नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
किशोर साव हा आमचा खूप जुना दोस्त. त्याच्या ‘दी गेम’ या पहिल्या नाटकापासून आमची मैत्री. काही वर्षांपूर्वी त्याचा ‘ब्लफमास्टर’ नावाचा धम्माल मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्याशी दिघेची भेट घालून द्यायची असं ठरविले.
January 12, 2022
संध्याकाळची वेळ,
बाहेर अंधारून आलेले. जोरात
पाऊस पडेल अशी हवा. अशावेळी मला
काम करायला खूप आवडते. उद्या कॉलेजमध्ये
द्यायच्या लेक्चरची तयार करत होतो.
बशी भरून चिवडा आणि चहाचा मग भरून ठेवून, आमची ही बाहेर गेली होती. चिरंजीव राहूल ऑफिसमधून यायला अजून दोन एक तासांचा वेळ होता. त्यामुळे तास दोन तास निवांतपणे मला माझ्या भाषणाची तयारी करता येणार होती. उद्याच्या लेक्चरमध्ये पोरांना काय शिकवायचे, कुठे विनोदाचा पंच टाकायचा, लेक्चर कसे खुलवायचे हसत-खेळत, हा किचकट विषय त्यांना कसा शिकवायचा याची मी उजळणी करीत होतो.
इकॉनॉमिक्स हा माझा आवडता विषय. फायदे हे माझे आडनाव. त्यामुळे इकॉनॉमिक्समधले फायदे, हा एक मोठाच विनोद असायचा. खट्याळ पोरं विचारायची, "सर काल फायदे सांगितले आज तोटे सांगणार का?" मी म्हणायचो, "अरे, तुम्हाला शिकवायला लागते हाच मोठा तोटा आहे!" वर्ग हास्यकल्लोळात बुडून जायचा. एकमेकांच्या फिरक्या घेत, लेक्चर कधी संपायचे याचा पत्ता लागायचा नाही. फायदे सरांच्या क्लासला खच्चून गर्दी ठरलेली!
तर सांगायची गोष्ट म्हणजे, मला हवा तसा निवांतपणा मिळाला आणि माझी तंद्री लागली. येवढ्यात बेल वाजली! मलाच दार उघडावे लागले!
दारात एक हसतमुख तरूण! रुबाबदार कपडे, टाय, बूट, हातात ब्रीफकेस आणि छोटीशी दाढी! दार उघडताच म्हणाला, "हॅलो! सर, ओळखलेत का मला?"
मी म्हणालो, "आत तर या, मग बोलू,"
तो आत आला, बूट बाहेर काढले, टायची गाठ ठाकठीक केली, रुमालाने तोंड पुसले. एक मंद सुगंध दरवळला. त्याच्या रुमालाच्या सेंटचा असावा. हसून म्हणाला, "सर, नाही ना ओळखलेत? आहे मी तोटे! उल्हास तोटे! आपला विद्यार्थी, फायदे-तोटे फेम!"
फायदे-तोटे फेम, म्हणताच मी ओळखले, "अरे तू? तोटे? केवढा बदलला आहेस? हा तुझा आपटुडेट पोशाख, चकाचक, गुळगुळीत दाढी रुबाब. तू तर एखादा मार्केटिंग एक्झिक्यूटीव्हच वाटतोस. वर्गातला तो शामळू तोटे पार बदलला! तू ९० च्या बॅचला होतास ना?"
"सर, कमाल आहे. त्याला सर पाच वर्षे होऊन गेली तरी अजून तुमच्या लक्षात आहे?"
"अरे, मी माझ्या क्लासमधल्या बहुतेक मुलांना ओळखतो. आता तुझा मोहराच पार बदलला, तेव्हा जरा गोंधळलो खरा. पण तुझे नाव कळले आणि माझी ट्युब पेटली! इकॉनॉमिक्समध्ये फायदे - तोटे शिकवताना हे इथे फळ्यावर शिकवताहेत ते फायदे आणि ते तिकडे शेवटच्या बाकावर झोपलेत ते तोटे! हा आपला नेहमीचा विनोद खूप पॉप्युलर होत नाही त्यावर्षी?"
"हो सर, पण खूप मजा यायची तेव्हा."
"बरं ते सोड,हा तुझ्यात एकदम चेंज कसा झाला? काय नवीन नोकरी बिकरी लागली, का लग्नाची पत्रिका बित्रिकाद्यायला आला आहेस?"
"नाही सर. मी टी.एफ्.एल.ची एजन्सी घेतली आहे. मोबाईल, क्रेडिट कार्डचा व्यवसाय सुरु करतो आहे. तुमचे आशीर्वाद हवेत सर."
"
"अरे वा! छान! माझे आशीर्वाद तर आहेत तुला. यशस्वी हो, खूप मोठा हो!"
"सर, नुसते तोंडी आशीर्वाद नकोत.
"मग? आणखी कसे असतात आशीर्वाद?"
"सर, तुम्ही माझ्याकडून एक मोबाईल आणि एक क्रेडिट कार्ड घेतलं पाहिजे, तुमच्याकडून माझ्या कामाचा मुहूर्त करायचाय सर."
"अरे, माझ्याकडे मोबाईल आहे. आता क्रेडिट कार्ड म्हणशील तर माझ्यासारख्याला त्याचा काय रे उपयोग?"
"सर, तुम्हाला लेक्चर, कॉन्फरन्ससाठी खूप फिरावे लागते. विमानाचा प्रवास, हॉटेलमध्ये रहाणे वगैरे खर्च असतात. तेव्हा क्रेडिट कार्ड जवळ असले म्हणजे सरकाही अडचण येणार नाही.रोख पैसेजवळ ठेवायलाच नकोत.'
"अरे माझे विमान तिकीट, हॉटेलची बिलं वगैरे सर्व खर्च कॉलेज करते. माझ्या पगारातून परस्पर कापले जातात. सगळी व्यवस्था परस्पर होते. शिवाय रोजचा घरखर्च माझी बायको बघते. मी दुकानाची पायरीपण चढत नाही. शिवाय हे तुझे कार्ड काय फुकट थोडेच येणार? काही तरी कमिशन असणारच ना?"
"हो. सर, वर्षाला फक्त पाचशे रुपये. पण सर पहिल्या वर्षी काही चार्ज नाही. फुकट वापरा. नको वाटले तर पुढच्या वर्षी बंद करा. कंपनीची काही हरकत नाही.
"हे बघ तोटे, तुझ्या दृष्टीने याचे फायदे खूप असतील. पण एकदा का याची सवय आमच्या घरच्यांना लागली ना, मग मला फायदा तर सोडाच तोटाच तोटा दिसतोय."
तेवढ्यात बेल वाजली. दार उघडले तर सौ. घाईघाईने आत आली माझ्या हातात पिशव्या दिल्या आणि म्हणाली, "या पिशव्या ठेवा. मी जरा परत जाऊन येते."
"का ग? आलीस काय? पुन्हा चाललीस काय? काय आहे काय?"
"अहो, त्या कजरीमध्ये सेल लागलाय-विमल साड्यांचा! जाम स्वस्तात आहेत! जरा जास्तीचे पैसे लागले तर असावेत म्हणून आले घरी. आत्ता येते जाऊन. आलेच." असे म्हणून ती आत गेली. जास्ती पैसे घेऊन आल्या पावलांनीच परत पळाली!
"या बायकांना, म्हाताऱ्या झाल्या तरी साड्यांचा सोस काही कमी होत नाही."
"सर, बघितलेत ना? आता कशी झाली पंचाईत. आत्ता क्रेडिट कार्ड असतं तर बाईसाहेबांना अशी धावपळ नसती ना करावी लागली?"
"अरे पण असं काय नेहमी थोडंच होतं? त्यासाठी काय कायम वर्षाला पाचशे रुपये भरत बसायचे?"
"सर, एक वर्ष तर वापरून बघा. त्यात तुमचं काहीच नुकसान नाही. सर मला तुमचे आशीर्वाद हवेत. तुम्ही मला नाऊमेद करणार नाही या आशेने मी आलो. नाही म्हणून नका."
माझ्या खनपटीस बसून त्याने माझ्या गळ्यात क्रेडिट कार्ड मारलेच एकदाचे! पोरगा चांगलाच तयार झाला होता धंद्यात. मग मी विचारले, "तोटे, आणखी किती लोकांचे आशीर्वाद घेतलेस रे चोरा? तेव्हा तो पोट धरधरून हसायला लागला. मी म्हणालो, "अरे चोराची पावले चोर ओळखतोच!" मग आम्ही जुन्या आठवणी काढत बसलो. त्या बॅचच्या इतरांच्या गोष्टी निघाल्या. किती वेळ गेला कोण जाणे. बेल वाजली तेव्हा लक्षात आलं की आठ वाजायला आलेत!
दार उघडले तशी सौ. हातात पुन्हा दोन पिशव्या घेऊन हजर!
"अहो, पाहिल्यात का या विमलच्या साड्या? निम्म्या किंमतीत मिळाल्या!" तेवढ्यात तिचे लक्ष तोटेकडे गेले. तशी ती म्हणाली, "अरे अजून हे आहेतच का? थांबा हां मी चहा आणते."
"अग हा माझा विद्यार्थी आहे, ९८ च्या बॅचचा, त्याला अहो जाहो काय करतेस?"
"हो, बाईसाहेब, आणि आता चहा वगैरे काही आणू नका, तुम्ही बाहेरून दमून भागून आला आहात. मी येईन पुन्हा कधीतरी."
"वा, वा, इतक्या वेळ बसला आहेस. तसा बरा जाऊ देईन मी तुला? आता पाच मिनिटात होईल चहा थांब जरा.” तिने चिवडा, जिलबी आणून दिली आणि चहा करायला आत निघाली तसा तोटे म्हणाला, "अरे वा जिलबी! मला फार आवडते. घरची वाटते?"
"नाही रे, येवला कुठला वेळ मिळायला? त्या समोरच्या सोनार, सराफ अॅन्ड हिरे ज्वेलर्सकडून आणल्यात या तुमच्या लाडक्या प्रोफेसरांनी!
"काय? ज्वेलर्सकडून? काय बोलताय काय बाईसाहेब तुम्ही?"
"मग विचार की या तुझ्या प्रोफेसरांना!"
"सर, ही काय भानगड आहे?"
मी खूप हसलो, "अरे उल्हास ती एक गंमतच झाली. आज आमच्या राहूलचा वाढदिवस तर ही म्हणाली काहीतरी स्वीटस् घेऊन या म्हणाली थोड्या जिलब्या आणा. राहूलला आवडतात. मी म्हणालो, "किती आणू?''तर म्हणाली, "आणा २००-३०० गॅम!'' पिशवी घेऊन निघालो तर सोसायटीचे सेक्रेटरी भेटले, कंटक! म्हणाले, काय प्रोफेसरसाहेब, आज कॉलेज नाही वाटते? सकाळी सकाळी दहा वाजता बाहेर पडताय म्हणून विचारतो," मी म्हणालो,"हो आज जाणार नाही कॉलेजला, जरा बाजारात निघालोय." त्यांचे ते दहा वाजलेत दहा माझ्या डोक्यात बसले. त्याच नादात मिठाईचे दुकान गाठले आणि तिथल्या पोऱ्याला म्हणालो, "दहा ग्रॅम जिलबी दे रे बांधून!" तो गालातल्या गालात हसून म्हणाला, "साहेब, ते समोर सोनार, सराफ अँन्ड हिरे ज्वेलर्स आहेत ना, त्यांच्याकडे मिळतील दहा ग्रॅम जिलब्या!" तसे आजूबाजूचे लोक लागले हसायला!
मालकाने चमकून वर पाहिले मला पाहताच तो म्हणाला, "अरे या,या प्रोफेसर साहेब, या काय पाहिजे?" तसा तो पोऱ्या म्हणाला, "मालक यांना दहा ग्रॅम जिलब्या हव्यात!"
मालक त्याच्यावर खेकसला!''मूर्खा, यांना ओळखलं नाहीस? अरे आपल्या नवीन दुकानाचे उद्घाटन परवा यांच्याच हातून नाही का झाले?" चल पटकन दोन किलो जिलबी दे त्यांना पॅक करून, अरे येवढी मोठी आसामी येते काय चेष्टा आहे काय?"
त्याने दोन किलो जिलब्या दिल्या बांधून.
--विनायक अत्रे
March 19, 2022
नाना आप्पा म्हणजे एक विलक्षण माणूस. क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे, एखाद्या पाखरासारखा त्याचा संचार असतो. नारद मुनी जसे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे सतत भ्रमण करतात. तसाच हा. जसे नारदाकडे कोणतेही वाहन नाही. तसेच नाना आप्पा कडे ही अद्याप कोणतेही वाहन नाही.
November 15, 2025
प्रत्येक ओवी ही देहगुण असल्यासारखीच आहे, ओवींचा अर्थ ज्याने योग्य लावला तो समृध्दीकडे जातो, निबंध लिहिण्यापेक्षा कमीत कमी शब्दात सांगायचे ते ज्ञान श्री समर्थ रामदासांनी ग्रंथ दासबोध मधून सांगितले.
September 5, 2021
कशी बघतेय ती माझ्याकडे!
खरं तर मला कबुतरं अज्जिबात आवडत नाहीत. मुख्य म्हणजे आमच्या सगळ्या building मध्ये जिथे तिथे colonies नी राहून सगळं घाण करुन ठेवलेनीत! पण आत्ता ना, एका कबुतरीने अंडं घातलंय माझ्या balconyतल्या एका कुंडीत! मला घाबरून सकाळी एकदा दूर जाऊन बसलेली, पण सतत डोळा माझ्याकडे! तेव्हा दिसलं, छोटुस्सं अंडं! आता तिला समजलंय कि तिला ती pregnant असल्याचा benefit मिळणारे. आम्ही तिला काही नाही करणार, आणि काही दिवस तिला इथेच मुक्काम ठेऊ देणार!
खरं तर मला हे बिलकूल पसंत नाहीये, पण नापसंत होऊन करतेय काय मी! असो.
आत्ता थोडासा पाय हलवला मी, तर लगेच माझ्या पुढच्या हालचालीकडे लक्ष हिचं! “उठतेय कि काय आता? येतेय कि काय इकडे? इजा तर नाही ना करणार ही माझ्या पिल्लाला?”
आई आई गं! मला आत्ता ही अग्गदी माझ्यासारखी वाटतेय! माझी पिल्लं वर्ष-सव्वा वर्षाची होईपर्यंत प्रत्येक दिसणारा माणूस, येणारा आवाज, कोणताही अन्न पदार्थ, वारा, पाऊस, खेळणं, काहीही, माझ्या बाळाला इजा तर करणार नाही ना? मग ही इजा अगदी physicalच होऊ शकेल असं नाही ना, त्यात मानसिक, बौद्धिक, भावनीक, आणी त्याही पलीकडे कित्तीतरी गोष्टी असतात! बघणारा माणूस, किंवा आसपासची वस्तू बऱ्यापैकी शुभ ईच्छेनेच तिथे प्रकट असते, पण आईची वक्र-संरक्षक (भोचक) दृष्टी काही हे मान्य किंवा सहन करू शकत नाही. तिचा protective mode कायमच On राहातो.
हाहाहा! आत्ताच पलीकडच्या एका मैदानावरून पोरांचा ओरडण्याचा आवाज आलेला, लगेच बाईसाहेब मान वर करून बघू लागल्या!
त्या वरून आठवलं, माझी पिल्लं ६ महिन्यांची असताना एका रात्री मी शेजारच्यांना, “गप्पांचा आवाज कमी करा” असं रात्री २ वाजता phone call करून सांगीतलं होतं! आज अजूनही भेटलं कि ते आम्हाला “आमचा आवाज आता येत नाही ना?” असं विचारतात, ही एक वेगळीच मजा! असो, त्यांना ही हे माहिती असेल, नाही तर कधी तरी कळेल, कि आई हि फक्त एक आईच असते.
त्यावेळेला ती तिच्या आयुष्यातले इतर roles सुद्धा पार पाडत असेल, पण तिचा पूर्ण प्राण हा तिच्या पिल्लांपाशीच घुटमळत असतो.. with protective mode always On!
May 10, 2019
December 15, 2022

जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, 'माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.' जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा त्याचा देश होता. भारताविषयी उल्लेख करताना तो नेहमी 'माझा भारत' असा करत असे. आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाला त्याने 'माझा भारत' नाव देऊन ते भारतीय जनतेला अर्पण केले आहे. त्याच्या शब्दा-शब्दात भारत व भारतीय लोकांच्याबद्दलचे प्रेम स्पष्ट होते.
आज लोकांना पर्यावरण व पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व कळू लागले आहे. पण जिम कॉर्बेटला हे महत्त्व त्याच वेळी कळले होते. जनजागृतीचे कार्य तेव्हाच त्याने सुरू केले होते. तो सभा घेऊन लोकांना पर्यावरणाचे व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगत असे. १९२६ पासून त्याने पर्यावरण रक्षणाच्या जागृतीसाठी आपली लेखणी उचलली. जंगलतोड, जंगलाच्या भूमीवर अतिक्रमण, पशुहत्त्या, जंगलात लावले जाणारे वणवे या विषयावर तो वृत्तपत्र, मासिकात लिहून जनजागृतीचे काम करत होता. विशेषत: तरूण पिढीला या विषयीचे महत्त्व पटवून देण्याकडे त्याचा जास्त कल असे. "The all India conference for preservation of Wild Life" या संस्थेने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. या संस्थेने जिमशी जवळीक साधली.आता जिमला पण एक चांगले व्यासपीठ मिळाले. या संस्थेच्या Indian Wild Life या मासिकाचा प्रकाशन समारंभ जिमच्या हस्ते झाला होता.
जिमने अनेक लेख लिहिले व त्याला चांगली प्रसिद्धी पण मिळाली. त्याचा "Wild life in village. An appeal" हा लेख तर खूप गाजला. जंगलात लावल्या जाणाऱ्या वणव्याविषयीच्या लेखाची सुरुवात त्याने, "Stop! You fools. Stop." अशी केली होती. या लेखात त्याने अशा लावल्या जाणाऱ्या आगीबद्दल राग प्रगट केला होता. वनाधिकारी, ब्रिटिश अधिकारी तसेच राजे-रजवाडे यांच्याकडून होणारी वन्य प्राण्यांची हत्या व जंगलाचे नुकसान याबद्दल त्याने खूप नाराजी व राग व्यक्त केला होता. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी प्रयत्न करणारी जिम कॉर्बेट ही भारतातील पहिली व्यक्ती असावी.
जिम कॉर्बेट निसर्गवेडा होता. तो म्हणतो, "निसर्ग ग्रंथाला अंतही नाही व आरंभही नाही. निसर्गाचे ज्ञान निसर्गात राहून शोषले पाहिजे. माझ्या आनंदी जीवनाचे निसर्ग हेच कारण आहे." जिम पर्यावरण, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी मनापासून प्रयत्न करीत होता. त्याच्या सामाजिक कार्यामुळे तो कुमाऊं भागात आदराने ओळखला जात होता.
वन्य प्राण्यांना बंदुकीने शूट करण्यापेक्षा कॅमेराने शूट करणे त्याला जास्त पसंत होते. ही प्रेरणा त्याला फ्रेड चॅम्पियन व त्याच्या 'विथ ए कॅमेरा इन टायगर लँड' या पुस्तकाकडून मिळाली. फ्रेड चॅम्पियनने फ्लॅशलाईटचा वापर करून वाघाचे फोटो घेतले तर त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन जिम कॉर्बेटने दिवसाउजेडी फोटो घेतले. त्याच्या एका उदार दोस्ताने त्याला बेल अँड हॉवेल कंपनीचा सोळा मिलीमीटरचा कॅमेरा दिला. मग त्याने तो कॅमेरा घेऊन जंगलात मनसोक्त भटकंतीचा कार्यक्रम सुरू केला. काही वेळा आपल्या भक्ष्याजवळ, पिल्लाजवळ जिमला भटकताना पाहून वाघांनी नाराजी व्यक्त केली. काही वेळा तो वाघांजवळ पोहचला सुद्धा पण त्याला मनपसंत छायाचित्रीकरण करता आले नाही. कधी कमी जास्त प्रकाश तर कधी काचेवर पाने, धूळ, कोळीष्टके पडत. शेवटी त्याने एक जागा निवडली. दिडशे फूट रूंदीचे खोरं. दोन्ही बाजूला झाडे-झुडपे. मधूनच वाहणाऱ्या झऱ्याला कृत्रिम अडथळे निर्माण करून छोटे धबधबे तयार केले व या 'जंगल स्टुडिओ'त चित्रीकरणाची तयारी केली. मग जिम वाघांना आपल्या जंगल स्टुडिओत आणू शकला. दहा ते साठ फूट अंतरावरून सूर्यप्रकाशात त्याने ४ वाघ व २ वाघिणी आपल्या कॅमेऱ्याने टिपल्या. हे सर्व करायला त्याला साडे चार महिने लागले. आपल्या जंगल स्टुडिओत तो तासन् तास पडून असे आणि विशेष म्हणजे एकाही वाघाने त्याला पाहिले नाही. ६०० फूट लांबीचे सुरेख चित्रीकरण त्याने केले. दिवसाढवळ्या वाघांच्या इतके जवळ जाणे ही अशक्य कोटीतील गोष्ट म्हणून सकाळच्या पहिल्या प्रहरी दिवसाचा प्रकाश हळूहळू पसरत असताना त्याला वाघावर नजर ठेऊन बसावे लागले. जिमने काढलेले जंगलांचे, वन्य पशूंचे फोटो लंडनच्या 'नॅचरल हिस्टरी म्युझियम' मध्ये आजही जतन करून ठेवले आहेत. या फोटोवरून त्यावेळी भारतात वनसंपदा किती संपन्न होती हे लक्षात येते.
१९२० साली जिम कॉर्बेट नैनिताल नगरपालिकेचा उपाध्यक्ष बनला. आपल्या कारकिर्दीत त्याने नैनितालमध्ये खूप सुधारणा केल्या. नैनितालच्या सरोवराकाठी बँड स्टँड बांधले. भूमिगत विद्युतवाहक तारा, आखीव रस्ते, पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा, ड्रेनेज सिस्टिम, झाडांची लागवड, व्यापारी लोकांकडून कर आकारणीचे नियम व त्या अनुषंगाने कायदे आणि या सर्वांच्या अंमलबजावणीसाठी नियमित बैठका! भविष्यात नैनिताल हे पर्यटन स्थळ बनावे हा सुद्धा त्या मागचा हेतू होता.
नैनिताल नगर परिषदेचा तो सभासद असताना नैनिताल परिसरात वृक्षतोड व पशुहत्येला त्याने बंदी घातली. तसे कायदे केले व त्यांची कडक अंमलबजावणी सुरू केली. नैनितालच्या पायथ्याशी असलेल्या पाटलीदून परिसरातील जंगल व पशुधन वाचवण्यासाठी त्या परिसराला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याचे त्याने प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नांना यश येऊन ६ ऑगस्ट १९३६ साली या परिसराला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला व भारतातील पहिले व जगातील तिसरे राष्ट्रीय उद्यान 'हॅले नॅशनल पार्क' नावाने अस्तित्वात आले. आज हेच पार्क 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क' म्हणून जगात प्रसिद्ध आहे.
नैनिताल परिसरात सुद्धा पक्ष्यांचे अभयारण्य त्याने स्थापन केले. पूर्वपरवानगीशिवाय कोणीही झाडे तोडू शकत नव्हते. आणि जर झाड तोडले तर तसलेच झाड लावून त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी झाड तोडणाऱ्या व्यक्तीवर असे. एके दिवशी नैनितालच्यां चर्चचे प्रिस्ट एक झाड तोडण्याची परवानगी मागण्यासाठी जिमकडे आले. कारण त्या झाडामुळे क्लॉक टॉवरवरचे घड्याळ नीट दिसत नव्हते. पण जिमने त्या प्रिस्टनासुद्धा नियमातून कोणतीही सवलत दिली नाही.
इतकेच नाहीतर त्यावेळी घोडे, गाढवे तसेच खेचरांचा कामासाठी वापर केला जात असे. या मुक्या जनावरांनासुद्धा आठवड्यात किमान एक दिवस तरी विश्रांती मिळेल याकडे सुद्धा जिमचा कटाक्ष होता. दुसऱ्या महायुद्धाच्या `समाप्तीपर्यंत नैनिताल व आजूबाजूचा परिसर जिमच्या नजरेखाली होता. त्यामुळे इथे वनश्री बहरली. पशु-पक्ष्यांची वर्दळ वाढली. आज मात्र हे काहीच उरलेले नाही.
१९१४ साली पहिल्या महायुद्धाचा वणवा पेटला. त्यावेळी जिम मोकामा घाट या ठिकाणी रेल्वेत काम करीत होता व त्याचे वय होते ३९ वर्षे! लष्करात द्राखल होण्यासाठी तो कलकत्त्याला पोहोचला. पण त्याचे वय पाहून त्याला लष्करात प्रवेश दिला गेला नाही. १९१७ साली त्याने परत प्रयत्न केला तेव्हा मात्र त्याला लष्करात दाखल करून घेण्यात आले व कॅप्टन हा हुद्दा मिळाला. अल्पावधीतच त्याने कुमाऊंमधील ५०० तरुणांची तुकडी बनवली व सर्वजण १९१७ च्या मे-जूनमध्ये मुंबईमार्गे इंग्लंडला रवाना झाले. ही तुकडी लष्करात No 70 kumoan Company म्हणून ओळखली जाऊ लागली व या तुकडीची फ्रान्समध्ये रणभूमीवर रवानगी झाली. जिमला स्वत:पेक्षा या तरुणांच्या जीवाची जास्त काळजी होती. युद्धानंतर बक्षिसे, ट्रॉफिज मिळवून सर्वजण सुखरूप परत आले. जिम आता कॅप्टनचा मेजर बनला होता. त्याला 'व्हॉलेंटियर्स डेकोरेशन' हा बहुमान देण्यात आला.
१९३९ साली हिटलरने सर्व जगाला महायुद्धाच्या वणव्यात ढकलले. १९४३ साली जपानी सेना ब्रह्मदेशात पोहोचून भारताचा दरवाजा ठोठावू लागली. हा सर्व प्रदेश पर्वतशिखरांनी, घनदाट जंगलांनी वेढलेला! दोस्त राष्ट्रातील तरुण सैनिकांना हे सर्वच अनोळखी होते व जपानी सैन्य याचा पुरेपूर फायदा उठवत होते आणि एके दिवशी जिम लष्करी कार्यालयात हजर झाला. लष्कराला अशा जाणकाराची गरजच होती आणि तसा माणूस मिळाला. जाणकार, सल्लागार, शिक्षक म्हणून जिम, फ्रँक मूर यांना भेटला. ते ३९ व्या ट्रेनिंग डिव्हिजनचे कमांडर होते. जिमची लेफ्टनंट कर्नल म्हणून नेमणूक झाली व छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे नियुक्ती झाली. आता जिमवर जबाबदारी होती या तरुण जवानांना जंगलाचे ज्ञान देण्याची! वनस्पतींची, प्राण्यांची ओळख, त्यांच्या सवयी याविषयी माहिती करून देण्याची! तसेच आणिबाणीच्या प्रसंगी घेण्याची काळजी, दक्षता, कृती, अवघड प्रसंगी मार्ग कसे काढायचे हे सांगण्याची! हे सर्वकाही १४४/ हिमशिखरांच्या सहवासात जिम त्यांना सांगत होता, दाखवत होता, शिकवत होता, पारंगत करत होता. एक अनोखे ज्ञान तो देत होता की जे प्रत्यक्ष युद्धभूमीवर जरूरीचे होते, उपयोगी ठरणारे होते. जिमने काही काळ ब्रह्मदेशातही वास्तव्य केले. तेथील जंगले त्याने निरखली. त्या काळात अनेक अमेरिकन वैमानिक त्याचे मित्र झाले होते.
--प्रकाश लेले
September 30, 2022
अकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते. एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शौक होता. त्याच्या अंगावर नेहमी हिया-मोत्यांच्या माळा झगमगत असत.
July 8, 2024
आत्माराम नीलकंठ अर्थात आनंद साधले यांची ‘ मातीच्या चुली ‘ (आत्मचरित्र ) आणि ‘ हा जय नावाचा इतिहास आहे ‘(महाभारतावरील ) हि पुस्तके चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीत, तुम्हीही ती वाचली असतीलच. पंचाहत्तर वर्ष्याच्या आयुष्यात त्यांनी साठ पुस्तक लिहिली आहेत ! त्यांच्या लेखनाबद्दल लेखक / वाचक मंडळीत खूप प्रवाद आहेत.आपण त्या प्रवादांत न पडता आता फक्त त्यांच्या ‘ हटके ‘ कथान बद्दल बोलू.
August 24, 2018
माणसाच्या मूर्खपणावर आईनस्टाईन सरांचा किती विश्वास होता बघा. हे सर म्हणजे एकदम बाप माणूस हे आपणास ठाऊक आहेच. सगळया मानवांपेक्षा या सरांचा मेंदू अधिक विकसित झाल्याचं नंतर सिध्द झालं.इतर मानवांपेक्षा हुषारीच्या बाबतीत अनेक पावलं समोर असलेलं सर असं म्हणतात म्हणजे ते सत्यच असलं पाहिजे,नाही का?
August 19, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti