कविकुलगुरू कालिदास यांचे हे तिसरे,वेगळ्या अर्थाने शेवटचे आणि विश्वातील सर्वात श्रेष्ठ नाटक.
या नाटकाचे संविधानक थोडक्यात असे आहे. शिकारीच्या निमित्ताने अरण्यात आलेला राजा दुष्यंत कण्वाश्रमात येतो. इथे त्याला शकुंतला ही कण्व ऋषींची मानलेली कन्या भेटते. परस्परांवर अनुरक्त झालेले ते दोघे गंधर्व पद्धतीने विवाह करतात.
राजा आपले नाव असलेली अंगठी तिला देऊन राजधानीला परततो. तो तिला नंतर घेऊन जाणार असतो.
इकडे आश्रमात राजाच्या चिंतनात गढून गेल्यामुळे अतिथी म्हणून आलेल्या दुर्वास मुनींच्या हाकेकडे तिचे दुर्लक्ष होते. ते संतापून, ज्याचे चिंतन करीत आहे तो तुला विसरून जाईल असा शकुंतलेला शाप देतात.
प्रियंवदा आणि अनसूया या शकुंतलेच्या मैत्रिणी त्यांची क्षमा याचना करतात. त्या वेळी राजाने एखादी गोष्ट दाखवली तर शापाचा अंत होईल असा उ:शाप ते देतात.
तपश्चर्ये वरून परत आलेल्या महर्षी कण्वांना अग्नि शाळेत सर्व वृत्तांत कळतो. ते राजाचे आणि शकुंतले अभिनंदन करतात. राजाच्या येण्याची वाट न पाहता ते ऋषिकुमारां सोबत शकुंतलेला हस्तिनापूरला पाठवतात. राजा गर्भवती शकुंतले चा स्वीकार करीत नाही. त्यावेळी त्याला ओळख म्हणून अंगठी दाखवायची असे मैत्रिणीने सांगितलेले आठवून ती अंगठी दाखवायला जाते पण ती सापडत नाही. राजा तिचा स्वीकार करत नाही.
ज्या शचितीर्थात अंगठी पडली असते तेथील एका कोळ्याला ती माशाच्या पोटात सापडते. तो विकायला आल्यानंतर व्यापाऱ्याच्या द्वारे अंगठी राजापर्यंत येताच राजाला सर्व वृत्तांत आठवून तो व्यथित होतो. अशाच अवस्थेत इंद्राच्या आमंत्रणावरून असुरांसोबत लढण्यासाठी तो स्वर्गात जातो. परत येताना हेमकूट पर्वतावर महर्षी कश्यप यांच्या आश्रमात शकुंतला आणि तिला झालेला सर्वदमन नावाचा पुत्र राजाला भेटतो. सर्व गोष्टींचा उलगडा होऊन त्यांचे मीलन होते.
दुष्यंत आणि शकुंतला यांची महाभारताच्या आदिपर्वात, पद्मपुराणात आलेली ही मूळ कथा कालिदासांनी आपल्या प्रतिभेने बदल करीत अजरामर केली. महाभारतातील व्यवहारी शकुंतला कालिदासांनी मुग्धा स्वरूपात बदलवली. दुर्वासांच्या शापाच्या माध्यमातून त्यांनी राजाचे चरित्र अधिक सुंदर केले. अशा स्वभावाचे सखोल चिंतन नाट्यमय प्रसंग आणि उत्कृष्ट संवाद लेखन यामुळे अभिज्ञान शाकुन्तलम् हे जगातले सर्वश्रेष्ठ नाटक ठरले आहे.
अनुश्री गणेश ठाकरे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बीए द्वितीय वर्ष
दि. २०. ०४. २०२२
