देव…फसवणूक का सत्याची जाणीव?

देवानेच आपल्याला फसवलं आहे,
हे वाक्य माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
वेगवेगळ्या आवाजात उमटलं…

लहानपणी…
आईच्या कुशीत झोपताना वाटायचं,
जग खूप सुरक्षित आहे,
देव म्हणजे गोष्टीतला राजा,
जो शेवटी सगळं ठीक करतो…
पण पहिल्यांदा जेव्हा हरवलं एखादं खेळणं,
किंवा तुटली एखादी मैत्री.
तेव्हा कळलं,
“गोष्ट संपली तरी सगळं ठीक होतंच असं नाही…”

किशोरवयात…
स्वप्नांना पंख फुटले होते,
आकाश स्वतःचं वाटत होतं,
पण पहिल्याच अपयशाने
ते पंख जळाले…
रात्री उशिरा देवाला विचारलं,
“मी एवढं मनापासून मागितलं होतं,
मग का नाही दिलंस?”
उत्तर आलंच नाही…
तेव्हाच पहिल्यांदा वाटलं,
देवानेच आपल्याला फसवलं आहे…

तरुणपणात…
प्रेमावर विश्वास ठेवला,
एखाद्या माणसात देव पाहिला…
पण जेव्हा तोच माणूस दूर गेला,
हातातून हात सोडून.
तेव्हा समजलं,
देव कधी कधी माणसांच्या रूपात
आपल्याला तोडतो…

मध्यमवयात…
जबाबदाऱ्या, कर्जं, अपेक्षा,
सगळं पेलताना स्वतःच हरवून गेलो,
आरशात पाहिलं तर
ओळखीचे चेहरेही अनोळखी वाटले…
देवाला विचारलं
“हीच का माझी वाट?”
तो पुन्हा शांत…
आणि ती शांतता
सगळ्यात मोठी फसवणूक वाटली…

वृद्धावस्थेत…
हात थरथरू लागले,
पावलं मंदावली,
आणि आयुष्य मागे वळून पाहताना
एक प्रश्न कायम उरला,
“खरंच, देवानेच आपल्याला फसवलं का?”

कदाचित…
फसवणूक ही त्याची नव्हतीच,
आपणच स्वप्नांना कायमस्वरूपी समजलं,
आपणच नात्यांना शाश्वत मानलं,
आणि अपेक्षांना देवाचं वचन समजलं…

तो तर फक्त उभा होता,
आपल्या प्रत्येक पडण्यात.
प्रत्येक अश्रूमध्ये,
प्रत्येक तुटण्यात…

देवानेच आपल्याला फसवलं आहे,
हे वाक्य अजूनही मनात येतं.
पण आता त्यात राग नाही,
फक्त एक थकलेली जाणीव आहे.

की कदाचित,
देव फसवत नाही…
तो फक्त आपल्याला
सत्याच्या इतकं जवळ नेतो,
की आपलेच भ्रम आपल्याला
फसवणूक वाटायला लागतात…

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author