कोथरूड येथील दृष्टिहीनांसाठी, सर्वसमावेशक निवासी’ शाळा एकदा तरी भेट द्यायला हवी अशीच आहे. गांधी भवन, कोथरूड येथे ही शाळा आहे. डोळे असले म्हणजेच यश गाठता येते असे नाही, हे येथील विद्यार्थ्यांकडून व त्यांनी केलेल्या वस्तू पाहून नक्कीच म्हणता येईल. केवळ वस्तूची निर्मिती नव्हे तर विक्री करून अर्थार्जनसुद्धा इथे केले जाते.
पुणे अंधशाळा ही दृष्टिहीनांसाठी शैक्षणिक व पुनर्वसनासाठी काम करणारी पुण्यातील एक मान्यवर संस्था आहे. २८ फेब्रुवारी १९३४ साली या संस्थेची सुरुवात झाली. व्यवसायाने नेत्रतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर एस. आर. माचवे यांना त्यांच्याकडे येणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या व्यक्तीबाबत काही केले पाहिजे, असे वाटत असे. ज्यांची दृष्टी पुन्हा येऊ शकणार नाही, त्यांच्या जीवनात प्रकाश कसा निर्माण करायचा या चिंतेने त्यांना ग्रासून टाकले, त्यातूनच त्यांना हा शिक्षणाचा मार्ग सापडला आणि त्यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सोडून हे शैक्षणिक कार्य हाती घेतले, जे आज वटवृक्षाच्या स्वरूपात विस्तारित झाले आहे. सुरुवातीस संस्थेत फक्त अंध मुलांना प्रवेश दिला जात असे, त्यानंतर म्हणजेच १९९५पासून अंध मुलींनाही शाळेत प्रवेश दिला जाऊ लागला. मुलीसाठी स्वतंत्र शाळा काढण्याचे स्वप्न त्यांच्या सुकन्या मंगलाताई देसाई यांनी पूर्ण केले. आज अंध मुलींची शाळा स्वतंत्रपणे चालू आहे, या दोन्ही संस्थांमध्ये मिळून सुमारे ३०० अंध विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. सर्व सोयींनीयुक्त असे वसतिगृह इथे आहे. या संस्थेत शासनाचे ७५% अनुदान व ट्रस्टचे २५% अनुदान आहे. काळाच्या गरजेनुसार अंध मुलींच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी १९७९पासून अंध मुलींसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. १९८८ पासून संस्थेने बालवाडी शिक्षणाची सुरुवात केली. अंध मुला-मुलींना शिक्षणाची सोय महाराष्ट्रातून होत असतानाच त्यांना शिक्षकाची उणीव भासू लागली आणि म्हणून महाराष्ट्र राज्य समाजकल्याण विभाग यांनी शिक्षक प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी संस्थेवर १९९० पासून सोपविली. ‘तमसो मां ज्योतिर्गमय’ या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल अखंडपणे गेली ६४ वर्षे चालू आहे. संस्थेत मुलीसाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम साजरे केले जातात, यात अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातही आवर्जून विद्यार्थी भाग घेतात. उदाहरणार्थ, तुकाराम, ज्ञानेश्वर पालखी, दहीहंडी, रामजन्मोत्सव असे कार्यक्रम केले जातात. पुणे अंध विद्यालयाचं गणेशोत्सवात दरवर्षी पथक असतं.
येथील मुले कौटुंबिक वातावरणात तर राहातातच; पण संस्कृती, मूल्यांची उपासना करत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला विकसित करतात, याचे श्रेय इथल्या कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक यांना नक्कीच आहे.
या शाळेत शारीरिक, भावनिक, शैक्षणिक आणि सामाजिक फरकासह विविधता असलेले विद्यार्थी शिक्षण घेतात. माँटेसरी ते माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षापर्यंतचे मोफत शिक्षण, निवास, भोजन पुस्तके, वैद्यकीय मदत इत्यादी इतर सर्व सुविधा येथे पुरविल्या जातात.
पूर्व प्राथमिक विभागात माँटेसरी आणि ब्रेल वर्गाचा समावेश आहे. हे वर्ग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त प्रशिक्षणासाठी सुंदर साधने, मुलांसाठी खेळणी आणि मनोरंजनात्मक साधने यांनी भरलेली आहे.
महिलांनाही व्यावसायिक प्रशिक्षण इथे दिले जाते. खडू बनवणे, मेणबत्ती बनवणे; तसेच महिलांना विणकाम, हातमागाचे सामान, साधे शिवणकाम, नोकरीचे काम, लिफाफा बनवणे, चॉकलेट तयार करणे इत्यादी प्रशिक्षण दिले जाते.
ट्रस्टने १९९० मध्ये एक शिक्षण-प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. ज्याला भारतीय पुनर्वसन परिषद, नवी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात ही सुविधा देणारे दुसरे केंद्र नसल्याने शिक्षण-प्रशिक्षण केंद्राला मोठी मागणी होती. त्यामुळे महाराष्ट्रासाठी पुण्यात शिक्षण-प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. आजपर्यंत जवळपास २०० शिक्षकांना यशस्वीरीत्या प्रशिक्षण मिळाले आहे.
पुस्तके बहुतेक ब्रेलमधील अंध मुलांना उपलब्ध असतात. जसे की, कथा पुस्तके, कविता, कादंबरी साहित्य आणि शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके.
शाळेच्या जाहिरातीप्रमाणे खेळाचे मैदान, समृद्ध ग्रंथालय यांसाठी सर्व सुविधा, शेतीकाम करण्यासाठी औजारे हे सर्व प्रत्यक्षात इथे आहे.
मशीनमध्ये कापडी शिवणकाम करताना सुईमध्ये धागा कसा घालायचा हे शिकवल्यानंतर व मुलींना समजावल्यानंतर आपोआप त्या मशीनमध्ये सराईतपणे धागा घालतात. चॉकलेट्स, पर्स, विणकाम, भरतकाम केलेले कपडे अशा कितीतरी वस्तू अंध मुली बनवतात व त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात.
ब्रेल मशीनच्या साहाय्याने वाचन, लेखन, अंकगणित या सर्व गोष्टी मुली करतात. ब्रेल शिकविणाऱ्या शिक्षिका या येथील विद्यार्थिनीच होत्या.
व्यंगावर मात करता येते व स्वतःलाही घडवता येते, हें या शाळेत प्रत्यक्ष घडतं.
मुलांच्या संदर्भातल्या समस्या म्हणजे मुले स्क्रीन टाईमचा वापर खूप करतात, त्यासाठी पालक हतबल आहेत.
एखाद्या वस्तूच्या अति वापरामुळे आपणच एखादं व्यंग निर्माण करतो. व्यंगावर मात करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. यापूर्वीही अनेकांनी व्यंगावर मात केली आहे, हे आमच्या मुलांना कळायला हवं.
निसर्गाने दिलेल्या पंचेंद्रियांच्या साहाय्याने आपण परस्पराशी सभोवतालच्या जगाशी संवाद साधतो. संवादाला जशा मर्यादा आहेत तशा प्रत्येक इंद्रियाच्याही मर्यादा आहेत.
अशा ही काही व्यक्ती आहेत की ज्यांची ज्ञानेन्द्रिये निसर्गाने हिरावून घेतली तरीही त्यांच्या आशावादी मनोवृत्तीने विलक्षण जिद्द आणि अपरंपार परिश्रमशीलता याच्या जोरावर त्यांनी साऱ्यावर मात केली. आपले स्वतःचे जीवन परिपूर्ण केलेच; पण जगातील सर्व अंध, मूक, बधिर यांनाही प्रगतीच्या विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. त्या हेलन केलरचं जीवन वेधक रोमांचक स्फूर्तिदायक आहे.
हेलन केलर हे माणसाच्या आत्मविश्वासाचे आणि अपराजित विजिगिषु वृत्तीचे एक सुंदर प्रतीक आहे. जगातील सर्व अंध, मूक, बधिर यांना प्रगतीच्या विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. ती आंधळी, बहिरी व मुकी होती; पण केवळ जिद्दीने सर्व अडथळे तिने पार केले.
हेलनची तर तीन ज्ञानेन्द्रिये निसर्गाने हिरावून घेतले होते. फक्त परस्परांशी संपर्क जोडण्याचे स्पर्श हे एकमेव साधन लाभूनही तिने मोठ्या परिश्रमाने अनेक लोकांनाही मान मिळवून दिला. जे अधिक सहानुभूतीने वाढवले जात आहेत त्यांच्या जीवनात आशा निर्माण करणं याला हेलनचेच कर्तृत्व कारणीभूत आहे.
एकेकाळी अपंग माणसांना जगावेगळे मानले जात असे त्यांना कटाक्षाने दूर ठेवले जाई. अपंगाबद्दलची सर्वसामान्य माणसाची वृत्ती बदलण्याचे श्रेय हेलन यांनाच देता येईल. हेलनने केवळ स्वतःच्या व्यंगावर विजय मिळवला नाही, तर सर्वच अपंगाविषयी जगाची सहानुभूती संपादन करण्यात तिने आपले आयुष्य वेचले.
अपंग लोकांना सर्वात अधिक आवश्यकता जर कशाची असेल तर ती तज्ज्ञ आणि सहृदयी अशा शिक्षकाकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची.
प्रसिद्ध ग्रीक कवी होणार हा आंधळा होता. जॉन मिल्टने आपलं सर्वश्रेष्ठ काव्य दृष्टी गेल्यानंतरच लिहिलं आणि थॉमस एडिसन ज्याने विजेच्या दिव्याला कार्यक्षम स्वरूप दिलं, तो अगदी ठार बहिरा होता. खरोखर यशस्वी जीवन जगण्यासाठी आपली सारीच ज्ञानेंद्रिय कार्यक्षम असावी लागतात असं मुळीच नाही.
अंधासाठी लिपी ब्रेल नावाच्या एका आंधळ्या माणसानेच तयार केलेली आहे. ब्रेल वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी एका अपघातात आंधळा झाला होता. पुठ्ठ्यावर उठावदार टिंबाच्या लिनीच्या साहाय्याने त्यांचे शिक्षण झाले; पण ब्रेल सुमारे वीस वर्षांचा झाला तेव्हा अंधासाठी एखादी सहजसुलभ लिपी हवी असे त्याला वाटू लागले. उठावाच्या अक्षरांच्या साहाय्याने अक्षरओळख करून घेणे, हे अंदाजाबाबतीत फार अडचणीचे व गुंतागुंतीचे होते आणि मग ब्रेलने स्वतःच टिंबावर आधारलेली ही नवीन लिपी शोधून काढली. हेलनने ब्रेन लिपी शिकून घेतली. व्यंगावर मात कशी करायची हे आजच्या पिढीला समजायला हवं. निसर्गाने दिलेल्या व्यंगावर मात काही प्रमाणात करता येते; पण आपण स्वतःच मोबाईलच्या साहाय्याने स्वतःमध्ये व्यंग निर्माण करत आहोत हे आमच्या मुलांना कळायला हवं.
काहीजण या शाळेतच शिक्षण पूर्ण केलेले व आता शिक्षकाची भूमिका निभावणारे शिक्षक आहेत; तसेच मुख्याध्यापकही आहेत.
अंधाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही समाजाचा बदलत नाही. हेलन केलरची यशोगाथा आपण वाचली; पण ती प्रत्यक्षात अनुभवायची असेल तर इथल्या अंध मुली व त्यांनी तयार केलेल्या वस्तू पाहिल्यावर प्रत्येकीचीच इथे यशोगाथा जाणवते.