(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शोध अस्तित्वाचा

    दिवसभराच्या दगदगीने शिणून अंग अंथरुणावर टाकले. तेव्हा वाटलं, लौकिकार्थाने आपला संसार पूर्ण तर झालाय. पण अजून आपली ह्या प्रपंचाच्या जोखडातून सुटका मात्र नाही. आजही मुलगा, सून, नातवंड, नवरा कशातून मोकळीक नाही. आपण स्वतःसाठी कधी जगलोच नाही. ते काही नाही. आता सोडवून घ्यायचं सगळ्यातून स्वतःला तिच्या मनात एक अभिनव कल्पना आली.

      August 30, 2023


  • तंत्रज्ञानाच्या विळख्यातील प्रायव्हसी!

    मनात जितके गुपितं नसतील तितके गुपित आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असतात. या गुपितांना एक पासवर्ड टाकला की ते सुरक्षित आहे, असा आपला समज होतो. पण,वरकरणी सेफ वाटणारे हे तंत्रज्ञान किती तकलादू आहे, हे आता समोर येऊ लागले आहे. ‘आपली गोपनीयता आमच्यासाठी महत्त्वाची आहे’ असा टाहो फोडत प्रायव्हसी स्टेटमेंट देणाऱ्या कंपन्यांचीच प्रायव्हसी धोक्यात येत असेल तर आपल्या प्रायव्हसीची काय कथा!

      November 19, 2019


  • आहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)

    भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला खीळ बसली ती नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानसहीतच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकालांनी. ह्या हिंदी पट्ट्यात झालेल्या निवडणुकांत तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता गमावली. भाजपच्या या राज्यांतील पराभंवामागे त्या त्या राज्य सरकारांचा कारभार, अँटी इनकॅबन्सी इत्यादी काही कारणांप्रमाणे मतदारांनी ‘नोटां’चा केलेला प्रभावी वापर हे देखील एक कारण आहे.

      February 4, 2019


  • भूक न लागण्याची कारणे

    भूक न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे ही तक्रार अनेक वेळा केली जाते. भूक न लागण्यामागे काही आजारच असेल असेही नाही. दैनंदिन तणावामुळेदेखील एखाद्या वेळेस भूक लागत नाही. भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो. काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे.

      August 10, 2019


  • सार्थ त्रिपुरसुन्दरी अष्टकम्

    त्रिपुरसुंदरी म्हणजे सर्वोत्कृष्ट सौंदर्य. तिन्ही लोकात सुंदर. तथापि त्रिपुर याचा अर्थ विविध अभ्यासकांनी अनेक प्रकारे अर्थ लावलेला दिसतो. त्रिपुर म्हणजे त्रिगुणात्मक शिव आणि त्याची अर्धांगिनी ती त्रिपुरसुंदरी.

      April 4, 2022


  • क्रिकेटपटू नरी कॉन्ट्रॅक्टर

    नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी १९६१-६२ मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध आणि वेस्ट इंडिजच्या विरुद्ध भारतीय नेतृत्व केले होते. त्यामध्ये भारताने दोन सामने जिंकले होते आणि बाकीचे तीन सामने बरोबरीत सुटले होते.

      September 11, 2021


  • महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन

    संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस.. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

      November 21, 2021


  • निरंजन – भाग ३१ – माता कालीरात्री

    कालीरात्री हा दुर्गामातेचा सातवा अवतार आहे. कालचा अर्थ आहे मृत्यू आणि रात्रीचा अर्थ आहे काळोख, अंधकार, अज्ञान…. अज्ञानरूपी काळोखाला मॄत करण्यासाठी स्वतः दुर्गामातेने कालीरात्रीचे रूप धारण केले. जगाच्या संरक्षणाकरीता मातेचा हा रक्षणरुपी अवतार…..

      October 30, 2020


  • श्री हनुमान जन्मकथा

    वंदन तुज मारुतीराया
    तुझा आशीर्वाद मिळाया
    न कळे कुणास तुझी माया
    भक्ताविना ||१||

    रुद्राचे तू रुप असता
    शक्तीची तू देवता
    अचाट कामे क्षणांत
    ह्या पृथ्वीवरी ||२||

    शक्ती बुद्धी नि सेवा
    ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा
    भक्तीभाव मनीं यावा
    हीच माझी इच्छा ||३||

    शक्तीचे तूं दैवत
    बुद्धीदाता तूं होत
    शक्ती नि बुद्धी एकांत
    मिळे तुझ्या आशिर्वादे ||४||

    हनुमंताची जन्मकथा
    आनंद होई सांगता
    चितीं समाधान देता
    तुमच्या ठायीं ||५||

    अंजनी एक वानरी
    भक्ती तिची शिवावरी
    रात्रंदिनी भजन करी
    सदाशिवाचे ||६||

    प्रभू भक्तीचा भूकेला
    पावन होई भक्ताला
    लक्ष देई शंकेला
    भक्तांच्या ||७||

    भक्तीचा महिमा थोर
    सर्वांसी उघडे द्वार
    असेल नर अथवा वानर
    कुणासही पावत असे ||८||

    अंजनीची पाहून भक्ति
    शिव प्रसन्न होती
    आशिर्वाद तिजला देती
    विश्वनाथे ||९||

    अंजनी होती वानरी
    इच्छा ती करी
    तुम्ही यावे उदरीं
    लाभावा प्रभू सहवास ||१०||

    शिवाचे मोठेपण
    वाटते भोळेपण
    परी भक्तास जाई शरण
    हिच शक्ती भक्तिची ||११||

    तपांत असते शक्ती
    तेथे पाहीजे अंतरीक भक्ति
    सामान्यास जाणिव न येती
    खऱ्या भक्तीची ||१२||

    भक्तीची शक्ती
    प्रभूला खेचती
    हीच त्याची महती
    समजोन घ्यावी ||१३||

    प्रल्हाद नि ध्रुव बालक
    वाकवितीं विश्वचालक
    तैसे अंजनी वानरी एक
    मिळवी तपशक्ती ||१४||

    जेव्हां भक्त घाली सांकडे
    उपाय नसतो प्रभुकडे
    कसे टिकेल भक्तापूढें
    प्रत्यक्ष परमेश्वर ||१५||

    दुजा मार्ग नसे
    इच्छा भक्ताची असे
    संतुष्टकरावे कसे
    काळजी ह्याची प्रभुला ||१६||

    हनुमंत म्हणून
    तुझ्या उदरीं येईन
    राम सेवा करीन
    शिव बोले ||१७||

    अयोध्येचा राजा दशरथ
    राहता विना अपत्य
    दुःख त्यासी होत
    संततीसाठी ||१८||

    उपदेश वशिष्ठ ऋषींचा
    पुत्र कामेष्ठी यक्ज्ञाचा
    प्रसाद मिळेल पुत्राचा
    यज्ञदेवते कडून ||१९||

    यज्ञ केला महान
    जमवून ऋषीगण
    द्रव्याचे केले हवन
    यज्ञामध्ये ||२०||

    पाहून दशरथ भक्ति
    यज्ञदेवता संतुष्टती
    पवित्र पायस देती
    दशरथासी ||२१||

    प्रसादाचे भाग करावे
    राण्यास वाटून द्यावे
    पुत्रवती व्हावे
    यज्ञदेवता आशिर्वादली ||२२||

    समभाग करीत असतां
    अघटीत घटना घडता
    आकाशातूनी घार येता
    एक भाग उचलून नेई ||२३||

    धरुन एका भाग
    घार उडाली आकाशी
    झेप घेता नभाशीं
    भाग निसटला चोंचीतूनी ||२४||

    अंजीनी वानरी
    बसली पर्वत शिखरीं
    प्रभूचे भजन करी
    दोन्ही हात पसरोनी ||२५||

    बघत होती वायुदेवता
    प्रसन्न अंजनीवर होता
    प्रसाद तिच्या पडण्या हाता
    मदत करी ||२६||

    प्रसादाचा भाग पडला
    अंजनीचे हाती मिळाला
    आनंदे स्विकारी त्याला
    प्रभूचा प्रसाद समजोनी ||२७||

    वायुपुत्र संबोधती
    वायुची चपळता मिळती
    मुर्तिमंत असे ती शक्ति
    पवन पुत्र हनुमान ||२८||

    चैत्रशुद्ध पोर्णिमेला
    हनुमंताचा जन्म झाला
    शिव ह्या जगती अवतरला
    अंजनीचे उदरीं ||२९||

    बजरंगबली मारुती
    सगुणरुप हीच शक्ती
    ह्या विश्वात अवतरती
    अंजनी पुत्र बनोनी ||३०||

    सूर्वोदयाचे समयीं
    मारुतीचा जन्म होई
    बाळ सुर्याकडे पाही
    आश्चर्याने ||३१||

    उगवत्या सुर्याची लाली
    फळा प्रमाणी भासली
    भूक हनुमानास लागली
    झेप घेई सुर्याकडे ||३२||

    मारुती म्हणजे शक्ति
    शिवाचे रुप असती
    झलक त्याची दिसती
    जन्माताक्षणीं ||३३||

    असून लहान मुर्ती
    प्रचंड त्याची शक्ति
    सुर्याकडे झेपावती
    मिलण्या त्यासी ||३४||

    इंद्र गेला घाबरुनी
    हनुमानाची झेप पाहूनी
    संकटात सुर्यासी बघूनी
    काळजी पडली विश्वाची ||३५||

    इंद्राची सत्ता देवांवरी
    राज्य त्याचे विश्वावरी
    देवांची तो काळजी करी
    विश्व चालणेसाठी ||३६||

    राहू केतू शनी
    यम वरुण अग्नि
    टाकीले सर्वासी
    हरवूनी हनुमंतानी ||३७||

    बघूनी हनुमंताची झेप
    इंद्रस होई कोप
    रागाने आला संताप
    वज्र टाकिले मारुतीवर ||३८||

    इंद्रवज्र कठीण
    शक्ति त्याची महान
    नष्ट होई तो लागून
    इंद्र फेकता ज्याचेवरी ||३९||

    दोन शक्तींची टक्कर
    मात करी एकमेकांवर
    वज्रघात होतां हनूवटीवर
    मुच्छित झाला मारुती ||४०||

    मारुतीस मूर्च्छित बघोनी
    वायु आला धाऊनी
    प्राण शक्ति त्यास देऊनी
    सावध केले ||४१||

    इंद्रास प्रश्न पडला
    बघून अपूर्व बालशक्तीला
    काय असावी प्रभू लीला
    कळेना कुणा ||४२||

    ब्रह्मा प्रकट होऊनी
    सर्व देवासंगे जमूनी
    सांगू लागले समजावूनी
    हनुमंताविषयी ||४३||

    हनुमंत आहे रुप प्रभूचे
    शिवाचे शिवशक्तीचे
    करील कार्य सेवेचे
    श्रीरामाच्या ||४४||

    देवांनी आशिर्वाद दिले
    सर्वामध्ये श्रेष्ठ ठरविले
    शक्ति बुद्धीची देवता संबोधीले
    मारुतीस ||४५||

    प्रभूरामाची करावी सेवा
    मनामध्यें भक्तीचा ठेवा
    प्रभूचरणी लीन व्हावा
    हेच दाखविले जगांते ||४६||

    प्रत्येक गांवाच्या वेशीवर
    मारुतीचे असते मंदीर
    आनंदी गांव असणार
    हनुमंताचे कृपे ||४७||

    पूजन करावे मारुतीचे
    भजन स्तोत्र म्हणूनी त्याचे
    वाहूनी पुष्प पत्र रुईचे
    तेल अर्पण करावे ||४८||

    प्रत्येक शनिवारीं
    जावे प्रभूचे मंदीरी
    जमल्यास रोज करी
    दर्शन मारुतीचे ||४९||

    जेवढी कराल प्रभूभक्ती
    मिळेल बुद्धी नि शक्ती
    यश तुम्हां प्राप्त होती
    मारुतीच्या आशिर्वादें ||५०||

    || शुभं भवतु ||

    डॉ. भगवान नागापूरकर
    ६- ०३११८३

      January 5, 2018


  • जाहीरात

    बंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारे महत्वाचे भाग बनवणारी ही कंपनी होती. या कंपनीची उत्पादने वापरल्याशिवाय डिझेल आणि पेट्रोल इंजिनांचे प्रॉडक्शन करणे शक्यच नव्हते. त्यामूळे भारतातले सगळे इंजीन मॅन्युफॅक्चरर्स या कंपनीचे ओ.इ. कस्टमर होते. या मध्ये ऍटोमोबाईल सेक्टरमधील कंपन्या मोठ्या प्रमाणावर होत्या. या प्रकारची उत्पादने बनवणारी ही भारतातील एकमेव कंपनी असल्यामूळे या कंपनीची जवळ जवळ मोनॉपली होती. या कंपनीला स्पर्धक होते. नाही असे नाही. पण ते फारच किरकोळ स्वरुपातले होते. कंपनीचे बंगलोर आणि नाशीक या दोन ठिकाणी कारखाने होते. दोन्ही कारखाने अत्याधुनीक होते. कंपनीची प्रॉडक्ट्स नुसतीच हाय टेक नव्हती तर हाय प्रिसिजन पण होती. कंपनीची जी उत्पादने इंजीनवर बसवण्यात येत त्यांना पण सर्वीस लागे. या साठी कंनीनीने भारतात 100 डिलर्स आणि सर्वीस स्टेशन्सचे जाळे उभे केले होते. तसेच या प्रकारची सर्वीस देणारी अनेक खासगी सर्वीस स्टेशन्स पण होती. यांना कंनीचे स्पेअर पार्ट मोठ्या प्रमाणावर लागत. त्यामूळे कंपनीचा स्पेअर पार्टचा धंदा पण मोठ्या प्रमाणावर होता. जसजसे इंजिनांचे आणि वाहनांचे उत्पादन वाढत होते तसतसे कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढतच चालली होती. अनेक वेळेला कंपनीच्या मालाचे शॉर्टेज असायचे. थोडक्यात कंपनी जे बनवत होती ते आपोआप विकले जात होते. ते सुद्धा कंपनीला हव्या असलेल्या किंमतीमध्ये विकले जात होते. कंपनिची 4 झोनल आणि 8 एरिया ऑफिसेस होती. यांच्यातर्फे कंपनीचे व्यवहार उत्तम चालू होते. अशी ही परिस्थिती अनेक वर्षे होती. मग कंपनीला जाहीरातबाजी करण्याची गरजच काय?

    पण 1980 च्या सुमारास परिस्थिती बदलली! कंपनीच्या बंगलोरच्या कारखान्यात कामगारांचा संप झाला. हा संप दिर्घकाळ, म्हणजे जवळ जवळ 2 महीने टिकला. या संपामूळे कंपनीचे प्रॉडक्शन बोंबलले. याचा मोठा फटका कंपनीच्या ग्राहकांना बसू लागला. ऍटोमोबाईल सेक्टरला याचा सर्वात मोठा फटका बसला. ट्रक, बसेच, कार्स आणि टू व्हिलर गाड्यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला आणि गाड्यांचे उत्पादन गडगडले. त्याचप्रमाणे ज्या गाड्या रस्त्यावर धावत होत्या त्यांच्या सर्व्हिसींगला कंपनीचे पार्ट मिळेनासे झाल्याने या गाड्या पण बंद पडू लागल्या. याचा मोठा फटका रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला बसला. थोडक्यात देशाच्या इकॉनॉमिलाच याचा मोठा फटका बसु लागला. अगदी लोकभेमध्ये चर्चा होण्यापर्यंत हे प्रकरण ताणले गेले. संप मिटवण्याचे कंपनीचे हर तर्हेलचे प्रयत्न चालूच होते पण त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. संपाच्या या काळात कंनीचे जे ओ. ई. कस्टमर्स होते त्यांचा कंपनीवरचा विश्वास कमी होऊ लागला आणि त्यांनी पर्यायी व्यवस्था शोधायचा मार्ग स्विकारायला सुरवात केली. काही जणांनी ही उत्पादने आयात करायला सुरवात केली. कंपनीचे जे किरकोळ स्पर्धक होते त्यांचे चांगलेच फावले आणि त्यांच्या उत्पादनांची हातोहात विक्री होऊ लागली. कंपनीचे नकली किंवा डुप्लिकेट पार्ट बनवणार्यांानी वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायला सुरवात केली. असे अनेक नकली मालाचे उत्पादक दिल्लीला होते. पण याहीपेक्षा अजून एक मोठा ‘थ्रेट’ कंपनीसाठी निर्माण झाला. भारतातील एका प्रसिद्ध उद्योग समुहाने यात उडी घेतली. या कंपनीसारखीच उत्पादने बनवणारा कारखाना सुरू केला. जोरदार मार्केटिंगच्या जोरावर कंपनीचे अनेक ग्राहक आपल्याकडे खेचून घेतले आणि कंपनीपुढे मोठे आव्हान उभे केले. कंपनीच्या मार्केट शेअरवर याचा परिणाम होऊन कंपनीचा मार्केट शेअर हळू हळू घसरू लागला.

    दोन महिन्यांच्या अथक परिश्रामाने हा संप एकदाचा मिटला आणि कंपनीचे उत्पादन परत पूर्वीसारखे सुरु झाले. या काळात कंपनीचे जे आर्थिक नुकसान झाले होते त्या पलीकडे जाऊन कंपनीसाठी तीन आव्हाने निर्माण झाली होती. पहीले आव्हान म्हणजे कंपनीच्या कामगारांच्या मनात कंपनी विषयी जिव्हाळा निर्माण करणे, दुसरे आव्हान कंपनीच्या ओ. ई. कस्टमर्सच्या मनात कंपनीविषयीचा विश्वास परत जागृत करणे आणि तिसरे आव्हान म्हणजे बाजारातील कंपनीची घसरलेली पत आणि प्रतिष्ठा परत मिळवणे.

    मी स्पेअर पार्ट मार्केटिंगमध्ये काम करत असल्यामूळे माझा संबंध तिसर्यार आव्हानाशी आला. मार्केटमधील घसरलेली कंपनीची पत आणि प्रतिष्ठा परत कशी मिळवायची या वर चर्चा सुरू झाली. अनेक उपायांचा विचार करण्यात आला. कंपनीचा नवीन आलेला कॉम्पिटिटर दिवसेंदीवस शिरजोर बनत चालला होता. त्याला आवर घालण्यासाठी मार्केटमधील कंपनीची इमेज शक्य तेवढ्या लवकर सुधारणे आवश्यक होते. अनेक उपायांचा विचार केल्यावर कंपनीने वर्तमानपत्रांतील जाहीरातींच्या माध्यमातून कंपनीची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. जाहीराती मुख्यतः दोन प्रकारच्या असाता. एक जाहीरात ही उत्पादनांविषयी किंवा वस्तुंविषयी असते. त्याला ‘प्रॉडक्ट ऍड’ म्हणतात. तर दुसरी जाहीरात ही कंपनीविषयी असते. त्याला ‘कॉर्पोरेट ऍड’ असे म्हणतात. कंपनीने प्रॉडक्ट ऍड आणि कॉर्पोरेट ऍड यांचे मिश्रण करून जाहीराती टाकायचे ठरवले. अशा प्रकारच्या जाहीराती त्या वेळी कोणी टाकत नव्हते, त्या मूळे हा एक नवीन प्रयोगच होता.

    अशा प्रकारच्या ‘ऍड कॅम्पेन’ साठी सक्षम ऍड एजन्सी असावी असे कंपनीला वाटले. त्यासाठी कंपनीने भारतातील त्या वेळच्या चार प्रमुख ऍड एजन्सिजना प्रेझेन्टेशनसाठी बोलावले. ऍड एजन्सीचे प्रेझेन्टेशन हा काय प्रकार असतो याचा मला अनुभव घ्यायची संधी मिळाली. या प्रेझेन्टेशन मधून भारातततील एक प्रसिद्ध आणि आघाडीची ऍड एजन्सी निवडली गेली. यामूळे ऍड एजेन्सीबरोबर काम करण्याचा भरपूर अनुभव मला मिळणार होता.

    त्यानंतर मग प्रत्यक्ष जाहीरातीवर काम सुरू झाले. आधी जाहीरातीचा आकार काय असावा यावर चर्चा सुरू झाली. कंपनीच्या दृष्टीने या जाहीराती महत्वाच्या असल्यामूळे लोकांचे लक्ष लगेच त्याकडे जावे यासाठी काय काय करता येईल यावर विचार विनिमय सुरू झाला. जाहीरातींचा आकार हा ‘कॉलम सेंटिमीटर’ तसेच ‘फुल पेज, हाफ पेज, क्वार्टर पेज’ या भाषेत ठरतो. क्वार्टर पेज (म्हणजे वर्तमानपत्राचे एक चतुर्थौंश पान) हा जाहीरतीचा आकार ठरला. क्वार्टर पेज आकाराचीच पण दोन कॉलम रुंदी असलेली उंच कॉलमसारखी जाहीरात अधीक आकर्षक होईल असे ऍड एजन्सीचे म्हणणे पडले म्हणून तो साईज फायनलाइज करण्यात आला. वर्तमानपत्राच्या कुठल्या पानावर जाहीरात टाकल्याने ती लोकांचे लक्ष वेधून घेते यावर पण बरीच चर्चा झाली. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची जाहीरात सर्वात महाग असते, जस जसे आतल्या पानांकडे जाल तस तसे जाहीरातींचे दर कमी कमी होत जातात असे कळले. दुसर्याआ किंवा तिसर्यात पानावर टाकलेली जाहीरात लवकर लक्ष वेधुन घेते असे एका सर्व्हेमधील पाहणीत आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे वर्तमान पत्राच्या दुसर्याम पानावर जाहीराती टाकायचे ठरले. एकुण तीन जाहीराती टाकायच्या, त्यातील दोन जाहीराती प्रॉडक्ट संबंधी (एक डिझेल इंजिन वाल्यांसाठी तर एक पेट्रोल इंजिन वाल्यांसाठी) तर एक जाहीरात कॉर्पोरेट प्रकारची टाकायचे ठरले.

    जाहीरातीचा साइझ ठरला. कुठल्या पानावर जाहीरात टाकायची हे ठरले. आता महत्वाचा भाग होता तो म्हणजे जाहीरातीचा मजकुर ठरवणे, याला कॉपी असे म्हणतात. कारण जाहीरातीमध्ये ‘कॉपी’ ला फार महत्व असते. आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे आधी ठरवावे लागते मगच कॉपी तयार होते. यावर बरीच चर्चा चर्विटचरण झाले. ऍड एजन्सीने कॉपीची एकुण 32 सॅम्पल्स सादर केली. अर्थातच मूळ कॉपी इंग्लीशमध्ये होती. यावर बरीच चर्चा चर्वीटचरण होऊन तीन कॉपीज फायनलाइज करण्यात आल्या. आधी फक्त इंग्रजी भाषेत आणि भारतातील प्रमुख इंग्रजी वर्तमान पत्रातून जाहीराती देण्याचे ठरले. मग हिन्दी आणि महत्वाच्या प्रादेशीक भाषांमधुन पण जाहीराती देणे आवश्यक आहे असे ठरले. त्यामूळे इंग्रजीबरोबर हिन्दी, तामीळ, तेलगु, मल्याळम, कानडी, मराठी, गुजराती, गुरुमुखी, बंगाली, ओरीया आणि आसामी भाषांमधून पण जाहीराती टाकायचे ठरले. यात पुढे उर्दु भाषा पण ऍड झाली. ज्या इंग्लीश कॉपी अप्रुव्ह केल्या होत्या त्याचीच निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्याचे ठरले. यासाठी ऍड एजन्सीने मुंबईतील एका प्रसिद्ध लॅन्वेज ब्युरोची नेमणूक केली. भाषांतरे योग्य झाली आहेत की नाही हे तपासण्यासाठी कंपनीने वेगळा मार्ग निवडला. कंपनीतील ज्या कर्मचार्यां ची मात्तृभाषा कानडी किंवा बंगाली आहे त्यांचेकडे ती भाषांतरे तपासण्यासाठी देण्यात आली. त्यावेळी बंगलोरला मराठी आणि हिन्दी भाषा येणारा मी एकमेव माणुस होतो. त्यामूळे हिन्दी आणि मराठी भाषांतरे माझ्याकडे आली. मराठी भाषांतराची तर बोंबच होती. त्यात बर्यारच सुधारणा कराव्या लागल्या. हिन्दी भाषांतर मात्र अप्रतीम झाले होते. नंतर मला कळले की हे भाषांतर गुलशन नंदा या हिन्दीमधील ज्येष्ट कादंबरीकाराने केले होते. गुलशन नंदा यांच्या हिन्दी कादंबर्याध त्या वेळी फार लोकप्रिय होत्या. त्यांच्या अनेक कादंबर्यांतवर चित्रपट पण निघाले. त्यावेळी त्यांच्या कादंबरीवर आधारलेला राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा ‘कटी पतंग’ हा सिनेमा तुफान गाजला होता. यासाठी गुलशनबाबूंनी भरपूर फी उकळली पण भाषांतर मात्र अप्रतीम करून दिले. उर्दु भाषांतर सुद्धा हिंन्दी सिनेजगततील एका प्रसिद्ध कवीने करुन दिले होते.

    कॉपी ठरल्यानंतर महत्वाचा भाग असतो तो म्हणजे लेआऊट. थोडक्यात जाहीरात कशी दिसेल याची मांडणी. आधी जाहीरातीमध्ये कंपनीची प्रॉडक्ट दाखवायची नाहीत, फक्त लोगो दाखवायचा असे ठरले. पण मग नंतर कंपनीच्या प्रॉडक्ट ऍडमध्ये डिझेल इंजीन आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारी प्रॉडक्स दाखवावी असे ठरले. आधी जाहीरातीमध्ये माणसाचे चित्र नव्हते. पण जाहीरातीला काहीतरी मानवी चेहेरा असावा असे ठरले. यासाठी आधी काही मॉडेल्स आणि चित्रपट तारकांचा विचार झाला. पण मग कंपनीतीलच एखादा कर्मचारी असावा असे ठरले. उत्तम पर्सनॅलिटी असलेला एक कर्मचारी कंपनीच्या मुंबई ऑफीसमध्ये होताच. त्याची मॉडेल म्हणून निवड झाली. लेआउटची आर्ट वर्क येउ लागली आणि लेआउट पण फायनलाइज होऊ लागले.

    कोणत्या वर्तमानपत्रात जाहीराती टाकायच्या आणि त्यांचे टाईमटेबल काय असावे यावर चर्चा सुरू झाली. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी जाहीरातींचे दर जास्त असतात. त्यामूळे रविवारच्या सुट्टीच्या अलिकडचा दिवस म्हणजे शनिवार, नंतरचा दिवस म्हणजे सोमवार आणि आठवड्याचा मधला दिवस म्हणून गुरुवार हे दिवस ठरले. दोन जाहीरातींमध्ये 15 दिवसांचे अंतर असावे असे ठरले. टाईम्स ऑफ इंडीया, इंडियन एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाईम्स, हिन्दू, अमृत बझार पत्रीका या इंग्रजीमधील आघाडीच्या वृत्तपत्रांसह एकूण 54 वर्तमानपत्रे निवडण्यात आली. यांमध्ये मराठीतील सकाळ, लोकसत्ता, तरुण भारत आणि पुढारी ही प्रमुख वर्तमानपत्रे होती. (त्या वेळी महाराष्ट्र टाईम्स बहुतकरून नसावा) या वर्तमानपत्रात जाहीराती कोणकोणत्या तरखांना प्रसिद्ध होणार हे वेळापत्रक त्याचप्रमाणे जाहीरात प्रसिद्ध झाल्यावर त्या वर्तमानप्तराचे तीन अंक बंगलोरला पाठवायचे ऍड एजेन्सीने मान्य केले.

    अशा रितीने ऍड कॅम्पेन दणक्यात सुरू झाले. ठरल्याप्रमाणे कंपनीच्या जाहीराती छापून येऊ लागल्या. जाहीराती छापून आलेल्या अंकांचे गठ्ठे च्या गठ्ठे बंगलोरला येऊ लागले. पेपर मध्ये छापून आलेल्या जाहीराती बघून सगळ्यांचे डोळे सुखावू लागले. फिल्डमधून पण जाहिरातींना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ऍड कॅम्पेन सक्सेसफुल झाला आहे असा फिडबॅक येऊ लागला. कंपनीने जाहीरातींसाठी जी मेहेनत घेतली होती आणि भरपूर पैसे खर्च केले होते (त्या वेळी या सर्व कँमेनचा खर्च 17 लाख रुपयांच्या घरात गेला होता. त्यावेळचे 17 लाख म्हणजे आत्ताचे 2 कोटी 93 लाख) ते सत्कारणी लागले असे वाटत होते.

    या जाहीरातबाजीच्या काळात एक गंमतीदार घटना घडली. मी विमानाने बंगलोरहून दिल्लीला निघालो होतो. मला विमानात त्या दिवसाचा टाईम्स ऑफ इंडियाचा अंक मिळाला होता. तो अंक चाळत असताना त्या अंकाच्या दुसर्यां पानावर छापून आलेल्या आमच्या कंपनीच्या जाहीरातीकडे माझे लक्ष गेले. थोड्याच वेळात सुटा बुटातले एक गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी पण टाईम्सचा अंक चाळायला सुरवात केली. माझ्या कंपनीच्या जाहीरातीवरून त्यांनी दोन तीन वेळा तरी नजर फिरवली असेल. थोड्या वेळाने मला त्यांनी त्यांचा परीचय करू दिला. भारतातील एका प्रसिद्ध वाहन निर्मिती करणार्या् कंपनीचे ते उच्च अधीकारी असल्याचे मला कळले. त्यांनी मला त्यांचे कार्ड पण दिले ते मी शर्टाच्या खिशात ठेवले. मी मग माझा परिचय करून दिला. माझ्या कंपनीचे नाव ऐकताच ते लगेच म्हणाले, ‘तुमच्या कंपनीबद्धल मी नुकतेच काहीतरी वाचले आहे!’
    ‘काय वाचलेत?’ मी कुतुहलाने विचारले.
    ‘नक्की आठवत नाही पण काहीतरी वाचले एवढे मात्र खरे. कदाचीत एखादी बातमी असेल’ ते म्हणाले.
    ‘साधारणपणे केव्हा वाचलेत?’ मी विचारले.
    ‘नक्की आठवत नाही! झाले असतील दोन तीन दिवस!’ ते म्हणाले.
    मला जरा आश्चर्यच वाटले. मी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड नीट बघीतले आणि उडालोच. ते त्यांच्या कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर होते आणि त्यांना काही वेळापूर्वी बघीतलेली आमच्या कंपनीची जाहीरात आठवत नव्हती. तर इतरांची काय कथा?
    मी त्यांना जेव्हा सांगीतले की त्यांनी आमच्या कंपनीविषयी थोड्या वेळापूर्वी या विमानातच वाचले आहे आणि जेव्हा मी त्यांना टाईम्समधली ऍड दाखवली तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले, ‘ आम्ही सुद्धा पूर्वी अशा जाहीराती देत होतो. पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आल्यावर जाहीराती देणे बंद केले.’ मला काही त्यांचे म्हणणे फारसे पटले नाही तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘टाईम्समध्ये तुमच्या कंपनीव्यतिरिक्त इतर अनेक जाहीराती आहेत. यातील किती जाहीराती तुमच्या लक्षात आहेत?’ खरोखरच एकही जाहिरात माझ्या लक्षात नव्हती. ‘आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी जाहीराती टाकत असतो आणि ऍड एजन्सीजना धनवान करत असतो. कारण कुठलिही ऍड एजन्सी घ्या. ती न्युज पेपर ऍड कॅम्पेनच सजेस्ट करत असते. कारण यातच त्यांचा फायदा असतो.’ ते म्हणाले.
    ‘म्हणजे तुम्ही ऍड टाकत नाही?’ मी वाचारले.
    ‘आम्ही आता पॅटर्न बदलला आहे. आम्ही लोकल डिलरला ऍड टाकायला सांगतो आणि त्याचा खर्च आम्ही उचलतो. यामूळे एकतर ऍड परिणामकारक होतात आणि खर्च पण वाचतो!’ ते म्हणाले.

    बंगलोरच्या आमच्या मिटींगमध्ये मी हा किस्सा सांगीतला. पुढे कंपनीने पण तो ऍड कॉम्पेन आवरता घेतला. त्यानंतर या कंपनीने कधी पेपरमध्ये ऍड टाकल्याचे मी तरी पाहीले नाही.

    एकुण जाहीरातबाजी करण्यासाठी किती मेहेनत घ्यावी लागते याची थोडी तरी कल्पना यावी यासाठी मी हा प्रपंच मांडला. तसेच हे एक खर्चीक माध्यम आहे. असे असुनही आज वर्तमानपत्रे, मासीके, टी.व्ही., रेडियो यांच्या माध्यमातून आपल्यावर जाहीरातींचा पाऊस पडत असतो. काही वर्तमानपत्रे तर केवळ जाहीरातींवरच चालतात असे मला आढळून आले आहे. पुण्याचा ‘सकाळ’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. मी हल्ली पुण्याच्या सकाळचा उल्लेख ‘सकाळ म्हणजे जाहीरतींचा सुकाळ’ असाच करत असतो. अनेक टीव्ही चॅनल तर निव्वळ जाहीरातीवर चालतात. अनेक कंपन्या या जाहीरातींसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असतात पण याचा किती उपयोग होतो? एकतर पेपरमध्ये छापून आलेल्या जाहीराती लक्षात रहात नाहीत. टी.व्ही. वरच्या जाहीरातीच्यावेळी अनेक जण टी.व्ही. म्युट करतात. तीच गोष्ट रेडियोवरच्या जाहीरातींची आहे. आता तर जाहीरातींचे तंत्र बदलत चालले आहे. इंटरनेट जाहीरातींचे युग सुरू झाले आहे. यांमध्ये केवळ जाहीरात पाहिल्याबद्दल पैसे मिळण्याची सोय आहे. अमेरिकेतील वर्तमान पत्रांमध्ये तसेच टी. व्ही. वर जाहीराती फार कमी असतात. तेथील वर्तमानपत्रे जाहीरातींची वेगळी सप्लिमेन्ट काढतात जे लोक जपून ठेवतात. टी. व्ही. वर सुद्धा जाहीरातींचा म्हणून वेगळा प्रोग्रॅम असतो. आपल्याकडे अजून हा प्रकार सुरू झाला नाही. काही दिवसांनी या पेपर आणि टी. व्ही. वाल्यांना जाहीराती मिळणे बंद होईल. मग हे लोक काय करतील?

    असो! जाहीरातींना किती महत्व द्यायचे. जाहीरातींच्या या जंगलात स्वतःला किती बुडवायचे आणि आपले आयुष्य किती जाहीरातमय करून टाकायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

    तुम्हाला काय वाटते?
    उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631

    28 May 2017

      May 28, 2017