बुधभूषणम्

हिंदुहृदय सम्राट छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अलौकिक गुणसंपन्न सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी रचलेला वैभव संपन्न संस्कृत ग्रंथ म्हणजे बुधभूषणम्. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही राजमुद्रा संस्कृत भाषेतच विराजित आहेत यातून त्यांचे संस्कृत प्रेम अधोरेखित होते.



छत्रपती श्री.संभाजी महाराज विरचित बुधभूषणम्

हिंदुहृदय सम्राट छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अलौकिक गुणसंपन्न सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी रचलेला वैभव संपन्न संस्कृत ग्रंथ म्हणजे बुधभूषणम्. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही राजमुद्रा संस्कृत भाषेतच विराजित आहेत यातून त्यांचे संस्कृत प्रेम अधोरेखित होते.

छत्रपती संभाजी महाराज तर संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य संपन्न अभ्यासक आणि रचनाकार आहेत. बुध म्हणजे विद्वान आणि भूषण म्हणजे अलंकार अर्थात विद्वानांना अलंकार वाटावा असा हा ग्रंथ.

तीन प्रकरणांमध्ये विभागलेल्या ८८३ श्लोकांचा हा ग्रंथ. पहिल्या अध्यायात काही उपविभाग केलेले आहेत. सर्वप्रथम देवता वंदन केलेले आहे. त्यामध्ये भगवान श्री गणेश, श्री शंकर , देवी पार्वती तथा श्रीकृष्णांना वंदन केले आहे.
दुसऱ्या उपविभागात स्वकुल आणि स्वकाव्याचे वर्णन केले आहे. त्यात त्यांनी आपले पिताश्री छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रत्यक्ष शिवावतार असल्याचे वर्णन केले आहे.

तिसऱ्या उपविभागात भवानी स्तुती पहावयास मिळते. चौथ्या प्राचीन नमस्कार नावाच्या विभागात देखील गणेश, देवी भवानी, श्रीशिव,श्रीकृष्ण यांचे वंदन केले असून पुढे त्यांनी आशीर्वाद दिले अशा अर्थाचे श्लोक आहेत. अशा स्वरूपात ६१ श्लोकात जणू काही प्रस्तावना केली आहे.

६२व्या श्लोकापासून १९४ श्लोकापर्यंत संस्कृत साहित्याचे वैशिष्ट्यपूर्ण भंडार असणाऱ्या अन्योक्तींचे वर्णन केले आहे.
तब्बल ६३० श्लोकांच्या दुसऱ्या अध्यायाला राजनीती असे नाव आहे. यामध्ये राजाची लक्षणे, राजाचे सहाय्यक ,अमात्य, राजपुत्राचे शिक्षण – कर्तव्य ,कोश निरूपण, दुर्ग निरूपण दुर्गसंपत्ती दुर्गाध्यक्ष गुप्तहेर, अधिकारी आणि सेवक वर्ग, मंत्री, राजाची कर्तव्य, राजा वरील संकटे, राजाची सामान्य कर्तव्य अशा अनेक विषयांवर अत्यंत मूलगामी चिंतन मांडलेले आहे.

तिसऱ्या प्रकीर्णनीती या प्रकरणात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या नीती मूल्यांचे निरूपण करण्यात आले आहे.

यामध्ये बुद्धीचे महत्त्व, यशस्वी होण्याचा मार्ग, स्वधर्म, मैत्री क्षमाशीलता, विनाशाचा मार्ग, विनय संपन्नता, त्याग अशा विविध विषयांवर सुभाषिते दिलेली आहेत. यात काही प्राचीन कवींच्या उदाहरणार्थ भर्तृहरींच्या नीती शतकातील अनेक श्लोकांना संकलित करण्यात आलेले आहे. अशा वेगवेगळ्या दृष्टीने विचार करता छत्रपती संभाजी महाराजांचा हा ग्रंथ म्हणजे संस्कृत साहित्याचे एक अनमोल रत्न आहे.

महेश मारुती पुंड
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
आचार्य पदवी संशोधन केंद्र संस्कृत विभाग
दि. २८. १२. २०२२

Author