पावसाची मंद रिपरिप चालली होती त्यामुळे वाहतूक संथ झाली होती. १५ ऑगस्टचा दिवस असल्याने रस्त्यावर गर्दी जरा कमीच होती. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो तेथील झेंडा वंदन नुकतेच संपवून घरी निघालो होतो. सुट्टीचा दिवस असूनही लवकर उठावे लागले होते. मी घरातून निघालो तेव्हा माझी मुलेही तयारी करून शाळेला निघाली होती. संस्थेच्या आवारात आम्ही काही तुरळक माणसे जमलो होतो. कुणाच्याही चेहेर्यावर प्रफुल्ल भाव नव्हता. आमच्यातील एकाने काहीतरी संदर्भहीन भाषण केले. मग संस्था प्रमुखांच्या हस्ते झेंड्याचे अनावरण झाले.
बाहेरून आणलेल्या कागदी कपातील चहा कॉफीचे प्राशन केल्यावर सहकाऱ्यांशी थोडीशी औपचारिक कुजबूज आणि हास्य विनोद करून सर्व जण परत निघालो. हसून मनात विचार होता ‘चला सुटलो एकदाचे. आता २६ जानेवारीपर्यंत चिंता नाही. माझ्या बहुतेक सहकाऱ्यांच्या मनात हीच भावना असणार. ज्यांना झेंडावन्दनास हजर राहावेच लागते ते ह्या सोहळ्याकडे एक जुलूमाचा रामराम असेच बघत असणार. शिवाय स्पष्ट बोलायची पण चोरी. परतीच्या रस्त्यावरील एका शाळेच्या मैदानावर झेंडा वंदनाचा सोहळा चालू असलेला दिसला. पावसाने थोडी उसंत घेतली होती. मी कुतुहल म्हणून माझी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. झेंड्याचे अनावरण झाले होते. सर्व मुलांना मैदानात मातीवर बसविण्यात आले होते. एक शिक्षक कर्तव्य भावनेने मायक्रोफोनवर कर्कश्य आवाजात काहीतरी उपदेशपर बडबडत होता. त्या मुलांचे त्या भाषणाकडे अजिबात लक्ष्य नसल्याचे स्पष्ट दिसत होते. मधूनमधून ‘मुलांनो इकडे लक्ष द्या’ असे आवाहन पण केले जात होते. त्या सर्व सोहळ्याचा उथळपणा पाहून पुढे निघालो.
माझी गाडी सिग्नलला येउन थांबली. एक सहा सात वर्षाची अत्यंत गलिच्छ व फाटके कपडे घातलेली एक कुपोषित मुलगी खिडकीतून मला झेंडा विकायचा प्रयत्न करू लागली. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरचे हेही एक विदारक सत्य आहे. मी मुलांसाठी दोन झेंडे खरेदी केले आणि तिच्या हातावर जरा जास्तच पैसे ठेवून तिला काहीतरी खाण्याची विनंती केली. तिने जरा हसून दुसर्या गाडीकडे कूच केले.
मी शांतपणे हळुहळू कमी होत असलेल्या सेकंदाच्या आकड्याकडे बघत असताना अचानक विचारांचे चाक सुरू झाले. साधारणपणे प्रत्येक २६ जानेवारीला आणि १५ ऑगस्टला सर्वत्र झेंडा वंदन केले जाते. रेडिओवर, टीव्हीवर आणि रस्तोरस्ती देशभक्तीपर गाणी तर कर्कश्य आवाजात दिवसभर ऐकविली जातात. वेगवेगळ्या गर्जना देत, छोट्या मोठ्या मिरवणूका पण निघतात. शाळकरी मुलांना वेठीला धरून तास दोन तास अत्यंत कंटाळवाणी बौद्धिकपर साचेबद्ध भाषणे दिली जातात. गांधी, नेहरू, शास्त्री, सुभाषबाबू, शिवाजी, संभाजी, स्वातंत्र योद्धे इत्यादी आत्ता जिवंत नसलेल्या लोकांनी देशासाठी व स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाची आणि कामाची आठवण करून दिली जाते. एकाही जिवंत व्यक्तीचे, राष्ट्रभक्तीच्या संदर्भात उदाहरण सहसा दिलेले आढळत नाही. आणि नंतर मनातल्या मनात चला आता सुटलो एकदाचे पुढील ६ महिन्यांसाठी, अशा भावनेने आपण सर्व जण पुन्हा नेहमीच्या जीवनात मग्न होतो.
याशिवाय मधून मधून मेणबत्त्या अथवा पत्रकांचे कागद घेऊन मिरवणुका काढणे, घराघरांवर झेंडे लावणे किंवा सिनेमागृहात राष्ट्रगीतासाठी उभे राहाणे हे सुद्धा राष्ट्रभक्ती दाखविण्याचे उथळ प्रकार केले जातात अथवा करावे लागतात. राष्ट्रभक्तीला एक प्रकारचा दांभिक मुखवटा चढविला गेला आहे. अर्थात हे उघडपणे मान्य करायला पण धाडस पाहिजे.
सत्य हे आहे की स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यावेळच्या नेत्यांनी जे हाल सहन केले आणि जे त्याग केले ते आत्ताच्या संदर्भात कोणी करायचे म्हंटले तरी करता येणार नाहीत. आज आपण स्वतंत्र आहोत. गेल्या ७५ वर्षात राजकीय परिस्थिती, समाजव्यवस्था, तंत्रज्ञान आणि लोकांच्या अपेक्षा खूप बदलल्या आहेत. त्यामुळे तरूणाईला त्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रभक्तीपर गोष्टीं ऐकायला आवडत असल्या तरी त्यांच्या जीवनात संदर्भ लागत नाही. यासाठीच एकविसाव्या शतकातील राष्ट्रभक्तीपर आचरण कसे असावे यावर विचार करणे आवश्यक ठरते.
आता राष्ट्रोद्धारातून राष्ट्रभक्ती दाखविणे आवश्यक आहे आणि शक्यपण आहे. आता त्याग, हालअपेष्टां, घरादारावर नांगर फिरविण्यापेक्षा, जास्त जरुरी आहे ती चांगले नागरिक बनण्याची. उत्तम नागरिक होणे आणि मुलांनाही तसे बनविणे हीच एकविसाव्या शतकातील खरी राष्ट्रभक्ती.
सोप्या कृती –
सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे,
वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे,
आपल्या पाळीव प्राण्याची विष्टा रस्त्यावर न सोडणे,
सार्वजनिक ठिकाणी गोंगाट न करणे,
कारण नसतांना गाडीचा हॉर्न न वाजविणे,
रांगेची शिस्त न मोडणे,
शक्यतो पाण्याचा वापर कमी करणे,
खरेदीसाठी कापडी पिशवी वापरणे, प्लास्टिक शक्यतो न वापरणे,
पुरेशी माहिती नसतांना उठसूठ टीका न करणे,
न चुकता मतदान करणे,
हळूहळू अंगवळणी आणावयाच्या कृती –
नोकरीच्या जागी कामचुकारपणा न करणे.
भ्रष्टाचारी वागणूक स्वतःहून न करणे किंवा सुचविणे,
योग्यवेळी न चुकता कर भरणे,
आपणच आपल्यासाठी केलेल्या कायद्यांचे पालन करणे, ,
शक्य तेव्हडी झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे,
समाजातील गरजूंना आपल्या उत्पन्नातील काही भाग निरपेक्षपणे देणे,
मुलांना घरातील कामामध्ये हातभार लावण्यास शिकविणे,
वरीलपैकी बऱ्याच कृती सहज शक्य आहेत पण आपणच खूप वेळा दुसऱ्यांच्या चुकीच्या वागणुकीचा आधार घेउन आपल्या चुकीच्या वागणुकीवर पांघरूण घालत असतो.
बघा पटतय का? चला, नुसतीच सद्य परिस्थितीवर टीका करत बसण्यापेक्षा, प्रत्यक्ष आचरणातून जमेल तेव्हढी, राष्ट्रोद्धारास मदत करता येते का ते बघूया.
जर तुम्हाला वाटत असेल की एखादी गोष्ट तुम्हाला जमेल किंवा जमणार नाही, तर दोन्ही पर्याय खरे असतात. कारण तुमचे मनच निकाल काय होणार हे ठरवीत असते.
विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/