेव्हाही मी रडण्याचे दृश्य करायची, तेव्हा ती घटना आपल्यासोबत प्रत्यक्षात घडतेय असं मला वाटायचं, त्यामुळे आपोआप डोळ्यात अश्रू तरळायचे.'' मौसमी चॅटर्जी यांची मुलगी मेघा चॅटर्जीही रुपेरी पडद्यावर आली आहे. 'रुसलान' या चित्रपटाद्वारे ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 26, 2017
अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते.
December 21, 2021
असे नेहमी म्हटले जाते, मोठ्या वृक्षासमोर लहान झाड वाढत नाही, मोठ्या झाडाची मुळे, ती वाढ रोखून ठेवतात. अर्थात याला काही अपवाद नक्कीच सापडतात आणि जेंव्हा असे अपवाद समोर येतात, तेंव्हा त्यांची झळाळी अलौकिक अशीच असते. राहुल देव बर्मन – यांच्या बाबतीत वरील विवेचन अत्यंत चपखल बसते, किंबहुना असे म्हणता येईल, राहुल देव बर्मन, आपल्या पित्याच्या (सचिन देव बर्मन) दोन पावले पुढेच गेला आणि हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झाला.
August 20, 2018
करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष होत. वाई येथे त्यांचे स्मारकमंदिर उभारले असून तेथे धर्मकोशाचे संपादनकार्य चालते. १९७५ पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. मीमांसाकोश व धर्मकोश ह्या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली.
March 1, 2022
सागर आर्टस चे सर्वेसर्वा व संस्थापक डॉ. रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, समाजातील लोक त्यांना नगरश्रेष्ठ म्हणून संबोधत. रामानंद यांचे मूळ नाव चंद्रमौली होते, ते त्यांचे मामा सागर यांना दत्तक गेले. दत्तक विधानानंतर त्यांचे नाव रामानंद ठेवले गेले.
मामाच्या घरी गरिबी असल्यामुळे लहान वयात ट्रक क्लिनर, ऑफिस कार्यालयात शिपायाचे काम अशी विविध कामे त्यांनी केली. मुळात साहित्याची आवड असल्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी ‘प्रितम प्रतीक्षा’ हे काव्य काश्मीर येथील प्रताप कॉलेजच्या मासिकासाठी लिहिले. पंजाब युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मुन्शी फझल’ असा पर्शियन किताब व सुवर्णपदक बहाल केले. १९३३ पासून साहित्य-काव्य-लेखन कार्यात ते मग्न झाले. वृत्तपत्रांतून स्तंभ लेखनाचे काम मिळाले. त्यांच्या लेखणीतील एक निराळी जादू लोकांना प्रभावित करू लागली.
पंजाबमधील ‘मिलाप’ या वृत्तदैनिक पत्रिकेमध्ये पत्रकार म्हणून नियुक्ती झाली. ३२ कथा, ३ प्रदीर्घ कथा, २ नाटके, कादंबरी, दूरदर्शन मालिकांसाठी लिखाण केले. १९४२ मध्ये त्यांना क्षयरोगाने पछाडले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले. स्वत:च्या अनुभवावरून ‘एका क्षयरोग्याची डायरी’ हे लिखाण केले. आयुष्याला वेगळं वळण मिळावं म्हणून कुटुंबासह ते मुंबईला आले. बरेच दिवस मुंबईत त्यांचा जम बसत नव्हता. त्या हालाखीच्या दिवसांत त्यांनी ‘और इन्सान मर गया’ हे उर्दू, हिंदी भाषेत अप्रतिम वास्तव चित्रण सादर केले.
या पुस्तकाला अमाप लोकप्रियता लाभली. १९४२ मध्ये प्रकाशित झालेला दिलीपकुमारचा प्रथम चित्रपट ‘ज्वारभाटा’ याचे कथा लेखन केले. तेव्हापासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत लेखननिर्मितीला सुरुवात केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या तळपत्या ताऱ्यासारखे ते चमकत राहिले. त्या आधी लाहोर येथे तयार केलेल्या ‘रायडर ऑफ द रेल रोड’ या मूकचित्रपट निर्मितीच्या वेळी क्लॅपर बायचे कामही त्यांनी केले. कुठलेही काम करण्यात कमीपणा मानायचा नाही असा त्यांचा स्वभाव होता. १९४९ मध्ये आर के निर्मित ‘बरसात’ चित्रपटाचे कथानक संवादलेखन केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्या आधी पृथ्वी थिएटरच्या नाटकासाठी त्यांनी लेखन केले होते.
१९५० मध्ये सागर आर्टस्’ या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. १९५१ मध्ये ‘मेहमान’, ‘बाझूबंद’, १९५० मध्ये ‘बडी बहू’, १९५३ मध्ये ‘संगदिल’, १९५५ मध्ये ‘इन्सानियत’, १९५८ मध्ये ‘पैगाम’, ‘राजकुमार’, ‘कोहिनूर’ या चित्रपटासाठी लेखन केले. तसेच १२ दूरदर्शन मालिका चित्रित केल्या. १९६० ते १९६४ या कालावधीत ‘घुंघट’, ‘जिन्दगी’ या चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शक, प्रोडय़ुसर म्हणून काम केले. मद्रास येथील जेमिनी या चित्रपटसंस्थेला आर्थिक सहाय्य केले होते. १९८६ सालापर्यंतच २५ चित्रपटांची निर्मिती केली. २९ चित्रपटांसाठी कथानक लेखन केले- त्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले.
‘आरझू’, ‘ललकार’, ‘चरस’, ‘बगावत’ या चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवाचे यश प्राप्त केले. २५ चित्रपटांना सिल्व्हर ज्युबिलीचे यश लाभले. सागर आर्टस्च्या जवळपास २५ यशस्वी चित्रपटांचे सरासरी एकत्रित यश एकटय़ा ‘रामायण’ व ‘श्रीकृष्ण’ मालिकेला मिळाले. दूरदर्शनच्या माध्यमातून डॉक्टर रामानंद सागर यांनी निदर्शनास आणून या माध्यमातून ते उत्कृष्ट वापर करून जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकतात व ज्ञान, मनोरंजन पुरवू शकतात हे दाखवून दिले. चित्रपटांमधून व्यावसायिक यश मिळविल्यानंतर १९८७ मध्ये रामानंद सागर छोटय़ा पडद्याकडे वळले व त्यांना धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा प्राप्त झाली.
१९८५ ते २००२ या कालावधीत सुमारे २००० तासांचे चित्रीकरण त्यांनी दूरदर्शन मालिकांसाठी केले. ‘रामायण’ या मालिकेचे डॉ. रामानंद सागर यांनी भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचे सृजनात्मक पद्धतीने सादरीकरण करून सर्वसामान्य जनमानसात मानाचे स्थान मिळविले. रामायणाची संकल्पना कल्पनेने सादर करून, लेखन, दिग्दर्शन, निर्माता या नात्याने तिन्ही आघाडय़ा यशस्वीरीत्या सांभाळून धार्मिक मालिकेचे युगप्रवर्तक अशी संज्ञा त्यांना प्राप्त झाली. तद्नंतर ‘श्रीकृष्ण’ ही महामालिका दूरदर्शनसाठी केली. ‘रामायण’, ‘अलिफ लैला’, ‘जय गंगा मय्या’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत.
फ्रान्स, जपान, लंडन बी. बी. सी.वर त्यांच्या कथांचे वाचनही झाले. भारत सरकारने २००१ मध्ये त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले. त्याआधी १९९७ मध्ये डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) जम्मू युनिव्हर्सिटी, ‘साहित्य वाचस्पती’ हिंदी साहित्य संमेलन प्रयाग-अलाहाबाद यांनी पदवी प्रदान करून गौरविले.
रामानंद सागर यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.शरद मेहेत्रे.
November 2, 2019
विष्णुदास भावे यांचे संपूर्ण नाव विष्णु अमृत भावे. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८१९ रोजी झाला. सांगली संस्थानाचे श्रीमंत चितांमणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन ह्यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णूदासांना होता.
१८४२ मध्ये कर्नाटकातून 'भागवत' नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपविले. त्यांची आज्ञा प्रमाण मानून १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर' नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्यपरंपरेत आवश्यक तेथे बदल केले.
भाव्यांनी स्वत:च नवीन पदाची रचना केली. `सीता स्वयंवर आणि अहिल्योध्दार` आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानुसार विष्णुदासांनी १८४३ मध्येसीतास्वयंवर ह्या स्वतःच रचिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले.
सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नचहर्त्या गजाननाचे स्त वन, सरस्व्तीस्त्वन, गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येवून आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहीलेली नसत.
नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला 'कचेरी' असे नाव दिलेले होते. भावे ह्यांनी पुढेमहाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ' तागडथोम नाटके ' असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या 'अलल् डुर्र' अशा डरकाळीमुळे ' अलल् डुर्र ' नाटके असे त्यांना संबोधिले जात असे.
५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदासांनी `सीता स्वयंवर' या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला. पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळ करीत असत. त्यांनी बनविलेल्या खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटार्याचत पडून राहिल्या होत्या व भावे यांच्या कठपुतळी खेळाच्या तीनचार संहिता उपलब्ध आहेत.
विष्णुदास भावे यांनी तयार केलेल्या आणि आता जीर्ण झालेल्या कळसूत्री बाहुलीचे रुप प्रख्यात रंगभूषाकार प्रभाकर भावे यांनी बदलले असून ती बाहुली सांगलीच्या विष्णुदास भावे रंगमंदिरात कायमस्वरुपी जतन करण्यात आली आहे. द्रौपदी स्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे असून या कठपुतळ्या लाकडी असल्यातरी अतिशय हलक्या होत्या. रेखीव आकार, प्रमाणबध्दता असून त्या चाकावर बसविलेल्या होत्या. त्या लोंखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोही प्रकारे खेळवता येत. भावे ह्यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांचील पद्यरचनेचे, प्राचीन मराठी आख्यानकरचनेशी निकटचे नाते होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख ' नाट्याख्याने ' असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत.
भावे ह्यांची पन्नासांहून अधिक नाट्याख्याने नाट्य कवितासंग्रह १८८५ साली प्रसिद्ध झालेली आहेत. विष्णुदासांच्या ह्या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध रागरागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता. विष्णुदासांच्या नंतरच्या ५०-६० वर्षांत मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. इतकेच नव्हे, तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकांतून केल्याचे दिसते. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटकमंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली.
विष्णूदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली हीच मराठी रंगभूमीची सुरवात होती. १८४३ ते १८५१ या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाल्यावर (१८५१) विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले.
नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इ. सर्व काही विष्णुदास स्वतःच असत. १८४३ साली मुंबईच्या दौर्याापासून या सांगलीकर मंडळीनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णुदासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरु केली. त्याचा परिणाम विष्णुदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करुन १८५१ ते १८६२ सालापर्यत एकूण सात दौरे केले. १४ फेब्रुवारी १८५३ रोजी प्रथमच वृत्तपत्रातून जाहिराती आल्या.
मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. प्रथमच गोपीचंद या हिंदी नाटकाचा प्रयोग १९५४ मध्ये झाला. त्यामुळे मराठी बरोबरच हिंदी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदासांचे नाव झाले. या विष्णुदास भावे यांनी एकूण ५२ नाटके लिहिली. यांची सर्व नाटके पौराणिक होती. हा काळ धर्मप्रबाल्याचा असल्याने ते स्वाभाविक होते. नाटक मंडळीत पुढे १८६२ सुमारास विष्णुदासांनी नाट्य संन्यास घेतला. पण त्यापूर्वी दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही. सांगलीकर संगीत हिंदी नाटकमंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळींनी विष्णूदास भावे यांच्या पध्दतीची नाटकांची परंपरा १९१० सालापर्यत चालू ठेवली.
विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती विष्णुदास भावे पुरस्कार दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाच्या दिवशी देते. १९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला होता. या वर्षीचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्यात आला. विष्णुदास भावे यांचे ९ ऑगस्ट १९०१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / रणजीत कुलकर्णी
August 9, 2021
हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पी.एच.डी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. यात सिनेमाच्या माध्यमातून विकास हा विषय त्यांनी निवड होता. अमेरिकेतील नामवंत गायक पॉल रॉबेसन यांच्या ‘ओल्ड मॅन रिव्हर’चे त्यांनी हिंदीत ‘गंगा बेहती हो’ असे रुपांतरण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखालील ‘एरा बतार सूर’ हा चित्रपट १९५६ साली प्रदर्शित झाला व तेव्हापासून त्यांची कारकीर्द यशोशिखराच्या दिशेने सुरू झाली. ईशान्य भारतातील एक नामांकित गायक, दिग्दर्शक म्हणून त्यांना आगळे स्थान होते.
अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनीच ‘मेरा धरम, मेरी मॉं’ हा पहिला रंगीत चित्रपट दिग्दर्शित केला. ‘एक पल’ या हिंदी चित्रपटात हजारिकांना संधी मिळाली व त्या संधीचे सोने करीत असंख्य पुरस्कार त्यांनी पटकावले. ‘लोहित किनारे’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधूनही ते रसिकांपर्यंत पोहोचले होते. कल्पना लाजमी यांनी सदर मालिका दिग्दर्शित केली होती. ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटाची गाणी व संगीत त्यांनी स्वत: लिहिले होते. महात्मा गांधीजींचे प्रख्यात ‘वैष्णव जन’ हे भजनही मा.भूपेन हजारिका यांनी म्हटले आहे. कवी, पत्रकार, गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट निर्माते आणि लेखक आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. मा.हजारिका यांनी लोकसंगीताचा वापर करून त्यावरील रचनांनी देशात आपला चाहता वर्ग निर्माण केला. डॉ. हजारिका केवळ संगीत व साहित्यातील तज्ज्ञ नव्हते तर ते मोठे नट व दिग्दर्शक होते. ब्रम्हपुत्रेचा कवी अशी त्यांना उपमा दिलेली होती. ‘दिल हुम हुम करे’ आणि ‘ओ गंगा बेहती हो’ या त्यांच्या गाण्यांनी कोट्यवधी भारतीयांना मोहीत केले.
‘जाजोबार’ म्हणजे (आश्च‘र्यचकित करणार) असे स्वत: संबोधत असत. शब्दाचे सौंदर्य ते आपल्या गाण्यातून मांडत होते. भूपेन हजारिका हे .एस. डी. बर्मन यांच्यानंतर आसामी लोकसंगीताचा इतका वापर करणारे संगीतकार होते. हजारिका यांची ओळख संगीतकार व गायक म्हणून असली, तरी ते उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक व निर्माते होते आणि त्यांच्या तीन चित्रपटांना राष्ट्रपतींचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. लहानपणापासून मी आदिवासींचे संगीत ऐकत होतो. त्यातील तालाने मला विकसित केले. मात्र संगीताची शिकवण मी आईकडून घेतली. ती माझ्यासाठी गाणी म्हणत असे. तिच्या रचना मी ‘रुदाली’ चित्रपटात वापरल्या. वयाच्या १२ व्या वर्षी आसामी चित्रपट ‘इंद्रमालती’ मध्ये बिश्वर नियोज नोजोवान’ हे गीत गायले होते, असे हजारिका यांनी एका आपल्या मुलाखतीत सांगितले होते.
१९९२ साली भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भूपेन हजारिका यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रुदाली, गजगामिनी, दमन, एक पल, साज, दरमियां, पपिहा ही काही भूपेन हजारिका यांनी संगीत दिलेल्या चित्रपटाची नावे.
भूपेन हजारिका यांचे ५ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भूपेन हजारिका यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=MioGuA3sRig
https://www.youtube.com/watch?v=jkNy7uPmxUA&list=PLEAB90B2AFFCC6499
September 8, 2017
पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल यांचा जन्म १५ जून १९५० रोजी सादुलपूर, राजस्थान येथे झाला.
लक्ष्मी मित्तल हे ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत भारतीय समजले जातात. लक्ष्मी मित्तल यांचे शालेय शिक्षण कोलकाताच्या श्री दौलतराम नोपानी स्कूल मध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये झाले. तेथे त्यांनी बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या 'ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स' या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत. त्या काळी लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी ‘मित्तल इस्पात’ असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला. इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले. मित्तल बंधूंमध्ये १९९४ साली संपत्तीची वाटणी झाल्यानंतर दोन वेगळे उद्योग समूह अस्तित्वात आले होते. त्यानंतर लक्ष्मी मित्तल यांनी २००६ ‘आर्सेलर मित्तल’ची स्थापना केली. सध्या लक्ष्मी मित्तल ‘आर्सेलर मित्तल’चे सीईओ व चेयरमेन काम बघत आहेत. २००७ मध्ये भारत सरकारने लक्ष्मी मित्तल यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच २००८ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना फोर्ब्ज मासिकाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. २०१३ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना ‘चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे इंग्लिश फुटबॉल क्लब 'क्वींस पार्क रेंजर्स'ची ३३ % मालकी आहे.
अमेरिकेतील ‘केल्लोग्स स्कूल ऑफ मैनेजमेंट’ च्या सल्लागार बोर्डवर व 'क्लीवलैंड क्लिनिक' च्या 'बोर्ड ऑफ ट्रस्टीज' चे सदस्य लक्ष्मी मित्तल राहिले आहेत.२००३ मध्ये लक्ष्मी मित्तल व त्यांच्या ऊषा मित्तल फाउंडेशनने राजस्थान सरकार बरोबर जयपुर मध्ये 'एल.एन.एम. इंस्टीट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी' ची स्थापना केली आहे.
लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नीचे नाव उषा मित्तल आहे. उषा मित्तल या फारच हुशार असल्याचे बोलले जाते. आपल्या पतीच्या व्यवसायात त्यांना त्या नेहमी मदत करत असतात. उषा मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगले काम उभे केले आहे. त्यांचे चिरंजीव हे त्यांच्या बरोबरच आदित्य मित्तल या व्यवसायात आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
June 15, 2022
कुंदनलाल सैगल ही आठ अक्षरे म्हणजे सप्तकातील पहिला ‘सा’ आणि वरचा ‘सा’ मिळून आठ स्वर, संगीतप्रेमींसाठी ही मंत्राक्षरे आहेत. महान गायक नट या उपाधीपेक्षाही वरती स्थान असलेला हा स्वर. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. अवघ्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात कुंदनलाल सैगल यांनी संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला. त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो.
‘जब दिल ही टूट गया’ हे ‘शाहजहाँ’ चित्रपटातील गीत ऐकताना ‘हम जी के क्या करेंगे’मधील ‘क्या’ हा स्वर गाताना उदास, हतबल आणि सकारण असा उच्चार हे सारेच भिडल्यावाचून राहत नाही. दोन्ही अंतऱ्यांमध्ये ‘इक भेदी लूट गया’ किंवा ‘हर साथी छूट गया’ ही विफलता समजण्यासाठी मूळ गाणे ऐकावेच लागते. ‘तदबीर’ चित्रपटातील संगीतकार लाल मोहम्मद यांनी स्वरबद्ध केलेले ‘मैं पंछी आजाद मेरा कहीं दूर ठिकाना रे, इस दुनिया के बाग में मेरा आना-जाना रे’ हे गीत अधिक वेगळे काही सांगत नाही. या गीताचा अंतराही पुरेसा संदेश देतो. ‘जीवन की परभात में आऊँ, सांज भये तो मैं उड जाऊँ, बंधन में जो मुझको बांधे वो दिवाना रे..’ हेच सैगल यांच्या बाबतीत खरे आहे. ‘शाहजहाँ’ याच चित्रपटातील ‘गम दिए मुस्तकिल..’ या गीतातील दोन वेगवेगळ्या पद्धतीत गायलेले.. ‘हाय हाय ये जालिम जमाना..’ ही या गीतातील खास बात आहे. ‘दिया जलाओ जगमग.. जगमग..’ हे खेमचंद प्रकाश यांनी स्वरबद्ध केलेले ‘तानसेन’ चित्रपटातील गीत जेव्हा सैगल स्वरात आपल्यासमोर येते, तेव्हा स्वरांचे झुंबर क्षणार्धात लख्ख प्रकाशमान झाल्याचे जाणवते. आणि हा प्रकाश उमलतो तो सुरुवातीच्या ‘दिन सूना सूरज बिना..’ पासूनच. ‘सो जा राजकुमारी..’ या अंगाई गीताने के. एल. सैगल यांचा गाण्यातील भाव ऐकताना आपण मोहरून जातो. ‘माय सिस्टर’ चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ हे लोकप्रिय गीत, ‘दिया जिसने दिल’ या गीतातील ‘दिल’ या शब्दावरील स्वरमेळ, ‘रुमझुम रुमझुम चाल तिहारी’ या गीतातील ‘हंसध्वनी’ राग, ‘देवदास’ चित्रपटातील ‘बालम आये बसो मोरे मन में’ ही तिमिर बरन यांची आकर्षक स्वररचना हे सारे सैगल माहौल निर्माण करणारे आहे. लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
सैगल हे त्या काळचे सर्वात लोकप्रिय गायक. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गजलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. के.एल. सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 18, 2017
लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्या नावाजलेल्या मराठी लेखिका डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला.
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले.
महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ.सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता.
अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
गालात हासून, ओठात बोलून...
हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
रांगत रांगत, हअम डौलात...
गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
झेप झेपावून, तोल सावरून...
नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
माझ्या जीवाचं, सुख दाटलं...
January 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti