शुक्रवारी संध्याकाळची साडेसातची वेळ असावी. सगळे सहकारी केव्हाच घरी गेले असून सुद्धा रवी मात्र ऑफिस मधेच बसून होता. पुढे काय होणार ह्या विचारांचे मोहोळ त्याच्या मनात उठले होते. एका मोठया व्यावसायिक आणि वैयक्तिक संकटाच्या कड्यावर तो उभा होता.
एका मोठ्या कंपनीच्या मार्केटिंग विभागाचा तो प्रमुख होता आणि कित्येक मॅनेजर्सची टीम तो हाताळत होता. ह्या असिस्टन्ट [कनिष्ठ] मॅनेजर्सच्या बरोबर मदतीसाठी अनेक शिकाऊ मॅनेजर्स पण होते.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी अंजली ह्या कंपनीत शिकाऊ मॅनेजर म्हणून लागली होती. ती स्वभावाने आक्रमक आणि महत्वाकांक्षी होती, तसेच एका उत्तम संस्थेतून MBA झालेली होती. ती मनमोकळी आणि वागायला मोकळीढाकळी होती. तिच्या ह्या स्वभावामुळे आणि तसेच तिच्यामधील गोष्टी घडवून आणण्याच्या क्षमतेमुळे आणि बऱ्यापैकी असलेल्या नैसर्गिक सौदर्यामुळे, सुरुवाती पासूनच रवीचे लक्ष तिने आकर्षून घेतले होते.
काही काळानंतर तर तिच्या अधिकाऱ्याला बाजूला ठेऊन तो तिच्याशी थेट संपर्क करू लागला होता. आपण काहीतरी चुकीचे करत आहोत ही भावना त्याचे मन कुरतडू लागली होती. असे असूनही रवीकडून स्वतःच्या तारुण्याच्या प्रभावाखाली तिला पाठवलेल्या कौतुकाच्या चिठ्ठ्या हळूहळू जरा जवळीकेच्या होत गेल्या होत्या. संध्याकाळी जरा उशिराच काम संपल्यावर एकत्र बाहेर जेवण घेणेही सुरु झाले. रवीकडून मिळणाऱ्या ह्या अनुकूलतेमुळे, अंजलीने त्याचा फायदा घेऊन दुसऱ्याने केलेल्या कामाचे क्रेडीट घेणे आणि स्वतःच्या चुका सहकाऱ्यांवर ढकलणे सुरु केले. रवीकडूनही संशयाचा फायदा नेहमीच अंजलीला दिला जात होता.
कंपनीमध्ये हळूहळू अफवांचे पीक सुरु झाले. रवी आणि अंजलीच्या समोर खुलेपणाने जरी कोणी बोलत नसले तरी दबकून चर्चा आणि अर्थपूर्ण कटाक्ष टाकले जावू लागले. रवी आणि अंजली दोघेही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहीले. तरुण अंजलीकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मध्यमवयीन रवी कुठेतरी मनातल्या मनात सुखावत होता.
लवकरच एका राजीनाम्यामुळे एक ब्रँड मॅनेजरची जागा रिकामी झाली. रवीच्या मनात एका अतीशय कर्तुत्ववान कनिष्ठ मॅनेजरला त्या जागेवर नेमायचे होते की ज्याला बढती मिळणे आवश्यक होते. परंतु अतिमहत्वाकांक्षी अंजलीने त्या जागेवर तिला बढती मिळावी असा हट्ट धरला. सुरुवातीला रवीने हा विषय टाळायचा प्रयत्न केला, कारण संपूर्ण विभागातील लोकांचे लक्ष त्याच्या निर्णयाकडे लागले होते.
आज तर फारच शर्थ झाली. कारण अंजलीने तिचे खायचे दात दाखवत, तिची मागणी लावूनच धरली. इतकेच नाही तर तिला बढती न दिल्यास तिने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्याची धमकी दिली. शिवाय त्याने तिला पाठवलेल्या चिठ्या आणि इमेल्स त्याच्या बायकोला पाठवण्याची पण धमकी दिली.
रवीला तर आभाळ कोसळल्या सारखेच झाले. एका बाजूला कंपनी मधील चौकशी आणि त्यातून होणाऱ्या बदनामीची भीती आणि दुसऱ्या बाजूला सुखाने चाललेल्या वैवाहिक जीवनाची वाट लागायची शक्यता.
रवी जेव्हढा जास्त विचार करत गेला तेव्हढे त्याच्या लक्षात आले की जर मूल्यांशी तडजोड करून तो जर ह्या दडपणाला बळी पडला तर यापुढे सहकाऱ्यांच्या डोळ्याला डोळा देऊन पाहू शकला नसता आणि मनाची टोच त्याला जन्मभर खात राहिली असती. शांत चित्ताने झोपूही शकला नसता. त्याला ह्याची पण पूर्ण कल्पना होती की एकदा चटक लागली की ब्लॅकमेल करणारी व्यक्ती कधीही थांबत नाही, त्या व्यक्तीच्या मागण्या वाढतच जातात.
ह्या गोष्टीची पुढे सांगता कशी झाली हे पाहू या.
कंपनीकडून दयेची अपेक्षा करणे चूक ठरले असते कारण कोठल्याही कंपनीमध्ये मत्सरी व्यक्ती असतातच. लैंगिक अत्याचार सिद्ध झाला तर त्याबाबतची कंपनीची धोरणे अगदी स्पष्ट होती. नोकरी सोडतांना मिळणारे कुठलेही फायदे न मिळता नोकरीतून बडतर्फ व्हावे लागले असते. याशिवाय सामाजिक नाचक्की झाली असती ते वेगळीच.
हे खरे होते की रवीचे वैवाहिक आयुष्य अत्त्यंत सुखाचे होते. त्याच्या पत्नीवर त्याचे नितांत प्रेम आणि विश्वास होता. स्वतःची मनशांती ढळू नये म्हणून, त्याने सर्व धैर्य एकवटून झालेल्या घटना, कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता आपल्या बायकोला विदित केल्या. तो कुठल्या कठीण परिस्थितीत अडकला आहे आणि त्याचे गंभीर परिणाम काय होतील हे पण त्याने तिला समजावून सांगितले. सुरुवातीला साहजिकपणे ती त्याच्यावर चांगलीच भडकली पण शेवटी एकमेकावरील प्रेमाचा आणि विश्वासाचा विजय झाला आणि तिने त्याला तो जो काही निर्णय घेईल त्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले.
त्यानंतर रवीने अंजलीला ऑफिसात बोलावून ठामपणे सांगितले की तो तिची मागणी मान्य करू शकत नाही. तसेच त्याने हे पण सांगितले की झालेल्या घटनांबद्दल त्याने आपल्या बायकोला सर्व माहिती दिली आहे. आणि त्याच्या बायकोचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे त्यामुळे बायकोने त्याला विनाअट संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.
त्याने अंजलीला सांगितले की तिच्या तरुण मनाला त्याने प्रोत्साहन दिले ही त्याची स्वतःची घोडचूक होती. झालेल्या घटनांचा त्याला पूर्ण पश्चाताप होत असून तिच्यावर कोणताही दुष्परिणाम व्हावा अशी त्याची अजिबात इच्छा नाही. त्याने पुन्हा एकदा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तिची सध्याची वागणूक तिच्याच पुढील आयुष्यात तिच्यासाठी कशी योग्य ठरणार नाही.
त्याने अंजलीला स्वच्छ सांगितले की हा विषय येथेच संपवण्याची त्याची तयारी असून आपण पूर्वीप्रमाणे फक्त चांगले सहकारी म्हणून काम करू या. आणि सर्वात शेवटी त्याने हेही स्पष्ट केले की त्यातूनही तिची धमकी तिने पुढे नेली तर तो येणाऱ्या परिस्थितीस तोंड देण्यास पूर्णपणे तयार आहे. पण याचा परिणाम म्हणून तिला प्रमोशन तर मिळणार नाहीच उलट कंपनीतील आणि बाहेरही तिची प्रतिमा पण कायमची खराब होईल.
हा सर्व घटनाक्रम रवीने मला एका संध्याकाळी क्लब मध्ये निवांतपणे गप्पा मारताना सांगितला होता. चांगली गोष्ट अशी की हे पेल्यातील वादळ तेव्हाच शमले होते आणि त्यानंतर उत्तम काम करत करत, समाधानी आयुष्य व्यतीत करत, अतीशय शांतपणे रवी योग्य वेळी निवृत्त झाला होता.
स्वच्छ मन आणि शांत आत्मा यांच्यासारखी उत्तम उशी नाही.
विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/