आनंदवर्धन नामक अलंकार शास्त्राचे श्रेष्ठ ग्रंथकार होऊन गेले. ध्वन्यालोक या त्यांच्या ग्रंथाने साहित्यचर्चेला जे वळण लावले ते उत्तरकाली मान्य झाले. आनंदवर्धन काश्मीरचा राजा अवंतिवर्मा याच्या विद्वत्सभेत होता.तेव्हा आनंदवर्धनाचे लेखनकार्य नवव्या शतकाच्या मध्यात चालू होते, असे मानावयास हरकत नाही. आनंदवर्धन हा कवी, तत्त्वज्ञ आणि साहित्यमीमांसक होता.
अर्जुनचरित हे संस्कृत महाकाव्य, विषमबाणलीला हे प्राकृत काव्य देवीशतक हे स्तोत्र, तत्त्वालोक व धर्मोत्तमाविवृत्ति हे दार्शनिक ग्रंथ आणि ध्वन्यालोक हा साहित्यशास्त्रीय ग्रंथ अशी त्याची ग्रंथसंपत्ती आहे.
कारिका, वृत्ती आणि उदाहरणे असे ध्वन्यालोकाचे स्वरूप आहे. उदाहरणे प्रसिद्ध काव्य- नाटकांतून घेतली आहेत. वृत्ती आनंदवर्धनाची आहे. कारिकांच्या बाबतींत मात्र अभ्यासकांत मतभेद दिसतात.
कारिकांचा लेखक आनंदवर्धनाहून वेगळा आहे, असे कित्येक मानतात तर कारिका आणि वृत्ती या दोहोंचाही लेखक आनंदवर्धनच आहे असे दुसरे काही मानतात. उत्तरकाली मात्र ध्वनिकार म्हणून आनंदवर्धनच प्रसिद्ध झाला.
ध्वन्यालोक ह्या ग्रंथाचे चार उद्योत आहेत. ‘काव्यस्यात्मा ध्वनिः’ या प्रसिद्ध वाक्याने ग्रंथाचा आरंभ होतो. रसिकाला आकृष्ट करणाऱ्या काव्यार्थात दोन अंश आढळतात. एक वाच्यार्थ आणि दुसरा प्रतीयमान. वाच्यार्थ हा उपमादिक अलंकारांच्या रूपात प्रकट होतो. या वाच्यार्थाहून वेगळ्या असा जो अर्थ महाकवींच्या काव्यांत रसिकांना प्रतीत होतो तो प्रतीयमान होय. हा प्रतीयमानच काव्याचा आत्मा आहे. काव्यातून प्रतीयमान जेव्हा प्राधान्याने अवभासित होतो. यालाच आनंदवर्धनाने ध्वनी असे म्हटले आहे.
ध्वनीला स्वतंत्र स्थान द्यावयास काही आलंकारिक अनुकूल नव्हते. ध्वनी म्हणून वेगळी अशी वस्तू नाहीच, असे कित्येक म्हणत ध्वनी असला तरी तो लक्षणेतच अंतर्भूत होतो असे दुसरे कित्येक म्हणत, तर तो स्वतंत्रपणे जाणवत असला, तरी त्याचे निर्वचन करता येत नाही असे तिसरे कोणी म्हणत.
या सर्व आक्षेपकांचे समाधान करून आनंदवर्धनाने प्रथमोद्योतात ध्वनीचे सामान्य लक्षण केले आहे. द्वितीयोद्योतात ध्वनिप्रभेदांचे व्यङ्ग्यमुखाने विवेचन करून रसभावस्वरूप असंलक्ष्यक्रमध्वनीच्या संदर्भात रसवत्, गुण, अलंकार इ. काव्यांगांची व्यवस्था लावली आहे. तृतीय उद्योतात व्यंजकमुखाने ध्वनिविवेचन करून पद, वाक्य, प्रकरण, प्रबंध, रीती, वृत्ती हे सर्व रसादींचे अभिव्यंजक कसे होतात, हे दाखविले आहे आणि शेवटी ध्वनी, गुणीभूतव्यंग्य आणि चित्र या काव्यप्रकारांची उपपत्ती लावली आहे. चौथ्या उद्योतात काव्याचे प्रधान कारण जी प्रतिभा तिचे वर्णन असून प्रतिभेच्या बळावर महाकवी जुन्या गोष्टींनासुद्धा नवीन रूप कसे देतात हे दाखविले आहे व अखेर सत्कवीने शब्दचमत्कृतीच्या मागे न लागता रसभावयुक्त काव्यच निर्माण करावे, असे सांगितले आहे. आनंदवर्धनाने अशा प्रकारे सर्व काव्यांगांची व्यवस्था लावली.
ध्वनिविवेचन आनंदवर्धनाने केलेले असले, तरी ध्वनिविचार हा त्याच्या पूर्वीचा आहे. या विचाराचा उगम स्फोटवादात आहे असे ग्रंथकारच सांगतो. भामह, उद्भट, वामन यांनाही ध्वनीची कल्पना आली होती पण त्यांचे ते स्फुरण अस्फुट होते. आनंदवर्धनाने ते स्फुटतेने विवेचित करून शास्त्रीय आधारावर प्रतिष्ठित केले.
अशा रीतीने ध्वनी शास्त्र या विषयावर ध्वन्यालोक हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.
तृप्ती अनंत वाघमारे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. भाग २
दि. १४. १२. २०२२
