वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
चांगल्या तऱ्हेने जीवन जगण्यासाठी आणि दीर्घायुषी होण्यासाठी आपले अन्नही शास्त्रात सांगितले त्याप्रमाणे असले पाहीजे. मात्र आपण मराठी माणसांनी ज्वारी खाणे बंद केल्यानेच बहुतांश आजार बळावल्याचे स्पष्ट मत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी व्यक्त केले. सुभेदार वाडा कट्टा आणि कल्याण रोटरी क्लबतर्फे कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात ‘नियोजनबद्ध आहार उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर ते बोलत होते.
आपल्या दैनंदिन आहारात ज्वारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पाचक रस ज्वारीत ठासून भरलेला आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ज्वारीच्या पदार्थाने करण्याबरोबरच जेवणातही आपण तिचा वापर केल्यास लठ्ठपणा,मधुमेह,ख हृदयरोग यासारख्या अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो, असे खडीवाले यांनी सांगितले. तर हल्लीच्या काळात अपचनाची समस्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली असून रोजच्या जेवणात पुदिना, आले आणि लसूण यांपासून बनविलेली चटणी खाल्ल्यास तुम्ही खाल्लेला दगडही (पचण्यास जड अन्न) पचवण्याची ताकद शरिरात तयार होते.
ज्याला 100 वर्षे जगायचे असल्यास लसूणासारखा छोटासा पदार्थ नाही. रोजच्या आहारात लसणाच्या किमान 3 ते 4 पाकळ्या खाल्ल्यास मधुमेह, हृदयरोग यांसारखे आजार जवळ फिरकतही नाहीत. आपल्या शारीरिक विकारांत वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर किमान अर्धा तास चालल्यास डोक्यातील आणि पोटातील वायू बाहेर निघून चांगली झोप लागते.
तर आपल्याकडे उपवास करणाऱ्या व्यक्तींना शेंगदाणे, साबुदाणे, बटाटे हे परदेशातून आलेले पदार्थ चालतात. मात्र उपवासाला बटाट्याऐवजी शिंगाडे,रताळ्याचा वापर करणे केव्हाही शरीरासाठी चांगलेच ठरते. ज्यांचे पोट वाढलेले आहे, त्यांनी चणाडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा अधिकाधिक वापर करावा. तसेच पश्चिमोतानासन आणि सिटअप्स (डोके आपल्या गुडघ्याला लावणे) केल्याने पोट कमी होते. पोट साफ नसल्याची तक्रार असणाऱ्यांनी दिवसातून किमान 20 ते 25 बिया असणाऱ्या काळ्या मनुका खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होण्याबरोबरच चांगले रक्त, सर्दी, खोकला, पडसे, दमा यांना आळा बसतो, असे ते म्हणाले.
तसेच पालेभाज्या या जमिनीपासून कमी उंचीवर असल्याने इतर भाज्यांच्या तुलनेत त्याला माती लागण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या खाण्यापूर्वी गरम पाण्यातून धुवून घेतल्यास त्याला लागलेले मातीचे कण निघून जाण्यास मदत होते.
तर मीठ खाल्ल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण हे साखरेमूळे होणाऱ्या अजारांपेक्षा अधिक भयानक असल्याचे सांगत शक्यतो मिठाचा वापर टाळल्यास अनेक विकार आपण टाळू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही वैद्य खडीवाले यांनी सखोल उत्तरे दिली.
October 15, 2016
एका वेगळ्याच.. हटके पद्धतीने बनवलेला.. हा हळदीचा गणपती….
September 3, 2016
गणिताचा प्रश्न पाहिल्यावर थिजल्यासारखे होते. काय करू काही सुचतच नाही!!! हा माझाच नव्हे,अनेकांचा अनुभव आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरू कुठे करावं हा प्रश्न असतो, तर तितक्याच विद्यार्थ्यांना समीकरण मांडणे अवघड जाते. म्हणून स्ट्रेटजी उपयोगी ठरते. त्यावरचा उपाय – ‘स्ट्रॅटजि’ – ‘रणनीती’. पहिले काय करावं हे सुचावं लागत नाही, माहित असते आणि ते केले के कोंडी फुटते … पुढची वाट दिसू लागते …
April 1, 2021
आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ?
दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे.
काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण घ्यावे. म्हणजे पचनाला पुरेसा वेळ मिळतो.
आधी पोटोबा मग विठोबा
आधी स्वार्थ मग परमार्थ
या म्हणी केव्हा तयार झाल्या असतील ? कोणत्या परिस्थितीमधे तयार झाल्या असतील, त्याचा परत एकदा विचार करायला हवा. एका पिढीपूर्वीची मुलाखत घेतली तर याचा उलगडा होत जाईल.
ती माणसे सांगतात, आमच्यावेळी सूर्यास्ताचे अग्निहोत्र झाले की लगेचच दिवसाउजेडी एकाने देवाकडे, अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा, ( घरात येणारी लक्ष्मी काळोखातून कशी येणार ? म्हणून अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा. ) तर दुसरीने स्वयंपाकघरात दिवा लावून पाटपाणी घ्यायचे. आधी स-अवकाश भोजन करून नंतर सावकाऽश भजन करीत बसायचे...... मग परमार्थ !
तेव्हा सारवलेल्या जमिनीवर ताट पाट मांडून खाली बसून, मांडी घालून पंगत वाढून जेवायचे. घरात कुटुंब नियोजन नव्हते, गोकुळ होते. दहा पंधरा माणसे एकमेकांशी बोलायची, शुभंकरोती एका सुरात म्हटली जायची,पाढे पावकी निमकी, सर्व श्लोक स्तोत्रे यांची उजळणी व्हायची.
चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या घरातील परिस्थिती आठवली तर टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे रेडीओ आणि सिनेमा थिएटर. थिएटरमधे जाऊन हौस म्हणून सिनेमा पहाणे त्या तिकिटासाठी तब्बल दोन ते अडीज रूपये खर्च करणेदेखील परवडत नव्हतं. एवढा श्रीमंत काळ आपण अनुभवला आहे.
त्याआधीची फक्त वीसेक वर्षे आता आठवून पहा. म्हणजे आपल्या बाबांच्या लहानपणीचा काळ सुखाचा......
रेडिओ ही अत्यंत प्रतिष्ठेची चीज होती, गावातील एखाद्या घरीच तो असायचा, बिनाका गीतमाला ऐकायला दर्दी गर्दी जमायची, तेव्हाच्या काळातील जेवणाच्या वेळा आठवून बघा, त्या काळातील ज्येष्ठ माणसांना आजही विचारून पहा. तेपण सांगतील, " आमच्या तारूण्याच्या सुवर्ण युगात आमची जेवणे दिवसाउजेडी संपायची. लाईटपण नव्हता तेव्हा. रात्री साडेआठ नऊ वाजता झोपी जात होतो."
विज्ञानयुग आले, विद्युतीकरण झाले, प्रगती झाली, विकास झाला. कोपऱ्यात टीव्ही आला. करमणुकीचे साधन बदलले, दूरदर्शनवर बातम्या देणारी माणसे, त्यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या माशा देखील पहाता यायला लागल्या. मालिका पहायला वेळ कमी पडू लागला. त्याच दरम्यान स्वयंपाकघरात कुकर आला, मिक्सरपण आला. मनोरंजन ही गरज बनली. खाना खान्यातला (म्हणजे स्वयंपाकघरातला) वेळ दिवाणखान्यात जाऊ लागला.
गोजिरवाण्या घरात लाजीरवाण्या सिरीयल सुरू झाल्या. बातम्यांपेक्षा जाहीरातीमधे जास्ती वेळ जाऊ लागला. आणि हळुहळू सगळंच बदललं. सुखाच्या कक्षा वाढत गेल्या आणि.....
विठोबा मागं गेला आणि पोटोबा पुढे आला........
कसं बदलत गेलं? कोण बदलत गेलं ? कोणी बदललं हे सगळं? कधी कळलंच नाही.
मुठीत घट्ट धरून ठेवलेल्या वाळूसारखं दोन्ही बाजूने ते बाजूला कधी पडत गेलं लक्षातही आलं नाही. आरोग्याची मूठ कधी रिकामी झाली, ते कधी समजलं देखील नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.03.2017
March 2, 2017
१८व्या शतकातील मराठे दिल्लीस जाऊन पोचले परंतु दिल्लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्टीचा विचार करतांना दिल्लीला धडक देणार्या व्यक्ती कोण होत्या, हे पुन्हा एकदा विचारात घेणे आवश्यक आहे. आधी हा उल्लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्वतः राजा नव्हता, ते कुणा दुसर्याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना नव्हते.
March 15, 2019

इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं!
December 13, 2022
तारुण्यामध्ये स्वतःच्या क्षमतांनीच आपण सर्व काही करतो असे वाटत असणाऱ्या जीवाला जसे जसे वृद्धत्व प्राप्त होत जाते तस तशी त्याची ही क्षमता कमी होत जाते. मग त्याच्या भरवशावर असलेला ताठा देखील नष्ट होतो. अशावेळी त्याला भगवंता शिवाय कशाचाही आधार नसतो. त्याच्या या निराधार अवस्थेचा विचार व्यक्त करताना आचार्य श्री म्हणतात…
October 12, 2020
मला चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत जात होते. घर शाळेच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचे चित्रकलेचे सर मला सुस्वागतमची रांगोळी काढायला बोलवत असत. त्यांचा मला जास्त सहवास मिळायचा व ते मला चित्रकलेबद्दल बरेच सांगायचे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं दरवर्षी एक मासिक काढलं जायचं, त्याचं मुखपृष्ठ नेहमी मीच काढत असे.
November 29, 2024
एक वर्ष,सव्वा वर्षाचे मूल...मुंबई शहरात एकटं फिरतय..गर्दीतून..गाड्यांच्या मधून..रेल्वे ट्रॕक वरुन...मधेच कुठल्यातरी बाकावर झोपतय...भूक लागते म्हणून एक पडलेली गोळी खातो तर ती झोपेची गोळी असल्याने गाढ झोपी जातय..पुन्हा उठतय...आपल्या आईला शोधत फिरतय…
कुणी तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा अर्धाअधीक भाग असा एखाद्या एक वर्षाच्या मुलावर चित्रीत झालाय हे सांगितले तर पटेल का?
माणसाचे आयुष्य अकल्पनीय आहे. 'Truth is stranger than fiction' असे मार्क ट्वेनचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. सिनेमाच्या पडद्यावर ज्या गोष्टी आपण काल्पनिक म्हणून पाहतो त्यात माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचेच प्रतिबिंब असते का, हा एक जुना वादाचा विषय. सिनेमॕटीक इलेमेंट म्हणून काही वेळी कल्पनेची फोडणी द्यावी लागते. तरीही सिनेमा पाहून बाहेर पडणा-या प्रेक्षकांना जे आपण पाहिलं तसे खरेच घडले असणार हे वाटत रहावे, त्यांना त्या विचाराने अस्वस्थ करावे, अशी ताकत काहीच सिनेमांमधे असते. 'आखरी खत' हा त्यापैकी एक.
माझ्यावर 'आखरी खत' या चित्रपटाची एक अजब मोहिनी आहे. याचे कारण जेंव्हा केबल टिव्हीने नुकतेच डोके बाहेर काढले होते तेंव्हा त्यावर येणारी काही मोजक्या चॕनेल्समधे एक होते ATN. या चॕनेलवर दुपारी हा सिनेमा नियमीत लागायचा. मी तेंव्हा काॕलेजमधे होतो. काॕलेजला सुट्टी असायची तेंव्हा केबलवर 'पडीक' असायचो. त्यामुळे चॕनेल बदलता बदलता या चॕनेलवर असेन व हा सिनेमा लागलेला असेल तर बोटं आपसूक स्थिरावायची. मग तो सिनेमा तिथून पुढे पाहिला जायचा.
आखरी खत हा चेतन आनंद यांचा चित्रपट. हकीकत, हिर रांझा यासारखे दर्जेदार सिनेमे देणारा हा आवलिया एक दिवस अचानक साधारण सव्वा वर्षाच्या एका मुलाला मुंबईत फिरायला सोडतो व सिनेमॕटोग्राफर जाल मिस्त्री यांना घेउन त्याच्या मागे त्याचे शुटींग करत फिरतोय अशी बातमी बाॕलीवूड मधे पसरली व काही जणांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. राजेश खन्ना नावाचा एक नवा कलाकार व इंद्राणी मुखर्जी सारखी तितकी प्रसिद्ध नसलेल्या आभिनेत्री घेउन चेतन आनंद काय हा वेडेपणा करताहेत असेही लोक म्हणू लागले होते. पण अर्थातच चेतन आनंद यांना आपण काय करतोय व आपल्याला काय बनवायचय याची पूर्ण जाणीव होती.
कथा तशी नेहमीच्याच धाटणीची.. एक तरुण शिल्पकार गोवींद काश्मिरमधे आलेला आहे. ज्या गावात तो आहे तिथल्या एका साध्याभोळ्या मुलीवर लज्जोवर त्याचा जीव जडतो. तिलाही तो पसंत आहे. दोघे गुपचूप मंदिरात लग्न करतात. काही दिवसांनी तो शहरात परत येतो, त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करायला. नंतर तिला कळते की तिला दिवस गेले आहेत. तिची सावत्र आई लज्जोला विकून टाकते. लज्जो तिथून कशीबशी सुटते. एका मुलाला जन्म देते. आपल्या मुलाला कष्ट करुन सांभाळू लागते. पण तिची तब्येत खूप खराब होते आणि आपला अंत जवळ आलाय हे पाहून आपल्या मुलाला, बंटूला, घेउन शहरात येते व गोवींदला शोधत फिरु लागते. ब-याच प्रयत्नांनी गोवींदचा पत्ता मिळतो पण गोवींद तिच्यावर शंका घेतो व तिला स्विकारत नाही. म्हणून ती त्याला एक पत्र लिहीते व जेंव्हा तो घरी नसतो त्यावेळी त्याच्या दाराशी सोडते..हेच ते 'आखरी खत'.
गोवींदला ते पत्र मिळते पण तोवर खूप उशीर झालेला असतो. लज्जो हे जग सोडून निघून गेलेली असते..त्याचे मूल शहरात हरवलेले असते. पश्चातापदग्ध गोवींद पोलीसांच्या मदतीने बंटूचा शोध घेउ लागतो. बंटू फिरत फिरत एका अनाथ आश्रमातल्या माणसाला सापडतो. तो त्याला घेउन येतो..खायला घालतो. रात्री आई स्वप्नात येते...तिच्या आठवणीत तो उठतो व त्या अनाथ आश्रमातून बाहेर पडतो. रात्रभर फिरत राहतो. त्याचा ट्रेस लागल्याने पोलीस व गोवींद शहरभर त्याला शोधत फिरत असतात. पहाटे पहाटे बंटू गोवींदच्या घराजवळ पोहोचतो. तिथे गोवींदने बनवलेला लज्जोचा पुतळा पाहतो..आईचा पुतळा बंटू ओळखतो व पुतळ्याला जाउन मिठी मारतो..तिचा पान्हा शोधू लागतो.
गोवींद दोन रात्र झोपलेला नसतो. तो व पोलीस परत येतात तेंव्हा बंटू त्यांना घरीच सापडतो..तो लज्जोच्या पुतळ्याला धरुन झोपी गेलेला असतो.
हा सिनेमा पाहताना तुम्हाला रडू आले नाही तर तुम्ही स्वतःला चेक करुन घेउ शकता. कारण कोणीही असो, डोळ्यात पाणी येणार नाही असे हा चित्रपट पाहताना होत नाही.
मुलांवर आलेले खूप चित्रपट आपण पाहिले आहेत. या चित्रपटातील मुले जराशी तरी कळत्या वयातील असतात. त्यांच्याकडून भूमीका करुन घेणं तसंही अवघडच असतं..इथे तर जेमतेम एक वर्षाचं मूल. मग चेतन आनंद या महाभागाने आख्खा चित्रपट (जवळ जवळ सत्तर टक्के भाग) त्याच्यावर कसा चित्रीत केला असेल? चेतन आनंद आणि जाल मिस्त्री या दोघांनाही यासाठी 'लवून कुर्नीसात'. त्याकाळी त्यांनी आउटडोअर चित्रीकरणासाठी (मुख्यतः बंटूच्या मागे मागे फिरताना) हँडहेल्ड कॕमेरा वापरला. चित्रपटात निओ-रिॲलिझम चा इफेक्ट आणण्यासाठी कदाचित हा चित्रपट कृष्णधवल बनला. कारण १९६६ साली रंगीत पडदा भारतात अवतरला होता.
चित्रपटातील गाणी एकदम उच्च दर्जाची. रफीनी गायलेले 'और कुछ देर न जा और कुछ देर ठहर' हे अतिशय तरल गीत खास खय्याम टच असलेलं. मन्ना डे यांनी म्हंटलेले एक पार्टी साँग 'ओह माय डार्लिंग' हे तितके प्रसिद्ध नाही पण छान आहे. असेच एक क्लब साँग भूपिंदर सिंग यांनी पडद्यामागे व पडद्यावर देखील गायलय..'रुत जवाँ..जवाँ..रात मेहेरबाँ..' खूप साॕफ्ट व छान लयीतलं हे गाणं तस खय्याम पठडीतलं नाही पण तरीही श्रवणीय.
पण या चित्रपटातील कळसाध्याय अर्थातच लता दिदींच्या आवाजातील दोन गाणी..
पहिलं अर्थात सदाबहार गीत 'बहारों..मेरा जीवन भी संवारो..कोई आयें कहींसे..यूं पूकारो..बहारो..' गोवींद भेटण्याआधी लज्जो तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला साद घालते तेंव्हाचं हे कमालीचे सुंदर गीत..माझ्या स्वतःच्या टाॕप टेन मधील एक.
दुसरं गाणं आहे एक अंगाई..'मेरे चंदा..मेरे नन्हे..तुझे अपने सिनेसे कैसे लगांउ..' लज्जो मृत्युनंतर बंटूच्या स्वप्नात येउन ही अंगाई गातेय..गोवींद रस्तो-रस्ती झोपलेल्या लोकांमधे त्याच्या मुलाला शोधतोय. बंटू एक चर्चच्या आवारात झोपलाय..सकाळ होताच तो पुन्हा उठून रस्त्यावरुन फिरायला लागलाय..अशी या गाण्याची पार्श्वभूमी. लताजींनी या गाण्यात प्राण ओतलाय..
कैफी आझमी व खय्याम ही बाप माणसं का होती हे तुम्हाला ही गाणी ऐकून पटतंच.
असो. चित्रपटाने रिलीजच्या वेळी फारशी कमाई केली नाही. राजेश खन्नाचा हा पहिलाच चित्रपट. पण त्याकाळी तो स्टार नव्हता. पण नंतर राजेश खन्ना सुपर स्टार झाला. त्यानंतर या चित्रपटाने रिपीट रिलीज मधे कमाई करीत खर्च वसूल केला.
चित्रपट विलक्षण होता..व त्याच्या आख्यायिका त्याहून विलक्षण.
मार्क ट्वेनचे वाक्य म्हणूनच इथे चपखल लागू होते..
Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.
कोण जाणे असे किती बंटू रस्त्यांवर आजही फिरत असतील..
-- सुनील गोबुरे.
सांगली.
July 9, 2022
भगवंताच्या चरणी विलीन होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. हे शास्त्राने सुस्पष्टरीत्या सांगितले आहे. त्यागाच्या या रचनेत शब्दच सर्वस्व असा आहे. यात प्रथम सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यानंतर स्व चा देखील त्याग करावा लागतो. त्याच वेळी परमात्म तत्त्वाची प्राप्ती होते. हीच प्रक्रिया उलगडून दाखवताना आचार्य श्री म्हणतात,
November 28, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti