प्रवास मूर्तींचा… शोध माणूसपणाचा

आज एक टेम्पो दिसला,
धुळीत हरवलेला, गोंगाटात विरलेला…
आत मात्र शांत बसले होते,
मूर्तीरूपी विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम.

धूळ खाली बसली, रस्ता पुन्हा शांत झाला,
पण मनातला गोंगाट वाढतच राहिला.

मी अजूनही तिथेच उभा होतो,
जिथे देव “जात” होता…
आणि माणूस “राहत” होता.
रिकामा, थोडा हरवलेला.

एक विचार हळूच आत शिरला,
आपण देवाला कुठे नेत होतो?
मंदिरात… की पुन्हा एकदा
आपल्या सोयीच्या चौकटीत बंद करायला?

त्या मूर्तींनी काहीच मागितलं नव्हतं,
ना फुलं, ना नारळ, ना मोठी आरती…
फक्त एक साधा, निरागस भाव,
जो आपण कधीच दिलाच नाही.

आपण त्यांना उचललं, सजवलं, बसवलं…
पण कधी त्यांच्यासारखं जगण्याचा
एक क्षण तरी जगलो का?

ज्ञानेश्वरांच्या ओठांवरचं शांत स्मित
आज जणू विचारत होतं.
“तुम्ही आम्हाला वाचता,
पण स्वतःला का नाही?”

तुकारामांचा आवाज
कुठेतरी हरवून परत येत होता.
“नाम घेताय, पण मन हरवलंय,
देव शोधताय, पण माणूस हरवलाय…”

रखुमाईच्या मायेचा स्पर्श
आज जाणवला…
पण त्या स्पर्शातही एक वेदना होती.
“माझ्या लेकरांनो,
तुम्ही इतके दूर कसे झालात स्वतःपासून?”

आणि विठ्ठल…
तो अजूनही उभाच आहे,
काळाच्या पल्याड, भावाच्या प्रतीक्षेत…
पण आज पहिल्यांदाच असं वाटलं,
तो वाट पाहत नाहीये आपली,
तो वाट पाहतोय
आपण “माणूस” होण्याची…

टेम्पो गेला, मूर्ती पोहोचल्या,
उद्या पुन्हा आरती होईल, घंटा वाजतील…
पण जर मनात दिवा पेटलाच नाही,
तर त्या प्रकाशाचं काय?

आणि शेवटी एक सत्य
हळूच डोळ्यात पाणी आणून गेलं…

देव कधीच हलत नाही…
हलतो तो फक्त आपला विश्वास,
आणि हरवतं ते फक्त,
आपलं “माणूसपण”…

कदाचित म्हणूनच आज
मूर्ती प्रवास करत होत्या…
आणि देव मात्र
आपल्या आत कुठेतरी
एकटा, शांत, आपली
वाट बघत होता…

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author