(पूर्वप्रसिद्धी – ‘अग्रलेख’ दिवाळी अंक २०२५)
पुण्याच्या कोंढवा भागात एक लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे ज्याचे नाव ‘साळुंखे विहार’ आहे. आता हे साळुंखे कोण हे पुण्यातल्या तरी किती जणांना माहीत असेल याबाबत शंकाच आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायला हवे की भारतीय सैन्यातील शूर हुतात्मा जवान ‘पांडुरंग साळुंखे’ यांच्या नावाने ही वसाहत उभी आहे.
पांडुरंग यांचा जन्म १ मे १९५० रोजी सांगलीतल्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळकृष्ण तर आईचे नाव सुंदराबाई होते. पांडुरंगना एक मोठा भाऊ आणि एक धाकटी बहीण होती. अगदी झोपडपट्टीवजा घरात हे कुटुंब राहत असे. ओढाताणीच्या परिस्थितीत घर चाललेले असताना या कुटुंबावर अजून एक घाला झाला तो म्हणजे बाळकृष्ण यांचे अकाली निधन झाले. यावेळी सगळी भावंडे शाळेतच होती. यानंतर त्यांच्या आईने खूप कष्टाने घर चालवले. पांडुरंग स्वभावाने अगदी चुणचुणीत, धाडसी व मनमिळावू होते. शाळेत त्यांचे फारसे लक्ष लागत नसे, पण व्यायामाची मात्र खूप आवड होती. १९६५ साली भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तेव्हा ते पंधरा वर्षाचे होते. त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला आणि तरुणांना सैन्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या घटनेने त्यांना सैन्यात जायची प्रेरणा मिळाली.
जेमतेम सातवी पास झाल्यानंतरच ते सैन्यात सामील होण्याच्या तयारीला लागले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि १८ व्या वर्षीच शिपाई म्हणून ‘मराठा रेजिमेंट’मध्ये त्यांचा सैन्यात शिरकाव झाला. पांडुरंगना सैन्यातली नोकरी मिळाल्यामुळे घरच्यांनाही खूप आनंद झाला आणि आईचे कष्टही काहीसे कमी झाले. थोड्याच काळात विशी पार झाल्याने आणि चांगली नोकरी असल्याने पांडुरंगना लग्नाची अनेक स्थळे सांगून येऊ लागली. आईने खूप आग्रह गेल्यानंतर आणि अनेक पत्रे पाठवल्यावर, पांडुरंग लग्नाला तयार झाले. वरिष्ठांच्या परवानगीने ते गावी लग्नासाठी आले आणि मुली बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पण दैवाच्या मनात दुसरेच काहीतरी होते. हा १९७१ चा काळ होता ज्यावेळी भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग दाटू लागले होते. त्यामुळे आठवड्याभरातच त्यांना ऑफिसमधून तार आली, ज्यात लगेच नोकरीवर रुजू होण्याचे आदेश होते. यामुळे त्यांची आई आणि धाकटी बहीण अक्षरशः रडवेली झाली. पण नोकरी आणि देशसेवेपुढे काही पर्याय नव्हता. त्यामुळे आईचा आशीर्वाद घेऊन पांडुरंग तसेच नोकरीवर रुजू झाले.
पांडुरंग मराठा रेजिमेंटमध्ये ’१५ लाईट इन्फंट्री’मध्ये सेवेवर होते. सप्टेंबर १९७१ मध्ये पांडुरंग यांची बटालियन पंजाबमधील अमृतसरच्या ईशान्य भागात संरक्षणासाठी तैनात करण्यात आली होती. पाकजवळील तेथील भारताच्या सीमेचे आणि चौक्यांचे रक्षण करणे हे या रेजिमेंटचे मुख्य काम होते. त्यांच्या तुकडीचे प्रमुख म्हणून ‘मेजर रणवीर सिंग’ यांची नियुक्ती झाली. युद्ध सुरू झाल्यावर पंजाब सेक्टरच्या उत्तरेकडच्या ‘भागूकमान’पासून ते दक्षिणेकडील ‘पुंगा’पर्यंतच्या महत्वाच्या पट्टयातील भिंडी, मेहरा, फतेहपूर इत्यादी महत्वाच्या चौक्यांवर पाकिस्तानी फौजांनी अचानक हल्ला केला. ३ डिसेंबर १९७१ च्या रात्रौ पाकिस्तानी सेनेतील कडव्या ‘बलुची पठाण रेजिमेंट’च्या ‘४३ व्या बटालियन’ने प्रचंड संख्याबळाच्या ताकदीने आणि अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, रॉकेट लॉंचर, मशीनगन्स, तोफांच्या सहाय्याने भारतीय चौक्यांवर बेछूट हल्ला चढविला. त्या तुफानी हल्ल्यासमोर चौक्यांवर तैनात असलेले भारतीय जवान टिकाव धरू शकले नाहीत आणि पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवला.
या उंचावरील चौक्या परत मिळविणे हे मोठे आव्हान होते. त्याठिकाणी डेरेदाखल असलेल्या ‘१५ मराठा लाइट इन्फंट्री बटालियन’ने हे आव्हान स्वीकारले. चौक्या सोडून आलेल्या जवानांच्या मदतीने मराठा बटालियनच्या जांबाज सैनिकांनी क्षणाचाही विलंब न करता, कडव्या बलुच पठाणांच्या बलाढ्य तुकडीवर हल्ला चढवला. मराठा बटालियनच्या वीरांनी केलेला प्रतिहल्ला यशस्वी करुन अनेक चौक्या परत मिळवल्या. आता दोन्हीकडील फौजा समोरासमोर होत्या. मात्र दुसीबंद, बेहलोक, गोगा या उंचावरील चौक्यांवरून पकिस्तानी फौजांना हुसकवणे कठीण काम होते. मराठा बटालियन खाली मैदानी भागात होती. त्यांच्या मदतीला त्यावेळचा प्रभावशाली वैजयंता रणगाड्यांचा ताफा होता, परंतु त्यांचा योग्य उपयोग होत नव्हता नव्हता. कारण शत्रू उंचावर होता आणि त्यांचे रणगाडाभेदक अमेरिकन रॉकेट लाँचर तैनात होते.
मराठा बटालियनची नामुश्की पाहून पाकिस्तानी सैन्य जणू जश्न साजरा करीत होते. हवेत गोळीबार करुन मराठा सैन्याला हिणवत होते, आव्हान देत होते. खाली तैनात असलेल्या मराठा जवानांचे रक्त खवळत होते. पण आदेश मिळत नसल्याने माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. डिसेंबरची सहा तारीख उजाडल्यावर मेजर रणवीरसिंग यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला तेव्हा माघार घेण्याचे संकेत मिळाले. परंतु अंतिम निर्णय मेजरसाहेबांवर सोडण्यात आला. पण मैदानातून माघार घेतील ते मराठे कसले? दुसीबंद चौकीवरच्या पाकिस्तानच्या रॉकेट लाँचरचाच मोठा धोका होता, ज्यांचा बंदोबस्त केला असता तर बाजी पलटू शकली असती. अखेर एकवीस वर्षाचे जवान साळूंखेनी पुढाकार घेतला. मेजर साहेबांना म्हणाले, ‘सर शत्रूच्या रॉकेट लॉंचरचा मी बंदोबस्त करतो, तुम्ही रणगाड्यांसह चाल करुन दुसीबंदवर ताबा मिळवा.’ खरेतर त्यांचा हा आत्मघातकी निर्णय होता. पण कोणाचीही माघारही घ्यायची तयारी नसल्याने अखेर मेजरनी या योजनेला परवानगी दिली.
शेकडो शूर मावळे अंगात एकत्र संचारलेले पांडुरंग सापासारखे सरपटत खाचखळग्यातून मार्ग काढत दुसीबंदच्या दिशेने निघाले. शत्रूच्या रॉकेट लाँचरवर कब्जा करायचा एकच ध्यास होता. शत्रूची नजर चुकवत पांडुरंग चढावरील अंतर कापत होते. सरपटण्यामुळे पोटावर, हातापायावर जखमा होऊ लागल्या. खाली भारतीय सैनिक माघार घेण्याच्या हालचाली शत्रूला जाणवत असल्याने आणि भारतीय सेना एवढ्या उंचावर येऊ शकत नाही अशी खात्री असल्यामुळे बलोची गाफील होते. दरम्यान पांडुरंग सरपटत वरती पोहोचले. संध्याकाळी पावणेसातची वेळ, थकव्यामुळे डोळ्यावर अंधारी येत होती. घशाला कोरड पडत होती, पण पाण्याचा घोट घ्यायलाही वेळ नव्हता. एकेक क्षण महत्वाचा होता. पांडुरंगनी संध्याकाळच्या संधीप्रकाशातही शत्रूच्या रॉकेट लॉंचरची जागा हेरली. अंगातले सारे बळ एकवटून पांडुरंगनी रॉकेट लाँचरधारी आडदांड बलोची सैनिकावर बंदुकीच्या दस्त्याने प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने बलोच कोसळला. एक क्षणही वाया न घालवता पांडूरंगनी रॉकेट लाँचरचा ताबा घेतला आणि शत्रुच्याच दिशेने बार उडवला.
खाली मेजर साहेबांना हा इशारा होता. वर दुसीबंद चौकीवर एकच खळबळ माजली. पाक सैन्याने पांडुरंगना घेरले. जास्त लोकांनी चौकीवर चढाई केली असावी असा त्यांचा समज झाला म्हणून बलोची पठाणांची धावपळ चालू झाली. याच संधीचा फायदा घेऊन भारतीय सैन्याचा विजयंता रणगाड्यांचा ताफा धुरळा उडवत सुसाट निघाला. पांडुरंगनी रॉकेट लाँचर खाली फेकले होते. एकटे पांडुरंग अनेक पाकिस्तानी सैनिकांशी प्राणपणाने लढत होते. इतक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी दुसीबंद चौकी हादरुन गेली. ‘१५ मराठा बटालियन’चे मावळे दुसीबंदच्या टेकडीवर पोहोचले. पुढच्या लढाईत मराठ्यांच्या प्रतिहल्ल्यासमोर बलोची पठाणांनी नांगी टाकली. हत्यारे टाकून पाकिस्तानी सैनिक पळाले. कित्येकांना मराठ्यांनी ठार केले. कित्येक पळता पळता रावी नदीत बुडाले. सुमारे दोनशे बलोची पठाणांच्या प्रेतांना वीर मराठ्यांनी रावीच्या पात्रात जलसमाधी दिली. शिवाय दोन ट्रक पाकिस्तानी हत्यारे, दोन RCL गनमाऊंट असलेल्या जीप गाड्या ताब्यात घेऊन मराठा जवानांनी मोठा पराक्रम केला. इकडे पांडुरंगच्या शरीराची मात्र चाळण झाली होती. अखेरची घटका मोजताना मोहिम फत्ते झाल्याच्या आनंदात मायभूमीचा जयघोष करीत पांडुरंग वीरगतीस प्राप्त झाले.
हुतात्मा पांडुरंगांच्या या अतुलनीय शौर्याला ‘महावीर चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते हा शौर्य पुरस्कार वीरमाता सुंदराबाई यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तत्कालिन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी मणेराजुरी गावात पांडुरंग यांच्या घरी जाऊन वीरमाता सुंदराबाई यांचे सांत्वन केले. आज मणेराजुरीच्या चौकात हुतात्मा पांडुरंगांचा पुतळा बसविला असून दरवर्षी सहा डिसेंबरला मराठा रेजिमेंटचे अधिकारी मिलीटरी बँडसह संचलनाद्वारे या पुतळ्याला महावीर चक्र घालून मानवंदना देतात. बेळगावला मराठा रेजिमेंटच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा त्यांचा पुतळा आहे. मणेराजुरी येथील शाळा, कॉलेजला देखील पांडुरंग यांचे नाव दिले आहे. या घनघोर युद्धाला ‘बुर्जची लढाई’ म्हणून भारतीय लष्करी इतिहासात मानाचे स्थान आहे. ‘पंधरा मराठा बटालियन’ला ‘बुर्ज बटालियन’ हा किताब मिळाला आणि ‘सर्वोत्तम बटालियन’ म्हणून गौरविण्यात आले. त्यातील पंधरा वीर जवानांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. या लढाईत बटालियनचे अकरा जवान हुतात्मा झाले आणि मेजर रणवीरसिंगसह पाच जवान जखमी झाले. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ‘४३ बलोच रेजिमेंट’चा असा दारुण पराभव झाल्याने पाकिस्तानने ती रेजिमेंट’च रद्द केली.
“मर्द मराठा लय झुंजार, भगवा रोवला अटकेपार” या शौर्यगीताला साजेसा पराक्रम हुतात्मा पांडुरंग साळुंखे यांनी गाजवला. आज ते हयात असते तर या वर्षी त्यांची पंच्याहत्तरी साजरी झाली असती. त्यानिमित्ताने या अद्वितीय वीराला कोटी कोटी कृतज्ञ प्रणाम.
जय हिंद !
(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)
– गुरूप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)
