ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई,
पाहीन गडे त्या हिरव्या हिरव्या राई ।
त्या विमल जलासह वळणे वळणे घेत,
हिंडेन झऱर्यांच्या शीतल कुंजवनात ।
दरडीवर बसल्या चढून चिमण्या वेली,
परि हाय फुलांची पाखर पायाखाली ।
उचलून उराशी धरीन चुंबुनि त्याते,
गुंफिन तयांची माला मी निज हाते ।
ती हरिण-बालके नयनी पाहुनि माते,
म्हणतील आज हे नवेच कोणी येथे ।
उडतील भरारा राघू बोलत बोल,
आकाश मंडळी त्यांची माळ खुलेल ।
कुरणातहि किलबिल करिती बहिणी सात,
मी बघेन भांडण कसले चाले त्यांत ।
Post Views: 24