(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • संतुलनाची गरज

    निसर्ग शक्यतो सृष्टीमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मात्र निसर्गाकडून हे संतुलन बिघडले, की त्याचा फटका मनुष्यप्राण्यालाच बसतो. अतिशय कडक उन्हाळ्यामुळे 'नको तो उन्हाळा'असे म्हणण्याची पाळी येते. तर प्रचंड पाऊस होऊन महापूर आला, की पावसाळाही नकोसा होतो. कडाक्याच्या थंडीमुळे तर अनेक वेळा अनेकांवर जीव गमावण्याची पाळी येते.

    निसर्गाचे हे संतुलन काही वेळा बिघडत असले तरी सहसा समतोल राखण्याचाच त्वाचा प्रयत्न असतो.

    निसर्गाप्रमाणेच मानवी जीवनातही समतोल राखण्याची नितांत गरज आहे. कारण मानवी जीवन ही तारेवरची कसरत आहे याची प्रचिती अनेकदा येते. अनेक वेळा थोडासा तरी 'तोल' गेला, की कधीही कोसळण्याची शक्यता असते.

    डोंबारी लोक त्यांच्या खेळामध्ये तारेवरील संतुलन सांभाळण्यासाठी काठीचा वापर करतात. तशीच सद्सद्विवेकबुध्दीची व सारासार विचाराची काठी घेऊन त्याच्या मदतीने ही तारेवरची कसरत केली तर जीवनात कुठे खाली कोसळता येणार नाही.

    'तारेवरील कसरत' करण्यात तरबेज असणाऱ्या एका डोंबाऱ्याच्या पोराला एकदा गर्व झाला, की मी काठीशिवाय तारेवरची कसरत करून दाखवितो. या खेळात अनुभवी असलेला त्याचा बाप त्याला म्हणाला, तू या खेळात जरूर तरबेज असशील, मात्र काठीशिवाय ही कसरत खेळण्याचे धाडस करू नकोस, मात्र पोराने बापाचे ऐकले नाही. तो काठीशिवाय तारेवर चढून कसरत करायला गेला. मात्र दोन-तीन पावले टाकली नाही तोच तो खाली कोसळला. त्याला बापाच्या म्हणण्याचे प्रत्यंतर आले होते.

  • खरे सुख

    संत तुलसीदासाच्या काळातच रैदास नावाचे एक संतकवी होऊन गेले. त्यांचे खरे नाव रविदास. मात्र रैदास या नावानेच ते ओळखले जातात.

    संत तुलसीदासांनी 'तुलसीरामायण' लिहिले तर संत रैदासाने अनेक भक्तिगीते लिहिली. ते वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर एका झोपडीत राहत असत. आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ते वहाणा शिवत असत. त्याच्यातून जेवढे उत्पन्न मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण व्हायची.

    त्यांची पत्नीही अतिशय समंजस होती. रैदास जेवढे काही मिळवून आणायचे त्यातच ती सुखासमाधानाने संसार चालवित असे. वहाणा शिवताशिवताच रैदास भक्तिगीते करीत असे त्यामुळे हातात काम व ओठात ईश्वराचे नाम असाच त्यांचा दिनक्रम चालत असे.

    एकदा एक साधू वहाणा दुरुस्त करण्याच्या हेतूने संत रैदासाकडे आला. त्याच्या वहाणा दुरुस्त केल्यावर त्याने त्याच्या झोळीतून एक वेगळ्या रंगाचा दगड काढला आणि तो रैदासांना म्हणाला, '' हा परीस आहे. त्याला लोखंड लावल्यास त्याचे सोने होऊ शकते. त्यामुळे हा परीस तुझ्याकडे ठेव म्हणजे तुझे जन्माचे दारिद्र्य मिटेल.''

    साधू एवढेच बोलून थांबला नाही. त्याने तेथलाच एक लोखंडाचा तुकडा घेतला. त्याला परीस लावताच त्याचे सोन्यात रूपांतर झाले. हा सोन्याचा तुकडा साधूने रैदासाला देऊ केला. मात्र रैदासाने तो सोन्याचा तुकडा नाकारला.

    रैदास साधूला म्हणाला, 'मी दिवसभर कष्ट करतो.. त्यातून पोटापाण्यापुरते जे काही मिळते, त्यात मी व माझी पत्नी मुखी व आनंदी. आहे. सोन्याचा हा तुकडा घेऊन मला माझा नेहमीचा आनंद हरवायचा नाही. कारण माझी सुखासमाधानाची व्याख्याच वेगळी आहे. तुला हा परिसाचा तुकडा कोणाला द्यायचाच असेल तर तो जे रात्रंदिवस पैशाच्या मागे लागले आहेत त्यांना दे.'

    असे म्हणून रैदास पुन्हा आपल्या वहाणा शिवण्याच्या कामात मग्न झाले व तो साधू संत रैदासापुढे नतमस्तक होऊन तेथून निघून गेला.

  • उक्ती आणि कृतीतील अंतर

    कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक - उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे सेवा केली. आजारातून बऱ्या झाल्यावर सावित्रीबाई जेव्हा पुण्यास परत जायला निघाल्या, त्या वेळी भाऊ त्यांना म्हणाला, ' 'ताई, तुला राग येणार नसेल तर सांगतो. तू हे समाजकार्य आता ताबडतोब सोडून दे. एकतर तू खालच्या जातीमधील लोकांच्या कल्याणाचे काम हाती घेऊन आमच्या कुळाला बट्टा लावला आहेस; शिवाय समाजाने तुम्हाला वाळीत टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आम्हालाही भोगावे लागतात. तरीही तुमचा सामाजिक कार्य चालू ठेवण्याचा अट्टहास आहेच. '' भावाचे हे कठोर बोलणे ऐकून सावित्रीबाई त्याला शांतपणे म्हणाल्या, की '' या कार्यामुळे आमची होणारी निंदा-नालस्ती तसेच अवहेलना तुला पाहवत नसेल. आमच्यावरील प्रेमापोटीच हे तू सारे बोलला आहेस हे मला माहीत आहे. मात्र इतरांप्रमाणेच तुझी बुद्धीही कोती ठेवू नकोस. आम्ही जे काम करीत आहोत ते चांगलेच काम करीत आहोत उच्चवर्णीय आपल्यावर श्रेष्ठत्व गाजवितात ते केवळ विद्येमुळे मग ही विद्या शिकली तर बिघडले कोठे? तुम्ही प्रसंगी जनावरांनाही जवळ करता. मात्र खालच्या जातीतील माणसांना दूर लोटता. म्हणजे तुम्ही भूतदया दाखविता. मात्र मानवतेला कलंक फासता. शिवाय वारकरी म्हणून तुम्ही नुसत्याच पंढरपूरच्या वाऱ्या करता. रंजल्या-गांजल्यांना जवळ करा. असे म्हणणाऱ्या संतांचे तुम्ही गोडवे गाता. मात्र त्यांचे शब्द वा विचार कृतीमध्ये आणत नाहीत. '' सावित्रीबाईंचे हे बोल ऐकून भाऊ ओशाळला व त्यांनी आपल्या बहिणीची माफी मागितली. मात्र सावित्रीबाईंनी त्याला केव्हाच माफ केले होते.

  • मातृभक्त सैनिक

    एक आरमारप्रमुख होता. आपल्या आरमारातील सैनिकांनी साहसी असावे, आपली आज्ञा पाळताना कोणतेही संकटं आले तरी त्यांनी न डगमगता संकटावर मात करावी, असा त्याचा नेहमीच आग्रह असे. त्यामुळे कधी कधी तो आपल्या सैनिकांची परीक्षाही पाही. ही परीक्षा कधीकधी फार कठोरही वाटे.

    एकदा तो जहाजावरून फिरत असताना त्याला एक सैनिक दिसला. आरमारप्रमुखाने ताबडतोब त्याला समुद्रात उडी मारायला सांगितले. मात्र त्या सैनिकाला उडी मारायला थोडासा वेळ लागला. ते पाहून संतप्त झालेल्या त्या आरमारप्रमुखाने त्या सैनिकाला त्याचा कोट काढण्यास सागितले. सैनिकाने कोट काढताच आरमारप्रमुखाने तो कोट समुद्रात भिरकावून दिला.

    तेवढ्यात अचानक समुद्रात वादळ सुरू झाले मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाच त्या सैनिकाने त्या वादळातही समुद्रात उडी घेतली व लाटांवर तरंगत असलेला तो कोट घेऊन पुन्हा जहाजावर आला.

    आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाही त्या सैनिकाने उडी मारली होती म्हणजे एका परीने त्याने आरमारप्रमुखाचा आज्ञाभंग केला होता. हा आरमारप्रमुख कठोर शिस्तीचा भोक्ता होता. हा आज्ञाभंग तो सहन करणार नाही, असे साऱ्यांनाच वाटले. त्यामुळे इतर सैनिकांना आता आरमारप्रमुख काय करतात याबाबत कमालीची उत्सुकता वाटत होती.

    आरमारप्रमुखाला मात्र उडी मारणाऱ्या त्या सैनिकाचे आश्चर्य वाटले होते म्हणून त्याने त्याला विचारले, ' 'मी नाही म्हणत असतानाही तू वादळात उडी मारण्याचे एवढे मोठे धाडस का केलेस?''

    त्यावर तो सैनिक नम्रपणे म्हणाला, '' त्या कोटात माझ्या आईचा फोटो होता व मला जेव्हा जेव्हा आईची आठवण होते, तेव्हा तेव्हा मी तो फोटो पाहत असतो. ''

    त्या सैनिकाची मातृभक्ती पाहून तो आरमारप्रमुखही चकित झाला व त्याने त्याला आज्ञाभंगाच्या मुख्यातून मुक्त केले.

  • पाणिनीची प्रतिज्ञा

    आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्योतिषशास्त्राच्या मते त्यातील काही रेषा विद्येच्या, धनाच्या तसेच आयुष्याच्या कालमर्यादेच्या असतात. अर्थात अनेकांच्या मते हे थोतांड आहे. त्यामुळे बऱ्याचजणांचा हातावरील या रेषेवर विश्वास नसतो. मात्र या संदर्भात प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांची मजेदार कथा सांगितली. पाणिनी तरुण असताना एका आचार्याकडे शिक्षण घेत होता. पाणिनीसारखेच आचार्यांचे असंख्य शिष्य त्यांच्या आश्रमात त्यांच्याकडून शिक्षण घेत होते. एकदा आचार्यानी सर्व शिष्यांना एक गृहपाठ दिला व दुसर्‍या दिवशी त्याची संपूर्ण तयारी करून द्यायला सांगितले. अनेक शिष्यांनी गृहपाठ तयार केला होता, मात्र काही शिष्यांची या ना त्या कारणामुळे गृहपाठाची तयारी झाली नव्हती. त्यामध्ये पाणिनीही होता. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य एकत्र आल्यावर आचार्यानी त्यांना गृहपाठाविषयी विचारायला सुरुवात केली. ज्यांचा गृहपाठ तयार नव्हता अशा शिष्यांना त्यांनी छडी मारायला सुरुवात केली. छडी खाल्लेले शिष्य आपापल्या जागी जाऊन बसले. पाणिनीची वेळ आली तेव्हा त्यानेही आपला हात पुढे केला. त्याचा हात पाहताच आचार्य म्हणाले, ' अरे, तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही. मग तू कसला गृहपाठ करणार. जा तुझ्या जागेवर जाऊन बैस. ' असे म्हणून आचार्यांनी पाणिनीला छडीही मारली नाही. आचार्यांचे ते म्हणणे ऐकून इतर सर्वशिष्यांना हसू आले. पाणिनीला त्याचा भयंकर अपमान वाटला. त्याने तेथेच प्रतिज्ञा केली, की मी एवढा अभ्यास करेन, की माझ्या हातावर विद्येची रेषा काढीनच. त्यानंतर त्याने संस्कृत भाषेचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून 'व्याकरणकार पाणिनी' म्हणून नावलौकिक मिळविला.

  • पुराणकाळातील अस्त्र

    महाभारतातल्या महायुद्धाच्या कथा ऐकल्या. कौरव व पांडव ह्या दोन भावंडामध्ये झाल्या होत्या. ह्या अंगावर रोमांच उभे करतात. जर सुक्ष्म निरक्षण केले तर ते शस्त्र व अस्त्र यांचा उपयोग करुन लढले गेलेले युद्ध होते.

    थोड्याच लोकाबद्दल योध्याबद्दल विरा बद्दल त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नावे सांगीतली गेली. त्यांची रणांगणातील यश वा अपयश प्राप्त म्हणून ओळखली गेली. परंतु ह्या युद्धांत अनेक अनेक विर पराक्रमी लढवये लढले. बलीदान पावले. त्यांची नांवे आपणासाठी तरी अंधारतच राहीली. फक्त श्री कृष्णला त्या प्रत्येकाबद्दल ज्ञान होते. जाणीव होती. केवळ त्या युद्धांत श्री कृष्णाची प्रत्यक्ष असण्याची भूमिका असल्यामुळे, जे तेथे त्याच्या नजरेदेखत धारातिर्थी पडले, त्यांच्याही आत्म्याना सद् गती मिळाली असावी, हे समजणे चुक ठरणार नाही.

    आगदी अधूनिक पद्धती प्रमाणे त्या युद्धांत डावपेच खेळले गेले. प्रतीस्पर्ध्यातील नैपुण्य, योग्यता, अचुकपणा, शस्त्रांचा वापर, अस्त्रांचा मारा, इत्यादींचा अभ्यासपूर्वक विचार होत होता. शस्त्र म्हणजे धनुष्य बाण, गदा, तिरकमटा, भाला, तलवारीसारखे हत्यार, इत्यादी आयुधे होती. ही साधी परंतु धारदार शस्त्रे होती. पूर्वी आश्रम आणि गुरुकडून ज्ञानसाधना होत असे. त्यांत मंत्रविद्या शिकवली जाई. मंत्रशक्ती प्रभावाने निरनीराळ्या उर्जाशक्तीना आवाहन करुन आपल्या जवळच्या शस्त्रामध्येच त्या अवतरीत केल्या जात. त्याचा त्याप्रमाणे परिणाम होत असे. उदा. बाणावर अग्नीचा मंत्र म्हणून, दिव्य अग्नीअस्त्र निर्माण केले जाई. परिणाम स्वरुप अग्नीचा वनवा वा ज्वालांचा हा हा कार होत असे. त्याच वेळी त्या अग्नीच्या वनव्याचा प्रतीकार पर्जन्यास्त्र वा पवनास्त्र ह्या संकल्पनेने केला जाई. जेवढे महान गुरुज्ञान व तपस्वीता, पावित्र्य थोर, तेवढी मंत्र साधना व तपोबल श्रेष्ठ असे. अस्त्रयुद्धाचे महत्व येथेच ठरते.

    दोन अत्यंत महत्वाची अस्त्रे महाभारत युद्धात वापरली गेली. एक ब्रह्मास्त्र व दुसरे नारायणास्त्र. दोन्हीही प्रचंड शक्तीची विध्वंसक. परंतु केवळ श्री कृष्णाच्या दिव्य भव्य ज्ञानशक्ती, चातूर्य, व दूरद्दष्टीमुळे त्या दोन्हीही अस्त्राना निकामी केले गेले. त्यांच्या प्रचंड विध्वंसक शक्तीवर रोक लावला गेला. तेही फारसे कांहीही न करता साध्य केले गेले. हा विषयाचा वृतांत उद् भोदक ठरेल. करमणूक करणारा वाटेल.

    " ब्रह्मास्त्र " हे नांव उचारताच प्रत्येकजण हादरुन जातो. घाबरतो. बेचैन होतो. जसे अधूनिक काळातील अँटम बॉंब ( Atom Bomb ). ह्याची सर्वाना कल्पना आहे. १९४६ साली अमेरीकेने त्याचा प्रथम वापर केला. तो जपानच्या हिरोशीमा व नागासाकी ह्या भागांवर.केवळ एका शस्त्राने प्रचंड भयानक व कल्पनेच्या बाहेर हानी पोहंचवीली. निसर्गात एक उत्पात माजला. घरदारे, मानवप्राणी, अनेक जीवजंतू, ह्याचा क्षणांत नाश झाला. विचार करता येणार नाही, असा हाहा कार त्या शस्त्राने केला. जमीनीचे अपरीमीत नुकसान झाले. झाडे झुडपे यांची वाढ बराच काळ खुरटली. जमिनीचा सुपीकपणा नष्ट झाला. अनेक लहान मोठे प्राणी नामशेष झाले. केवढा हा भयावह परीणाम. त्या एका अधुनिक शस्त्राचा.

    " ब्रह्मास्त्र " हे आगदी ह्याच पद्धतीप्रमाणे होते. मात्र ते अस्त्र होते व त्याची विध्वंसक क्षमता आजकालच्या कोणत्याही बॉंबपेक्षा अनेक पटीने जास्त होती. ब्रह्मास्त्राची योजना व त्यावरील ताबा एकदम वैयक्तीक होता. त्याचा आधार पवित्रता, एकाग्रता, ज्ञान, असा उच्य दर्जाच्या साधनेमध्ये होता. माणसाची योग्यता जर इतक्या वरच्या स्थरावर साध्य झाली, तरच त्याला ब्रह्मास्त्र शिकण्याचा व बाळगण्याचा हक्क अपोआप मिळे. त्यामुळे ते अस्त्र कुणीही घेईल वा वापरेल हे मुळीच नव्हते. आजकालचे Atom Bomb, Hydrogen Bomb, अटॉमिक शस्त्र हे कुणालाही ज्ञान घेऊन, चोरुन, लुबाडून, अर्थसहाय्य देऊन, सहज प्राप्त होऊ शकते. तसेच ह्याचा कुणीही उपयोग करु शकतो. आगदी माथेफीरु, बदमाश, वा आतंकवादी. ते जे असेल ते कुणालाही मिळणे अशक्य नाही. ब्रह्मास्त्राचे असे मुळीच नव्हते. त्याचमुळे योग्यताप्राप्त अशी मोजकी व्यक्तीरेखा होऊन गेल्या की ज्याना ब्रह्मास्त्राचे ज्ञान व उपयोग करण्याची क्षमता प्राप्त झाली होती. केवळ मंत्र तंत्र पाठ करुन हे शक्य नव्हते. त्यासाठीची बैठक ही महानता, दिव्यता, भव्यता अंगी असल्याशिवाय शक्यच नव्हते.

    ब्रह्मास्त्राला आणखी एक गुणधर्म होता. ब्रह्मास्त्राच्या विध्वंसक परिणामाना जर रोकणे जरुरी असेल तर, त्यावर फक्त एकच उपाय होता. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रानेच विरोध करणे. येथे अस्त्राची योजना अशी होती की टाकल्या गेलेल्या ब्रह्मास्त्रावर जर विरोधी दिशेने कुणी फक्त ब्रह्मास्त्रच फेकले तर दोन्ही अस्त्र आपसांत एक होऊन, कोणताही उत्पात न करता निकामी होऊन जात. विचार केल्यास ही अप्रतीम योजना होती. त्या काळी दिव्य उर्जा असलेली अस्त्रे होती. त्याचप्रमाणे त्याना निकामी करण्याचे ज्ञान अस्तित्वात होते. ही अत्यंत भाग्याची देण म्हणावी लागेल. समोरा समोरचा विर लढवय्या दोन्ही प्रकारचे ज्ञान बाळगुन होता. तो दिव्य अस्त्र टाकणे अथवा विरुद्ध दिशेने स्वतः वर टाकलेले अस्त्राला निकामी करणे. ज्याना हे ज्ञान अवगत नव्हते, तेच त्या अस्त्राचे बळी पडत. मात्र त्यासाठी गरज होती ती त्या अस्त्राची जाण व धारणा असलेल्या व्यक्तीची.

    कौरव आणि पांडव यांच्या युद्धांत ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला. परंतु त्याच वेळी दोन्ही पक्षातील कांही महान व्यक्तीना त्याचे ज्ञान अवगत असल्यामुळे, ब्रह्मास्त्राला निकामी करणेही शक्य झाले. कौरवाना स्वतःला ब्रह्मास्त्राचे ज्ञान मुळीच नव्हते. कारण तेथे संबंध होता पावित्र्याचा, एकाग्रतेचा. मात्र त्यांच्याबरोबर होते भिष्माचार्य, द्रोणाचार्य, ज्याना ब्रह्मास्त्र विद्या अवगत होती. अर्जून. कर्ण यानाही हे ज्ञात होते. कौरवाकडून प्रथम ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला. परंतु सतर्क असलेल्या पांडवाना श्रीकृष्णाने त्वरीत मार्गदर्शन केले. दोन्हीकडील ब्रह्मास्त्रामुळे कसलाही विध्वंस वा हानी न होता ती नामशेष केली गेली.

    दुसरे अस्त्र " नारायणास्त्र " . ह्या अस्त्राची तिवृता व विध्वंसक क्षमता ही देखील प्रचंड होती. कदाचित् ब्रह्मास्त्रापेक्षाही जास्त असेल. कौरवांच्या सुदैवाने त्या अस्त्राचे ज्ञान फक्त भिष्माचार्यानाच होते. पांडवाकडील कुणालाही नारायणास्त्राचे ज्ञान नव्हते. अर्थात श्री कृष्णाला ते संपूर्णपणे माहीत होते. आणि तो पांडवांच्या बाजूने होता. परंतु पांडवांच्या दु्र्दैवाने श्री कृष्णाची युद्धपूर्व अट त्यानाच जाचक ठरणारी होती.

    "मी युद्धांत तुम्हास साथ देईन. चार शब्द युक्तीचे सांगेन.

    परंतु हाती शस्त्र वा अस्त्र केंव्हांही घेणार नाही. "

    शेवटी झालेही तसेच. जेव्हां कौरवानी बघीतले की ब्रह्मास्त्र हे निकामी झाले, त्याक्षणी दुर्योधनाने पितामह भिष्माचार्य याना विनंती केली की त्यांनी शेवटचा उपाय म्हणून

    "श्री नारायणास्त्र " याचा वापर करावा. भिष्माचार्यानी ते मंत्रुन पांडव सेनेवर टकले.

    काय घडले असते ? कारण प्रचंड विध्वंसक व हानीकारक क्षमताप्राप्त ते अस्त्र होते. हा हा कार माजला असता. पांडवाकडे तशाप्रकारचे अस्त्र नव्हते. ह्याच ठिकाणी, ह्याच क्षणी उपयोग झाला तो श्री कृष्णाच्या युक्तीच्या चार गोष्टींचा.

    न घरी शस्त्र करी मी / सांगेन गोष्टी युक्तीच्या चार //

    "श्री नारायणास्त्र " ह्याचे संपूर्ण ज्ञान फक्त श्री कृष्णाला अवगत होते. त्याच्या विध्वंसक क्षमतेची त्याला कल्पना होती. त्याच प्रमाणे त्या अस्त्राचा एक विशेष गुणधर्म होता.

    " जो त्या अस्त्राला विरोध करेल, त्याच क्षणी त्या विरोधामधली सर्व उर्जा शक्ती आपोआप नारायणास्त्र खेचून घेईल. नारायणास्त्राची आपली उर्जा व विरोधकाची उर्जा एकत्र होऊन ते नारायणास्त्र जमा झालेल्या शक्तीनीशी विरोधकाचा नाश करेल.

    श्री कृष्णनी येणाऱ्या नारायणास्त्र याचा वेध घेतला. त्याच क्षणी त्यानी अर्जूनाला आणि इतर सर्व सेनेला सुचना केली की सर्वानी त्या नारायणास्त्राला नतमस्तक व्हावे. आपली हत्यारे टाकून द्यावी. कोणताही विरोध वा उलट हल्ला करु नये. सर्वानी त्याक्षणी ते मानले. कुणीही त्या नारायणास्त्राला कसलाही विरोध केला नाही. "विरोधकांची उर्जा शक्ती हानन " हीच जर नारायणास्त्राची संकल्पना होती. तर त्याला कोताही विरोध न करता, It was Total Surrender to Narayanastra करीत त्याला मान्यता व अभिनादन केले गेले. ज्या तेजाने नारायणास्त्र चालून आले ते सर्व पांडव सैनाच्या वरुन कसलाही आघात न करता निघून गेले. नामशेष झाले. जणू ह्या अस्त्राने श्री कृष्णालाच एक प्रकारे अभिनादन केले होते.

    अशा तऱ्हेने दोन दिव्य, भव्य प्रचंड उर्जायुक्त, विध्वंसक अस्त्रे ही नामशेष केली गेली. योग्य त्या धोरणामुळे व श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनामुळे.

    पशुपतास्त्र- हे प्रचंड ताक्तीचे अस्त्र श्री शंकराच्या संबंधीत असते. ते शिवानी प्रसन्न होऊन अर्जूनाला दिले होते. परंतु त्या अस्त्राचा कुणाही व केव्हांही उपयोग केल्याची नोंद नाही. ते अत्यंत विनाशी अस्त्र असून त्याची विध्वंसक शक्ती ब्रह्मास्त्र, नाराणास्त्र यांच्या पेक्षाही जास्त असते. संपुर्ण जग, त्यातील सर्व जीवन उद्धवस्त करण्याची श्रमता ह्या अस्त्रांमध्ये असल्याची नोंद पुराण शास्त्रांत केलेली आहे. ते जर वापरले, टाकले तर जो विनाश घडेल त्यांत टाकणाऱ्यासहीत सर्वांचा नाश करण्याची शक्ती त्याच्या अंगी असते. म्हणूनच अर्जूनाने देखील ते अस्त्र कधीच वापरले नाही. श्री कृष्णाचा हे अस्त्र वापरण्याला विरोध होता.

    आंता काळ बदलला आहे. पूर्वीचा इतिहास पुराण हे सर्व दाखविते व वर्णन करते. की भारतीयांजवळ ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, पशुपतास्त्र ही प्रचंड विनाश क्षमता असलेली अस्त्रे होती. आजच्या अधूनिक काळांत त्याच धरतीची अस्त्रे आपण बाळगीत आहोत. ज्याला ऍटम (अणू) बॉंब, नॉट्रोजन बॉंब, हैड्ऱोजन बॉंब इत्यादी संबोघीले गेले. हे आपण समजतो, अभ्यासतो. जे सारे एके काळी पूर्वीच आपणाजवळ होते. मानवाचा पूर्व इतिहास तेवढाच मनोरंजक, बोधक आणि थरार निर्माण करणारा होता. प्रत्येकानी त्याला सन्मान द्यावयास हवे. आदर करावयास हवे. आपल्या ऋषीमुनिंची शक्ती, क्षमता अभ्यासूनच आजच्या अधूनिक इतिहासांत त्याची पुनुरावृत्ती होताना दिसते. त्या ऋषीमुनीना विनंम्र प्रणाम.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • धर्मपिता आणि मानसपुत्र

    स्वातंत्र्य चळवळीसाठी महात्मा गांधी यांनी केलेल्या कार्याला ज्यांनी तनमनधनाने मदत केली त्यात जमनालाल बजाज यांचा फार मोठा वाटा आहे. जमनालाल बजाज यांच्या पायाशी सारे वैभव लोळण घेत पडलेले असतानाही ते त्याच्यापासून अलिप्तच राहिले. आयुष्यात कोणी तरी चांगला गुरु लाभावा अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. त्या वेळी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून नुकतेच भारतात परतले होते व त्यांनी सत्याग्रही चळवळीचा श्री गणेशा केला होता. जमनालाल बजाज यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर आश्रमात राहून त्यांचे कार्य अगदी जवळून पाहिले व आपल्या मनात असलेली गुरुंची प्रतिमा ती हीच असे त्यांच्या मनाने पक्के केले. परंतु गुरुपेक्षा आपण त्यांना धमपिताच मानले तर? असा विचार त्यांच्या मनात आला व त्यांनी मला तुमचा पाचवा पुत्र माना, हा विचार गांधीजींना बोलून दाखविल्यावर त्यांनीही त्यास मान्यता दिली. त्याचा खूप मोठा आनंद जमनालाल यांना झाला व आपल्या धर्मपित्याचा वारसा पुढे चालविण्याचा त्यांनी निश्चय केला. एकदा मात्र मोठी गंमत झाली. महात्माजींनी जमनालाल बजाज यांना लिहिलेल्या एका पत्रात ' भाई जमनालाल' असा सरळ उल्लेख केला. ते पत्र वाचल्यानंतर जमनालालजींना तो उल्लेख खटकला. महात्माजींची भेट झाल्यावर ते त्यांना म्हणाले, '' तुम्ही दर वेळी मला चिरंजीव असे लिहिता मग याचवेळी ' भाई जमनालाल' असा उल्लेख का केलात? माझे काही चुकले का? पुत्रधर्माला न शोभेल असं वर्तन माझ्या हातून घडले काय?'' त्यावर महात्मा गांधी त्यांना म्हणाले, '' तुझे काहीच चुकले नाही परंतु मलाच शंका आली की, तुमचा धर्मपिता व्हायला मी लायक आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला चिरंजीव म्हणण्याचा मला कितपत अधिकार आहे?'' गांधीजी हे सारे नम्रतेमुळे म्हणाले हे जमनालालजींना कळायला वेळ लागला नाही. त्यांनी त्यांना धर्मपिताच मागून पुढे प्रत्येक कार्यात त्यांना पुत्रासारखेच सहकार्य केले. त्यामुळेच जमनालालजींचे जेव्हा आकस्मिक निधन झाले तेव्हा ' असा दुसरा पुत्र मी आता कोठून आणू? असे भावोद्गार महात्माजींनी काढले.

  • नामस्मरणातील ताकद

    जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.

    तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.

    कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’

    त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’

    त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
    यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.

    मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’

    आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
    आता कबीरजी चकित झाले होते.

    सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.

    कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’

    जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.

    कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.

    जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
    गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.

    जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’

    कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.

    एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.

  • हृदय परिवर्तन

    क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी तेथे येऊन भिक्षा मागितली. त्वामुळे ती बाई त्यांच्यावरच भडकली व त्यांना उद्देशून म्हणाली, हे गोसावड्या, भिक्षा मागायला तुला लाज कशी नाही वाटत, असे म्हणत तिने आपल्या हातातील शेणाचे पोतेरे समर्थांच्या अंगावर फेकले. त्यामुळे समर्थांचे अंग खराब झाले. मात्र ते त्या बाईवर मुळीच रागावले नाहीत. उलट ते तिला म्हणाले, माई हीच भिक्षा समजून मी ती आनंदाने स्वीकारेन. असे म्हणून ते पोतेरे घेऊन नदीवर गेले आणि नदीच्या खडकावर ते पोतेरे त्यानी स्वच्छ धुवायला सुरुवात केली. जसजसे ते पोतेरे स्वच्छ होऊ लागले. तसतसे इकडे त्या बाईच्या मनाची घालमेल सुरू झाली. कारण तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला होता. म्हणून ती स्वतःच समर्थांची माफी मागण्यासाठी बाहेर पडली. समर्थांना शोधत शोधत ती नदीवर गेली. तोपर्यंत समर्थांनी ते पोतेरे -स्वच्छ धुऊन वाळत घाललेले होते व वाळल्यानंतर त्यांनी त्या कापडाच्या वाती करायला सुरुवात केली होती. समर्थांना पाहताच त्या बाईने त्यांच्या पायावर डोके ठेवले व आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. मात्र समर्थांनी तिला केव्हाच माफ केले होते. ते तिला म्हणाले तुझी 'भिक्षा' खरोखरच मोठी होती, कारण त्याच वातीने श्रीराम व मारुतीरायाची मूर्ती उजळणार आहे. समर्थांचे बोल ऐकून ती बाई धन्य झाली.

  • माना न माना !

    हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या. त्याचे संकलन व आकलन करणे बुद्धीमान समजल्या गेलेल्या माणसाला देखील आवघड जाऊ लागले. परंतु मानव हा सदा प्रयत्नशील व चौकस असून त्याचा हा सत्य शोध सुरु आहे.

    यातूनच प्रश्नांची एक मालिका निर्माण झाली. तो कोण ? मी कोण ? अर्थात कर्ता कोण व माझी भूमिका कोणती? हे महत्वाचे प्रश्न निर्माण होतात. अभ्यासक आले. चिंतन झाले. भाष्य झाले. अनेक विचारवंत निर्माण झाले. बघून जाणून अनूभवून वेगवेगळी सुत्रे निर्माण झाली. चौकटी आखल्या. ज्यांत त्यांचे तत्वज्ञान काठोकाठ भरविण्याचा प्रयत्न झाला. कित्येकजण साक्षात्कारी होते. त्यांच्या मुखातून पडलेले सर्व हेच सत्य वाटून कित्येकाना ते पटत गेले. एक महान व्यक्ती म्हणून त्यांची लोकानी पाठपूरवणी केली. त्यांना मान्यता दिली. ही विद्वत्तेची किमया अनेक जणाना प्राप्त होत गेली. तसे त्यांचे विचार ऐकण्यासाठी व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आपणासही कांही मिळेल कां ह्या कल्पनेने बराच वर्ग त्याचा पाठ पुरावा करीत गेला.

    प्रत्येक साक्षात्कारी व्यक्तीमध्ये सत्य व त्याची जागृती तीच होती. साध्य कोणते ध्येय कोणते याला सर्वानी मान्यता दिली. ते एक सत् चित् व आनंदा याचे स्रोत आहे. मात्र त्यांने ती जाणून घेण्याचा मार्ग, रचना मात्र भिन्न होत्या. येथेच एका संभ्रमी अवस्थेचा जन्म झाला. प्रत्येकाला दोन टोके दिसू लागली. जे मिळवायचे ते एक. व ते कसे मिळवायचे ते दुसरे. मात्र भिन्नतेने जो जन्म दिला तो ते साध्य करण्यासाठी जो मार्ग आहे त्याचा. भिन्नता ही असणारच. उंच शिखरावर एक तेजस्वी मनोहर ठिकाण दिसत असेल, तर तेथे जाण्याचे निश्चितच अनेक मार्ग असणारच. ह्यांत शंकाच नाही.परंतु त्याच अनेक मार्गाच्या भिन्नतेमुळेच सर्वांच्या विचारांमध्ये विखुरता निर्माण केली गेली. कुणाचा योग्य मार्ग, चांगला, सुलभ व ध्येया जवळ त्वरित नेणारा असेल ह्यावर आपापली बुद्धी प्रगल्भतेनुसार टिपणी होऊ लागली. सर्व खेळांची हीच गोम बनली. लोकांच्या संभ्रमामुळे प्रत्येकजण साध्याला तर नजरेसमोर ठेवीत होता. सारी शक्ती ही साधनेमध्येच घालू लागले. तेथेच घाण्याच्या बैलाप्रमाणे गोल गोल फिरु लागला. त्याचा प्रवास तर बराच झालेला परंतु त्याला कळले नाही की साध्य कोठे आहे.

    आपण जे करतो ते प्रत्येकाला योग्यच वाटत असते. मग ते लहान मूल का असेना. त्याला वाटते माझेच बरोबर आहे. वरिष्ठ जाणकार हे मग कसे मागे राहतील. त्याना त्याच्या प्रत्येक कृतीचे योग्य म्हणूनच समर्थन करणे मनास उचित वाटते. जर प्रेरणेचा स्रोत हा अंतर्यामी असेल तर त्याचा उगम देखील सत्य आनंद ह्या ब्रह्मा निर्मीत शक्तीमधूनच होत असतो. म्हणूनच प्रत्येकाला आपली कृती योग्य व निश्चित व्हावी वाटत असते. त्याचे हे वाटणे एका हद्दीपर्यंत बरोबर असते.

    येथे एक जाणीव व्हावी.

    गंगा जेंव्हां गंगोत्री मुखातून उत्पन्न होते, ह्या भूतलावर येण्यासाठी झेप घेते, तेंव्हां ती अत्यंत पवित्र निर्मळ व पर्यावरणरहीत असते. चांगुलपणांची सारी महान तत्वे त्यांत निगडीत झालेली असतात. परंतु जेव्हां ती आपला मार्ग सागराच्या दिशेने जाऊ लागते. तेंव्हां तीचा संबंध अनपेक्षीत मुल्यांबरोबर येतो. ज्यांत इतर नद्या, पर्वतावरचे वाहून आलेले पाणी, नाले इतकेच काय नदीकाठी वसलेले गांव वसत्यांचे नको असलेले सांडपाणी, एक नव्हे अनेक दूषित पाण्याचे साठे हे त्या प्रवाहामध्ये मिसळले जातात. गंगेच्या उगमस्थानाचे जल व महासागरामध्ये विलीन होण्यासाठी गंगासागर किनारी आलेले जल ह्यांत प्रचंड भिन्नता असणारच. कदाचित् धार्मिक पावित्र्याची संकल्पना एकच हे मान्य केले तरी वैज्ञानिक समर्थन हे मान्य करील काय? जर जल चाचणी केली गेली तरी पाण्याच्या गुणधर्मांत खूपच तफावत असेल.

    विचार आत्मिक तेजा पासून चेतावले जातात. त्यांत मुळ स्रोत म्हणून सत्याचा, तपाचा, भाग उत्पन्न झालेला असतो. त्या विचारांचा प्रवाह उगमस्थाना पासून मेंदूपर्यंत, तेथून स्वर यंत्र, जीभ इत्यादी साधनांमधून पार करीत ते बाहेर पडून इच्छीत स्थळापर्यंत पोहचतांत. त्यांत प्रचंड प्रमाणात मिश्रण होणारच. तो व्यक्त होत असतांना आजू बाजूचे, परिस्थीतीचे, संस्काराचे, दृश्य अदृष्य कल्पनांचे अनेक पैलू, अनेक अघात त्या उत्पतीत सामील होतात. त्याचे रुप हे देखील प्राथमिक सत्यापासून खूपच अंतरावर असणार. जसे गंगेच्या धार्मिक पावित्र्या बद्दलच्या कल्पना, तिचा उगम व तिचा शेवट ह्यामध्ये एकच कल्पिला गेला आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकाला आपला विचारच योग्य आहे. हा जो अट्टाहास त्याच्या मनी येतो, त्याचेपण मुळ हेच आहे. कुणीही ह्यावर चिंतन करीत नाही, की माझ्या विचार शक्तीची उत्पत्ती व शेवट यांचे रुप कोणते.

    जर खूप आत्मचिंतन केले, सभोवतालचे अवलोकन केले, तर प्रत्येकाच्या आग्रही मुळ स्वभावांत सुधारणा होऊं शकेल. अनेक व्यक्ति ह्या असले चिंतन करीत नाहीत. व त्याना पटेल तेच कार्य हाती घेतात. त्यांत झोकून देतात. उत्पन्न होताना जी चेतना असते तीचे रुप व्यक्त होताना व त्याहून भिन्न दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पोहंचतना जाणवते. हे एक सत्य. परमेश्वरी संकेतापासून मानवी गुणधर्मामध्ये त्याचे रुपांतर होत जाते. मुळ दया क्षमा शांती प्रेम आनंद अशा बहूरुपी चक्रामधून त्यावर राग लोभ अहंकार याचा प्रभाव पडतो.

    उत्पत्ती, स्थिती व लय ह्या चक्रामधील दोनच भाग - उत्पत्ती व लय हेच सत्य आहेत. स्थिती अर्थात जीवन हे सारे विचारावर, कल्पनेवर आधारलेले आहे. त्यामुळे ते सतत सुख दुःखाच्या गुंत्यात अडकलेले असते. तेच जीवन प्रवाहाचा खेळ खेळते. रोज बदलते. वेगळे होते. सभोवतालच्या परिस्थितीच्या लाटेवर आरुढ असते. आपले सारे प्रयत्न तपश्चर्या ही केवळ ह्या मार्गावरच केंद्रीत झालेली असते. कारण हा काळ प्रत्येकजण जाणतो, अनुभवतो, सत्य आहे हे समजतो.

    आपणाला स्वतःला केव्हांच उत्पत्तीचा व लयाचा अनुभव येत नाही. तो येणार देखील नाही. दुसरे जे केवळ बघतात, जाणतात आणि ते एक ज्ञान म्हणून व्यक्त केले जात असते. तेच आपण फक्त मानतो. ते अनुभवने शक्यच नाही. आपल्या जीवनाशी फक्त स्थितींचा संबंध येतो. उत्पत्ती व लय हे दोन भाग आपण घेण्याच्या पलीकडे म्हणूनच आपल्यासाठी काल्पनिक ठरतात. जे खऱ्या अर्थाने सत्य असते. त्यापासून आपण दूर राहतो. स्थिती हे तत्व असत्य,भौतिक, नाशवंत ठरविले, तेच आपण अनुभवतो.

    आपला प्रत्यक्ष संबध, जो सत्य भाग म्हणजे उत्पत्ती व लय आहे त्याचा आपण अनुभव घेऊ शकत नाही. तांत्रिक दृष्ट्या संबध असतो कारण ही तुमच्या जीवनाची सुरवात व शेवट असते. मान्य. परंतु ते म्हणजे तुम्हाला समज नसता व समज पूर्ण गेली असता. ज्याचा तुमचा जाणत्या काळाचा संबंध येतो तो स्थितीचा काळ फक्त सत्य सोडून असत्याचाच पाठपुराव्याशी येतो.

    सत्य हे ईश्वराचे प्रतिक bवा अंशात्मक ईश्वरी चेतना आहे. ती बाजूस रहाते. तुम्ही ती घेतलेली. स्वतः असलेली नाही. केवळ चालू राहण्यसाठी ( Carry on ) बाळगलेली शक्ती आयुष्याची पाऊलवाट चालतात. सारे आयुष्य असत्याच्या संपर्कांमध्ये. कसे मिळणार सत्य त्यातून ?

    तुम्ही जे अंशात्मक सत्य बाळगता त्याच्या स्फुरलेल्या लाटा ( Spiritual Waves ) जेव्हां बाहेर येण्याचा प्रयत्न होतो, त्याच क्षणी ते असत्य ह्या वातावरणाशी स्पर्श करुं लागतात. भौतिक वातावरणामध्ये त्यांचा स्पर्श होतो. कसे जाल तुम्ही त्या सत्याकडे. एक जबरदस्त कोंडी निर्माण झालेली आहे. सत्य ह्या आत्मिक केंद्र बिंदूला थोडे देखील सोडले की असत्यामध्ये गुंडाळले जातात. बाह्य स्थिती हे सर्व सत्य होऊंच शकत नाही. सत्य फक्त एकच आणि ते म्हणजे तुमचा अंतरात्मा. ह्याच केंद्रबिंदूवर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. हेच एक असे सत्य जवळ आहे जे तुम्ही बाळगल्यामुळे अनुभवतां येणे शक्य आहे. ध्यान अवस्था प्राप्त करा हे म्हणतात. विचाररहीत मनाची स्थिती हेच ध्यान. अत्यंत अवघड गोष्ट आहे. सुक्ष्मात सूक्ष्म अशा चेतनेने मनाला उद्युक्त केले जाते. मनाएवढे चंचल आज पर्यंत तरी ह्या सृष्टीवर दुसरे माध्यम निर्माण झाले नाही. ही ज्ञानमार्गातील संकल्पना आहे.

    मनाचे शांत होणे म्हणजेच त्या सत्याजवळ जाणे. हा साधा हिशोब केलेला आहे. याचा अर्थच असा की त्या ईश्वराला बघण्यासाठीस फक्त एकच मार्ग शांत मन. हेच त्याला बघू शकते. भेटू शकते. कां ? फक्त शांत मनच कां ? कारण त्याच्यातला थोडासा देखील चंचलपणा हा त्या सत्याच्या केंद्र बिंदूपासून त्वरीत खूप दूर नेऊन सोडतो. किती कोंडी केलेली आहे ह्या मार्गानी. ज्ञानानी त्याला जाणा म्हणजे काय ? आत्मचिंतन करा हेच ना. हे करीत असताना मनाभोवतालची सारी वैचारीक झाकणे Covers of the Mind बाजूस करावयाची असतात.

    भक्ती करा म्हणतात. येथेही भावनांची अशीच गर्दी केली जाते. मनावर एक वेगळीच छटा निर्माण होते. सत्य हे त्यानेही झाकोळते. विचाराने, ज्ञानाने, भक्तीने त्या ईश्वराजवळ गेलो. एक मात्र सत्य आहे की अनेक व्यक्तीमधून, एखादाच त्या आत्मतत्वाजवळ जाऊ शकतो.- परंतु फक्त जवळ- एकरुप होऊंच शकत नाही.

    शिवाय ज्ञानीजनांना, भक्ताना देखील अहंकाराच्या भिंती उभारुन अडचणी केल्याच आहे. ईश्वर एकच असून शक्तिमान, अनंत, अविनाशी, निर्गुण, निराकार आहे. तो उत्पत्ती, स्थिती लय ह्या त्रिगुणात्मक शक्तीच्या बाहेर आहे. अनेक महान गुणधर्मानी परिपूर्ण असलेला. ही धारणा जगातल्या सर्व मार्गदर्शकानी अर्थात् धर्म संस्थापकांनी, विद्वान पंडीतांनी मान्य केलेली संकल्पना. जे पिंडी ते ब्रह्माडी समजले गेले. त्याच तत्वज्ञानाने प्ररित होऊन प्रत्येकामधल्या आत्म्याला अंशात्मक त्या ईश्वरी रुपाचे स्थान मिळाले आहे. तो प्रत्यक्ष ईश्वर मात्र आपल्या वैचारिक झेपेपासून अनंत योजने दुर आहे ह्यात शंका नाही. परंतु त्यानेच ही प्रत्येकासाठी सोय करुन ठेवलेली आहे. की त्याच्यापर्यंतचा मार्ग हा जरी केवळ अशक्य असला तरी प्रत्येकजण त्याला आत्मकेंद्रात जाणऊ शकतो. त्याच्या संपूर्ण शक्तीची, अस्तित्वाची न सुटणाऱ्या कोड्याचे प्रतिबिंब समजू शकेल. प्रखर सुर्याला उघड्या नजरेने कुणीच बघूं शकणार नसलो तरी रंगीत काचा. पाण्यातील प्रतिबिंब ह्या माध्यमातून अवलोकन करणे सुसह्य ठरते. तसेच हे आत्मचिंतन त्याच्या सान्निध्याजवळ, प्रतिबिंबाजवळ घेऊन जाऊं शकते. परंतु हा मार्ग अत्यंत खडतर असतो. ज्ञान, भक्ती, कर्म मार्ग भगवतगीतेमधले मार्गदर्शन व तसा अनुभव घेण्यास मदत करील.

    कित्येकजण हिमालयांत जाऊन गंगोत्री अर्थात गंगेच्या उगमस्थानी जाऊन पवित्र जलाची साठवणूक करतात. देव्हाऱ्यांत ठेवतात ह्यामागची तात्विक बैठक समजली पाहीजे. आत्मचिंतनातून अर्थात ईश्वरी प्रतिकात्मक केंद्रातून उत्पन्न झालेल्या विचारांची देखील इतक्याच तात्विक बैठकीवर स्थापना झाली पाहीजे. हे केंव्हां शक्य होइल जेव्हां सारी माध्यमे पावित्र्याचाच आधार घेतील. मन पवित्र, देह पवित्र वाणी पवित्र आणि सारा सभोवताल देखील पवित्र. हेच सत्य आणि आनंदाचे मुळ असेल. पावित्र्याची व्याख्या काय व कोणती हे अर्थात तुमचा अन्तरात्माच सांगेल. दुसऱ्याचे ऐकून होणार नाही.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com